Home Blog Page 659

व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे देशात घुसखोरीला प्रोत्साहन – ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे सातुर्डेकर व मोरे महाराज यांना पुरस्कार

पिंपरी, पुणे (दि. ७ ऑक्टोबर २०२४)
भारतामध्ये सद्यस्थितीला सहा कोटी पेक्षा जास्त घुसखोरांची संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षितता, एकता, अखंडता धोक्यात आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हा एक देशद्रोह व संघटित अपराध आहे. हे रोखण्यासाठी देशात पुरेसे कायदे आहेत, परंतु त्याची कडकपणे अंमलबजावणी होत नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनीच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून देशातील शिक्षण व कायदा व्यवस्था बदलण्यासाठी काम केले पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले.
रविवारी (दि.६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्व. संजय आर्य स्मृती दिनानिमित्त आद्य पत्रकार देवर्षी नारद राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना आणि स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे यांना
ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. संजय उपाध्ये, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ॲड. उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, सुहास पोफळे, दत्तात्रय सूर्यवंशी, अतूल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, मनोज गोबे, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक पंडित धर्मवीर आर्य आणि हरिकृष्ण वाफता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, भारताला इंग्रज, मुघलांनी लुटले नाही एवढे भ्रष्टाचाऱ्यांनी लुटले आहे. त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. भ्रष्टाचार, धर्मांतर, जनसंख्येचा विस्फोट, युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि अश्लीलता यामुळे देश आतून पोखरला जात आहे. भारतातील ९ राज्य, २०० जिल्हे १५०० तालुक्यांमध्ये हिंदू लोकसंख्या अल्प प्रमाणात आहे, याला वरील कारणे जबाबदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी केली होती. त्यांच्यामुळेच मुघलांना दक्षिणेवर आक्रमण करणे शक्य झाले नाही, आजही दक्षिणेमध्ये बालविवाह, घुंगटप्रथा किंव्हा रात्रीचे विवाह होत नाहीत. पाश्चात्य संस्कृतीचे प्रमाण उत्तरेत जास्त आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आता पुढार्‍यांच्या आश्वासनांना बळी न पडता शिक्षण आणि कायदा व्यवस्थेत बदल करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे असेही ॲड. उपाध्याय म्हणाले.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले की, जातीजातींमधला भेदभाव दूर करून सर्वांनी हिंदू म्हणून ओळख निर्माण करावी. तसेच अध्यात्मिक भेदभाव देखील संपला पाहिजे तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल.
सत्काराला उत्तर देताना पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी लेखणी हाती घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात वाचकांना आदर्श लोकशाहीचे धडे देण्यासाठी, देशवासीयांचे जीवन सुकर करण्यासाठी पत्रकारांनी चांगली कामगिरी केली. आणीबाणीतील अत्याचारांविरोधात जनजागृती, बोफोर्स प्रकरण, तहलका प्रकरण, शिवानी भटनागर प्रकरण, टू जी, स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा अशा अनेक विषयांना पत्रकारांनी वाचा फोडली. मात्र गेल्या काही वर्षापासून व्यावसायिकतेचा अतिरेक झाल्याने व चुकीच्या व्यक्ती पत्रकारितेत आल्याने पत्रकारितेचे अध:पतन होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता व रामशास्त्री प्रभुणेंचा करारी बाणा हे आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी लागेल. त्यासाठी वाचक शक्तीचा दबाव महत्त्वाचा आहे.
स्वागत कृष्णकुमार गोयल, प्रास्ताविक व मानपत्र वाचन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

 तीन वर्षांत मर्स्कच्या भारतीय महिला खलाशांची संख्या  41 वरून  350 च्या वर  

मुंबई, 7 ऑक्टोबर 2024 : ए.पी. मूलर – मर्स्क (मर्स्क) ही लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक इंटिग्रेटर कंपनी असून, आज भारतात त्यांच्या ‘इक्वल ॲट सी’ उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची घोषणा कंपनीने केली. 2024 मध्ये ऑनबोर्ड केलेल्या 45% नॉटिकल आणि इंजिनीअरिंग कॅडेट्स महिला असल्याने, कंपनीने तिच्या कॅडेट प्रवेशामध्ये समान लिंग प्रतिनिधित्वाच्या 2027 च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.

भारतीय सागरी क्षेत्रातील लैंगिक समानतेच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढविणे

2022 मध्ये सुरू झालेला ‘इक्वल ॲट सी’ उपक्रम भारतात उल्लेखनीय यश मिळवून तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. मर्स्क खलाशांमध्ये लैंगिक समानता प्राप्त करणे, खलाशांमध्ये महिलांचे ऐतिहासिक कमी प्रतिनिधित्वाच्या समस्येचा सामना करणे आणि लैंगिक विविधता सुधारण्यासाठी संपूर्ण भारतीय सागरी क्षेत्रासाठी एक परिसंस्था निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम संपूर्ण उद्योगातील विविध भागधारकांना एका समान व्यासपीठावर आणतो, जो विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी, उद्योगातील आव्हाने समजून घेण्यासाठी, एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती लागू करण्यासाठी केंद्र म्हणून काम करतो. 

डेन्मार्कचे भारतातील राजदूत महामहिम फ्रेडी स्वेन म्हणाले“समुद्राला लिंग कळत नाही. सागरी कारकीर्दीतील विविधतेला चॅम्पियन करून, मर्स्क केवळ समानतेकडेच चालत नाही तर जहाजबांधणी उद्योगात नावीन्य आणि वाढीसाठी एक आदर्श तयार करत आहे. डेन्मार्क आणि भारत या दोन्ही सागरी राष्ट्रांनी या बदलाचे नेतृत्व केले पाहिजे. ते पुढे म्हणाले, “महिलांसाठी सागरी करिअरमध्ये अधिक संधी निर्माण करण्याचा हा उद्योग-व्यापी प्रयत्न निःसंशयपणे आमच्या जागतिक शिपिंग समुदायाला बळकट करेल आणि पुढील वर्षांमध्ये प्रगती आणि टिकाऊपणा वाढवेल.”

मर्स्कच्या मरीन पीपलचे प्रमुख, आशिया करण कोचर म्हणाले, “आमच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि उद्योगाकडून मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे समुद्रात महिलांच्या भरभराटीसाठी एक समान वातावरण निर्माण करण्याचे भविष्य लक्षात येऊ लागले आहे. आमच्या उपक्रमांद्वारे आम्ही भारतातील अधिकाधिक महिलांना करिअर म्हणून समुद्री प्रवास निवडण्यासाठी यशस्वीपणे प्रेरित केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मर्स्क आणि संपूर्ण उद्योगात महिलांची संख्या 45% पर्यंत पोहोचणे हा एक चांगला सांघिक प्रयत्न आहे आणि आता हीच वेळ आहे की, भरती केलेल्या महिलांनाही ताफ्यात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.”

मुंबईत आज झालेल्या ‘इक्वल ॲट सी’ परिषदेने लिंग विविधता आणि समावेशावर चर्चा करण्यासाठी सागरी उद्योगातील लीडर्सना एकत्र आणले. महामहिम फ्रेडी स्वान, भारतातील डॅनिश राजदूत यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. परिषदेत तीन प्रमुख विभागांचा समावेश होता: सस्टेनेबल इक्वॅलिटी : गोइंग बियाँड दी ऑन बोर्डिंग – यातून परस्परसंवादी चर्चेद्वारे कार्यस्थळ संस्कृती आणि छळवणूक शोधली; सी-साइड चॅट – नॉट ऑल सीलिंग्स आर मेड ऑफ ग्लास – यात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांची एट्री याविषयी चर्चा झाली, याशिवाय ऑल वुमन ऑन बोर्ड : मिथ अँड रिअॅल्टी याविषयीही सविस्तर चर्चा झाली. सर्वसमावेशक सागरी उद्योगाला चालना देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून, मर्स्कच्या विविधतेच्या उपक्रमांवरील प्रगती अहवालाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

भारतातील प्रमुख उपलब्धी आणि टप्पे

  1. भारतीय महिला नाविक : अलीकडील कॅडेट समावेशांसह, भारतीय महिला खलाशांची संख्या 2021 मध्ये केवळ 41 वरून 350 चा आकडा ओलांडली आहे, ज्याने भारतातील मर्स्कच्या नाविक लोकसंख्येतील विविधता सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  2. समुद्री आणि अभियांत्रिकी प्रवाहात प्रगती: या वर्षीच्या प्रवेशातील महिला कॅडेट्सची एकूण टक्केवारी 45% वर गेली आहे आणि नॉटिकल विभागात आधीच 50% ओलांडली आहे.
  3. महिला रेटिंग कार्यक्रम: 2023 मध्ये ‘इक्वल ॲट सी’ या उपकार्यक्रमाच्या रूपात सुरू झालेल्या या उपक्रमाची सुरुवात भारतातील 22 महिला प्रशिक्षणार्थींनी केली. त्याच्या यशावर आधारित मर्स्कने त्यानंतरच्या दोन अतिरिक्त बॅचेस जोडल्या व आता एकूण 70 महिला रेटिंग प्रशिक्षण घेत आहेत.

जागतिक प्रभाव

भारतातील ‘इक्वल ॲट सी’ उपक्रमाच्या यशाने लिंग विविधता सुधारण्यात मर्स्कच्या जागतिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मर्स्कच्या ताफ्यातील महिला खलाशांची संख्या 2021 मध्ये 295 वरून 650 हून अधिक झाली आहे आणि 2024 मध्ये मोजली जात आहे. मर्स्कच्या जागतिक खलाश पूलमधील महिलांची टक्केवारी 2022 मध्ये 2.3% वरून 2024 मध्ये 5.5% झाली आहे.

रयत विचारवेध संमेलनाचे २१ ऑक्टोबला आयोजन

प्रकाश रोकडे यांची माहिती; ‘रयतेपासून रयतेपर्यंत’वर चंद्रकांत दळवी यांची मुलाखत
पुणे, ता. ७: विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या रयत विचारवेध संमेलनामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्र‌कांत दळवी यांची ‘रयतेपासून रयते‌पर्यंत’ या विषयावर प्रकट मुलाखत, विश्वबंधुता साहित्य संमेल‌नाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृतमहोत्सवी सत्कार व डॉ. सविता पाटील लिखित ‘विश्वबंधुतेचे सुवर्णपर्व’ पुस्तकाचे प्रकाशन असा त्रिवेणी संगम अनुभवता येणार असल्याची माहिती रयत विचारवेध संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

प्रकाश रोकडे म्हणाले, “नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये २१ ऑक्टोबर २०२४ रोजी हे संमेलन होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलींग मेनकुदळे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होईल. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अरुण आंधळे आणि डॉ. सविता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. चंद्रकांत दळवी यांच्या ‘रयतेपासून रयतेपर्यंत’ या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होईल. दळवी यांच्याशी प्रा. शंकर आथरे आणि संगीता झिंजुरके मुक्त संवाद साधतील.”
“दुपारच्या सत्रात पल्लवी उमरे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी सह‌भागी होतील. ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोक‌कुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रभंजन चव्हाण, बंडोपंत कांबळे व प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे,” असेही प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.

माता-पित्याच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद: विठ्ठलशेठ मणियार

पुणे : “आई वडिलांचे संस्कार, त्याग, समर्पण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. पण माता-पित्याचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद आहे. आपल्या मातापित्याचा समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा सुषमा व संजय चोरडिया यांनी घेतेलेला वसा कौतुकास्पद आहे,” असे मत प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे रतनबाई व बन्सीलाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण रविवारी करण्यात आले. ऍड. एस. के जैन व कुटुंबियांना पहिला ‘बन्सी-रत्न आदर्श परिवार राष्ट्रीय पुरस्कार’, तर आशाबाई व रमणलाल लुंकड दाम्पत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शोभा धारिवाल यांना ‘समाजरत्न’, पोपटलाल ओस्तवाल यांना ‘समाज शिरोमणी’, सुभाष ललवाणी यांना ‘समाजभूषण’, माणिक दुग्गड यांना ‘गुरुसेवा’ व शेखर मुंदडा यांना ‘मानवसेवा’ राष्ट्रीय पुरस्कार-२०२४ प्रदान करण्यात आला.  पुरस्काराचे हे सातवे वर्ष होते. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी जैन समाजातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
बिबवेवाडी येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकावासी जैन श्रावक संघामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी होते. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार, माजी हवाईदल प्रमुख एअरमार्शल भूषण गोखले, संगीतकार अबू मलिक, ब्रह्मकुमारीजचे बी. के. दशरथ भाई, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, प्राचार्य अजित शिंदे आदी उपस्थित होते.
विठ्ठल मणियार म्हणाले, “बन्सीलाल व रत्नबाई माझे जवळचे स्नेही होते. चोरडिया परिवाराचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. नाना पेठेत मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदात वावरणाऱ्या चोरडिया यांनी चांगल्या पदाची नोकरी सोडून पिढी घडविण्याचे काम हाती घेतले आहे. तेही मी अतिशय जवळून पाहिले आहे. आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा संजय व सुषमा यांचा उपक्रम स्तुत्य आहे.”

आचार्य डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, “इथे सन्मानित झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सेवेचा सन्मान आहे. भारतीय संस्कृती सेवा, त्याग व समर्पणाची आहे. अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करून नव्या पिढीला घडविण्याचे काम संजय व सुषमा चोरडिया करत आहेत. त्यांच्यातील सकारात्मक विचाराने आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत आहे.”

एअरमार्शल भूषण गोखले म्हणाले, “समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे. सूर्यदत्त शिक्षण संस्था नव्या पिढीमध्ये ही भावना रुजवण्याचे काम करत आहे. त्यासाठी समाजात ज्यांनी चांगले काम केले आहे, अशा लोकांना विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांना सन्मानित करत आहे. त्यातून चांगल्या पिढीचे निर्माण होण्यास मदत होईल.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सामाजिक व धार्मिक कार्यातून ज्यांनी आम्हाला घडवले त्या माता-पित्याच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सोहळा आयोजिला जातो. यंदापासून समाजातील आदर्श परिवाराचा व गुरुसेवा करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात  येत आहे. आईवडिलांनी दिलेला संस्कार, शिकवण पुढील पिढीला देत राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी ‘सूर्यदत्त’ नेहमीच पुढे राहील.”

शोभा धारीवाल म्हणाल्या,” आपण भावी पिढीला संपत्तीसह झाड लावण्याचे संस्कार द्यावेत. संपत्ती जगण्यासाठी आवश्यक असली, तरी त्यापेक्षा आपल्याला ऑक्सिजन अधिक महत्वाचा आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून कार्यरत राहावे. आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात मला योगदान देता येत आहे, याचा आनंद वाटतो. रसिकलाल धारीवाल यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

ऍड. एस. के. जैन म्हणाले, “संजय चोरडिया व सूर्यदत्त परिवार सूर्याप्रमाणे सर्वांच्या जीवनात प्रकाश पसरवण्याचे काम करत आहे. आपण सर्वांनी त्यांचे अनुकरण करायला हवे. समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी घ्यावी.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. मनीषा कर्नावट व प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले. अबू मलिक व सहकाऱ्यांच्या गायन मैफलींनी उपस्थितांची मने जिंकली.

कृषीविषयक संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बारामती, दि.७: शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य प्रकारे भाव मिळण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे होणारे नुकसान टाळण्याकरीता कृषी विषयक संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

कृषी विकास ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र माळेगाव येथे ‘रोटरी क्लब’च्यावतीने आयोजित ‘ग्रीन गोल्ड’ दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिबीरास पालघर, ठाणे, पुणे येथील शेतकरी उपस्थित होते. त्याचबरोबर रोटरीच्या प्रकल्प संचालक मनीषा कोंडसकर, विभागीय व्यवस्थापक रश्मी कुलकर्णी, प्रतीक्षा माई, वृषाली खिरे, डॉ. संजीव जैन, डॉ. सुनीता जैन आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतकरी कल्याणाच्या वीज देयकात माफी, महिलांना कृषी विषयक बाजारपेठेत स्थान मिळण्याकरीता लखपती दीदी योजना आदी योजना राबविण्यात येत आहे. त्याकरीता पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कृषी विभाग, ॲग्रोवन, कृषी विषयावर काम करणाऱ्या संघटनेच्यामार्फत या योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडी बाजारामुळे शेतकरी ग्राहकाला थेट शेतमाल विक्री करता येते. शेतकरी आठवडी बाजारापेठेत पूर्व मागणी (प्री-आर्डर) घेण्याबाबत विचार करण्यात यावा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कृषी विषयक कामाबाबत केंद्र सरकारच्यावतीने पुरस्कार प्रदान केला आहे. कृषी विषयक प्रकल्प, संशोधन, कृषी उद्योग तसेच बियाणे, खते, औषधामधील भेसळ आदीबाबत जनजागृती करण्याकरीता प्रशिक्षाणार्थी आणि शेतकऱ्यांचे मंच, व्यासपीठ निर्माण झाले पाहिजेत, कृषी पर्यटन क्षेत्रातही काम करावे. उत्पादक शेतकरी आणि पुरवठादार यांचा समन्वय, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याकरीता पुढाकार घेण्यात यावा.

कृषी विद्यापीठामार्फत सेंद्रीय शेतीवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत असून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर द्यावा. पशु आरोग्य महत्त्वाचे असून याबाबत शेतकऱ्यांसाठी शास्त्रशुद्ध दृष्टीकोनाचे व्याख्यान आयोजित करावे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात यावी, कृषी वाचनालये स्थापन करण्याबाबत पुढाकार घ्यावा. या बाबींचा कृषी क्षेत्राला लाभ होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

शाश्वत विकासाच्या उदिष्टपूर्तीकरीता काम करावे
तापमान, अतिवृष्टी, निसर्गाचे बदलणारे चक्र यासारख्या बाबींचा कृषी घटकावर परिणाम होतो. त्यामुळे शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी शेतकऱ्यांशी निगडित 17 उदि्दष्टांविषयी व्याख्यात्यांनी या शिबीरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. आगामी काळात शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीकरीता काम करावे, कृषी विभागाच्यावतीने राज्यात क्षेत्रनिहाय पीकपद्धती घेण्याबाबत नियोजन केले असून त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या भागाचा विचार करुन पिके घ्यावीत, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कृषी विज्ञान केंद्रात करण्यात येणारे विविध संशोधन, प्रकल्प, कलमे, रोपे, प्रशिक्षण, अन्न प्रकिया केंद्र आदीबाबत माहिती जाणून घेतली.

श्रीमती कोंडुसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सशस्त्र माओवादी कॅडरची २०१३ मधील ५५० ही संख्या २०२४ मध्ये अवघी ५६-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली -येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली डावी कडवी विचारसरणी प्रभावित क्षेत्राच्या सुरक्षा व विकासाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी  नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले,’ राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत माओवादविरोधी अभियान अधिक तीव्र झाले आहे. सशस्त्र माओवादी कॅडरची २०१३ मधील ५५० ही संख्या २०२४ मध्ये अवघी ५६ झाली आहे. गत ६ वर्षात ९६ सशस्त्र माओवादी मारले गेले, १६१ पकडले गेले तर ७० जणांनी आत्मसमर्पण केले.माओवाद्यांची पुरवठा साखळी राज्याने तोडली आहे. प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाले आहे. अबुझमाड ते एमएमसी झोनपर्यंतच्या त्यांच्या विस्तारास मोठा धक्का बसला आहे. एकाही व्यक्तीची #माओवादी संघटनांत नव्याने भरती झाली नाही. सुरक्षा दलाचा सदस्यही शहीद झाला नाही.

नक्षलग्रस्त भागात रस्ते #पायाभूत सुविधा, इंटरनेट नेटवर्क, उद्योग, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात प्रभावी विकास कामे झाली आहेत. #कोनसरी येथे २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह लॉयड मेटल्स लिमिटेडसोबत सामंजस्य करार झाला आहे. यामुळे सुमारे १० हजार लोकांना रोजगार मिळेल.सूरजागड इस्पात लिमिटेड १० हजार कोटी रुपये खर्चून अहेरी तहसीलमध्ये एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करणार आहे. यामुळे आणखी सात हजार स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आदिवासी तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने गडचिरोलीमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि प्रशिक्षण यासाठी एक अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे केंद्र वर्षाला ४८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे

मोहनवीणा, बासरी आणि संतूर वादनाची जुगलबंदी अन्‌‍ ‌‘जसरंगी‌’ने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय

पुणे : सुरेल गायन तसेच मोहन वीणा, बासरी आणि संतूर वादनाची जुगलबंदी आणि संगीत क्षेत्रातील अनोखा प्रकार जसरंगी यांच्या सादरीकरणाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय झाली. निमित्त होते येरवडा परिसरातील प्रतिष्ठित एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेल्या स्वरयज्ञ महोत्सवाचे.
मैफलीची सुरुवात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सायली तळवलकर यांनी श्री रागातीलन ‌‘वारी जाऊँ सावरिया‌’ आणि ‌‘साँझ भयी आवो‌’ या दोन बंदिशीने झाली. यानंतर तळवलकर यांनी पं. कुमार गंधर्व यांनी रचलेला तराणा प्रभावीपणे सादर केला. गानसरस्वती यांनी अजरामर केलेला संत तुकारामांचा ‌‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल‌’ हा अभंग सादर करून तळवलकर यांनी रसिकांना विठ्ठलनामात दंग केले. त्यांना विनायक गुरव (तबला), तुषार केळकर (संवादिनी), शुभम शिंदे (पखवाज), अबोली सेवेकर, योगिती ढगे (तानपुरा) साथ केली.
पं. पॉली वर्गिस (मोहन वीणा), डॉ. नरेश मडगांवकर (संतूर), पं. प्रकाश हेगडे (बासरी) यांच्या अनोख्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. राग यमनमध्ये आलाप, जोड, झाला सादर करून तिनही कलाकारांनी अतिशय सुरेल, दमदार वादन केले. बासरीचे अलवार सूर, मोहन वीणेचा धीरगंभीर आवाज आणि संतूर वाद्यातून उमटलेली सुरांची नजाकत यांचा सुंदर मिलाफ या त्रिवेणी संगमातील जुगलबंदीने रसिकांना अनुभवायला मिळाला. तबलासाथ समीर सूर्यवंशी यांनी केली.
त्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीतात सुप्रसिद्ध गायक पं. जसराज यांची संकल्पना असलेल्या ‌‘जसरंगी‌’ हा प्रकार सादर करण्यात आला. ‌‘जसरंगी‌’ गायन प्रकार हा मूर्छना पद्धतीवर आधारित असून यात स्त्री व पुरुष कलाकार एकाच वेळी वेगवेगळ्या साथीदारांसह दोन स्वतंत्र राग सादर करताना एकमेकांच्या गायनाला पूरक सादरीकरण करतात असे सांगून डॉ. अविनाश कुमार आणि डॉ. रिंदाना रहस्या यांनी राग मधुकंस आणि चंद्रकंस या रागांची खुमारी उलगडत सुरेल, बहारदार सादरीकरण केले. जसरंगीचे अनोखे सादरीकरण करून रसिकांना नाविन्यतेची आनंदानुभूती दिली. मैफलीची सांगता डॉ. कुमार व डॉ. रहस्या यांनी स्वत: रचलेल्या आणि देवीस्तुती रागांचे नावे गुंफलेली रागमाला ऐकवून केली. डॉ. अविनाश कुमार यांना विनायक गुरव (तबला), उपेंद्र सहस्त्रबुद्धे (संवादिनी) यांनी तर डॉ. रिंदाना रहस्या यांना मुक्ता रास्ते (तबला), तुषार केळकर (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार एस. एन. बी. पी. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, प्राचार्या रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात मिरज येथील शतायुषी अहमदसो अब्बासो सतारमेकर यांचा विशेष सत्कार डॉ. डी. के. भोसले व डॉ. वृषाली भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

ॲड. सोनावणे यांच्या लेखनातून नव आंबेडकरवादाची मांडणी : डॉ. श्रीपाल सबनीस

लेखक, प्रकाशक ॲड. डी. बी. सोनावणे यांच्या सात पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : आंबेडकरी चळवळीत कालौघात शिरलेले काही नकारात्मक मुद्दे परखडपणे मांडण्याचे महत्त्वाचे कार्य ॲड. डी. बी. सोनावणे यांनी केले आहे. त्यांनी मानवतावादी दृष्टीने केलेली वैचारिक मांडणी हा नव आंबेडकरवाद म्हणावा लागेल, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे काढले.
लेखक, प्रकाशक ॲड. डी. बी. ऊर्फ दादासाहेब सोनावणे लिखित सात पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. पवन साळवे, ॲड शारदा वाडेकर, केशव गाडे, सुहासिनी धिवार, राहुल मकरंद हे मान्यवरही व्यासपीठावर होते.
माणुसकीचा मार्ग सांगणारा बुद्ध, डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीतील राजकीय आणि सामाजिक नेते, हिऱ्यांचा व्यापारी, चिखलातील कमळ, माझी पत्नी रोहिणीस सलाम, कविता माझ्या मनातल्या आणि कॉन्ट्रिब्युशन ऑफ सायंटिस्ट टोवर्डस्‌‍ मॅनकाईंड या सोनावणेे लिखित सात पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. संविधानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. सबनीस म्हणाले, सोनावणे यांच्याकडे अनुभवांची समृद्धी आहे, लेखकाचे चिंतन आहे. बुद्धीचे वैभव आहे. बुद्ध, महावीरांचा वारसा आहे. या साऱ्याला मानवतावादी दृष्टिकोनाचा पाया असल्याने त्यांनी आंबेडकरी चळवळ आणि विचार यांचे तर्कशुद्ध पण परखड परीक्षण केले आहे, जे गरजेचे होते. सोनावणेे यांच्याकडे ते धाडस आहे, सत्याची चाड आहे. द्वंद्वात्मक जगात वावरताना जे संघर्ष जगभरात घडत आहेत त्यातून मानवता भयभीत झाली आहे. अशा वेळी भगवान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी दिलेले विचारधन कालसुसंगत पद्धतीने पुन्हा मांडण्याचे कार्य सोनावणेे यांनी केले आहे. प्रबोधनाला पुढे नेणारा हा मार्ग आहे आणि ही विधायक भूमिका आहे.
प्रास्ताविकात ॲड. सोनावणे यांनी स्वतःची जडणघडण सांगितली. मी शिक्षणासाठी नोकऱ्या केल्या, वकील झालो. मुंबईत आल्यावर व्यावसायिक कारकीर्द घडली. जगताना आलेले अनुभव सांगण्यातून लेखन सुरू झाले, असे ते म्हणाले. प्रत्येक पुस्तकाच्या निर्मिती आणि आशयाचीही त्यांनी माहिती दिली. काही भावी लेखन प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, सोनावणे यांच्या लेखनातून सामाजिक भान व भोवतालचे वातावरण यांचे नेमके चित्र दिसते. मराठी साहित्यात एक नवे दालन उघडणारे दलित चळवळीचे परखड विश्लेषण त्यांनी केले जे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल. मराठी साहित्यात सोनावणे यांच्या लेखनाने नवे प्रबोधन दालन उघडले आहे. दलित चळवळीची सद्यस्थिती आणि चळवळीला आलेली उद्विग्नता तसेच झालेले अंध:पतन यांचे सोनावणे यांनी अक्षरशः शवविच्छेदन केले आहे,‌’.
प्राजक्ता सोनावणे यांनीही वडिलांविषयी मनोगत व्यक्त केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब जाधव यांनी स्वागतगीत सादर केले तर बी. आर. प्रक्षाळे यांनी आभार मानले.

 शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला तोटाच

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणीचे निष्कर्ष

पुणे-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विभाजन आणि फुटीचा भाजपला तोटाच होत असून आगामी काळातही तोटाच होण्याचा संभव असून पक्षाच्या मतांच्या प्रमाणात घट होऊ शकते असा निष्कर्ष सर्वेक्षणातून निघत आहे. केवळ सत्तेसाठी संख्येची जुळवाजुळव करण्याइतपतच ठीक आहे मात्र मतदारांच्या समोर जाताना स्थानिक पातळीवर राजकीय मिश्रण रुचताना दिसत नाही. मागील निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांचे मतांचे प्रमाण पाहिल्यास फाटाफूट आणि विभाजनानंतर दोन्ही गटांचे एकत्रित मतांचे प्रमाण वाढलेले असून खरा राजकीय लाभ मिळाल्याचे स्पष्ट होते. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना(ठाकरे) गटाचे मतांचे प्रमाण 16.72 टक्के तर शिवसेना शिंदे गटाचे मतांचे प्रमाण 12.95 टक्के होते यांची एकूण मतांचे 29.67 टक्के प्रमाण आहे तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) मतांचे प्रमाण 10.27 टक्के तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मतांचे प्रमाण 8.6 टक्के होते यांची एकूण मतांचे 18.87 टक्के प्रमाण आहे. दोन्ही गटांच्या पक्षांचे एकूण 48.54 मतांचे प्रमाण होते. भाजपचे 26.18 टक्के प्रमाण जवळपास स्थिरावले आहे तर काँग्रेसचे देखील 16.92 मतांचे प्रमाण स्थिरावले आहे. बंडाळीचा खरा लाभ कोणाला होत आहे हे भाजप व काँग्रेसने अभ्यासने महत्वाचे आहे. हे गणित समजणे जरा कठीण जाऊ शकते त्यासाठी सविस्तरपणे खुलासा अहवालात पाहू शकता. राज्यातील राजकीय उलथापालथ होण्यास जबाबदार भाजपला ठरवले जात असून स्थानिक पातळीवर मतदारांमध्ये याचा रोष पहावयास मिळत आहे. त्याचा विपरीत परिणाम मतदानातून दिसून येईल. दरम्यान महायुतीतून लढणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धोक्याचेच असून जागावाटपात कितीही जागा मिळाल्या तरी 15 ते 20 जागांवरच गाडी अडखळणार आहे अशी राजकीय स्थिती स्थानिक पातळीवर निर्माण झालेली असल्याचे सर्वेक्षणात दिसून आलेले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविण्यात प्राविण्य मिळविलेल्या पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून राज्यात मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मतदारांचे मत आजमावून घेतले. या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल)मध्ये धक्कादायक निष्कर्ष आलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार राज्यात महाविकास आघाडीचाच सर्वाधिक प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे असा अंदाज निष्कर्षातून व्यक्त होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण भाजप-22.83% तर कॉंग्रेस-18.42% आणि शिवसेना-11.74% तर शिवसेना (उबाटा)-15.24% आणि राष्ट्रवादी-8.48% आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)-13.71 तसेच अन्य राजकीय पक्ष, अपक्ष व नोटासह 9.58% असे संभाव्य मतांचे प्रमाण राहील असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तविण्यात येत आहे. महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 43.05 टक्के इतके तर महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांच्या एकत्रितपणे मतांचे प्रमाण 47.37 टक्के इतके राहण्याची शक्यता मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) नुसार व्यक्त होत आहे.

मतदारांचा कल आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर आधारित राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांचे सर्वाधिक विजयी होण्याचे तुलनात्मक प्रमाणात (स्ट्राईक रेट) मध्ये राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष सरस ठरणार आहे. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये पक्ष निहाय भाजप पक्षाचे मतांचे प्रमाण अन्य पक्षांच्या तुलनेत जास्तीचेच राहणार आहे मात्र मागील निवडणुकांच्या तुलनेत जनाधारात घट होण्याचा संभव आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींवर स्ट्राईक रेट अवलंबून राहणार आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि प्रमुख शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील विभाजन, फाटाफूटीचा लाभ कोणाला मिळणार यासह अन्य प्रमुख निष्कर्ष प्राब संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात पाहण्यास मिळेल.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 नंतरच्या काळात राजकारणातील घडामोडींमध्ये झपाट्याने धक्कादायक बदल होत गेले. बदलत्या राजकीयदृष्ट्या समीकरणांमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात देखील अमुलाग्र बदल झाले त्याचा थेट परिणाम राजकीय पक्षांच्या जनाधारात परिवर्तीत होत गेले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील निकालापूर्वीच आत्मसन्मानाची बीजे रोवली होती असे नंतर स्पष्ट झाले होते. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 25.75 टक्के इतके होते. अर्थातच युती मध्ये निवडणूक लढवली होती. शिवसेनेने १२४ जागा लढवून ५६ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 16.41 टक्के इतके होते.

राष्ट्रवादीने १२१ जागा लढवून ५४ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 16.71 टक्के इतके होते. काँग्रेसने १४७ जागा लढवून ४४ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 15.87 टक्के इतके होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०१ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 2.25 टक्के इतके होते. एमआयएमने ४४ जागा लढवून २ जागा जिंकल्या होत्या. मतांचे प्रमाण 1.34 टक्के इतके होते. शेकापने २४ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 0.97 टक्के इतके होते. स्वाभिमानी पक्षाने ५ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण 0.40 टक्के इतके होते. वंचित बहुजन आघाडीने २३६ जागा लढवून एकही जागेवर यश मिळाले नाही मात्र मतांचे प्रमाण 4.58 टक्के इतके होते. राष्ट्रीय समाज पक्षाने ६ जागा लढवून अवघी १ जागा जिंकली होती. त्यांच्या मतांचे प्रमाण केवळ 0.15 टक्के इतके होते.

निकालानंतर शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली आणि आघाडीच्या पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत बंड होऊन 2 गटांमध्ये विभाजन झाले यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार व उद्धव ठाकरे यांच्याकडे उर्वरित आमदार राहिले. शिवसेनेपाठोपाठ कालांतराने राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गटांमध्ये विभागणी होऊन अजित पवार यांच्या गटाकडे 40 आमदार तर उर्वरीत आमदार शरद पवार यांच्याकडे राहिले. भाजपने शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट एकत्रितरीत्या महायुती नावाने सत्ता उपभोगत असून सार्वजनिक लोकसभा निवडणुकांना प्रथमच सामोरे गेले आणि जनतेने त्यांच्या विरोधात कौल दिला. बहुतांश जागा महायुतीला गमवाव्या लागल्या आहेत त्यामुळे प्रामुख्याने भाजपला धक्का बसला आहे. मुळातच महायुतीचे राजकीय मिश्रण मतदारांना रुचले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राजकारणात जसे वारे वाहते तसा पक्षांतराचा प्रवाह प्रवाहित होतो आणि महाविकास आघाडीकडे राजकीय महत्वाकांक्षा असलेले उपेक्षित नेते आकर्षित झालेले पहावयास मिळत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सद्यस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुड फीलचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक घटकांच्या विविध मागण्या व विरोधाचा परिणाम महायुतीच्या पराभवात दिसून आला त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना मतदारांचा कल कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेकडून करण्यात आला. मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) मध्ये स्थानिक पातळीवरील मतदारांची व राजकीय पदाधिकाऱ्यांची सद्यस्थितीत असलेले मत आजमावून घेतले त्याचा निष्कर्ष अहवालात दिलेला आहे.

मतदारांनी दिलेल्या कल व पसंती नुसार राजकीय पक्षांच्या मतांचे प्रमाण वरीलप्रमाणे विषद करण्यात आलेले असून साधारण स्ट्राईक रेट प्रमाणे जागा मिळतील यामध्ये 2 ते 7 टक्के कमी-जास्त होऊ शकतात. भाजप- 65 ते 70 तर शिवसेना(शिंदे)- 25 ते 35 आणि राष्ट्रवादी(अजित पवार)- 15 ते 20 तसेच अन्य घटक पक्ष- 5 ते 10 असे महायुतीचे किमान 110 तर कमाल 135 पर्यंत संभाव्य जागा येऊ शकतील असा निष्कर्ष निघत आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस- 55 ते 60 व शिवसेना(ठाकरे)- 35 ते 40 आणि राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)- 60 ते 65 तसेच आघाडीतील घटक पक्ष व अन्य- 3 ते 13 असे महाविकास आघाडीचे किमान 153 तर कमाल 178 पर्यंत संभाव्य जागा येऊ शकतील असा निष्कर्ष या ओपिनियन पोल मधून निघत आहे. यामध्ये जागावाटप व अन्य परिणामकारक घाडमोडीनंतर बदल होऊ शकतात.

2019 च्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र विधानसभेतील एकूण 288 जागांपैकी रिक्त झालेल्या 6 मतदारसंघात पोटनिवडणुका घेण्यात आल्या तर लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने 7 आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने सद्यस्थितीत सदर जागा रिक्त आहेत तर कॉंग्रेसच्या एका आमदाराने राजीनामा देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने एक जागा रिक्त असून अन्य काही जागांमध्ये निधनाने रिक्त आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून कोणत्या पक्षाकडे जागा जाते हे निश्चित झाल्यानंतर लढत स्पष्ट होईल तेव्हा संभाव्य अंदाजातील अचूकता निष्पन्न होईल. मतदारांचा कल जाणून घेताना राजकीय पक्ष आणि स्थानिक पातळीवरील प्रमुख पदाधिकारी यांची पसंती आजमावून घेतली जाते त्यावरून संभाव्य मतांचे प्रमाण ठरते. प्राब संस्थेकडून मतदानपूर्व जनमत चाचणी (ओपिनियन पोल) घेऊन स्थिती स्पष्ट केलेली असून स्थानिक पातळीवर पक्षांतर, बंडखोरी, उमेदवारी वाटप, सामाजिक समीकरणांवर तेथील संभाव्य यश अवलंबून राहणार आहे. या सर्वेक्षणाचा जागावाटप व उमेदवार निवडीसाठी राजकीय पक्ष व इच्छुकांना उपयुक्त अहवाल आहे. या अहवालाच्या आधारावर उमेदवारीवर दावा केला जाऊ शकतो व सत्य वस्तुस्थिती काय आहे हे देखील स्पष्ट होते.

महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, चौथी आघाडी, वंचित, मनसेसह यांचा तसेच सामाजिकदृष्ट्या मराठा, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम या प्रमुख घटकांचा देखील समावेश सर्वेक्षणात अंतर्भूत केलेला आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे दि, 7 ऑक्टोबर: आपल्या धडाडीच्या पत्रकारितेने सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच, समाजातील असंख्य वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आले होते. या पत्रकारांनी तीन दशकांहून अधिक कालावधीत शोध पत्रकारिता करीत, चुकीच्या गोष्टींचा प्रखर विरोध केला. त्याचप्रमाणे विविध मुद्द्यांवर अग्रलेखाद्वारे समाजाच्या भावना मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक मुद्द्यांवर परखडपणे लिखाण केले आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांना समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर (मुंबई), ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे(पुणे), बाळासाहेब बडवे (पंढरपूर), आचार्य प्रा. डॉ. रतनलाल सोनाग्रा(अहमदनगर), डॉ.सुकृत खांडेकर (मुंबई), जयप्रकाश दगडे (लातूर), राजा माने (मुंबई), डॉ. सुब्रतो रॉय (पुणे), विनायक प्रभू (मुंबई) आणि मोहम्मद वजीरुद्दिन (मुंबई)यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि पदक देऊन सन्मान करण्यात आला.
 पत्रकारांचा सन्मान करून, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने एकप्रकारे समजाचा सत्कार करण्याचे काम केले आहे. यावेळी पत्रकारितेचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित असल्याने, त्यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांनी व्यक्त केली
यावेळी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस आणि या परिषदेचे मुख्य समन्वयक प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविक करीत, कार्यक्रमाची भूमिका विषद केली.  प्रा. डॉ. मिलिंद पत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

नवरात्रोत्सवा निमित्त विविध मंडळाना स्पीकर सेट भेट देण्याचा क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चा उपक्रम – संदीप खर्डेकर.

पुणे-गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवितानाच कर्णकर्कश डीजे न लावता सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अश्या पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या विविध मंडळाना क्रिएटिव्ह फाउंडेशन व वेस्टर्न इंडिया फोर्जिंग प्रा. लि. कंपनीच्या वतीने स्पीकर सेट भेट देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमांस क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर, कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, तसेच महिला उत्सव प्रमुख सौ. कल्याणी खर्डेकर,सौ.अक्षदा भेलके,सौ. श्वेताली भेलके, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, बाळासाहेब टेमकर, आर पी आय ( आठवले ) चे वसंतराव ओव्हाळ, केशवराव पवळे इ मान्यवर उपस्थित होते.
सध्या उत्सवांचे स्वरूप विभत्स होत असून त्यामागचा सामाजिक आशय नष्ट होत आहे, अश्या परिस्थितीत केवळ कायद्याचा धाक दाखवून बदल होणार नाही तर मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणे आणि चांगले कार्यक्रम करणाऱ्या मंडळाना प्रोत्साहन देण्यातूनच बदल घडेल असे संदीप खर्डेकर म्हणाले.या प्रसंगी शनी मारुती मंडळाचे प्रमुख सचिन पवार,शुभम पेंढारे, राज पेंढारे, आकाश पाडेकर,
जयदीप मंडळाचे संदीप मोकाटे,हर्षल मोहिते, हर्षल कुसाळकर, सौरभ पवार,नवनाथ मंडळाचे रामभाऊ भिसे, ओम नवनाथ मंडळाचे शंतनू खिलारे, हर्षवर्धन खिलारे, वैभव तनपुरे, शुभम चोरगे, साहिल साळवी,राजबाग मंडळाचे समीर फाले, ओंकार शिंदे, निहाल सातपुते,सुजीत फाले,छत्रपती शिवाजी मंडळाचे विनायक गायकवाड, संतोष गायकवाड, अचानक मित्र मंडळाचे विशाल टिळेकर,सोहन मोतीवाले,किरण पोळेकर,यश बोराडे,खिलारेवाडी मित्र मंडळाचे निखिल धिडे,अनिकेत साठे, स्वामी ठोंबरे, रोहन जोशी, अथर्व साठे,कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे मिलिंद सातपुते, नवनाथ शिंदे, यासह इतर मंडळाना ही भेट देण्यात आली. यात स्पीकर सेट, दोन कॉर्डलेस माईक, एक वायर माईक चा समावेश असून त्याला वायफाय व पेनड्राइव्ह घालण्याची देखील सोय देखील आहे.
दिवाळी दरम्यान काही स्वयंसेवी संस्थांना देखील अशीच भेट देणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगतानाच शनी मारुती मंडळाचे सचिन पवार व ओम नवनाथ मंडळाचे शंतनू खिलारे यांनी यापुढे देखील विधायक कार्यक्रमांवर भर देणार असल्याचे सांगितले.तसेच आपले उत्सव अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे प्रमुख अरुण जिंदल यांनी जाहीर केले.

चंद्रकांतदादांच्या बाणेरमधील दांडिया उत्सवात,प्राजक्ता माळीला सेल्फीचा मोह आवरेना, बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दांडिया हा नवरात्रोत्सवातील आनंद साजरा करण्याचे माध्यम- नामदार चंद्रकांतदादा पाटील

पुणे-नवरात्रोत्सवानिमित्त बाणेर मध्ये ५-६ दोन दिवस दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास बाणेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अबालवृद्ध, तरुण-तरुणी सारेच या महोत्सवात उत्साहात सहभागी झाले होते. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या उपस्थितीने तरुणाईच्या जल्लोषात आणखीनच भर घातली.

महायुती सरकारने यंदाही निर्बंधमुक्त वातावरण नवरात्रोत्सव असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गरबा रास दांडीया या नृत्यप्रकाराची तरुणाईमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र गरबा रास दांडियांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून बाणेर-बालेवाडीमध्ये दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या महोत्सवात घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा नृत्य सादर करताना तरुण व तरुणी पारंपारिक पेहरावात सहभागी झाली.

या महोत्सवात प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही उपस्थिती लावली. यावेळी तिने फुलवंती चित्रपटातील मदन मंजिरी गाण्यावरील नृत्याविष्कार सादर करत तरुणांची मने जिंकली. प्राजक्ताच्या नृत्याविष्काराच्या विविध छटा तरुण- तरुणींनी आपल्या कॅमे-यात टिपल्या. तर लकी ड्रॉमुळे अनेकांना प्राजक्तासोबत सोल्फी काढण्याची संधी मिळाली.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, “पोटाची भूक भागल्यानंतर; मनाची भूक भागविण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची आवश्यक्ता असते. हिंदू समाजात संपन्नता असल्याने; आपला आनंद साजरा करायचा असतो. मराठी दिनदर्शिकेत प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे सण, व्रत, वैकल्याच्या निमित्ताने हा आनंद साजरा करायला मिळतो. त्यातील प्रमुख ३० सणांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी सारखे सण आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दांडिया महोत्सवास हा आनंद व्यक्त करण्याचे माध्यम आहे.”

वादग्रस्त रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला स्मरणपत्र.

रश्मी शुक्लांची मुदतवाद विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा पोहचणारी.

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२४
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उच्च पदावर असलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करतात. अशा पक्षपाती अधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडतील याबाबत शंका असल्याने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

२४ सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यात मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त राज्याच्या दौऱ्यावर असताना रश्मी शुक्लांच्या हकालपट्टीबाबत काँग्रेस शिष्टमंडळाने मागणी करून निवेदन दिले होते. परंतु अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे. या स्मरणपत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून अलीकडील नियुक्ती आणि त्यानंतर त्यांना दिलेली मुदतवाढ ही कायदेशीर नियम आणि प्रक्रियांचे उल्लंघन करणारी आहे. रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही मुदतवाढ देऊन राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केले आहे. रश्मी शुक्ला यांना दिलेल्या मुदतवाढीचे समर्थन करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा प्रकाश सिंह यांचा हवाला दिला आहे मात्र, सुप्रीम कोर्टाचा तो निकाल हा पोलीस प्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करण्यासाठीचा असून राज्य सरकारने या निकालाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय हे देशात एक धोकादायक उदाहरण होऊ शकते. उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) घालून दिलेल्या मानदंडांना बगल देऊन अशा पद्धतीने मुदतवाढ दिल्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो. भविष्यात इतर राज्यातही अशाच पद्धतीने नियुक्त्या केल्या जाण्याची भिती आहे.
रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे दिसून येते तसेच यात पारदर्शकता नसल्यामुळे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिल्याने संशय निर्माण झाला आहे. राज्य सरकारचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा आहे. अशा पद्धतीने एका कलंकित अधिकाऱ्याला मुदतवाढ दिल्याने सरकारच्या निष्पक्षता आणि निष्पक्षतेवरील विश्वास आणखी कमी होतो. रश्मी शुक्ला यांना दिलेल्या मुदतवाढीचा तात्काळ आढावा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी कोल्हापूरच्या अजित संधे यांच्या घरी दिलेल्या भेटीचे फोटो पहा …


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शनिवार दिनांक ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यात उचगाव येथे टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी संधे यांच्या स्वयंपाक घरात जाऊन हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, तुरीची डाळ व भाकरी बनवली व त्यांच्यासोबत जेवण केले.

राहुल गांधी यांनी तुकाराम संधे व अंजना तुकाराम संधे यांच्याशी यावेळी तासभर चर्चा केली. शाहू पटोले आणि तुकाराम संधे यांच्याशी जाती आणि भेदभावाच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलताना दलित आहाराबद्दल जागरूकता नसणे आणि या संस्कृतीच्या दस्तऐवजीकरणाचे महत्त्व यावर राहुल गांधी यांनी चर्चा केली.

दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा गडी ठरला:हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा
इंदापूर-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाची गर्दीच विधानसभा निवडणुकीचा निकाल सांगत आहे. 2019 मध्ये आमच्या पक्षाचे एकेक नेते आम्हाला सोडून जात होते. त्यावेळी मी राज्यात सांगत होतो, अ, बक, क गेला तरी चालेल कारण, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आमच्याकडे आहे. शरद पवार नावाचे विद्यापीठ आमच्याकडे आहे.

त्यांनी एकदा नव्हे तर चारवेळा हे करुन दाखवले आहे. महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो. दिल्लीवाल्यांनी जेव्हा केव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवार यांनी त्यांना मराठी स्वाभिमान दाखवण्याचे काम केले.

जयंत पाटील म्हणाले, आज राज्यातील स्वाभिमानी माणसे शरद पवार यांच्या मागे उभी आहेत. हर्षवर्धन पाटील 2019 साली काही कारणांमुळे भाजपमध्ये गेले. पण आता ते स्वगृही परत आलेत. त्यांनी यापूर्वीच येण्याची गरज होती. पण आमच्या घरी गर्दी थोडी जास्त होती. त्यामुळे त्यांना येता आले नाही. पण आता ते आलेत याचा फार मोठा आनंद आहे.

शरद पवार बहुजन समाजाचा विचार घेऊन मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही त्यांच्यासोबत येत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणूक पाहून सत्ताधाऱ्यांना आता बहिणी लाडक्या झाल्या आहेत.

जयंत पाटलांनी यावेळी व्यासपीठावरूनच हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. ते म्हणाले, इंदापूरची जागा कोणत्याही स्थितीत आपल्याला निवडून आणायची आहे. उद्याच्या विधानसभेला इंदापूरचे हे महाशिवधनुष्य हर्षवन पाटील यांच्या प्रवेशामुळे सहज सुलभ झाले आहे. त्यांनीच हे धनुष्य हातात घ्यावे अशी आमची त्यांना विनंती आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय मला यासंबंधीची घोषणा करता येणार नाही. पण त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना याहून वेगळे काहीही सांगण्याची गरज मला वाटत नाही. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे एकप्रकारे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारीच दिल्याचे स्पष्ट झाले आहे.