अभिनेत्री मुक्ता बर्वेने गेल्या दशकभरामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून नाट्य-सिने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आता लवकरच प्रदर्शित होणा-या विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ सिनेमातून ती समायरा जोशीच्या सशक्त भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात ती पहिल्यांदाच दोन मुलींच्या आईची भूमिका करत आहे.
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’च्या आंतरराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमीत्ताने अनविल झालेल्या पोस्टरमध्ये मुक्ता आणि तिच्या ह्या सिनेमातल्या दोन मुली पाउटिंग करताना दिसतायत. ह्या दिलखुलास पोझमधून ‘आई मुलीची जिवाभावाची मैत्रिण’ असल्याचंच अधोरेखित केलं गेलंय.
मुक्ता ह्याविषयी म्हणते, “गेल्यावर्षी आलेल्या ‘वायझेड’ सिनेमात जरी मी आईच्या छोटीश्या भूमिकेतून दिसले असले, तरीही त्यात आईपण अनुभवता आलं नव्हतं. ती कशीबशी अगदी पाच मिनीटांचीच भूमिका होती. मला ख-या अर्थाने आईपण समजून ते व्यक्त करण्याची संधी ‘हृदयांतर’मधल्या समायरा जोशी ह्या भूमिकेने दिली. माझ्या आईने आजपर्यंत माझ्यासाठी नक्की किती केलं, आणि किती सोसलं त्याची जाणीव मला ह्या भूमिकेमूळे झाली.”
मुक्ता बर्वेची आई ‘हिरोइनची आई’ ह्या गटात मोडणारी नाही. ती मुक्ताची खरी समीक्षक आहे. त्यामूळे दोन मुलींच्या आईची भूमिका केल्यावर मुक्ताला आपल्या आईची प्रतिक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता होती.
मुक्ता म्हणते, “विक्रमने जेव्हा तिला चित्रपटाचा फस्ट कट दाखवला तेव्हा सिनेमा संपल्यावर आई पाच मिनीटं काहीच बोलली नाही. पाच मिनीटांनी आई विक्रमकडे जाऊन म्हणाली, तुझ्या सिनेमाने मी नि:शब्द झाले. बासं, आईची ही प्रतिक्रिया सबकुछ बोलून गेली. मला आत्मविश्वास देऊन गेली.”
टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ 7 जुलै 2017 ला चित्रपटगृहात झळकेल.