पुणे-ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा यासाठी खासदार श्रीमती. वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना पत्राद्वारे निवेदन दिले.
पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नागरी हिताच्या आणि सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या ॲमेनिटी स्पेस उत्पन्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा किंवा त्या भाडेतत्वार देण्याचा घाट घालत असल्याचे समजते. शहरीकरण वाढत असताना अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेल्यास शहरासाठी ही अत्यंत दुर्देवी आणि चुकीची घटना असेल.
पुण्याची लोकसंख्या ४० लाखांवर पोचली आहे. तसेच राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात स्थलांतरीत होणारया नागरिकांची संख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेतला तर, वाढत्या पायाभूत सुविधांवरील ताण वाढत आहे. त्यासाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज वाढत आहे. तसेच शहराच्या सुनियोजीत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणीही पुरेशा वेगाने होत नसल्याचे गेल्या तीन वर्षांतील महापालिकेतील कारभारावरून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत नागरी सुविधांच्या जागा विकण्याचे प्रयोजन काय आहे, हे समजत नाही.
पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये मुळात क्रिडांगण, गार्डन, पार्क, शाळा, आरोग्यकेंद्रे, क्रिडा संकुल, भाजी मार्केट, बालवाडी आदी विविध सुविधांसाठी जागा प्रचलित मानांकनापेक्षा कमी आहेत. सार्वजनिक उपयोगासाठी ॲमेनिटी स्पेसचा वापर व्हावा हा मूळ उद्देश ॲमेनिटी स्पेसचा आहे आणि तोच विसरून निर्णय घेणे योग्य ठरणार नाही; हे समाजहिताच्या विरोधात असेल. विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डिसी रूल) ॲमेनिटी स्पेसच्या जागांची विक्री करता येत नाही. तरीही महापालिकेने तसा प्रयत्न केल्यास पुणेकर म्हणून आमचा ह्या निर्णयाला कडाडून विरोध असेल.
वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, स्थलांतर लक्षात घेता नागरी सुविधा वाढविण्यावर व त्या विकसित करण्यावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणीही वेगाने केली पाहिजे. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार नियोजन करावे, अतिरिक्त उधळपट्टी थांबवावी यामुळे खर्चात बचत होईल आणि तो निधी आवश्यक असलेल्या नागरी हिताच्या कामांसाठी वापरता येईल. त्यामुळे ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न आपण तातडीने थांबवावा.
अनेक वर्षांपासून मी ॲमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करावा अशी मागणी प्रशासनाकडे करत आहे, परंतु याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत ही शोकांतिका आहे. या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा आपणांस विनंती करते की, ॲमेनिटी स्पेससाठीचा मास्टर प्लॅन तयार करावा, यासाठी एक लोकप्रतिनिधी व एक पुणेकर म्हणून मी आवश्यक ते सहकार्य निश्चित करेल.