Home Blog Page 90

युवा नेते जय पवार यांच्या या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण..

बारामती : अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत.. स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेतानाच ग्रामस्थांशी ते संवाद साधत आहेत.. आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरु झाली.. त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं.. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.. त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला.. जय पवार यांची ही कृती उपस्थितांना अजितदादांची आठवण करुन देणारी ठरली.. दरम्यान, गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं संवाद साधताना जय पवार हे अजितदादाच्या आठवणीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं..

शरद मोहोळ खून :आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेल्या वकील संजय उधाणचा जामीनअर्ज फेटाळला

पुणे–पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी संजय उधाण याने गुन्ह्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला होता, तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले.संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी, तसेच मूळ फिर्यादीचे वकील ॲड. खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव आणि ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.

घटनेनंतर लगेचच आरोपी संजय उधाण यांचा मुख्य आरोपी नामदेव कांगुडे याच्याशी फोनवर संपर्क झाला होता. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार करणारे साहिल पोळेकर, नामदेव कांगुडे आणि चंद्रकांत शेलके यांना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

उधाण यांनी सहआरोपी वकील रवी पवार यांच्याशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली. तसेच, सहआरोपींना सिम कार्ड नष्ट करण्याचा सल्ला दिला गेला आणि खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ नवीन सिम कार्ड पुरविण्यात आले. आरोपीने नवी मुंबई क्राईम ब्रांचमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधून आत्मसमर्पणाबाबत चर्चा करण्याचाही प्रयत्न केला होता, यावरून त्यांना गुन्ह्याची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येते, असे ॲड. राजपूत आणि सोलंकी यांनी जामीनाला विरोध करताना सांगितले.

बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, संजय उधाण हे व्यवसायाने वकील असून आरोपी त्यांचे पूर्वीचे पक्षकार होते. त्यांच्याशी झालेला संपर्क केवळ व्यावसायिक स्वरूपाचा होता. तसेच, सहआरोपी रवी पवार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समानतेच्या तत्त्वावर त्यांनाही जामीन द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली.

न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावताना नमूद केले की, रवी पवार यांची भूमिका मर्यादित होती आणि त्यांचा थेट शूटरांशी संपर्क नव्हता. उलट, संजय उधाण यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत करणे, त्यांच्या हालचालींचे समन्वय करणे आणि आत्मसमर्पणाबाबत प्रयत्न करणे यावरून त्यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. न्यायालयाने ‘कायदेशीर सल्ला’ या बचावालाही नाकारले.

अमेरिका आजपासून होर्मुझ स्ट्रेटवर नाकेबंदी करणार

:ट्रम्प म्हणाले- इराणी नौदल नष्ट, 158 जहाजे उद्ध्वस्त केली; कच्च्या तेलाची किंमत पुन्हा 100 डॉलर पार
वॉशिंग्टन डीसी-अमेरिका आजपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी लागू करत आहे. यूएस सेंट्रल कमांडनुसार, इराणी बंदरांकडे ये-जा करणारी जहाजे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजल्यापासून रोखली जातील.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणला तेल विक्री करण्यापासून रोखणे हा या नाकेबंदीचा उद्देश आहे. ट्रम्प यांच्या मते, या प्रयत्नात इतर अनेक देश अमेरिकेला पाठिंबा देत आहेत. ट्रम्प यांनी दावा केला की, इराणच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे नौदल अक्षरशः नष्ट झाले आहे. त्यांनी सांगितले की १५८ जहाजे नष्ट झाली आहेत.

नाकेबंदी जाहीर झाल्यापासून जागतिक तेलाच्या किमती वाढल्या असून, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रति बॅरल १०४ डॉलर आणि ब्रेंट क्रूड १०२ डॉलरच्या वर पोहोचले आहे.

दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिका इराणवर आणखी एका लष्करी हल्ल्याचा विचार करत आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे की सर्व पर्याय खुले आहेत आणि पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतले जातील.
चीनचे आवाहन- ट्रम्प यांच्या नाकेबंदीच्या धमकीला प्रतिसाद म्हणून सर्व पक्षांनी संयम बाळगावा
ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची धमकी दिल्यानंतर, चीनने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित, स्थिर आणि खुली ठेवणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समान हिताचे आहे.

या महत्त्वाच्या सागरी मार्गात कोणताही व्यत्यय आल्यास त्याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा चीनने दिला असून, ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा कायम राखण्यासाठी सर्व पक्षांसोबत काम करण्यास आपण तयार असल्याचेही म्हटले आहे.

अनोळखी लिंकवर क्लिक, मोबाईल केला हॅक;अन आठ लाखांची ऑनलाइन फसवणूक


पुणे:एका ज्येष्ठ नागरिकास मोबाईलवरील अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले. सायबर चोरट्यांनी या लिंकद्वारे त्यांचा मोबाईल ‘हॅक’ करून बँक खात्यातून सात लाख ९६ हजार रुपयांची रक्कम परस्पर लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एरंडवणे परिसरातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला आहे. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक लिंक पाठवली. ज्येष्ठ नागरिकाने ती लिंक उघडताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर तांत्रिकदृष्ट्या ताबा मिळवत बँक खात्यातून चोरट्यांनी परस्पर सात लाख ९६ हजार रुपयांची रोकड लांबविली. बँक खात्यातून अचानक एवढी मोठी रक्कम कमी झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकास फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

महिलेवर लैंगिक अत्याचार:पुण्यात आणखी एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल

पुणे: पती-पत्नीतील मतभेद दूर करून पुन्हा एकत्र आणण्याचं आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ४२ वर्षीय महिलेनं स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार २७ मे २०२१ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचं पोलीसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला ‘देवऋषी’ असल्याचं भासवून महिलेला तिच्या वैयक्तिक अडचणी सोडवून देण्याचं आश्वासन दिलं. विशेषतः पतीशी असलेले मतभेद दूर करून दोघांना एकत्र आणण्याचं आमिष दाखवत त्याने तिचा विश्वास संपादन केला. ओळख वाढवल्यानंतर आरोपीने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर आरोपीने लोणेरे, उतेखोल आणि माणगाव आदी ठिकाणी वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपीने नोकरी लावून देण्याचं, बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचं, तसेच बंगला घेऊन देण्याचं आमिष दाखवत महिलेची फसवणूक केली. फिर्यादी महिलेचा एकटेपणा ओळखून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि वेळोवेळी तब्बल ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. तसेच दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून जबरदस्तीने अत्याचार केल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करत असून, आरोपीविरुद्ध फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार
मुंबई, दि.12 : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, गेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून, त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

आमन तांबे :- आधुनिक तमाशा सृष्टीचा ‘बादशाह’

0

लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. या परंपरेला आपल्या प्रतिभेने समृद्ध करणाऱ्या कलावंतांमध्ये आमन तांबे पुणेकर यांचे तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय असे आज ही नाव घेतले जाते. गोड आवाज, प्रभावी सूत्रसंचालन आणि अभिनयाची अफाट ताकद या तिन्ही गुणांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता.

आमन तांबे हे केवळ कलाकार नव्हते, तर ते लोककलेचे खरे जतनकर्ते होते. त्यांच्या आवाजातली मधुरता आणि भावस्पर्शी सादरीकरणामुळे प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभत असे. सूत्रसंचालन करताना त्यांच्या ओघवत्या शैलीतून कार्यक्रमाला रंगत येत असे, तर अभिनयाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना हसवत, रडवत आणि विचार करायला भाग पाडत.
लोकनाट्य तमाशा या पारंपरिक कलेत त्यांनी दिलेले योगदान नोंद घेण्यासारखी होती.. त्यांनी परंपरेचा गाभा जपत आधुनिकतेची जोड दिली आणि ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. गावोगावी जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शान समजली जायची.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, जिद्द आणि कलेप्रती अपार प्रेम होते. सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याने वागणारा, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणारा आणि रसिकांशी आत्मीयतेने जोडला जाणारा हा कलाकार सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यांची कौटुंबिक पार्शवभूमी पाहिली तर अहमद फकीर मोहम्मद तांबे यांनी 1921 साली पुण्यात आर्यभूषण थिएटरची स्थापना केली.हे थिएटर म्हणजे तमाशा कलावंतांची कर्मभूमी होती.येथे अनेक लोककलावंत घडले.
म्हणूनच पूर्वी पुण्याला लोककलेचे माहेर घर सुद्धा म्हणायचे. अहमद शेठ यांनी सुद्धा काही कालावधीनंतर आपला स्वतःचा सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या नावाने तमाशाचा फड काढला.आणि महाराष्ट्राभर हा तमाशा फिरविला.पारंपारिक नामांकित तमाशा म्हणून हा फड नावारुपाला आला.

एकेदिवशी सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या तमाशाच्या रंगमंचावर सोळा वर्षाचा गुबगुबीत, सतत स्मित हास्य करणारा मुलगा रंगमंचावर चढला अन आपल्या गोड आवाज गाणी म्हणून लागला.चित्रपटाच्या विविध गाण्यावर नाचू लागला.तमाशातील अभिनय करून लागला.अशा या मुलाचे नाव होते. आमन अहमदशेठ तांबे.त्यांचा जन्म पुण्यातील गणेश पेठेतील जुन्या घरी दिनांक 03मार्च 1960 रोजी झाला. खरं तर अनेकांना प्रश्न पडतो. आमनशेठ हे मुस्लिम समाजाचे आहेत,तर त्यांचे आडनाव तांबे कसे..! असा अनेकांना प्रश्न पडतो. मुळात अहमदशेठ तांबे यांची कुळ- वंशावळ ही कोकणातील आहे. त्यांचे पूर्वज हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालधोल (ता.चिपळूण ) या गावचे रहिवाशी होते.अन कोकणात बहुतेक मुस्लिम समाजातील आडनावं ही मराठीत असतात.किंवा त्यांच्या गावावरून असतात.

आमन शेठ केवळ एक कलाकार नव्हते , तर एक बहुआयामी कलावंत होते. त्यांच्यात विविध कलेचे पैलू होते. त्यांच्या आवाजातली गोडी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती, तर सूत्रसंचालन करताना ते कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दयायचे. त्यांच्या शब्दांमध्ये ओघवती शैली आणि प्रसंगानुरूप विनोदबुद्धी असल्यामुळे प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद साधला जायचा. दादा कोंडके आणि निळू फुले यांचा आवाज ते काढायचे.त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून घेण्याचे ठरविले.
म्हणूनच एके दिवशी आमन तांबे पुणेकर सह सरस्वती कोल्हापूरकर असा तमाशाचा बोर्डावर आणि तमाशाच्या गाड्यावर झळकला. अन खऱ्या अर्थाने आपल्या कलागुणांनी आमन तांबे महाराष्ट्रातील लोककला क्षेत्रात नावारुपाला आले.

अभिनयाच्या क्षेत्रातही आमन तांबे यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. विविध भूमिकांमध्ये ते सहजपणे रंगून जायचे. त्यांची अभिनयशैली ही नैसर्गिक आणि प्रभावी असल्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटत होती. विशेषतः लोकनाट्य तमाशा सारख्या पारंपरिक कलेत त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय असायचे. प्रत्येक जिल्ह्यातील गावातील कला रसिकांना काय हवं आहे.यांची जाण त्यांना चांगलीच ठाऊक होती.म्हणून प्रत्येक गावात ते तमाशा बदलून करायचे.रंगमंचावर आल्यावर कला रसिकांना आपलसं करून घेण्याची त्यांची एक आगळी वेगळी पद्धत होती.आमन तांबे थेट रंगमंचावरून खाली बसलेल्या प्रेक्षकांमध्ये उतरायचे. “जव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, निसर्ग राजा ऐक सांगतो, जीवा शिवाची बैल जोडी, माझ्याकडे बघती गालत हसती, बांगो.. बांगो.. सारा जमाना हसीने का दिवाना, जीले ले जीले आयो आयो जीले ले..! अशा गाण्यावर त्यांनी रसिकांना थिरकायला लावायाचे. विशेष म्हणजे एलईडी लाईटचा ड्रेस घालून ते रंगमंचाच्या खाली लोकांमध्ये मिसळायचे.हिंदी मराठी गीतांचा तो एक काळ त्यांनी गाजविला. शिर्डीच्या साई बाबाचे ते एक आपल्या गोड आवाजात साईबाबा बोलो..! हे भक्तीगीत अत्यंत भक्तिमय स्वरात गात असायचे. या भक्ती गीताला लोकं टाळ्या वाजवायचे. अगदी जमलेले प्रेक्षक अगदी भक्ती रसात बुड्यायचे, असे हे आमन तांबे साई बाबांची वेशभूषा परिधान केल्यावर तर अनेक वेळा ओळखू सुद्धा यायचे नाही.येवढा प्रभाव त्यांनी या गाण्यात निर्माण केला होता.मात्र त्यांच्या तमाशाचे एक वैशिष्ट दिसते की, कधी ही थिल्लर मुलांनी कोणत्या गाण्यासाठी तमाशा बंद पाडला नाही.कारण अमन तांबे आपल्या मधुर आवाजाने रसिकांना ताब्यात ठेवत होते.त्यांनी कधी प्रेक्षकांच्या हातात आपला तमाशा जावून दिला नाही.असे सांगितलं जाते.

परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेचा स्पर्श देण्याची त्यांची इतरांपेक्षा एक वेगळी हातोटी होती. अन यामध्ये अमन तांबे यांचा कोणी हात धरू शकत नव्हता. एखाद्या हिंदीतील चित्रपट अभिनेत्यासारखा त्यांचा एक रुबाब असायचा.मराठवाड्यात, कोकणातील रायगड पट्ट्यात त्यांच्या भेटीसाठी तमाशाचा प्रेक्षक मागे लागायचे. असा त्यांनी आपला एक दबदबा निर्माण केला होता. कोणी त्यांना ज्युनिअर अमिताभ बच्चन म्हणत, तर कोणी त्यांना ज्युनिअर मिथुन चक्रवती म्हणायचे. असे म्हणतात की, 80 आणि 90 च्या दशकात तमाशाला आधुनिकतेचे स्वरूप त्यांनी दिले. एलईडी ड्रेस त्याला आपण लाईट अप कॉसच्यूम म्हणतो. (light up costume ) हा तमाशात पहिला प्रकार अमन तांबे यांनी आणला. इको साउंड सिस्टीम,मिरर बॉल,स्टॉपर लाईट,कलावंतांच्या ग्रुप डान्समध्ये एक सारखे ड्रेसिंग आणि तमाशा सृष्टीत रंगबाजीचा ड्रॉप पडदा. प्रथमच त्यांनी आपल्या तमाशा वापरला.
सूत्रसंचालन करताना आमन तांबे कार्यक्रमाची सूत्रे इतक्या प्रभावीपणे हाताळायाचे की, प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहायचा. कार्यक्रमाचा प्रत्येक भाग सुसंगत आणि रंगतदार ठेवण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यामुळे ते केवळ सूत्रसंचालक नसून कार्यक्रमाचे आत्मा बनला होता.
लोककलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. गावोगावी होणाऱ्या जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शान मानली जायची.एक काळ असा होता की,त्यांच्या तमाशाला आठ -आठ मॅनेजर काम करीत असायचे.त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांच्या फडाला चांगली बुकिंग होत होती.

अभिनयचा बुलंद आवाज..!

​आमन तांबे यांची खरी ओळख त्यांच्या पहाडी आवाजात आणि डोळ्यांतील जाज्वल्य अभिनयात होती. ‘संताजी घोरपडे’ या वगनाट्यात त्यांनी साकारलेला ‘औरंगजेब’ आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. जेव्हा ते रंगमंचावर औरंगजेबाच्या वेशात उभे राहत, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत असत. क्रूरता, अगतिकता आणि दरारा यांचा असा त्रिवेणी संगम त्यांच्या अभिनयातून उमटत असे.त्यांची काही गाजलेली वगनाट्ये म्हणजे लोककलेच्या इतिहासातील सोनेरी पाने आहेत. शौर्याची गाथा मांडणारे पाच तोफाची सलामी, प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा भावूक वगनाट्य आईचं काळीज, अस्सल मराठी मातीचा संघर्ष सांगणारा दख्खनचा मराठा, खंडोबाची चोरी,, अशा वगनाट्यात त्यांनी जीव ओतून केलेल्या अभिनयला पाच तोफाची सलामी दयावी. अशा भूमिका त्यांनी साकारल्या.

आपला गावच्या रागड्या तमाशा बरोबर त्यांची चित्रपट क्षेत्राकडे ही एक वेगळी ओढ होती.त्यामुळे चित्रपट सृष्टीत जे काही नवीन लाईट सिस्टीम आली की,हे जर आपल्या तमाशात आणले तर…. असा प्रश्न लगेच त्यांना पडायचा.म्हणून त्या काळात जेवढी लाईट सिस्टीम एखाद्या चित्रपटात आपण बघितली की ,पुढच्या तमाशा सिझनला ती लाईट सिस्टीम आपल्याला अमन तांबे यांच्या तमाशात हमखास दिसायची. त्यामुळे आमन तांबे पुणेकर यांनी तमाशा आणि चित्रपट सृष्टीतील मनोरंजनाचा मिलाप अगदी पद्धतशीरपणे जुळवला होता.त्यातून कुठेही तमाशाच्या परंपरेला धक्का न लावता, त्यांनी आपली एक वेगळी कलाकृती निर्माण केली होती.
हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते.हिंदी चित्रपट अभिनेता राकेश रोशन,जॉनी लिव्हर,गोविंदा धर्मेद्र,हेमा मालिनी, मराठी चित्रपट सृष्टीतील दादा कोंडके,लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलावंतांचे त्यांचे घरोब्याचे संबंध होते.अनेक अभिनेते त्यांच्या घरी जेवून जायचे.परंतु त्याचा कधीच गाजावाजा केला नाही. अगदी दुबई,सिंगापूर, लंडन,मॉरीशस या ठिकाणी त्यांनी आपला कार्यक्रम नेवून महाराष्ट्राची पारंपारिक लावणी,बतावणी तिथल्या रसिकांना दाखविल्या.गोवा,गुजरात,कर्नाटक,राजस्थान,मध्यप्रदेश या राज्यात त्यांनी आपला कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला.त्यांचे हिंदीवर चांगले प्रभुत्व असल्याने अनेक शेरशायरी ते स्वतः तयार करीत होते. त्यामुळे इतर राज्यातील कला रसिक अमन तांबे यांच्या तमाशाला विशेष उपस्थिती लावून त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे.
आमन तांबे यांनी पंढरीची वारी या चित्रपटात जेष्ठ लावणी सम्रादयी मोहना म्हाळुंगेकर यांची सखी बहिण चंदाबाई यांच्यासोबत जेजुरी गडावर शूटिंग झालेल्या एका गाण्यावर छान नृत्य ही केले आहे. कार्यकर्ता नावाचा चित्रपटात ही त्यांनी महत्वाच्या भूमिका केली आहेत.अल्फा मराठी चॅनेलवर सोंगाड्या बाज्या या सिरीयलमध्ये त्यांनी विजय कदम आणि उषा नाईक यांच्या सोबत भूमिका केली.
सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील घोडे माळेगावच्या यात्रेत तर त्यांनी तीन वेळा पहिला क्रमांक पटकवला होता.एकदा तर त्यांनी ज्युनिअर दादा कोंडके यांना रंगमंचावर आणले.अन संपूर्ण गर्दी आपल्याकडे ओढून घेतली होती.
2010 ते 2012 या कालावधीत आमन तांबे सह ईश्वर बापू पिंपरीकर,(बारामती) 2012 ते 2013 या काळात छाया खिल्लारे आणि 202014- 2015 या काळात काळू नामू वेळवंडकर, यांच्यासोबत तमाशाचा फड त्यांनी गाजविला.
नंतर पुन्हा स्वतंत्र फड सुरु केला.मात्र 2016मध्ये सुप्याच्या यात्रेत अचानक आमन तांबे यांची तबेत बिघडली. अन तेथून त्यांच्या तमाशाला उरतील कळा लागली.मात्र त्यांचे चिरंजीव राहिल तांबे यांनी पुन्हा आपल्या वडीलांचा फड सावरण्यासाठी पुढाकार घेतला. 2017 मध्ये सिनेस्टार आमन तांबे पुणेकर यांचे चिरंजीव राहिल तांबे पुणेकर हा पुन्हा नव्याने तमाशा जोमाने उभा केला.रंगमंचावर वडीलांची अनुपस्थिती त्याला सतावत होती. पण तो हरला नाही. अन एकेदिवशी त्याने स्वतः रंगमंचाचा ताबा घेतला.
आता तो एक उत्कृष्ट नावाजलेला डान्सर म्हणून रंगमंचावर काम करतोय.

जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, अनेक वेळा घोडे माळेगावला आमचा शेजारी तमाशा असला की,आमन आधी माझ्या पाया पडून मग आपल्या तमाशाच्या बोर्डावर चढायचा.येवढा गुणी कलावंत होता.त्यांचे वडील अहमदशेठ तांबे यांनी आम्हाला खूप मदतीचा हात दिला.जेव्हा जेव्हा आर्य भूषणला आमचा तमाशा असायचा तेव्हा अहमद शेठ हे आजची बारी छान झाली.असं कौतुक करून कलाकारांना पाठबळ दयायचे.
जेष्ठ तमाशा कलावंत आतांबर तात्या शिरढोणकर यांनी म्हटले आहे की,तमाशाला आधुनिकतेची कलाटणी अमन तांबे यांनी दिली.त्यांना आम्ही ज्युनिअर मिथुन चक्रवती म्हणायचो.सरस्वतीबाई कोल्हापूरकर ह्या पारंपारिक तमाशा कलावंत होत्या.अन आमनशेठ हे उत्कृष्ट गायक,सूत्रसंचालन करणारा कलावंत होता. उत्तम हिंदी त्यांना यायचे. त्यामुळे दोघांच्या कष्टाने या तमाशाला चांगली सांगड घालली गेली.

ईश्वर बापू पिंपरकर यांना सुद्धा त्यांचा सहवास लाभला होता.त्यांनी ही या आठवणीला उजाळा दिला. आमन तांबे कलावंतांच्या पोटाचा पोटमारा कधी करत नव्हते.कोणाचे दोन पैसे त्यांनी कधी थकविले नाही. पुण्याचे गणपती,मुंबईची दिवाळी,बारामतीचे डोले,आणि साताऱ्याचे शिलांगण कधी चुकवू नये असे म्हणतात.कारण पुण्यातील गणपतीचे डेकोरेशन हे लाईट सिस्टीममुळे बघण्यासारखं असतात. मग तिच लाईट सिस्टीम कितीही महागडी असो.अमन शेठ आपल्या तमाशात आणायचे अन तमाशा रंगीत संगीत करायचे.एका सिझनला तर खोपोली येथील बोबल्या विठोबाच्या यात्रेला आमन तांबे यांनी साई बाबांची वेशभूषा परिधान केले होते..मात्र काही मिनिट त्यांच्या पत्नीला आणि मला सुद्धा आमनशेठ ओळखू आले नाही.असे ईश्वर बापू यांनी त्यांच्या बद्दल आठवणी सांगत होते.

दिवाळीच्या काळात पूर्वी मुंबईला नामांकित तमाशाचे फड यायचे.अन त्यांचे कार्यक्रम लालबागच्या हनुमान थिएटर,शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे मैदान,घाटकोपर,मानखुर्द, अशा विविध ठिकाणी तमाशाचे फड रंगायचे.एकदा एका मोठ्या इंग्रजी दैनिकाच्या वृत्तपत्राच्या एका जेष्ठ पत्रकाराला तमाशा फड मालकाची मुलाखत घ्यायची होती. ऐन दिवाळीत आमन तांबे यांचा तमाशा प्रबोधन ठाकरे मैदानात आला होता.तेथे दोघांची भेट झाली.आमन शेठ यांनी तमाशा सृष्टीतील परिस्थितीची माहिती दिली.मग एका रविवारच्या अंकात त्यांच्या इंग्रजी दैनिकात स्पेशल संडे पुरवणीमध्ये आमन तांबे यांच्यावर फोटो सह एक मोठी मुलाखत आली.अन त्यांच्या मुलाखतीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती.

त्यांनी पन्नास वर्षं लोककलेची सेवा केल्याबद्दल शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुरस्कार देवून सन्मान केला.पण राज्य सरकारला अशा लोककलावंतांची यापूर्वी दखल घ्यावीशी वाटली नाही.आमन तांबे यांनी कधी ही आपला तमाशा हाताबाहेर जावून दिला नाही.कधी ही आपल्या तमाशाची अप्रतिष्ठा केली नाही.

दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी आमन तांबे यांच्या निधनाने लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे. मात्र, त्यांच्या कलेच्या आठवणी, त्यांनी दिलेला आनंद आणि त्यांनी जपलेली परंपरा यांमुळे ते सदैव रसिकांच्या मनात जिवंत राहतील.
या निमित्याने त्यांचा एक गाजलेला शेर आठवतो.तो शेर नेहमी रंगमंचावर आल्यावर ते बोलायचे.

“दूर से देखा तो विरान था
सामने देखा तो कब्रिस्तान था
चलते चलते पैरों तले एक हड्डी दबी उस हड्डी का यह बयान था
कि यह चलने वाले चलना जरा संभल कर
किसी जमाने में
मैं भी एक इंसान था..!

असा हा “स्वर, शब्द आणि अभिनय यांचा सुरेल संगम असलेला हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याची कला आणि आठवणी कायम जिवंत राहतील.”

लेखक – खंडूराज शं.गायकवाड
khandurajgkwd@gmail.com
मो.9819059335

भारतीय नौदलाची पहिली कमांडर परिषद 2026 नवी दिल्लीत

नवी दिल्ली-

भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषद 2026 ची पहिली आवृत्ती 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही सर्वोच्च स्तरावरील परिषद राष्ट्रीय सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी नौदलाच्या कार्यात्मक स्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी, क्षमता विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांशी धोरणात्मक समन्वय साधण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय दलांची उपस्थिती लक्षात घेता, भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी जलद नौदल तैनातीच्या संदर्भात या आवृत्तीला विशेष महत्त्व आहे. ‘आॅपरेशन सिंदूर’ नंतर नौदलाच्या कार्यपद्धती, आंतरसेवा समन्वय आणि तंत्रज्ञानाधारित प्रतिसाद यंत्रणा यांची पुनर्पुष्टी करण्यासाठीही ही परिषद महत्त्वपूर्ण ठरते.

या परिषदेत संरक्षण दल प्रमुख आणि गृहमंत्रालयाचे सचिव यांची भाषणे होणार असून वरिष्ठ नौदल नेतृत्वासोबत सखोल चर्चा होणार आहे. या संवादांद्वारे परस्पर कार्यक्षमतेत आणि संयुक्ततेत वाढ करण्याबरोबरच राष्ट्रीय स्थैर्य, सुरक्षा रचना आणि भविष्यातील सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहयोगी दृष्टिकोन यावर व्यापक विचारमंथन केले जाईल. ही परिषद राष्ट्रीय नेतृत्वासोबत घनिष्ठ संवाद साधण्यासाठी आणि नौदलाच्या योजनांसाठी धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

नौदल प्रमुख, कार्यकारी कमांडर आणि वरिष्ठ नौदल नेतृत्व यांच्यासह, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत बहुआयामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या योजनांचा यावेळी आढावा घेतील आणि त्यांचे मूल्यमापन करतील. सुरक्षा गरजांबरोबरच, निर्णायक कार्यात्मक यश मिळवणे, महासागरी कार्यक्षमता वाढवणे, प्रशिक्षण, मनुष्यबळ व्यवस्थापन, शाश्वत देखभाल पद्धती, मानवरहित प्रणालींचा प्रभावी वापर, संचालनात्मक रसद व्यवस्था आणि लढाऊ तयारीसाठी आवश्यक इतर घटकांवर यामध्ये चर्चा केली जाईल. तसेच, संपूर्ण नौदलासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कृती आराखड्याची अंमलबजावणी आणि डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा वापर यावरही यात चर्चा नियोजित आहे.

विस्तृत दृष्टीकोनातून, भारतीय सागरी सिद्धांतामध्ये (आयएमडी) नमूद केलेल्या भारतीय नौदलाच्या चार भूमिकांनुसार, सरकारच्या निर्देशानुसार लष्करी यश मिळवण्यासाठीची एकूण तयारी वरिष्ठ नेतृत्वाद्वारे या परिषदेत तपासली जाईल. यामध्ये सातत्यपूर्ण कार्यवाही, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विस्तार, तसेच भारत सरकारच्या  प्रदेशांमधील सुरक्षेसाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती ( महासागर) या दृष्टिकोनाला चालना देणे आणि स्वदेशीकरण व नवोन्मेष यावर भर देणे यांचा समावेश असेल. परिषदेदरम्यान झालेल्या चर्चांमुळे भारतीय नौदलाला आयओआर आणि हिंद प्रशांत प्रदेशात पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून प्रस्थापित करण्यास निश्चितच मदत होईल.

नवीन जाहिरात धोरण वादाच्या भोवऱ्यात,केवळ मोठ्या ठेकेदारांचे हित

-स्थानिक व्यावसायिकांना जाणीवपूर्वक स्पर्धेतून बाहेर काढल्याचा आरोप

पुणे-महापालिकेने शहराचे उत्पन्न वाढवण्यासाठी आखलेले नवीन जाहिरात धोरण आणि त्यासाठी काढलेली निविदा वादात सापडली आहे. या धोरणामुळे उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसून, उलट शहराचे विद्रुपीकरण होण्याची भीती माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून या ‘अविचारी’ धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेने जाहिरात धोरणासाठी काढलेल्या निविदेत एक जाचक अट टाकली आहे. ज्या ठेकेदाराची गेल्या पाच वर्षांतील उलाढाल १०० कोटी रुपये आहे, तोच या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. या अटीमुळे स्थानिक आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना स्पर्धेतून बाद करून केवळ मोठ्या कंपन्यांचे हित जपले जात असल्याचा आरोप होत आहे. एकाच ठेकेदाराला संपूर्ण शहराचे ‘निर्विवाद अधिकार’ देणे हे स्पर्धात्मक वातावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रस्तावित धोरण ‘प्रॉफिट शेअरिंग’च्या (३० टक्के हिस्सा) तत्त्वावर आधारित आहे. मात्र, यात मोठी त्रुटी अशी की, जर ठेकेदाराला उत्पन्न मिळाले नाही, तर तो पालिकेला किमान किती रक्कम देणार, याचे कोणतेही स्पष्टीकरण निविदेत नाही. याचाच अर्थ, ठेकेदाराला सर्व मालमत्ता वापरण्याचे अधिकार मिळतील, पण पालिकेच्या खजिन्यात निश्चित किती रक्कम जमा होईल, याची कोणतीही खात्री नाही. हे धोरण पालिकेच्या आर्थिक हिताचे नसून केवळ गृहीतकांवर आधारित असल्याचा दावा केसकर कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केला आहे.“हे धोरण तयार करताना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणताही सखोल अभ्यास केल्याचे दिसत नाही. जाहिरातीसाठी जागांची पाहणी करणे आणि त्यांचे निश्चितीकरण करणे ही प्राथमिक जबाबदारी होती; मात्र ती पार पाडली गेलेली नाही,” अशी टीका पत्राद्वारे करण्यात आली आहे. केवळ उत्पन्नाच्या नादात शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पारदर्शक निर्णय घ्यावा, अशी विनंती ‘आपले पुणे, आपला परिसर’ या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या २१ तारखेला या निविदा उघडल्या जाणार असून, त्यापूर्वी प्रशासन या तक्रारींची दखल घेते का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

पुणे, दि.१२: सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” तसेच “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” या विषयांवर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा, पुणे येथे
व्याख्यान आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मा सुतार, गृहप्रमुख, शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी होत्या. या कार्यक्रमास नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका शीतल सावंत, माजी उपमहापौर श्री सिद्धार्थ धेंडे, समाजकल्याण अधिकारी माधुरी वाघमोडे, व्याख्याते पुष्पा घोडके, वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर, मामासाहेब मोहळ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मेघना भोसले आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रतिनिधी श्रीमती सुपेकर उपस्थित होत्या.

श्रीमती धेंडे सामाजिक समता सप्ताह व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

श्रीमती घोडके यांनी “संविधान जागर” या विषयावर मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षण, कायदेशीर संरक्षण, तसेच समानतेचे हक्क मिळवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अधोरेखित केले.

श्रीमती रणधीर यांनी “महिला सक्षमीकरण” या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भोईटे गृहपाल यांनी केले. त्यांनी सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा कांबळे समतादूत, बार्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीतल बंडगर प्रकल्प व्यवस्थापक, समतादूत प्रकल्प, बार्टी यांनी केले.

प्रारव पँथर्सने पटकावले विजेतेपद

पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग स्पर्धेत सारडा स्टॅलियनवर मात

पुणे : धीरज मंत्रीच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर प्रारव पँथर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत सारडा स्टॅलियन संघावर आठ गडी राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर मास्टर स्मॅशर्स संघाने हाय-बाइट चॅलेंजर्स संघावर पाच गडी राखून मात केली आणि तिसरा क्रमांक पटकावला.

नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. अंतिम लढतीत सारडा स्टॅलियन संघाने मुकुल जाजूच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित १६ षटकांत ३ बाद १४६ धावा केल्या. मुकुलने २५ चेंडूंत ११ चौकारांसह ५४ धावा केल्या. मुकुलने रोहित राठीने सहा षटकांत ६३ धावांची सलामी दिली. यानंतर मुधुसुदन कलंत्री (५) आणि करण सारडा (१) झटपट बाद झाले. यानंतर रोहितने यश लढ्ढाच्या साथीने ६८ धावांची नाबाद भागीदारी रचली. रोहितने ४१ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद ४७, तर यशने १७ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या.

प्रारव पँथर्स संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. विजयाचा शिल्पकार ठरला तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज धीरज मंत्री. नितीश मनियार (९) बाद झाल्यानंतर धीरजने हर्ष दरकच्या साथीने ९६ धावांची भागीदारी रचली. हर्ष २७ चेंडूंत चार चौकारांसह ३५ धावा करून बाद झाला. यानंतर धीरजने गोविंद राठीच्या साथीने प्रारव पँथर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धीरजने ३६ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, बेहडे ग्रुपचे निशांत बेहडे, मेटारोल ग्रुपच्या राधिका बिर्ला, क्रीडा अध्यक्ष नीरज धूत, क्रीडा सचिव गितेश झंवर, युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश सोमानी, गणेश भुतडा आदी उपस्थित होते.

अभय करवा, राकेश लद्दड, संतोष जाजू, अभय जाजू, भूषण भट्टड, सचिन चांडक, मनोज डागा, राहुल भुतडा, अजय झंवर, नवल भुतडा, प्रद्युमन भूतडा, शुभम मंत्री, स्वप्नील बांगड, पियुष भुतडा, गोविंद डागा, हिमांशू सोनी, शुभम डाल्या, चिराग मुंदडा, नरेश बाहेती यांसह युवा च्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेचे आयोजन केले. योगेश मुंदडा, प्रतीक कालिया, भूषण मानधने, पार्थ लाहोटी यांनी स्पर्धेदरम्यान संपूर्ण निवेदन केले.

स्पर्धेसाठी बेहडे बिल्डकॉन एलएलपी निशांत बेहडे व परिवार हे मुख्य प्रायोजक होते, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला पाठिंबा दिला. मेटारोल श्रीमती राधिका बिर्ला हे को-टायटल स्पॉन्सर होत्या. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हे व्हेन्यू स्पॉन्सर, जीबी ग्रुप  गणेश भुतडा ट्रॉफी स्पॉन्सर, तर मॅजेस्टिक लँडमार्क कैलाश मुंदडा जर्सी स्पॉन्सर व युट्युब लाईव्ह स्पॉन्सर मेहुल शाह  म्हणून सहभागी आहेत. याशिवाय डीडब्ल्यू रिअल्टर्स अँड लॉ फर्म, स्वनिती, तिरुपती सेल्स एम्पोरियम आणि अरुणकुमार अँड कंपनी हे असोसिएट स्पॉन्सर्स म्हणून सहभागी झाले होते.

धावफलक : सारडा स्टॅलियन – १६ षटकांत ३ बाद १४६ (मुकुल जाजू ५४, रोहित राठी नाबाद ४७, यश लढ्ढा नाबाद ३१, गोविंद राठी ४-०-१७-२) पराभूत वि. प्रारव पँथर्स – १४.१ षटकांत २ बाद १५२ (धीरज मंत्री नाबाद ७९, हर्ष दरक ३५, गोविंद राठी नाबाद १९, सागर कारवा २-०-१७-१, रोहित राठी २-०-२२-१). मॅन आॅफ दि मॅच – धीरज मंत्री

तिसऱ्या क्रमांकाची लढत : हाय-बाइट चॅलेंजर्स – १२ षटकांत ८ बाद ११० (मधुर जेठलिया ६७, कन्हैया लढ्ढा १२, केदार बजाज ३-०-२८-२, नयन भन्साली ३-०-२४-२, कपिल धूत २-०-११-२) पराभूत वि. मास्टर स्मॅशर्स – १०.३ षटकांत ५ बाद ११४ (केदार बजाज ५१, अखिल तपाडिया १८, सुदर्शन हरकुट ३-०-२६-२).

पुणे शहरातून एकाच वेळी दहा गुंड तडीपार

पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांचे आदेश; गुंडांवर गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे
पुणे-पुणे शहर आणि जिल्ह्यातून गंभीर गुन्हे करणाऱ्या दहा गुंडांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले आहेत. गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अभिजित संजय जाधव (वय २९), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भीमराव मातंग (वय २५), आदित्य बापू शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८) आणि मालती संतोष मलके (वय ४५) यांचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध चंदननगर, लोणीकंद आणि वाघोली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, ज्याला मंजुरी मिळाल्यानंतर उपायुक्त मुंडे यांनी हे आदेश दिले.

पुणे पोलिसांच्या परिमंडळ सातमध्ये लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ आणि येरवडा ही पोलिस ठाणी येतात. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी या परिमंडळातून १०० गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. तडीपार केलेले गुंड शहरात दिसल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, पुणे शहरातील धनकवडी परिसरात दहशत माजविणाऱ्या एका गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या कारवाईचे आदेश दिले असून, त्यानुसार गुंडाला यवतमाळ कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

कारवाई करण्यात आलेल्या गुंडाचे नाव रोहन राजेंद्र रोंगे (वय २१, रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आहे. रोंगे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी रोंगेविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंजुरी दिल्यानंतर रोंगेची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली

केअरटेकरला मारहाण करून हातपाय बांधून पळाल्या १२ बांगलादेशी महिला.. २० दिवस बातमी दडपली

रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 महिला पळाल्या
पुणे-पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे वस्तीमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी पहाटे ही घटना घडली असून, केअरटेकर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत या महिलांनी पलायन केले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आला होता.पळून गेलेल्या १२ महिलांपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, उर्वरित दहा महिला अजूनही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या सर्व महिला २३ ते ३३ वयोगटातील आहेत.

या महिलांना शहरातील विविध ठिकाणी वेश्याव्यवसायावर केलेल्या कारवाईतून वाचवण्यात आले होते. दिघी, फरासखाना, देहूरोड, जेजुरी आणि कोंढवा पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईनंतर त्यांना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये आश्रय देण्यात आला होता.न्यायालयाने १८ मार्च रोजी या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दूतावासाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असतानाच, फाऊंडेशनच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

२३ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता एका बांगलादेशी महिलेने पोटदुखीचे नाटक करत महिला केअरटेकरला औषध मागण्यासाठी बोलावले. औषध देण्यासाठी आलेल्या केअरटेकरवर तिने मैत्रिणीच्या मदतीने झडप घातली. तिचे तोंड दाबून, हात-पाय बांधले आणि त्यानंतर सर्व महिलांनी मिळून मुख्य गेटचे कुलूप उघडून पळ काढला.रेस्क्यू फाउंडेशनकडून वारंवार पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती, परंतु ती पुरवण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून, यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक

बिहू नृत्य,  होजगिरी नृत्य व संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि असोमी यांच्यावतीने आयोजन

पुणे : वेगवान लय, हातांच्या तालबद्ध हालचाली, पारंपरिक वाद्यांचा सुरेल नाद आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे बिहू नृत्य खुलले. अस्सल सादरीकरणातून प्रेक्षकांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली.

 ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा ‘रोंगाली बिहू’  कार्यक्रम उत्साहात पार पडला. आसाममधील नामांकित नृत्यांगना आणि गायक-गायिकांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून पुणेकर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक बिहू नृत्याबरोबरच सुरेल आसामी संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू शिवाजीराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठकूर, असोमीचे राजीव बोरकटाटी, मौसमी बोरा उपस्थित होते.

कार्यक्रमात रुमा रुलिका भुयान, हिमाश्री मेधी कलिता, अप्सरा गोगोई, निहारिका बोर्गोहैन, जाह्नोबी गोगोई आणि प्रियाक्षी कटक्य या पुरस्कारप्राप्त नृत्यांगनांनी बहारदार सादरीकरण केले. तन्वी गोखरे, आर्या घाटे, खानंडका या पुण्यातील मुलीनी सादर केलेले त्रिपुरा राज्यातील होजगिरी लोकनृत्याने सर्वांचे मन जिंकले.

आसाममधील सुप्रसिद्ध गायक-गायिका निहारिका हजारिका, ध्रुव ठाकुरिया आणि रिपुंजीत यांनी आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या सादरीकरणातून पारंपरिक आणि आधुनिक आसामी संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, आसाम आणि महाराष्ट्राच्या परंपरा व कला प्रकारांमध्ये अनेक साम्य आहेत. आसाममधील वैष्णव परंपरा आणि महाराष्ट्रातील परंपरा यामध्येही साम्य आढळते. या दोन संस्कृतींमध्ये संवाद आणि आदानप्रदान व्हावे, यासाठी दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये सत्रीय नृत्याचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिकूलतेतूनच सामाजिक चळवळी निर्माण होतील-गांधी दर्शन शिबीरातील आशावाद

पुणे
महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर या महापुरूषांच्या काळात देखील फार मोठी प्रतिकुल परिस्थिती होती. त्याला तोंड देत सामाजिक आंदोलने उभी राहीली व परिवर्तन घडले. सामाजिक चळवळी दडपण, दबावाला न जुमानता, सामाजिक न्यायासाठी वारंवार निर्माण होतच राहतील, असा विश्वास गांधी दर्शन शिबीरात व्यक्त करण्यात आला.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर विशेष व्याख्याने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. गांधी विचार दर्शन मालिकेतेतील या ३०व्या पुष्पात ‘महात्मा फुले यांच्या कार्याची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी’ या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विश्वनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टीकोन’ या विषयावर मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य,   प्राध्यापक प्रा. पी. विठ्ठल आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भूमी अधिकार’ या विषयावर युवा भारत आंदोलनचे सल्लागार शशी सोनावणे यांचे व्याख्यान झाले.

विश्वनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या काळात पुरोहित सांगतील तो धर्म, न्याय मानला जायचा. धर्मग्रंथांना कायद्याचे स्वरूप आले होते. त्या विरोधात बोलणे म्हणजे परमेश्वरा विरोधात बोलण्यासारखे होते. धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी सुरू होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक दृष्ट्या समाज निकृष्ट अवस्थेत पोहोचला होता. अशा काळात महात्मा फुले यांनी विविध प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या. त्या  सगळ्यांच्या पाठीमागे सत्यान्वयी दृष्टिकोन होता.
विश्वनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जनतेचा, सुधारकांचा आवाज बंद करायचे धोरण राज्यकर्ते करत आहेत. एकहाती सत्ता असावी असे राज्यकर्त्यांना वाटते. लोक मूग गिळून गप्प बसतात तो पर्यंत हे असेच चालू राहणार. पण पुन्हा चळवळी न्यायासाठी आवाज उठवतील. संघटितपणे लोक एकत्र येऊन चुकीच्या धोरणांना विरोध करतील.

प्रा. पी.  विठ्ठल म्हणाले की, शिक्षण सर्वांसाठी खुले असावे अशी महात्मा फुले यांची धारणा होती. तोच विचार बाबासाहेबांनी पुढे नेला.  समाज शिक्षित झाला तरच समाज पुढे जाईल. म्हणून समतेवर आधारित शिक्षण असावे. शिक्षणामुळे माणूस स्वाभिमानी होतो. तर्कशूध्द आचरण करतो. जाती रचना हा समाजातील मोठा दोष आहे. मुक्ती साधायची असेल तर बुध्द धर्मात प्रवेश करा असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. आत्ताच्या पिढीने महापुरुषांशी नाते सेल्फी काढण्यापुरते जोडले आहे. शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही याचे भान सर्वांनी ठेवायला हवे.
 
शशी सोनवणे की, जमीनीचे राष्ट्रीयीकरण करणे, सुधारणा, फेर वाटप हा मुद्दा 1918 साली बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केला होता. सामाजिक समतेकडे जायचे असेल तर जमिनीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. सर्व समाजाच्या हाती नैसर्गिक संसाधनांची मालकी राहिली पाहिजे. जातीय उतरंड, शोषणाची उतरंड त्यातून दूर केली जाऊ शकते.
असे त्यांचे मत होते. जमिनीवरचा अधिकार प्रस्थापित करण्याचे मोठे संघर्ष भारतात झाले. प्रा. शशी सोनवणे पुढे म्हणाले की, भारतातील मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे असे आम्हाला वाटते.
भांडवलशाही हे संकट आहे. नैसर्गिक संसाधनांवर कब्जा मिळवून भांडवलदार सत्ता गाजवतात.
 
लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले की, सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले पाहिजे असे हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी मांडले. तोच आग्रह बाबासाहेबांनी धरला. विवेकाचे अधिष्ठान असलेला समाज निर्माण झाला पाहिजे.  शिक्षणातून समानता निर्माण झाली पाहिजे या ध्येयापासून आपण खूप दूर आहोत.
सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या पासून वंचित असलेल्या समाजासाठी लढायचे यावर आम्ही युक्रांदमध्ये चर्चा करायचो, अशी आठवण सांगत अन्वर राजन म्हणाले की, समाजात जेव्हा न्याय असतो, तेव्हा शांतता असते. आपली समाज रचना विषमतावादी आहे. त्यामुळे शांतता नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गांधी, आंबेडकर यांनी आंदोलने केली. आत्ताच्या वातावरणात देखील ठामपणे उभे राहण्याची युक्रांदची भुमिका आहे. गांधीजींच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल.
लक्ष्मिकांत देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजस भालेराव यांनी सुत्रसंचलन केले. सुरज कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रविण सप्तर्षी यांनी आभार मानले.
कार्यक्रमात गानकोकिळा आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.