Home Blog Page 95

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व प्रतिबंधात्मक कामांना स्थायी समितीची मान्यता

पुणे, दि. ९ एप्रिल : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी तुंबणे व पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सुचना स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज केल्या.

नगरसेविका रूपाली धाडवे यांनी या संदर्भातला प्रस्ताव दिला होता. शहरात गेल्या काही काळात अल्पावधीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या आहेत. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कमी झालेली वहन क्षमता आणि उंच भागातून सखल भागाकडे वाहून येणारे पाणी यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून सखल भागांतील प्रतिबंधात्मक कामे तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अंतर्गत नाले व पावसाळी लाईनची तातडीने साफसफाई, साचलेला गाळ व पाणी काढणे, तसेच आवश्यक ठिकाणी मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा वापर करून कामे गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी अनुभवी व गुणवत्तापूर्ण कंत्राटदारांची नियुक्ती करून कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

सदर कामांसाठी तातडीने मंजुरी देण्यात आली असून, पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या या निर्णयामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व जलनिस्सारण व्यवस्थेला गती मिळणार असून, संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

महापालिकेकडून महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम

0

पुणे, दि. ९ एप्रिल : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेकडून वर्षभर विविध वैचारिक व सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी या विषयाचा प्रस्ताव दिला होता. महात्मा फुले यांनी पुणे शहरातूनच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाचा पाया घातला. तसेच विविध समाज घटकांसाठी शाळा, महिलांसाठी आश्रम, विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, तसेच स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली.

महात्मा फुले हे सन १८७६ मध्ये पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. त्यांच्या या कार्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हे विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर महापुरुषांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या सर्वांच्या विचारांचा जागर आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध व्याख्याने, प्रदर्शन, शैक्षणिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या निर्णयामुळे पुण्यात सामाजिक प्रबोधनाची चळवळ वाढीस लागण्यास मदत होईल, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

पुणे शहराच्या सर्व सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास स्थायी समितीची मान्यता: पुणे महानगरपालिकेच्या हद्दीवर शहराची ओळख अधिक ठळक करण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने आज मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्पात काही समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार जाहीर केले होते. आज स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे शहराच्या प्रमुख सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शहरात प्रवेश करताना पुण्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आधुनिक ओळख अधोरेखित करण्यासाठी आकर्षक व सुबक प्रवेशद्वार उभारले जाणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.स्थायी समितीच्या या निर्णयामुळे पुण्याच्या सर्व प्रमुख सीमांवर टप्प्याटप्प्याने प्रवेशद्वार उभारले जाणार असून, शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे.

पुणे येथे 11 एप्रिल रोजी विशेष पासपोर्ट मोहीम

0

पुणे, 9 एप्रिल 2026

प्रादेशिक पारपत्र  कार्यालय (आरपीओ) पुणे, सामान्य आणि तत्काळ श्रेणीतील अर्जदारांसाठी एक विशेष पारपत्र  मोहीम आयोजित करत आहे. ही मोहीम शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी पारपत्र सेवा केंद्र (पीएसके), पुणे येथे आयोजित केली जाईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश पारपत्रासाठी   मुलाखत  लवकर उपलब्ध करून देणे आणि पारपत्र  सेवांच्या वितरणात आणखी सुधारणा करणे हा आहे.

सामान्य पारपत्र  श्रेणी अंतर्गत अर्जदारांनी पारपत्र  नियमांनुसार विहित  संपूर्ण आणि अचूक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांनी ‘Passport India’ संकेतस्थळावरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पात्रता सुनिश्चित करावी.अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

तत्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असते आणि त्यासाठी अधिक कठोर पात्रता मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अनेक अर्जदार एक किंवा दोन्ही निकषांमध्ये अयशस्वी ठरतात आणि त्यामुळे ते अर्ज यशस्वीपणे सादर करू शकत नाहीत. अर्जदारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी तत्काल मार्गदर्शक सूचना आणि तत्काळ अंडरटेकिंग  काळजीपूर्वक वाचावे आणि भेटीच्या दिवशी कोणतीही संभाव्य समस्या टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व पात्रता  सुनिश्चित करावी. तत्काळ अपात्र श्रेणींबद्दल जाणून घेण्यासाठी, कृपया येथे भेट द्या:

https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports.

[अर्जदाराची खरी ओळख तपासण्यासाठी, पारपत्र कायदा 1967 च्या कलम 5 आणि पारपत्र  नियम 1980 च्या नियम 5 मध्ये असे नमूद केले आहे की, पारपत्र प्राधिकारी यासंदर्भात सर्व चौकशी करू शकतात आणि अर्जाच्या योग्य निपटारा करण्यासाठी पारपत्र  प्राधिकारीवर्गाला  आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता अर्जदाराला भासू  शकते.]

1.विशेष मोहिमेसाठी अपॉइंटमेंट कशी बुक करावी:

i. पासपोर्ट इंडिया संकेतस्थळ (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport Seva App ला भेट द्या आणि तात्काळ/सामान्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.

ii. ऑनलाइन पैसे भरल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’ वर जा, ‘PSK Pune’ स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करा.

4.  विशेष मोहिमेची तारीख आणि ठिकाणाचा तपशील:

i. तारीख : 11एप्रिल  2026 (शनिवार )

ii.ठिकाण :  मॉन्ट क्लेअर बिल्डिंग,  134/1, पार्ट एमपी-1, कमर्शियल पहिला मजला, ऑफिस नं.101 आणि 102, बाणेर पाषाण लिंक रोड, पाषाण, पुणे – 411021

iii. श्रेणी :  सामान्य आणि तात्काळ अपॉइंटमेंट (नवीन आणि नूतनीकरण)

iv.वेळ: सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी हजर रहावे.)

धनंजय मुंडेंनी माझा अर्ज बाद करण्यासाठी मुंबईहून वकील पाठवला:बारामती पोटनिवडणुकीत करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

पुणे-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ठिणगी पडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा मुंडे यांनी आपला अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बारामती पोटनिवडणुकीत माझा अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईहून वकील पाठवला होता, असे त्या म्हणाल्यात. करुणा मुंडेंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतली. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल 30 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 23 उमेदवार रिंगणात उरले आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांचे अर्ज कायम आहेत.

करुणा मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला. “धनंजय मुंडे यांनी माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी मुंबईहून एक नामवंत वकील पाठवला होता. माझ्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता का दाखवली नाही, असा आक्षेप त्या वकिलाने घेतला. एकीकडे मुंडे म्हणतात की मी त्यांची पत्नी नाही, तर दुसरीकडे वकिलामार्फत माझ्या अर्जावर मालमत्तेवरून आक्षेप घेतात,” असा दावा करुणा शर्मा यांनी केला. तसेच, अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या तीन मोठ्या नेत्यांचे फोन आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
करुणा शर्मा यांनी यावेळी बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यामागचे कारण देखील सांगितले. जर अजितदादांच्या अपघाताचा एफआयआर (FIR) दाखल झाला असता, तर मी उमेदवारी मागे घेतली असती, असे त्यांनी म्हटले. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या अपघाताची तक्रार जर घेतली जात नसेल, तर उद्या माझ्यासोबत काही विपरीत घडले तर कुणाला सांगायचे? म्हणूनच मी ही निवडणूक लढवत असल्याचे करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले.

करुणा मुंडे यांनी पुढे स्पष्ट केले की, निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मोठ्या तीन लोकांचे फोन आले होते. मात्र मी ही निवडणूक लढवणार असून, घरोघरी जाऊन प्रचार करणार आहे. तसेच पदयात्रा देखील करणार आहे. करुणा मुंडेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 30 मार्च 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल होती, तर 7 एप्रिल रोजी छाननी पार पडली. आज 9 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. आता 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

एप्रिल २०२६ मध्ये विशेष डिजिटल शेतीशाळा; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पुणे, दि. 9 : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शेतीशाळांद्वारे पेरणीपूर्व तंत्रज्ञान, जैविक व नैसर्गिक निविष्ठा, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच भात शेतीतील सुधारित तंत्रज्ञान याबाबत तज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. या शेतीशाळेमध्ये कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे व प्रगतशील शेतकरी यांचा सहभाग राहणार आहे.

पहिल्या दोन शेतीशाळा १ व ८ एप्रिल रोजी ऑनलाइन उपलब्ध असून, तिसरी व चौथी शेतीशाळा अनुक्रमे १५ व २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या यु-ट्युब चॅनेलवर केल्या जाणार आहेत.
या कार्यशाळेस शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे तसेच इच्छुक नागरिकांनी या डिजिटल शेतीशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

तथाकथित कार्यकर्त्यांच्या दबाव तंत्र व सोशल मीडिया गैरवापराविरोधात महापालिकेतील अधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन; कठोर कारवाईचे आश्वासन

पुणे, दिनांक : 9 एप्रिल-पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन सादर करून काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अयोग्य वर्तन, दबाव तंत्र तसेच सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार वैयक्तिक तक्रारी फक्त संबंधित व्यक्तीकडूनच स्वीकाराव्यात व तृतीय पक्षाकडून येणाऱ्या तक्रारी ग्राह्य धरू नयेत, अशी स्पष्ट तरतूद असतानाही काही जणांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

यावर आयुक्तांनी संबंधित खोडसाळ व्यक्तींविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्याचे, पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई घेण्यासाठी सूचना देण्याचे तसेच अशा व्यक्तींना महानगरपालिका कार्यालयांमध्ये प्रवेशबंदी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.अधिकाऱ्यांनी अशा प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच प्रशासनाच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे.

पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ

नवी दिल्ली -पार्थ पवार यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ यांना शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि भाजपचे नेते जे. पी. नड्डा यांची उपस्थिती होती.या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या इतर सर्व खासदारांचा शपथविधी आधीच झाला होता. त्यामुळे पार्थ पवार कधी शपथ घेणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या शपथविधीने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केले होते. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जात होते.

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार:हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

पुणे-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. अखेर अनेक घटना-घडामोडींच्यानंतर काँग्रेसने अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.
बारामतीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज कायम होते. यापैकी 30 उमेदवारांनी माघार घेतली असली तरी अद्याप 23 उमेदवार हे रिंगणात कायम आहेत. त्यामुळे बारामतीत बिनविरोध निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाच्या माघारीमुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात एका दिवसात 254 मृत्यूइराणने म्हटले- युद्धविराम आणि युद्ध एकत्र नाही चालू शकत

लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये एकाच दिवसात २५४ जण ठार झाले असून १,१६५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. यानंतर देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम म्हणाले की, इस्रायली हल्ले थांबवण्यासाठी ते देशातील सर्व राजकीय आणि राजनैतिक संसाधने एकत्रित करत आहेत. आरोग्य मंत्री राकान नासेरेद्दीन यांनी आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले. जखमींच्या मोठ्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे.

दरम्यान, शस्त्रसंधीवरून वाद अधिकच गडद झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी म्हटले आहे की, लेबनॉन या कराराचा भाग नाही. “आम्ही असे कोणतेही वचन दिले नव्हते,” असे व्हान्स म्हणाले.दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, अमेरिकेला युद्धविराम लागू करायचा की इस्रायलमार्फत युद्ध सुरू ठेवायचे, याचा निर्णय घ्यावा लागेल, कारण दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत.
युद्धात अमेरिका आणि इराणला झालेल्या नुकसानीवर एक नजर
अमेरिका:
१५ सैनिक शहीद, ३०० जखमी, अब्जावधी डॉलर्स किमतीची विमाने नष्ट

एफ-१५ई स्ट्राइक ईगल: ७५०–९१५ कोटी
एफ-३५: ६६०-९१० कोटी (जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान)
ए-१० थंडरबोल्ट II: १५०–२१० दशलक्ष
ई-३ एव्हीएसीएस: २,२००–२,५०० कोटी
एमक्यू-९ रीपर (१७+ ड्रोन): ₹४,२५०–५,००० कोटी
१५ सैनिक शहीद झाले
पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका दररोज सुमारे १५,६६६ कोटी रुपये खर्च करत होती.
५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला.
इराण:
१३ लाख कोटी रुपयांची नासाडी, पुनर्बांधणीला १० वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो

इराणचा जीडीपी सुमारे २० टक्क्यांनी घटू शकतो.
तेल निर्यात थांबल्यामुळे ३३,००० कोटी रुपयांचे नुकसान.
इराणमध्ये सुमारे ४ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली येऊ शकतात.
एका महिन्यात इराणचे १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
इराणला पुनर्बांधणीसाठी १० वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.

मुख्य रस्त्यांवर ओव्हरहेड केबलला पूर्ण बंदी,महापालिकेच्या डक्टचा वापर अनिवार्य,अनधिकृत केबलवर कठोर कारवाई-आयुक्तांचे धोरण

पुणे- मुख्य रस्त्यांवर ओव्हरहेड केबलला पूर्ण बंदी,महापालिकेच्या डक्टचा वापर अनिवार्य,कामापूर्वी जीपीआर सर्वेक्षण बंधनकारक,
सर्व परवानग्या ऑनलाइन पद्धतीने मिळणार असेच महापालिकेचे धोरण असून ओव्हरहेडवरील कारवाईमुळे शहर सुंदर होईल केबल कुठे व कशा असाव्यात, शुल्क किती भरावे आणि भूमिगत केबलना प्राधान्य कसे द्यावे. यासाठी आम्ही धोरण तयार करत आहोत माझ्या अधिकारात याची अंमलबजावणी केली जाईल
असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी म्हटले असल्याने आता त्यांनीही ओव्हरहेड केबलच्या विषयात उडी घेऊन कारवाई चे समर्थनच केले असल्याचे वृत्त आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी शहरातील ओव्हरहेड केबलबाबत धडाकेबाज भूमिका घेत बेधडक कारवाईला सुरुवात केलेल्या या भूमिकेने समर्थनच मिळते आहे. छोटे छोटे केबलवाले म्हणविले जाणारे केबल ऑपरेटर यांना पुढे करून काहींनी आपली राजनीती सुरु करून पुणेकरांच्या डोक्यावरील केबलचे जाळे हटविण्यास विरोध केला असला तरी हे छोटे केबलवाले कोण? त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर नेमका किती / याबाबतची माहिती जर पुढे आली तर छोटे छोटे आहेत कि बडे आहेत ते स्पष्ट होणार आहे. पण अशा कुठल्याही छोटे म्हणविले जाणाऱ्यांनी आपले वार्षिक टर्न ओव्हर उघड करण्याचे तर सोडाच पुढे येऊन उघड विरोध करण्याचे धोरण स्वीकारले नाही आणि आपल्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट केलेलं नाही ,इंटरनेट बंद होईल ,लोकांची अडचण होईल , समस्या निर्माण होतील अशी करणे देऊन बेकायदा ,ओव्हरहेड केबलला संरक्षण दिले जाऊ लागले आहे.ज्यांनी निरभ्र आकाश दिसणे हि मुश्कील करून सोडले आहे.

कारवाईची धडाकेबाज मोहीम विद्युत विभागाच्या महिला अधिकारी शेकटकर यांनी श्रीनाथ भिमाले यांच्या नेतृत्वाखाली सुरु ठेवली असली तरी यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी ती का राबविली नाही हा पर्ष्ण उपस्थित न करता सध्या सुरु असलेल्या मोहिमेचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या मोहिमेने एकीकडे कंपन्यांना काहीही फरक पडत नसल्याचे दिसते आहे. एक केबल कापली कि ते १० केबल उभ्या करत आहेत असेही दिसते आहे . यामुळे महापालिकेने केबल काम्प्न्यानावर गुन्हे दाखल करण्याचे धोरण स्वीकारताच या केबल आमच्या आहेत असे सांगण्यास कुणीच पुढे तर येत नाहीच पण या आमच्या नाहीतच हे सांगून या केबल बेवारस देखील ठरवीत आहेत . या सर्व पार्श्वभूमीवर केबल वरील कारवाई शहरात मोठा चर्चेचा विषय तर बनली आहेच पण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रा बाहेर हि या कारवाई कडे विस्मयतेने पाहिले जाऊ लागले आहे.पण एकूणच आकस निरभ्र दिसावे , केबलचे जाळे डोक्यावर नसावे हीच भावना जनमानसातून दिसते आहे. त्याच बरोबर इंटरनेट बंद होऊ नये ते व्याहत पणे सुरु राहावे असाही सूर आहेच आहे.आता हा तिढा धाडसी कारवाई सुरु केलेल्या भिमाले यांना सोडवायचा आहे. आणि त्यासाठी त्यांना महापालिका आयुक्त आणि त्यांच्याच पक्षातील नेते ,पदाधिकारी कशा पद्धतीने साथ देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओमप्रकाश चौहान यांची नियुक्ती

मुंबई
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यम प्रमुख पदी श्रीगोविंद येतयेकर यांची आणि सह माध्यम प्रमुख पदी ओम प्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री गोविंद येतयेकर व श्री ओम प्रकाश चौहान यांना संघटनात्मक नियुक्तीचे पत्र देण्यात आले
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे ,सरचिटणीस सुनील राणी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

कोथरुडमधील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती,चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बालेवाडी-वाकड पूल रस्ता भूसंपादनाची अधिसूचना जारी

पुणे: कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. बाणेरमधील कस्पटे वस्ती परिसरातील ‘मिसिंग लिंक’च्या कामाला गती देण्यासाठी, बालेवाडी-वाकड पूल रस्ता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अखेर जारी करण्यात आली आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रकारची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने आग्रही आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बुधवारी ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, आता कस्पटे वस्ती येथील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. या अधिसूचनेनुसार, बाणेर-वाकड पुलासाठी बाणेर भागातील विकास योजनेतील (DP) ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

हे संपादन महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २०५ अन्वये आरक्षित केलेल्या जागेसाठी होणार आहे. तसेच, विकास आराखड्यानुसार हा रस्ता ३० मीटर रुंद असणार आहे, ज्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेऊन तिथे सुसज्ज पदपथ आणि सायकल ट्रॅकचेही नियोजन करण्यात आले आहे.

“बाणेर ते वाकड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बालेवाडी-वाकड उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता अधिसूचना निघाल्याने कामाला वेग आला असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी मुक्तता होईल,” असा विश्वास ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

या रस्त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा ‘शॉर्टकट’ ठरणार आहे. यामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील राधा चौक आणि भुजबळ चौक येथील वाहतूक कोंडीचा भार ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले मार्गदर्शन

मुंबई, दि. ८ एप्रिल २०२६

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत तर दोन गुजराती खरेदी करत आहेत. देशात जे सुरु आहे तेच महाराष्ट्रातही सुरु आहे, ‘बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां भी सुभानल्ला’, अशी परिस्थिती आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या न्याय सत्याग्रह आंदोलनाला उपस्थिती लावून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी युवक काँग्रेसच्या कामाचे कौतुक केले, या संघर्षात युवक काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली.
यावेळी ते म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे पण भाजपाच्या राजवटीत देशातील अन्नदाता देशोधडीला लागला आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत. शेतमालाला दुप्पट भाव तर मिळत नाहीच उलट शेतीसाठी लागणारा खर्च मात्र दुप्पट, तिप्पट वाढला आहे. नरेंद्र मोदींनी दबावाखाली अमेरिकेशी व्यापार करार केला असून ट्रम्पच्या धमकीला मोदी घाबरतात. या करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील तरूण, कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वांची नरेंद्र मोदी यांनी फसवणूक केली आहे. विकासाचा दावा करणारे मोदी सरकार देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे.

पुलवामा अतिरेकी हल्लात आपले जवान शहीद झाले या हल्ल्यात वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. पहलगावमध्ये सीमेपासून ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी २६ लोकांची हत्या केली पण आजही हे अतिरेकी मोदी सरकारला सापडले नाहीत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सैन्य दमदार कामगिरी करत असताना डोनाल्ड ट्रम्पने एक फोन केला आणि नरेंद्र सरेंडर झाले. इंदिराजी गांधी यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आणि शिमला करार केला पण नरेंद्र मोदी मात्र अमेरिकेसमोर झुकले आहेत, अमेरिका सांगते तसे त्यांना करावे लागते, देशाचा स्वाभिमान मोदींनी गहाण ठेवला आहे. भारत पाकिस्तानच्या प्रश्नावर आता डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करतात, आपल्या पंतप्रधानाला सरेंडर म्हणाले लागते हे दुर्दैवी आहे असे सपकाळ म्हणाले..

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात संविधान, लोकशाही व संस्कृती वाचवण्याची लढाई सुरु आहे. जुलुम व अन्यायाच्या विरोधात काँग्रेसचा हा लढा सुरुच राहणार आहे. देश वाचवण्याची ही लढाई म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाईच असून आपण सर्व मिळून ही लढाई लढू व विजयी होऊ, असा आत्मविश्वासही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, शाह आलम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेशभाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा.धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांनी सांगितले की, समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण आहे. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की यापुढे पक्ष सांगेल त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, सौ. रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सौ. सारिका बारड, नगरसेविका सौ. साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, सौ. मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.

बड्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष अन किरण दगडे पाटलांनी केलं हातगाडी,पथारीवाल्यांना ‘लक्ष्य’ ?

पुणे- आपल्या भागात असंख्य अनधिकृत आणि नियमबाह्य बांधकामे आहेत, अनेकांनी फ्रंट,साईड मार्जिन मध्ये,पार्किंगच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकामे केलीत.५ कुटुंबांची घरे होती तिथे ५० हून अधिका सदनिकांच्या इमारती उभ्या राहिल्या असे असताना या साऱ्या बड्या बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करून नियमात असलेलीच बांधकामे ठेवावीत,नियमबाह्य तातडीने काढून टाकावीत असा आग्रह धरण्या ऐवजी प्रभाग क्रमांक १० मधील अंडा-भुर्जी गाड्या,टपऱ्या,हातगाडी वाले यांना नगरसेवक किरण दगडे पाटलांनी का लक्ष्य करावे ? असा सवाल आता याभागातील पथारीवाले, टपरीवाले आणि हातगाडीवाले करू लागलेत. एक तर काही राजकीय आशीर्वाद असलेली मंडळे आहेत त्यांचे काही म्होरके देखील या व्यावसायिकांना त्रास देत असतात एवढेच काय इमारतीतील दुकानदार आपल्या दुकानापुढे पथारी,टपरी हातगाडी लावायची असेल तर अशा हातावरचे पोट असणाऱ्यांना भाडे मागतात.पुन्हा अतिक्रमण वाले आहेतच अशा स्थितीत पोट भरायला रस्त्यावर आलेली हि मंडळी काकुळतीला आलीत आणि एक मोठ्ठा चित्रपट निर्माता असलेल्या आणि बडे बडे दिग्दर्शक,स्टार घडवलेल्या दगडे पाटलांनी अशा सामान्य लोकांच्या पोटावर पाय द्यावे हे काहीना पटेनासे झालेय तर रस्त्यावर अतिक्रमणे नको,त्यामुळे खूप त्रास होतो अशी भूमिका असलेले काही जन त्यांच्या या कृतीचे स्वागत देखील करत आहेत.

दगडे पाटलांनी आपले असे म्हणणे समाज माध्यमातून मांडले आहे कि ,प्रभाग क्रमांक १० मधील वाढते अतिक्रमण,अनधिकृत तसेच आर.एम.सी. प्लांट यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय येथे तीव्र आंदोलन करावे लागले. या आंदोलनादरम्यान प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात अनधिकृत टपऱ्या व हातगाडे आम्ही आणले होते.प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला.अतिक्रमणावर तातडीने कारवाई न झाल्यास कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाला कुलूप लावून कामकाज ठप्प करण्यात येईल,असा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनही सतर्क झाले आहे.सहाय्यक आयुक्त जाधव यांनी तात्काळ दखल घेत बांधकाम विभागासह संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावली असून, पुढील ७ दिवसांत अतिक्रमण,अनधिकृत टपऱ्या,हातगाडे, अंडा-भुर्जी गाड्या तसेच आर.एम.सी.प्लांट हटविण्याची कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन दिले आहे.नागरिकांच्या हक्कांसाठी उभे राहणारे हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याची भावना प्रभागात व्यक्त होत आहे असाही दावा दगडे पाटलांनी केला आहे.