फुले-आंबडेकरांना डॉ. गेल यांनी जागतिक स्तरावर नेले डॉ. रावसाहेब कसबे
डॉ. ऑमव्हेट यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : “परदेशातून भारतात येऊन फुले-आंबेडकर यांच्या कार्यावर डॉ. गेल ऑमव्हेट यांनी प्रबंध लिहिला. बहुजनांच्या चळवळीला आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्याला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे महत्वाचे काम डॉ. ऑम्व्हेट यांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे विचारविश्वात आमूलाग्र बदल झाला. आता बहुजन तरुणांनी पुढे येत हे कार्य आणि विस्तारावे,” असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑमव्हेट यांना डॉ. कसबे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात गंगाधर पानतावणे विचारपीठावर प्रसंगी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर, संमेलनाचे प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, दीपक म्हस्के, प्रा. किरण सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, “सातासमुद्रापलीकडून येऊन ऑम्व्हेट आणि इलिनॉर यांसारख्या मुलींनी इथल्या महात्म्यांचे कार्य अभ्यासले. त्या येताना मार्क्सवाद घेऊन आल्या. पण हा मार्क्सवाद भौतिक, आत्मिक आणि अध्यात्मिक बंधनातून मुक्त करणाऱ्या मानववृत्तीचा होता. माणसाला बाह्य आणि अंतर्विश्व आहे. त्याचा शोध घेणे म्हणजे निर्वाण आहे. जगण्यात फरक पाडण्यासाठी आत्मभान येण्याची आवश्यकता आहे. मात्र आज अनेकजण मार्क्सवादावर भंपकपणे टीका करतात. आपल्याला जसा समजेल आणि आवडेल तसा आंबेडकरवाद लादण्याचे अनेकजण प्रयत्न करतात. आंबेडकर आणि मार्क्सवादाची जपमाळ करत बसलेले एखाद्या गाढवाप्रमाणे वागत आहेत. तेव्हा या सगळ्या विचारवंताचा विचार आत्मसात करून आपले स्वतःचे काहीतरी निर्माण करणे महत्वाचे आहे. त्यातूनच माणूस मोठा आणि नम्र होतो.”
भारत पाटणकर म्हणाले, “काहीतरी नवीन शोधले पाहिजे असे दोघांना वाटायचे. आज मी जो काही आहे तो फुले, आंबेडकर, बुद्ध यांच्यामुळे आहे. आंबेडकर यांना जेवढा मार्क्सवाद पटला, तेवढाच मलाही पटला, हे गेलमुळे समजले. या चळवळीत गेलची साथ मिळाली. तिने कधी कुरकुर केली नाही. बाजारूपणा नाकारून ती इथे आली. तिच्यामुळे आंबेडकरांच्या सिद्धांताकडे वळलो. हा धागा एका सहचारीपणाचा आहे. २५ वर्षांपूर्वी बौद्ध झालो त्याचा मार्ग गेलमुळे सापडला.”
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गेल ऑमव्हेट म्हणाल्या, “समता, ममता आणि करुणा ही आपली शक्ती आहे. या शक्तीच्या बळावर चळवळ पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. या पुरस्काराने सतत कार्यशील राहण्याची ऊर्जा मिळाली आहे.”
परशुराम वाडेकर यांनी स्वागत केले. डॉ. विजय खरे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण सुरवसे यांनी आभार मानले.