पुणे – महापालिका कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारासाठी १०० टक्के सवलत मिळावी तसेच महापालिका शाळेतून १० वी आणि १२ वी चे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी पहिल्या ५ उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत शिक्षणासाठी महापालिकने अर्थसहाय्य द्यावे असे प्रस्ताव आज महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आले अशी माहिती समितीच्या अध्यक्षा रुपाली दिनेश धाडवे यांनी दिली.
त्या म्हणाल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी हे फ्रंटलाइन वर्कर म्हणून अहोरात्र काम करीत आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील इतरही कामकाज पार पाडत आहेत. या परिस्थितीत त्यांचे स्वत:चे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना महामारीच्या रोगराईमध्ये कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना काही सेवक कोरोना बाधित होवून बरे झाले तर काही सेवकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीत अनेक सेवकांच्या कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती गमवावी लागल्याने त्यांच्या कुटुंबावार आर्थिक बोझा वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये मनपा कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना त्यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अंतर्गत वैद्यकीय उपचारासाठी जे ९०% सवलतीचे पत्र दिले जाते त्याऐवजी सध्याची परिस्थिती विचारात घेवून मनपा सेवक व त्यांच्या कुटुंबियांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना अंतर्गत वैद्यकीय उपचारासाठी १००% परिपूर्तीसाठीचे पत्र (सवलतीचे पत्र ) देण्यात यावे.
तसेच पुणे मनपाच्या शाळेमध्ये इ 12 वी पर्यंत शिक्षण दिले जाते, सध्याच्या कोविड च्या परिस्थिती मुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. या परिस्थितीत सुद्धा सन 2020-21 साल चा पुणे मनपा शाळांचा इ 10 वी व इ 12 चा निकाल अतिशय चांगला लागला आहे, या परिस्थितीत इ 10वी व इ 12 वी च्या विद्यार्थ्यांचे पुढील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मनोबल उंचविण्यासाठी पुणे मनपाच्या शाळेमधून सन 2020-21 मध्ये इ 10 वी व इ 12 वी उत्तीर्ण झालेल्या 10 वीच्या 5 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना व इ 12 वी च्या 5 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पुढील पदवी पर्यंत च्या शिक्षणासाठी पुणे मनपा तर्फे अर्थसाहाय्य देण्यात यावे या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असी माहिती धाडवे यांनी दिली.