Home Blog Page 719

परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न: नाना पटोले

भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४
परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसांच्या नव सत्याग्रह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बेळगावात पोहचले असताना प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परभणीत आंबेडकरी विचाराच्या सुशिक्षित तरुणाचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू हा पोलीसांनी केलेली हत्याच आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली, या दोन्ही घटनांवर जनतेने व सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी वस्तुस्थिती मांडली आहे पण भाजपा युती सरकार ते मान्य करत नाही, हे सरकार प्रायोजित असल्याने सीआयडी चौकशी केली तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही.

देशात हुकूमशाही सुरु असून सध्या देशात काय चालले आहे हाच प्रश्न सर्वांनाच पडला आहे. देशातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात होत असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन हे काँग्रेस पक्षासाठी तसेच देशवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड, निवडणूक आयोगाने 118 जागांवर 72 लाख मतदार जोडले, त्यापैकी 102 जागांवर भाजप विजयी

बेळगाव -बेळगावी येथे 26 डिसेंबरपासून काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे. 1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या 39व्या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.बेळगावी येथे 26 आणि 27 डिसेंबर 1924 रोजी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन झाले. हे पहिले आणि शेवटचे अधिवेशन होते ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. याच अधिवेशनात त्यांची पक्षाध्यक्षपदी निवडही झाली.

येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात 118 जागांवर 72 लाख मतदार जोडले गेले, त्यापैकी भाजपने 102 जागा जिंकल्या. कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट आहे.

पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले- भाजपला सर्व घटनात्मक संस्था काबीज करायच्या आहेत. आम्ही लढाई लढत राहू. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत असून निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक नियमात बदल करून हे सरकार काय लपवू पाहत आहे, जे कोर्टाने शेअर करण्याचे आदेश दिले आहेत.

खरगे म्हणाले – कधी मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, कधी त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाते, कधी मतदार यादीत अचानक मतदार वाढतात, कधी मतदानाच्या शेवटच्या वेळी मतांची टक्केवारी अनपेक्षितपणे वाढते. हे काही प्रश्न आहेत ज्यांचे समाधानकारक उत्तर नाही.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीच्या नकाशाचे छायाचित्र पोस्ट केले आहे, ज्यामध्ये काश्मीर पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे.

बेळगावी हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे केंद्र होते. लोकमान्य टिळकांनी 1916 मध्ये बेळगावातून ‘होम रुल लीग’ चळवळ सुरू केली. 1924 मध्ये बेळगावच्या टिळकवाडी भागातील विजयनगर नावाच्या ठिकाणी हे अधिवेशन भरले होते. आता काँग्रेस अधिवेशनाचे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनवण्यात आले आहे. तेथे एक विहीर बांधण्यात आली, जी आजही अधिवेशनाची साक्ष म्हणून अस्तित्वात आहे.

धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तुल:अंजली दमानिया यांनी पोस्ट केला VIDEO

मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी मंत्री धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे त्यांनी हे असले बॉस? असा प्रश्न उपस्थित करत बीडमधील सर्वच शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावण्याची मागणी केली आहे. यामुळे या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत. विशेषतः मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अंजली दमानिया गुरुवारी 2 व्हिडिओ ट्विट केले. यापैकी एका व्हिडिओत धनंजय मुंडे व त्यांचे विश्वासू वाल्मीक मुंडे कारमध्ये बसल्याचे दिसून येत आहे. या कारचे सारथ्य स्वतः मुंडे करत असून, वाल्मीक कराड त्यांच्या शेजारी बसल्याचे दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तुल असल्याचा फोटो व त्यामागे एक गाणे ऐकू येत आहे.अंजली दमानिया आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांच्या या कृतीवर संताप व्यक्त करत म्हणाल्या, हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रिल्स दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल vision असणार आहे का? ताबडतोब बीड मधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, असे त्या म्हणाल्या.

सतीश वाघ हत्या प्रकरणात सर्व आरोपींना ३० डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी

पुणे: पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.सोमवारी सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. सतीश वाघ हत्या प्रकरणात सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती . पत्नीला गुन्हे शाखेने काल अटक केली. आज लष्कर कोर्टाने या महिलेसह सर्व आरोपींना ३० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1848/2024 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 103(1) ,140(1), 140 (2) ,140 (3) ,142 ,61 (2) ,238 (ब) 3(5) अन्वये दाखल पुण्यातील आरोपी नामे 1). पवन श्याम सुंदर शर्मा, वय 30 वर्ष 2). नवनाथ अर्जुन गुरसाळे वय 31 वर्ष3). विकास उर्फ विकी सिताराम शिंदे वय 28 वर्ष 4). अक्षय उर्फ सोन्या हरीश जावळकर वय 29 वर्ष, सदर आरोपीस प्रोडक्शन वॉरंट ने ताब्यात घेऊन मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयानी सदर आरोपींना दिनांक 30/12/2024 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
तसेचमहिला आरोपी नामे मोहिनी सतीश वाघ वय 48 वर्षे यांना आज रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर महिला आरोपीस दिनांक 30 /12 /2024 पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.तसेच आरोपी नामे अतिश संतोष जाधव वय 20 वर्षे याला यापूर्वीच अटक करण्यात आलेले आहे.या दाखल गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सहा आरोपी अटक करण्यात आलेले आहे

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर रेप -हत्या:आरोपी विशाल गवळीला 7 दिवसांची पोलिस कोठडी

0

नवरा – बायकोने मिळून मृतदेहाची लावली विल्हेवाट
मुंबई-कल्याणमधील एका 13 वर्षीय मुलीची अत्याचारानंतर हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला न्यायालयाने गुरुवारी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी आरोपीला त्याच्या पत्नीनेही मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोर्टाने तिचीही 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृत मुलगी सोमवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह मंगळवारी भिवंडी लगतच्या बापगाव परिसरात आढळला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवली. त्यांनी मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात ती कुठेतरी जाताना दिसली. पण तेथून परत येताना दिसली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात तपास केला असता एका घराच्या आसपास रक्ताचे डाग पडल्याचे आढळले. यामुळे त्यांचा संशय तिथे राहणाऱ्या विशाल गवळी नामक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीवर बळावला.

पोलिसांनी विशालची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्यावर साक्षीने विशालने अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याची कबुली दिली. तिने दिलेल्या जबाबानुसार, आरोपी विशाल गवळीने सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास आपल्या राहत्या घरी अल्पवयीन मुलीवर गैरकृत्य केले होते. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह एका बॅगेत लपवला. सायंकाळी 7 च्या सुमारास बँकेत नोकरी करणाऱ्या साक्षीला त्याने झाला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकल्यानंतर साक्षी घाबरली.त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी सर्वप्रथम घरातील रक्ताचे डाग पुसून टाकले. त्यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास मित्राचा ऑटो बोलावला. त्यानंतर तो ऑटो त्याने स्वतः चालवत मुलीचा मृतदेह बापगाव भागात नेऊन फेकून दिला. तेथून परत येताना विशालने आधारवाडी चौकातील दारू खरेदी केली. त्यानंतर तेथूनच तो पत्नी साक्षीच्या माहेरी शेगाव येथे गेला, तर साक्षी घरी परतली.

पोलिसांनी विशाल गवळीला शेगाव येथून अटक केली. त्याला आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला 7 दिवसांची, तर साक्षीला 2 जानेवारीपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेचे तीव्र पडसाद कल्याण परिसरात उमटत आहेत.

6 वर्षांच्या चिमूकल्याच्या छातीवरून घातली गाडी:चालक झाला होता फरार, सीसीटीव्हीच्या मदतीने अखेर सापडला पोलिसांच्या जाळ्यात

0

मुंबई-वसई येथील वाळीव भागात बुधवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली होती. एका सहा वर्षाच्या लहान मुलाच्या छातीवरून वाहन चालवून आरोपी फरार झाला होता. त्याला आता वाळीव पोलिसांनी अटक केली आहे. कफील अहमद असे या चालकाचे नाव असून तो गोरेगाव पूर्व येथील रहिवासी आहे. या आपघाताचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाले होते.बुधवारी सकाळी 10.21 च्या सुमारास ही घटना घडली होती. वसई पूर्वच्या शिव भीम नगर, नाईकपाडा येथे एमच 01 ईएम 3245 नंबरची ओला टॅक्सी बूक करण्यात आली होती. गाडी प्रवासी घेण्यासाठी आली तेव्हा समोरच सहा वर्षांचा राघवकुमार उर्फ छोटू गाडीच्या समोर खेळत होता. त्यानंतर चालकाने मुलाला न पाहताच गाडी थेट पुढे नेली. यात गाडी मुलाच्या छातीवरून गेली. मुलाची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे समजते.

गाडी जेव्हा प्रवाशांना घेण्यासाठी आली तेव्हा राघवकुमार तिथल्या मोकळ्या जागेत मातीत खेळत होता. यावेळी वाहनचालकाचे ससमोर लक्ष नव्हते. त्याने सरळ त्याची गाडी त्या चिमुकल्या मुलाच्या अंगावरून घातली. यात गाडी थेट छातीवरून गेली. घडलेला प्रकार लक्षात येताच मदत करण्याच्या ऐवजी चालकाने तिथून पळ काढला. यावेळी स्थानिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.

हा प्रकार घडल्याचे समजताच चालक घटनास्थळावरून फरार होत असताना स्थानिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कोणाचेही ऐकले नाही. ओला बुक करणाऱ्या प्रवाशालाही संपर्क साधण्यात आला, परंतु त्याने कार चालकासोबत येण्याचे सांगत मोबाईल स्विच ऑफ केला. त्यानंतर वाळीव पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनचालक आरोपी काफील अहमदला अटक केली. दरम्यान, राघवकुमारच्या हाताला, डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वालवादेवी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यात 8-9 वर्षांच्या दोन बहिणींचा खून:​​​​​​​दोघींचेही पाण्याच्या टाकीत आढळले मृतदेह

पुणे-8 व 9 वर्षांच्या दोन लहान मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह खोलीतील पाण्याच्या टाकीत भरून ठेवल्याची भयंकर घटना पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील एका वस्तीत गुरुवारी सकाळी उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका 50 वर्षीय परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, कार्तिकी सुनील मकवाने (9) व दुर्वा सुनील मकवाने (8) अशी मृत मुलींची नावे आहेत. त्या एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचे मृतदेह ते राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या परप्रांतीय मुलांच्या एका खोलीतील पाण्याच्या टाकीत आढळले. हे सर्व परप्रांतील तरुण एका स्थानिक बियर बारमध्ये काम करतात. मृत बहिणी बुधवारी दुपारी खेळताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. पण त्या सापडल्या नाही. अखेर त्यांच्या मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी बुधवारी सायंकाळी खेड पोलिसांत मुली हरवल्याची तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना सक्रिय केले. या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृत मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असणाऱ्या चाळी लगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली. तेथील एका पाण्याच्या टाकीत दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले. त्यानंतर दोन्ही मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.फौजदार मोरे पुढे म्हणाले, मृत मुलींवर अत्याचार झाला किंवा नाही हे लगेच सांगता येणार नाही. पण खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील धनराज बारमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जवळपास 50 वर्षीय असून, त्याला गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. मुलींच्या आईचे व वेटरचे प्रेमसंबंध होते. त्यातून वेटरने हे कृत्य केल्याचाही अंदाज या प्रकरणी व्यक्त केला जात आहे.

योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलला ६ पदके३ सुवर्ण व ३ रौप्य पदकांचे ठरले मानकरी

पुणे: जिल्हा स्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल ने पदकांची लयलूट केली. येथे झालेल्या योगासन क्रीडा स्पर्धेत स्कूल ने एकूण ६ पदके जिंकली असून त्यापैकी ३ सुवर्ण व ३ रौप्य पदकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या वतिने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘योगासन’ स्पर्धा नुकतीच जुन्नर येथील बेल्हे बांगरवाडीच्या समर्थ कॉलेजमध्ये संपन्न झाली. १४ व १९ वर्षवयोगटातील खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आपली प्रतिभा दाखविली. अंडर १४ मुलांमध्ये मेधांश बहादुर हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तर अंडर १४ मुलींमध्ये महिका पटवर्धन हिने १ सुवर्णपदक व १ रौप्यपदक पटकावले. तसेच अंडर १९ मुलींमध्ये सई कुलकर्णी ला सुवर्णपदक मिळाले.
जिल्हा स्तरीय स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करणार्‍या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना  ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी म्हणाले, आजपर्यंत योगासने केवळ रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानली जात आहेत. मात्र योग हा खेळ नसून प्रथमच अंगीकारून ध्रुव येथील हुशार विद्यार्थ्यांनी त्याला नवे रूप दिले आहे.  तसेच स्कूलच्या प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.
प्रशिक्षक वैष्णवी आंद्रे, प्रगती देशमुख आणि वैष्णव कोरडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

मूड्स ऑफ रफ़ी” गीतांचा मैफिलीतून मोहंमद रफींच्या आठवणींना उजाळा

 पुणे-प्रख्यात गायक मोहंमद रफ़ी  यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, याचेच औचित्य साधून पुण्यातील प्रयोगशील आयोजक झळकी नागण्णा यांनी “मूड्स ऑफ रफ़ी” हा मोहम्मद रफ़ी विशेष सुमधूर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी केले होते. या ठिकाणी रफी यांनी गायलेली अजरामर गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायक “गफार जी मोमीन” हे होते. ज्यांना आपण “व्हॉइस ऑफ रफ़ी” म्हणून देखील ओळखतो. या कार्यक्रमात त्यांनी युगल गीते सादर करण्यात आली होती. सदरील कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी साधना शर्मा, अश्विनी बिरारी, स्वाती पटवर्धन, केतकी जाधव, प्राची दातार, शारदा मिश्रा, सुनिता कुलकर्णी, स्मिता गिरमे, मीनाक्षी जोशी, अनघा चिंचवडकर, संगीता खरवडे, साधना कुर्लेकर व बाल कलाकार अयुधा बिरारी यांनी सुरेल साथ दिली. सदरील कार्यक्रमाचे निवेदन मनीष गोखले यांनी केले तर या कार्यक्रमाला शैलेश घावटे यांचे ध्वनी संयोजन, एस.आर.निर्मित यांचा सहयोग व विक्रम क्रिएशन यांचे तंत्र सहाय्य लाभले.झळकी नागण्णा म्हणाले की  “मैं जिंदगी का साथ निभाता चला गया” हे गाणे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा सार आहे हे गाणे ऐकत असताना आपल्यासमोर येतो तो एक हसतमुख चेहरा आणि भावनाप्रधान आवाज या गाण्यातील आवाजाचे लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत असंख्य चाहते आहेत. स्वर्गीय रफ़ीनीं एकूण २८ हजार गीते गायली आहेत. एखाद्या व्यक्तीला लोकांनी शंभर वर्ष लक्षात ठेवणे ही फार मोठी गोष्ट आहे. यशाच्या कितीही उंच शिखरावर पोहोचलो तरी पाय जमिनीवर ठेवले पाहिजे हे कुणाकडून शिकावे तर ते रफ़ी साहेबांकडूनच..या कार्यक्रमात अयुधा बिरारी यांनी सादर केलेल्या “अच्छा जी मैं हारी चलो” या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‌‘यात्रा‌’ची बाजी‌‘कलम 375‌’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकायंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा …

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‌‘यात्रा‌’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावित पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक शहाजी विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‌‘कलम 375‌’ या एकांकिकेने पटकाविला. या संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच स्पर्धकांनी ‌‘गणपती बाप्पा मोरया‌’, ‌‘ज्योतीबाच्या नावाने चांगभलं‌’, ‌‘उद गं आई उद‌’ अशा आरोळ्या देत एकच जल्लोष केला. सांघिक प्रथम आणि प्रायोगिक एकांकिकेसाठी पारितोषिक पटकाविणाऱ्या कोल्हापूरातील संघांचा आवाज दणाणला.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. 27 ते दि. 29 डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण 18 संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 29) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री मनोज जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक सुषमा देशपांडे, अनिल दांडेकर, वैभव देशमुख मंचावर होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या ‌‘पाटी‌’ या एकांकिकेस श्रीराम करंडक तर सांघिक तृतीय आलेल्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.

परकाया प्रवेशासाठी भाषेवर प्रभुत्व हवे : मनोज जोशी

भारतीय रंगभूमीवरील पुरुषोत्तम योग म्हणजे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करून मनोज जोशी स्पर्धकांशी संवाद साधताना म्हणाले, नाटक हे प्रत्येक कलेचे मिश्रण आहे. एकांकिका स्पर्धांना सिरिअलमध्ये जाण्याची पायरी मानू नका. अभिनयाच्या ताकदीतून रसोत्पत्ती निर्माण करण्यासाठी नाटक पाहणे, तालीअम करणे आणि सतत वाचत राहणे गरजेचे आहे. हे त्रिगुण साधल्यास संगीत, नेपथ्य बाजूला पडून अभिनयाच्याद्वारे कलाकार रंगभूमीवर यश प्राप्त करू शकतो. माझ्यासाठी नाटक हे नुसते गंगास्नान नव्हे तर प्राणवायू आहे. भारतात कुठेही अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित केली जात नसावी. त्यामुळे मुंबईत वाढलेल्या मला पुरुषोत्तम स्पर्धेत भाग घेता आला नाही याचे कायम दु:ख वाटत राहिल. आज-काल आपण समृद्ध भाषा विसरत चाललो आहोत. शब्द भांडार कमी होत आहे. अशा परिस्थितीत भाषा आणि संस्कृतीचे देणे-घेणे वाढविण्यासाठी मिळेल त्या साहित्यकृती वाचत राहा. भाषेचा प्रकार अवगत नसेल, त्याचे ज्ञान नसेल तर वाचिक अभिनय करणे शक्य नाही. तसेच भूमिकेत शिरण्यासाठी परकायाप्रवेश करताना भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. नाटकात काम करताना इमानदारीत काम करा, नटेश्वराला संपूर्ण समर्पित झाला तर तो नक्कीच प्रसन्न होतो. नाटकाचे संस्कार असल्यास पुढील आयुष्यात सांघिक शक्ती, समर्पण भाव, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढीस लागते आणि तुम्ही उत्तम माणूस बनता.

उत्तम संवादफेक आवश्यक : सुषमा देशपांडे

परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे म्हणाल्या, एकांकिकेची निवड करताना मुलांनी भरपूर वाचन केले पाहिजे. अनेक नाटके वारंवार बघितली पाहिजेत. यातून विषयाची निवड करणे सुकर होते. एकांकिका व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून वापरा. नाटकातील प्रोजेक्शनचा अर्थ समजून घ्या. तंत्रावर अवलंबून न राहता शब्द, भावना पोहोचण्यासाठी उत्तम संवादफेक असणे आवश्यक आहे. नाटकाचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासाठी नक्कीच होतो.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक प्रथम : यात्रा (देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सांघिक द्वितीय : पाटी (विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
सांघिक तृतीय : देखावा (न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
सर्वोकृष्ट प्रायोगिक करंडक : कलम 375 (शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर)

वैयक्तिक पारितोषिके
सर्वोकृष्ट अभिनय : पुरुषोत्तम नारायण गाडकीळ करंडक : श्रद्धा रंगारी (सुवर्णा, पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
अभिनय नैपुण्य : दिशा फाऊंडेशन करंडक : पुरुष : सुजल बर्गे, (अरविंद, पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती)
अभिनय नैपुण्य : अरुणा जोशी करंडक : स्त्री : अक्षता बारटक्के (म्हातारी, यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य : विश्वास करंडक : पार्थ पाटणे (घन:श्याम, यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : चैतन्य प्रणित करंडक : अभिषेक हिरेमठ स्वामी (यात्रा, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
पवन पोटे (शंकर, देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
यश पत्की (सदा मोरे, बस क्र. 1532, म. ए. सो.चे गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे)
ओम चव्हाण (सुदामा, सखा, आय. एम. सी. सी. पुणे)
श्रेया माने (सई, व्हाय नॉट, राजाराम बापू अभियांत्रिकी महाविद्यालय, साखराळे, इस्लामपूर)
अथर्व धर्माधिकारी (राजाराम-बाप, देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर)
मानसी बोळूरे (व्यक्ती 2, कलम 377, शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर)
शांभवी सुतार (म्हातारी, होळयोनागरा, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी)
समर्थ तपकिरे (दिल्या, पिंडग्रान, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर)
सुमित डोंगरदिवे (मास्तर, फाटा, देवगिरी महाविद्यालय, नाट्य शास्त्र विभाग, संभाजीनगर)
तृती येवले (म्हातारी/लक्ष्मी, सखा, आय. एम. सी. सी. पुणे)

महापालिकेच्या विभाजनाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील- चंद्रकांत पाटील

पुणे-दोन महापालिकेच्या प्रस्तावाच्या बाबत अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री हेच करणार आहेत .आम्ही १५ जानेवारीला या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागत आहोत .३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही एशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे.त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे. आणि म्हणून दोन महानगरपालिका केले पाहिजे आणि हे आम्ही मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहोत असे आज येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला.यावेळी त्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांचा सन्मान केला आणि त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केले.स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो. पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून, मेट्रोने प्रवास देखील करत आहोत.६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरु आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे शहरात दोन महापालिकेच्या प्रस्तावाच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की ,याच अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे करणार आहे.देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराच्या सर्वच प्रश्न माहीत आहे.पण आम्ही १५ जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागत आहोत आणि याच्या एका आठवड्याच्या आधी पुण्याचे प्रश्न त्यांना देणार आहोत.३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही एशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे.त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे. आणि म्हणून दोन महानगरपालिका केले पाहिजे आणि हे आम्ही मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहोत असे यावेळी पाटील म्हणाले.

यावेळी पाटील यांना पुरंदर विमानतळ येथील प्रश्नाच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की, पुरंदर विमानतळाच परवानग्या सगळ्या झाल्या असून जमीन भूसंपादन बाबत गती पकडावी लागणार आहे आणि याला २ ते ३ वर्ष हे लागणार आहे.

पुण्याचे पालकमंत्री पदाच्या बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, या विषयात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय करतात.तसेच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील.तसेच आमच्या पालकमंत्री पदाच्या बाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.विधानसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की , पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलणे, न बदलणे हा केंद्राचा विषय आहे.पण साधारणतः दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारणी ही बदलत असते आणि ही लोकशाही प्रक्रिया आता आमच्याकडे सुरू आहे. पक्ष सदस्यता मग, सक्रिय सदस्यता आणि लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर निवडणुका होत होत ही प्रक्रिया चालत असते असे यावेळी पाटील म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी बीडच्या मस्साजोग येथे घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

0

संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

बीड/मुंबई दि. २५ डिसेंबर २०२४

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात केली आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आ. अमित देशमुख होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना अत्यंत वेदनादायी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना आणि सुत्रधारांना त्वरित शोधून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. बीड जिल्ह्यासह राज्यात दहशत वाढवण्यासाठी कारणीभूत कोण आहे आणि यामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे या गोष्टींची सुद्धा सखोल चौकशी होऊन कारवाई केली पाहिजे. गुन्हेगारांना जात धर्म काही नसते या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी व फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे.

गुन्हेगारांवर कायद्याचा धाक असावा लागतो मात्र सध्या प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना आहेत. पण पोलीस साधा एफआरआय ही घेत नाहीत इतकी दुर्दैवी स्थिती आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव उभा राहील असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले की, परभणी आणि बीड येथील घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणा-या आहेत. या दोन्ही घटनांमागील गुन्हेगारांना तातडीने अटक करावी व पिडीत कुटुंबांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.

संसद भवनासमोर एकाने स्वतःला पेटवून घेतले

0

नवी दिल्लीदिल्लीतील नवीन संसद भवनाजवळील रेल्वे इमारतीसमोर बुधवारी दुपारी एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुण गंभीर भाजला आहे.दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.35 वाजता कॉल आला. यामध्ये तरुणाने आग लावून घेतल्याची चर्चा होती. आम्ही एक वाहन घटनास्थळी पाठवले होते.

अधिकाऱ्याने सांगितले की, संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना घटनास्थळावरून पेट्रोल, जळालेली पिशवी आणि बूट सापडले. तरुणाने ज्या ठिकाणी स्वतःला पेटवून घेतले त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सध्या तरुणाची माहिती समोर आलेली नाही.

प्रवासी विमान कोसळले:39 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

0

मॉस्को-कझाकस्तानमधील अकताऊ येथे बुधवारी सकाळी एक प्रवासी विमान कोसळले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानात 62 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. यापैकी 28 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. हे विमान अझरबैजानहून रशियाच्या चेचन्या प्रांताची राजधानी ग्रोझनीकडे जात होते. पण त्याला कझाकिस्तानच्या अकताऊ शहरापासून 3 किमी अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

वृत्तसंस्थेच्या मते, दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग बदलण्यात आला होता. वृत्तानुसार, विमानाने क्रॅश होण्यापूर्वी विमानतळावर अनेक फेऱ्या मारल्या होत्या. त्यानंतर त्याला आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

अपघातग्रस्त विमान अझरबैझान एअरलाईन्सचे असल्याचे सांगितले जात आहे. सोसल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसून येत आहे की, विमान क्रॅश होताच त्याला आग लागली. बीबीसीच्या वृत्तानुसार, सध्या आग विझवण्यात आली आहे.

मौजमजेसाठी दुचाक्या चोरणा-या मुलाला पकडून दोन दुचाकी वाहने जप्त

पुणे- कोयता गँग असो कि किरकोळ घरफोड्या चोऱ्या , मद्य सेवन असो विविध गुन्ह्यात पुण्यात अल्पवयीन मुलांचा असणारा सहभाग गंभीर बनत चालला आहे . भारती विद्यापीठ पोलीसांनी मौजमजेसाठी दुचाक्या चोरणा-या मुलाकडुन दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत. आणि या मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.

या स्नाद्र्भात पोलिसांनी सांगितले कि,’ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस स्टेशन अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरांबाबत माहीती घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालक हा चोरीची गाडी घेवुन फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नमुद बालकास त्याचे ताब्यातील दुचाकी गाडी सह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने सदरची गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने सदरची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली असुन नमुद विधीसंघर्षित बालकाकडे आणखीन केलेल्या तपासामध्ये आणखीन एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे, त्याच्याकडून खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत.
१, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५९४/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) २, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७२७/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परि.२ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमाले, सागर बोरगे, मंगेश पवार, चेतन गोरे, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.