पुणे- एखाद्या गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूक रथापुढे किती ढोल ताशा पथके ठेवायची ? यावर दर वर्षी खल होत, एखाद्याला जास्त एखाद्याला कमी पथके ठेवण्याची परवानगी देता येत नसे, मानाचे गणपती,आणि अन्य काही मान्यवर मंडळे आपापल्या रथा पुढे जास्तीत जास्त पथके ठेऊन कलावंतांना आणि रसिकांना आकर्षित करण्यात चढाओढ लावत,पण आता सर्वांना कितीही पथके ठेवा,नो प्रोब्लेम … अशी मुभा शिंदे फडणवीस सरकारच्या कृपेने पुण्याच्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जणू देऊन टाकली आहे.त्यामुळे आता मेट्रोने गणेश विसर्जन मिरवणूक रथांची उंची एकीकडे कमी केली असली तरी दुसरीकडे मंडळांना.. बजाव ..बजाव्व ..ची मुभा मिळाल्याने,या पथकांना यंदा पर्वणी लाभली आहे,पण दुसरीकडे पुण्याच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक किती तास चालेल ? यावेळी रेकॉर्ड मोडेल काय ? असे प्रश्नही आता विचारले जाऊ लागले आहेत .गेली २ वर्षे कोरोनामुळे गणेश उत्सवा वर आलेले सावट आता अशा पद्धतीने जोरदार उसळी घेणार असल्याचे वाटू लागले आहे.
गणेश चतुर्दशी व अनंत चतुर्दशी रोजी पुण्यात दारूबंदीचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी व ९ सप्टेंबर रोजी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐन उत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, उत्सवाचा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथके मिरवणुकीत ठेवावीत, यावर निर्बंध असणार नाही अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात बंदोबस्ताकरिता बीडीडीडी पथके, क्यूआरटीचे अधिकारी, अंमलदार तैनात करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रणाकरीता वाहतूक शाखेकडील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता एकूण 1709 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
मेट्रोच्या कामाचा देखाव्याच्या उंचीला अडथळा
पुण्यात विविध मार्गांवर सध्या पुणे मेट्रोचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे गणेश मिरवणुकींमध्ये काही निर्बंध येणार आहे. डेक्कन पोलिस स्टेशन अंतर्गत छत्रपती संभाजी पूल, लकडी पूल मेट्रो ओव्हर ब्रिज उंची गरवारे मेट्रो स्टेशन , कर्वे रोडवरील ओव्हर ब्रिजच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोडची रुंदी व पुणे मनपा मेट्रो पूल असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीस अडथळा होवू शकतो. वनाज मेट्रो स्टेशन कॉन्क्चर पिलर आनंदनगर मेट्रो स्टेशन पिलर, पडल स्टेशन पिलर या सरावाच्या उंची मुले आता विसर्जन रथांच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत.
गणेशोत्सव काळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरीता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलिस मित्र समिती यांना आयुक्त, परिमंडळीय पोलीस उप-आयुक्त, पोलिस स्टेशन स्तरावर एकूण ६९ बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना गणेशोत्सव साजरा करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्या आहेत.
आगीचा लोळ निर्माण करणेस बंदी..
गणेशोत्सव काळात गणेश मंडळे त्यांच्या स्थापनेच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीमध्ये ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ उत्पन्न करतात किंवा हवेत सोडतात. यंदा कोणत्याही ज्वालाग्रही पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करणेस किंवा हवेत सोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.