Home Blog Page 89

‘पीएमआरडीए’चा आशियाई विक्रम! अवघ्या ९५ दिवसांत उभी राहिली १४ मजली इमारत!

  • स्वकर्तृत्वाचा १०० दिवसांचा विक्रम मोडीत
  • ‘आशिया’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद; सेक्टर १२ मधील प्रकल्पात प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा चमत्कार!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा नवा झेंडा फडकावला आहे. चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभी करण्याचा भीमकाय पराक्रम ‘पीएमआरडीए’ने केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये या विक्रमाची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ‘पीएमआरडीए’ने यापूर्वीचा आपलाच १०० दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढत बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला. मंगळवारी चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिकृत प्रमाणपत्र व पदक देऊन ‘पीएमआरडीए’चा गौरव केला. प्राधिकरणाच्यावतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला.

‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैलाचा दगड गाठण्यात आला. हे अशक्यप्राय काम पूर्ण करण्यासाठी ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी’ या कंपनीच्या सुमारे ९ हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम केले. अत्याधुनिक ‘प्रीकास्ट आरसीसी’ तंत्रज्ञानामुळे (३-एस सिस्टिम — Safety, Strength and Speed) गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ही इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असून शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

यापूर्वी मार्च २०२६ मध्ये ‘पीएमआरडीए’ने १०० दिवसांत इमारत बांधून विक्रम केला होता. मात्र, अवघ्या एका महिन्यात पुन्हा स्वतःचेच रेकॉर्ड सुधारत ९५ दिवसांचे नवे लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील दिग्गज ‘एल अँड टी’ कंपनीच्या नावावर ९६ दिवसांत १२ मजली इमारत बांधल्याची नोंद होती; त्यावर आता ‘पीएमआरडीए’ने मात केली आहे.

दृष्टिक्षेपात विक्रमी बांधकाम :

  • इमारत : १४ मजली निवासी इमारत (डी-३) LIG
  • एकूण क्षेत्रफळ : ९४,७२२ चौरस फूट
  • सदनिका : ११२ (२ बीएचके)
  • कालावधी : केवळ ९५ दिवस
– तंत्रज्ञान : प्रीकास्ट आरसीसी (इंडस्ट्रियलाइज्ड ३-एस सिस्टिम)

‘हे यश म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार’ – रिनाज पठाण

“पीएमआरडीएच्या सेक्टर-१२ येथील गृहनिर्माण प्रकल्पात आम्ही ‘मिशन ९५ डेज’ हे मोठे आव्हान स्वीकारले होते. अभियांत्रिकी कौशल्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर १४ मजली ‘डी-३’ LIG इमारत केवळ ९५ दिवसांत पूर्ण करून आम्ही हा टप्पा गाठला आहे. ही यशस्वी अंमलबजावणी प्रामुख्याने ‘३-एस प्रीफॅब टेक्नॉलॉजी’ (3S Prefab–Precast Technology), ‘झिरो लॅग शेड्युलिंग’ आणि अहोरात्र चालणाऱ्या ‘थ्री-शिफ्ट वर्किंग’ मॉडेलवर आधारित आहे. या प्रकल्पात फॅक्टरी-मेड प्रीकास्ट घटकांचा वापर केल्यामुळे बांधकामाचा वेग वाढला, तसेच गुणवत्तेतही कमालीची समानता राखली गेली आणि साहित्याची नासाडी (wastage) कमी झाली. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर कडक गुणवत्ता नियंत्रण (QA/QC), सुरक्षा मानके आणि डिजिटल पाळत (digital surveillance) ठेवण्यात आली. हा प्रकल्प केवळ विक्रम प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित नसून, भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी हे एक ‘स्केलेबल मॉडेल’ ठरणार आहे. गुणवत्तेचा दर्जा राखून सर्वसामान्यांना विक्रमी वेळेत हक्काची घरे उपलब्ध करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश असून, आगामी काळातही अशा तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांना प्राधिकरणाचे प्राधान्य राहील.”

— रिनाज पठाण (मुख्य महानगर अभियंता, पीएमआरडीए)
यावेळी मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, बांधकाम परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे, उपअभियंता रश्मी पाटील, शिर्के ग्रुपचे उपाध्यक्ष वाय. पी. काजळे, उपमुख्य अधिकारी एन. एम. कदम, सहमहाव्यवस्थापक जे. सी. राक्षे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भिडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एन. एम. कदम यांनी मानले.

प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन,४५ दिवसांत उचलणे बंधनकारक

केरोसीन वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

पुणे, दि. १३ : माहे मार्च २०२६ कालावधीसाठी केरोसीन (रॉकेल) वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. अंत्योदय
व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना प्राधान्य देण्यात येणार असून, उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग्रामपंचायत दाखल्यासह) तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल.

केरोसीनचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे बंधनकारक असून, उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही.
वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकानदार, लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ३ लिटर प्रमाणे वाटप करणे आवश्यक असून, दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.

तेल कंपन्यांनी पुरवठा नियमित ठेवावा, तसेच ८५% केरोसीन पहिल्या पंधरवड्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पोलीस) नियुक्त करण्यात येणार आहे. केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून, भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

तरी सर्व संबंधितांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे प्रार्थना समाजात संगीतोपासनेतून भक्तिरसाची अविस्मरणीय अनुभूती

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने चैत्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित संगीतोपासनेचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यंदा हरी मंदिर प्रवेशाला ११७ वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षीचा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या संगीतोपासनेतून उपस्थितांना अध्यात्मिक शांततेचा आणि अंतर्मुखतेचा अनोखा अनुभव मिळाला.

संगीतोपासनेत विश्वजीत मेस्त्री आणि सानिका सोमण यांनी सुरेल व भावपूर्ण गायन सादर केले. त्यांना दिग्विजय देशमुख (तबला) आणि संगमेश्वर तडलगी (हार्मोनियम) यांनी  साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन नमिता मुजुमदार यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात उपनिषदांतील पवित्र श्लोकांच्या उच्चारांनी झाली. ‘स्वर ही परमेश्वराशी जोडणारी अतूट साखळी आहे’ या भावनेतून सादर झालेल्या गायनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. मंगल गजराने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि त्यानंतर भजनामृताचा रसिकांनी मनोभावे आस्वाद घेतला.

‘जगन्नाथ मंगला जय जय परब्रह्म वत्सला’ यांसारख्या भक्तिगीतांनी वातावरण अधिकच पवित्र केले. कलाकारांनी स्वरांच्या माध्यमातून सर्वत्र व्यापून असलेल्या परमेश्वराची अनुभूती अत्यंत प्रभावीपणे साकारली. यानंतर सादर झालेल्या भजनाने श्रोत्यांना स्वरांच्या सावलीत विसावण्याचा एक अद्वितीय, समाधानकारक अनुभव दिला, आणि ‘प्रीती प्रभुसे जोडरे मन’ यासारख्या रचनांनी कार्यक्रमाला उंची आणि आध्यात्मिक गाभा प्राप्त करून दिला.

कार्यक्रमाच्या पुढील भागात विश्वजीत मेस्त्री यांनी सादर केलेला अभंग ‘आनंददाता आनंद दीजे’ याच्या माधुर्यपूर्ण, सुरेल आणि हृदयस्पर्शी सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात तल्लीन झाले. या अभंगाच्या लयबद्धतेने आणि भावगर्भ अभिव्यक्तीने उपस्थित श्रोत्यांच्या मनावर अमिट छाप उमटवली. यानंतर विचारप्रवर्तक अभंगांची प्रभावी मांडणी सादर करण्यात आली. सानिका सोमण यांनी ‘क्षण एका चित्त करुनी निवांत’ आणि ‘मना मनन माझिया’ हे अभंग मनोज्ञ रीतीने सादर केले, तर विश्वजीत मेस्त्री यांनी ‘विष्णुमय जग’ या अभंगातून अध्यात्मिक चिंतनाची अनुभूती घडवली. शेवटी ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे’ या अभंगाने संगीतोपासनेची अत्यंत समाधानकारक, प्रसन्न आणि भावपूर्ण सांगता झाली.

निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई१३ एप्रिल २०२६: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘भागूबाई’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसणार असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘भागूबाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘भागूबाई’ या खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया पाहायला मिळते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसत ती गावात गोंधळ माजवते आणि साध्या घटनांना मोठं रूप देत नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करते. पण या सगळ्या विनोदामागे एक गंभीर सत्य दडलेलं असल्याची झलकही ट्रेलरमध्ये दिसते.

या चित्रपटाचा गाभा म्हणजे निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका. त्यांच्या खास कॉमिक टायमिंगसोबतच भावनिक अभिनयाची झलक यात पाहायला मिळते. ‘सुपर डुपर’ मधील यशानंतर त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं वाटेल अशी, मातीशी जोडलेली व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

चित्रपटात भार्गवी चिरमुले, शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर, नागेश भोंसले आणि निखिल चव्हाण यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

भागुबाई चित्रपटाची कथा एका अशा बाई भोवती फिरते, जिला गावातल्या गप्पा आणि कुचाळक्या करण्यात विशेष आनंद मिळतो. मात्र तिच्या आयुष्यात घडणारी एक अनपेक्षित घटना सगळंच चित्र बदलून टाकते. त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात आणि गावात काय बदल होतात हे या चित्रपटात पाहायला मिळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय अमर यांनी केलेलं असून वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक स्पर्श असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, तर निर्माती श्रद्धा पटेल यांनी ही कथा प्रेक्षकांपर्यंत भावनिक पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

हास्य, नाती आणि लपलेलं सत्य यांचा सुरेख मेळ साधणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव देण्याचं आश्वासन देतो.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

पुणे, दि.१३ – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर दिनांक १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक तसेच रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन

0

पुणे -श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 60 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते.
त्यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता कोथळे गाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

धुरंधर 2 ने 25 दिवसांत ₹1712 कोटी कमावले

रणवीर सिंग अभिनित ‘धुरंधर द रिवेंज’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 26 दिवस झाले आहेत आणि चौथ्या आठवड्यानंतरही त्याची कमाई मजबूत आहे. सॅकनिल्कनुसार, हा चित्रपट आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’ च्या जगभरातील कमाईचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

25व्या दिवसापर्यंत धुरंधर 2 चे जगभरातील एकूण कलेक्शन 1,712.98 कोटी रुपये झाले आहे. पुष्पा 2 चे लाइफटाइम जगभरातील कलेक्शन 1,742.10 कोटी रुपये आहे. हा विक्रम मोडण्यासाठी चित्रपटाला आता 30 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची गरज आहे.तिकिटांच्या विक्रीच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ सध्या ‘पुष्पा 2’ पेक्षा मागे आहे. बुकमायशोच्या आकडेवारीनुसार, धुरंधर 2 ची आतापर्यंत 1.71 कोटी तिकिटे विकली गेली आहेत. तर पुष्पा 2 ची 1.92 कोटी तिकिटे विकली गेली होती. भारतातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, पुष्पा 2 ने 1,234.10 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले होते. धुरंधर 2 ने आतापर्यंत फक्त 1,083.67 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच, देशांतर्गत बाजारात चित्रपट अजूनही 150.43 कोटी रुपये मागे आहे.धुरंधर 2 ची सर्वाधिक कमाई हिंदी पट्ट्यातून होत आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनचा 94% हिस्सा म्हणजे 1,017.79 कोटी रुपये फक्त हिंदी मार्केटमधून आले आहेत. तुलना केली तर पुष्पा 2 ला दक्षिणेसोबतच हिंदी पट्ट्यातून (812.14 कोटी) देखील मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र, धुरंधर 2 ला तेलुगु मार्केटमधून फक्त 41.85 कोटी रुपयेच मिळाले आहेत. याच कारणामुळे चित्रपट इंडिया नेट कलेक्शनमध्ये पुष्पा 2 च्या मागे आहे.
धुरंधर 2 च्या वर्ल्डवाइड रेकॉर्डजवळ पोहोचण्याचे सर्वात मोठे कारण त्याचे परदेशी कलेक्शन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाने पुष्पा 2 ला खूप मागे टाकले आहे. धुरंधर 2 ने परदेशात 415.50 कोटी रुपये कमावले आहेत, तर पुष्पा 2 चे परदेशी कलेक्शन 259.50 कोटी रुपये होते. परदेशातून झालेल्या 156 कोटींच्या अधिक कमाईने भारतातील कलेक्शनमधील फरक कमी केला आहे.

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 11 जण जागीच ठार

पुणे-कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 11 प्रवाशी ठार झाले असून, 2 जण गंभीर जखमी झालेत. मृतांत 3 महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते.यासंबंधीच्या माहितीनुसार, कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 11 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले. या घटनेत इतर 2 जणही गंभीर जखमी झालेत. त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांत 8 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील गोविली गावालगतच्या रायता पुलावर सकाळी 10.45 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती आज सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 11 ते 12 जण प्रवास करत होते. या कारला समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. त्यात कारमधील एकाही व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळणार नाही. ट्रकच्या धडकेने कारमधील 8 जण जागीच ठार झाले, तर इतर 1 जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी लगतच्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली.
या भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या 6 जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे कल्याण – नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरुळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्वच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत, असे ते म्हणालेत.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अपघाताबाबत निवेदन जारी करताना म्हणाले की, आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10:45 वाजण्याच्या सुमारास कल्याण – मुरबाड – माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, ही विनंती.

————————————————————————————————————————

जिद्द,कष्टातून उभा राहिला स्वावलंबनाचा नवा आदर्श

यशकथा

ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल, तर केवळ योजना पुरेशा नसतात; त्यासाठी लागते जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि संधीचा योग्य उपयोग करण्याची तयारी. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील चार महिलांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या उंच शिखरावर पोहोचला असून, त्यांच्या यशोगाथा ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) करत आहे. स्वयं-साहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांना बचत, कर्जसुविधा, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. या सर्व घटकांचा योग्य संगम साधला गेला, की महिलांच्या आयुष्यात केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडते…याचे जिवंत उदाहरण म्हणजे या ‘उमेद रणरागिणी’.

श्रीमती आशा विश्वास गायकवाड यांची कहाणी ही परंपरेला आधुनिकतेची जोड देणारी आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असला, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याची जाणीव त्यांना झाली. मात्र, त्यांनी परिस्थितीवर नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्यातून मार्ग शोधला. PMFME योजना अंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा उपयोग करून त्यांनी डिहायड्रेशन प्रकल्प उभारला. सुरुवातीला तांत्रिक ज्ञानाचा अभाव, बाजारपेठेची अनिश्चितता आणि आर्थिक जोखीम यांसारखी आव्हाने होती; पण ‘उमेद’च्या प्रशिक्षणामुळे त्यांनी या सर्व अडचणींवर मात केली. शेवगा, बीटरूट, केळी यांसारख्या पिकांपासून नैसर्गिक पावडर तयार करून त्यांनी ‘रसायनमुक्त उत्पादन’ ही ओळख निर्माण केली. आज त्यांच्या उत्पादनांना स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत मागणी असून, त्यांनी इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे ‘शेतीपूरक उद्योग’ ही संकल्पना गावपातळीवर रुजत आहे.

श्रीमती पुजा नितीन मारगडे यांची यशोगाथा ही संकटातून संधी निर्माण करण्याची प्रेरणा देते. कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात रोजगाराचे सर्व मार्ग बंद झाले असताना त्यांनी हार मानली नाही. ‘उमेद’कडून मिळालेल्या ४० हजार रुपयांच्या बीजभांडवलातून त्यांनी घरातूनच केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहक मिळवणे, उत्पादनाची गुणवत्ता राखणे आणि बाजारपेठेत टिकून राहणे ही मोठी आव्हाने होती. मात्र, त्यांच्या चिकाटीमुळे आणि सातत्यामुळे व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या नेतृत्वाखाली ४४ महिला बचत गट कार्यरत असून, चकली, मसाले, बेकरी उत्पादने अशा विविध गृहउद्योगांच्या माध्यमातून महिलांना नियमित उत्पन्न मिळत आहे. पूजाताईंच्या कार्यामुळे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

श्रीमती मनीषा राजाराम कुंजीर यांनी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून सामाजिक नेतृत्वाचे वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. अनेक वेळा शासकीय योजना उपलब्ध असतात, परंतु त्याची माहिती किंवा प्रक्रिया यामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नाही. ही दरी भरून काढण्याचे काम मनीषाताईंनी केले. महसूल विभागाच्या सहकार्याने त्यांनी विविध शिबिरे आयोजित करून महिलांना उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, इतर आवश्यक कागदपत्रे त्वरित मिळवून दिली. त्यांच्या पुढाकारामुळे दिव्यांग, अल्पभूधारक शेतकरी आणि वंचित घटकांना शासकीय योजनांचे कवच मिळाले. त्यांनी गावपातळीवर ‘प्रशासन तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, ज्यामुळे महिलांचा शासन व्यवस्थेवर विश्वास अधिक दृढ झाला.

श्रीमती संध्या नितीन वारघडे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना आणि बालसंगोपन योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणास हातभार लागत आहे. संध्या आणि त्यांच्या मुलांना जगण्याचे बळ मिळाले आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

या महिलांच्या यशामागे एक समान धागा आहे—‘उमेद’ अभियानाचे सक्षम मार्गदर्शन आणि जिल्हा प्रशासनाचे सातत्यपूर्ण सहकार्य. वित्तीय समावेशन, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री, बाजारपेठेची उपलब्धता आणि सततचे मार्गदर्शन या सर्व घटकांचा परिणाम म्हणून महिलांनी ‘गृहिणी’पासून ‘उद्योजिका’ होण्याचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

आज या महिलांच्या उत्पन्नामुळे त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत, आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि भविष्याबाबतची असुरक्षितता कमी झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी इतर महिलांनाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे, ज्यामुळे गावपातळीवर सामूहिक विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

“उमेदने आम्हाला केवळ आर्थिक बळ दिले नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवले. आज आम्ही स्वतः उभ्या राहिलो आहोत आणि इतर महिलांनाही उभे करत आहोत,” अशी भावना व्यक्त करत या ‘उमेद रणरागिणी’ ग्रामीण परिवर्तनाचे सशक्त प्रतीक बनल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील या यशोगाथा केवळ चार महिलांच्या संघर्षाची कथा नसून, त्या ग्रामीण भारतातील बदलत्या वास्तवाचे द्योतक आहेत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या बळावर महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, याचा ठोस पुरावा या ‘उमेद’ रणरागिणी देत आहेत.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

समाधान शिबिराचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे उद्घाटन

‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शासनाचे नागरिकांच्या कल्याणाकरिता लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय

पुणे, दि.१३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-२०४७’ करण्याच्या संकल्प करण्यात आलेला आहे; ‘विकसित महाराष्ट्राच्या’ माध्यमातून या संकल्पपुर्तीच्यादृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. त्याअनुषंगाने राज्यशासनाच्यावतीने लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित समाधान शिबारात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासन होते, या त्रिसुत्रीची प्रेरणा घेऊन अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर असे नाव दिले आहे. या शिबीरात जवळपास २० गावांचा यामध्ये समावेश आहे. वेगवेगळ्या विभागाच्या ४५ सेवा उपलब्ध करुन देण्यात आहेत, येत्या काळात सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे शिबीराचे आयोजन करावे.

या शिबाराच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० संगणकीकृत सातबाऱ्याचे वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप, २ हजार कमी जास्त पत्रक तयार केले, ५०० गावातील दस्तावेज दुरुस्ती करण्यात आले आहे, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्याचे वितरण करण्यात आले. एकूणच सुमारे ५ लाख परिवाराला शिबाराचा लाभ देण्यात आला असून खऱ्या अर्थाने मागील दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं काम राज्य शासनाच्यावतीने केले आहे.

नागरिकांच्या जीवनात महसूल आणि गृहखात्याचे महत्वाचे आहेत, त्यादृष्टीने इतरखातेही पुढे नेण्याचे काम सुरु आहे. २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अधिकाराचे विकेंद्रीकरण करून राज्यातील एकही नागरिक बेघर राहणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. बाजार मूल्य भावामध्ये वाढ न करण्याचा निर्णय, खासगी सर्व्हरची नेमणूक, भुमि अभिलेख अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समोवश, शेतजमीन अकृषक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. महसूल विभागातील पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात आला. महसूल विभागाला बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने महसूल विभाग, नोंदणी व मुंद्राक विभाग आणि भुमि अभिलेख विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता हवेली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेगळी ग्रामसभा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले. हा निर्णय राज्यात लागू करुन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा लागू करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्व शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे.

येत्या काळात ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरात लवकर बैठक घेवून सूचना देण्यात येईल. भामा-आसखेडसंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली शेरे कमी करण्याबाबत लवकरच पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल. देवस्थानाच्या नावे असलेल्या इनाम जमिनीबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येईल. हवेली तालुक्यातील लोणीकंदला स्वामित्व योजनेत आणून भूमिअभिलेख विभागाच्यावतीने ड्रोन सर्वेक्षण करण्यात करावे आणि मालमत्ता पत्रक आणि सनद देण्यात यावे. याकरीता खासगी सर्व्हर तातडीने नेमणूक करुन गतीने मोजणी करावी. लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, याप्रस्ताव जमीन देण्यात येईल.

ग्रामपंचायतीने लोकोपयोगी कामांबाबत महसूल विभागाकडे सादर करावे, त्यासही मंजुरी देण्यात येईल. कार्यक्रमात मागणी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन अडीअडचणी सोडविण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. याप्रमाणे अशा प्रकारची योजनांची पुणे विभागात अंमलबजावणी करण्याची विभागीय आयुक्तांना मंत्री श्री. बावनकुळे यांनी सूचना केली.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखले जाते. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित विभागाना सोबत घेवून नागरिकांना दिलासा देण्याचे कामे करण्यात येते. नागरिकांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतची सर्व प्रकारचे दस्ताऐवज महसूल विभागाशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुखकर व्हावे, त्यांना जलदगतीने सेवा देण्याकरिता गेल्या काळात विभागाच्यावतीने विविध क्रांतीकारी आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासह योजनांची माहिती होण्यासाठी अशा प्रकारचे शिबीरे उपयुक्त आहेत. जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनःरीक्षण कार्यक्रम, भारतीय जनगणना-२०२६, शेतकरी ओळखपत्र काढण्याच्या कामात नागरिकांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पुलकुंडवार यांनी केले.

श्री. राऊत यांनी महाराजस्व अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल विभागाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.

श्री. कंद म्हणाले, हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनांची कामे प्रगतीपथावर आहे. ही योजना यशस्वी करयाकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून जोमाने कामे करण्यात येत आहे.महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांबाबत समाधान व्यक्त करत येत्या काळात तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी मार्गी लावण्याची सूचनाही श्री. कंद यांनी केल्या.

श्री. साकोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

श्री. माने यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबीरात हवेली उप विभागात देण्यात आलेल्या लाभाबाबत माहिती दिली. नियमित कामे करण्यात महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काळातही यापुढेही अशाच प्रकारचे कामे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असेही श्री. माने म्हणाले.

कार्यक्रमात महसूल विभागाचा आकृतिबंध मंजूर केल्याबद्दल मंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बावनकुळे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरुपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महसुली सेवांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉल भेट देवून माहिती घेतली.

श्री. बावनकुळे यांच्या हस्ते विविध विभागाच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आले.

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी:SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा,ईडीची नाशिक, पुणे, शिर्डीत छापेमारी

नाशिक -महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे.दरम्यान ईडीने या प्रकरणी अशोक खरातच्या नाशिक येथे 5, पुण्यात 3 व शिर्डी परिसरातील 3 ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी त्याच्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत. विशेष तपास पथक या सर्वच प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आज त्याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोर्टापुढे हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात होताच, न्यायाधीशांनी खरातला त्याचे नाव विचारले. त्यानंतर पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणाही केली. त्यावर खरातने हात जोडत नकार दर्शवला.

यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली. त्यावर कोर्टाने वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा ताबा घेण्याची सूचना केली. त्यानुसार, आता वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा उद्या त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याही त्याला आजच्यासारखेच ऑनलाईन पद्धीतने कोर्टापुढे हजर केले जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ईडीने या प्रकरणी अशोक खरातच्या नाशिक येथे 5, पुण्यात 3 व शिर्डी परिसरातील 3 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. नाशिकच्या तृप्ताबाला निवासस्थानीही ईडीने छापेमारी केली आहे. तिथे खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहता येथील शाखेत ईडीचे अधिकारी पोहोचलेत. ते तिथे अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी करत आहेत. या खात्यांमधून तब्बल 60 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे.

बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू:एसआयटीच्या चौकशीने बिल्डर लॉबी हादरली

मुंबई-नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, शहरातील 49 नामांकित बिल्डरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नियमांनुसार, चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये 20 टक्के जागा किंवा घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ही घरे किंवा जमीन म्हाडाकडे वर्ग करणे आवश्यक असते. मात्र, काही विकासकांनी प्रकल्पाचे क्षेत्र कागदोपत्री कमी दाखवून किंवा नियमांतील पळवाटा वापरून ही जबाबदारी टाळल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे.

या गैरप्रकारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जे घरकुल गरजूंना मिळायला हवे होते, तीच घरे विकासकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनावरही टीका होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली असून त्यात जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, नाशिक पोलिस आयुक्त, नगररचना संचालक आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाला सर्व कागदपत्रांची तपासणी करून संपूर्ण घोटाळ्याचा तपशील उघड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या विकासकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. इतकेच नव्हे तर या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा बिल्डरांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि विकासक या दोघांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, या एसआयटीला एका महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील मोठ्या बिल्डरांची नावे पुढे येऊ शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात निर्माण झालेल्या या वादाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून बिष्णोई गँगची RTO अधिकाऱ्याला धमकी

मुंबई-मुंबईत रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावामुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी जगतातील बिष्णोई गँगने थेट हस्तक्षेप करत मिरा-भाईंदरमधील RTO अधिकाऱ्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथील वाहतूक विभागातील अधिकारी नलावडे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून धमकी देण्यात आली. ही धमकी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. बिष्णोई गँग अमराठी रिक्षाचालकांच्या बाजूने उभी राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रशासनात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, मुंबईत रिक्षा चालवायची असल्यास चालकाला मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येईल. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. या वक्तव्यामुळे विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटल्या आणि भाषिक वाद पुन्हा चर्चेत आला.

या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषिक विभागाचे प्रमुख मनीष दुबे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, रिक्षाचालक हे मुंबईच्या वाहतुकीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. अनेक चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली असून ते लाखो प्रवाशांना सेवा देतात. अशा परिस्थितीत अचानक भाषिक अट लादणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.मनीष दुबे यांनी पुढे सुचवले की, मराठी भाषा शिकण्यास विरोध नाही, मात्र त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांनी सांगितले की, जर सरकारने एक वर्षाचा कालावधी दिला आणि 1 एप्रिल 2027 पर्यंत मराठी शिकण्याची अट ठेवली, तर त्याला समर्थन देता येईल. पण अल्प कालावधीत सक्तीचा निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात बिष्णोई गँगच्या धमकीने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. प्रशासनाने या धमकीची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

एकूणच, मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आणि गुन्हेगारी अशा दोन्ही पातळ्यांवर पोहोचला आहे. पुढील काळात सरकार या मुद्द्यावर काय भूमिका घेते आणि तपास यंत्रणा या धमकीप्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील भाषिक समतोल राखताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे महानगरपालिकेत प्रथमच महापौरांच्या पुढाकारातून पुस्तक वितरण उपक्रम

पुणे महानगरपालिका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यंदा प्रथमच महापौरांच्या पुढाकारातून पुस्तक वितरणाचा अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अकरावीच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित पुस्तके वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमास महापौर मंजूषा नागपुरे प्रमुख उपस्थित होत्या. तसेच विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, आरपीआय गटनेते हिमाली कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेविका स्वप्नाली पंडित व अर्चना जगताप तसेच शिक्षण विभाग उपायुक्त वसुंधरा बारवे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते ॲड. क्षितिज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व, शिक्षणाचे स्थान आणि सामाजिक बांधिलकी याबाबत प्रेरणादायी भाषण केले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, तसेच समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव अधिक दृढ करणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या अभिनव उपक्रमाचे शहरभर स्वागत होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, शैक्षणिक व सामाजिक जागरूकता वाढविण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.

पुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’

राज्य व केंद्रातील मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, पार्थ पवार, मेधा कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा हे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय विविध पक्षांचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (काँग्रेस), धिरज घाटे (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), गजानन थरकुडे (शिवसेना उ.बा.ठा.), रवींद्र धंगेकर (शिवसेना) आणि श्रीकांत पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) हेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजन उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्ष राहुल डंबाळे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे आणि बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.