प्रकाश रोकडे यांची माहिती; ‘रयतेपासून रयतेपर्यंत’वर चंद्रकांत दळवी यांची मुलाखत
पुणे, ता. ७: विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या रयत विचारवेध संमेलनामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांची ‘रयतेपासून रयतेपर्यंत’ या विषयावर प्रकट मुलाखत, विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृतमहोत्सवी सत्कार व डॉ. सविता पाटील लिखित ‘विश्वबंधुतेचे सुवर्णपर्व’ पुस्तकाचे प्रकाशन असा त्रिवेणी संगम अनुभवता येणार असल्याची माहिती रयत विचारवेध संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
प्रकाश रोकडे म्हणाले, “नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये २१ ऑक्टोबर २०२४ रोजी हे संमेलन होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलींग मेनकुदळे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अरुण आंधळे आणि डॉ. सविता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. चंद्रकांत दळवी यांच्या ‘रयतेपासून रयतेपर्यंत’ या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होईल. दळवी यांच्याशी प्रा. शंकर आथरे आणि संगीता झिंजुरके मुक्त संवाद साधतील.”
“दुपारच्या सत्रात पल्लवी उमरे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी होतील. ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोककुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रभंजन चव्हाण, बंडोपंत कांबळे व प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे,” असेही प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.