Home Blog Page 720

२५/३० वर्षे वयाच्या २ तरुणी पकडल्या.. पीएमपीबस मध्ये करत चोऱ्या-६ तोळे दागिने हस्तगत

पुणे-कात्रज-स्वारगेट – हडपसर गाडीतळ या मार्गावरील पीएमपीएमएल च्या बसेस मधील वाढत्या चोऱ्या मुळे पोलीस आणि प्रवासी हैराण झाले असताना आता अशा चोऱ्यांच्या प्रकरणात २५ आणि ३० वर्षीय २ तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण ५ चोऱ्यांचा तपास लावला आहे. या प्रकरणी आता पर्यंत एकूण ६ तोळे वजनाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं. १८०/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ मधील फिर्यादी हे दि.१४/०५/२०२४ रोजी आळंदी पी एम पी एम एल बस स्टॉप येथे बसमध्ये चढत असताना मोठया प्रमाणात गर्दी होती सदर गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या डावे हातातील सोन्याची बांगडी चोरी केली होती. त्यावरुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशीत केले होते.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनकडील दामिनी मार्शल वरील महिला पोलीस अंमलदार अनिता घायतडक या दि. १९/१२/२०२४ रोजी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना कात्रज पीएमपीएल बस स्टॉप येथे काळा व हिरव्या रंगांचा टॉप परिधान केलेल्या अशा वर्णनाच्या दोन महिला ह्या संशयितरित्या फिरत असल्याचे दिसुन आल्याने त्यांना त्यांचेवर संशय निर्माण झाल्याने त्यांनी लागलीच मदती कामी तपास पथकातील अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन सदर महिलांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचा नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अनुक्रमे १) दुर्गा अविनाश उपाध्याय वय ३० वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्सजवळ, खडकी पुणे, मुळगाव सरकारी दवाखान्याजवळ, दर्याचे पाठीमागे, बापुनगर गुलबर्गा कर्नाटक २) लक्ष्मी मिवा सकट वय २५ वर्षे रा. सध्या म्हाडा कॉम्पलेक्स जवळ, खडकी पुणे, मुळगाव होम मैदान सिद्धेश्वर मंदीराजवळ सोलापुर असे असल्याचे सांगितले सदर संशयित महिलांना सदर ठिकाणी विनाकारण फिरण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तद्नंतर सदर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचे कडे महिला पोलीस अंमलदार धायतडक यांचे समक्ष पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांनी कौशल्य पुर्ण तपास केला असता त्यांनी सांगितले कि, गेले ७ ते ८ महिन्यांपुर्वी त्या दोघींनी स्वारगेट येथील आळंदी पी.एम.टी बस स्टॉप येथे एका महिलेच्या हातातील बांगडी चोरी केली होती. असे सांगितल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन कडील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर

आरोपीतांनी स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८०/२०२४ भादंविकलम ३७९ प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर महिला आरोपींना दाखल गुन्हयात अटक करुन पोलीस कोठडी मधील तपासा दरम्यान त्यांचे कडुन ०४,८८,०००/- रु. किं. चे ६० ग्रॅम वजनाचे (६ तोळे) सोन्याचे दागीने तपासा दरम्यान जप्त करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले सोने चोरीचे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत ते पुढीलप्रमाणे-
१) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं १८०/२०२४ भादंविकलम ३७९ प्रमाणे
२) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं.५०७/२०२४ भा.न्या.सं. कलम.३०३ (२) प्रमाणे
३) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. ४९३/२०२४ भा.न्या.सं. कलम.३०३(२) प्रमाणे
४) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. २९५/२०२४ भा.न्या.सं. कलम.३०३ (२) प्रमाणे
५) स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. ४७३/२०२४ भा.न्या. सं. कलम. ३०३ (२) प्रमाणे
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार मोराळे, तनपुरे, घुले, पवार, शिंदे, टोणपे, खेदाड, शेख, चव्हाण, दुधे, महिला पोलीस अंमलदार सिताप, शिंदे, अनिता धायतडक, सांगोलकर यांनी केली

२१ वर्षे वयाच्या चोरट्यास पकडून चोरलेल्या ६ दुचाक्या हस्तगत:हडपसर पोलिसांची कारवाई

पुणे-२१ वर्षे वयाच्या चोरट्यास पकडून त्याने चोरलेल्या ६ दुचाक्या हडपसर पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२३/१२/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना, पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनीअर्जुन हिराजी भोसले वय २१ वर्षे रा. दत्त मंदिराचे जवळ अप्पर इंदिरानगर पुणे याचे कब्जात मिळुन आलेली दुचाकी ही चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे शहर कार्यक्षेत्रातुन दुचाकी वाहने विक्री करण्याचे उद्देशाने चोरी केली होती, नमुद आरोपी अर्जुन हिराजी भोसले याचेकडुन १,६५,०००/- रु.च्या एकुण ०६ दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे. त्याचेकडुन हडपसर, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, चतुश्रृंगी व डेक्कन पोलीस स्टेशन कडील एकुण ६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण (अतिरीक्त कार्यभार) दरोडा वाहन चोरी पथक २, सहा.पो. निरी. सी.बी.बेरड, पोलीस अंमलदार राजेश अभंगे दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, सुनिल महाडीक, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, विनायक येवले व अमोल सरतापे यांनी केली आहे.

घरफोड्या करणारी दोन लहान मुले पकडली:चोरीचे दागिने हस्तगत

पुणे- येथील सहकारनगर पोलिसांनी २ लहान मुले पकडून त्यांनी केलेले घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून ९०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यासह मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सांगितले कि,’
दि.०९/१२/२०२४ रोजी रात्रौ २३.०० वा.ते दि.१०/१२/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वा.चे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घराचा दरवाजा कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरात प्रवेश करुन घराचे कपाटे उचकटुन कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले त्या बाबत अज्ञात इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.४३५/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३३१ (३), ३३१ (४) ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक २४/१२/२०२४ रोजी सदर दाखल गुन्हयाचा तपास वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे तपास करित असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांच्या बातमी मिळाली की सदर गुन्हा हा तळजाई वसाहतीमधील रेकॉर्डवरील बालकांनी केला असुन ते तळजाई वसाहतीमधील बदाम चौकाचे अलीकडे एका रिक्षामध्ये बसलेले असुन त्यांचेकडे सोन्याचे दागीने आहेत. त्यांना ताब्यात घेवुन त्याच्या कडे पालकांन समक्ष सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता सदर विधीसंघर्षीत बालकांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने दोन बालकांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन चोरीस गेलेले दागिने असा एकुण ९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत यांनी केली आहे.

गडकिल्ले, महिला सक्षमीकरण,कोदवली धरण आणि महत्त्वाची विधेयकं यावर सविस्तर चर्चा

0

पुणे : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले. यावेळी राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा झाली. नवीन सदस्यांसह इतर सदस्यांनी कामगाजात सहभाग घेतला. विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली. तसेच हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर खाते वाटपाची यादी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विधानपरिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे, दिलेले निर्देश आणि विधेयके याबाबत पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.

याबाबत बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “यंदाचे हिवाळी अधिवेशन नवीन पर्व सुरू करणारे त्याचबरोबर ऐतिहासिक स्वरूपाने महत्त्वाचे होते. जवळ जवळ 33 वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम पार पडला. या अधिवेशनामध्ये जी विधेयकं सभागृहामध्ये मंजूर झाली त्यापैकी कारागृहांच्या संदर्भातील विधेयक,
सिद्धिविनायक मंदिराच्या समिती सदस्यांची मुदत तीन वर्षापासून पाच वर्ष करण्याचा निर्णय तसेच सदस्य संख्या नऊ वरून पंधरा वरती करण्याचा निर्णय घेणारे २४ क्रमांकाचे विधेयक हे अधिवेशनामध्ये मंजूर झाले.

गडकिल्ले संवर्धन हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जे दुर्गकिल्ले आहेत तसेच पुरातत्व विभागाच्या आखत्यारीमध्ये अनेक पौराणिक स्थळं आहेत येथे अनेक गैरकृत्य होताना आढळतात. हे पाहता १९६० च्या कायदे मध्ये असणारी शिक्षा वाढवली गेली आणि त्यानुसार ३ ते ५ वर्षापर्यंत शिक्षा करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नागपूर अधिवेशनामध्ये विविध लोकांनी बजावलेली भूमिका आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या आठवणी याबाबत बैठक झाली. ही माहिती एकत्र करण्याच्यावतीने साधारण ३०-३५ पत्रकारांची बैठक झाली. त्यामध्ये सुधीर पाठक, प्रदीप मैत्रा या दोन पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या मधील महत्त्वाच्या घटना व महत्त्वाची विधेयके याबाबत ग्रंथ तयार करण्यासाठी समिती तयार करण्यात आली. तसेच, विधान परिषदेच्या शतक महोत्सव संदर्भात हे पुस्तक तयार करण्यासाठी ही बैठक झाली.

तसेच राज्य महिला आयोग आणि आमचे उपसभापती कार्यालय यांनी मिळून एक नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये नवीन महिला आमदारांना काम करण्याच्या संदर्भामध्ये महिला आयोगांची माहिती व्हावी, त्यांच्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी ज्या अडचणी असतील त्याचं निराकरण व्हावं आणि त्यांनी कुठल्या महत्त्वाच्या प्रश्नावर काम करावं यावर चर्चा केली. या कार्यक्रमात स्त्री शक्ती व्यासपीठावर चर्चेसाठी भाजप आमदार चित्रा वाघ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मंत्री अदिती तटकरे, आमदार स्नेहा दुबे, भाजप आमदार श्रीजया चव्हाण, आमदार सना मलिक, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, उमाताई खापरे, संजना जाधव आणि स्त्री आधार केंद्राच्या जेहलमताई जोशी उपस्थित होत्या.

तसेच सभागृहाचे कामकाज एवढ्यापुरते मर्यादित नसते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोदवली म्हणून धरण आहे त्याच्यासाठी आधी दहा कोटी रुपये सरकारने दिले होते आणि नंतरच्या आठ कोटींसाठी ते जवळजवळ सहा-सात वर्षे काम रखडले होते. माझ्या अध्यक्षतेखालच्या विनंती अर्ज समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. मुख्यमंत्री कार्यालयाला त्याचा अहवाल दिला आणि त्वरित त्या बैठकीमध्येच आठ कोटी रुपये त्या धरणासाठी मंजूर झाले बाबत अधिकाऱ्यांनी शासन निर्णय आणला. यामुळे हे मोठे ते काम आता मार्गी लागलेले आहे. त्याचाही अहवाल आम्ही अधिवेशनामध्ये मांडला आणि त्या दृष्टीकोनातून एक पिण्याच्या पाण्यासंदर्भातला प्रश्न सुटला.”

तसेच पालघर, नंदुबारमधील शाळेत आढळलेले खराब पोषण आहार, बालकांचे कुपोषण या घटनांचा विशेष उल्लेख करत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशांवरही चर्चा केली. त्यांना दर्जेदार आहार मिळावा यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे असा निर्देशही त्यांनी यावेळी दिला.

“भविष्यकाळात स्त्रियांच्या चळवळीमध्ये राजकारणामध्ये अनाथ मुलींचा नक्कीच सहभाग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे ४ थे महिला धोरणामुळे मुलींच्या आर्थिक प्रगतीकडे तसेच महिला सक्षमीकरणाच्या विषयात आपल्या सर्वांना निश्चितच प्रगती झाल्याची पाहायला मिळेल. मुलींच्या अनाथ गृह संस्थांची sop करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर अनाथ मुला मुलींच्या विवाह जमावण्यासंबंधी राज्यातील विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे”, असंही याप्रसंगी डॉ नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या.

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक अदाकारीतून परंपरा, संस्कृतीचे दर्शन

सांस्कृतिक कला महोत्सवात कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनोहारी सादरीकरण
पुणे: मनोहारी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर… कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन… प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण… भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन… वारकरी वेशात हरिनामाचा गजर अन देशभक्तीपर गीतांचा गहिवर… नेत्रदीपक नृत्याविष्कार… विद्यार्थ्यांतील कलागुणांचे, सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट अन भरभरून कौतुक!
निमित्त होते, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे! सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षिणक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली. विविध कला, परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर, कोळी नृत्य, कव्वाली, पाणी अडवा पाणी जिरवा, मिशन मंगलम, खंडोबाचा जागर, महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केले. मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका, विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले. देशभक्तीपर गीतांतून ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला. भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लाऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे, प्रशांत नेटवटे, संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण, पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण, भीमराव बंडोजी चव्हाण, सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालिका सुनिता काकासाहेब चव्हाण, हर्षदा अनिकेत चव्हाण, रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार, विलास खाडे, माधव काकडे, डॉ. सुनीता चव्हाण, दीपक खेडकर, वंदना काकडे, मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान दिले.
“धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेली २५ वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजिला जातो. त्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या एकत्रित मेहनतीमुळे यंदाचा महोत्सव अतिशय दर्जेदार झाला आहे.”- काकासाहेब चव्हाण, अध्यक्ष, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा .. मराठी भाषा भवन एक भुल भुलैय्या .. संजय मोरे

पुणे- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिमान आहे आम्हाला ..पण यामुळे किती मराठी भाषिकांचे कोणकोणते फायदे झाले ? मराठी भाषेचा किती प्रसार झाला ? निवडणुकीच्याच तोनावर पुण्यात मराठी भाषा भवनाचे लोकार्पण देखील करण्यात आले काय झाले या भवना मुळे.. नेमके काय साधले ? अशा प्रश्नांचा आता मारा होऊ लागला असताना मराठी भाषा भवनाच्या दुरावस्थेची पोलखोल शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी यांनी केली आहे.

ते म्हणाले ,’ एक मे 2024 रोजी पुणे विद्यापीठ येथे मराठी भाषा भवनचे लोकार्पण करण्यात आले. परंतु त्या दिवसापासून आज पर्यंत मराठी भाषा भवनाचा एकाही विद्यार्थ्याला उपयोग झालेला नाही. आतील सर्व पुस्तके दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सदर वास्तूला गळती लागल्याचे दिसून येते. निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे, लाईट नाही, पाणी नाही, बाथरूम नाही. बसायला खुर्च्या, टेबल नाही. उद्घाटनावर लाखो रुपये खर्च करूनही मराठी भाषा भवन वापरात येणार नव्हते तर याचे लोकार्पण का करण्यात आले ? मराठी भाषा भवनच्या चारही बाजूने पत्र्याचं कंपाउंड करून बंद ठेवण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी भिंतींचे प्लास्टर उखडलेले आहे. पुस्तकांवर धुळीचे साम्राज्य आहे. विद्यार्थ्यांना बसायला काहीही व्यवस्था नाही. विद्यार्थी येऊन याचा लाभ घेतात असं सांगितलं जातं, परंतु असे काहीही आढळून येत नाही. पुणे विद्यापीठाचे साडेसहाशे कोटीचे बजेट असून या बजेटचा अपव्यय होताना दिसत आहे. मुख्य इमारत ही हेरिटेज वास्तूमध्ये गणली जाते. तरीही इमारतीला बेकायदेशीररित्या होल मारून लाईट्स लावण्यात आले. त्याचा खर्च अडीच कोटी रुपये दाखवण्यात आला. तसेच विद्यापीठामध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु तशी केबल कुठेही टाकल्याचे किंवा राउटर बसविल्याचे दिसून येत नाही.संसदेत मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे फर्मान काढले जाते. आणि याच महाराष्ट्रामधे मराठीची गळचेपी होताना दिसत आहे. मागील दहा वर्षापासून सदर मराठी भाषा भवनच्या ईमारतीचे काम सुरू आहे. परंतू लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मराठी माणसाचा विश्वास संपादन करण्यासाठी अर्धवट काम असताना लोकार्पण घाईघाईने केले गेले. कोनशिलेवर नाव याव म्हणून उद्घाटनाचा घाट घातला गेला का ? याप्रसंगी पुणे विद्यापीठात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी उपस्थित होते.

काव्यलेखन कला तर सादरीकरण हे शास्त्र -ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांचे मत

वल्लरी प्रकाशनच्या वतीने गोकर्ण आणि हरिप्रिया  काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे: कवितेचे बीजारोपण जरी कवीने केले, तरी ती फक्त एका व्यक्तीची राहत नाही. ज्याची अनुभव संपन्नता जास्त, त्याची कविता तेवढीच समृद्ध होते. निखळ कविता लिहिणे ही एक कला आहे, तर कवितेचे प्रभावी सादरीकरण हे शास्त्र आहे. कवीने दोन्ही गोष्टींत पारंगत असणे महत्वाचे असते कारण प्रेक्षकांसमोर सादरीकरण करताना अभ्यासपूर्ण दृष्टिकोन गरजेचा आहे, असे मत ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशनच्या वतीने व्यंकटेश कल्याणकर संपादित “गोकर्ण” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे आणि डॉ. सारिका बावस्कर यांच्या “हरिप्रिया” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. यावेळी गझलकार आनंद पेंढारकर, कवयित्री कांचन सावंत, साहित्यिका मानसी चिटणीस, संपादक व्यंकटेश कल्याणकर, कवयित्री डॉ. सारिका बावस्कर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आनंद पेंढारकर म्हणाले, कविता लिहिताना कवीने आधीच्या कवींनी लिहिलेल्या कवितांचा अभ्यास करणे, स्वतःच्या कवितांना वारंवार वाचून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच भाषेचा गाढा अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. कवी सामाजिक भान ठेवून लिहितो, तेव्हा त्याच्या कवितेत वास्तव अधिक स्पष्टपणे दिसते, त्याकरीता त्याला सामाजिक भान असणे देखील गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कांचन सावंत म्हणाल्या, “कविता म्हणजे केवळ प्रेम किंवा विरह नव्हे. याहूनही व्यापक विषय कवितेचे होऊ शकतात. त्याकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून कविता आपोआप सुचू लागते, त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नसते, असेही त्यांनी सांगितले.

व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले तरी माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गोकर्ण या शब्दावर १० सेकंदांत १० कविता मिळतील, परंतु स्वतःच्या जगण्याला स्वतःच्या शब्दांत मांडणे ही खरी कविता आहे. गोकर्ण हा संग्रह कविता लिहिणाऱ्या कविच्या जीवनातील प्रत्येकासाठी समर्पित आहे.

प्रज्ञा कल्याणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर ज्योती इनामदार यांनी आभार मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन गोंगटल्लू, आर्या इनामदार, अनिष कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील 58व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ होणार पुण्यात

पुणे, 25 डिसेंबर, 2024: महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये दिनांक 24, 25 व 26 जानेवारी, 2025 रोजी मिलीटरी डेअरी फार्म ग्राउंड, पिंपरी पॉवर हाउस जवळ, शास्त्री नगर, पुणे 411017 (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानांवर आयोजित केला जात आहे. परमात्म्याची ओळख करुन मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करुन विश्वामध्ये सौहार्द व शांतीसुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे.

​या भव्यदिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज आदरणीय श्री.मोहन छाब्राजी यांच्या शुभहस्ते बुधवार, दि. 25 डिसेंबर, 2024 रोजी करण्यात आला. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज श्री.जोगिंदर मनचंदा, प्रचार प्रसार कॉर्डिनेटर (महाराष्ट्र) डॉ.दर्शन सिंह, समागम समितीचे चेअरमन श्री.शम्भुनाथ तिवारी, समन्वयक श्री.ताराचंद करमचंदानी आणि समागम समितिच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते. हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला.

स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना आदरणीय श्री.मोहन छाब्राजी म्हणाले, की सतगुरुंच्या असीम कृपेने आयोजित होत असलेल्या या संत समागमामध्ये तोच सत्याचा संदेश दिला जाईल जो युगानुयुगे संत-महापुरुषांनी समस्त मानवतेला दिला.
ते पुढे म्हणाले, की संत निरंकारी मिशन मानवता व विश्वबंधुत्वाचे मिशन आहे. परमात्म्याचे ज्ञान प्राप्त केल्याने मानवा-मानवातील अंतर संपून जाते आणि एकमेकांशी प्रेमाचे नाते जोडले जाते. ज्यायोगे वैर, द्वेष, ईर्षा यांसारख्या दुर्भावना दूर होतात. ब्रह्मानुभूतिने आत्मानुभूति प्राप्त करुन मानवी गुणांनी युक्त होऊन धरतीसाठी वरदान बनेल असे जीवन जगणे हे मनुष्य जीवनाचे मुख्य लक्ष्य आहे.

​उल्लेखनीय आहे, की महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे. 1968 मध्ये महाराष्ट्राचा पहिला संत समागम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला व त्यानंतर सतत 52 संत समागम मुंबई महानगरातच होत आले. सन 2020मध्ये 53वा संत समागम नाशिक मध्ये झाला, 56वा संत समागम छत्रपती संभाजी नगर येथे तर 57वा संत समागम नागपुर नगरी येथे आयोजित करण्यात आला. यावर्षी हा 58वा संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य वि़द्येचे माहेरघर पुणे नगरीला प्राप्त झाले आहे, ज्याचे साक्षी अवघे विश्व होईल.

​समालखा येथे आयोजित 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक भक्त महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

​हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत.

पोलिस हफ्तेवसुली करतात,अन सर्वसामान्य नागरिकांचा छळ करतात – खासदार बारणेंची तक्रार

पुणे- पिंपरी चिंचवड पोलिस हफ्तेवसुली करतात. पोलिसांचा कारभार हा कुणालातरी पाठिशी घालण्यासाठी सुरू असल्याचे दिसून येते. सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलाईदार समस्यांना प्राधान्य देतात. यामुळे सरकार बदनाम होत आहे, असे तक्रार शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार रखडला त्या काळात गृहमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. यावेळी शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी गृहखात्यावर एखादा डॅशिंग नेता असायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारावर बोट ठेवले आहे.

श्रीरंग बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही, तक्रारदाराला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते म्हणूनच सर्व तक्रारी तत्काळ आणि योग्य प्रकारे हाताळल्या जाव्यात. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. जनतेचा सरकारवरील विश्वास कायम ठेवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे, हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य आहे, असेही मी स्पष्ट केले.

श्रीरंग बारणे म्हणाले की, पोलिसांचा कारभार हा कुणालातरी पाठिशी घालण्यासाठी सुरू असल्याचे दिसून येते. यात मलाईदार प्रश्नाकडे पोलिस पहिले लक्ष घालतात. मात्र सर्वसामान्यांच्या तक्रारीमध्ये ते लक्ष घालत नाहीत. माझ्याकडे हिंजवडी, वाकड, काळेवाडी, सांगवीसह मालदार पोलिस ठाण्याची तक्रार आल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना म्हटले आहे.श्रीरंग बारणे म्हणाले की, सरकार कुठेच बदनाम होता कामा नये. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या रुपाने राज्याला सक्षम नेतृत्व मिळाले आहे. . राज्याच्या जनतेने मोठा विश्वास देऊन पुन्हा एकदा सत्ता दिली आहे. म्हणून अशे प्रकार होत असतील ते थांबले पाहिजेत.

महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपैकी साडेसात वर्ष गृहखातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. केवळ महाविकास आघाडीच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती. या दरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली?:सूत्रधार कोण हे उभ्या महाराष्ट्राला माहिती, पण सरकार शांत झोपलंय- जितेंद्र आव्हाड

मुंबई-संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.दरम्यान जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकार वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मीक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा.

आव्हाडांचे ट्विट काय?

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, चलो बीड ! दिनांक 28 डिसेंबर!! सकाळी 11.00 वाजता संतोष देशमुख याची निर्घृण हत्या, बीडमध्ये वाढत चाललेली खुनांची मालिका आणि त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले सरकार या निषेधार्थ भव्य मोर्चा ! महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सहभागी व्हावे !! मी जाणार आहे, तुम्ही पण या. कदाचित, मोर्चाला घाबरून सरकार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करेल. पण, अजूनही वाल्मिक कराडला खुनाचा आरोपी केलेला नाही. हे सरकार किती निर्ढावलेले आहे ते बघा. उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की, संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे. मागील दोन वर्षात झालेल्या हत्यांच्या मागे कोण आहे? असे असूनही सरकार शांत झोपलेय. सरकारला खडबडून जाग आणण्यासाठी चलो बीड !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन 16 दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक

पुणे : शिवाजी रोडवर एका मद्यधुंद कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर त्याने पळून जाताना अनेक वाहनांना धडक दिली. शेवटी त्याला दीप बंगला चौकात लोकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

दयानंद केदारी असे या कारचालकाचे नाव आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले की, शिवाजी रोडवर प्यारा हॉटेलसमोर एका कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातानंतर कारचालक पळून जात असताना त्याने आणखी काही वाहनांना धडक दिली. मोटारसायकलचालकाने त्याचा पाठलाग केला. त्याला दीप बंगला चौकात अडविले. तेथे लोकांनी त्याला पकडून ठेवून चतु:श्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट करुन पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, हा कारचालक एका हॉटेलमध्ये किचन मॅनेजर आहे. तो दारुच्या नशेत कार चालवत असताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्याची मोटारसायकलला धडक बसली. त्यानंतर त्याने अनेक वाहनांना धडक दिली. परंतु, ही धडक किरकोळ असल्याने कोणीही तक्रार न करता निघून गेले. खाली पडलेल्या मोटार सायकलचालकाने या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यात पळून जाताना त्याने आणखी काही जणांना धडक दिली. दीप बंगला चौकात त्याला लोकांनी पकडले. चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे

समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता येईल अशा बंगल्यांच्या प्राप्तीसाठी मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव

0

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप होताच मंत्र्यांना मंत्रालयातील दालने तसेच निवासासाठी बंगले, फ्लॅट्सचे वाटप केले. काही मंत्र्यांनी मलबार हिल या मुंबईतील महत्त्वाच्या भागातील आलिशान बंगले लाटण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे सुरू केले आहे.मंत्र्यांना दालन, बंगल्यांचे वाटप सामान्य प्रशासन विभागाने करून आदेश काढले असले तरी, त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे दालन, बंगल्यांच्या वाटपाची अंतिम यादी फडणवीस यांच्याकडूनच मंजूर झाली. त्यामुळे मंत्री छुपेपणाने बंगले, दालनांना विरोध करत आहेत. पक्ष कार्यालयासाठी ३ आणि अतिरिक्त २ अशा एकूण ५ बंगल्यांचा वापर होत असल्याने ३१ बंगल्यांमध्ये ३३ कॅबिनेट मंत्र्यांसह ६ राज्यमंत्र्यांना निवासाची सोय करण्याची तारेवरची कसरत सामान्य प्रशासन विभागाकडून केली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आधी रामटेक देण्यात आला होता. रामटेक बंगल्याचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन त्यांनी मला रामटेक नको, असे बजावले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी धावपळ करत त्यांना चित्रकूट बंगला दिला. आता त्याच चित्रकूटसाठी नितेश राणे आग्रही असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेे. हा बंगला कधीकाळी त्यांचे वडील नारायण राणे यांना मिळाला होता. त्यामुळे जुन्या आठवणींमुळे राणेंकडून हा बंगला मिळण्यासाठी जोर लावलेला दिसून येत आहे. याच दरम्यान, बावनकुळे यांनी नाकारलेला रामटेक बंगला पंकजा मुंडे यांनी घेतला. त्यांचे वडिल गोपीनाथ मुंडे १९९५ च्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना याच बंगल्यात राहत होते. त्यामुळे पंकजांनी रामटेक बंगला ताब्यात घेतला आहे.मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेल्या रामटेक बंगल्यात राहणारे मंत्री नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडतात, असे म्हटले जाते. त्यामुळे या आधी काही मंत्र्यांनी वास्तुशास्त्रात दोष असल्याचे कारण दाखवून रामटेकला नाकारले होते. आताही बावनकुळेंनी पंकजा मुंडेंशी बोलून बंगल्यांची अदलाबदल केली. तसे शासन आदेशही काढण्यात आले. पंकजांनी वडिलांची आठवण म्हणून रामटेक बंगला स्वीकारला आहे.

काही माध्यमांच्या माहितीनुसार , वन मंत्री गणेश नाईक यांना ब -४ पवनगड, राज्यमंत्री योगेश कदमांना सुनीती १०, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना सुरुची १५ तर अन्न औषदी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना सुरुची ०९ निवासस्थान देण्यात आलेे. त्यांंनी चांगल्या बंगल्यांसाठी थेट सामान्य प्रशासन विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून दबाव टाकला आहे. मंत्र्यांसाठी सध्या एकूण ३६ बंगले आहेत. त्यापैकी ३ बंगले राष्ट्रवादी अजित पवार, एकनाथ शिंदे शिवसेना तर उद्धवसेना पक्ष कार्यालयासाठी देण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रामटेक बंगला लाभला तो फक्त शरद पवारांना …

शरद पवार : १९७८ मध्ये वसंतदादा मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी रामटेक बंगल्यात बसून वसंतदादांचे सरकार पाडले होते. नंतर ते मुख्यमंत्री झाले.

सन 1995 ला रामटेकमध्ये विलासराव देशमुख वास्तव्यास असतानाच त्यांचा मोठा पराभव झाला.

गोपीनाथ मुंडे : १९९५ मध्ये उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे रामटेकमध्ये राहत असताना त्यांच्यावर एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला. हा आरोप ४ वर्षे मुंडेंचा पिच्छा सोडू शकला नाही. अखेर १९९९ मध्ये मुंडे सत्तेबाहेर गेले.

छगन भुजबळ : १९९९ मध्ये आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच गृह, पर्यटनमंत्र्यांचा भार असलेल्या छगन भुजबळांवर २००३ च्या दरम्यान तेलगी घोटाळ्याचा आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.

एकनाथ खडसे : २०१४ मध्ये एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदासह रामटेक बंगलासुद्धा गमवावा लागला.

दालनांचे वाटप –
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मुख्यमंत्री – मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (पश्चिम बाजू)
एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उप मुख्यमंत्री – मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (उत्तर-पूर्व बाजू), ६वा मजला, पूर्व बाजू (उप मुख्यमंत्री दालन, सभागृह, कार्यालय मुख्य सचिव कार्यालयाकडे जाताना डाव्या बाजूला), ६वा मजला, मुख्य सचिव कार्यालयाकडे जाताना दरवाज्याच्या उजव्या बाजुचे दालन (अगोदरचे प्रतिक्षालय), ६वा मजला पूर्व बाजू ब्रीजवरील पॅसेज (टपाल कक्ष), ७ वा मजला, दालन क्र.७१७ मधील वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाजूचा जनसंपर्क कक्ष/कार्यक्रम कक्ष
अजित आशाताई अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री – मंत्रालय मुख्य इमारत, ६ वा मजला (उत्तर बाजू). ७ वा मजला (पूर्व बाजू)- दालन क्र.७१७ मधील निधी कक्षाच्या दालनातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर येणारा कक्ष, दालन क्र.७२२,७२३. ५वा मजला, दालन क्र. ५०३ (उत्तर बाजू)
चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे – दालन क्र. १०१, १०१ (अ), १०१ (व), १०४ ते १०८ १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
गिरीश गोता दत्तात्रय महाजन – दालन क्र. ६०५, ६०७ व ६०९ ६ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक – दालन क्र. ५३६, ५३८,५४० ५ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील दालन क्र. ४०२, (मध्य बाजू), ४ था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
दादाजी रेश्माबाई दगडू भुसे दालन क्र. ७००, ७०१ ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
संजय प्रमीला दुलिचंद राठोड दालन क्र. १०२ (मध्य बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे दालन क्र. २०१, २०२, २०४, २१२ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा दालन क्र. २०२, (मध्य बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
उदय स्वरुपा रवींद्र सामंत दालन क्र. १०१ (दक्षिण बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल दालन क्र. ४०७, ४था मजला, मंत्रालय विस्तार इमारत
पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे दालन क्र. ४०३ (उत्तर बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
अतुल लिलावती मोरेश्वर सावे दालन क्र. ५०१ (दक्षिण बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
अशोक जनाबाई रामाजी उईके दालन क्र. ५०२ (मध्य बाजू) ५वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई दालन क्र. ३०२ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
आशिष मिनल बाबाजी शेलार दालन क्र. ४०१ (दक्षिण बाजू) ४था मजला, मंत्रालय मुख्य इमारत
दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे दालन क्र. ३०१ (मध्य बाजू) ३रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
आदिती वरदा सुनिल तटकरे दालन क्र. १०३ (उत्तर बाजू) १ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत
शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले दालन क्र. ६०१, ६०२, ६०४ ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे दालन क्र. २०३ (उत्तर बाजू) २रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
जयकुमार कमल भगवानराव गोरे पोटमाळा (१), मंत्रालय मुख्य इमारत
नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ दालन क्र. २०१ (दक्षिण बाजू) २ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
संजय सुशिला वामन सावकारे दालन क्र. ३०३ (उत्तर बाजू) ३ रा मजला, मंत्रालय मुख्य इमारत
संजय शंकुतला पांडूरंग शिरसाट दालन क्र. ७०३, ७०४, ७०४ (अ), ७१० ७ वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
भरत विठाबाई मारुती गोगावले दालन क्र. ३१४, ३१६, ३१८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) दालन क्र. ३३६, ३३८ ३ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
नितेश निलम नारायण राणे पोटमाळा (२), मंत्रालय मुख्य इमारत
बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील – दालन क्र. ५०१, ५०२ ५वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर – दालन क्र. २२७ (मुख्य व विस्तार इमारतीसजोडणारा ब्रिज), २३१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
राज्यमंत्री-
आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल – दालन क्र. ६२६ ते ६२८ (मुख्य व विस्तार इमारतीस जोडणारा ब्रिज), ६वा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
माधुरी मीरा सतिश मिसाळ दालन क्र. १३८ व १४० १ ला मजला, मंत्रालय विस्तार इमारत
डॉ. पंकज कांचन राजेश भोयर दालन क्र. २३७ व २४१ २ रा मजला, मंत्रालय विस्तार इमारत
मेघना दिपक साकोरे-बोडीकर – विधान भवन दालन क्र. १२५ व १३०, ए व सी, तात्पुरती व्यवस्था
इंद्रनिल अनिता मनोहर नाईक – विधान भवन दालन क्र. १२३ व १२४, तात्पुरती व्यवस्था
योगेश ज्योती रामदास कदम – विधान भवन दालन क्र. ११७ व १२२, तात्पुरती व्यवस्था

मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

पुणे, दि. २४: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या तामिळनाडू किंवा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आपल्या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून गतीने पाठपुरावा करावा.

ते पुढे म्हणाले, दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुणे येथे घेण्यात येईल. त्यासाठी विभागाने तयारी करावी. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेल्लनात मराठी भाषेसाठी एक तास राखून त्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषा जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी दिले. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करुन मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव करावेत. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील नामांकित लेखकांची नावांची यादी करावी, त्याचप्रमाणे कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे. शासनाच्या सर्व विभागांच्या प्रदर्शनात मराठी भाषा विभागाचे दालन असले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मराठी भाषेला अभिजात मिळाल्याचे महत्त्व तसेच त्यामुळे होणारे लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या सर्व संस्था, मंडळ, संचालनालयांना चांगली जागा मिळण्यासाठी प्रस्ताव करावेत, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील- उद्योगमंत्री

पुणे, दि. २४: उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, तळवडे आदी ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, पीएमआरडीए च्या माण – म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकातील टपऱ्या पोलीस विभागाच्या सहकार्याने हटवाव्यात. उद्योगांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. एमआयडीसीने दोन्ही महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून तेथे उद्योगांसाठी येणाऱ्या ट्रक आदी वाहनांचे पार्किंगसाठी प्रयत्न करावेत.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क उद्योगांना परवडेल अशा पद्धतीने त्यांचेशी समन्वय साधून वाढविण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एनएचएआय, जिल्हा परिषद आदी सर्व संबंधित विभागांनी उद्योगांच्या समस्या समन्वयाने सोडवाव्यात.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. 3 येथील पोलीस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलीस विभागास देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही प्रकल्प, लक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाण्याची वाहिनी तसेच बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम आदींच्या अनुषंगाने विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली.

निवडणुका जाहीर होण्याआधीच पुणे महापालिकेचे विभाजन हा प्राधान्याचा विषय-मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे-साधारण १ ते १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागलेले असेल. त्यांच्यापुढचा प्राधान्याचा विषय पुणे महापालिकेचे विभाजन हाच असेल. त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

श्रमिक पत्रकार संघाने पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचे पत्रकारांबरोबर वार्तालापाचे आयोजन मंगळवारी सकाळी पत्रकार संघात केले होते. पाटील यांच्यासमवेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, बापू पठारे, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. हेमंत रासणे व सुनील कांबळे या आमदारांनी कामामुळे शहराबाहेर असल्याने उपस्थित राहता येणार नाही, असे कळविले होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आमदारांचे स्वागत केले. पुण्यातील वाहतूक, पाणी, गुन्हेगारी, नव्याने सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या अडचणी, अशा अनेकविध समस्यांना स्पर्श करत आमदारांनी त्यावर काय कामकाज सुरू आहे याची माहितीही दिली. मेट्रोचे जाळे वाढविण्यात भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, महापालिकेची निवडणूकच नसल्याने नगरसेवक व नागरिक यांच्यात संवाद राहिला नाही. आमदारांची नसलेली कामे आमदारांना करावी लागत आहेत. मात्र, आता सरकार लवकरच कामकाजाला लागेल. त्यानंतर काही विषय प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. त्यात हाही विषय आहे. मेट्रो, नदी सुधार, ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, असे विषय आमदारांशी संबंधित असतात. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मुळशी धरणाबाबत सरकार व टाटा कंपनी यांच्यात बोलणी सुरू आहे. आता धरणातून वीज तयार होत नाही. त्यामुळे ‘धरणच ताब्यात द्या’ अशी आमची मागणी आहे. तसे झाले तर पुण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेतली तरीही सुटू शकेल.

महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. नावांचा प्रश्न अशा वेळी अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यातही पुणे नावाला इतिहास आहे. त्यामुळे पुणे नावाचा समावेश असलाच पाहिजे, याबाबत सगळेच आग्रही असणार. अशा अनेक गोष्टींचा साधकबाधक चर्चा झाल्यानंतरच महापालिकेच्या विभाजनाचा निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.

पुणे शहराच्या समस्या हा विषय असला तरी राजकीय प्रश्न येणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना पुण्याचा दादा कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हा जटिल प्रश्न आहे, असे उत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोके सुपीक आहे. २३७ इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच आमदार आहेत, त्यांनी बरोबर मंत्रिमंडळ तयार केले. आता हाही प्रश्न ते समाधानकारक पद्धतीने निकाली काढतील, असे पाटील म्हणाले.

वाहतुकीच्या कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. त्यासाठीच मी येत्या ५ वर्षांत स्वारगेट ते खडकवासला या मेट्रोसाठी प्रयत्नशील आहे. नागरिक किंवा पत्रकार तक्रारी सांगतात, काही विषय समोर आणतात, त्याचा कधी राग येत नाही. कामाला संधी यादृष्टीने आम्ही त्याकडे पाहात असतो. त्या कामांचा पाठपुरावा केली की कामे मार्गी लागतात, असा माझा अनुभव आहे. -भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला

मतदारसंघातील बसस्थानकाचा प्रश्न कालच आम्ही सोडवला आहे. तसेच वाहतूक प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी नगरविकास मंत्री आता पुण्याचे आहेत, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवू. रिंगरोड होणार आहे, तो लवकर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोमुळे देखील वाहतुकीवरील बराचसा ताण कमी होऊ लागला आहे.- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुण्याचा विस्तार प्रचंड होत आहे. तो कुठेतरी मर्यादित करायला हवा. पुणे वाढत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिंगरोडच्या बाहेर पुण्याची हद्द वाढणार नाही, असे काही धोरण करायला हवे. आपण ठोस भूमिका घेतली नाही तर पुणे वाढतच राहील. बिल्डर बांधकामे करतात, पण पाण्याची समस्या मात्र पाहिली जात नाही. वाहतूक हा एक गहन प्रश्न आहे. त्यावर काम करणे अपेक्षित आहे. रिंगरोडला जोडणारे रस्ते बनवणे गरजेचे आहे. – आमदार बापू पठारे


पुण्याचा झपाट्याने होणारा विकास आपण पाहतोय. त्यासाठी आपण भविष्यासाठी योग्य नियोजन करत आहोत. आपल्याकडे त्याचा आराखडा आहे. मेट्रो केली आहे, रिंगरोड करत आहोत. त्यामुळे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. पुण्याचा विकास २०५० पर्यंत नियोजनबद्ध झालेला असेल. समाविष्ट गावांचाही प्रश्न असून, तेथेही योग्य पायाभूत सुविधा उभ्या करणार आहोत. – नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ

वाहतुकीच्या समस्येवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढविणे हा उपाय आहे. आमचे त्याकडे लक्ष आहे. पाणी समस्येवर आधी महापालिकेने वितरणातील गळती थांबविणे आहे. वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी नागरी सुविधा तयार करणे, त्यांची कार्यक्षमता राखणे, या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे. ते व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. – चेतन तुपे, आमदार, हडपसर