Home Blog Page 688

जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरकडून आपल्या विस्तार योजनेला पाठबळ देण्यासाठी ड्रेजरची डिलिव्हरी

मुंबई, २३ सप्टेंबर २०२४: जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी व्यावसायिक पोर्ट ऑपरेटर जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (“कंपनी”)ने नेदरलँड्समधील IHC ड्रेजिंग कडून एक नवीन, अत्याधुनिक ड्रेजरची डिलिव्हरी घेतली आहे.

दुसऱ्या ड्रेजर मधील गुंतवणूक कंपनीच्या आर्थिक वर्ष २०३० विकास योजनेशी सुसंगत असून त्याअंतर्गत क्षमता १७० दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) वरून ४०० MTPA पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा नवीन ड्रेजर अनेक बंदरांवर कंपनीच्या ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड विस्तार प्रकल्पांना मदत करेल.

Infra pic_23

जुनी पेन्शन  लागू करा, अन्यथा आमरण उपोषणाचा  माजी सैनिकांचा इशारा

पुणे:

राज्य शासनात कार्यरत माजी सैनिकांना  ‘जुनी पेन्शन योजना सुरू करा’ या मागणीसाठी   शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सैनिक कल्याण विभाग  संचालक महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत  मुख्यमंत्री  आणि  अपर मुख्य सचिव  सामान्य प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले. माजी सैनिकांची मागणी पूर्ण न झाल्यास  आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १२  वाजता घोरपडी येथील कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.
 शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष बाजीराव देशमुख ,सरचिटणीस बाळासाहेब जाधव, पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे, सैनिक कल्याण विभाग उपाध्यक्ष संजय मोहिते, राज्य सल्लागार सुरेश माने, दिलावर शादीवान, विलास घाडगे, विभागीय सहसचिव संजय बोराटे, पुणे जिल्हाध्यक्ष तथा माजी चिटणीस दीपक पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष शरद शिंदे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासनचे संचालक कर्नल(नि) दीपक ठोंगे  तसेच उपसंचालक मेजर(नि) शिल्पा खोपकर, लेफ्टनंट कर्नल (नि) हांगे, मेजर (नि) कापले यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन सविस्तर मुद्दे मांडले. २००५ पूर्वी राज्य शासनात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ च्या योजनेनुसार  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील २९००  माजी सैनिक मागील पाच वर्षापासून लढा देत आहेत .त्यानंतर सरकारनं आश्वासन देऊनही अद्याप शासन निर्णय अथवा अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने  अखेर  माजी सैनिक  संघटनेनं आंदोलनाचा हा निर्णय घेतला. 

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड; चाकण परिसरात तीन तास वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. २३ सप्टेंबर २०२४: महापारेषण कंपनीच्या आळेफाटा २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण परिसरातील १२ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. २३) सकाळी तीन तास खंडित होता. मात्र महापारेषणकडून युद्धपातळीवर उपाययोजना करून चिंचवड २२० केव्ही उपकेंद्रातून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, चाकण परिसरातील वाकी, बिरदवडी, रोहकल, कडाची वाडी, रासे, रहाणुबाई मळा, मेदनकरवाडी या परिसराला महावितरणच्या आंबेठाण व फोक्सवॅगन २२ केव्ही या दोन वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होतो. मात्र महापारेषणच्या आळेफाटा २२० केव्ही उपकेंद्रातील इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये (आयसीटी) बिघाड झाल्यामुळे सोमवारी (दि. २३) सकाळी ८.१५ वाजता या दोन्ही वीजवाहिन्यांवरील सुमारे १२ हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

तथापि हा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे लक्षात येताच महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. यामध्ये सकाळी ११.१५ वाजता चिंचवड २२० केव्ही उपकेंद्रातील पर्यायी व्यवस्थेतून महावितरणच्या आंबेठाण व फोक्सवॅगन २२ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, महापारेषणकडून नादुरुस्त झालेले इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

प्रो कबड्डी लीग 2024 साठी स्टार स्पोर्ट्सच्या हाय-ऑक्टेन मोहिमेमध्येरितेश देशमुख दाखविणार कबड्डीचा थरार

मुंबई: स्टार स्पोर्ट्स हे प्रो कबड्डी लीगचे (पीकेएल) अधिकृत प्रसारक आहेत. स्टार स्पोर्ट्सने आगामी पीकेएल सीझन 11 साठी पहिल्या ब्रँडिंग जाहिरातींचे अनावरण केले असून, त्यात बॉलीवूड सुपरस्टार रितेश देशमुख कबड्डीचा थरार दाखविणार आहे. 18 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणाऱ्या स्पर्धेसह हे ॲक्शन-पॅक कॅम्पेन दर्शकांना जंगलाच्या हृदयाचा ठाव देते. महाकाय दृश्य, शक्ती आणि अथक धैर्य याद्वारे कबड्डीची तीव्रता जिवंत केली जाते. हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ यांसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारे कॅम्पेन पीकेएल हंगामातील सर्वात रोमांचकारी ठरेल, याची प्रचिती देते.
Link to watch the promo feat. Riteish Deshmukh – YouTube
प्रोमोमध्ये रितेश एकाकी योद्धा म्हणून येतो, धोकादायक लोकांना हेरताना वाघाची चपळता दाखवितो. हीच तीव्र अंतःप्रेरण, वेग आणि मानसिक कणखरपणाचे एक ज्वलंत रूपक, जे कबड्डी चॅम्पियन्सची व्याख्या करते. हा लघुपट कबड्डीतील धडधड अत्यंत योग्यप्रमाणे अधोरेखीत करतो. दर्शकांना अशा जगाकडे आकर्षित करतो, जिथे प्रत्येक चाल ही एक लढाई असते आणि प्रत्येक निर्णय हा विजय व पराभव यातील फरक असू शकतो.
कथनाला अधोरेखित करणाऱ्या उद्बोधक गाण्यासोबत एकत्रितपणे आकर्षक व्हिज्युअल, खेळाच्या केंद्रस्थानी असलेली शक्ती आणि रणनीती हायलाइट करते, त्यातून सीझन 11 ची अपेक्षा नवीन उंचीवर जाते.
रितेश देशमुख म्हणाला, “कबड्डी हा एक खेळ आहे, जो आपल्या संस्कृतीच्या जडणघडणीत रुजलेला आहे आणि या मोहिमेचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे. लघुपटातील तीव्रता आणि अभिमान कबड्डीपटूंच्या योद्धा भावनेला प्रतिबिंबित करतो – ते तीव्र, निर्भय आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असतात. पीकेएल हा आता राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. मला खात्री आहे की, हा हंगाम त्या उत्साहाला आणखी एका पातळीवर नेईल.”
प्रेक्षकांना या खेळाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या उद्दिष्टाने, मशाल स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सने “डिफाइन युअर टीम्स सुपरपॉवर” ही मोहीम सुरू केली, ज्यामध्ये चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाच्या सुपरपॉवर्ससाठी मतदान करण्याचे निमंत्रण दिले गेले. या मोहिमेने पीकेएल ११ च्या टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कॅम्पेनला आकार दिला. या उपक्रमाला १.०५ लाख मतं मिळाली असून, संबंधित पोस्ट्सना १.१२ दशलक्ष व्ह्यूज, १.४५ दशलक्ष रीच आणि १.१९ लाख इंटरअॅक्शन्स मिळाले. महाराष्ट्रातील चाहत्यांनी निवडलेल्या तीन प्रमुख गुणधर्म – आश्चर्य, चपळता आणि संतुलन – रितेश देशमुख यांच्या प्रमोशन फिल्ममध्ये दाखवले आहेत, जे महाराष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. पीकेएल हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी ही पोल्स अधिकाधिक वाढवली जातील.
यावेळी पीकेएल तीन-शहरांच्या फॉर्मेटमध्ये परतणार आहे. 2024 ची आवृत्ती हैदराबादमधील GMC बालयोगी क्रीडा संकुलात 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत सुरू होईल. त्यानंतर, ती दुसऱ्या टप्प्यासाठी नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये जाईल, 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 1 डिसेंबरला संपेल. तिसरा टप्पा येथे सुरू होईल 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये. पवन सेहरावत, परदीप नरवाल आणि फझेल अत्राचली यांसारख्या स्टार खेळाडूंसह मॅटवर वर्चस्व गाजविण्यासाठी PKL 11 कबड्डी या दोघांचेही लक्ष वेधून घेईल, याची खात्री देते. चाहते आणि नवीन दर्शक सारखेच.
तेलुगू टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स या सीझन ओपनरमध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. या थरारक हंगामाची जबरदस्त सुरुवात होईल. रात्रीचा दुसरा सामना अधिक आतषबाजी करायला लावणार आहे. जसे घरी डायनॅमिकसह हॉर्न लॉक करते दबंग दिल्ली के.सी. संपूर्ण भारतातील चाहते नाटक, तीव्रता आणि नॉन-स्टॉप ॲक्शनने भरलेल्या सीझनची तयारी करू शकतात, हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने + हॉटस्टारवर थेट पाहू शकतात!
१८ ऑक्टोबर 2024 पासून प्रो कबड्डी लीग सीझन 11 पहा,
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिस्ने+ हॉटस्टारवर थेट पाहू शकता

विधानसभा निवडणुकीसाठीची काँग्रेस पक्षाची विभागीय आढावा बैठक चंद्रपूरात संपन्न.

मुंबई, दि, २३ सप्टेंबर २०२४
भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, असा घणाघाती हल्ला प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक चंद्रपूरात संपन्न झाली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. प्रतिभा धनोरकर, खा. नामदेव किरसान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली विदर्भाच्या भूमितूनच सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली. वर्ध्याच्या सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सोयाबिनला १० हजाराचा भाव देऊ असे सांगितले. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला होता आणि सत्तेत आहेत तर ४ हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले, डिझेलचा भाव वाढला, बि, बियाणांचा भाव वाढला पण शेतमालाचा भाव काही वाढला नाही. भाजपा शेतकरी विरोधी आहे.
राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे.
असेही पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी जनतेने मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये जो रोष होता तो त्यातून व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारची जडण घडणच भ्रष्टाचारातून झाली आहे. त्यासाठी ज्या साधनांचा त्यांनी वापर केला ते जनता ओळखून आहे. सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महिला अत्याचार वाढले आहेत, अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. जमीन व्यवहारातून सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु आहे असे हे भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल व मविआ सत्तेवर नक्की येईल याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर तोफ डागत म्हणले की, महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे व झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे. भारतीय जनता पक्ष दुतोंडी साप असल्याचे यातून उघड झाले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आढावा बैठकीवेळी विदर्भातून मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती द्या – एस. एम. देशमुख

राज्यस्तरीय पहिल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत ४०० पेक्षा अधिक पत्रकारांचा सहभाग

पिंपरी, पुणे (दि. २३ सप्टेंबर २०२४)- डिजिटल च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे विषय सडेतोड पणे मांडत आहेत. प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे तर सध्याच्या स्पर्धा युगात डिजिटल मीडिया प्रभावी साधन ठरत आहे असे प्रतिपादन लखनऊ येथील न्यूज फोर पीएम या यू ट्यूब चॅनलचे संपादक संजय शर्मा यांनी केले.
पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय शर्मा बोलत होते. याप्रसंगी आगामी काळात हा डिजिटल मीडिया अजूनच व्यापक होणार आहे. त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका आणि सरकारी जाहिराती देण्यात याव्यात,’ अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
यावेळी ॲड. असीम सरोदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला न घाबरता सत्य तेच पण कायद्याच्या चौकटीत बसून जनतेसमोर प्रखरपणे बातमीतून पुढे आणावे असे मत व्यक्त केले. तसेच मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर आणि इंदिरा कॉलेजचे जर्नलिजम विभागाचे प्रिन्सिपल किशोर वायकर आदी मान्यवरांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली. याप्रसंगी पीसीईटीचे अध्यक्ष डॉ. गिरीश देसाई, परिषदेचे शरद पाबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच विभागीय सचिव गणेश मोकाशी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एमजी शेलार, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे अध्यक्ष महावीर जाधव, कार्याध्यक्ष अविनाश आदक, उपाध्यक्ष सुरज साळवी, संघटक चिराग फुलसुंदर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पुणे विभागीय उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे, पुणे जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर रवींद्र ठाकूर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक कैलास थोपटे, सिद्धांत चौधरी, प्रकाश अनंता, नितीन कालेकर, संतोष गोतावळे, माऊली भोसले, अशोक कोकणे, विनय सोनावणे, रमेश साठे आदींसह पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य व राज्यभरातून आलेले विविध माध्यमाचे पत्रकार मोठ्या प्रमाणात विविध जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे ४०० पेक्षा जास्त पत्रकार आले होते. आगामी काळात अशा कार्यशाळा महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्यात येणार आहेत.
तसेच डिझिटल माध्यमांकडे तरुण पत्रकारांचा ओढा वाढत आहे. डिझिटलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमुळे आज ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्नही सहज समोर येऊ लागले आहेत. डिजिटल माध्यमात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठीच ही कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामुळे काळाची पावले ओळखून परिषदेने डिजिटल मीडिया परिषदेची सुरुवात केली आहे. काळानुसार बदलणे ही भूमिका कायमच परिषदेची राहिली आहे. अशी भूमिका एस. एम. देशमुख यांनी स्पष्ट केले.
‘डिजिटल मीडियाला सरकारकडून जाहिराती मिळाव्यात, अशी मागणी मराठी पत्रकार परिषद सातत्याने करीत आहे. त्यामुळेच हळूहळू सरकारकडून डिजिटल माध्यमांना जाहिराती देण्याचे काम सुरू झाले. पण ग्रामीण भागामध्ये देखील अशा जाहिराती मिळाव्यात, यासाठी परिषदेचा लढा सुरूच राहिली,’ असेही देशमुख म्हणाले.
साप्ताहिकांनी डिजिटलमध्ये उतरणे काळाची गरज ‘ग्रामीण भागातील साप्ताहिक असतील, छोटी वर्तमान पत्रे असतील यांनी आताच काळाची पावले ओळखून डिजिटलमध्ये उतरण्याची गरज आहे. साप्ताहिकासोबतच या माध्यम देखील त्यांनी चालवावे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते गरजेचे आहे,’ असे आवाहनही परिषदेच्यावतीने करण्यात आले.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप चव्हाण, स्वाती घोसाळकर आणि टीव्हीजेएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उदय जाधव यांचा एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आकाश वडघुले यांनी तर प्रास्ताविक अनिल वडघुले व आभार महावीर जाधव यांनी व्यक्त केले.

दुर्धर आजाराशी यशस्वी लढा देणारी ‘आशा’ एक योध्दा – सुनिता राजे पवार

आशा नेगी यांच्या ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाचे प्रकाशन

पिंपरी, पुणे (दि.२३ सप्टेंबर २०२४) – स्थळ निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह … रविवारी संध्याकाळची पाचची वेळ … कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे ‘ब्युटी ऑफ लाईफ – द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ या आशा नेगी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा प्रसंग …. कॅन्सर झाला हे समजले की रूग्ण मुळापासून कोलमडतो … आपल्याच नशीब हे का, असा प्रश्न पडतो … संपूर्ण कुटुंब सैरभैर होते … कॅन्सरवर मात करू शकतो हे मनाला ही शिवत नाही… परंतु आशा याला अपवाद… त्यांची कहाणी ऐकताना उपस्थित निःशब्द होतात… ही सैनिकाप्रमाणे वीरांगनाच भासते… तिला मनोमन कडक सॅल्युट ठोकतात… आणि सकारात्मक दृष्टिकोन, उर्जा घेऊन आपल्या अवतीभवती वावरणाऱ्यांना संकटावर मात करून नवी उमेद देऊ… असा निष्यय करून बाहेर पडतात…
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारी आशा नेगी ही एक योध्दा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुळातच स्त्रियांमध्ये लढण्याची शक्ती निसर्गाने दिली आहे. त्यांनी लिहिलेले आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी कव्हर पेज केलेले ‘ब्युटी ऑफ लाईफ – द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ हे पुस्तक समाजाला प्रेरणा देणारे आहे. अशी पुस्तके प्रकाशित झाली पाहिजेत. हे पुस्तक म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिता राजे पवार यांनी व्यक्त केले.
आशा नेगी यांनी लिहिलेल्या ‘ब्युटी ऑफ लाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि.२२) निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे करण्यात आले. यावेळी आमदार अमित गोरखे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. वैभव ढमाल, कॅन्सर तज्ज्ञ रेश्मा पुराणिक, सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, न्यू ईरा पब्लिकेशनच्या संस्थापिका अमृता तांदळे, शब्दांकन करणाऱ्या संजना मगर, लेखिका आशा नेगी यांचे पती गिरीश हिरेमठ, मुली आरिका आणि आरा आदी उपस्थित होते.
कॅन्सर सारख्या आजाराशी जे लढा देत आहेत. अशा रुग्णांना, त्यांच्या कुटुंबीयांना प्रेरणा, मार्गदर्शन ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकातून होते. पुस्तक सर्वांना प्रेरणा देणारे आहे, असे डॉ. विश्वास मोरे यांनी सांगितले.
बदलती जीवनशैली, भेसळयुक्त अन्न, पर्यावरणातील बदल या काही घटकांचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. लोक आपल्याकडे कसे पाहतात या पेक्षा आपण स्वतःकडे कसे पाहतो, हे महत्त्वाचे आहे. आपण खंबीर असू तर कुठल्याही आजारांवर, संकटावर मात करू शकतो. हे आशा नेगी यांनी समाजाला दाखवून दिले आहे. योग्य आहार, व्यायाम, विश्रांती घेतली तर आपण आजारांपासून दूर राहू शकतो, असे डॉ. रेश्मा पुराणिक यांनी सांगितले.
स्वतः अंध असूनही लुयी ब्रेल यांनी अंधांना वाचता येईल अशा ब्रेल लिपीचा शोध लावला. ब्रेल लिपी अंधांना वरदान ठरली. तसेच आशा नेगी यांचे पुस्तक कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना नव्हे तर संकटात सापडलेल्या व्यक्तींना नवी दिशा देऊन जगण्याची उमेद, प्रेरणा देईल, असे आमदार अमित गोरखे म्हणाले. प्रास्ताविक न्यू इरा पब्लिकेशनच्या संस्थापिका अमृता तांदळे, सूत्र संचालन अमृता प्रकाश आणि आशा नेगी यांनी आभार मानले.


मुखवटे घालून जगतो ते फेकून द्या – आशा नेगी

पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रारंभी ज्येष्ठ छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी आशा नेगी यांची प्रकट मुलाखत घेतली. समाजात वावरताना आपण सर्वजण मुखवटे घालून जगतो. परंतु कठीण प्रसंगी आपले कोण हे कळतं. आव्हाने कोणती हे लक्षात येते. चांगल्या बरोबरच संकटाला खंबीरपणे सामोरे जा. संकटावर मात करू शकतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. चुकीच्या सर्जरी मुळे हाताची हालचाल बंद झाली. पण मी कधीच आशावाद सोडला नाही. उपचार घेताना मी कॅन्सर सोबत ‘नॉर्मल’ आयुष्य जगले. मला व्यक्त व्हायचे होते म्हणून लिहित गेले. त्यातून पुस्तक तयार झाले. कोणताही आजार हा फक्त शारीरिक नसतो तर तो मानसिक सुद्धा असतो. कोणत्याही आजारात स्वीकारण खूप महत्त्वाचं असतं. आयुष्यात अडचणींना सामोरे जाताना मानसिक कणखरता आवश्यक आहे. त्याचबरोबर जीवन अनिश्चित आहे आशा निराशाने भरलेले आहे.. जगण्याची आसक्ती आहे म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे. तुमच्या वेदनेत संघर्षात आनंदात जीवनाचे सौंदर्य दडले आहे आणि यालाच आपण ब्युटी ऑफ लाईफ म्हणतो असे नेगी यांनी सांगितले.
माझी आई सुपर वुमेन – आरिका

माझ्या आईला अचानक कॅन्सरचे निदान झाले. परंतु आईच्या दिनचर्येत कुठलाही बदल झाला नाही. किंवा कॅन्सर झाला आहे हे जणू तिच्या ख्याली नव्हतेच. ती हसतमुखाने सामोरी गेली‌. कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला तिने तिच्या वागण्याने सामान्य आजार करून टाकलं. म्हणूनच माझी आई सुपर वुमेन आहे, असे आरिका म्हणाली. रेडिएशन घेतल्यानंतर माझ्या आईची त्वचा निघाली. तिला दोन महिने कपडे घालता आले नाही.तरीसुद्धा काहीही चिडचिड न करता तिने हसतमुखाने या सगळ्यांना अडचणींना सामोरे जाताना ती तिचं पुस्तक सुद्धा लिहीत होती. आईचा हा प्रवास सांगताना आरिका खूप भावना विवष झाली. त्यामुळे सभागृहातील उपस्थितांनी अश्रुंना कधी वाट मोकळी करून दिली हे समजलेच नाही.

पुस्तक समुपदेशकाचे काम करते – प्रा. डॉ. वैभव ढमाल

‘ब्युटी ऑफ लाईफ’ हे पुस्तक वाचताना दु:खदायक घटना वाचत आहे असे वाटत नाही. यामध्ये घटना आहेत पण कॅन्सरच्या आजाराला सामोऱ्या जाणाऱ्या आशा नेगी दुर्गेच्या रूपात दिसतात. आठ महिन्यांचा प्रवास पुस्तकात आहे. पुस्तक समुपदेशकाचे काम करते, असे प्रा. डॉ. वैभव ढमाल यांनी सांगितले.

स्त्री विरुद्ध पुरुष नाही तर स्त्री पुरुष एकत्र येतच पुरुषसत्तेला उखडता येईल 

पुरुषसत्तेची पाळंमुळं समजून घेताना… कार्यशाळेतील सूर 
पुणे (प्रतिनिधी): स्त्री विरोधी पुरुष नाही तर पुरुषसत्ता पुरुषांना माणूसपणापासून दूर नेते, हे लक्षात घेतलं तर पुरुषसत्तेची पाळंमुळं उखडून टाकणं अजिबात अवघड नाही. पुरुषसत्ता स्त्री पुरुष दोघांना साचेबद्ध राहण्याचे धडे देते, अशक्य नाही मात्र अवघड असले तरी त्यासाठी प्रयत्न करत राहूयात. ही वक्तव्ये आहेत पुरुषसत्तेची पाळंमुळं समजून घेताना… या कार्यशाळेतील.  अभिव्यक्ती आयोजित २२ सप्टेंबर रोजी लोकायत हॉलमध्ये ही कार्यशाळा पार पडली. अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी आणि कार्यकर्ते रुषल हीना यांनी उपस्थितांना बोलतं करत फिल्म, खेळ यांच्या माध्यमातून या विषयाची मांडणी केली. स्त्री पुरुष दोन्हीही खरंतर समाजातील महत्त्वाचे घटक आहे, पुढची पिढी जन्माला यावी म्हणून निसर्गाने केवळ लैंगिक अवयवांचे भेद केले मात्र समाजाने त्यांच्यात भेदभाव करत पुरुषाला श्रेष्ठ आणि स्त्रीला दुय्यम स्थानी ठेवले. यातून जन्माला आला मालकी हक्क-सत्ता. आणि ते शाबूत ठेवण्यासाठी त्यातून आली हिंसा. श्रेष्ठ कनिष्ठ अबाधित राहावे यासाठी चौकटी आखून दिल्या. यातून स्त्रियांचं दबलेलं तर पुरुषांचं कठोर असंवेदनशील व्यक्तिमत्त्व घडत जातं. मात्र विचारपूर्वक-प्रयत्नपूर्वक याला आव्हानं देऊ शकतो. आज समाजात अनेक पुरुष आणि स्त्रिया, कुटुंबे सामानतेत रहात जगत आहेत. इतिहासातली उदाहरण सांगायची झाली तर महात्मा फुले, पेरियार,म. गांधीजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पुरुष ज्यांनी स्त्रियांना बरोबरीचं स्थान देण्यासाठी अथक प्रयत्न केले. आपण ही पाळंमुळं समजून घेतली तर स्त्री विरुद्ध पुरुष नाही तर स्त्री आणि पुरुष असा समानतेवर आधारित समाज निर्माण करणं सध्या होईल. कार्यशाळेला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी कोल्हापूरहून कार्यशाळेसाठी तरुण तरुणी आले होते.

दिव्यांगांनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या ‘प्रोत्साहन’ प्रदर्शनाला प्रारंभ

 महाराष्ट्रातील २८ दिव्यांग व्यक्ती व १२ संस्थांचा सहभाग ; प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य
पुणे : आकाशकंदील, भेट पाकिटे, कागदी फाईल्स, खाद्यपदार्थ, दागिने, वायरच्या बास्केट अशा दृष्टीहिन आणि दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील विविध भागातील २८ दिव्यांग व्यक्ती आणि १२ संस्थांचा सहभाग असलेल्या प्रोत्साहन प्रदर्शनात दिव्यांगांनी कलागुणांचे सादरीकरण देखील केले. 
दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२४ या प्रदर्शनाचे आयोजन कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे केले आहे. दिव्यांगांसाठी ३५ वर्षे कार्यरत असलेल्या प्रिझम फाऊंडेशनच्या बेन्यू टेÑनिंग इन्स्टिटयूटच्या मुख्याध्यापिका विद्या भागवत आणि पीपल वीथ हीअरिंग इमपेअर्ड नेटवर्कच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कर्णबधिर अंबु गोविंदगिरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. 
प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर यांनी केले आहे. प्रदर्शनादरम्यान धायरी येथील दृष्टीहिन वृद्ध महिलांनी वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्याशिवाय प्रदर्शन सुरु असताना दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम देखील सादर करीत आहेत. तसेच विविध प्रात्यक्षिके देखील सुरु आहेत. 
फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे  प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनात विद्या ज्योती स्पेशल स्कूल, अंध वृद्ध महिलाश्रम,  नंदनवन, प्रिझम फाउंडेशन, मैत्र  फाउंडेशन, स्मित फाउंडेशन, उन्मेष संस्था इत्यादींनी भाग घेतला आहेत.   
सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शनात १८ ते ८० वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यापूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

मुंबई, दि. २३ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्हा प्रशासन, पोलिस, महानगरपालिका, संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावे. वाहतुकीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस पुणे विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस आयुक्त,पिंपरी-चिंचवड, विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पंकज देशमुख,पुणे महानगर परिवहन महामंडळ,अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्रीमती दिपा मुधोळ मुंडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पिंपरी चिंचवड बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कृषी महाविद्यालय अधिष्ठाता महानंद माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, ससून सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता,डॉ. व्ही.पी. काळे ,शल्य चिकित्सक, डॉ. नागनाथ यम्मपल्ले, विमानतळ संचालक संतोष डोके दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

माण हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 23 :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी चोवीस तास परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी. याकाळात वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

युरोकिड्सतर्फे पुण्यात महत्त्वाकांक्षी विस्तार योजना

हार्वर्ड– प्रेरित हेयुरेका अभ्यासक्रमाचे अनावरण

पुणे  – युरोकिड्स या भारतातील आघाडीच्या प्रीस्कूल एक्सपर्ट कंपनीला त्यांच्या हेयुरेका – दृश्य वैचारिक अभ्यासक्रमाची आठवी आवृत्ती लाँच करताना आनंद होत आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोजेक्ट झीरोपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत सर्वसमावेशक विकासाचे धोरण ठेवणारा हेयुरेका अभ्यासक्रम लहान विद्यार्थ्यांम्ये सर्जनशील विचार कौशल्य विकसित करेल.

युरोकिड्सच्या महत्त्वाकांक्षी विकास धोरणाचा एक भाग म्हणून प्रीस्कूल नेटवर्कने पुणे व महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. युरोकिड्सने पुढील पाच वर्षांत राज्यात ३२५ नवी केंद्रे सुरू करत महाराष्ट्रातील केंद्रांची संख्या ४०० वर नेली आहे. या विस्ताराद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे ध्येय आहे. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने युरोकिड्सला ते दर्जेदार असण्याची गरज माहीत आहे आणि म्हणूनच कंपनीद्वारे अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत ठेवला जातो.

हेयुरेका मुलांना ‘काय’ विचार करायचा, हे सांगण्याऐवजी त्यांना ‘कसा’ विचार करायचा, याची कौशल्ये आत्मसात करायला मदत करणार आहे. या अभ्यासक्रमात २० वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीच्या, हार्वर्ड प्रेरित थिंकिंग रूटिन्सचा समावेश असून, त्यामुळे लहान मनांमध्ये उत्सुकता, कल्पनाशक्ती आणि विचार कौशल्य विकसित होते. मुलं फक्त माहिती घेत नाहीयेत, तर ती सक्रियपणे त्याचा वापर करत आहेत व त्यांच्यामध्ये सखोल आकलन आणि सर्जनशीलता विकसित होत आहे, याची काळजी या अभ्यासक्रमाद्वारे घेतली जाते.

१८ महिन्यांचे कठोर संशोधन, प्राथमिक चाचणी व आवश्यक बदलांनंतर हेयुरेकाला ईपिक्स तत्त्वाची तोड देण्यात आली आहे. त्यामध्ये एरवी शिक्षण क्षेत्रात दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक अशा पाच महत्त्वाच्या विकास जागांचा समावेश करण्यात आला आहे. १३ वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्रॅम या अभ्यासक्रमाचे प्रमुख स्तंभ असून (कोडक्वेस्ट, युरोकनेक्ट, युरोफिट, युरोआर्ट, एलेव्हेट आणि इतर बरंच काही), ते प्रत्येक मुलाला फक्त शैक्षणिक यशच नव्हे, तर आयुष्यभर पुरणारा वैयक्तिक विकास साधण्यासाठी मदत करेल.

या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी केव्हीएस सेशसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्री– के विभाग (युरोकिड्स), लाइटहाउस लर्निंग म्हणाले, ‘युरोकिड्समध्ये आम्ही अगदी दोन वर्षे वयाइतक्या लहान मुलांमधली उत्सुकता आणि विचार कौशल्य विकसित करत आयुष्यभराचा पाया घालत असतो. डॉ. अनिता मदन, प्रमुख- अभ्यासक्रम विकास विभाग यांनी हेयुरेका हा लहान मुलांसाठीच्या शिक्षण क्षेत्रातील अनोखा अभ्यासक्रम तयार केला आहे. आमचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लहान मुलांना फक्त शाळेसाठीच नव्हे, तर आयुष्यभरासाठी तयार करतो व त्यांना सातत्याने बदलत असलेल्या जगासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम असतो. हा अभ्यासक्रम विचारवंत, इनोव्हेटर्स आणि उद्याच्या लीडर्सना कशा प्रकारे आकार देतो, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या नव्या अभ्यासक्रमाच्या मदतीने आम्ही पुणे व महाराष्ट्रातील आमचे अस्तित्व आणखी बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.’

या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी युरोकिड्सच्या अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुख डॉअनिता मदन म्हणाल्या, ‘हेयुरेका हा प्राथमिक शिक्षण क्षेत्रासाठी क्रांतिकारी दृष्टिकोन मांडणारा आहे. ईपिक्स फ्रेमवर्कच्या मदतीने आम्ही बुध्यांकावर (आयक्यू) लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच भावनिक, शारीरिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक पैलूंवर काम करत चौफेर विकास करत आहोत. मुलांनी केवळ प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत, तर उत्तरांवरही प्रश्न उभे करावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे उत्सुकता, वैचारिक विश्लेषण आणि भोवतालच्या जगासह सखोल नाते त्यांच्यात रुजवेल. शैक्षणिक तयारीबरोबरच हेयुरेका मुलांना नाती जोडण्यासाठी, अडचणी सोडविण्यासाठी आणि जगाशी अर्थपूर्ण पद्धतीने संवाद साधण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी चालना देणारी मानसिकता विकसित करत आहे.’

एनईपी २०२० शी सुसंगत असलेला हा अभ्यासक्रम पंचकोश किंवा मानवी अस्तित्वाचे पाच पैलू या प्राचीन भारतीय संकल्पनेवर आधारित समग्र विकासावर भर देणारा आहे. हेयुरेकामध्ये या तत्त्वांचे शैक्षणिक विचारसरणीत रुपांतर करण्यात आले आहे. युरोकिड्स आपले होमबडी अपमध्ये या अभ्यासक्रमाशी सुसंगत बदल करत असून, आकलनात्मक विकासाला पाठिंबा देणारा समृद्ध संवादी कंटेंट उपलब्ध करत समतोल स्क्रीन टाइम मिळवून दिला जाणार आहे.

२३ वर्षांचा अनुभव आणि ४०० शहरांतील १,६०० पेक्षा जास्त प्रीस्कूलचे नेटवर्क व आतापर्यंत ७,००,००० विद्यार्थ्यांचा विकास करत, युरोकिड्स लहान मुलांना भविष्यासाठी सज्ज करण्यात आघाडीवर आहे. हा अभ्यासक्रम युरोकिड्सची सर्वसमावेशक विकास झालेले लर्नर्स तयार करण्याची बांधिलकी अधोरेखित करणारा असून, त्यामुळे प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान अधोरेखित झाले आहे.

महिला अत्याचारा विरोधात जनजागृतीसाठी ‘मिस, मिसेस,मिस्टर,किड्स इंडिया ईलाईट – इंडिया आयकॉन २०२४’ फॅशन शो संपन्न

पिंपरी: बलात्कार करणाऱ्याला काठोरात कठोर शिक्षा करा.., गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या .., महिला सुरक्षेसाठी काटिबद्ध रहा .., असा संदेश देत महिलांवरील अत्याचारा बाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला.

कशीश सोशल फाउंडेशन आणि कशीश प्रोडक्शनच्या वतीने विष्णुप्रिया 7 आर्ट, Ak’s जगदंबा ज्वेलर्स यांच्या सहकार्याने  मिस,मिसेस,मिस्टर, किड्स इंडिया ईलाईट – इंडिया आयकॉन २०२४’फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो एल्प्रो मॉल सभागृह, चिंचवड येथे पार पडला. यामध्ये महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला. यावेळी  प्रमुख पाहूणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ( पिंपरी – चिंचवड शाखा) अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, Ak’s जगदंबा ज्वेलर्सचे डॉ. अजयकुमार कारंडे, देव झुंबरे, गणेश गुरव,ब्रॅंड अॅबेसिडर सोना म्हात्रे, प्रश्विता बेहळे, आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांसह सिनेमा,फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पॅडमॅन योगेश पवार म्हणाले, अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की असे प्रकार घडण्या पासून थांबवणे. या फॅशन शो च्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत.आशा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला आसावा.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर गांभीर्याने सांगितलेली माहिती कितपत पटेल हे सांगता येत नाही, मात्र प्रबोधनात्मक किंवा मनोरंजक पद्धतीने सांगितले तर लोक स्वीकारतात असे अनेकदा दिसते. पॅडमॅन योगेश पवार यांनी फॅशन शो च्या माध्यमातून समाजातील अत्यंत ज्वलंत विषयाला हात घातला आहे, महिला अत्याचारांविरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची आज गरज आहे. पवार देशभर राबावत असलेले कार्य आदर्शवत आहे.  

महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात ‘महिला सुरक्षा’ या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात आला. यामध्ये मॉडेल्सनी  आणि आयोजकांनी महिला सुरक्षे  विषयी संदेश फलक घेवून रॅम्प वॉक केला. तसेच यामध्ये स्पर्धकांनी विविधतेतून एकता संदेश देत भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत त्या त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या फॅशन शोमध्ये घडले.अंजली रघुनाथ वाघ, अर्चना माघाडे, दीपाली मुंढरे, ह्यांनी मॉडेल्स ला शिकवायला योगेश पवार ला सहाय्य केले. संपूर्ण भारतातून  ३ वर्षे वयोगट ते ५५ वर्षे असे एकूण ७५ स्पर्धकांना ह्या कार्यक्रमामध्ये निवडण्यात आले होते


विजेते – कार्तिकी बत्ते ,जोहान,डॅनियल मुजावर,शरयू पाटील ,सारा ,जरीन इराणी ,दीपाक्षी,जितेश पवार…उपविजेते- खुशी मोहिते,शिवण्या काकडे,अद्वित राजवडे,जेनिसा,भुवी डेंगळे, पोर्णिमा अंबार्गे ,जिया देवारे,प्रियांका मानकर, टीना शहा,अर्जुन झुंबरे,सुजल अग्रवाल

‌‘सहेला रे – आ मिल गाएं..‌’ मैफलीचे आयोजन

ऋत्विक फाउंडेशनतर्फे शनिवारी

भीमसेन जोशी, गानरसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक मानवंदना

डॉ. राधिका जोशी, अभिषेक काळे यांचे होणार गायन

पुणे : भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे सांगीतिक मानवंदना दिली जाणार असून या निमित्त शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी ‌‘सहेला रे – आ मिल गाएं ..‌’ या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मैफल सायंकाळी 6 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, प्लॉट नं. 17, वेद भवन मागे, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आली असून यात जयपूर-अत्रैली घराण्याच्या गायिका डॉ. राधिका जोशी आणि किराणा घराण्याचे गायक अभिषेक काळे यांचे गायन होणार आहे. डॉ. राधिका जोशी या पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या असून त्यांना पद्मविभूषण गिरीजादेवी यांचेही मार्गदर्शन लाभलेले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच ठुमरी, दादरा, कजरी, होरी या गायन प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. अभिषेक काळे यांचे गायनातील प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई स्वाती काळे यांच्याकडे झाले असून पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि पंडित शरद बापट यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत, गझल आणि बंदिशींच्या सादरीकरणातून भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक मानवंदना दिली जाणार आहे. कलाकारांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), मालू गांवकर (हार्मोनियम), प्रथमेश तारळकर (पखवाज), उद्धव कुंभार (साईड ऱ्हिदम) साथसंगत करणार आहेत. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे निवेदन आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍च्या समन्वयक रश्मी पाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

भारत-इस्रायल कामगार सहकार्य नवीन उंचीवर, इस्रायल भरती मोहिमेसाठी आयटीआय औंध, पुणे येथे मोठी गर्दी

पुणे- भारत आणि इस्रायल यांच्यातील धोरणात्मक कामगार भागीदारीने एक नवीन रोमांचक टप्पा गाठला आहे कारण हजारो कुशल भारतीय कामगार आयटीआय औंध, पुणे येथे दुसऱ्या फेरीच्या भरती मोहिमेसाठी जमले आहेत. ही मोहीम १७ सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे, आंतरराष्ट्रीय कामगार सहकार्याच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

या महत्त्वाकांक्षी भरती मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी १२ इस्रायली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ भारतात आले. त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे, ज्याचा उद्देश इस्रायलच्या वाढत्या कुशल बांधकाम कामगारांच्या मागणीची पूर्तता करणे आणि भारतीय प्रतिभेला अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय करिअर संधी देणे आहे.

सध्याची भरती फेरी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा येथे यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या मोहिमेच्या यशावर आधारित आहे. आतापर्यंत, सुमारे ४,८०० भारतीय कामगार इस्रायलमध्ये तैनात झाले आहेत, ज्यांना सुमारे रु. १.३२ लाख प्रति महिना आणि रु. १६,००० चा मासिक बोनस मिळत आहे. पहिल्या तुकडीतील आणखी १,५०० कामगार १८ सप्टेंबर २०२४ रोजी इस्रायलला रवाना झाले, ज्यामुळे इस्रायलमधील कुशल भारतीय व्यावसायिकांची एकूण संख्या ५,००० पेक्षा जास्त झाली आहे.

या सकारात्मक परिणामांनी प्रेरित होऊन, इस्रायली नियोक्त्यांनी त्यांच्या भरती लक्ष्यांचा विस्तार केला आहे, या फेरीत आणखी १०,००० उमेदवारांची मागणी केली आहे. चौकटी, लोखंड वाकवणे, प्लास्टरिंग आणि सिरेमिक टाइलिंग या चार महत्त्वाच्या कौशल्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.

हा उपक्रम भारत आणि इस्रायल यांच्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ऐतिहासिक सरकार-टू-सरकार (जी२जी) कराराचा फल आहे. महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे, आयटीआय औंध येथे आवश्यक पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक समर्थन प्रदान केले आहे. उपसंचालक आणि प्रभारी संयुक्त संचालक रमाकांत भावसार आणि त्यांची टीम संस्थेत भरती प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, भारताच्या कौशल्य कार्यक्रमांना जागतिक रोजगार मागण्यांशी संरेखित करण्याचे सुनिश्चित करत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उमेदवार इस्रायलमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी चांगले तयार आहेत.

ही भरती मोहीम भारताच्या उच्च-गुणवत्तेच्या मानव संसाधनांचा जागतिक पुरवठादार बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कामगारांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते, विशेषत: श्रम-प्रधान उद्योगांमध्ये भारतीय कौशल्याचे मूल्य असलेल्या देशांमध्ये.

या उपक्रमाला गती मिळत असताना, आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेसाठी एक शक्तिशाली उदाहरण स्थापित करते आणि राष्ट्रांमधील सहकारी भागीदारीचे परस्पर फायदे दर्शवते. या कार्यक्रमाच्या यशामुळे भविष्यात अशा अनेक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जागतिक कुशल कामगार क्षेत्रात भारताची भूमिका अधिक मजबूत होईल

Adfactors