Home Blog Page 643

पुण्यात :वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरचे महिला प्रवाश्यासमोर समोर गैरवर्तन; महिलेची कॅबमधून उडी

0

पुणे-पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट परिसरात बस मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेने कॅब मधून उडी मारली तसेच थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासासाठी कॅब बुक केली होती. त्यानंतर संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. या दरम्यान गाडी चालवत असताना आरोपी ड्रायव्हर तरुणाने रियल व्हिव्ह मिरर मधून महिलेकडे पाहून हस्त मैथुन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले.याप्रकरणी खडकी पोलिसांनी वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक देखील केली आहे. खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेला माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी आहे. तो नुकताच मुंबईवरून पिंपरी चिंचवड येथे कामासाठी आला होता. पुण्यात काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच महिलांच्या सुरक्षेबाबत घडत असलेल्या घटनेमुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

“त्रिनेत्र महोत्सव -शिवशक्ती आराधना” महाशिवरात्री निमित्त विशेष नृत्य महोत्सव संपन्न

पुणे, २६ फेब्रुवारी २०२५ – केअर एनजीओ यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर “त्रिनेत्र” या विशेष नृत्य महोत्सवाचे भव्य आयोजन बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, पुणे येथे करण्यात आले. भगवान शंकराच्या विविध रूपांवर आधारित या नृत्य सादरीकरणांनी उपस्थित रसिकांना अद्वितीय अनुभूती दिली.

या भव्य कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रज्ञा डांगे, नम्रता पंडित, डॉ. महेशकुमार वडदरे आणि सत्यजित जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी मयूर ठेंगे वारेगावकर, निशा गोंधळे, जया ठेंगे, सृष्टी मराठे व योगिनी कोठाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सांस्कृतिक सोहळ्यात एकूण १४४ कलाकारांनी सहभाग घेतला. याप्रसंगी गणेश आप्पा गांधे (दिवाणी न्यायाधीश)व श्री बाळासाहेब होनराव या मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली विविध नृत्यप्रकारांतून भगवान शंकराची आराधना साकारली गेली, ज्यात शास्त्रीय व लोकनृत्यांचे अप्रतिम सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

“त्रिनेत्र” हा केवळ एक नृत्य महोत्सव नसून, भक्ती आणि संस्कृती यांचा अनोखा संगम ठरला. केअर एनजीओ तर्फे आयोजित या भव्य सोहळ्याने महाशिवरात्रीचे पावित्र्य अधिकाधिक वाढवले आणि शिवभक्तांच्या मनात चिरंतन ठसा उमटवला

तृप्ती देसाईंनी अडविली गृहराज्यमंत्री योगेश कदमांची गाडी अन म्हणाल्या, कोणत्या तोंडाने इथे आलात ?

संतप्त तृप्ती देसाई पोलिसांच्या कब्जात…

पुणे : स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देत आढावा घेतला. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी योगेश कदमांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी देसाईंनाच ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये नेले. त्यानंतर देसाई अधिकच आक्रमक झाल्या.

लोकशाहीत आवाज उठवू शकत नाही का? मला कशाला अटक करताय? आरोपीला तातडीने अटक करा,अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. पोलीस व्हॅनमध्ये बसतानाही तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या ‘आरोपीला अटक झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत होत्या.भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेऊन कदम यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून दिला. पोलिस बलात्कार करणारा आरोपी शरण येण्याची वाट पाहत आहेत का? तुम्ही येथे कोणत्या तोंडाने आलात? आरोपीला घेऊन या? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी गृह राज्यमंत्र्यांवर केली.

तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम घटना घडल्यानंतर 50 तासांनी येथे आलेत. आम्हाला त्यांना राज्यात काय चाललंय याचा जाब विचारायचा होता. भेटायचे होते. यासाठी आम्ही त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय गाडेसारखा साधा आरोपी सापडत नाही. ही कसली यंत्रणा आहे? त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाही करण्यात आले आहे.

पोलिसांना लाखोंचा पगार मिळतो. फुकट मिळतो. पोलिस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे. राजकीय दबावामुळे अशी अनेक प्रकरणे दाबण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण घ्या. वाल्मीक कराड स्वतःहून शरण आला. आता या प्रकरणातही आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट पाहिली जात आहे का? रात्रभर महिला झोपल्या नाहीत. आज सगळ्या महिला आहेत. मुले-मुली आहेत. सर्वजण घाबरलेत. महिला एसटीमध्ये सुरक्षित प्रवास करतात. पण एसटीही आता सुरक्षित राहिली नाही.

मंत्री योगेश कदम यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला पोलिस जबरदस्तीने ओढून आणतात. तसे आरोपीलाही ओढून आणा. अन्यथा आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचा निकाल लावू. मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो की पळवून लावला जातो? वाल्मीक कराड सरेंडर होणार अशा बातम्या आल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम इथे कोणत्या तोंडाने आलेत. त्यांनी आरोपीला घेऊन यावे. हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. इथे कोयता गँग आहे, गाड्या जळत आहेत. पोलिस यंत्रणा साफ अपयशी ठरली आहे.

पालकमंत्री अजित पवार आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची भाषा करतात. आम्हा सर्वांची हीच मागणी आहे. त्यांचे बारामतीचे बसस्थान कुठे आणि आमचे स्वारगेट बसस्थानक कुठे. गाड्या बंद पडल्यात. त्यात कंडोमची पाकिटे पडलेत. साड्या पडल्यात. मटक्याचे आकडे चालतात. आम्ही आतापर्यंत अनेकदा हा विषय मांडला. पण अशी वेळ आली की रस्त्यावर उतरावे लागते. महिलांबाबत असे घडत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असेही तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या.

स्वारगेट रेप केस: पोलिसांचा निष्काळजीपणा नाहीच , मात्र आरोपी लवकरच गजाआड होईल – गृहराज्यमंत्री

योगेश कदम, गृहराज्यमंत्री म्हणाले,’ पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकेशननुसार त्याला फॉलो केलं जातंय. त्याचं संभाव्य लोकेशनही आपल्याकडे आहे. लवकरच आरोपीला पकडलं जाईल. एक असा गैरसमज तयार केला जातोय, परवा सकाळी घटना घडली, ती कालपर्यंत का कळवली गेली नाही? ज्यावेळेला फिर्याद आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच आरोपीला ओळखलं. तो अलर्ट होऊ नये म्हणून ही माहिती बाहेर दिली गेली नाही. जर माहिती आधीच बाहेर दिली असती तर आता जे संभाव्य लोकेशन सापडलं आहे ते मिळालं नसतं. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. फक्त गुप्तता पाळण्यात आली आहे पुणे शहराच्या बाबतीत ही जी घटना घडली आहे ती एसटी स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांमार्फत रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजल्यापर्यंत कितीवेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार पीआय फेरी मारून गेल्याचं दिसतंय. पोलिसांकडून दुर्लक्ष झालं नाही. पोलीस अलर्ट नव्हते असंही नाही. आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत. घटना घडली तेव्हा आजूबाजूला माणसं होते.गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी बलात्काराचे हे प्रकरण फोर्सफुली घडले नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुली कृती झाली नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेवर1 लाखाचे बक्षीस, पुणे पोलिसांची घोषणा

पुणे-स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी आता नागरिकांची मदत मागितली आहे. फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दत्तात्रय गाडे याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आरोपी दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय तरुणीवर धमकावून शिवशाहीमध्ये बलात्कार केला आणि पसार झाला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. घटनेच्या 48 तासांनंतरही आरोपी पोलिसांना सापडला नाही. आरोपीच्या शोधासाठी सुरुवातील आठ पथके तैनात केली होती. आता 13 पथके तैनात केली आहे. आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी आहे. त्याच्यावर याआधीच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे. सध्या तो जामिनावर सुटलेला आहे.

फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलिस ठाण्याशी किंवा 100 क्रमांकावर संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आली आहे. आरोपीबद्दल माहिती सांगणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून पोलिसांनी दत्तात्रय गाडेबद्दल माहिती काढून घेतली. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पुण्यात काम करणारी तरुणी फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात आली होती. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते. यादरम्यान पीडितेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल रुग्णालयाने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिला. आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती या मेडिकल रिपोर्टमधून समोर आली आहे. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्वारगेट अत्याचार :आरोपी राजकीय कार्यकर्ता अन तोतया पोलिसही

स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत असल्याचे ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा तो ‘कार्यकर्ता’ असल्याचेही समोर आले झाले असून, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारीही असल्याचे प्राथमिक तपासात आढळले.दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, गाडे सातत्याने स्वारगेट एसटी स्टँडवर असावा; त्यामुळे त्याला तेथील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा उठवून त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचा तर्क लावण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत असे. मात्र, हे सराईत गुन्हेगार सातत्याने तेथे येत असल्याने, पोलिसी कारवाईवरही मर्यादा येत असल्याचे खासगीत सांगितले जाते.

गाडे हा घटनेच्या दिवशी रात्री किमान दीड-दोनपासून एसस्टी स्टँडवर असल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाची चक्रे फिरली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्याने कोणाशी संपर्क साधल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गाडेने याखेरीजही अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये तक्रारदार पुढे येत नसल्याने त्याचे धारिष्ट्य वाढल्याची शक्यता आहे. गाडेबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महादेवांच्या भिंतीचित्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व दीपक मानकर यांचा हस्ते अनावरण

पुणे


ॐ नवनाथ मित्र मंडळ ट्रस्ट गेली अनेक वर्षे झाली छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज अशा थोर विचारवंताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या हेतूने अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करत असे. याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या महाशिवरात्रीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील व पुण्यातील पहिले व सर्वात मोठे “महादेवांचे” भिंतीचित्र साकारलेल्या भव्यदिव्य अश्या भिंतीचित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील,पुणे शहराचे माजी उपमहापौर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. एरंडवणे गावठाण येथील राजमयूर सोसायटी, ॐ नवनाथ मित्र मंडळ ट्रस्ट, अजय कंधारे, माजी नगरसेवक दिपक पोटे,आशिष पाडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील प्रसिद्ध भिंतीचित्रकार निलेश खराडे यांच्या हस्ते साकारण्यात आलेले आहे. त्यांच्याही यावेळी सत्कार करण्यात आला तसेच हिंदू राजा महाराज अघोरी टीम, संगमनेर यांनी अतिशय सुंदर जिवंत देखावा सादर केला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनावरण सोहळ्या प्रसंगी जयंती भावे, महेश पोटे, हर्षवर्धन मानकर, पुनीत जोशी,दत्ता सागरे, प्राची शहा, डॉ.संदीप बुटाला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

“माजी मंत्र्यांच्या मुलाचं विमान पोलीस शोधून काढतात अन …?

मुंबई-स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ( २५ फेब्रुवारी) साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून आरोपी मात्र फरार झाला या भयंकर घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तानाजी सावंतांच्या मुलाचं विमान शोधून काढणारे पोलीस आरोपीला जेरबंद करू शकत नाहीत? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.

या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, “स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना म्हणजे पुणे पोलिसांचा, एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस होय. स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याहून धक्कादायक बाब म्हणजे  आरोपी अजून पोलिसांना सापडला नाही!”पुढे त्यांनी म्हटले आहे की, “महायुतीतील माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान शोधून काढणारे पुणे पोलिस आज पहाटे घडलेल्या या घटनेतील आरोपी अजूनही जेरबंद करू शकत नाहीत, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे.”

ते म्हणतात की, “राज्याचे गृहखाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतक होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत?” असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली: हर्षवर्धन सपकाळ

‘घाशीराम कोतवाल करो सो कायदा’ महाराष्ट्रात चालणार नाही, इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्याचा आका कोण?

इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा कोणाच्या आशिर्वादाने पोलिसांच्या विश्रामगृहात राहतो.

फिक्सर अधिकाऱ्यांच्या व ते ज्या मंत्र्यांकडे काम करायचे त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत.

मुंबई व महाराष्ट्रातील महत्वाची कार्यालये हलवून महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा मोदींचा प्रयत्न

मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २५

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवनात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पण त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. सर्वच विषयावर बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री महत्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसतात. पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. दिल्लीत ११ वर्षापूर्वी एका तरुणीवर बलात्कार झाल्याने समाजातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर मोठे जनआंदोलन झाले होते. पुण्याची घटना ही तितकीच गंभीर आहे. सरकार बेफिकीर असल्याने राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे सपकाळ म्हणाले.

इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी धमकी दिल्याच्या प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा व त्याचा आशय पाहता सरकार कोणत्या विचाराच्या लोकांना पुढे करत आहे हे दिसून येते. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी काँग्रेसने शिवजयंती दिनी केली होती, पण त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरसंघचालक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे तसेच सावरकर यांनीही संभाजी महाराजांबद्ल आक्षेपार्ह लेखन केले आहे. चिटणीसाच्या बखारीपासूनचा जो खेळ सुरु आहे त्याची पाठराखण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का? आणि छावा चित्रपट प्रमोट करण्यात कुचराई करत आहेत का? हे प्रश्न असताना इतिहासतज्ञ इंद्रजीत सांवत यांना धमकी देत, ‘हे राज्य आमचे आहे’, अशी धमकी दिली, महाराष्ट्रात घाशीराम कोतवालाचे राज्य आहे का? असा संतप्त सवाल करत घाशीराम कोतवाल जर महाराष्ट्राचा गृहविभाग चालवत असतील तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, हा धमकी देणारा पोलिसांच्या विश्रामगृहावर कसा काय थांबतो? त्याला सुरक्षा कशी पुरवण्यात आली? कोण मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना या व्यक्तीची संपत्ती वाढली हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ‘हम करे सो कायदा’ व ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही असे सपकाळ म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांकडे पीए, ओएसडी आणि पीएस म्हणून काम करणा-या काही अधिकाऱ्यांना फिक्सर म्हटल्याने सर्वच अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे, त्यामुळे हे १६ अधिकारी कोण आहेत व ते कोणत्या मंत्र्यांकडे काम करत होते हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मुंबईतील पेटंटचे कार्यालय केंद्रातील सरकारने दिल्लीला हलवले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील अनेक महत्वाची कार्यालयाचे राज्याबाहेर हलवली आहेत. यातील बहुतांश कार्यालये गुजरातला हलवली आहेत. पालघर येथे होणा-या सागरी पोलीस मुख्यालय, मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र यासारखी अठरा हून अधिक कार्यालये हलवली आहेत आणि आता पेटंट कार्यालय हलवले जात आहे. मोदींच्या सरकारने महाराष्ट्राची लूट चालवली आहे. राज्याच्या सत्तेत बसलेले मोदी शांह यांचे एजंट या कामी त्यांना मदत करत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी संरक्षण खात्याची संगमवाडीतील १७ एकर जागा पुणे महापालिकेला हस्तांतरित

– केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे –

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी संगमवाडी येथील संरक्षणदलाची जागा या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत पाठपुरावा केला होता. त्यानंतर सिंह यांनी मोहोळ यांना सदर जागा हस्तांतरित केल्याचे पत्र पाठविले आहे. या जागा हस्तांतरणामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.

पुणे शहरात मुळा-मुठा नद्यांचा एकात्मिक पद्धतीने विकास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रकल्प सुरु असून मुळा-मुठा या नद्यांची शहरातील एकूण लांबी ४४.४० किलोमीटर आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची एकूण ११ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली असून यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच-९) या स्ट्रेचमध्ये संरक्षण विभागाची (सादलबाबा दर्गा ते संगमवाडी स्मशानभूमी या दरम्यानची ) जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु होती. संरक्षण विभागाकडील एकूण १७ एकर इतके क्षेत्र मिळण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे सादर करण्यात आला होता. याच अनुषंगाने पुण्याचे खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केला.

याबाबत माहिती देताना खासदार मोहोळ म्हणाले, ‘प्रकल्पासाठी आवश्यक जागेत काम करण्यास परवानगी मिळाली असून ही जागा ताब्यात आल्याने नागरिकांसाठी या जागेत पब्लिक प्लेसेस, विविध सुविधा, ओपन जिम, गार्डन, इ. करिता नदीकाठसुधार प्रकल्पास लागून वापर करणे शक्य झाले आहे. या संदर्भात पुणे महापालिका प्रशासनाला पुढील कार्यवाही आणि प्रत्यक्ष कामे वेगाने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत’.

‘२०१४ आधी संरक्षण दलाची जागी कोणत्याही नागरी सुविधांसाठी मिळवायची असल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वर्षानुवर्षे पाठपुरावा करुनही प्रकल्पांसाठी जागा मिळत नव्हत्या. मात्र २०१४ नंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात नागरी प्रकल्पांचे गांभीर्य आणि गरज ओळखून प्रक्रिया गतिमान पद्धतीने केल्या जात आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत संरक्षण खात्याने गतिमानता दाखवल तातडीने प्रक्रिया केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे समस्त पुणेकरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

साहित्यातून एकाचवेळी अनेक गोष्टींचा आनंद-डाॅ. धनश्री लेले

–  वल्लरी प्रकाशनच्या वतीने सावळा सखा, उणीव जाणिवांची, मोगरी सुगंध या काव्यसंग्रहांचे प्रकाशन

पुणे : कमी शब्दात लिहिता येणे फार अवघड आहे आणि ते कवीला जमले पाहिजे. कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडण्याची कला ही कवीची सगळ्यात मोठी ताकद असते. कमी शब्दात लिहीण्यासाठी शब्दांची समृध्दी असणे गरजे आहे. याकरीता नेहमी साहित्याचे वाचन केले पाहिजे म्हणजे एकावेळी आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो. त्याबरोबर त्यातून शब्द संपत्ती समृद्धी होते, असे मत व्याख्यात्या डाॅ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशनच्या वतीने कवी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश रमेश सराफ यांच्या “सावळा सखा भाग एक व दोन”, “उणीव जाणिवांची”, “मोगरी सुगंध” या चार  काव्यसंग्रहांचा प्रकाशन समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्याख्याता डॉ. धनश्री लेले, ज्येष्ठ संपादक व पत्रकार विद्याधर ताठे, वल्लरी प्रकाशनचे संचालक व्यंकटेश कल्याणकर, साहित्यिका मानसी चिटणीस, कवी डॉ. ऋषिकेश सराफ उपस्थित होते.

विद्याधर ताठे म्हणाले, मराठी भाषा १३ व्या शतकापासूनच अभिजात भाषा आहे, तिला फक्त आज केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मराठी साहित्याचा आढावा घेतला, तर असे दिसते की सर्वाधिक संत साहित्यावर अभ्यास केला गेला आहे. मराठी साहित्यातील ७० टक्के भाग हा संत साहित्याने व्यापला आहे. संत साहित्यावर सर्वाधिक पीएचडी केली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले छंद जोपासणे विसरून जातो. मात्र आपल्या दैनंदिन जीवनाला छंदांची जोड कशी द्यावी याचे उत्तम उदाहरण डाॅ. ऋषिकेश सराफ यांनी दिले आहे. याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छंदांच्या माध्यमातून आपले दैनंदिन जीवन कसे समृद्ध करता येईल याचा विचार करा, असेही त्यांनी सांगितले.

कवी डाॅ. ऋषिकेश सराफ यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण करीत त्याचे विश्लेषण केले.

गौरी जोशी यांनी सरस्वती वंदना सादर केली तर प्रज्ञा कल्याणकर यांच्या पसायदानाने समारंभाची सांगता झाली. विश्वजीत सराफ यांनी सूत्रसंचालन केले. तर राधिका सराफ यांनी आभार मानले.

देवराईमुळेच जैवविविधता टिकून – डॉ. माधव गाडगीळ

  • ‘लोक – जैवविविधता नोंदवही’ पुस्तिकेचे प्रकाशन

पुणे – “जैवविविधता सगळीकडे सारखी नसते. केवळ धार्मिक भावनेने देवराईकडे पाहणे उचित नाही. देवराईमुळेच जैवविविधता टिकून आहे. त्यामुळे तेथील जलस्रोत्र, औषधी वनस्पती, वन्यजीव संरक्षित होतात. हे सर्व वैभव देवराईमुळे आहे. पूर्वी देवराईत शिकार करायची नाही, अशी एक धारणा होती. पण आता धार्मिकताही कमी होत असून तिचे महत्त्व माहिती नसल्याने देवराई नष्ट होऊ लागली आहे,” अशी खंत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केली.

वनराई प्रकाशित ‘लोक – जैवविविधता नोंदवही’ हे पुस्तक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विजय एदलाबादकर यांनी लिहिले असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वनराई संस्थेत पार पडला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते याचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. माधव गाडगीळ, विजय एदलाबादकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवाजी तोफा आणि माजी खासदार ऍड. वंदनाताई चव्हाण, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, सचिव अमित वाडेकर यावेळी उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, “जैवविविधता संपन्न प्रदेश म्हणून वा. द. वर्तक सरांनी देवराईची ओळख करून दिली. जैवविविधता कायदा २००२ मध्ये मंजूर झाला. पण वन विभागाने या कायद्याची नीट अंमलबजावणी होऊ दिली नाही. त्यांनी स्थानिकांवर खूप अटी टाकल्या. त्यामुळे सुरवातीला या नोंदवहीला थंड प्रतिसाद होता. परंतु २०२० नंतर भराभर नोंदवही भरू लागल्या. त्या कशाही भरून नोंदवह्या सादर केल्या. ‘एनजीटी’नेदेखील त्याला छान झालंय असे सांगितले. पण सर्व काही निरर्थक झाले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, लोकांचा स्वार्थीपणा आणि अडाणीपणा दूर करता आला पाहिजे. ज्ञान कसे वापरावे याचे तारतम्य माणसाकडे नाही. जगातला पहिला पर्यावरणवादी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. जैवविविधता म्हणजे केवळ झाड-झाडोरा, पशू-पक्षी, कीटक इत्यादींचे निरनिराळे प्रकार एवढेच नव्हे; तर जग हीच मुळात जैवविविधता आहे. बहुविविधता जिथे नसेल ते जगच नाही. या जैवविविधतेच्या जाळ्याने संपूर्ण सजीवसृष्टी बांधली गेली असून त्यावर आपलेही अस्तित्व अवलंबून आहे.

एदलाबादकर म्हणाले, “१९९८ मध्ये जैवविविधता कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यात स्थानिकांची भूमिका असावी असा प्रवाह होता. तो अनेकांना मान्य नव्हता. पण स्थानिकांचा सहभाग अत्यंत आवश्यक होता. लोकांनी जैविविधतेची नोंद करावी, असे ठरविण्यात आले. पण गेल्या काही वर्षांत राज्यात या जैवविविधता नोंदीवहीमध्ये केवळ झेरॉक्स सारखे काम झालंय. जर असे काम झाले तर ते वाईट आहे.

ॲड वंदना चव्हाण म्हणाल्या की, लोकांचा सहभाग कुठेही स्थानिक शासन नोंदवत नाही. मात्र लोक सहभाग महत्वाचा आहे. बीडीपीसाठी आम्ही खूप लढलो. जैवविविधता टिकविण्याची गरज असून हवामान बदलामुळे समाजात खूप काही गोष्टी बदलत आहेत. पूर्वीचा पावसाळा आल्हादायक आणि आनंद देणारा होता. हल्ली पावसाला आला की धडकी भरते. राजकीय व्यक्तींना जोपर्यंत जैवविवीधतेचे महत्व कळत नाही, तोपर्यंत हा कायदा नीट राबविला जाणार नाही.

सागर धारिया म्हणाले की, ‘लोक-जैवविविधता नोंदवही’ जास्तीत जास्त ग्रामपंचायत पर्यंत पोहचवणे आणि याचा उपयोग करून पर्यावरण रक्षण करणे हि वनराई संस्थेने प्राथमिकता बनवली आहे. सजग आणि जाणकार जनतेच्या सहभागाने आपल्या गाव-शहरातील जैवविविधतेची यादी कशी करता येऊ शकते याबद्दलची रूपरेषा मांडणारे हे एक दिशादर्शक पुस्तक आहे.

अमित वाडेकर म्हणाले की, जैवविविधतेच्या नोंदवहीबद्दल जागरूकतेचा अभाव, माहिती संकलनाचे स्रोत, पद्धती आणि एकूणच प्रक्रियेबद्दल अनभिज्ञता यांमुळे मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी ‘लोक-जैवविविधता नोंदवही’बाबत फारसे समाधानकारक चित्र आढळत नाही. म्हणूनच यासंदर्भात सर्व स्तरांमध्ये लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी या मार्गदर्शनपर पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

महाशिवरात्री निमित्त ब्रह्माकुमारी तर्फे उभारली प्रतिकात्मक अमरनाथ गुफा

महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये नोंदविला विक्रम

पुणे, : प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणार्‍या भावना लिहिल्या. तसेच ब्रह्माकुमारी तर्फे प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारली होती जे मुख्य आकार्षण होते.
स्मार्ट युगात पत्रव्यवहार प्रथा लूप्त पावत आहे म्हणून ही प्रथा अविरत रहावी म्हणून सरळ महाशिवरात्री महादेवासच पत्र लिहिण्याचा उपक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालयाने राबविला. याचा शुभारंभ विठ्ठल भरेकर उप-शक्षण आधिकारी, वैशाली जाधव (ढोलकीच्या तालावर विजेती), प्रिती शिरोडे, डॉ.त्रिवेणी बहिरट (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर), सोलोमन शेंडगे, संजय रायकर यांच्या उपस्थित करण्यात आला. तसेच घनशम रायकर,माजी नगरसेवक अमोल बालवडकर , दिलीप मुरकुटे यांनी या उपक्रमांस भेट दिली. तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर येथे 10 फुट उंच आणि 20 फुट प्रतिकात्मक अमरनाथ गुफा उभारण्यात आली. या गुफेत शिवलिंग, शंकर भगवान आणि आकर्षक विद्यत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सोमनाथ, महाकालेश्‍वर, केदारनाथ, भीमाशंकर, विश्‍वनाथ सह भारतात असलेले 12 ज्योतिर्लिंगाचे पोस्टर ही येथे लावण्यात आलें होते. यावेळी येणार्‍या भक्ताला खोल आध्यात्मिक शांती आणि ध्यानाचा अनुभव ही दिला जात होता.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर येथे महाशिवरात्री महोत्सव अंतर्गत बनविलेली गुफा पाहण्याची संधी रायकर फार्म हाऊस, बाणेर, पुणे येथे सकाळी 8:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत 28 फेब्रुवारी पर्यंत पाहण्यास उपलब्ध असणार आहे. याचा लाभ संर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉ.त्रिवेणी बहिरट (संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर) यांनी यावेळी केले.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याचे महाकालेश्वर पिंड व मुखवटा 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजा
पुणे :  बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा साकारण्यात आला. बारा ज्योतिर्लिंग क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर येथील शिवपिंड व मुखवटा पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

महाशिवरात्रीनिमित्त श्रीमंत सरदार कुमारराजे रास्ते व स्नुषा संजीवनी माधवराजे रास्ते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.

मंदिरातील पुरुषोत्तम वैद्य गुरुजी, उमेश धर्माधिकारी, प्रताप बिडवे, विनायक झोडगे, वैभव निलाखे, शोभा गादेकर आदींनी चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास दोन तासात साकारली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन ही चक्केश्वराची पूजा साकारण्यात आली. प्रमोद व सौ. लता भगवान तसेच लीना भागवत यांनी साकारलेला महाकालेश्वरचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी माहिती दिली की महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. भगवान शंकराचा महाकालेश्वर येथील मुखवटयाची प्रतिकृती हे विशेष आकर्षण होते. बदाम, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे.  विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की या चक्क्याचे श्रीखंड करून रविवारी अनाथालयांमध्ये देण्यात येईल तसेच मंदिरात भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येईल.

श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महाशिवरात्र महोत्सवात रंगला शिव-पार्वती विवाह सोहळा

पुणे : ढोल ताशांचा गजर…भस्माची उधळण… नंदी,गण आणि देवी देवतांच्या साक्षीने वाजत गाजत काढलेली शिवाची वरात, अशा भक्तीमय वातावरणात शिव पार्वती विवाह सोहळा रंगला. शिवभक्तांनी यावेळी पुष्पवृष्टी करत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. हर हर महादेव च्या जयघोषात झालेला, भक्तीने भारलेला हा विवाह सोहळा पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला.  

शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्र महोत्सवात शिव – पार्वती विवाह सोहळा व मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते उपस्थित होते.

मिरवणूकीत समर्थ ढोल ताशा पथकाचे वादन झाले. श्री जंगली महाराज मंदिर, शिवाजीनगर गावठाण मार्गे मंदिरात मिरवणूक आली.

हनुमंत बहिरट पाटील म्हणाले,  शिव आणि पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण मानला जातो. हा विवाह केवळ दैवी प्रेमाचे प्रतीक नसून, भक्तांसाठीही एक महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देणारा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संजय सातपुते म्हणाले, संगमनेर येथील अघोरी आख्याड्यातील कलाकारांनी शिव पार्वती विवाह सोहळा सादर केला. महाशिवरात्रीनिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, कार्तिकी गायकवाड आणि कलाकारांनी गायन सेवा दिली.