पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकारणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दहा नगरसेवक असताना पक्षाचे उमेदवार नगरसेवक चंदूशेठ कदम यांना आठच मते कशी मिळाली. दोन मते कुठे कशी फुटली याचा शोध घेण्यासाठी पक्षाच्यावतीने या निवडणुकीची जबाबदारी पाहाणारे नेते याबाबत खुलासा मागविणारआहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितली.या संदर्भात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘आमच्या पक्षाच्या उमेदवाराला किमान दहा मते मिळणे अपेक्षित होती. मात्र, दोन मते कमी मिळाल्याने ही मते कुठे गेली याचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात जबाबदारी असलेले नगरसेवक यांच्याकडून अहवाल घेण्यात येईल. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन मते नेमकी कुठे गेली हे स्पष्ट होईल.’’