महाविकास आघाडीतील जागा वाटपातील वाटाघाटी आणि काही महत्त्वाच्या जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नंतरच्या बैठकांची जबाबदारी पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.
मुंबई-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. नव्या अध्यक्षाची चाचपणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूर येत असल्याचे सांगितले जात आहे. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाईल अशीही चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींवर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले होते. त्यांच्यावरच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबादार येईल, असे सांगून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे सहाजिकच पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वा विषयी मत जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येणार आहेत. ते सर्वांसोबत चर्चा करतील. या चर्चेतून जो सूर निघेल त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
मात्र चर्चेत कोण सहभागी होतात, काय मत नोंदवतात यावरच सर्व अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचे सध्या फक्त १६ आमदार आहेत. त्यांच्या भरोशावर महाराष्ट्रात पुन्हा पक्ष उभारणे, बांधणी करणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यावी याची चाचपणी व चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. हे सांगताना वडेट्टीवारांचा सर्व रोख आणि रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता.
पटोले यांना बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र लोकसभेत मोठे यश मिळाल्याने पटोले यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दर्शवला होता. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढण्याचे निर्देशही राहूल गांधी यांनी दिले होते.