कर्नल संभाजी पाटील (नि.) यांच्या हस्ते ध्वजारोहणसंविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कर्नल संभाजी पाटील (नि.) यांच्या हस्ते करण्यात आले. विविध देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून व्यसनमुक्तीची शपथ देखील विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली.
यावेळी संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सह सचिव विकास गोगावले, संस्थेचे खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र कांचन, व कारभारी मंडळाचे अध्यक्ष सुरेशशेठ देसाई आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.
कर्नल संभाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सैन्य दलातील विविध पदावर केलेल्या देशसेवेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. भारतीय सैन्य दलाचे भारताच्या संरक्षणातील महत्त्व सांगून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली पाटील यांनी केले व श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप काकडे यांनी आभार मानले.