पुणे–पं. कै. शंकरराव कान्हेरे यांचे शिष्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरंग वादक पं. मिलिंद तुळाणकर यांचे स्वतंत्र जलतरंगवादन आणि जेष्ठ बासरीवादक पं.बाळासाहेब कुलकर्णी व पं नारायणराव पटवर्धन यांचे शिष्य,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पं राजेंद्र कुलकर्णी यांचे स्वतंत्र बासरीवादन तसेच जलतरंग आणि बासरी यांची जुगलबंदी अशी पर्वणी 34व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज दि ४ रोजी पुणेकर रसिकांनी अनुभवली.
प्रारंभी पं राजेंद्र कुलकर्णी यांनी बासरीवर गावाती रागात ७ मात्रांच्या रूपक मध्ये गत व१६ मात्रांच्या त्रितालात गत पेश करत सर्व रसिकांना जागीच खिळवून ठेवले.पुणेकर रसिकांसाठी ही विशेष सांगीतिक मैफिल रसास्वाद देणारीच ठरली .त्यानंतर पं मिलिंद तुळाणकर यांनी जलतरंग वर पुरिया धनश्री रागात १० मात्रांच्या झपतालात,१२ मात्रांच्या एकतालात,१६ मात्रांच्या त्रितालातील सादर केलेल्या वैविध्यपूर्ण स्वरमयी बंदिशींनी आणि रचनांनी सर्व पुणेकर रसिकांची वाहवा मिळवली.
मैफलीची सांगता जलतरंग आणि बासरीच्या जुगलबंदीने हंसध्वनी या रागात झाली.त्यात ९ मात्रांचा वाजविण्यास अतिशय अवघड अशा ‘मत्तताल’ आणि १६ मात्रांच्या ‘त्रितालात’ रचना पेश केल्या त्यात सवाल जवबांनी मैफलीस वेगळीच रंगत आणली. रसिकांनी जणू परब्रह्माची अनुभूतीचे अनुभवली.यावेळी पद्मश्री तालयोगी पं.सुरेश तळवळकर यांचे जेष्ठ शिष्य आणि ख्यातनाम तबलावादक पं.रामदास पळसुले यांच्या खुमासदार आणि उत्तम हाताची फिरत असलेल्या अशा तबला साथसंगतीने मैफलीस चारचांद लावले.
यावेळी मैफलीस उद्योगपती प्रभाकर मुजुमदार, उद्योगपती रवि नाथ, स्टाॅक मार्केटतज्ञ सौरभ कुलकर्णी,अनेक मान्यवर उपस्थितीत होते. पुणे फेस्टिव्हल यशवंतराव चव्हाण नाट्यगृह प्रमुख अतुल गोंजारी यांनी कलावंतांचे सत्कार केले. या मैफलीचे प्रायोजक रोहन बिल्डर प्रा.लि., डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी आणि भारत देसरडा यांचे मोहरले होते.