पीटर गारट्रेल(67 वर्षे)हे ऑस्ट्रेलियन जलतरण संघाच्या प्रशिक्षक पथकात 1989पासून आहेत. जागतिक जलतरणावर वर्चस्व गाजवणार्या ऑस्ट्रेलियाच्या अव्वल जलतरणपटूंना प्रशिक्षण देण्याचा त्यांना तब्बल 40 वर्षांचा अनुभव आहे. पीटर गारट्रेल यांनी तीन ऑलंपिक स्पर्धा, जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकूल स्पर्धा अशा जगांतील सर्वोच्च स्पर्धांचा अनुभव घेतला आहे. त्यांनी अनेक ऑलंपिक विजेते तयार केले असून ऑस्ट्रेलियन जलतरण संघटनेने त्यांना हॉल ऑफ फेम पुरस्कार दिला आहे. त्यांची जस्टिन लेंबर्ग, जुली मॅकडोनाल्ड यांसारखे अनेक ऑलंपिक सुवर्णपदक विजेते घडविले आहेत.
आता पीटर गारट्रेल हे भारतांतील ग्लेनमार्क ऍक्वेटिक फाऊंडेशनमध्ये तांत्रिक संचालक म्हणून रूजू झाले असून पुढील तीन वर्षांच्या काळात ते भारतांतील सर्वोत्तम जलतरणपटूंना घडविण्यात सहभाग घेतील. त्यांच्याशी साधलेला संवाद असा आहे.
प्रश्न 1ः ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन जलतरणपटूंच्या तुलनेत भारताच्या उद्योन्मुख जलतरण पटूंचे भवितव्य तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता?
मी मुंबईतील ग्लेनमार्क फाऊंडेशन सेंटर आणि दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात काही दिवस काम केले असून यावर्षीच्या सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांचेही बारकाईने निरिक्षण केले आहे. भारतीय जलतरण पटूंमध्ये सर्वोच्च स्तरावर पदक जिंकण्याची क्षमता असणारे अनेक युवा जलतरणपटू आहेत. त्यामुळे भारतामध्ये ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेच्या तुलनेतही भरपूर गुणवत्ता आहे. परंतु भारतामध्ये एका मजबूत आणि सर्वांगीण अशा जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करण्याची गरज आहे. शिवाय या कार्यक‘माचे नियमित आधुणिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हे जलतरणपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील. नुकत्याच पार पडलेल्या ग्लेनमार्क सबज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अनेक विक्रम नोंदविले गेले. हे भारतीय जलरणाच्या दर्जाचे निर्दशक आहेत.
प्रश्न 2ः पुढच्या तीन वर्षात जलतरण प्रशिक्षक म्हणून तुमचा प्राधान्य क्रम कोणत्या गोष्टीला असेल?
माझी पहिली आणि सर्वात महत्वाची पसंती योग्य ऍटिट्यूड असलेले गुणवान खेळाडू टिपणे आणि त्यांना योग्य दिशेने मेहनत करण्यास भाग पाडणे याला आहे. त्याशिवाय खेळाडूंमध्ये जलतरणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि प्रशिक्षकांच्या ज्ञानात भर घालणे याला माझी पसंती राहिल.
प्रश्न 3ः ग्लेनमार्क सबज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तुम्ही देशांतील सर्वोत्तम युवा जलतरणपटू पाहिलेत, त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्टी तुम्हांला कोणती वाटली?
मी पाहिलेल्या गुणवान युवा जलतरणपटूंपैकी काहीजण नियमितपणे राष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणारे आहेत आणि ते निश्चितपणे भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करतील. ग्लेनमार्क सबज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 46 राष्ट्रीय विक्रम हे देशांतील गुणवत्ता उंचावत असल्याची साक्ष देतात.
प्रश्न 4ः टोकियो 2020 ऑलंपिकमध्ये भारतीय जलतरण पटूंना पदक मिळविण्याबद्दलचे आपले भाकीत काय?
माझ्या मतानुसार, मध्यम अंतराच्या आणि दिर्घ पल्ल्याच्या शर्यतींमध्ये भारतीय जलतरणपटू अधिक चांगली कामगिरी करू शकतील. भारतीय खेळाडूंची शारिरीक ठेवण व क्षमता पाहता त्यांना छोट्या अंतराच्या शर्यतीत संधी कमी आहेत. माझ्या मते, भारतीय जलतरणपटूंनी 400मीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या शर्यंतीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. 2020 ऑलंपिकबाबत लगेच सांगणे अवघड असले तरी, देशांतील प्रशिक्षकांचा दर्जा जसजसा वाढत जाईल तसतशी भारतीय जलतरणपटूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावत जाईल. त्यानंतरच ऑलंपिक पदकांविषयी विचार करणे योग्य ठरेल.