एमआयटी डब्ल्यूपीयूत ७६ वां प्रजासत्तादिन उत्साहात
पुणे, दि. २७ जानेवारी : “देशातील प्रत्येक सैनिक महान योध्दा असून भारतीय सेना सर्वोत्कृष्ट आहे. कल्पनेच्या जोरावर व्यक्तीचा विकास होतो परंतू देश अंतर्गत जीवन जगण्यासाठी संपूर्ण गोष्टींचे संतुलन आवश्यक आहे.”असे विचार पीव्हीएसएम ले.जनरल (निवृत्त) बी.टी पंडीत यांनी व्यक्त केले.
एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे ७६वा प्रजासत्ताक दिन कोथरूड कॅम्पस येथे साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी ले.जनरल. बी.टी पंडीत व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी सौ. पुष्पा पंडीत, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्र कुलपती प्रा.डॉ. मिलिंद पांडे, डॉ. संजय कामतेकर, कुलसचिव प्रा.गणेश पोकळे व माईर अंतर्गत असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण नंतर एमआयटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती पर कार्यक्रम सादर केले. तसेच एनसीसीच्या कॅडेट ने सादर केलेल्या परेड ने सर्वांना आकर्षित केले. तसेच सर्वांनी शपथ देण्यात आली.
बी.टी. पंडीत म्हणाले, “१९७१ च्या भारत पाकिस्तान लढाईत सहभागी असतांना अनेक अनुभव आले. यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडिओच्या माध्यमातून सैनिकांनी केलेल्या कार्याची स्तुती करून संदेश दिला. वर्तमान काळात महिला सबलीकरण खूप गरजेचे आहे. या विद्यापीठाचे कार्य पाहता येथे देशातील नेतृत्व तयार होत असून ते राष्ट्र सेेवेसाठी महत्वाची भूमिका पार पाडतील.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “आज संकल्पाचा दिवस आहे. भारतमातेसाठी समर्पित भावना जागविण्याचा हा दिवस आहे. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानाचे पालन करून सर्वांनी देशसेवा करावी. या देशातूनच संपूर्ण मानवतेला आणि विश्वासाठी शांतीचा संदेश दिला जात आहे. भारतमातेला विश्वगुरू बनण्याबरोबरच जगाला सुख, शांती आणि समाधान देण्याची शक्ती आहे.”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य सेनानींची आठवण गरजेचे आहे. त्यातून देश प्रेम, बलिदान आणि कर्तव्याची जाणिव होते. त्यांच्या तत्वांचे पालन करून हे विद्यापीठ सामाजिक समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेने कार्यरत आहेत.”
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधि पृथ्वीराज शिंदे यांनी विचार मांडले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना मांडली.
प्रा.डॉ.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व अक्षदा सक्सेना यांनी आभार मानले.