महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान मोदींचे मौन
महाविकास आघाडी सरकारनेच सुरु केलेल्या कामांचे पंतप्रधानांकडून उद्घाटन.
मुंबई, दि. १९ जानेवारी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे सरकार मुंबईचा विकास होऊ देत नव्हते, भ्रष्टाचार होत होता असा आरोप मोदींनी केला. परंतु मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? शिवसेनेने विकास केला नाही किंवा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्याबरोबर २५ वर्षे सत्तेत असलेला भाजपा कसा काय नामानिराळा राहू शकतो ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्राचा विकास झाला नाही पण मागील सहा महिन्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळेच विकासाची गती वाढली असा दावा करताना मुंबई महानगर पालिकेच्या कारभावरही त्यांनी टीका केली. भारतीय जनता पक्ष व शिवसेना मागील २५ वर्षे युतीची सत्ता महानगरपालिकेत होती. उपमहापौरपदासह विविध पदे भाजपाकडेही होती मग भ्रष्टाचारचा वा विकास झाला नसल्याचे खापर एकट्या शिवसेनेवर कसे फोडता येईल. जे काही झाले असेल त्यात भाजपाचाही तितकाच वाटा आहे हे पंतप्रधान मोदी विसरले.
मुंबईत आज ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले त्या प्रकल्पाची सुरुवात महाविकास आघाडी सरकार असतानाच झाली होती, ती काही मागील सहा महिन्यात झालेली नाहीत परंतु ते सर्व आपणच केले आहे अशा अविर्भावात त्याचे श्रेय मात्र घेतले. भाजपाने पंतप्रधानांच्या हस्ते गटारींचेही उद्घाटन करून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपाने मविआ सरकारच्या कामांचे श्रेय लाटले. आजच्या भाषणात पंतप्रधांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा दोन तीनदा उल्लेख केला पण शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व राज्यपाल कोश्यारी यांना चार खडे बोल सुनावले असते तर बरे झाले असते पण मोंदींनी ते केले नाही.
महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या सारखे महत्वाचे व ज्वलंत प्रश्न आहेत परंतु देशाच्या पंतप्रधांनांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही. देशात अनेक वर्ष फक्त गरिबीच होती असा आरोप करताना मोदी सरकारच्या काळात गरिब आणखी गरिब झाला याचे जाणीव मोदींनी कशी झाली नाही. आपले सरकार देशातील ८० कोटी लोकांना रेशनवर मोफत धान्य देते असे मोदी स्वतःच सांगतात. देशातील गरिबी कमी झाली आहे असे मोदींना म्हणायचे असेल तर हे ८० कोटी गरिब आले कोठुन ? एकूणच मोदींनी नेहमीप्रमाणे प्रचारमंत्रीपदाला साजेशे प्रचारी भाषण केले. मुंबईकरांचे जीवन सुखकर करण्याचे बोलत असताना त्यांच्या आजच्या कार्यक्रमामुळे मुंबईकारांचे किती हाल झाले याचाही त्यांना व भाजपाला विसर पडला असा टोलाही पटोले यांनी लगावला.