पुणे : सुरेल गायन तसेच मोहन वीणा, बासरी आणि संतूर वादनाची जुगलबंदी आणि संगीत क्षेत्रातील अनोखा प्रकार जसरंगी यांच्या सादरीकरणाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय झाली. निमित्त होते येरवडा परिसरातील प्रतिष्ठित एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेल्या स्वरयज्ञ महोत्सवाचे.
मैफलीची सुरुवात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका सायली तळवलकर यांनी श्री रागातीलन ‘वारी जाऊँ सावरिया’ आणि ‘साँझ भयी आवो’ या दोन बंदिशीने झाली. यानंतर तळवलकर यांनी पं. कुमार गंधर्व यांनी रचलेला तराणा प्रभावीपणे सादर केला. गानसरस्वती यांनी अजरामर केलेला संत तुकारामांचा ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हा अभंग सादर करून तळवलकर यांनी रसिकांना विठ्ठलनामात दंग केले. त्यांना विनायक गुरव (तबला), तुषार केळकर (संवादिनी), शुभम शिंदे (पखवाज), अबोली सेवेकर, योगिती ढगे (तानपुरा) साथ केली.
पं. पॉली वर्गिस (मोहन वीणा), डॉ. नरेश मडगांवकर (संतूर), पं. प्रकाश हेगडे (बासरी) यांच्या अनोख्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. राग यमनमध्ये आलाप, जोड, झाला सादर करून तिनही कलाकारांनी अतिशय सुरेल, दमदार वादन केले. बासरीचे अलवार सूर, मोहन वीणेचा धीरगंभीर आवाज आणि संतूर वाद्यातून उमटलेली सुरांची नजाकत यांचा सुंदर मिलाफ या त्रिवेणी संगमातील जुगलबंदीने रसिकांना अनुभवायला मिळाला. तबलासाथ समीर सूर्यवंशी यांनी केली.
त्यानंतर भारतीय शास्त्रीय संगीतात सुप्रसिद्ध गायक पं. जसराज यांची संकल्पना असलेल्या ‘जसरंगी’ हा प्रकार सादर करण्यात आला. ‘जसरंगी’ गायन प्रकार हा मूर्छना पद्धतीवर आधारित असून यात स्त्री व पुरुष कलाकार एकाच वेळी वेगवेगळ्या साथीदारांसह दोन स्वतंत्र राग सादर करताना एकमेकांच्या गायनाला पूरक सादरीकरण करतात असे सांगून डॉ. अविनाश कुमार आणि डॉ. रिंदाना रहस्या यांनी राग मधुकंस आणि चंद्रकंस या रागांची खुमारी उलगडत सुरेल, बहारदार सादरीकरण केले. जसरंगीचे अनोखे सादरीकरण करून रसिकांना नाविन्यतेची आनंदानुभूती दिली. मैफलीची सांगता डॉ. कुमार व डॉ. रहस्या यांनी स्वत: रचलेल्या आणि देवीस्तुती रागांचे नावे गुंफलेली रागमाला ऐकवून केली. डॉ. अविनाश कुमार यांना विनायक गुरव (तबला), उपेंद्र सहस्त्रबुद्धे (संवादिनी) यांनी तर डॉ. रिंदाना रहस्या यांना मुक्ता रास्ते (तबला), तुषार केळकर (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार एस. एन. बी. पी. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, प्राचार्या रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात मिरज येथील शतायुषी अहमदसो अब्बासो सतारमेकर यांचा विशेष सत्कार डॉ. डी. के. भोसले व डॉ. वृषाली भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.