Home Blog Page 721

उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील- उद्योगमंत्री

पुणे, दि. २४: उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, तळवडे आदी ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, पीएमआरडीए च्या माण – म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकातील टपऱ्या पोलीस विभागाच्या सहकार्याने हटवाव्यात. उद्योगांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. एमआयडीसीने दोन्ही महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून तेथे उद्योगांसाठी येणाऱ्या ट्रक आदी वाहनांचे पार्किंगसाठी प्रयत्न करावेत.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क उद्योगांना परवडेल अशा पद्धतीने त्यांचेशी समन्वय साधून वाढविण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एनएचएआय, जिल्हा परिषद आदी सर्व संबंधित विभागांनी उद्योगांच्या समस्या समन्वयाने सोडवाव्यात.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. 3 येथील पोलीस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलीस विभागास देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही प्रकल्प, लक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाण्याची वाहिनी तसेच बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम आदींच्या अनुषंगाने विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली.

निवडणुका जाहीर होण्याआधीच पुणे महापालिकेचे विभाजन हा प्राधान्याचा विषय-मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे-साधारण १ ते १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागलेले असेल. त्यांच्यापुढचा प्राधान्याचा विषय पुणे महापालिकेचे विभाजन हाच असेल. त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

श्रमिक पत्रकार संघाने पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचे पत्रकारांबरोबर वार्तालापाचे आयोजन मंगळवारी सकाळी पत्रकार संघात केले होते. पाटील यांच्यासमवेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, बापू पठारे, सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. हेमंत रासणे व सुनील कांबळे या आमदारांनी कामामुळे शहराबाहेर असल्याने उपस्थित राहता येणार नाही, असे कळविले होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आमदारांचे स्वागत केले. पुण्यातील वाहतूक, पाणी, गुन्हेगारी, नव्याने सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या अडचणी, अशा अनेकविध समस्यांना स्पर्श करत आमदारांनी त्यावर काय कामकाज सुरू आहे याची माहितीही दिली. मेट्रोचे जाळे वाढविण्यात भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, महापालिकेची निवडणूकच नसल्याने नगरसेवक व नागरिक यांच्यात संवाद राहिला नाही. आमदारांची नसलेली कामे आमदारांना करावी लागत आहेत. मात्र, आता सरकार लवकरच कामकाजाला लागेल. त्यानंतर काही विषय प्राधान्याने घेण्यात येणार आहेत. त्यात हाही विषय आहे. मेट्रो, नदी सुधार, ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प, असे विषय आमदारांशी संबंधित असतात. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मुळशी धरणाबाबत सरकार व टाटा कंपनी यांच्यात बोलणी सुरू आहे. आता धरणातून वीज तयार होत नाही. त्यामुळे ‘धरणच ताब्यात द्या’ अशी आमची मागणी आहे. तसे झाले तर पुण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेतली तरीही सुटू शकेल.

महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. नावांचा प्रश्न अशा वेळी अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यातही पुणे नावाला इतिहास आहे. त्यामुळे पुणे नावाचा समावेश असलाच पाहिजे, याबाबत सगळेच आग्रही असणार. अशा अनेक गोष्टींचा साधकबाधक चर्चा झाल्यानंतरच महापालिकेच्या विभाजनाचा निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले.

पुणे शहराच्या समस्या हा विषय असला तरी राजकीय प्रश्न येणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना पुण्याचा दादा कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हा जटिल प्रश्न आहे, असे उत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोके सुपीक आहे. २३७ इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच आमदार आहेत, त्यांनी बरोबर मंत्रिमंडळ तयार केले. आता हाही प्रश्न ते समाधानकारक पद्धतीने निकाली काढतील, असे पाटील म्हणाले.

वाहतुकीच्या कोंडीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. त्यासाठीच मी येत्या ५ वर्षांत स्वारगेट ते खडकवासला या मेट्रोसाठी प्रयत्नशील आहे. नागरिक किंवा पत्रकार तक्रारी सांगतात, काही विषय समोर आणतात, त्याचा कधी राग येत नाही. कामाला संधी यादृष्टीने आम्ही त्याकडे पाहात असतो. त्या कामांचा पाठपुरावा केली की कामे मार्गी लागतात, असा माझा अनुभव आहे. -भीमराव तापकीर, आमदार, खडकवासला

मतदारसंघातील बसस्थानकाचा प्रश्न कालच आम्ही सोडवला आहे. तसेच वाहतूक प्रश्न गंभीर होत आहे. त्यासाठी नगरविकास मंत्री आता पुण्याचे आहेत, त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवू. रिंगरोड होणार आहे, तो लवकर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोमुळे देखील वाहतुकीवरील बराचसा ताण कमी होऊ लागला आहे.- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुण्याचा विस्तार प्रचंड होत आहे. तो कुठेतरी मर्यादित करायला हवा. पुणे वाढत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रिंगरोडच्या बाहेर पुण्याची हद्द वाढणार नाही, असे काही धोरण करायला हवे. आपण ठोस भूमिका घेतली नाही तर पुणे वाढतच राहील. बिल्डर बांधकामे करतात, पण पाण्याची समस्या मात्र पाहिली जात नाही. वाहतूक हा एक गहन प्रश्न आहे. त्यावर काम करणे अपेक्षित आहे. रिंगरोडला जोडणारे रस्ते बनवणे गरजेचे आहे. – आमदार बापू पठारे


पुण्याचा झपाट्याने होणारा विकास आपण पाहतोय. त्यासाठी आपण भविष्यासाठी योग्य नियोजन करत आहोत. आपल्याकडे त्याचा आराखडा आहे. मेट्रो केली आहे, रिंगरोड करत आहोत. त्यामुळे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. पुण्याचा विकास २०५० पर्यंत नियोजनबद्ध झालेला असेल. समाविष्ट गावांचाही प्रश्न असून, तेथेही योग्य पायाभूत सुविधा उभ्या करणार आहोत. – नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ

वाहतुकीच्या समस्येवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढविणे हा उपाय आहे. आमचे त्याकडे लक्ष आहे. पाणी समस्येवर आधी महापालिकेने वितरणातील गळती थांबविणे आहे. वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी नागरी सुविधा तयार करणे, त्यांची कार्यक्षमता राखणे, या दृष्टीने काम होणे गरजेचे आहे. ते व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. – चेतन तुपे, आमदार, हडपसर

१५ वर्षे झाली ..३ इडियट्सची जादू कायमच …

  ३ इडियट्स ह्या चित्रपटात रॅंचो, फरहान आणि राजू या इंजिनियरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची गोष्ट होती. इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी त्यांच्या मनावर सतत असलेला तणाव, समाजाच्या, कुटुंबाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण या चित्रपटात बघायला मिळाले होते. २५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊन १५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा साजरा करण्यासाठी सोनी मॅक्सवर हा चित्रपट आणि त्यातील कलाकारांचे शॉट प्रसारित करण्यात येणार आहेत. चला, या चित्रपटाच्या आठवणींची एक सैर करू या आणि हा चित्रपट तयार होत असतानाच्या गंमतीजमती पुन्हा शेअर करू या.

पात्रांसाठी योग्य अभिनेत्यांची निवड!

राजकुमार हिरानी यांनी जेव्हा आमीर खानला पाहिले, तेव्हा ‘गजनी’ चित्रपटातला तो पिळदार शरीराचा आमीर होता. त्यांच्या कल्पनेत जो एक इडियट होता, तसा अमीर दिसू शकेल का याबाबत हिरानी साशंक होते. ते म्हणतात, “मला एक बारकासा, मोठ्या डोळ्यांचा मुलगा हवा होता, जो थोडा खुळचट असेल आणि स्वतःच्या स्वतंत्र विचाराने वागणारा असेल!” हिरानी यांना विश्वास होता की, आमीर या पात्रासाठी अनुरूप ते बदल स्वतःच्या शरीरयष्टीत करण्यास समर्थ आहे. या चित्रपटात आमीरने रॅंचोची भूमिका केली होती, ज्याचे वय आमीरच्या वयाच्या अर्ध्याहूनही कमी होते. त्यामुळे त्याला तरुण दाखवणे हे सगळ्यात मोठे आव्हान होते. आमीरने जिममध्ये जाणे थांबवले आणि असा आहार तो घेऊ लागला, ज्याच्यामुळे मसल्स कमी होतील.

ती व्यक्तिरेखा अस्सल दिसावी यासाठी आमीरला त्यावर खूप काम करावे लागले. तो म्हणतो, “मला वाटले की, त्याचे कपडे विकत घेण्याऐवजी ते कुणाकडून तरी घ्यावेत. जुने कपडे सहजपणे पोक्त दिसतात.” तो पुढे म्हणतो, “रॅंचोच्या भूमिकेत मी जे कपडे घातले ते मोठ्या मापाचे होते, आणि त्याने माझे काम साधले. माझ्या जीन्स ३-४ साईझ मोठ्या होत्या. टी-शर्ट देखील अगदी ढगळ होते. मी विशिष्ट प्रकारे उभे राहण्याची लकब घेतली होती, ज्यामुळे मी थोडा लहान दिसायचो. मी लहान आणि पोरगेलासा दिसू लागलो. त्यामुळे शेवटी योग्य त्या वयाचा मी दिसू शकलो.”

तोहफा कबूल करो!

आर. माधवन म्हणजे फरहानने सांगितले की, पहिल्या दिवसाचे शूटिंग बंगळूरात होते आणि तेही मुलींच्या वसती गृहात. जे दृश्य शूट व्हायचे होते, ते म्हणजे, तो प्रसिद्ध संवाद ‘जहापनाह तुस्सी ग्रेट हो, तोहफा कबूल करो!” या दृश्यात अभिनेत्यांना आपल्या पॅन्ट खाली उतरवायच्या होत्या आणि सगळ्यांसमोर अंडरवेअरमध्ये यायचे होते! माधवन म्हणतो, “म्हणजे, तुम्ही हीरोसारखे वावरता, सगळ्यांना स्वाक्षरी देता आणि दुसऱ्याच क्षणी ते सगळे काही अगदी पार बदलून जाते. जेव्हा शॉट तयार झाला, तेव्हा आम्ही सगळे पॅन्ट काढण्यास कसेबसे तयार होतो! हा सीन बघायला खूप रोचक असला तरी आम्ही मात्र तो करताना खूप अवघडलो होतो.”

खोडकर आमीर खान

करीना कपूरला जेव्हा विचारण्यात आले की तिला स्कूटर चालवता येते का, तेव्हा ती उडालीच! ती तर आमीर खानच्या मागे स्कूटरवर बसायला देखील घाबरत होती. त्या दृश्याची आठवण काढत करीना म्हणते, “माझ्या बाबतीत दोनदा असे झाले आहे की, मी एका अभिनेत्याच्या मागे बाइकवर बसले आणि पडले! त्यामुळे यावेळी हॅट्रिक होणार अशीच भीती माझ्या मनात होती.” बेबोची ही भीती मुख्यतः तिच्या भूतकाळातल्या अनुभवांमुळे असली, तरी आमीरनेही त्यात भर घातली होती. आमीर खान म्हणतो, “करीनाला असे सांगण्यात आले होते की, मला स्कूटर चालवता येत नाही. त्यामुळे जेव्हा ती माझ्या मागे बसायची, तेव्हा तिला वाटायचे की ही आपली शेवटची राइड असणार” आमीर खान हसत हसत पुढे सांगतो, “मी तिला सांगितले की मला स्कूटर चालवता येत नाही. जेव्हा जेव्हा मी स्कूटर चालवतो, तेव्हा पडतोच! त्यामुळे माझ्यामागे स्कूटरवर बसायला ती भलतीच घाबरायची!”

हा चित्रपट पुन्हा एकदा हसू, आसू आणि एक सुंदर, मौलिक संदेश, मैत्रीचे नाते, आपल्या पॅशनचा पाठपुरावा करण्याचा आग्रह घेऊन छोट्या पडद्यावर येत आहे.

 इडियट्सची जादू अनुभवण्यासाठी आणि या कालजयी मास्टरपीसच्या १५ वर्षांचा प्रवास साजरा करण्यासाठी बघासोनी मॅक्स२५ डिसेंबर रोजी

कष्टांची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे-अमनोरा येस फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे 

अमनोरा येस फाउंडेशन आणि अमनोरा सिटीझन सोशल वाॅरियर्स अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट विद्या’ ची वर्षापूर्ती
पुणे : आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिला इतरांच्या घरातील धुणी भांडी करणे, त्यांच्या मुलांना सांभाळणे हे मोठे आव्हानात्मक, कष्टाचे काम करतात. तुम्ही करत असलेल्या या कष्टाचे चीज करायचे असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही करत असलेल्या काबाडकष्टाची जाणीव करून देणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांचे उज्वल भविष्य घडणार नाही, असे मत अमनोरा येस फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.

अमनोरा टाउनशिप मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी अमनोरा येस फाऊंडेशनच्या वतीने आणि अमनोरा सिटीझन सोशल वाॅरियर्स अंतर्गत  ‘प्रोजेक्ट विद्या’ हा उपक्रम राबविण्यात येतो, या प्रोजेक्टच्या वर्षपूर्ती निमित्त त्या मुलांसाठी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात देशपांडे बोलत होते. यावेळी अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, पदाधिकारी, अमनोरा मधील रहिवासी उपस्थित होते. 

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, अमनोरा टाऊनशिप मध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना अवंतिका असे संबोधले जाते. प्रोजेक्ट विद्या अंतर्गत फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्पोकन इंग्लिश, पुणे दर्शन सह अन्य उपक्रमात मुलांचा सहभाग आमचा उत्साह वाढवणारा आहे. आज या विशेष कार्यक्रमात ४० हून अधिक मुलं – मुली आपली कला सादर करत आहेत आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी ही संख्या शंभर पर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही फाउंडेशनच्या वतीने मुलांना मदत म्हणून नव्हे  राष्ट्रासाठी गुंतवणूक या भावनेतून आर्थिक, शैक्षणिक मदत करतो असेही देशपांडे यांनी नमूद केले.

या महिलांच्या मदतीने टाउनशिप मध्ये पाणी बचत मोहीम राबविण्यात येत असून त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळत असल्याचे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले. या पाणी बचतीच्या माध्यमातून आमच्या अवंतिका लाखों कार्बन फुटप्रिंट कमी करत असल्याचे नमूद करताना प्रती व्यक्ती किमान २५ लीटर पाणी वाचवण्यात यश येत असल्याचे सांगितले. या महिला करत असलेल्या जन जागृतीमुळे आम्ही टँकर मागवत नाही. पाणी बचती मुळे वीजवापर कमी झाला आहे. यामुळे पाणी बचत हा उपक्रम संपूर्ण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अमनोरा सिटीजन सोशल वॉरियर्स ही संस्था अमनोरा मधील नागरिकांनी स्थापन केली आहे. या मार्फत अवंतिकांच्या मुलांना इंग्रजी, गणित आणि विज्ञान असे विषय त्याच बरोबर विविध कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगला बदल दिसून येत आहे. वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ग्लोबल वॉर्मिंग, पाणीबचत, वाहतूक शिस्त, सोशल मीडियाचा अतिवापर, राष्ट्रप्रेम या विषयावर मुलांनी सादरीकरण केले.

प्रोजेक्ट विद्या या उपक्रमामध्ये शशी अग्रवाल, सपना अग्रवाल, स्वाती प्रदीप, हर्षा गाजरे, कनिका शर्मा, स्वाती पेंडकर, योगिनी पटवारे, कल्पना सैंदाणे या नागरिकांनी वेगवेगळ्या विषयांचे वर्ग घेतले.

आमदार बापूसाहेब पठारे यांची पालिका अधिकाऱ्यांसमवेत रस्ते पाहणी

खराडीत आयटी पार्क असल्यामुळे दररोज ३ ते ४ लाख नागरिक कामासाठी येतात. सध्या अस्तित्वात असलेले रस्ते पुरेसे नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. भविष्यात होणाऱ्या आयटी पार्क कंपन्या व कंपन्यांमध्ये येणाऱ्या नोकरदारांसाठी सोयीस्कर असणारे प्रामुख्याने हे चार रस्ते पूर्ण केल्यानंतर खराडीतील तसेच पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.सकाळी झालेल्या पाहणी नंतर पठारे यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन पथविभाग उपायुक्त अनिरूद्ध पावस्कर यांचीही भेट घेतली. भेटीदरम्यान, रस्त्यांच्या पाहणीसंदर्भातील मुद्दे स्पष्ट करत पुढील कार्यवाही सुरू करण्यासंबंधी पावले उचलावीत, असे सांगितले.

वडगावशेरी: “आमच्या मतदारसंघाचा रस्ते हाही एक मूलभूत प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झाले असून, रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्ते चांगले असतील तरच विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी माझी धारणा आहे. पाहणीदरम्यान, अधिकारी वर्गाला रस्त्यांच्या विविध कामांसंबंधी सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काळात मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न आणि सोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला असेल, असे यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

काल (ता. २४) सकाळच्या वेळी, पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता दांगड साहेब, कार्यकारी अभियंता धारव साहेब तसेच पथविभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांसमवेत पठारे यांनी रस्त्यांची पाहणी केली. यात प्रामुख्याने, यात सातववस्ती येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळील अर्धवट रस्ता, चौधरी वस्ती येथील रस्ता, चौधरी वस्तीच्या पाठीमागील गोडाऊन येथील रस्ता व पूल, फॉरेस्ट काउंटी गेट क्र. ०३ येथील रस्ता, फॉरेस्ट काउंटी गेट क्र. ०८ येथील फुटपाथ, सर्व्हे क्र. ५६ नवीन भाजी मार्केट येथील रस्ता इ. रस्त्यांचा समावेश होता.

पाहणीदरम्यान, आमदार बापूसाहेब पठारे यांनी सदर रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंबंधी सूचना केल्या. पालिका अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यातील रस्ते एक ते दीड महिन्यात चालू करतील, असे आश्वासन यावेळी कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांनी दिले. तसे न झाल्यास, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली जाई, असे अधीक्षक अभियंता यांनी यावेळी स्पष्ट केले.


अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा समतोल जीवन सुसह्य करेल-जया किशोरी

पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरीजी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. अध्यात्म आणि प्रेरणादायी वक्तृत्व क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यात आयोजित सोहळ्यात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते जया किशोरी यांना सन्मानचिन्ह, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थीर्नींनी बनविलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराचा नम्रपणे स्वीकार करत जया किशोरी म्हणाल्या, “पंचवीस वर्षांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या ‘सूर्यदत्त’ संस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार अभिमानास्पद आहे. विविध ज्ञानशाखांसोबत विद्यार्थ्यांना येथे सर्वांगीण शिक्षण दिले जातेय, हे महत्वाचे आहे. आज युवकांना आध्यत्मिकतेची सर्वात जास्त गरज आहे. भौतिकवादी जगण्याला अध्यात्मिकतेची जोड दिली, तर जीवन अधिक सुसह्य होईल. शिकत राहणे हा परिवर्तनाचा नियम आहे आणि हे मूल्य सूर्यदत्त संस्थेत रुजवले जाते, याचा आनंद वाटतो.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “जया किशोरी या एक भारतीय आध्यात्मिक वक्त्या, गायिका, प्रेरक वक्त्या, जीवन प्रशिक्षक आणि सामाजिक सुधारणावादी नेत्या आहेत. त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि भावपूर्ण भजनांसाठी लाखो भक्तगण आसुसलेले असतात. ‘किशोरीजी’ आणि ‘आधुनिक युगातील मीरा’ म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा या महान व्यक्तीचा सन्मान करताना सूर्यदत्त परिवाराला आनंद होत आहे. त्यांच्या आदर्श कार्यातून ‘सूर्यदत्त’मधील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”
आपल्या उत्कृष्ट कार्यातून समाजात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. उत्कृष्टता हे ‘सूर्यदत्त’चे वैशिष्ट्य असून, गेल्या अडीच दशकांच्या प्रवासात ‘सूर्यदत्त’ने २००३ पासून हा पुरस्कार सुरु केला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात परिवर्तनवादी अमूल्य योगदाना देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना आजवर सन्मानित करून विद्यार्थी, पालक आणि समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यामागे आहे.
पद्मभूषण पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंजन, योगाचार्य पद्मभूषण डॉ. बीकेएस अय्यंगार, प्रख्यात अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर, पद्मभूषण शिव नाडर, माजी पोलीस अधिकारी किरण बेदी, पद्मविभूषण मोहन धारिया, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आध्यात्मिक आणि प्रेरक वक्ते गौर गोपाल दास यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरवान्वित केले आहे, असे स्नेहल नवलखा यांनी नमूद केले.

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

0

मुंबई- काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार, अशी माहिती दिली होती. त्यानंतर योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेत वाढ करुन 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे आता सहावा हप्ता 2100 रुपये येणार की 1500 रुपये येणार, अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती. दरम्यान, आता सहावा हप्ता हा 1500 रुपये प्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे.

या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. तर निवडणुकीआधी आलेल्या 25 लाख नवीन अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सांगितले होते. त्यानुसार राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा मिळू शकेल, अशी स्थिती आहे. दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प हा 3 मार्च 2025 रोजी सादर करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, लाडक्या बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्या जमा करण्यात आली आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

राजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा साजरा

 श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या तर्फे आयोजन ; किल्ले राजगड येथे ४४ वा दुर्ग राजगड उत्सव
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय…च्या जयघोषात किल्ले राजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा थाटात साजरा झाला. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या तर्फे किल्ले राजगड येथे ४४ वा दुर्ग राजगड उत्सव आयोजित करण्यात आला होता. 
किल्ले राजगड आणि पाल खु. येथील खंडोबाचा माळ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध शेत्रातील मान्यवर , वक्ते , इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खंडोबाचा माळ येथे शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मर्दानी खेळ व ढोल ताश्यांच्या गजरात कार्यक्रमास सुरवात झाली. शिव व्याख्याते प्रा.विनायक खोत यांचे शिव व्याख्यान देखील झाले. 
राजगडावरील पद्मावती मंदिरात जागरण-गोंधळ घालून गड जागरणाचा कार्यक्रम करण्यात आला. किल्ले राजगडावर पद्मावती देवीचे पूजन करून वंश परंपरेने किल्लेदार सुर्यकांत भोसले व १३ मी.४८ सेकंद वेळेत किल्ल्यावर येणारे सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ढोल ताश्याच्या गजरात पालखीचे आगमन झाले. पाली दरवाजा येथे निवेदीता पायगुडे, शितल पासलकर, दिपाली कारळे, निलम कुंजीर, पुनम पायगुडे, वैशाली कुऱ्हाडे, जया राऊत आदी महिलांनी पालखीचे पूजन केले. 


पारंपारिक पोशाखातील मावळे व महिला सहभागी झाले होते. जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणा देत पालखी सोहळा सदरेवर आला. तेथे पालखी थोडा वेळ आसनस्थ झाली. व या नंतर पद्मावती मातेच्या मंदिरात देवीला साडी चोळी देऊन पूजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, रणजीत पठारे, नितीन चव्हाण, राहुल पायगुडे, संजय दापोडीकर, सुनील वालागुडे, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सतीश सोरटे, नरेंद्र मुजुमदार,पांडुरंग दर्डीगे , शिवाजी पोळेकर, नाना शिर्के, करण भोसले, योगेश दर्डीगे , प्रकाश भोसले,अमित दारवटकर, समीर रुपदे, योगेंद्र भालेराव, मंगेश राव, अमोल व्यवहारे, अभिजित पायगुडे, पांडुरंग मोरे, वीरेंद्र ठाकूर, शशी रसाळ, निलेश बारावकर, प्रशांत पायगुडे, निखिलेश ठाकूर, विवेक नाकोड, गुरुदत्त भागवत, संजय शेंडकर, सुनील तोंडे, महेश कदम, राम कदम, गोविंद राऊत  आदी सहभागी झाले होते.  

पाल खु. राजगड परिसर सर्व ग्रामपंचायत व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन संचालक पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य व सहाय्यक संचालक (पुरातत्व) पुणे विभाग यांचे विशेष सहकार्यातून हा उत्सव पार पडला.   

लहान वयातील संस्कारांतून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडते- लेखक आनंद माडगूळकर

ग्रंथ पारायण दिंडी, पुणेच्या वतीने तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती कृतज्ञता सोहळा
पुणे : लहानपणी लागलेल्या चांगल्या सवयी नेटाने पुढे चालवल्या तर त्याचे परिणाम भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरतात. मुलांमध्ये चांगल्या सवयी रुजवण्यासाठी पालकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा प्रभाव मोठे झाल्यानंतरही जाणवतो. लहान वयात झालेल्या संस्कारांवर मुलांचे भविष्य अवलंबून असते, असे मत ज्येष्ठ लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केले.

ग्रंथ पारायण दिंडी, पुणेच्या वतीने तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी साताऱ्यातील समर्थ सेवा सज्जनगडचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, जनता सहकारी बँकेचे संचालक अभय माटे, ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आशिष केसकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या गीतरामायणाच्या सादरीकरणाचा अनुभव कथन केला.

योगेशबुवा रामदासी म्हणाले, कोणतेही कार्य आपण स्वतः करत नाही; भगवंत ते आपल्याकडून करवून घेतो. इतक्या लहान वयात अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या चरणी गीतरामायणाचे सादरीकरण करण्याची संधी या चिमुकल्यांना परमेश्वराने दिली आहे. आज अनेक मुलांना रामरक्षा स्तोत्र काय आहे हेही माहिती नाही. काळाच्या ओघात हे मागे पडत आहे. मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल.

वीरेंद्र कुंटे यांनी सांगितले की, पुण्यातील बालचमूंनी भव्य रामरक्षा पठण व गीतरामायणाचे सादरीकरण अयोध्या राम मंदिरात केले. तब्बल तेरा लक्ष रामरक्षा स्तोत्र पठणाचा संकल्प पूर्ण झाला. या संकल्प पूर्तीनंतर जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले.

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत 

दोन सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबई, दिनांक २४  डिसेंबर २०२४: राज्यभरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंतर्गत ठिकठिकाणी १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. 

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर – सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. पंपांना वीज पुरवठा करणारे सर्व कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० अंतर्गत काम सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर चालविण्यात येतील.

या कार्यक्रमाला उंबर्डा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील उंबर्डा येतील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट आहे. या प्रकल्पामुळे १७११ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा आहे. एकूण ८४५ शेतकरी या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. वाशिम आणि धाराशीव जिल्ह्यातील एक – एक सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प यापूर्वीच सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतील पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत राज्यात नोव्हेंबर अखेर १५,७०८ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६६९ मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यामधून १,३०,४८६ शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

राज्यात शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा आणि रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी अनेक दशकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत राज्यभरात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून विकेंद्रीत स्वरुपात कृषी फीडर्सना विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल तसेच या योजनेत किफायतशीर दरात वीज मिळाल्यामुळे राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होईल.

ओढे-नाले व कालव्यांवरील पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडीट’

पुणे : शहराच्या विविध भागातील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधलेले आहेत. मात्र पुलांची संख्या किती आहे, याची कोणतीही माहिती अद्याप महापालिकेकडे नाही. त्यामुळे आता यापुलांची माहिती घेतली जाणार असून ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ केले जाणार आहे.महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, “ओढे-नाले व कालव्यांवरील पुल सध्या सुरु आहेत. मात्र, या पुलांचे नेमकी काय स्थिती आहे, हे जाणुन घेणे गरजेचे आहे. त्यातुन पुलाची डागडुजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळणे शक्‍य होईल. त्यादृष्टीने या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याचे काम केले जाणार आहे.’

शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. यावर पुल बांधण्यात आले आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाचे सध्या तरी कोणतेही लक्ष नाही. ओढ्यांवर स्लॅब टाकून पूल तयार करण्यात आलेले आहेत. हे पुल आता जुने आणि धोकादायक झाले आहेत. शहरात वाहतूक कोंडीची समस्येने नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे गल्लीबोलातील रस्त्यावरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. या छोट्या पुलांवरुन वाहतूक होत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी पुलांची पाहणी केली जाणार असून स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाणार आहे.

याबरोबरच मुठा डावा कालवा देखील शहरातुन ग्रामीण भागामध्ये जातो. संबंधित नाले, ओढे, कालव्यावर महापालिका प्रशासनाकडुन अनेक वर्षांपुर्वी छोटे-मोठे पुल बांधण्यात आले. या पुलांवरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. त्यापैकी काही पुल जुने झाले असल्याने ते धोकादायक झाले आहेत का ? संबंधित पुलांची सद्यःस्थिती नेमकी कशी आहे ? याबाबतची पाहणी महापालिकेकडुन केली जाणार आहे. या पुलांचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडुन स्ट्रक्‍चरल ऑडीट केले जाणार आहे, त्यातुन पुलांच्या सद्यःस्थितीची माहिती महापालिकेस मिळणार आहे. त्यानंतर पुलांच्या कामांसंदर्भात पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

नदीवरील ३८ पैकी ११ पुलांचे काम पुर्ण…
महापालिकेने दोन वर्षांपुर्वी नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट केले होते. पुलांची कामे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपयांची तरतुद केली होती. परंतु महापालिकेने १५ कोटी रुपयेच मंजूर केले होते. त्यामुळे प्राधान्याने विशेष प्रकल्प विभागाने ११ पुलांची कामे केली. तर आता उर्वरीत २७ पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतुद केली जाणार आहे. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहे. त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.

प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन.

मुंबई, दि. २४ डिसेंबर २०२४
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले.

लातूरमध्ये माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटार सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नांदेडमध्ये शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभाताई धानोकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात माजी आमदर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती मधील मोर्चात जिल्हाध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

अकोला महानगर काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर अमित शहा यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रकाश तायडे, अशोक अमानकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनेही अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड बाबासाहेब भोंडे, प्रा. संतोष आंबेकर, गणेशराव पाटील, शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पालघरमध्ये काँग्रेसनेही डॉ, बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढून भाजपा व अमित शाह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसने अमित शाह व भाजपाविरोधात सुरु केलेले आंदोलन यापुढेही सुरुच राहणार आहे. जालनामध्ये शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व मा. आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी शरद पवार यांचा साहित्य परिषदेत सत्कार .

पुणे : २१/२२/२३ फेब्रुवारी२०२५ या काळात, सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी ( तालकटोरा स्टेडियम) नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. दिल्लीत ७१ वर्षांनी होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्या निमित्ताने त्यांचा शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सरहद् आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थांच्या वतीने माधवराव पटवर्धन सभागृह,महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ४११०३० येथे ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तसेच या प्रसंगी १९५४ साली दिल्लीत झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि संमेलनाचे उद्घाटक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाच्या ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी संपादित केलेल्या ‘ दिल्लीतील साहित्य चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या प्रसंगी साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ पी. डी. पाटील, माजी आमदार अनंत गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठीगुरुवारी खुली राज्य निवड चाचणी

पुणे, दि. 24 : व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या तदर्थ समितीद्वारा जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्यासाठी खुल्या राज्य व्हॉलीबॉल निवड चाचणीचे आयोजन गुरुवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी येथे करण्यात येणार आहे.

जयपूर राजस्थान या ठिकाणी 7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत सन 2025 मधील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी राज्य संघाच्या निवडीसाठी खुल्या राज्य व्हॉलीबॉल निवड चाचणीला शाळा, महाविद्यालय, क्लब यातील इच्छुक स्पर्धकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
00000

ख्रिसमस सणानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल

पुणे, दि. २४: ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक सुरळीत रहावी म्हणून २४ व २५ डिसेंबर २०२४ रोजी दोन्ही दिवस सायं. ७ वा. ते गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहेत.

याअंतर्गत वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी मार्गाकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तीनतोफा चौक सरळ लष्कर पोस्ट अशी वळविण्यात येणार आहे.

व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल.

सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गाने पुढे सोडण्यात येईल, असे आदेश पुणे वाहतूक. शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.