Home Blog Page 739

अल्लू अर्जुनला जामिन मंजूर

0

मुंबई – तेलंगणा उच्च न्यायालयाने दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा जामिन मंजूर केला आहे.तसेच ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा पती भास्करने माध्यमांशी संवाद साधला आहे. माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितलं की, ‘अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही. चेंगराचेंगरीच्या घटनेशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.

अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा २: द रुल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथे या सिनेमाचा प्रीमिअर शो झाला. या प्रीमिअरसाठी अल्लू अर्जुन अचानक थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसंच तिचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच या प्रकरणी अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आणि त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. या अटकेपासून सुटका मिळवण्यासाठी अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली.

सुप्रीम कोर्ट म्हणाले- न्यायाधीशांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा:साधूसारखं आयुष्य जगावं, न्यायव्यवस्थेत दिखाव्याला जागा नाही

0

नवी दिल्ली-न्यायाधीशांनी साधूप्रमाणे जगावे आणि घोड्यांसारखे काम करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा. निर्णयांबाबत कोणतेही मत व्यक्त करू नये.

गुरुवारी न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. जून 2023 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या 6 महिला न्यायाधीशांना निलंबित करण्याच्या प्रकरणावर खंडपीठात सुनावणी सुरू होती.खंडपीठाने म्हटले की, ‘न्यायव्यवस्थेत दिखाऊपणाला जागा नाही. न्यायिक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर जाऊ नये. त्यांनी निकालांवर भाष्य करू नये, कारण निकाल उद्याचा संदर्भ दिला तर न्यायाधीशांनी आधीच आपले मत कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त केले असेल.

खंडपीठाने म्हटले –
फेसबुक हे खुले व्यासपीठ आहे. तुम्हाला (न्यायाधीशांना) साधूसारखे जगावे लागेल, घोड्यासारखे काम करावे लागेल. न्यायिक अधिकाऱ्यांना मोठा त्याग करावा लागतो.

मे 2023 मध्ये मध्य प्रदेश सरकारने 6 महिला न्यायाधीशांना बडतर्फ केले

उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, मध्य प्रदेशच्या कायदा आणि विधान व्यवहार विभागाने 23 मे 2023 रोजी 6 महिला न्यायाधीशांच्या सेवा समाप्त करण्याचा आदेश जारी केला होता. प्रशासकीय समितीचा निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीच्या आधारे हा आदेश देण्यात आला आहे.

या महिला न्यायाधीशांची परिवीक्षा कालावधीत कामगिरी खराब असल्याचे कारण काढून सेवा समाप्त करण्याचे कारण देण्यात आले. यासंदर्भातील राज्य शासनाच्या आदेशाची राजपत्र अधिसूचना 9 जून 2023 रोजी जारी करण्यात आली होती. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.मध्य प्रदेश सरकारने ज्या सहा महिला न्यायाधीशांच्या सेवा संपुष्टात आणल्या त्यामध्ये सरिता चौधरी, रचना अतुलकर जोशी, प्रिया शर्मा, सोनाक्षी जोशी, अदिती कुमार शर्मा आणि ज्योती बारखेडे यांचा समावेश आहे.

सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी वगळता सर्व न्यायाधीशांच्या नोकऱ्या बहाल करण्याचे आदेश दिले होते. आदिती कुमार शर्मा आणि सरिता चौधरी यांची प्रकरणे स्वतंत्रपणे पाहिल्यानंतर हा आदेश देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

वीजबिल भरण्यासाठी ‘महापॉवर-पे:सहा महिन्यांत वॉलेटद्वारे तब्बल १७७ कोटींचा भरणा

0

वॉलेटधारकांना मिळाले ८० लाखांचे कमिशन तर वीजग्राहकांनाही सुविधा

पुणे, दि. १३ डिसेंबर २०२४: निमशहरी व ग्रामीण भागात वीजबिल भरणे सोयीचे करणाऱ्या तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला प्रामुख्याने कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत १६ लाख ६ हजार ६६२ वीजग्राहकांनी १७७ कोटी ४२ लाख रुपयांच्या वीजबिलांचा वॉलेटद्वारे भरणा केला आहे. तर कमिशनपोटी वॉलेटधारकांनाही ८० लाख ३३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत ६०१ जणांनी ‘महापॉवर-पे’ वॉलेटच्या माध्यमातून वीजबिल भरणा केंद्र सुरु केले आहे.

ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने स्वतःचे ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीजबिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. हे वॉलेट मोबाईल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबॅकिंगने रिचार्ज करण्याची ऑनलाइन सोय आहे. वीजबिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक होण्यासाठी इच्छुकांनी महावितरणच्या विभागीय / उपविभागीय कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३२ वॉलेटधारक असून गेल्या सहा महिन्यांत ७ लाख १५ हजार ४६५ ग्राहकांनी वॉलेटमधून ७२ कोटी ९७ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे. तर वॉलेटधारकांना ३५ लाख ७७ हजारांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ५ लाख ८० हजार ९४४ ग्राहकांनी ५८ कोटी ५९ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला असून जिल्ह्यातील ८३ वॉलेटधारकांना २९ लाख ४ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. 

सांगली जिल्ह्यात १ लाख ६ हजार ६० वीजग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. यात ७९ वॉलेटधारकांना ५ लाख ३० हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात ९१ हजार ८३५ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १२ कोटी ७६ लाख रुपयांचे वीजबिल भरले. यात ५१ वॉलेटधारकांना ४ लाख ५९ हजार रुपयांचे कमिशन मिळाले आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील १ लाख १२ हजार ३५८ ग्राहकांनी वॉलेटद्वारे १६ कोटी ९६ रुपयांचा भरणा केला. यात संबंधित ५६  वॉलेटधारकांना ५ लाख ६१ हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले.

आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जांची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजूरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेता येतो. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर तात्काळ ‘एसएमएस’ दिला जात आहे. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. अशा प्रकारच्या वसूलीचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जात आहे.

भारताची पंच्याहत्तरी आणि शंभरी – भविष्यातील प्रवास

मुंबई, १३ डिसेंबर २०२४ –

ललित दोशी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने ३०वे ललित दोशी स्मृती व्याख्यान मुंबईतील वाय.बी.चव्हाण केंद्रात पार पडले. १२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या व्याख्यानमालेत हे शेवटचे व्याख्यान होते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि आयसीआयसीआय बँकेचे माजी अध्यक्ष के.व्ही. कामत व सीएनबसी टीव्ही १८च्या व्यवस्थापकीय संपादिका शेरीन भान यांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ‘भारताची पंच्याहत्तरी आणि शंभरी-पुढचा प्रवास’ या मूळ संकल्पनेवर आधारित भारताचा १९९० च्या प्रारंभापासून ते २०४७ पर्यंतचा अपेक्षित प्रवास या विचारांवर तज्ज्ञांनी आपापली मते मांडली.

आपल्या व्यावसायिक करिअरमधील आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातील दीर्घकालीन अनुभवांच्या आधारावर के.व्ही.कामत यांनी देशाच्या आर्थिक उत्क्रांतीबद्दल तपशीलवार माहिती दिली. १९९०च्या सुरुवातीला देशात बदलांचे वारे वाहू लागले होते. त्याच वेळी आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना होऊ लागली होती. उदारीकरण आणि तंत्रज्ञानाचा सढळ हस्ते वापर करत, देशात पायाभूत सोईसुविधांची वाढ होत गेली. ही वाढ २००० सालीच्या सुरुवातीला तत्परतेने केली गेली, हा विचार त्यांनी मांडला. या काळात प्रगतीचा कालखंड लक्षात घेतल्यास विकास हा झपाट्याने घडत गेला. त्याच वेळी विविध प्रकल्पांच्या पायाउभारणीतील पर्यावरणीय नियमावलींच्या मर्यादा ते बाजारपेठेतील मंदीपर्यंत कामत यांनी चिंता व्यक्त केली. हे सर्व घटक भारताच्या आर्थिक विकासासमोरील मोठी आव्हाने असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

येत्या २५ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास विविध घटकांवर विकास करण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

० पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण – २००० साली पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी झाली. आता या पायाभूत सुविधांच्या जोरावर सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढायला हवा. सौरऊर्जा किफायतशीर दरात उपलब्ध आहे, ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढायला हवी, असे ते म्हणाले. रस्ते आणि दूरसंचार सेवांमध्येही विकास घडविला, तर आर्थिक विकासाचा पाया स्थिर होईल, असेही त्यांनी सूचविले.

० औद्योगिक क्षेत्र आणि मालाच्या निर्मितीचा व्यवसाय वाढण्यावर भर – मालाचे उत्पादन बाजारात तत्काळ उपलब्ध करून द्यायला हवे. मालाच्या उत्पादनातील स्पर्धा वाढल्यास बाजारात असंख्य स्पर्धक निर्माण होतील. माल उत्पादन निर्मितीत मूल्य साखळी तयार झाल्यास रोजगारनिर्मितीला हातभार लागेल. भारत जागतिक बाजारपेठेत मालपुरवठा करणारे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.

० तांत्रिक झेप आणि डिजीटल भारत – १९९०च्या सुरुवातीला मोबाइल तंत्रज्ञानाचे भारतात आगमन झाले. त्यानंतर, भक्कम फिनटेक प्रणालीचा विकास घडला. तंत्रज्ञान आणि डिजिटल उद्योगाच्या विकासामुळे जलद गतीने विकास घडला. याबद्दलही कामत यांनी आपले विचार मांडले. येत्या दशकांत डिजिटल माध्यमांतील उत्क्रांतीमुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात किमान दोन टक्क्यांनी वाढ होईल. परिणामी, दोन अंकी विस्ताराचा मार्ग मोकळा होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

० सामाजिकीकरण आणि ग्रामीण-शहरीकरणाचे एकत्रिकरण – कामत यांच्या मते, ग्रामीण भारताच्या समुद्धीने भविष्यातील प्रगतीचा पाया रचला जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण-शहरीकरणातील भेदभाव मिटविणे, कामाचा दर्जा वाढविणे, तसेच बाजारातील पुरवठा साखळी वाढविणे इत्यादी घटकांवर भर दिल्यास सर्वसमावेशक विकास घडविता येईल, तसेच न्याय वाढीला चालना मिळेल.

या सर्व मुद्द्यांसह विचारविनिमयाने केलेल्या वित्तीय योजना आणि धोरणांवर लक्ष केंद्रित केल्यास येत्या २५ वर्षांत देशाच्या आर्थिक विकासात भरभराट होईल, असा दृढ विश्वास कामत यांनी व्यक्त केला. आर्थिक उलाढालीत कर्जदारीच्या प्रक्रियेत व्याजदर कमी राहिल्यास चलनवाढ नियंत्रणात राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. देशाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्व वाढल्यास चलनवाढ नियंत्रणात आल्यास अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होईल. भारत आर्थिक महासत्ता म्हणून जगभरात ओळखला जाईल, असा सकारात्मक दृष्टिकोन कामत यांनी आपल्या भाषणातून दिला.

या व्याख्यानमालेला प्रसिद्ध उद्योगपती उदय कोटक, दीपक पारेख, राजदूत विजय नांबियार, डॉ.अशोक गांगुली, नादिर गोदरेज आणि आनंद महिंद्रा या नामवंत उद्योगपतींनी हजेरी लावली.

या व्याख्यानमालेत ललित दोशी मेमोरिअल फाउंडेशनचे विश्वस्त भरत दोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘यंदाच्या व्याख्यानमालेत भविष्यातील परिवर्तनवादी दृष्टिकोन मांडला गेला. हा परिवर्तनवादी दृष्टिकोन ललित दोशी यांच्या विचारांना प्रेरणा देणा-या भावनेशी सुसंगत आहे. हा परिवर्तनवादी विचार भारताचे धोरणकर्ते, उद्योगपती आणि नागरिकांना मार्गदर्शन करणारा ठरेल. आम्ही सर्व एकसंघिक होत पूर्ण विकसित देशाकडे वाटचाल करण्यास सज्ज आहोत.

PICT च्या Neural_Nexus टीमचा Smart India Hackathon 2024 मध्ये शानदार विजय


पुणे: पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या Neural_Nexus टीमने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024 स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ₹1,00,000 चे बक्षीस जिंकले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या सहभागातून अंतिम फेरीत पोहोचलेल्या टीमने आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाद्वारे सर्वोत्कृष्ट ठरून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
टीमचे सदस्य परम प्रशांत जोशी (ई. & टी.सी.), ईशा शहा (AIDS), सारा नांबियार
(C.E.), अथर्व कुलकर्णी (E.C.E.), श्री मेघ शेट्टी (C.E.), आणि निकिता भेडसगावकर(AIDS) यांनी समाजोपयोगी समस्यांवर आधारित अभिनव प्रकल्प तयार केला. या यशामध्ये डॉ. जी. पी. पोतदार यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
PICT चे प्राचार्य प्रा. एस. टी. गंधे आणि संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी यांनी टीमचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी हे यश संस्थेच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि तांत्रिक सर्जनशीलतेच्या परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
Neural_Nexus टीमचे हे यश PICT च्या शैक्षणिक कामगिरीचा गौरव वाढवणारे ठरले आहे. त्यांनी साकारलेला आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

स्व. राज कपूर यांची ‘राजबाग’ आता झाली शिक्षण-संस्कृतीची पंढरी ‘विश्वराजबाग’!

१४ डिसेंबर ही भारताचे एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक स्व. राज कपूर ह्यांची जन्मतारीख. १९२४ मध्ये जन्मलेल्या स्व. राज कपूर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा पूर्णत्वास येत आहे.


आपले वडील म्हणजेच भारदस्त आणि दमदार अभिनेते स्व. पृथ्वीराज कपूर ह्यांच्याकडून राजकपूर यांना देखण्या रुपाचा आणि कसदार अभिनयाचा वारसा लाभला. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शोमन’ म्हणून ओळखले जायचे.
अतिशय कोवळ्या वयातच त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. प्रथम किदार शर्मा, भालजी पेंढारकर अशा सारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली उमेदवारी आणि नंतर आर. के. फिल्मस् ह्या संस्थेची स्थापना करून त्यांनी ‘आग’ ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. आग, आह, आवारा, बरसात, जिस देश में गंगा बहती है, संगम, जागते रहो, प्रेमरोग, मेरा नाम जोकर, सत्यम् शिवम् सुंदरम्, राम तेरी गंगा मैली, हीना अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. त्यातल्या बहुतेकांचे दिग्दर्शन देखील केले.
आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता त्यातून काहीतरी सामाजिक संदेश दिला जाईल ह्याची खबरदारी घेतली.
लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच १९६४ साली राज कपूर ह्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी-काळभोर गावाच्या शिवारात राजबाग ह्या नावाने ओळखली जाणारी सुमारे १०० एकर जमीन एका पारशी व्यक्तीकडून विकत घेतली. मुळा-मुठा नदीच्या काठावर असलेली अतिशय निसर्गरम्य अशी ही जमीन स्व. राज कपूर ह्यांची कर्मभूमी बनली. त्यांनी इथे अनेक दर्जेदार चित्रपटांचे केवळ चित्रीकरणच केले नाही तर कितीतरी चित्रपटांचे ‘आयडिएशन’ व इतर निर्मितीपूर्वीच्या प्रक्रियादेखील ह्याच राजबागेत केल्या.
अशी ही सृजनशील व कलात्मक पार्श्वभूमी असलेली राजबाग २००२ साली एमआयटी, पुणे या सुप्रसिध्द शिक्षणसंस्थेच्या मालकीची झाली. ह्या पाठीमागचा इतिहास देखील रंजक आहे.


एमआयटी, पुणे शिक्षण संस्थेचे संस्थापक, दूरदृष्टी असलेले सुप्रसिध्द शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे मूळचे रामेश्वर (रूई) या मराठवाड्यातील छोट्या खेड्यातले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण करून ते तिथेच प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. वारकरी संप्रदायाची जडणघडण असलेले प्रा. कराड सर हे अतिशय शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि सतत कामात गढलेले. १९८३ साली एमआयटी या शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर पूर्णपणे एमआयटीच्या कामाला त्यांनी वाहून घेतले होते. तसेच विश्वात शांती संस्कृती स्थापित व्हावी या एकाच ध्यासाने पछाडलेले डॉ. कराड सर हे चित्रपट, नाटक अशासारख्या करमणूकीच्या साधनांपासून दूरच असायचे. सुमारे ३० ते ४० वर्षात त्यांनी चित्रपटगृहात पाऊल टाकले नव्हते.
अशी पार्श्वभूमी असलेल्या प्रा. डॉ. कराड सरांना एक दिवशी लोणी काळभोर येथील स्व. राज कपूर यांची राजबाग विकत घेण्याचा प्रस्ताव घेऊन एक परिचित त्यांचेकडे आले. राज कपूर यांचे १९८८ साली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती कृष्णा कपूर आणि रणधीर कपूर, ऋषी कपूर इ. त्यांच्या मुलांकडे जमिनीची मालकी होती. कराड सरांच्या बरोबर चर्चा करताना त्यांनी असे सांगितले की स्व. राजकपूर यांच्या मनात अशी तीव्र भावना होती की राजबागची ही जमीन देशाच्या नवीन व उज्ज्वल समाज घडविण्याच्या दृष्टीने एखाद्या शैक्षणिक संस्थेला देण्यात यावी. एमआयटी या संस्थेच्या वतीने कराड सरांनी त्यांना हमी दिली की सदरील जमीन ही पूर्णपणे शिक्षण आणि भारतीय ज्ञान संस्कृतीचे संवर्धन यासाठीच विकसित केली जाईल आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कार्य होणार नाही.
कराड सरांच्या या विधानाचा कपूर कुटुंबियांवर अतिशय प्रभाव पडला व त्यांनी राजबाग ही २००२ साली एमआयटी या संस्थेला विकली. जमीन विकत घेताना प्रा. कराड सरांच्या मनामध्ये तिथे सप्तरंग, सप्तसूर व सप्तऋषी या मूळ भारतीय संकल्पनेवर आधारित शिक्षण संस्थांची उभारणी करण्याचे मनात आले.
त्यानुसार त्यांनी विश्वशांती गुरुकुल, आयबी स्कूल, मॅनेट ही नौका अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी संस्था, विश्वशांती संगीत कला अकादमी ही स्व. लता मंगेशकरजी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली संगीत शिक्षणाची संस्था, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी अशा अत्यंत दर्जेदार आणि वेगवेगळ्या विषयांना वाहिलेल्या संस्थांची स्थापना करून मूळ राजबागेचे जणू रुपच पालटून टाकले.
आज राजबागला ‘विश्वराजबाग’ या अत्यंत अर्थपूर्ण नावाने ओळखले जाते. विश्वराजबाग ही भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी जागा आहे. तिथे आज एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या नावाने एक आंतरराष्ट्रीय स्तराचे विद्यापीठ कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात मोठा असा विश्वशांतीला समर्पित घुमट तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या नावाने साकारला गेला आहे. भारताला ज्ञानाचे केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारे महर्षी गौतम, महर्षी विश्वामित्र, महर्षी वशिष्ठ अशा अठरा ऋषींच्या नावाने उभारले गेलेले १८ आश्रम, पवित्र असे होमकुंड, श्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवन, श्री विश्वदर्शन देवता मंदिर अशा असंख्य वास्तूंनी विश्वराजबागेचे पावित्र्य खुलून आले आहे.
विशेष म्हणजे, स्व. राज कपूर यांची स्मृती जागती ठेवणारे ‘राज कपूर मेमोरिअल’ हे भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाला वाहिलेले एक विशाल संग्रहालय देखील प्रा. कराड सरांच्या संकल्पनेतून उभे राहिले आहे, जे पर्यटकांचे एक विशेष आकर्षण ठरले आहे.
भारतीय सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणार्‍या कलाकारांचे पूर्णाकृती पुतळे आणि छायाचित्र यांनी सजवलेले हे राजकपूर मेमोरिअल म्हणजे स्व. राजकपूर यांना वाहिलेली एक भावपूर्ण श्रध्दांजलीच आहे.
आजपर्यंत बघितले गेले तर असेच दिसून येते की एकदा एखादी जागा विकत घेतल्यानंतर जुने मालक हे विस्मृतीत जातात. परंतु इथे कराड सरांनी स्व. राजकपूर यांच्या पवित्र स्मृतीला जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने इतके विशाल असे संग्रहालय उभारले आहे, हे विशेषच म्हणावे लागेल.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात दत्तजयंतीनिमित्त दत्तजन्म सोहळा व पालखी नगरप्रदक्षिणा 

पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२७ व्या दत्तजयंती सोहळ्यांतर्गत दत्तजयंतीनिमित्त शनिवार, दिनांक १४ डिसेंबर रोजी पहाटे ६ पासून मंदिर खुले राहणार असून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तजयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम, दत्तजन्म सोहळा, पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा होणार आहे. दत्तमंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी दिली.   
शनिवारी सकाळी ६ वाजता ट्रस्टचे माजी विश्वस्त चंद्रशेखर व नूतन हलवाई यांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व हेमलता बलकवडे यांच्या हस्ते श्री दत्तयाग होईल. सकाळी ८  वाजता प्रात: आरती आमदार हेमंत रासने व मृणालिनी रासने यांच्या हस्ते तसेच दुपारी १२.३० वाजता सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर, जिल्हा न्यायाधिश किरण क्षीरसागर व सुहाना मसालेचे राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते माध्यान्ह आरती होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात कीर्तनकार ह.भ.प.तेजस्विनी कुलकर्णी यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी ५ वाजता असून सायंकाळी ५.५७ वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सायं आरती सारथीच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता व अशोक काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कांचन व संजीव जाधव, पोलीस उपायुक्त डॉ. संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते होईल. 
त्यानंतर पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वैभवशाली सुवर्ण रथातून पारंपरिक दिंडी, अश्व बग्गी, नगारा वादन व वाद्यपथकांच्या जल्लोषात भाविकांसह निघणार आहे. भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सुविधा सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आली आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

केळेवाडीतील साहिल जगतापला पकडून ३ लाखाचा गांजा हस्तगत:अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची कारवाई

पुणे-केळेवाडीतील साहिल जगतापला पकडून त्याच्या कडून ३ लाख १४ हजाराचा गांजा आणि इतर ऐवज अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. यापाराक्र्णी पोलिसांनी सांगितले कि,’
दि.१३/१२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लोणीकाळभोर पो रटे कडील सपोनि शिवशांत खोसे व पोलीस अंमलदार लोणीकाळभोर पो. स्टे कार्यक्षेत्रात पेट्रोलींग करीत असताना दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना प्राप्त झालेल्या माहितीचे अनुषंगाने लोणी टोलनाका जवळ, रेड्डी हॉटेल शेजारी, सार्वजनिक रोडवर, पुणे सोलापुर रोड, पुणे या ठिकाणी सापळा रचुन साहिल विनायक जगताप वय २८ वर्षे, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे यास ताब्यात घेतले असता, त्याची व त्याचे ताब्यातील सॅकबॅगचे झडतीमध्ये कि.रु.३,१३,८४०/- चा १४ किलो १८२ ग्राम गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे याठिकाणी एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १, गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सपोनि शशिकांत खोसे, तसेच पोलीस अंमलदार मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, सुजित वाडेकर, योगेश मोहिते, बांगर, भगत यांनी केली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. १३: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

पुणे, दि. १३ : जिल्ह्यात पौड, लोणावळा व हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच १ जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी २५ डिसेंबर रोजी ००.१० वाजेपासून ते ७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत.

रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी. कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होवू देणे यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिपेक्षकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देण्याबाबतचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचे अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे

0

मुंबई- राज्य सरकारने उच्चपदस्थ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढत त्यांना तत्काळ आपल्या नव्या नियुक्तीचा पदभार सांभाळण्याचे निर्देश दिलेत.आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्याकडे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी शुक्रवारी एका विशेष आदेशांद्वारे त्यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्याचे आदेश काढले.

व्ही. राधा यांनी यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, प्रिय श्रीमती अश्विनी भिडे, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मा. मुख्यमंत्री यांचेच प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.

…अश्विनी भिडे ह्या 1995 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यभर विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे.

EVM व्हेरिफिकेशन: सुप्रीम कोर्ट म्हणाले- याचिका आमच्याकडे का आणली; ज्या खंडपीठाने निर्णय दिला तेच ऐकतील

0

नवी दिल्ली-
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) पडताळणीसाठी धोरण तयार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जुन्या खंडपीठाकडे पाठवली, जे या प्रकरणी निर्णय देईल. ही याचिका आमच्याकडे का आणण्यात आली, त्यावर जुन्या खंडपीठाने सुनावणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

26 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जुन्या बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. कोर्टाने आपल्या निर्णयात ईव्हीएममधील बिघाडाचे आरोप निराधार ठरवत ईव्हीएम सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. यामुळे बूथ कॅप्चरिंग आणि बनावट मतदान थांबले आहे.SC ने निवडणूक निकालांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना प्रत्येक विधानसभेच्या 5% EVM च्या मायक्रोकंट्रोलर चिप्सची चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांनी अपीलार्थी, हरियाणाचे माजी मंत्री करणसिंग दलाल आणि पाचवेळा आमदार लखन कुमार सिंगला, गोपाल शंकरनारायणन यांच्या वकीलांना हा आदेश दिला.ते म्हणाले की, कलम 32 अंतर्गत याचिकेत केलेल्या मागणीसाठी 26 एप्रिल रोजी दिलेल्या पूर्वीच्या खंडपीठाच्या निर्णयाची आवश्यकता आहे.

दलाल आणि सिंगला यांना आपापल्या विधानसभांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपीएटी आणि सिम्बॉल लोडिंग युनिट या ईव्हीएमच्या 4 घटकांची मूळ बर्न मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी निवडणूक आयोगाकडे (EC) मागितल्या.ते म्हणाले की, याचिकेत निवडणूक निकालांना आव्हान दिलेले नसून ईव्हीएम तपासण्यासाठी मजबूत यंत्रणा असावी अशी मागणी केली आहे.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विधानसभेच्या 5 टक्के ईव्हीएमची चाचणी त्या बनवणाऱ्या कंपनीच्या अभियंत्यांनी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.या निकालाला आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला आठ आठवड्यात तपास प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 90 पैकी 48 जागा जिंकल्या.

कॉंग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी नाना पटोलेंचीच, वडेट्टीवार यांनी थेट डागली तोफ

महाविकास आघाडीतील जागा वाटपातील वाटाघाटी आणि काही महत्त्वाच्या जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नंतरच्या बैठकांची जबाबदारी पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.

मुंबई-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. नव्या अध्यक्षाची चाचपणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूर येत असल्याचे सांगितले जात आहे. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाईल अशीही चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींवर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रोखठोक मत व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले होते. त्यांच्यावरच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबादार येईल, असे सांगून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे सहाजिकच पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वा विषयी मत जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येणार आहेत. ते सर्वांसोबत चर्चा करतील. या चर्चेतून जो सूर निघेल त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मात्र चर्चेत कोण सहभागी होतात, काय मत नोंदवतात यावरच सर्व अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचे सध्या फक्त १६ आमदार आहेत. त्यांच्या भरोशावर महाराष्ट्रात पुन्हा पक्ष उभारणे, बांधणी करणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यावी याची चाचपणी व चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. हे सांगताना वडेट्टीवारांचा सर्व रोख आणि रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता.

पटोले यांना बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र लोकसभेत मोठे यश मिळाल्याने पटोले यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दर्शवला होता. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढण्याचे निर्देशही राहूल गांधी यांनी दिले होते.

अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची कोठडी

0

चेंगराचेंगरीत मृत्यूप्रकरणी 4 तासांपूर्वी झाली होती अटक, पीडित व्यक्ती खटला परत घेण्यास तयार
पुष्पा-2’च्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद कोर्टाने अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अभिनेत्याला शुक्रवारी सकाळी 12 वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर त्याला ४ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.

अल्लू 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेथे जमाव जमा झाला आणि चेंगराचेंगरी झाली. अनेक जण जखमी झाले.या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, महिलेच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी अभिनेत्याने उच्च न्यायालयात अपील केले आहे.

अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. अभिनेत्याने मृत रेवतीच्या कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला आणि त्यांची भेट घेतली. अभिनेत्याने 25 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासनही दिले होते.

दरम्यान अल्लू अर्जुनने आपल्या अटकेच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी त्याला नाश्ता पूर्ण करू दिला नाही, असा दावा अभिनेत्याने केला आहे. कपडे बदलण्याचीही परवानगी दिली नाही.

एका व्हिडिओमध्ये अभिनेता घरातून खाली येतो आणि पार्किंगमध्ये येतो. तिथे त्याचे सर्व्हंट धावत येतात आणि चहा-पाणी देतात. व्हिडिओमध्ये तो चहा पिताना दिसत आहे. यावेळी त्याची पत्नी स्नेहा रेड्डी दिसत आहे. अल्लू त्याच्या पत्नीला समजावतो. यानंतर पोलीस त्याला सोबत घेऊन जातात.

दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आले पाहिजे- सुनंदा पवार

:सत्तेसोबत जायचे का नाही हे नेते ठरवतील, तरुणांना संघटनेत जबाबदारी द्यावी

पुणे-मूठ घट्ट असली की ताकद रहाते, आपण जर विखुरलेले राहू तर ताकद राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले पाहिजे. कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केले आहे.सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबद्दल निर्णय घ्यायला हवा. नवे उमदे जे आमदार निवडून आले आहे, त्यांना जर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर पक्ष लवकर उभारू शकतो.

सुनंदा पवार म्हणाल्या की, अजित पवारांनी काल जी शरद पवार यांची भेट दिली ती राजकीय नाही तर कौटुंबिक होती. हा केवळ कौटुंबिक प्रसंग आहे, वाढदिवसाच्या निमित्ताने ही भेट झाली ते नेहमीच होते, असे मला वाटते. ते केवळ शुभेच्छा देत आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आले होते.सुनंदा पवार म्हणाल्या की, अजितदादा काही बोलले कुणाला भेटले, कुठे गेले तर त्यांची बातमी होते. पण मला त्या भेटीत बातमी सारखे काही वाटत नाही. कुटुंबामध्ये मतभेद असतात, सर्वच कुटुंबामध्ये मतभेद असतात. मतभेद संपवून पुढे एकत्र येतील असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांनी 60 वर्षे राजकारण केले आहे. त्यांनी काय करावे यावर मी बोलू शकणार नाही.सुनंदा पवार म्हणाल्या की, जे तरुण आमदार निवडून आले आहे, त्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली पाहिजे. त्यांना पक्षात जबाबदारी दिली तर हा पुन्हा चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो. नव्या चेहऱ्यांना जर संधी दिली तर लवकर पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी फायदा होईल. रोहित पवारांना काय संधी द्यायची याबाबत सर्व अंतिम निर्णय शरद पवारांचा आहे.