Home Blog Page 658

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोरे कुटुंबियांचे पालकत्व

पुणे-सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन; शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहून महाराजांच्या आत्म्याला सद्गति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच, मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

महाराजांच्या अकस्मिक जाण्याने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज कार्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या जाण्याने केवळ वारकरी संप्रदायाचे नव्हे; तर समस्त हिंदू समाजाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अशी भावना व्यक्त करत त्यांच्या संपूर्ण पालकत्व घेतले.

दरम्यान, महाराजांच्या लहान भगिनी यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी मदत करण्यासह विवाहाची सर्व जबाबदारी घेत असल्याचे पाटील यांनी मोरे कुटुंबियांना आश्वास्त केले‌‌.

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत

0

महाराष्ट्रातील तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आढावा बैठक

कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक, एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये

महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय
प्रणाली स्थापन करावी

सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा
जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत

मुंबई, दि १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) चे महासंचालक, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) चे महासंचालक तसेच केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मोदी सरकार देशातील नागरिकांना जलद आणि पारदर्शक न्यायव्यवस्था प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे आणि एफआयआर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये.
महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायद्यांच्या धर्तीवर एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली विकसित करावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. पोलिस, सरकारी वकील आणि न्यायपालिका यांनी समन्वय साधून दोषींना शक्य तितक्या लवकर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, संगठित गुन्हेगारी, दहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवली पाहिजे, जेणेकरून या तरतुदींचा गैरवापर होऊ नये. तसेच, कारागृहे, सरकारी रुग्णालये, बँका आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदविण्याची प्रणाली विकसित करावी.
गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रला CCTNS 2.0 आणि ICJS 2.0 प्रणाली स्वीकारण्याचा सल्ला दिला आणि दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआरचे हस्तांतर सहज करता यावे यासाठी CCTNS प्रणाली विकसित करावी, असे सुचवले.
गृहमंत्र्यांनी असेही सांगितले की, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. तसेच, राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आवश्यकता आहे.
गृहमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की, प्रत्येक पोलीस उपविभागात फॉरेन्सिक सायन्स मोबाईल व्हॅन्स उपलब्ध असाव्यात आणि फॉरेन्सिक तज्ञांची भरती वेगाने करावी. यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील फिंगरप्रिंट ओळख प्रणालीला ‘राष्ट्रीय स्वयंचलित फिंगरप्रिंट ओळख प्रणाली (NAFIS)’ शी जोडावे, असेही निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. तसेच, नवीन फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हेगारांकडून जप्त केलेली संपत्ती त्वरित मूळ मालकाकडे परत करण्यासाठी एक प्रभावी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश दिले.
गृहमंत्र्यांनी पोलीस ठाण्यांचे सौंदर्यीकरण आणि सुधारणांवर भर देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा दर पंधरवड्याला एकदा आढावा घ्यावा, तर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांनी आठवड्याला एकदा याचा आढावा घ्यावा.

‘मनमोही’ रोमॅंटिक गाण्यातील सावनी रवींद्र आणि अभिजित खांडकेकरच्या अभिनयाची झलक समोर

सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या व्हॅलेंटाईन वीक दरम्यान अनेक नवनवीन प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच सर्वांची लाडकी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिच्या सुद्धा एका सुंदर अशा गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सावनीने आजवर अनेक भाषांमध्ये गायन केले आहे.तसेच मराठी आणि इतर भाषिक चित्रपटांसाठी अनेक सुमधूर गाणी गायली आहेत.
आणि आता तिने तिच्या फॅन्स साठी valentine’s days च्या निमित्ताने “मनमोही” या गाण्याची भेट दिली आहे.
यामधे फक्त गाण्यावरच ती न थांबता तिने या गाण्यात अभिनयसुद्धा केला असल्याचं पाहायला मिळतंय.

‘मनमोही’ असे या गाण्याचे नाव असून या गाण्यात सावनी रविंद्र सह सुप्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तसेच लोकप्रिय बालकलाकार केया इंगळे हिने साकारलेली भूमिका ही लक्षवेधी ठरली आहे. “मनमोही” चं सुंदर संगीत प्रणव हरिदास याचे असून वलय मुळगुंद याचे शब्द मनाला भावणारे आहेत. सावनी बरोबर या गाण्यात सुप्रसिद्ध गायक अभय जोधपुरकर याच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळते.
 ‘मनमोही’ या गाण्याची कथाही आशयघन असल्याचे पाहायला मिळते. एक मोडलेला संसार जेव्हा दुसरा व्यक्ती येऊन सावरतो आणि त्या कुटुंबाला आधार देतो याचं वर्णन या गाण्यातून करण्यात आलं आहे.

गाण्याबद्दल बोलताना सावनी म्हणाली, “या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांचा मिळालेला पाठिंबा पाहून खूप छान वाटतंय. सावनी ओरिजनल चं हे पहिलं असं मराठी गाणं आहे ज्यात मी गायन आणि अभिनयाच्या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. आजवर ‘सावनी ओरिजनल’मध्ये मी तामिळ, तेलगू, मल्याळम,बंगाली, गुजराती अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली होती पण आज मी पण मराठी गाण्यातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या गाण्यात काम करण्याचा आनंद खूपच चांगला होता. गाणं गाताना मजा आली त्याहून जास्त गाणं शूट करताना आली. या गाण्यात माझा सहकलाकार अभिजीत खांडेकर आहे. अभिजीत माझा चांगला मित्र असून बरेच दिवसांपासून आम्हाला एकत्र काहीतरी काम करायचं होतं आणि तो योग या ‘मनमोही’ गाण्यानिमित्त जुळून आलाय.

‘मराठवाडा’, ‘ब्रिक’ संघाचा विजय

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेला आजपासून सुरुवातविवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे आयोजन
पुणे : मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एमएमसीओए) आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बीएसओए) या संघांनी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्समधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.
वानवडी येथील एस. आर. पी. एफ.च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन सैन्य अधिकारी नम्रता पाटील, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू तन्वी साळवे, सचिव जितेंद्र पितळीया यांच्या हस्ते झाले. 
यात फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटातील उद्घाटनच्या लढतीत मराठवाडा संघाने भारतीय कला प्रतिष्ठान संस्थेच्या संघाचा ७-०ने पराभव केला. यात मराठवाडा संघाकडून मोहित (८, ६३ मि.), यश (११, २४, २७ मि.), चिराग (२२ मि.), थोटपे इंगशे (३२ मि.) यांनी गोल केले. यानंतर ब्रिक संघाने भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचा १-०ने पराभव केला. यात अंश अगरवालने १८व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आण सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्यातील लढत ०-० अशी बरोबरीत सुटली.
निकाल : फुटबॉल – मुली – १. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड – ० बरोबरी वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ०. २. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ० बरोबरी वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ०.
बास्केटबॉल – मुले – ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ४५ वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३५. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ३९ वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी – ३३.
मुली – मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – २७ वि. वि. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १८.
व्हॉलिबॉल – मुले – सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन २५-११, २५-१९. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पिंपरी-चिंचवड वि. वि. भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी २५-६, २५-१२. 
मुली – मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. आयोजन स्कूल ऑफ डिझाईन २५-१९, २५-१२.

शहरातील हरविलेल्या २३०० मोबाईलपैकी एकूण ४५६ मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश

तुमचा फोन हरवलाय ? सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर हे जनतेस त्यांचे फोन हरविल्यास किंवा गहाळ झाल्यास तात्काळ सी.ई.आय.आर. पोर्टलवर माहिती भरण्यास आवाहन करीत आहे.

पुणे- शहर पोलीसांनी सी.ई. आय. आर. पोर्टलच्या मदतीने लोकांचे गहाळ / हरविलेले ४५६ मोबाईल ट्रेस करुन त्यांना परत मिळवून दिल्याने याबाबत पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले जात आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’पुणे शहर पोलीस आयुक्तालया मार्फत लोकांचे हरविलेले, पडून गहाळ झालेले मोबाईल फोनची तक्रारी करण्याकरीता पुणे शहर पोलीस वेबसाईटवर लॉस्ट अॅड फाऊंड हे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आले होते. जनतेकडून सदर पोर्टलवर बयाच मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नागरीकांना प्रॉपर्टी मिसींगचा दाखला ऑनलाईन मिळतो. हा ऑनलाईन दाखला व नागरीकांचे स्वतःचे आधारकार्ड याव्दारे सी.ई.आय.आर या केंद्रीय पोर्टलवर परत हरविलेल्या / गहाळ झालेल्या फोनबाबत तक्रार नागरीकांना नोंदवावी लागते. सी.ई.आय.आर पोर्टलवर प्राप्त तक्रारीनुसार हरविलेल्या मोबाईल फोनचे आय.एम.ई.आय. क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करुन हरविलेल्या मोबाईल मध्ये सध्या सुरु असलेले सीमकार्डच्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेते. सदरबाबतची सर्व माहिती ही पोलीसांना सी.ई. आय. आर. पोर्टलव्दारे प्राप्त होते. मोबाईल हरविल्यावर नागरीकांच्या मनात रुखरुख लागलेली असते.
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा, संगणक शाखा व सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल वरील प्राप्त ट्रेस झालेल्या मोबाईल करीता संयुक्त सहा टिम तयार करुन नमुद पोर्टलवरील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन गेल्या महिन्याभरात केलेल्या कारवाई मध्ये पुणे शहरातील २३०० हरविलेल्या मोबाईलच्या तक्रारी मधील एकूण ४५६ मोबाईल फोन सापडले आहेत. यापुढे देखील पुणे शहराबाहेर ट्रेस झालेले मोबाईलचे शोधकार्य सातत्याने चालू रहाणार आहे.
दि. १४/०२/२०२५ रोजी हिरकणी हॉल, पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते हरविलेल्या मोबाईलच्या तक्रारीतील सापडलेले मोबाईल नागरीकांना परत देण्यात आले आहेत. ४५६ नागरीकांना हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांविषयी आदराची भावना व्यक्त केल्याने गेल्या महिनाभर मोबाईल शोध पथकाने केलेल्या अथक मेहतीचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर मच्छींद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, श्रीमती स्वप्नाली शिंदे, टिम-१ राहूल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, टिम-२ प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, टिम-३ चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, टिम-४ राजेंद्र पुनेकर, लटू सुर्यवंशी, समीर पिनाणे, टिम-५ इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वरी चुटके, टिम ६ किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर तसेच सुषमा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख या सायबर पोलीस ठाणे, संगणक शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली आहे.

व्हीके ग्रुपतर्फे २१ ते २३ फेब्रुवारी ला ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ प्रदर्शन व शहरीकरणावर चर्चासत्र

पुणेकरांना अनुभवता येणार व्हीके ग्रुपच्या पाच दशकांतील विविध प्रकल्पांच्या डिझाईनचा संग्रहआर्कि. हृषीकेश कुलकर्णी यांची माहिती; शहराच्या स्मार्ट व शाश्वत विकासावर होणार विचारमंथन

पुणे: आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंट, इंटेरियर डिझाईन, टाऊन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्हीके ग्रुपच्या वतीने ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. गेल्या ५० वर्षांतील आकर्षक, नाविन्यपूर्ण व वास्तुकलेच्या डिझाईन्स व प्रकल्पाच्या संग्रहाचे प्रदर्शन पुणेकरांना अनुभवता येणार आहे. दि. २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी हे प्रदर्शन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र, घोले रोड पुणे येथे सर्व पुणेकरांसाठी विनामूल्ये खुले असणार आहे, अशी माहिती व्हीके ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आर्कि. हृषीकेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर ‘पुणे आणि शहरीकरण’ याविषयी अनेक तज्ज्ञ मान्यवरांच्या चर्चासत्र, कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

याप्रसंगी व्हीके ग्रुपचे संस्थापक आर्कि. विश्वास कुलकर्णी, संचालिका आर्कि. अनघा पुरोहित-परांजपे, संचालिका सौ. अपूर्वा कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी, विद्यार्थ्यांनी, युवा व्यावसायिकांनी भेट देऊन वास्तुकलेचा आविष्कार अनुभवावा, अशी विनंती संयोजकांनी केली आहे.

आर्कि. हृषीकेश कुलकर्णी म्हणाले, “व्हीके ग्रुपने आजवर दगडूशेठ गणपती मंदिरापासून ते सौदी अरेबियातील ‘द लाईन’ मेट्रोसिटी, लोणावळ्यातील ग्रीन बटरफ्लाय हिलस्टेशनपासून नाशिकमधील ग्रेप कंट्री रिसॉर्ट आणि पुण्यासह देशविदेशात अनेक टाऊनशिप्स, सरकारी प्रकल्पाच्या युनिक डिझाईन्स साकारल्या आहेत. या सर्व डिझाईन्स या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३ वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार असून, ते आपले विचार मांडणार आहेत.”

“उद्घाटन सोहळ्यावेळी पुण्याचे शहरीकरण व विकासाचे विविध पैलू यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या संस्थांना ‘लीडर्स ऑफ चेंज’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये पुण्यातील मॉडेल समजले जाणारे मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सतीश मगर, १२५ हुन अधिक वर्षांचा शैक्षणिक वारसा असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, पुण्यातील प्रसिद्ध पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, पुण्यातील सांस्कृतिक प्रतीक सवाई गंधर्व या वार्षिक उत्सवाचे संचालक मुकुंद संगोराम यांना निमंत्रित केले आहे. त्यानंतर होणाऱ्या ‘बिल्डिंग द सिटी ऑफ टुमारो’ या विषयावरील चर्चासत्रात ‘क्रेडाई’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या पुणे चॅप्टरचे चेअरमन विकास अचलकर आपले विचार मांडणार आहेत. यावेळी ‘लंडन ऑलिम्पिक पार्क’ हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे,” असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

आर्कि. अनघा परांजपे-पुरोहित म्हणाल्या, “दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० ते ८ या वेळेत ‘आर्किटेक्चरल कलात्मक चित्रीकरण’ या विषयावर ‘द आर्च आर्ट’च्या श्वेता हिंगणे यांची कार्यशाळा होणार आहे. ‘सस्टेनेबल सिटीज अँड डायनॅमिक अर्बन प्लॅनिंग टूल्स’वर निरमा युनिव्हर्सिटीचे संचालक उत्पल कुमार शर्मा यांचे, तर ‘टाऊन प्लॅनिंग स्कीम्स-इफेक्टिव्ह अर्बन प्लॅनिंग मॉडेल फॉर लिव्हेबल कम्युनिटीज’वर व्हीके ग्रुपचे संचालक विजय साने यांचे सादरीकरण होणार आहे. ‘पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे सामाजिक उपक्रम’ या विषयावरील चर्चासत्रात वेस्टर्न रूट्सचे जयेश परांजपे, अर्बन स्केचर्सच्या गायत्री गोडसे, अमुक तमुकचे शार्दूल कदम, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या यशोदा जोशी, ऐसी अक्षरे मासिकाचे प्रकाशक समीर बेलवलकर सहभागी होणार आहेत. ऋषभ पुरोहित व त्यांचे सहकाऱ्यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे.”

“तिसऱ्या दिवशी दुपारी ३ ते ८ ‘डेटा ड्रिव्हन अर्बनायझेशन’वरील चर्चासत्रात सीआरई मॅट्रिक्सचे अभिषेक किरण गुप्ता, जेएलएल इंडियाचे आर्कि. राहुल वैद्य विचार मांडतील. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित ‘शहरी वाहतुकीचे आधुनिकीकरण: शहराच्या शाश्वत विकासात पुणे मेट्रोचे योगदान’ यावर, तर स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार ‘स्मार्ट सिटीज मिशन: यश आणि भविष्यातील दिशा’ यावर आपले विचार मांडणार आहेत. यावेळी ‘रील्स’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल,” असे सौ. अपूर्वा कुलकर्णी यांनी नमूद केले.

वय ३२ चोरल्या ५० हून अधिक दुचाक्या .. सराईत दुचाकी चोर पकडून २५ बाइक्स केल्या हस्तगत

पुणे पोलिसांची कारवाई

पुणे- वाहन चोरीचे ५० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, रा. मेमाने वस्ती, उरूळी देवाची, पुणे यास अटक करून पुणे पोलिसांनी २५ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. मागील ५ महिन्यात जेलमधून सुटल्यावर त्यने चोरलेल्या २५ दुचाक्या हस्तगत झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४३०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) हया दाखल गुन्हयाचा समांतर तपास पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते हे करीत असताना दाखल गुन्हयाचे घटनास्थळी मिळाले सीसीटिव्ही फुटेजवरून दाखल गुन्हयातील मोटर सायकल चोरणारा आरोपी हा शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, रा. मेमाने वस्ती, उरूळी देवाची, पुणे हा पोलीस अभिलेखावरील सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झालेने.
त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण करून नमुद आरोपीस इचलकरंजी, कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात असे निष्पन्न झाले की, त्याने मागिल ०५ महिन्यांचे कालावधीत जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहर परीसरातुन दुचाकी वाहने चोरी करून नमुद गाडयांच्या नंबरप्लेट काढून टाकून सदरच्या गाड्या त्याचे ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनिल कुदळे, वय २७ वर्षे, रा.मु. पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे यास त्याचे भैरवनाथ गॅरेज मु.पो. खडकी, ता. दौंड, जि. पुणे येथे विक्री करीता नेवून देत होता तसेच शंकर देवकुळे याचा तुळजापुर येथील मित्र याचेकडे ठेवण्याकरीता दिलेल्या ०२ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच शंकर देवकुळे याचे ओळखीचा इसम रा. दौंड, जि.पुणे यास विकलेली ०१ दुचाकी व त्याचेकडे विक्रीकरीता ठेवलेल्या ०४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी एकुण २५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. सदर वाहनांबाबत पुणे शहरात व इतर ठिकाणी वाहने चोरीचे एकुण १८ गुन्हे नोद असून उर्वतरी ०७ वाहनांचे मालकांचा शोध सुरू आहे.
आरोपी शंकर भरत देवकुळे वय ३२ वर्षे, हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे ५० पेक्षा जास्त वाहन चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तसेच मेट्रो स्टेशन जवळ व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाड्यांचे लॉक जुने झाले आहे अशा दुचाकी हेरून डुप्लीकेट चावी वापरून त्या चोरी करून घेवून जात होता. तसेच शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला सांगत होता की, “मी फायनान्स कंपनीत कामाला असून हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो.” त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे यास साथ देवून त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर ग्राईंडरने खराब करून त्या दुचाकी गावामधील शेतक-यांना व गरजुंना कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकत होता.

सदरची कामगिरी हीअपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर श्री. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, सपोफौ मधुकर तुपसौंदर, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, वेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांचे पथकाने केली आहे.

वनराज आंदेकर खून: ८ पिस्टल, १३ जिवंत काडतुस व ०७ कोयते, १० वाहने जप्त,२३ आरोपी अन १७०० पानाचे चार्जशीट दाखल

पुणे- माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनप्रकरणी पुणे पोलिसांनी ८ पिस्टल, १३ जिवंत काडतुस व ०७ कोयते, १० वाहने जप्त करून २३ आरोपी अटक केल्यावर आता १७०० पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले आहे.

या गुन्हयातील आरोपी संजिवनी कोमकर यांचे नाना पेठ, पुणे येथील जनरल स्टोअर्सच्या दुकानावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. सदरची कारवाई हि वनराज आंदेकर याचे सांगणेवरुन झाली असल्याचा संशय होता तसेच संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर कुटुंबियाचे वनराज आंदेकर याचे कुटुंबिया बरोबर प्रॉपर्टीवरून वाद चालु होते. त्याचा आरोपी संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांना राग होता. तसेच सन २०२३ मध्ये आदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर व इतर यांनी गुन्हयातील टोळीप्रमुख आरोपी- सोमनाथ सयाजी गायकवाड याचे टोळीतील सदस्य निखिल आखाडे याचा खुन केला होता. वरील दोन्ही कारणावरुन टोळीप्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड व संजिवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर व प्रकाश कोमकर यांनी इतर आरोपीसह माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचे खुनाचा कट रचुन दि. ०१/०९/२०२४ रोजी रात्री ०९/०० वाजताचे सुमारास सोमनाथ सयाजी गायकवाड याचे टोळीतील सदस्य आकाश म्हस्के, विवेक कदम, तुषार कदम व समीर काळे यांनी त्यांचेकडील अवैध पिस्टलमधुन माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचेवर फायरींग करुन इतर ९ आरोपींनी कोयत्याने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचेवर जिवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी करुन खुन केला आहे. गुन्हयात आरोर्पीनी वापरलेले एकूण ८ पिस्टल, १३ जिवंत काडतुस व ०७ कोयते जप्त करण्यात आले आहेत. आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या ७ दुचाकी, ३ चारचाकी वाहने सुध्दा जप्त करण्यात आली आहेत. गुन्हयात एकूण ३९ साक्षीदार तपासले आहेत. दाखल गुन्हयाचे तपासात एकूण २१ आरोपी अटक करण्यात आले असुन दोन विधी संघर्षित बालक ताब्यात घेण्यात आले आहेत. नमुद गुन्हयाचे तपासात एकूण २१ आरोपी व ०२ विधी संघर्षित बालक निष्पन्न झाले असुन २१ अटक आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दिनांक १४/०२/२०२५ रोजी गुन्हयाचे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. दोषारोपपत्रातील पानांची संख्या १७०० आहे.

दोषारोपपत्रातील महत्वपुर्ण मुददे-

सीसीटिव्ही फुटेज तीन ठिकाणचे नानापेठ घटनास्थळावरील, आंबेगाव पठार, दापोली (रत्नागिरी)

आरोपी यांचे आवाजाचे नमुने
मकोका कलम १८ चा जबाब कार्यवाही
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १८३ प्रमाणे जबाब कार्यवाही
आरोपी यांची ओळख परेड कार्यवाही
आरोपी यांचे मोबाईलवरुन एकमेकांशी झालेल्या संपर्काबाबत तांत्रिक विश्लेषण कार्यवाही
आरोपी यांचे पुर्वीचे गुन्हे रेकॉर्ड संदर्भातील कार्यवाही
गोपनिय साक्षीदाराकंडे तपास कार्यवाही
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे तपास कार्यवाही
आरोपीत यांचे संघटीत गुन्हेगारी टोळीचे स्थावर व जंगम मालमत्तेबाबतची कायदेशीर कार्यवाही, गुन्हयात वापरेलेले अवैध अग्निशस्त्र पुरवठा करणारे परराज्यातील आरोपीबाबत तपास कार्यवाही, आरोपींना गुन्हा करणेकामी मदत करणारे याबाबत तपास कार्यवाही करून पुरवणी दोषारोपपत्र पाठविण्याची तजवीज ठेवली आहे.

पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या १०० व्या जयंती निमित्त उलगडला संघर्षमय, राजकीय व सामाजिक प्रवास

पुणे – पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी दिनाच्या औचित्याने पुढील वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 200 गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलसंधारणाची आणि ग्रामीण विकासाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचबरोबर डॉ. धारिया यांचे कार्य पुढील पिढ्यांसमोर यावे यासाठी वनराई तर्फे विविध उपक्रम वनराई राबविणार आहे. भविष्यातील पर्यावरण, हवामान, प्रदूषण आदी संकटे विचारात घेता वनराई संस्थेच्या वतीने त्याविषयीची चर्चा व परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये पुण्यासह, महाराष्ट्रातील आणि भारतातील भविष्यातील समस्या निर्माण होणार आहेत, त्याविषयीच्या उपाययोजना काय करता येतील याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी वनराईचे विश्वस्त सागर धारिया, साधना धारिया श्रॉफ, सचिव अमित वाडेकर, बबन कांकीरड उपस्थित होते.

सागर धारिया म्हणाले की, खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी  २०० गावांमध्ये जलसंधारण आणि सर्वांगीण ग्रामीण विकासाचे विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. चार दशकांपूर्वी पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया तथा आदरणीय अण्णांनी भारतभूमीला पुन्हा एकदा ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवण्याच्या ध्यासातून ‘वनराई’ची स्थापना केली. लोकचळवळीतून हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्याबरोबरच जलसमृद्ध, स्वच्छ, हरित, जैववैविध्यपूर्ण आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त असा भारत घडवण्यासाठी ‘वनराई’ आज देशपातळीवर कार्यरत आहे. या कार्यमोहिमेचा भाग म्हणून नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, परिसंस्था पुनरुज्जीवन आणि शाश्वत ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत वनीकरण, मृदा-जल संधारण, कृषी-पशुधन विकास, उपजीविका, शिक्षण, स्वच्छता-आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठीचे हे रचनात्मक कार्यक्रम लोकसहभागातून राबवण्यासाठी याला पूरक-पोषक प्रबोधन होणेही तितकेच आवश्यक आहे.

अमित वाडेकर म्हणाले की, डॉ. धारिया यांची खासदार अथवा केंद्रीय मंत्री म्हणून केलेली लोकसभा आणि राज्यसभांमधील भाषणे ग्रंथ स्वरूपात प्रकाशितदेखील केली जाणार आहेत. आजच्या काळामधील परिस्थितीला अनुसरून असणाऱ्या प्रामुख्याने धोरणात्मक पातळीवर राष्ट्रीय मुद्द्यांवरचे त्यांचे विचार होते त्याचेही डॉक्युमेंटेशन केले जाणार आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून ते सध्याच्या पंतप्रधानांपर्यंत तसेच सर्व राष्ट्रपती व पंतप्रधानांबरोबर राजकीय, सामाजिक पातळीवरील त्यांचे जे पत्रव्यवहार आहेत त्याचा राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा पत्रकारिता शिकणाऱ्यांसाठी अभ्यासासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यांच्या त्या निवडक पत्रांचे संकलन करून एक पुस्तक तयार करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर डॉ. धारिया यांचे जीवन चरित्र फोटोंच्या माध्यमातून उघडण्याचा सुद्धा प्रोजेक्ट आपण करत आहोत. फोटो बायोग्राफी स्वरूपामध्ये त्यांचे जीवन चरित्र आपण मांडणार आहोत.

वनराई २.०

सध्या हवामान बदल, प्रदूषण आणि पर्यावरणाची परिस्थिती अतिशय भीषण झालेली आपण बघतो आहोत. सध्या गाव, शहर आणि देशासमोर जुन्या आव्हानाबरोबर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. त्याला तोंड देण्यासाठी आपण नव्या काही योजना आखत आहोत. वनराई संस्थेची ध्येयधोरणे तीच राहणार असून यामध्ये सायन्स आणि इन्फरमेशन टेक्नॉलॉजीची जोड कशी देता येईल विशेषत: सॉफ्टवेअर तसेच वेगवेगळे एप्लीकेशनची जोड देऊन पर्यावरण संवर्धन व ग्रामीण विकासाच्या कामांमध्ये गतिशीलता, अचूकता आणि पारदर्शकता कशा पद्धतीने आणता येईल असा प्रयत्न सुरु आहे. धारिया यांच्या कुटुंबाची तिसरी पिढीसुद्धा या सगळ्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेले आहे. नव्या ऊर्जेने म्हणजे ‘वनराई 2.0’ साकारत आहे.  याचाच आढावा जन्मशताब्दी  निमित्त घेण्यात आला.

 जन्मशताब्दी निमित्त उलगडला डॉ. धारिया यांचा संघर्षमय, राजकीय व सामाजिक प्रवास

डॉ. धारिया यांनी आयुष्यातील जवळपास ७० वर्षे देशसेवा केली. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले होते. अनेक रचनात्मक कार्यांची पायाभरणी केली. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मता या नीतीमूल्यांवर आधारित विचारधारेतून आणि ठाम भूमिकेतून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. तसेच ‘वनराई’सह विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या माध्यमातून जलसंधारण, वनीकरण, पर्यावरण, ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रांत मूलभूत योगदान दिले. यावेळी त्या योगदानांचा उजाळा उपस्थितांकडून देण्यात आला.

एक पडदा चित्रपट गृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करा !

0

तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या जिर्णोदराबाबत पंधरा दिवसात संयुक्त बैठकसांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु

मुंबई दि. 14
तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा विकास, आणि मराठी चित्रपटांसाठी एक पडदा चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे या तिन्ही विषयात आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तिन्ही विषयांत पुढील पंधरा दिवसांत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झाला.

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुरातत्व विभागामार्फत तुळजापुरच्या भवानी मातेचे मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. सोमवारी हा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.
तसेच मंदिराच्या परिसरात सध्या दोन एजन्सी मंदिर दुरुस्ती आणि डागडुजीचे काम करीत आहेत. या दोन एजन्सींमध्ये समन्वय साधून त्यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम घेण्याबाबत मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विभागाला निर्देश दिले.

मंदिराचा कळज ज्या खांबावर उभा आहे त्या खंबाना तडे गेले आहेत. त्यामुळे मंदिरांच्या मुख्य गर्भगृहाचे काम करावे लागले तर आई भवानी मातेची मुर्ती व तीच्या दैनदिन पुजा याबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, मंदिराचे पुजारी, स्थानिक, मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी बैठक घेऊन शासनाला उपाय सूचवा असेही आशिष शेलार यांनी सांगितले.

मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामे ठरविण्यापुर्वी देवस्थानाचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

रायगड विकास प्राधिकरणातर्फे ६०० कोटीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामार्फत रायगड किल्ला आणि रायगड परिसराचा विकास करण्यात येणार असून या कृती आराखड्या संबंधित सादरीकरण तयार करण्यात आले आहे. त्याचा अभ्यास करुन लवकरच रायगड प्राधिकरण, स्थानिक कलेक्टर, केंद्रिय पुरातत्व विभागाचे अधिकारी, राज्यशासनाचा पुरातत्व विभाग अशी संयुक्त बैठक घेण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

एक पडदा सिनेमागृहांसाठी सवलत योजनेचा मसूदा तयार करा !

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे वेळोवेळी मांडलेल्या समस्यांपैकी एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्येविषयी आज मंत्रालयातील दालनात चर्चात्मक बैठक घेण्यात आली. राज्यामध्ये १२०० हून अधिक एक पडदा चित्रपटगृहे असून त्यातील फक्त ४७५ चित्रपटगृहे सुरु आहेत. त्यामुळे उर्वरित सिनेमागृहांच्या सद्यस्थितीबद्दल उपलब्ध माहिती मिळवावी आणि बंद असलेली चित्रपटगृहे पुन्हा चालू करून त्यांनी फक्त मराठी सिनेमा दाखवावा आणि या चित्रपटगृहांना सवलती देणाबाबतच्या स्वतंत्र योजनेचा मसुदा तयार करण्यात यावा असे संबंधित विभागाला मंत्री ॲड. आशिष शेलार आदेश दिले.
येत्या पंधरा दिवसांत ही योजनेचा मसूदा सादर करून योजने संदर्भातील तज्ञ, थिएटर मालक, संबंधित अधिकारी या सर्वांसोबत बैठक घेऊन ही योजना जाहीर करू असे देखील मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मृतांना पुणेकरांकडून आदरांजली

पुणे:

दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे शहिदांसाठी श्रद्धांजली चा कार्यक्रम घेण्यात आला.
अतिरेक्यांनी भयानक बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला होता या घटनेला येत्या 13 तारखेला पंधरा वर्षे झाली . दरवर्षी कोरेगाव पार्कचे नागरिक आणि सामजिक कार्यकर्ते या बॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली वाहतात . आजच्या श्रद्धांजली सभेमध्ये स्थानिक नागरिकांनी मेणबत्त्या लावून या सर्व शहिदांना श्रद्धांजली दिली.
या श्रद्धांजली सभेसाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार रमेश बागवे, तसेच त्या घटनेच्या वेळेसचे कोरेगाव पार्कचे पोलीस निरीक्षक नाडगोडा सर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, तसेच क्राइम पीआय चेतन मोरे , माजी नगरसेवक बाबू वागस्कर, उमेश गायकवाड, भगवान वैराट,स्वाती शरद मोहोळ ,अभिजीत वाकचौरे, गणेश लांडगे. मिलिंद गायकवाड, बेकरीचे मालक शंकर भाऊ खरोसे, मनोज खरोसे, जनार्दन बोया, हर्ष तिवारी.पूर्णिमा लूनावत, तसेच अशोक वाकचौरे साहेब,आणि तेथील स्थानिक नागरिक महिला भगिनी उपस्थित होते. सर्वांनी या कार्यक्रमास मेणबत्ती लावून श्रद्धांजली दिली.मेरे अपने संस्थेचे बाळासाहेब रुणवाल तसेच शबनम खान यांनी आज एकदिवसीय उपोषण करत या भ्याड हल्याचा निषेध केला.१३ फेब्रुवारी २०१० साली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या यासीन भटकळ, हिमायत बेग आदी दहशतवाद्यांनी पुण्यातील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात १७ जणांचा मृत्यु झाला होता. तर, ५६ जण जखमी झाले होते. या वर्षी या हल्याला १५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एकदिवशीय उपोषण तसेच मौन ठेऊन निषेध करण्यात आला. हॅालंडच्या शूनयाम यांचे सहकारी या हल्ल्यात मरण पावले होते. त्यांच्या हस्ते सकाळी पुष्पांजली अर्पण करून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. कोरेगावपार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन रुणवाल तसेच खान यांनी उपोषण सोडले.

गेली १४ वर्षे अविरतपणे पुणेकरांकडून हल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळेत उपस्थित राहून या दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त करावा, असे आवाहन रुणवाल, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, दलित सेना संस्थेचे अध्यक्ष सुनील यादव, डॉ. मानसी जाधव, जर्मन बेकरीच्या स्नेहल खरोसे यांच्यावतीने करण्यात आले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत, अनेक पुणेकरांनी दिवसभर जर्मन बेकरी परिसरात भेट देऊन मृतांना आदरांजली वाहिली. यावेळी सुजित यादव, हरीश काकडे, पोहाज शेख, जनार्दन जगताप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सुरेश धसांकडून दगाफटका होईल असे वाटले नव्हते:मनोज जरांगेंची धस-मुंडे भेटीवर संतप्त प्रतिक्रिया

जालना-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही धसांवर खूप मोठा विश्वास दाखवला. पण त्यांनी राजकारण व सत्तेच्या आहारी जाऊन समाजाशी दगाफटका केला. आम्हाला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर ‘आकाचा आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांचा राजीनामाही मागितला होता. पण आता त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेऊन या प्रकरणी एकप्रकारे आपले शस्त्र टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे व भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीची गोष्ट माझ्या कानावर आली आहे. याविषयी माझ्याकडे जास्त माहिती नाही. त्यामुळे मला त्यावर फार काही बोलता येणार नाही. पण ही भेट झाली असेल तर फार धक्कादायक आहे. गोरगरिबांच्या लेकरांच्या न्यायासाठी आपण लढलात म्हणून या कोट्यवधी समाज बांधवांनी तुमच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला होता. हा विश्वास अजूनही आहे, पण राजकारणाच्या व सत्तेच्या एवढे आहारी जाऊन समाजाशी असा दगाफटका करणे योग्य नाही. सुरेश धस यांच्याकडून असे काही होईल याची आम्हाला कदापीही अपेक्षा नव्हती.

मनोज जरांगे म्हणाले, पत्रकारांनी एकदा सुरेश धस यांना एक प्रश्न केला होता की, पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? त्यावर त्यांनी अजिबात देणार नसल्याचा दावा केला होता. जे मला पाडायला उठले होते त्यांना मी शुभेच्छा देणार नाही असे ते म्हणाले होते. आता या माणसाने (धनंजय मुंडे) तर आपल्या समाजबांधवाचा खून केला आहे. क्रूरपणे हत्या केली. त्याला भेटण्यासाठी हे कसे गेले? हे शॉकिंग आहे. मला यावर विश्वास बसत नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे व सुरेश धस यांची एका खासगी रुग्णालयात भेट घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे बावनकुळे यांनीही ही भेट झाल्याचे मान्य केले आहे. पण मुंडे यांच्या कार्यालयाने याविषयी कानावर हात ठेवलेत. बावनकुळे याविषयी बोलताना म्हणाले की, आम्ही जवळपास 4 तास एकत्र होतो. सुरेश धस व धनंजय मुंडे हे दोघेही होते. त्यांच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत. ते दूर होतील. आयुष्यात एक काळ असतो, जो मतभेद दूर करतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. दोघेही मला भेटले. या दोघांत कौटुंबिक भेट झाली. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो.

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

१०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार

पुण्यातील गरवारे महाविद्यालयास भेट आणि आढावा

फीमाफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा; महाविद्यालयांना सूचना

पुणे-महायुती सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर आले असून, आज त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे; यासाठी राज्य सरकारने व्यवसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकूण ८४२ कोर्सेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. सदर निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देश देखील जारी केले होते. तसेच, उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती.
सदर निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला, याचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील घेण्यास सुरुवात केली असून, आज त्यांनी गरवारे महाविद्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट महाविद्यालयामधील विद्यार्थिनींशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी नामदार पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.‌ मुलींनी देखील ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून मुलींना या निर्णयाचा लाभ घेता येईल. तसेच, विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना यावेळी केली.

दरम्यान, राज्यभरातील शंभर महाविद्यालयांना अशा प्रकारे अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफीचा आढावा घेणार असून, मुंबईतील वांद्रे येथील थडोमल शहानी महाविद्यालयातून सुरुवात केली असून; पुण्यातील गरवारे दुसरे महाविद्यालय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘कमवा आणि शिका’ तत्वावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली असता; त्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, सहसंचालक प्रकाश बच्चाव हे देखील उपस्थित होते.

अजित दादा लई वक्तशीर नेता:मी धनंजय मुंडेंचा राजीनामा कधीच मागितलाच नाही म्हणाले सुरेश धस

मुंबई- मी काही अजित पवारांना वेळ मागितली नाही. मी काल नव्हे, तर परवा वेळ मागितली होती. अजित दादा वक्तशिर आहेत, मलाच त्यांच्याकडे जाता आले नाही. तसेच मी अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न हा त्यांचा पक्षाचा आहे, असे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

सुरेश धस बीडचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीतील म्हणजे 2019 ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांच्या चौकशीची मागणी करणार होते. पण अजित पवारांनी धस यांना भेटीची वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे अजित पवारांनी धस यांना भेटणे टाळले का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.पुढे संतोष देशमुख प्रकरणावर बोलताना सुरेश धस म्हणाले, आकाचे सर्व सहकारी आणि ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुखला मारले आहे ते जोपर्यंत फासावर जात नाहीत तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार आहे. तसेच अचानक बॉम्ब फोडून उपयोग नसतो. मी 73 कोटींचा बॉम्ब फोडला होता, त्याचा आता परिणाम होताना दिसत आहे. रात्रीतून आता रस्ते तयार व्हायला सुरू झाले आहे. आता पुढचा बॉम्ब फोडण्यापूर्वी अभ्यास करावा लागतो, माझा अभ्यास सुरू आहे.

तसेच पुढे बोलताना सुरेश धस यांनी सीडीआर तपासणीची देखील मागणी केली आहे. जे काही सहआरोपी आहेत, अजून बरेच सहआरोपी आहेत, त्यांच्या सीडीआर तपासायला पाहिजे, याची मागणी आम्ही करणार आहोत. महादेव मुंडे यांचे सौभाग्यवती यांना उपोषणाला बसू देऊ नये, आता सोळावा महिना सुरू झाला आहे आणि अद्यापही कारवाई झालेली नाही. सुदर्शन घुले सारखे आरोपी यांचे अनेक व्हिडिओ मिळतील ते शोधून काढले पाहिजेत, असेही सुरेश धस म्हणाले.

संतोष देशमुख हा अत्यंत हुशार माणूस होता. त्याने त्याचे गाव पाणीदार केले आहे. इतका सुंदर पोरगा तुम्ही तुमच्या दीड कोटीसाठी मारला याचे वाईट वाटते. त्याच्या गावासाठी त्याने जवळपास अनेक कोटींचे बक्षीस जिंकले आहेत. तसेच त्याचे काम पाहता भाजपमध्ये त्याला चांगले पद मिळाले असते, असेही सुरेश धस म्हणाले आहेत.

सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीच्या वृत्ताने राजकीय खळबळ

तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? सुरेश धस यांच्या सवालाने संशयाचे धुके गडद

मुंबई- भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेले होते. त्यामुळे नेमके काय झाले याची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? असा सवालही सुरेश धस यांनी पत्रकारांना केला आहे.

सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो होतो. यात वेगळी काहीच चर्चा झाली नाही. आमचा लढा सुरूच राहणार आहे. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगळे प्रकार आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. या लढ्यात काहीच फरक पडणार नाही. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? तसेच या भेटीचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका, असा सल्ला देखील सुरेश धस यांनी पत्रकारांना दिला आहे.

दरम्यान, या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची परिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवारीक भेट म्हणून भेटलो. तसेच पुढे ते म्हणाले कॉम्प्रोमाइज करायला कोणी सांगितले नाही. आमच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत.