Home Blog Page 91

कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण:१२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन सुरु

पुणे- कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गती देण्यात आली असून १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन सुरु करून पहिला टप्पा आता पुर्णत्वाला येणार आहे .

दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याचे वाढते वाहतूक महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रकल्पासाठी भू-संपादनाकरिता विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाला गती देण्यात येत आहे.सध्या या मार्गावर ताशी सुमारे १५,००० पेक्षा अधिक वाहनांची वर्दळ असून, त्यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. PMR रिंग रोड तसेच कात्रज–खडी मशीन–वडकी बायपास मार्ग अद्याप उपलब्ध नसल्यामुळे बोपदेव घाट व दिवे घाटमार्गे ये-जा करणारी वाहने याच मार्गावर अवलंबून आहेत.याशिवाय परिसरात वेगाने वाढणारा निवासी व व्यावसायिक विकास, तसेच मोठ्या प्रमाणावर उभारलेली गोदामे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत असून, जून २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

प्रस्तावित ८४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील (DP) रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील भू-संपादन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

मंगळवार दि.७ एप्रिल २६ पासून प्रत्यक्ष जागेवर बॉण्ड्री मार्किंग तसेच फळझाडे व इतर झाडांची मोजणी करण्याचे काम विविध विभागांच्या समन्वयातून सुरू करण्यात आले आहे. एकूण ३.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे.

आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, भू-संपादन प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात आहे. अंतिम निवाडा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, लवकरच मंजुरी अपेक्षित आहे.

या प्रकल्पासाठी शासनाकडून सुमारे ₹१४० कोटी निधी , त्याचबरोबर महापालिकेमार्फत प्रथमच भू-संपादनासाठी सुमारे ₹३०० कोटींची भरीव तरतूद करण्यात येऊन रक्कम भूसंपादन साठी 100 % रक्कम जमा करण्यात आली आहे, यामुळे प्रकल्पाला आवश्यक आर्थिक बळ मिळाले आहे.

“कात्रज–कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.”
— आयुक्त नवल किशोर राम

या प्रक्रियेत अतिरिक्त आयुक्त (विशेष) श्री ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त (भू-संपादन) श्री निखिल मोरे तसेच विशेष भू-संपादन अधिकारी श्रीमती दारुणकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत कार्यवाही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवली आहे.

५० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामामध्ये मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिनी (U-ड्रेन), तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश आहे. तर ८४ मीटर रुंदीच्या अंतिम आराखड्यात मुख्य रस्ता, सर्विस रस्ते, पार्किंग, फूटपाथ, सायकल ट्रॅक, युटिलिटी डक्ट, पावसाळी वाहिनी आणि मलवाहिनी यांचा समावेश असेल.

“भू-संपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती यांना प्राधान्य देत, संबंधित सर्व प्रशासकीय टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्यात येईल.”
— जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी

सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी ₹८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ३२% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पूर्णत्वास जाण्यासाठी शहर अभियंता श्री पावसकर पथ विभागाचे मुख्य अभियंता श्री बनकर आणि सर्व संबंधित अधिकारी सातत्याने कार्यरत आहेत.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत उभारण्यात येणारा उड्डाणपूल राजस चौक येथे सुमारे २६० मीटरपर्यंत येत आहे. या उड्डाणपुलाच्या उतारासाठी विद्यमान वाहतूक वळविणे आवश्यक असल्याने सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी काही भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम सुरू आहे.

महापालिका व शासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कात्रज–कोंढवा रस्ता प्रकल्पाच्या भू-संपादन प्रक्रियेला वेग आला असून, यामुळे वाहतूक सुलभता वाढण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार:खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही, ते आणले गेले; रोहित पवारांचा मोठा दावा

पुणे-सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल्याचेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच भोंदू अशोक खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार ट्विट करत म्हणाले, भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असून ही फक्त सुरुवात असल्याचे पवार म्हणाले.

पुढे रोहित पवार म्हणाले, आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणेच उचित राहील, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे वृत्त खुद्द एकनाथ शिंदे यांनीच फेटाळून लावले होते. अशी कोणतीही बैठक झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

एकनाथ शिंदे म्हणाले होते की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

पुण्याला येणाऱ्या ‘सह्याद्री एक्सप्रेस’वर दरोडा:प्रवाशांचे पैसे, दागिने, मोबाईल लुटले

सातारा-
कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसला कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. चोरट्यांनी चक्क रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने व मोबाईल लंपास केले. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील शेणोली स्थानकाजवळ आली होती. यावेळी चोरट्यांनी रेल्वेच्या आऊटर सिग्नलवर लाल कापड टाकून तो बंद पाडला. तांत्रिक बिघाडामुळे सिग्नल ‘लाल’ झाल्याचे समजून रेल्वे चालकाने गाडी आऊटरलाच थांबवली. गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या ४ चोरट्यांनी डब्यांच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली.

या लुटीमध्ये मिरज येथील रहिवासी मीना विकास उमापती आणि त्यांच्या सहप्रवासी आशा नारायण पवार यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरट्यांनी खिडकीतून हात घालून जबरदस्तीने खेचून नेल्या. तसेच रंजन दयानिधी साहू या प्रवाशाचा मोबाईलही चोरट्यांनी हिसकावून घेतला. काही प्रवाशांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सर्वांना गप्प केले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.
मिरज पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, सोलापूरचे रवींद्र गायकवाड आणि मिरज लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. या घटनेमुळे सह्याद्री एक्सप्रेस बराच वेळ घटनास्थळी उभी होती, त्यानंतर ती पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.

याप्रकरणी मीना विकास उमापती (रा. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मिरज रेल्वे पोलिसांनी चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक फौजदार मुर्ढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी थेट छेडछाड करून अशा प्रकारे रेल्वे लुटल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः आऊटर सिग्नलवर रेल्वे थांबते तेव्हा प्रवाशांच्या संरक्षणासाठी कोणती खबरदारी घेतली जाते, याबाबत आता संताप व्यक्त होत आहे.

अशोक खरात हा सरकारचाच माणूस:राजकारणी अन् अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न,SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही – नाना पटोले

खरातवर तब्बल 16 गुन्हे, पैकी 8 बलात्काराचे
मुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होते आहेत. खरातशी संबंध आल्यामुळे रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले आहे. आता त्यांच्यामागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लागण्याचीही शक्यता आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आली आहेत. पण तूर्त तरी एसआयटीने या प्रकरणी एकाही नेत्याला चौकशीसाठी बोलावले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपरोक्त आरोप करत या प्रकरणाच्या एकूण चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नाना पटोले रविवारी म्हणाले, अशोक खरात हा सरकारचाच माणूस आहे. या प्रकरणात SIT चौकशी लावण्यात आली होती, मात्र त्या SIT कडून अद्याप कोणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. भोंदू अशोक खरात तसेच त्याच्यासोबत असलेल्या काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू असल्याचे दिसून येत आहे. दररोज या प्रकरणाशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकार राजकारण करत आहे. नाशिकसारख्या पवित्र स्थळी ही घटना घडली, परंतु सरकारकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही चिंतेची बाब आहे.

एसआयटीने शुक्रवारी अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्यात अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टी जप्त केल्यात. यात अशोक खरात आपल्या भक्तांना देत असलेल्या विशिष्ठ औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सॅनेटायझरची बाटली आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसह कार्यालयाच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातच्या हातांचे ठसे आढळले आहेत. खरात याच वस्तूंचा वापर करून पीडित महिलांना आपण सांगू ते करण्यास भाग पाडत होता, असा संशय आहे. या वस्तूंवर पीडित महिलांच्या हातांचे ठसे आढळले नाहीत. पण खरातने पीडितांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे अन्य काही पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत. हेच पुरावे अशोक खरातला दोषी ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असा दावा केला जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे भोंदू अशोक खरातवर शिर्डी, सिन्नर, नाशिक आदी वेगवेगळ्या भागांत तब्बल 16 गुन्हे दाखल झालेत. यात लैंगिक अत्याचाराशी संबंधित तब्बल 8 गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या खरात पोलिस कोठडीत आहे. त्याची कोठडी सोमवारी संपणार असल्यामुळे त्याला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचे काळे कारनामे पाहता त्याच्याभोवती चौकशीचा फास घट्टपणे आवळला जावा, यासाठी तपास यंत्रणेने अधिक खबरदारी घेतली आहे.

दुसरीकडे, अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. गत 10 दिवसांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पण अद्याप ती हाती लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी कल्पनाच्या माहेरी जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या नातलगांचीही झाडाझडती घेतली. पण तिचा कोणताही थांगपत्ता अजून लागला नाही. त्यामुळे फरार कल्पना कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही; काँग्रेस भूमिकेवर ठाम, अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर महायुती सरकार गप्प का?

पुणे दि. ११ एप्रिल २०२६..

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाड्याला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस भानुदास माळी, नगरसेवक प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चौधरी, शहर उपाध्यक्षा प्राची दूधाने, अविनाश बागवे, राज अंबिके तसेच काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु करून महिलांना शिक्षणाची दारे उघडून महिला सक्षमीकरणाचे एक महत्वाचे पाऊस उचलेले. या क्रांतीकारी निर्णयाला मात्र मनुवादी विचारांनी तीव्र विरोध करत सावित्रीबाईंना प्रचंड त्रास दिला, त्यांचा छळ केला. मनुवादी विचारांना काँग्रेसचा विरोध यातूनच आहे आणि सावित्रीबाईंना छळणाऱ्या विचारांचे लोक आज सत्तेत आहेत असे सपकाळ म्हणाले.

महात्मा ज्योतीबा फुलेंच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविणार..

२०२६ हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्म द्वीशताब्दी वर्ष विविध उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा जागर करण्याची विशेष मोहीम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर वर्षभर राबविली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महात्मा फुले उत्सव समिती स्थापन केली आहे. या समितीची नियोजन बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष भानुदास माळी, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, किशोर कान्हेरे, भाई नगराळे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे मनपा गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेवक प्रशांत जगताप, सुनील शिंदे, सुनील मलके, प्रदेश सरचिटणीस सीमा गुट्टे, आमिर शेख, यशराज पारखी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर महायुती सरकार गप्प का?

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सर्वांच्या विनंतीचा विचार करून अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, असे असले तरी काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस पक्ष आजही आग्रही आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला नाही मात्र काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पाठपुरावा काँग्रेस करत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केली, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार तातडीने बंगळुरूला गेले, त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी भेट घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशीही अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही चर्चा केली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या एनसीपी पक्षातील मंत्री व नेते यावर काहीच बोलत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मेट्रो आता पुणेकरांच्या जीवनाचा भाग!- ना. चंद्रकांतदादा पाटील

पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ एचे कोथरुडकरांसमोर सादरीकरण

पुढील चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प

पुणे:२०१६ रोजी पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा हे अनेकांना दिवास्वप्न वाटत होते. मात्र मेट्रोच्या वर्तमान स्थिती मुळे मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग बनली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हिंजवडी मेट्रो मार्गिका ही लवकर सुरु व्हावी; अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर व वारजे परिसराला जोडणाऱ्या मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून, सदर प्रकल्पाची माहिती स्थानिक नागरिकांना व्हावी, यासाठीचे सादरीकरण पुणे मेट्रोच्या वतीने आज करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, शिवरामपंत मेंगडे, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी पुणे मेट्रोचा विकास, सद्यस्थिती आणि प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ एचे विस्तृत सादरीकरण केले. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच कुटुंबासोबत योग्य वेळेची उपलब्धता वाढवणं ही मेट्रोच प्राथमिकता आहे. ‘लास्ट माईल कनेक्टिविटी’साठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये सुरु असलेल्या शटल बससेवा आणि प्रीपेड रिक्षाचेही हर्डिकर यांनी कौतुक केले.

तसेच, प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाबाबत नागरिकांच्या शंकांचेही निरसन केले.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले. २०१६ मध्ये पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा हे अनेकांना दिवास्वप्न वाटत होते. मात्र मेट्रोच्या वर्तमान स्थिती मुळे मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग बनली आहे. मेट्रोच्या यशस्वीततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरीव आर्थिक पाठबळ दिल्याने आज पुण्याच्या मेट्रोचे टप्पे पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत.

ते पुढे म्हणाले की, मेट्रो ४ आणि ४ ए हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोथरुडकरांचा वेळ, पैसा वाचण्यासोबतच वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पुण्यातील आयटीयन्ससाठी हिंजवडी मेट्रो मार्गिका देखील लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

परांजपे रस्त्यावर महिनाभरापासून खड्डा उघडाच, नागरिकांनी वेधले लक्ष 

पुणे: शहरातील गजबजलेल्या फर्गसन रस्ता ते आपटे रस्त्याला जोडणाऱ्या रँग्लर  परांजपे  रस्त्यावर, (हॉटेल वैशाली कॉर्नरवर) गेल्या महिनाभरापासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचारी मार्गावरच  भूमिगत वाहिन्या दुरुस्तीसाठी केलेल्या मोठा खड्डा उघडा पडलेला असून त्याभोवती तुटलेल्या फरशा आणि मातीचे ढिगारे दिसत आहेत. या ठिकाणी भूमिगत  वाहिन्यांचे काम सुरू असल्याचे दिसते, मात्र काम अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आले आहे.

या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर होते.स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या समस्येकडे लक्ष वेधत प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन रस्ता पूर्ववत करण्याची अपेक्षा  व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते.

आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत त्या जिथे राहायच्या तिथे त्यांचे दर्शन घ्यावे आणि उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार आहेत.

12,000 हून अधिक गाणी गायली

आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांची “दम मारो दम”, “पिया तू अब तो आजा” आणि “चुरा लिया है तुमने” यांसारखी गाणी आजही सदाबहार आहेत. आशा भोसले यांच्यासाठी संगीताचा प्रवास इतका सोपा नव्हता.आशा भोसले या प्रसिद्ध नाट्यअभिनेते आणि शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण आहेत. जेव्हा त्या फक्त 9 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, ज्यामुळे त्यांनी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाला आधार देण्यासाठी गायनाला सुरुवात केली होती.

16 वर्षांच्या असताना आशा भोसले यांनी मोठी बहीण लता यांच्या 31 वर्षांच्या सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केले होते. लताजी आणि त्यांचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. यामुळे त्यांनी आशासोबत बराच काळ बोलणे बंद केले होते.
लग्नानंतर आशा भोसले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्या घरगुती हिंसाचाराच्या बळीही ठरल्या. त्या आयुष्यात इतक्या निराश झाल्या होत्या की त्यांना स्वतःला संपवायचे होते. 1960 मध्ये त्या पहिल्या पतीपासून वेगळ्या झाल्या.

जेव्हा आशा भोसले यांचे पहिले लग्न तुटले आणि त्या आपल्या तीन मुलांसह (हेमंत, वर्षा आणि आनंद) पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतल्या, तेव्हा हळूहळू दुरावा कमी होऊ लागला.

आर.डी. बर्मन यांच्या आईने म्हटले होते की लग्न माझ्या मृतदेहावरच होईल

आशा भोसले यांनी संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले होते. त्यांची पहिली भेट 1956 मध्ये झाली होती. त्यांची घट्ट मैत्री आणि संगीताचा प्रवास ‘तिसरी मंझिल’ (1966) या चित्रपटादरम्यान सुरू झाला. नंतर, एकत्र काम करत असताना त्यांची चांगली मैत्री हळूहळू प्रेमात बदलू लागली.
एक दिवस आरडी बर्मन यांनी संधी साधून आशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आशानी लगेच होकार दिला, पण बर्मनच्या आईने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी बर्मनला सांगितले की, ‘हे लग्न होणार असेल तर ते माझ्या मृतदेहावरच होईल.’ बर्मनच्या आईने नकार दिला कारण आशा त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या होत्या आणि 3 मुलांची आई होत्या.

तेव्हा बर्मनने आईचे म्हणणे शांतपणे ऐकले. मात्र, जेव्हा बर्मनचे वडील एस.डी. बर्मन यांचे निधन झाले, तेव्हा आईची मानसिक स्थिती बिघडली. अशा परिस्थितीत आईच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी बर्मनने 1980 मध्ये आशा भोसले यांच्याशी लग्न केले होते.

आशा भोसले यांनी 50 ते 90 च्या दशकात ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन, खय्याम आणि बप्पी लहरी यांसारख्या अनेक संगीतकारांसोबत काम केले. अनेक सदाबहार गाणी गायली. मात्र, एक वेळ अशीही होती, जेव्हा याच आवाजाला खराब सांगून रेकॉर्डिंग स्टुडिओतून परत पाठवण्यात आले होते.

आरजे अनमोल यांच्यासोबतच्या संभाषणात आशा भोसले यांनी सांगितले होते की, आवाज खराब असल्याचे सांगून त्यांना आणि किशोर कुमार यांना रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर जाण्यास सांगितले होते.

त्यांनी सांगितले होते की, 1947 मध्ये त्या किशोर कुमार यांच्यासोबत जे.बी. रूंगटा यांच्या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये राज कपूर आणि नर्गिस अभिनीत ‘जान पहचान’ चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी गेल्या होत्या. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश होते.
आजकाल स्टुडिओ वातानुकूलित (एयर-कंडीशन्ड) असतात आणि त्यात अनेक मशीन असतात. त्या दिवसांत दोन ट्रॅकच्या मशीन असायच्या. एक ट्रॅक संगीतकारासाठी आणि दुसरा गायकासाठी असायचा. माइकही एकच असायचा आणि गायकांना त्याच्यासमोर उभे राहून गावे लागत असे.

आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गाणे सुरू केले. त्यानंतर साउंड रेकॉर्डिस्ट रॉबिन चटर्जी यांनी बंगालीमध्ये सांगितले होते की, तुमच्या लोकांचा आवाज माइकमध्ये चांगला येत नाहीये. किशोर कुमार समजले कारण त्यांना बंगाली येत होती. त्यांनी आशा भोसले यांना सांगितले की, काहीतरी गडबड आहे. आशा काहीच बोलल्या नाहीत. रॉबिन चटर्जी यांनी संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांना सांगितले की, तुम्ही दुसरे गायक आणा. यांचा आवाज गाण्यालायक नाहीये. त्यानंतर दोघेही स्टुडिओतून निघून गेले होते.

१९४३ मध्ये मिळाला पहिला ब्रेक

८ सप्टेंबर १९३३ रोजी आशा भोसले यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतातील सांगली येथे झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे रंगमंच कलाकार होते. आशा अवघ्या ९ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत लतांनीच संघर्ष करून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि बहिणींचे संगोपन केले. कुटुंब आधी पुणे आणि नंतर मुंबईत येऊन स्थायिक झाले. येथे अवघ्या 10 वर्षांच्या वयात आशा भोसले यांनी गाणे सुरू केले. त्यांना पहिला ब्रेक मराठी चित्रपट ‘माझा बाळ’ (१९४३) मधील ‘चला चला नाव बाळा’ या गाण्याने मिळाला. आशा फक्त १५ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांना हिंदी चित्रपट ‘चुनरिया’ मधील ‘सावन आया’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली.

गझल, अभंग, भावगीते, भूपाळी ते अगदी पाश्चात्य ढंगाची ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांती ओम’ सारखी सुपरहिट गाणी… आशाताईंनी प्रत्येक प्रकारच्या संगीतात आपल्या आवाजाची जादू निर्माण केली. केवळ गायनच नाही, तर संगीतात नवनवीन प्रयोग करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना ‘बॉलिवूडची सर्वात वर्सटाईल गायिका’ म्हणून ओळखले गेले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडिलांकडे संगीताचे धडे गिरवणाऱ्या आशाताईंनी आपल्या आयुष्यातील ८० हून अधिक वर्षे या कलेला समर्पित केली होती.

आशा भोसले यांना शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी प्रचंड थकवा आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’मुळे (सर्व अवयव निकामी झाल्याने) त्यांची प्राणज्योत मालवली. आशाताईंचे पार्थिव उद्या, सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत त्यांच्या लोअर परळ येथील ‘कासा ग्रांडे’ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला पवित्र देखील मानले जाते अशा नदीच्या सफाईसाठी कोणी भल्या जोरदार दमदार पावसाचीच आणि धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होण्याचीच जणू वाट पाहत आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी स्थिती नेहमी असते . याच पार्श्वभूमीवर आज क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काही फोटो सह महापालिका आयुक्तांकडे गाऱ्हाणे गायले आहे. पहा वाचा त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे….

मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय –
1) पावसाळ्यापूर्वी नदीपात्राच्या सफाई बाबत.
2) बाबा भिडे पुलाचे काम अजून किती वर्ष चालणार ?
मा. महोदय,
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्याची पावसाळ्यापूर्वी सफाई होणे आवश्यक आहे अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने करत आहे.
विशेषतः डेंगळे पूल ते म्हात्रे पूल पर्यंत चा नदीपात्राचा भाग हा अत्यंत अस्वच्छ असून सोबत बाबा भिडे पुलाशेजारील काही छायाचित्र जोडत आहे.सदर कचरा नं हलविल्यास अवकाळी पावसाने किंवा ऐन पावसाळ्यात हा कचरा पुनःश्च नदीतून वहात जातो व शेजारील गावातून वाहताना तेथे अडकतो. याचे एक उदाहरण म्हणजे कवडीपाट येथे ह्या अडकलेल्या कचऱ्यामुळे तेथे येणारे परदेशी स्थलांतरित पक्षी कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच येथे नदीपात्रात मेट्रो चे साहित्य पडलेले असून ते देखील पावसाळ्यापूर्वी हलविणे गरजेचे आहे.
बाबा भिडे पुलाचे काम अनेक वर्ष सुरूच असून अनेकदा हा पूल वाहतुकीस बंद करून देखील येथे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते. तरी मेट्रो व्यवस्थापनाशी चर्चा करून ह्या पुलाचे काम कधी पूर्ण होईल व येथील बॅरिकेड कधी काढले जातील याची माहिती जाहीर करावी.
आपण ह्या बाबत तत्परतेने कारवाई कराल अशी खात्री वाटते.
आपला,
संदीप खर्डेकर.

‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर,32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी 7 जण जेरबंद

मुंबई-क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर गुन्हेगारीच्या ‘पिच’वर फसवणुकीची बॅटिंग करत असल्याचे उघड झाले आहे. गोरेगावमधील एका ज्येष्ठ महिलेला ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी गुजरात आणि नांदेडमधून एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी गुजरात आणि नांदेडमधून एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मास्टरमाईंड ऋषी आरोठे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, गुजरात आणि बंगळुरूतही गुन्हे दाखल आहेत. कमी वेळात श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी त्याने फसवणुकीच्या पैशांसाठी ‘म्युल अकाउंट्स’ (भाड्याची बँक खाती) पुरवण्याचे जाळे विणले. विशेष म्हणजे, ऋषीचे वडील आणि क्रिकेट प्रशिक्षक असलेले तुषार आरोठे हेदेखील काही वर्षांपूर्वी क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात अडकले होते. कोट्यवधींच्या रोकड जप्तीप्रकरणी त्यांनाही अटक झाली होती.

पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार ,त्यांचे सर्व प्रश्न सोडविणार -महापौर

पुणे-महापालिका हद्दीतील प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार असून अशा अधिकृत व्यवसायिकांना संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा आज येथे महापौर मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.

शहरातील पथारी व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला शिस्तबद्ध व कायदेशीर स्वरूप देण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.याबाबत त्या म्हणाल्या,’शहरातील सर्व पथारी व्यवसायिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात येणार असून, या माध्यमातून त्यांना अधिकृत परवाना (लायसन्स) प्रदान करण्यात येईल. या बारकोडमध्ये संबंधित व्यवसायिकाची संपूर्ण माहिती, व्यवसायाचा प्रकार व परवानगीची जागा यांचा समावेश असेल.या उपक्रमामुळे अनधिकृत पथारी व्यवसायावर नियंत्रण येऊन अधिकृत व्यवसायिकांना संरक्षण मिळणार आहे, तसेच शहरातील व्यवस्थापन अधिक सुसूत्र होण्यास मदत होणार आहे.तसेच, पथारी व्यवसायिकांच्या संघटनेने महानगरपालिकेस लेखी अनूमोदन देत पुढील बाबींची हमी दिली आहे की, ते रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, स्वच्छता राखतील, महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करतील तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतील.

या संदर्भात आपण संबंधित सर्व विभागांना या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, या माध्यमातून शहरातील पथारी व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व नियमनबद्ध करण्याचा उद्देश आहे.असेही महापौर नागपुरे यांनी म्हटले आहे.

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ​मुळा-मुठा नदीला प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करण्याच्यादृष्टीने
आज मुंढवा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच भैरोबा नाला सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसराची पाहणी केली; मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुळा-मुठा नदीला प्रदूषणातून मुक्त करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असून प्रदूषणाचे मूळ शोधून त्यावर तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलावीत. मुळा-मुठा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

पुण्यातील सांडपाणी प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी भैरोबा नाला येथील प्रकल्पाचा संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेतला. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. नदीत कचरा टाकणे थांबवूया, पुण्याचे वैभव वाचवूया, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी पुणे करांना उद्देशून केले.

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी – केजीपी12 (Gamini – KGP12) या भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. ही मादी चित्ता गामिनीच्या पहिल्या वितातील (First Litter – पहिल्यांदा जन्म दिलेल्या पिल्लांच्या समूहातील) दुसरे पिल्लू असून, तिचे वय 25 महिने आहे. ही घटना भारताच्या चित्ता संवर्धनाच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या घटनेसंदर्भातली माहिती, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमावर सामायिक केली असून, ही घटना कुनो राष्ट्रीय उद्यान आणि देशाच्या वन्यजीव संवर्धन प्रयत्नांमधील  मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गामिनीची भारतात जन्मलेली मादी चित्ता, गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून इथल्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात वावरत आहे. या मादी चित्त्याने नैसर्गिक वातावरण आणि स्थितीत यशस्वीपणे चार बछड्यांना जन्म दिला. ही घडामोड चित्ता पुनर्वसन कार्यक्रमातील एक मोठा टप्पा ठरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

चित्त्यांचे भारतातील अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी 2022 मध्ये भारतात  चित्ता पुनर्वसनाला सुरूवात झाल्यापासून, चित्त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नोंदवला हा पहिलाच जन्म आहे, यासोबतच भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याच्या बाबतीतीलही ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केले आहे. भारतातील नैसर्गिक परिस्थितीत चित्त्यांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांचे प्रजनन होत राहील हे सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असून, ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे यश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या यशस्वी घटनेतून भारतीय पर्यावरणीय परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने चित्त्यांमधील वाढती क्षमता दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच या घटनेतून कुनो राष्ट्रीय उद्यानातील संवर्धन आणि विज्ञाननिष्ठ व्यवस्थापनासाठी केल्या जात असलेल्या शाश्वत प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही यातून दिसून येते असेही त्यांनी म्हटले आहे.

समाज माध्यमावरील आपल्या संदेशातून केंद्रीय मंत्री मंत्री भूपेंद्र यादव यांनी चित्ता संवर्धन कार्यक्रमात सहभागी असलेले वन्यजीव व्यवस्थापक, पशुवैद्यक आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या समर्पित आणि अथक परिश्रमांचीही प्रशंसा केली आहे. ही घटना देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यासोबतच त्यांनी या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :
भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत घर यादी गट व घर गणना ही प्रक्रिया दिनांक १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज Field Trainers च्या (Batch १, २,३ व ४ बॅच) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष field work देखील पार पाडण्यात आले.याप्रसंगी १४७ fild ट्रेनर उपस्थित होते.

महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी नवल किशोर राम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) .ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त विजय लांडगे तसेच शहर जनगणना कार्यालयाच्या माध्यमातून सदर प्रशिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमांतर्गत शहरातील विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांची Field Trainer म्हणून निवड करण्यात आली ., Master Trainer म्हणून महा सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे,निवासी नायब तहसीलदार मावळ, गणेश तळेकर,निवासी नायब तहसीलदार शिरूर स्नेहा गोसावी,निवासी नायब तहसीलदार बारामती नामदेव काळे यांनी अतिशय सोप्या, ओघवत्या भाषेत सर्व जनगणणेबाबत संकल्पना, digital जनगणना करतानाचे माध्यमे, त्याचा वापर, आणि नागरिकांशी प्रत्यक्ष प्रगणक आणि पर्येंवेक्षक यांनी साधावायचा संवाद, निर्धारित केलेली प्रश्नावलीचे अचूक ज्ञान, आणि ती भरताना घ्यायची विशेष काळजी, आणि भारत सरकार, आणि जनगणना संचालनालायकडून वेळीवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करुन विहित वेळेत घर गणना गट आणि गणना घरे यांची प्रथम टप्प्यातील नोंदणी कार्याबाबतीतील प्रशिक्षण प्रधान जनगणना आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर जनगणना कार्यालयच्या वतीने यशस्वीपणे पार पडले गेले.
सर्व field trainers यांनी प्रशिक्षणबाबत विशेष समाधान व्यक्त केले.राष्ट्रीय कर्तव्य करण्याची ही संधी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पुणे शहरासाठी १४७ field trainers नियुक्त केले आहेत.

या प्रसंगी आयुक्त यांनी Field Trainers यांना मार्गदर्शन करताना नागरिक, गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी (Chairman), शाळा, महाविद्यालये तसेच सर्व संबंधित घटकांनी घर यादी गट व घर गणना प्रक्रियेस उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच, यंदाच्या जनगणनेत नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या स्व-गणना (Self Enumeration) या पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही आवाहन केले.जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येकाने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकांना सहकार्य करावे.असे ते म्हणाले.

नागरिकांसाठी आवाहन –

महापालिका आयुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त
पुणे महानगरपालिका
आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी नवल किशोर राम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी जनगणना २०२७ या राष्ट्रीय कर्तव्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
आयुक्त यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून शासनाच्या विविध योजना, धोरणे आणि संसाधनांचे योग्य नियोजन यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना अचूक आणि संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे.
अतिरिक्त आयुक्त यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, यंदाच्या डिजिटल जनगणनेमध्ये स्व-गणना (Self Enumeration) हा सुलभ पर्याय उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्था आणि सर्व घटकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे.
दोन्ही मान्यवरांनी एकमुखाने नमूद केले की,
“जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान असलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. चला, आपण सर्वजण मिळून या महत्त्वपूर्ण कार्यात सहभाग नोंदवूया.”

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली.

पुणे, दि. 10 — उंड्री (ता. हवेली) परिसरातील रेडिमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग, झोन-१च्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून, सुमारे २७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडण्यात आली.

या कारवाईत अनधिकृत शेड, स्ट्रक्चर्स, यंत्रसामग्रीसाठी उभारलेली बांधकामे तसेच परवानगीशिवाय उभारण्यात आलेले विविध घटक हटविण्यात आले. संबंधित प्रकल्पांनी आवश्यक परवानग्या न घेता काम सुरू ठेवले असल्याचे निदर्शनास आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे आणि कार्यकारी अभियंता सुरेश साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे व राहुल सोरटे, तसेच कनिष्ठ अभियंता ऋतुजा चिलकेवार, राजेंद्र फुंडे, सागर शिंदे व किरण आहिरराव यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ (बिगारी) तसेच दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.

यावेळी एकूण ७ RMC प्लांट्सवर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकल्पांविरुद्ध पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच महावितरण (MSEB) यांना कळविण्यात आले आहे. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणांच्या सहकार्याने ही कारवाई सुरळीत पार पडली.

नियमबाह्य RMC (रेडिमिक्स काँक्रीट) प्लांट व बांधकामांवर तात्काळ कारवाई करून ते पाडण्यात येतील. परवानगीशिवाय प्रकल्प चालविणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. RMC प्लांट सुरू करण्यापूर्वी पुणे मनपा, MPCB व MSEB यांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे.