पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यानंतर मांजरी बाजारात खोतीवर स्वस्तात माल घेऊन तेथेच तो चढ्या भावाने विक्री करणार्या खोती आणि दुबार शेतमाल विक्रीला बंदी घातली. दुसरीकडे काही संचालकांच्या माणसांनी चक्क हफ्ते घेऊन दुबार शेतमाल विक्री सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे ‘गुगल पे’वरून पैसे घेतल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.
एका बाजूला बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी दुबार विक्री होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्नशील होते. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. पुणे बाजार समितीचा मांजरी बाजार हा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी बाजार उपलब्ध करून दिलेला आहे. या बाजारात खोतीवर स्वस्तात माल घेऊन तेथेच तो चढ्या भावाने विक्री करणारांची साखळी निर्माण झाली होती.
या बाजारात हवेली तालुक्यासह इंदापुर, बारामती, पुणे, पुरंदर, दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खुटबाव, केडगाव, वाखारी, खोर, भांडगाव, खुटबाव, यवत, कासुर्डी, खामगाव, सहजपूर, नांदूर, बोरीऐंदी, डाळिंब, भरतगाव, ताम्हाणवाडीसह नगर रस्त्यावरील शेतकर्यांचा शेतमाल बाजारात विक्रीस येतो. एकीकडे शेतकर्यांसाठी चांगला निर्णय घेतल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे हफ्ते घेण्याचा प्रकार झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
बाजार समितीवर संचालक मंडळ निवडुण आल्यानंतर मांजरी बाजारातील प्रकाराबाबत अनेक तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्यांना मारक असलेली खोती आणि दुबार शेतमाल विक्रीची प्रथा बंद करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि संचालक मंडळाने घेतला होता.
त्याची तातडीने काटेकोर अंमलबजावणीही सुरू केल्याचा परिणाम शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यावर झाला. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी हफ्ते घेत दुबार विक्री सुरू ठेवली. त्यामुळे संचालक मंडळाच्या दुटप्पी भुमीकेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.
संचालक मंडळाच्या काही माणसांनी चक्क गुगल पेवरून हफ्ते घेण्यास सुरूवात केली होती. एखाद्याने वेळेत हफ्ता न दिल्यास संबंधितांची दुबार विक्री बंद केली जात होती. गुगल पेवरून पैसे दिल्याचे स्क्रीनशॉट बाजारात व्हायरल झाले आहेत. तसेच याबाबतचे चॅटींगही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.यासंबंधीत पैसे घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यानंतर खोती आणि दुबार शेतमाल विक्रीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधीच हा प्रकार घडलेला आहे. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

