नागपूर-राहुल गांधींनी राजे- महाराजांचा अपमान केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेसची नागपुरात महारॅली नाही तर सूक्ष्म सभा झाली. काँग्रेसने कितीही हम तैयार हैचा दावा केला तरी लोक त्यांना ऐकायलाही तयार नाहीत, अशी कोपरखळीही फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसला हाणली.
राहुल गांधी यांनी नागपुरातील सभेत बोलत असताना काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी होती. त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, ही आरएसएसचा विचारधारा होती. आम्ही ते सगळे बंद केले, लोकांना मताचा अधिकार देऊन आपला नेता निवडण्याचा अधिकार दिला , जो पूर्वी नव्हता यावर देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र डागले आहे.
नेमके राहुल गांधींचे वक्तव्य काय?
राहुल गांधी म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी या देशात पाचशे-सहाशे राजे, इंग्रज होते. त्यावेळी सामान्य जनता भरडली जात होती. त्यावेळी त्यांच्या हातात सर्व अधिकार ऐकवटले होते. राजाला जे काही हवे, जे त्याच्या मनात यायचे ते तो करायचा. त्यावेळी आरएसएसने कधीही भारतीय राष्ट्रध्वजाचा मान ठेवला नाही. त्यावेळी काँग्रेसचे कितीतरी नेते तुरुंगात गेले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सर्वांना समान मानले , आणि प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. सर्वसामान्य असो वा दलित, आदिवासी असो, किंवा राजा असो, सर्वांनाच काँग्रेसने एका मताचा अधिकार दिला आणि संविधानाखाली आणले . काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी होती, जे इंग्रजांचे पार्टनर बनले होते . त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, ही आरएसएसचा विचारधारा होती. आम्ही ते सगळे बंद केले. आता पुन्हा देशाला त्या मार्गाने नेले जात आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.