‘एक सूर एक ताल’ सांगीतिक कार्यक्रम ‘युवक बिरादरी’तर्फे १९ ते २१ ऑगस्टला
पुणे : युवक बिरादरी आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ ऑगस्ट रोजी ‘एक सूर एक ताल’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोथरूड येथील एमआयाटी कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात १९ आणि २० ऑगस्ट या दोन दिवशी विद्यार्थ्यांना आसामी, पंजाबी, कन्नड, मराठी, तामिळ, बंगाली, गुजराती, हिंदी आदी भाषांतील गाणी गाण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. २१ ऑगस्ट रोजी सहभागी विद्यार्थ्यांची रंगीत तालीम व अंतिम सादरीकरण होईल. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, भूपेन हजारिका आणि केशवसुत या प्रसिद्ध व्यक्तींनी लिहिलेल्या गाण्यांचा यात समावेश असणार आहे, असे माहिती प्रा. कल्याणी बेलसरे यांनी दिली.
अशा सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करणारी युवक बिरादरी ही भारतातली एकमेव संस्था आहे. गुवाहाटी, दिल्ली, लखनौ आणि भारतातील इतर अनेक ठिकाणी ‘एक सूर एक ताल’चे सादरीकरण होते. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांनी याचे कौतुक केले आहे. या सांगीतिक कार्यक्रमातून मानवी मूल्ये जपणे, बंधुत्वाची भावना जागृत करणे, सामाजिक-सांस्कृतिक संहितेचे पालन करणे, तरुणांमध्ये नैतिक जबाबदारीची जाणीव करून देणे अशा गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध भाषांतील गायन शिकवले जाते. सुसंवाद, बंधुता, शांती, सेवा यांची भावना त्यात निर्माण होऊन सामाजिक विषयांवर जागरूकता वाढते, असे बेलसरे यांनी सांगितले.