पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोबर २०२४) पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार सायली कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी विनय लोंढे आणि रेहान सय्यद यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था ( रजि.) या संस्थेशी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील एक वर्षासाठी (सन २०२४ ते २०२५) करण्यात आली आहे.
पत्रकार संघाचे पदाधिकारी व सभासदांची मंगळवारी बैठक घेण्यात आली या बैठकीत अध्यक्ष – सायली कुलकर्णी, (माझी सखी सोबती); उपाध्यक्ष – विनय लोंढे (खरा सामना); रेहान सय्यद (शबनम न्यूज); सचिव – संतोष जराड (पीसीएमसी न्यूज); कोषाध्यक्ष – गणेश शिंदे (न्यूज २४ महाराष्ट्र); सदस्य – बापूसाहेब गोरे (माझा आवाज), विश्वास शिंदे (पुणे दर्शन), अशोक लोखंडे (पीसीएमसी न्यूज) यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाला अनेक वर्षांची परंपरा असून पत्रकार अधिवेशन, पत्रकार कार्यशाळा, दिवाळी फराळ, पत्रकारांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे असे अनेक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविले जातात. पत्रकार संघाच्या सन २०२४-२५ साठी नूतन कार्यकारिणी निवड झाल्याने पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सायली कुलकर्णीउपाध्यक्षपदी विनय लोंढे, रेहान सय्यद
एसबीपीआयएम ने नॅकचे ए प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा विश्वस्तांच्या हस्ते सत्कार
पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोंबर २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन नुकतेच प्राप्त केले आहे. हे मानांकन मिळणे म्हणजे पीसीईटीच्या विश्वस्तांनी एसबीपीआयएमच्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे. त्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, समन्वयक डॉ. अमरीश पद्मा व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी सांगितले की, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना २००९ मध्ये करण्यात आली. संस्थेने नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एनबीए) मानांकन या पूर्वी पहिल्या फेरीत पटकावले होते. आता या महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ‘ए प्लस’ ही श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या दुसऱ्याच फेरीत प्राप्त केली आहे. शैक्षणिक प्राविण्य, संशोधन व नवनिर्माण, व्यवसायाभिमुखता आणि सामाजिक बांधिलकी या चतु:सुत्रीवर संस्थेची वाटचाल सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्वांगीण विकासावर महाविद्यालय भर देत असल्याने ‘नॅक’च्या परीक्षणात यश मिळणे ही त्याची पावती आहे. सर्व विश्वस्तांचे सहकार्य आणि अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे योगदान यामुळे हे मानांकन प्राप्त झाले. येथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे व्यवस्थापन शाखेला प्रवेश घेताना विद्यार्थी व पालक नेहमीच एसबीआयएमला प्राधान्य देतात.
प्रसाद ओक, मंदार आगाशे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार
याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांची उपस्थिती
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक व निर्माता प्रसाद ओक आणि सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संस्थेचे उपेंद्र केळकर, सचिन पंडित, चैतन्य सराफ, अपूर्वा देवगावकर, मंजुषा वैद्य,अजय कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, आशिष भावे आदी उपस्थित होते.
टिळक स्मारक मंदिर येथे शनिवार, दिनांक १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी संस्थेच्या युवा महिला अध्यक्ष व खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी या देखील उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे, संकर्षण क-हाडे आदींना देण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे.सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.
पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : मनिष आनंद
–शिवाजीनगरमध्ये परिवर्तनासाठी जनता सज्ज असल्याचा केला दावा
पुणे : गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं दोनवेळा भाजपच्या हातात सत्ता दिली मात्र भ्रष्ट नेत्यांनी या मतदार संघाचं अक्षरश: वाटोळे केले आहे. निष्क्रिय आणि अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत खूप मागे पडला आहे, अशी खंत मनिष आनंद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. पाच वर्षे गायब असलेले आमदार पुन्हा आता प्रकट होतील आणि नेहमीप्रमाणेच आश्वासनांचा पाऊस पाडतील. मतदारांना आमिषं दाखवतील. पण जनता सुज्ञ आहे. मतदारराजा पुन्हा पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनिष आनंद हे शिवाजीनगर मतदार संघात कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आज शिवाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
मनिष आनंद म्हणाले की,शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील समस्यांची मला जाण आहे. खडकी छावणी परिषदेचा सदस्य म्हणून १२ वर्षे काम पाहिले आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून ६ वर्षांचा अनुभव आहे. याशिवाय पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच स्व. सुरेंद्र आनंद मेमोरिअल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे करत आहे. सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा नेता म्हणून लोकांशी नाळ जुळलेली असल्याचेही मनिष आनंद यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत शिवाजीनगर मतदारसंघातील नागरी प्रश्न अधिक बिकट बनले आहेत. प्रंचड वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, अपूरा पाणीपुरवठा, कच-यांचे ढीग, वाढती गु्न्हेगारी, प्रदुषण अशा नागरी प्रश्नांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शिवाजीनगरमध्ये परिवर्तन हवे आहे.
हा मतदारसंघ पुण्याच्या मध्यभागी येतो. या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधा पुरविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. शहरी भागात वाहतूक कोंडीसारखा विषय खूपच संवेदनशील बनला आहे. यासाठी मेट्रोचे कारण पुढे केले जात असले तरी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र १० वर्षात सत्ताधाऱ्यांना तेही करता आले नाही. मतदारसंघात एकही सरकारी हाॅस्पिटल नाही, येथील नागरिकांना ससून किंवा खासगी हाॅस्पिटल्सवर अवलंबून राहावे लागते. या मतदार संघात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जो लोकप्रतिनिधी दहा वर्षात नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही, ते मतदार संघाचा सर्वांगीण विकास करू शकतील? असा सवालही मनीष आनंद यांनी केला.
शिवाजीनगर मतदार संघाला लागलेलं हे ग्रहण सोडविण्यासाठी कॉग्रेसच्या माध्यमातून मला काम करायचे आहे. जनतेने पाहिलेले मतदार संघाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे. केवळ सत्तेच्या मागे लागलेल्या लोकप्रतिनिधींना याचाही विसर पडला आहे की, आपण ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे, त्याचं नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ ‘ आहे. हिंदुत्वाचा डंका पिटणाऱ्या भाजपाला मतदारसंघाचे नाव बदलून ते ‘छत्रपती शिवाजीनगर’ करावे, असे कधीच का वाटले नाही? कारण त्यांचे हिंदुत्व खोटे आणि फक्त मते मिळविण्यापुरतेच आहे. निवडणुका आल्या की त्यांचे हिंदुत्व जागे होते आणि मते मिळाली की सोयीस्करपणे सगळं विसरून जातात. मला संधी मिळाली तर मी पहिल्यांदा मतदार संघाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजीनगर असे करेन.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी मला असं एक स्टेडियम उभारायचं आहे, जिथं सर्व प्रकारच्या खेळांचे तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळेल. जिथं खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक असतील. अत्याधुनिक सोयीसुविधा असतील. मतदारसंघात मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. वस्तीसुधाराचे महत्वाचे काम करायचे आहे. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला असल्याने महिला प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी करणार असल्याचे मनिष आनंद म्हणाले.
वसाहतीकरण, आर्थिक विकास, बेरोजगारी, व्यवसायिकरण वाढलं आहे. मात्र लोकप्रतिनिधीचे जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष नाही. जनतेनं आपल्याला दोनवेळा आमदार केलं, आता तिसऱ्या वेळेला पण आपणच निवडून येऊ, अशा भ्रमात ते आहेत. मात्र ते विसरले आहेत की, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला शिवाजीनगरमधून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. विश्वासघात करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही असंही मनीष आनंद म्हणाले. शिवाजीनगर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. एक नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं की जनतेला सुखी, समाधानी आणि सुरक्षित जीवनाचा आनंद घेता यावा. त्यासाठी काम करणार असल्याचे मनीष आनंद यांनी यावेळी सांगितले.
समुत्कर्षची कोथरुड मधील रंगकर्मींना दिवाळी भेट!
५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध
आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कार्ड वाटप
पुणे- महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेने कोथरुड मधील रंगकर्मींना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष भेट दिली असून, ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या कार्डचे वाटप करण्यात आले.
दिवाळीला आता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गडबड सुरू आहे. मात्र, रंगभूमीची मनोभावे सेवा करणाऱ्या नाट्यकला जिवंत ठेवणाऱ्या, पण वयामुळे घरीच असलेल्या आणि लोकांच्या दृष्टीने काहीशा विस्मृतीत गेलेल्या ज्येष्ठ नाट्य कलावंतांनाही दिवाळीचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी कोथरुड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठेने विशेष पुढाकार घेतला आहे.
या अंतर्गत कोथरुड मधील ज्येष्ठ रंगकर्मींना ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा ग्राहक पेठेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे रंगकर्मींना मोठा आधार मिळाला आहे. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या कार्डचे वाटप करुन धान्य उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, सचिव गणेश मोरे, उपसचिव सौ अश्विनी कुरपे, उप खजिनदार मनोज माझिरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ फाटके
संचालक मोनिका जोशी समुत्कर्ष फाऊंडेशनच्या वनिता काळे, शशिकला मेंगडे, धनंजय रसाळ, पार्थ मठकरी यांच्या सह ज्येष्ठ रंगकर्मी, बॅक स्टेज आर्टिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुपाली चाकणकरांच्या बाबतीत जी तत्परता दाखविली ती दीपक मानकरांच्या बाबतीत का नाही दाखविली ? दादा गटात असंतोष,राजीनाम्यांचा वर्षाव
पुणे : रुपाली चाकणकर यांना मुदत संपण्यापूर्वी पुन्हा महिला आयोगाचे अध्यक्षपद देण्यासाठी जी तत्परता दाखविली ती दीपक मानकर यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी का नाही दाखविली ? असा सवाल करत नेत्यांनाच जर कार्यकत्यांची पर्वा नसेल तर नको ते शहर अध्यक्षपद .. मी शनिवारी या पदाचा राजीनामा देतो असा स्पष्ट इशारा आज अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे.
अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या पुणे शहरातील ६०० पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या एकूणच परिस्थितीवर दिपक मानकर यांनी काल कोणतीही भूमिका मांडली नव्हती. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने दिपक मानकर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. त्या पार्श्वभूमीवर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडताना म्हटले की, मी मागील ४० वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली आणि पदांना न्याय देण्याच काम केले आहे. त्याच दरम्यान मागील दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे.या संपूर्ण कालावधीत माझ्यावर अजित पवार आणखी जबाबदारी देतील असे वाटत होते. त्याबाबत सांगायचे झाल्यास माझ्यासह शहरातील कार्यकर्त्यांना वाटत होते की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत माझे नाव असेल पण माझ्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे काल असंख्य कार्यकर्ते नाराज होऊन त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी देखील माझ्या पदाचा राजीनामा देत असून यापुढील काळात मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. ज्यावेळी राज्यपालांकडे नावे पाठविण्यात आली त्यावेळी तरी किमान दादांनी मला विचारले पाहिजे होते. मात्र त्याबाबत विचारणा केली नाही. त्यामुळे दादांना एकच विचारायचे की, दादा मी कुठे कमी पडलो हे सांगावे, मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून शहरात कायम आपला कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार आहे. येत्या दोन दिवसात अजित पवार यांची भेट घेणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस इलियास नाईकवाडी यांना अजितदादांनी संधी दिली. त्यांचे पक्ष संघटनेतील कार्य किती आहे याबाबत मला माहिती नाही. या दोन सदस्यांपैकी छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली असून यांच्याच कुटुंबात किती पदे देणार, हा प्रश्न मनात येतो. तर इद्रिस इलियास नाईकवाडी यांच्या कामाबाबत माहिती नाही. पण एवढेच वाटते की, मी कुठे कमी पडलो हे दादांनी सांगावे ही विचारणा करित त्यांनी नाराजी व्यक्त केली.मानकर पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली आहेत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद किती आहे याबाबत मुरलीधर मोहोळ यांना देखील दादांनी विचारावे, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जेवढी तत्परता रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात दाखवली तसेच त्यांच्याकडे महिला प्रदेश अध्यक्ष पद का? राज्यात त्यांच्यापेक्षा अधिक कर्तुत्ववान महिला आहेत ना, जेवढी रुपाली चाकणकर यांचे पद वाढवून देण्याबाबत तत्परता दाखवली तेवढी माझ्याबाबत का नाही दाखवली नाही, असा सवाल मानकर यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला.
आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघ विजयी
पीसीसीओई मध्ये बास्केटबॉल स्पर्धा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोबर २०२४)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि
पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या
आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघाने विजेतेपद पटकावले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (दि. १४ व १५ ऑक्टोबर) येथे झालेल्या या मुलींच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा या चार संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झाली होती. या स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात आल्या.
अंतिम सामन्यात पुणे शहर संघाने व पुणे जिल्हा संघावर ३६ विरुद्ध २२ या गुणफरकाने विजय मिळवला. सिया खिलारे, मानसी निर्मलकर, चैतन्या रोळे यांच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर पुणे शहर संघाने तीनही सामने जिंकून विजेतेपद पटकावले. तसेच सृष्टी लंगोट, पूर्वा भिरुड, संपदा सावंत, समीक्षा पाटील यांच्या उत्कृष्ठ खेळामुळे पुणे जिल्हा संघ दोन सामने जिंकून द्वितीय स्थानी राहिला.
स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डिन एचडी डब्ल्यू डॉ.पद्माकर देशमुख, विद्यापीठ प्रतिनिधी किशोर घडीयार, निवड समिती अध्यक्ष प्रा. शैलेंद्र कांबळे, सदस्य प्रा. आशिष तळेकर, अर्जुन मेहता आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे.
स्पर्धेचे नियोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी केले.
यशस्वी संघांचे व स्पर्धकांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
लाडकी बहिण कार्यक्रमाला कोणी टच करायला गेला तर त्याचा कार्यक्रमच होणार – CM एकनाथ शिंदे
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा निशाणा-
मुंबई-अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. हे दोन पानांचे रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.
एक व्यक्ती परदेशामध्ये जाऊन देशाची बदनामी करतच आहे. मात्र राज्यातील विरोधी देखील राज्याची बदनामी करत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. विरोध करावा, आरोप करावेत, मात्र जे काम चांगले आहे. त्याला चांगले म्हटले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे. आमच्या सरकारच्या 60 ते 70 कॅबिनेट बैठका झाल्या आहेत. यामध्ये 900 निर्णय घेण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आधी वर्षावर कोण जात होते? किती जणांना त्याची परवानगी होती? हे सर्वांना माहिती आहे. असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आम्ही लोकांसाठी लगेच सही करतो. मात्र पहिले मुख्यमंत्री पेन देखील ठेवत नव्हते, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. बालहट्टासाठी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली होती. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
विरोधक गडबडलेले – अजित पवार
विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. आरोप करताना विरोधकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे. आमच्या योजनांना अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातील जनतेचा मिळाला आहे. त्यामुळे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण घाबरलेले असल्याचा आरोप देखील करत आहेत. मात्र, मी गडबडले असल्याचे म्हणेल, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी होणारच नसल्याचा आरोप विरोधक करत होते. मात्र आता अडीच कोटी महिलांच्या खात्यात महिलांचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे विरोधकांना बहिणीच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल पचणी पडत नसल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ते निवडणुकीपुरतेच पैसे मिळणार असल्याचे म्हणत आहे. मात्र, या योजनेसाठी तरतूद करण्यात आली असूनही पैसे महिलांना मिळत राहणार असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.
निवडणुकीनंतर टोलमाफी मागे घेतली तर खबरदार…. राज ठाकरे
मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. पण त्याचवेळी त्यांनी सरकारला निवडणुकीनंतर हा निर्णय रद्दबातल केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही दिला. सरकारचा टोलमाफी देण्याचा निर्णय स्वागतारार्ह आहे. पण सरकारने निवडणुकीनंतर हा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न करू नये. असे होणार नाही आणि मनसे तसे होऊही देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटरवरील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना दिलेल्या टोलमाफीच्या सवलतीचे स्वागत केले. ते म्हणाले, राज्यात मनसेनेच सर्वप्रथम टोलमाफीची मागणी केली होती. या प्रकरणी जनतेची कशी फसवणूक होत आहे? हे आम्ही लोकांना पटवून दिले. यासाठी सातत्याने भूमिका मांडली. त्यानंतर आता मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवर टोलमाफी जाहीर झाली आहे. याविषयी मी सरकारचे अभिनंदन करतो व आभार मानतो. सरकारला उशिरा का होईना या गोष्टी समजल्या.
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या तोंडावर टोलमाफी करायची आणि निवडणूक संपली की पुन्हा हा निर्णय मागे घ्यायचा असे चालणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे होऊ देणार नाही. आम्ही ते खपवूनही घेणार नाही. त्यामुळे सरकारने अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. कारण यापूर्वी काही प्रकरणांत कायदेशीर गोष्टींचा दाखला देत अशा गोष्टी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.
राज ठाकरे म्हणाले, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जनतेला समाधान आहे. आतापर्यंत किती पैसे येतात? किती जातात? हे कळायला काहीच मार्ग नव्हता. टोलनाक्याचा सर्व व्यवहार कॅशवर होता. त्यामुळे किती गाड्या गेल्या? कुणाच्या खिशात किती पैसे गेले? कुणाला किती पैसे मिळाले? हे कुणालाही समजत नव्हते. राजकीय पक्षही यावर गप्प होते. आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतील. पण त्यांचा याच्याशी कोणताही संबंध नाही. हे आंदोलन कुणी केले? हे जगाला माहिती आहे. राज ठाकरेंनी एखादे आंदोलन हाती घेतले की काय होते हे या निर्णयातून स्पष्ट होते. सरकारला टोलमाफी द्यावी लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागांवर निवडून लढवेल, अशी घोषणाही राज ठाकरे यांनी यावेळी केली. आम्ही ही निवडणूक केवळ लढवायची म्हणून लढवत नाही. आम्हाला निवडणूक कशी लढवायची हे ठावूक आहे. आम्ही यापूर्वीही अशा निवडणुका लढवल्या आहेत. याविषयी आमचे दौरे लवकरच राज्यात सुरू होतील. या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल. मनसे आपला जाहीरनामा लवकरच जाहीर करेल, असे राज ठाकरे म्हणाले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज.
पुणे:
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या तयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सूचना घेण्यात आल्या. या बैठकीला विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाकारी व कार्यकर्ते यांनी पुणे शहरातील ८ विधानसभेतील उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार एक मताने व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून येणारा महिना हा पक्षासाठी समर्पित करून पक्षश्रेष्ठी जे महाविकास आघाडीचे उमेदवार देतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, महिला अध्यक्ष पुजा आनंद, पुणे लोकसभा समन्वय अजित दरेकर, नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, मनिष आनंद, उस्मान तांबोळी, मेहबुब नदाफ, भिमराव पाटोळे, प्रियंका रणपिसे, सुजित यादव, प्रदिप परदेशी, समिर शेख, आशितोष शिंदे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, अक्षय माने, राजू ठोंबरे, रमेश सकट, विशाल जाधव, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, सुनिल शिंदे, कैलास गायकवाड, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, नितीन परतानी, शिवराज भोकरे, रवि आरडे, नारायण पाटोळे, रवि आरडे, उषा राजगुरू, सुंदर ओव्हाळ, छाया जाधव, अर्चना शहा, अनुसया गायकवाड, राज अंबिके, अनिल पवार, नुर शेख, सुरेश नांगरे, नुर शेख, विनोद रणपिसे, हर्षद हांडे, अजय खुडे, राधिका मखामले, कल्पना उनवणे, अनिता मखवाणी आदी उपस्थित होते.
मुंबईत लोखंडवाला कॉम्पलेक्सला आग:14 मजली अपार्टमेंटच्या 10 व्या मजल्याला आग, 3 जणांचा होरपळून मृत्यू
मुंबई-मुंबईतील अंधेरी परिसरात बुधवारी सकाळी एका 14 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 2 वृद्धांसह तिघांचा मृत्यू झाला. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या रिया पॅलेस इमारतीच्या 10व्या मजल्यावर सकाळी 8 वाजता ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.1 तासाच्या अथक परिश्रमानंतर सकाळी 9 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत 3 जण होरपळले असून, त्यांना गंभीर स्थितीत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी या तिघांनाही मृत घोषित केले.
चंद्रप्रकाश सोनी (74), कांता सोनी (74) आणि पेलुबेता (42) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. चौकशीनंतरच संपूर्ण माहिती दिली जाईल.काही दिवसांपूर्वी मुंबईतीलच चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीतील एका 3 मजली इमारतीला आग लागली होती. त्यामुळे एकाच कुटुंबातील 3 मुलांसह 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे 5.20 वाजता घडली. तळमजल्यावर बांधलेल्या दुकानाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच आग वरच्या मजल्यावर पोहोचली, मात्र तेथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही.अग्निशमन दलाने रात्री 9 च्या सुमारास आग आटोक्यात आणली, त्यानंतर आत अडकलेल्या सर्व 7 जणांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. शॉर्टसर्किटमुळे दुकानात स्फोट झाला आणि आग संपूर्ण इमारतीत पसरली.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा रूपाली चाकणकरांच्या गळ्यात …
3 वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच गॅजेट प्रसिद्ध
मुंबई-येत्या 22 तारखेला ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर पायउतार होण्यापूर्वीच महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा रूपाली चाकणकरांच्या गळ्यात विअर्ज्मान झाली आहे .या संदर्भात नुकतेच गॅजेट प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. सध्या या आयोगाची जबाबदारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच महायुतीच्या वतीने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांचा शपथविधी काल पार पडला. त्यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देखील विधान परिषदेची आमदारकी मिळणार? अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातीलच महिला नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हे पद पुढील तीन वर्षे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी, महिला हक्कांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये या महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणारे अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी महिला हक्कांसाठी हा आयोग काम करतो. त्यामुळे या आयोगाला अनेक अधिकार देखील देण्यात आले आहेत. राज्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे पद तेवढेच महत्त्वाचे देखील मानले जाते.
भाजपच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात पक्षांतर्गत मोठी नाराजी- दोन नवे चेहरे देणार ?
पुणे-पुण्यातील भाजपच्या एकूण ५ आमदारांपैकी जवळपास ४ आमदारांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचे चित्र आजवर दिसून आले असून या ४ पैकी २ ठिकाणी तरी भाजपा नवे चेहरे देईल असा विश्वास येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ सोडला तर पुण्यातील ज्या ज्या मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत अशा विद्यमान आमदारांच्या विरोधात कमी जास्त फरकाने का होईनात नाराजी असल्याचे चित्र आजपर्यंत पुढे आले आहे.यात सर्वाधिक नाराजी खडकवासला मतदार संघातून आहे. त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती,कोथरूड मतदार संघातून असल्याचे चित्र पुढे आले आहे. यातील कोथरूड मधून पक्षांतर्गत नाराजी कार्यकर्त्यांकडून सामुहिक पणे उघडपणे व्यक्त होत नसली तरी बंडखोरी करत उघडपणे नाराजी अमोल बालवडकर यांनी व्यक्त करत निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे दिसले आहे तर पर्वती मतदार संघातून श्रीनाथ भिमाले यांनी हि माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीला थेट आव्हान देत शड्डू ठोकले आहेत.अर्थात येथून मिसाळ यांच्या उमेदवारीला आव्हान देण्याच्या पवित्र्यामागे राज्यातील बड्या नेत्याचा त्यांच्या डोक्यावर हात असल्याचे सांगितले जाते.तर बालवडकर यांच्या मागे मात्र कोण दडलंय हे सध्या तरी सांगणे मुश्कील आहे…पण काल तर खडकवासल्याचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर याच्या विरोधात या मतदार संघातील नगरसेवकांची बैठक झाल्याचे वृत्त हाथी आले आहे. माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी आणि विद्यमान सघटन मंत्री अजय जाम्ब्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होऊन खडकवासला हातातून जाऊ द्यायचा नसेल तर विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नका असा निरोप दिल्लीत पोहोचवा असा सूर या बैठकीतून सर्वांनीच आवळला.गेल्या निवडणुकीत आयत्या वेळी बाहेर आलेला व्हिडीओ,जनसंपर्क अजिबात नसलेला,आणि शासकीय कोणतीही योजना जनतेपर्यंत घेऊन न गेलेला आमदार म्हणून त्यांची यावेळी गणना करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातून कांबळे आलटून पालटून किती वेळा चालविणार ? कित्येक वेळा ते आपल्या वर्तणुकीतून पक्षाला हानी पोहोचविणारे ठरलेत, गेल्या निवडणुकीत ते निसटत्या मतांनी आले आणि लोकसभेला तर त्यांची तिथून पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झालेले आहे असे सांगत आता हाही मतदार संघ भाजपच्या हातून निसटेल असे सांगितले जातेय.कोथरूड हा मात्र भाजपचा बालेकिल्ला आहे.कोल्हापुरातून आलेले चंद्रकांतदादा इथून निवडून आले, मंत्री झाले तसे आता इथे पुणेकर झालेले आहे आपल्या स्वभावाने, कामाने त्यांनी सर्वांना आपलेसे केलेले आहे पण कोथरूड मधील स्थानीक नेत्यांनी त्यांच्यामागे भुंगा लावल्याचे सांगितले जाते.शिवाजी नगर मतदार संघातून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे विद्यमान आमदार आहेत. खासदारकी सोडून अनिल शिरोळे यांनी नगरसेवक असलेल्या पुत्राला विधानसभेच्या रणांगणात उभे केले होते.उच्च शिक्षित आणि वडिलांच्या प्रमाणेच शांत स्वभावाचा आणि ‘राजकारणी’ नसल्याची त्यांची इथे प्रतिमा आहे.त्यामुळे त्यांना विरोध करायला,त्यांच्यावर नाराजी व्यक्त करायला इथे कोणाकडे काही कारण नाही मात्र राजकारणी स्पर्धा करणारे करत आहेत असे इथले चित्र आहे.
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. १५: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी यांच्या कामकाजाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची सर्व प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. मतदान केंद्रावर आवश्यक शौचालय, पाणी, व्हीलचेअर, रॅम्प, पाळणाघर, औषधोपचार, बसण्याकरीता बाकडे, आदी सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देऊन उपलब्ध असलेल्या सोई-सुविधांची पडताळणी करावी. शहर हद्दीत महानगर पालिकांनी तर ग्रामीण हद्दीत जिल्हा परिषदेने या व्यवस्था कराव्यात असे आयोगाने निर्देश दिले आहेत.
मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता मतदार नोंदणी, मतदार जनजागृतीविषयक शिबीरे आयोजित करावीत. बदलेल्या मतदान केंद्राविषयी मतदारांनी माहिती देण्यात यावी. एफएसटी पथके कार्यान्वित करण्यात यावीत. मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला असून याबाबत याबाबत यंत्रणेसह मतदारामध्ये जनजागृती करावी. आवश्यकतेप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावेत. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे. निवडणूक प्रक्रियेत आपल्या दिलेल्या जबाबदारीप्रमाणे चोखपणे कर्तव्य पार पाडावे, असे डॉ. दिवसे म्हणाले.
ग्रामीण भागात अनधिकृत होर्डिंग्जवर निवडणूक प्रचाराबाबत होत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. आवश्यक तेथे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही डॉ. दिवसे म्हणाले.
डॉ. भोसले म्हणाले, मतदान केंद्रावर उभारण्यात येणाऱ्या शौचालयाची स्वच्छता करावी. रॅम्प सुस्थितीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृतीवर भर देण्यात यावे. याकरीता समाजमाध्यमे, वाणिज्यिक आस्थापना, पीएमपीएल बसेस, महानगरपालिकांचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले फलक, लघुसंदेश आदी सुविधांचा वापर करावा. तसेच बचतगट गणेश, नवरात्र आणि दहीहंडी मंडळासोबत बैठक त्यांचा सहभाग वाढवावा, शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढविण्याकरीता महानगरपालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल.
शासकीय मालमत्तांचे विद्रुपीकरण कायद्याचे काटेकोर पालन व्हावे. शासकीय मालमत्तांवरील आचारसंहिता भंग होईल अशा राजकीय पक्षांच्या, राजकीय व्यक्तींच्या जाहिराती तत्काळ काढण्यात याव्यात. २४ तासाच्या आत जाहिराती, मजकूर काढण्यात यावा. खासगी इमारतीवरील, जागेतील मजकूर संबंधिताच्या परवानगीशिवाय लावलेला नसल्यास त्याबाबतही कठोर कारवाई करावी. विद्रुपीकरणबाबत केल्यास गुन्हे दाखल करावेत, असेही डॉ. भोसले म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री. देशमुख म्हणाले, संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्ट्राँगची पाहणी करुन आढावा घ्यावा. प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) नुसार हेलिपॅड व विमानाच्या धावपट्टीवरून उड्डाण परवानगीबाबत कार्यवाही व्हावी तसेच तेथील व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, असेही श्री. देशमुख म्हणाले.
0000
जागा वाटपावरून कोणतीही ताणाताणी नको-हायकमांड ने सुनावताच कॉंग्रेस नेत्यांची ११५ ऐवजी १०५ जागांवर लढण्याची तयारी, ठाकरेंच्या शिवसेनेला १०० तर शरद पवारांना ८३ चा फॉर्म्युला
-आठ दिवसांनी काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार
मुंबई-हरियाणातील पराभवाचा महाराष्ट्रातील मविआच्या जागा वाटपावर काहीही परिणाम नाही. आम्ही ११५ जागा लढवण्यावर ठाम आहोत, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी सांगितले होते. ते दिल्लीत राहुल गांधींना भेटून आल्यामुळे त्यांच्या दाव्यात ठामपणा असेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी चित्र बदलले असून ११५ ऐवजी १०५ जागांवर लढण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. सूत्रांनी सांगितले की, जागा वाटपावरून कोणतीही ताणाताणी नको, असा नवा निरोप हायकमांडकडून मंगळवारी सकाळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आला. त्यानुसार काँग्रेस १०५, उद्धवसेना १०० आणि शरद पवार गट ८३ असा नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाच्या नेत्यांनी राज्य पिंजून काढले असून तीनही पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. बहुतांश मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आहेत. मविआत सर्वाधिक बैठकांचे सत्र काँग्रेसमध्ये सुरू आहे. मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यातील काही ज्येष्ठ काँग्रेस नेते दिल्लीत तळ ठोकून बसले आहे. ते उमेदवारांची नावे अंतिम करत आहेत. ८ दिवसात यादी घोषित होईल, असा दावा एका वरिष्ठ नेत्याने केला.
हरियाणाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बरेच खटके उडाले होते. उद्धवसेना नेत्यांनी अचानक जागा वाटपामध्ये आक्रमकता दाखवणे सुरू केले. जास्त जागा देण्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावांची घोषणा करण्याचा आग्रहही करण्यात आला होता. काँग्रेसचे नेते आणि उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांसमोर उघडउघडपणे एकमेकांवर टीका करू लागले. तेव्हा शरद पवारांनी खा. राऊत यांना कडक शब्दात समज दिली. त्यामुळे ते एकदम गप्प झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले. पुढील काळात त्यांना प्रचाराची दगदग झेपणार नाही, असे म्हटले जात आहे. ते लक्षात घेऊन जास्त जागांची मागणी करणे परवडणार नाही, असा सूर उद्धवसेनेतून लावला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, शरद पवार यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांना समजावून सांगितल्यावर उद्धवसेना १०० पेक्षा कमी जागा लढण्यास तयार होणार आहे.
