पुणे -समर्थ पोलिस स्टेशन येथील सी.सी.टी.व्ही. मॉनिटरींग कक्षाला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी भेट देत या कामाचे कौतुक केले. हा उपक्रम पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयात सुरू करण्याचे सुतोवाच कृष्णप्रसाद यांनी केले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली रहावी या उद्देशाने समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत १५३ अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुसज्ज असा सी.सी.टी.व्ही. मॉनिटरींग कक्ष उभारण्यात आला आहे. पुणे महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विकास निधीतून हे काम करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रमकुमार, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत झाले. या प्रकारचा प्रकल्प उभारणारे समर्थ पोलिस स्टेशन राज्यातील पहिलेच पोलिस स्टेशन ठरले आहे.
महानरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रसाद यांनी या प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. पोलिसांचा फिटनेस चांगला रहावा तसेच पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सभागृह नेते बिडकर यांच्या पुढाकारातून समर्थ पोलिसांना सायकली देखील भेट देण्यात आलेल्या आहेत. फिटनेसप्रेमी अशी ओळख असलेल्या कृष्णप्रसाद यांनी आपल्या भेटीत या सायकलींची देखील आवर्जून पाहणी केली.
समर्थ पोलिस स्टेशनकडून केले जाणारे सायकल पेट्रोलिंग व सीसीटीव्ही कॅमेरे या उपक्रमामुळे गुन्हे प्रतिबंध होणे व गुन्हे उघडकीस आणणे तसेच महिला व नागरीकांची सुरक्षा या साठी निश्चीत उपयुक्त ठरतील, असा विश्वास पोलिस आयुक्त कृष्णप्रसाद यांनी व्यक्त केला. स्थानिक पोलिस, नगरसेवक तसेच नागरीक हे चांगल्या कामाकरीता एकत्र आल्यास एकमेकांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे लोक उपयोगी उपक्रम उभे राहू शकतात, याचे समर्थ पोलिस स्टेशन उत्तम उदाहरण आहे. हा उपक्रम पिंपरी चिंचवडमधील पोलिस स्टेशनच्या हद्दीत उभारण्यासाठी प्रयत्न असणार आहे, असे संकेत कृष्णप्रसाद यांनी दिले.