पुणे- बकाल झालेले, अन गुन्हेगारुने वेढलेले पुण्याचे दक्षिण द्वार आता मद्य विक्रीच्या गैर प्रकारात देखील आघाडीवर असल्याचे दिसून येत असून या परिसरात ओरीजनल मद्य विकण्याऐवजी गोव्याची स्वस्तातील दारू विकून संपत्ती जमविण्याच्या व्यवसायाचा पर्दाफाश आता होऊ लागला आहे.
राज्य उत्पादन शुल्क राज्य आयुक्त विजय सुर्यवंशी , संचालक सुनिल चव्हाण ,यांच्या आदेशान्वये व विभागीय उपआयुक्त श्री. विजय चिंचाळकर तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे चरणसिंग राजपूत ,उप-अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, पुणे या विभागाने बिबवेवाडी गावच्या हद्दीत, शिवतेज नगर, अप्पर, बिबवेवाडी, या ठिकाणी छापा घातला असता, सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेला परंतू महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्याकरीता प्रतिबंदीत असलेले विदेशी मद्य १८० मिली क्षमतेचे ९६ सिलबंद बाटल्या एक दुचाकी वाहनासह आढळून आले. सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल सदरचा मुद्देमाल आरोपी क्र. १ हा त्याच्या स्वतःच्या घरात साठा करुन ठेवला असल्याचे सांगितले, त्यानुसार अप्पर, बिबवेवाडी, पुणे-३७ या ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी विविध ब्रॅण्डचे ७५० मिलीचे ३६ सिलबंद बाटल्या व १८० मिली क्षमतेचे ४८० सिलबंद बाटल्या (१३ बॉक्स) आढळून आले. सदर आरोपी इसमांना अवैध विदेशी मद्याबद्दल आधिक चौकशी केली असता, सदर गोवा बनावटीचे विदेशी मद्य त्यांनी आरोपी क्र. ३. रा. कात्रज पुणे याच्या राहत्या घरातून दुचाकी/तीनचाकी प्रवासी वाहनाने आणल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरुन या कार्यालयाच्या स्टाफसह आरोपी क्र. ३, रा. कात्रज पुणे याच्या राहत्या घरी छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेला परंतू महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्याकरीता प्रतिबंदीत असलेले अवैध विविध ब्रॅण्डचे विदेशी मद्य ७५० मिली क्षमतेचे ८० सिलबंद बाटल्या आढळून आले. आरोपी क्र. ३ च्या सांगण्यावरुन कात्रज, पुणे या ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे ७५० मिलीचे ३०१ सिलबंद बाटल्या (२५ बॉक्सेस) तसेच १८० मिली क्षमतेचे ३४८ सिलबंद बाटल्या (७ बॉक्सेस) आढळून आले. तीनही ठिकाणी छापे घातले असता सदर ठिकाणी अवैध विविध ब्रॅण्डचे विदेशी मद्य ७५० मिली क्षमतेचे ४१७ सिलबंद बाटल्या (३५ बॉक्सेस) व १८० मिली क्षमतेचे ८२८ सिलबंद बाटल्या (एकुण १७ बॉक्सेस) असे एकुण (५३ बॉक्सेस), एक होंडा कंपनीची अॅक्टीव्हा दुचाकी वाहन क्र. MH-१२-LY-८५३१ व एक अॅपल कंपनीचा आयफोन मोबाईल असा एकुण अंदाजे किमंत रू.५.८५,८५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात निरीक्षक, अशोक एम. कटकम, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे सी विभागाचे नवनाथ मारकड, विशेष भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड व राहूल खाडगीर सहा. दु.नि. राजेश पाटील जवान सर्वश्री विशाल गाडेकर, माधव माडे, गोपाल कानडे, शरद भोर व महिला जवान शामल शिंदे यांनी सहभाग घेतला आहे. सदर गुन्हयाचा तपास राज्य उत्पादन शुल्क, एच विभागाचे निरीक्षक अशोक एम. कटकम हे करीत आहे.
सदरची कारवाई ३१ डिसेंबर व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असुन अवैध विदेशी मद्य व बिअर वाहतुक व विक्री करणाऱ्यांना विरुध्द कारवाई करण्यासाठी या विभागाने विशेष भरारी पथके तयार केलेली असुन त्यांच्या मार्फत पुणे जिल्ह्यात ठिक ठिकाणी तपासणी करुन कारवाई करण्यात येत आहे.

