Home Blog Page 642

पंडित कुमार गंधर्व महोत्सवातून अनाहत नादाची अनुभूती:गायन, नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

विदुषी सानिया पाटणकर, पंडित सत्यशील देशपांडे, डॉ. पुष्कर लेले, अरुंधती पटवर्धन यांचा सहभाग

पुणे : अनाहत नादाची अनुभूती देणाऱ्या शतकातील महान गायक पंडित कुमार गंधर्व यांची गायकी सांगीतिक महोत्सवातून उलगडली. महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आज (दि. 26) पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बालशिक्षण मंदिराजवळील एमईएस सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन झाले तर डॉ. पुष्कर लेले यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाची वैशिष्ट्ये उलगडली. पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्वांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करत सादरीकरणही केले.
महोत्सवातील पहिले पुष्प जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांनी गुंफले. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग श्रीमधील मध्यलय झपतालातील ‌‘हरि के चरण कमल‌’ या बंदिशीने केली. अनवट रागातील ही बंदिश सहजतेने फुलवत नेत पाटणकर यांनी आपल्या गायकीवरील प्रभुत्व दर्शविले. गुरू अरविंद थत्ते यांनी याच रागात बांधलेली अनोखी सरगम सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. अंशुलप्रताप सिंग (तबला), माधव लिमये (संवादिनी) तर वेदवती परांजपे, आदिती नगरकर, रुची शिरसे यांनी स्वरसाथ केली.
दुसरे पुष्प गुंफताना डॉ. पुष्कर लेले यांनी कल्याण रागातील पंडित कुमार गंधर्व रचित शिवाचा जपस्वरूप असणारी ‌‘शिव शिव कल्याण करे‌’ ही बंदिश ताकदीने सादर केली. पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजन गायकीचे अनोखे दर्शन घडविताना डॉ. लेले यांनी ‌‘माया महा ठगनी हम जानी‌’ हे संत कबिर यांचे भजन अतिशय भावपूर्ण स्वरात सादर केले. गौतम टेंबेकर (तबला), माधव लिमये (संवादिनी) आणि रोहन पोळ यांनी स्वरसाथ केली.
पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक विचारांवर भाष्य करताना कुमारजींच्या नजरेतून विविध रागांचे चलन, रागरूप यांचे अनोखे दर्शन घडविले. कुमारजींना पारंपरिक संगीत अमान्य नव्हते तर कुमारजींचे वेगळेपण म्हणजे या संगीतात ते अजून काहीतरी नाविन्य शोधत परंपरेचे परिशीलन करीत असत, असे सांगून राग दरबारीची झलक तसेच केहन ऐकविली. पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेला ‌‘दिम दिम तन न दे रे ना‌’ हा तराणाही ऐकविला. जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायन वैशिष्ट्य दाखवून कुमारजींच्या मोरपंखी अलवार गायनाचे पदर उलगडले. प्रत्येक रागात अष्टांगाचे दर्शन घडविणे अपेक्षित नसते तर बंदिशीला पूरक अंग वापरणे महत्त्वाचे असते, ज्यातून गायन या हृदयीचे त्या हृदयीला भिडते असे सांगून नंद रागातील ‌‘ढुंढा बारी सैय्या‌’ या बंदिशीची झलक ऐकविली. कुमारजींचे गायनातील सखोल विचार ऐकून आणि पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सादरीकरणातून नवकलाकारांना रागाकडे पाहण्याची अभ्यासक दृष्टी मिळाली.
कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना अरुधंती पटवर्धन आणि त्यांच्या शिष्यांनी गुंफले. त्यांनी सादरीकरणाची सुरुवात गणेशवंदनेने केली. हिंदुस्तानी संगीतावर आधारित रचना सादर करताना कालिमातेची स्तुती, ‌‘शिव शिव महादेव‌’ हे शिवध्रुपद ताकदीने सादर केले. कार्यक्रमाची सांगता पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेल्या ‌‘गुरुजी मै तो एक निरंजन‌’ या निर्गुणी भजनावर नृत्याविष्कार सादर करून कलाकारांनी रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमास लेखाअधिकारी नरेंद्र तावडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माधुरी सहस्रबुद्धे, उज्ज्वल केसकर, ॲड. मिताली साळवेकर, सिद्धार्थ काक, सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वकर, पंडित सत्यशील देशपांडे, पुष्कर लेले आणि अरुंधती पटर्वधन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवर व कलाकारांचे स्वागत सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वरकर, संजय पायगुडे, क्रांतीशिला ठोंबरे यांनी केले.

अध्यापकांच्या भरती प्रकियेस मान्यता: नवीन कार्यपद्धतीचा होणार अवलंब

0

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची माहिती

अध्यापक निवड प्रक्रिया पारदर्शक,निःपक्ष राबविण्यासाठी गुणवत्ताधारित नवीन कार्यपद्धती जाहीर

मुंबई,दि. २७ : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक पदांची भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले , मा.राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी २०टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहे. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील.
अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य (aptitude) यांचे मुल्यमापन परिसंवाद (seminar) अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक (lecture in a classroom situation) अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृक-श्राव्य चित्रिकरण,बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात येईल.
मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील. नवीन निवडप्रक्रियेच्या अधीन राहून विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरिता याच कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे. या सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित अध्यपकांची निवड होईल. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

गृह विभागाचा कारभार घाशीराम कोतवालाच्या हातात-हर्षवर्धन सपकाळ

रायगड/ मुंबई, दि. २७ फेब्रुवारी
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु, असा संकल्प असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ अदिलशाही, निजामशाहीच नाहीतर भेदाभेद, अस्पृषता व असमाजवादी विचार घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधातही लढले. अदिलशाही, निजामशाही, औरंगजेब गेला पण जातीयवादाचा विचार मात्र गेला नाही तो आजही कायम आहे. एका अभिनेत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या घरासमोर पोलीस पहारा देत बसले आहेत. इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी फोनवरून धमकी दिली जाते व त्याचवेळी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांना सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करते हे दुर्दैवी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

स्वातंत्र्य चळवळीतही केवळ सत्तेचे हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्नही होते आणि स्वातंत्र्यानंतर देशाला दिलेल्या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे.काँग्रेसची ध्येय धोरणही हिंदवी स्वराज्यावर आधारीत आहेत. महाराजांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य स्वराज्य स्थापन करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधिल असल्याचे सांगताना ही प्रतिज्ञा करण्यासाठी रायगडावर आलो आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की, महिलांवरील बलात्कार हे सरकारचे अपयश आहे. घाशीराम कोतवालाच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे याचे हे द्योतक आहे. छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवले आणि पेशव्यांनी स्वराज्याची वाट लावली, आज तसेच होत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महाड येथे विंचू दंशावर संशोधन करून औषध शोधणारे प्रख्यात डॉक्टर पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांच्या निवासस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सदिच्छा भेट दिली व बावस्कर कुटुंबियांशी संवाद साधला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे महिला काँग्रेसच्या ॲड. श्रद्धा ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, दिलीप पाडगावकर, यांच्यासह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

परराष्ट्र व्यवहार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलकोब्बी शोषाणी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’

पुणे: इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद व ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते शोषानी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, महाव्यवस्थापक रोहित संचेती, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सागर चोरडिया आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रेरक आणि विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो. आपल्यासारख्या महान व्यक्तींचे कार्य विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे असते. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास प्रोत्साहन मिळते. समाजातील दिग्गजांच्या गौरवाचा हा सोहळा सूर्यदत परिवारासाठी अविस्मरणीय क्षण असतो. कोब्बी शोषानी यांनी परराष्ट्र क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या धोरणी आणि मुत्सद्दी कार्यामुळे भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांतील परस्पर सबंध अधिक मजबूत होत आहेत.”

हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे सांगून कोब्बी शोषानी म्हणाले, “काटेकोर शिस्त आणि समर्पित वृत्ती ही इस्राईलची ओळख असून, त्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळतेय, याचा मला अभिमान वाटतो. मला भारताविषयी अतीव प्रेम आहे. वर्षागणिक या सुंदर अशा देशाची संस्कृती आणि येथील लोकांविषयी माझ्या मनात आदर, प्रेम व आस्था वाढत आहे. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सूर्यदत्त मोलाचे योगदान देत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी संस्थेत राबविण्यात येत असलेले उपक्रम महत्वपूर्ण आहेत. ज्ञानाचा मार्ग सहकार्याचा असतो, आणि या ज्ञानमार्गात सहभागी होण्यास मी उत्सुक आहे, असे त्यांनी नमूद केले.

रझा मुराद यांनी कोब्बी शोषाणी यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. इस्रायल आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे. अशा व्यक्तीला सन्मानित करताना मला उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. शोषाणी यांचा सन्मान म्हणजे दोन महान राष्ट्रांमधील दृढ संबंध साजरे करण्यासारखे आहे. २०१४ पासून सूर्यदत्त संस्थेशी संबंधित असल्याचा मला खूप अभिमान आहे, आणि मी या नात्याला अजूनही मोठा मान देतो आणि भविष्यात अनेक वर्षे या अद्भुत परंपरेचा भाग होण्याची मला इच्छा आहे, असे रझा मुराद यांनी नमूद केले.

सागर चोरडिया यांनी सांगितले, ‘माननीय कोब्बी शोषाणी यांचे इस्राईलचे कॉन्सुल जनरल म्हणून कार्य अत्यंत आदर्शवत आहे. त्यांची समर्पण आणि राजनैतिक कौशल्ये दीर्घकालिक प्रभाव निर्माण करणारी आहेत, आणि मला विश्वास आहे की हे पुरस्कार त्यांच्याशी संबंधित त्यांच्या प्रयत्नांचे योग्य मान्यता आहे. सर्वांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अभिनंदन करतो.”

स्नेहल नवलखा यांनी शोषानी यांना सूर्यदत्त संस्थेमध्ये येण्याचे, तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे निमंत्रण दिले. शोषानी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याला संस्थेत येऊन विद्यार्थ्यांशी बोलायला आणि माझे अनुभव शेअर करायला आवडेल, असे आश्वस्त केले.

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी ठाकरेंची शिवसेना पुन्हा आक्रमक …..

पुणे- मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, तरी आजही पुण्यात टिळक रोड व इतर भागात अनेक दुकानदारांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावर आंदोलन करण्यात आले.
यावेळी दुकानदरांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन पुढील पंधरा दिवसांत सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याचे तसेच सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन घेण्यात आले अन्यथा मराठी भाषेच्या सन्मानार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले .

यावेळी आंदोलनाचे आयोजक शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी भाषा ,मराठी माणूस यांच्यासाठी झाला आहे, त्यामुळे मराठीचा अवमान महाराष्ट्रात आम्ही कदापी सहन करणार नाही, दुकानांवर मराठी पाटी विषयात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारने तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पाट्या लागल्याच पाहिजे अन्यथा शिवसेना आक्रमकपणे सदर विषयात रस्त्यावर उतरेल..
यावेळी आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, सूरज लोखंडे, राजेश मोरे, नितीन परदेशी, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर राजपूत, संदीप गायकवाड, पराग थोरात, मकरंद पेठकर, महिला आघाडीच्या निकिता मारतकर, वैशाली दारवटकर, अमृता पठारे, दिपाली राऊत, राणी इनामदार, शिवसेना पदाधिकारी संतोष भुतकर, राकेश बोराटे, दिलीप पोमण, अमर मारतकर, जुबेर तांबोळी, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, संजय साळवी, नितीन दलभंजन, मुकेश दळवे, निलेश वाघमारे, गणेश वायाळ, जुबेर शेख, किरण शिंदे, जगदीश परदेशी, तुषार भोकरे, शिवाजी मेनकरी, अमित बाबर व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृहामध्ये हजर होण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

पुणे, दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५० मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.३ विश्रांतवाडी येरवडा, पुणे हे वसतिगृह नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला असून त्यांनी तात्काळ वसतिगृहात हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेले अर्ज व सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नव्हता अशा सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली असून गुणवत्तेनुसार वसतिगृह प्रवेश मंजूर केलेली विद्यार्थ्यांची यादी वसतिगृहाच्या गृहप्रमुखांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या वसतिगृहाची मंजूर विद्यार्थी संख्या २५० इतकी असून सद्यस्थितीत गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. उर्वरीत ११० जागा कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक विभागाच्या वर्गवारीनुसार प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्त आहेत.

वसतिगृहाच्या गृहप्रमुखांकडून प्रवेश मंजूर झालेल्या १४० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे, अशीही माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिली आहे.

क्षेत्र कोणतेही असो व्यवस्थापन महत्त्वाचे – सोनाली कुलकर्णी

उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक – प्रदिप जांभळे पाटील

एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ‘युवोत्सव – २०२५’चे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि. २७ फेब्रुवारी २०२५) तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल; पण यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या कार्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे; याची माहिती असली पाहिजे. जबाबदारीने व्यवस्थापन केले तर आपण आपल्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘युवोत्सव २०२५’ या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी (दि.२७ फेब्रुवारी) सोनाली कुलकर्णी आणि पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. जे. अक्षय, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसबीपीएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते. युवोत्सव स्पर्धेचे हे दहावे वर्ष असून यामध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट या स्पर्धा होणार आहेत. युवोत्सव क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे परिसरातील पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयामधील संघ सहभागी झाले आहेत. विजयी संघांना आकर्षक बक्षिसे व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
शासकीय, सामाजिक, शैक्षणिक अथवा युवोत्सव सारखे उपक्रम लोक सहभागातूनच यशस्वी होतात. त्यांना मान्यता प्राप्त होते. हे युवोत्सव स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येते. पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक नगरी बरोबरच सांस्कृतिक, क्रीडा नगरी अशीही ओळख निर्माण झाली आहे. महापालिकेने अनेक क्रीडांगणे विकसित केली आहेत. यामध्ये विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्न करत आहे, असे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोक सहभाग आवश्यक आहे असे प्रदिप जांभळे पाटील म्हणाले.
युवोत्सवाच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा गुणांना वाव देऊन भारताचे जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य पीसीईटी करीत आहे. युवोत्सवाचा समारोप शनिवारी (दि. १ मार्च) होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी संघ आणि खेळाडूंचे स्वागत करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या आयोजनात डॉ. अनिषकुमार कारिया, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी खेळाडू, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार पायल झोरे, सुरज पाटील यांनी मानले.

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांनी देशाला नाहीतर जगाला संदेश दिला, मराठी जपण्याचे काम ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केले तीच जपवणूक आपण करायला पाहिजे – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन हा प्रसिद्ध मराठी कवी, लेखक कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी रिल्सस्टार अथर्व सुदामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी कुसुमाग्रजांच्या “जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी !‬ गेल्यावर ही या गगनातील, गीतांमधुनी राहीन मी” या कवितेचा उल्लेख करीत कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पुढे ते बोलताना म्हणाले, २००० वर्षापूर्वीची आपली मराठी भाषा संत ज्ञानेश्वर यांनी संस्कृत मधील असलेली ज्ञानेश्वरीचे मराठीत अनुवाद केले. त्यामुळे मराठी जपण्याचे काम करत संतांनी, कलाकर, लेखक,कवी यांनी जे योगदान दिले आहे, त्याची जाणीव आपल्याला असणे गरजेचे आहे. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासन व राज्य शासनाचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी स्वागत करत अभिनंदन केले. सदर उपक्रमाचे विरोधी पक्षनेते,उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, युवती शहध्यक्ष कु.पूजा झोळे, कार्याध्यक्ष कु.लावण्या शिंदे यांनी आयोजन केले होते.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मा.नगरसेवक,बाळासाहेब बोडके, खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके, कसबा अध्यक्ष अजय दराडे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष महेश हांडे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे,अल्पसंख्याक महिला अध्यक्ष नूरजहा शेख,वकील अध्यक्ष विवेक भरगुडे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, ग्राहक संरक्षण अध्यक्ष राजेंद्र घोलप, कोथरूड महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, सरचिटणीस दुष्यंत जाधव, धनंजय पायगुडे, अनिकेत कोठवदे, उपाध्यक्ष शिवाजी पाडाळे, डिंपल इंगळे, प्रशांत निम्हण, योगेश वराडे, वंदना साळवी, विवेक मुगळे, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, अंगद माने, युवक कार्याध्यक्ष आनंद सागरे, युवती कार्याध्यक्ष श्रेया तांबे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर, शिवाजीनगर कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, राहुल तांबे, शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, कोथरूड युवक अध्यक्ष मोहित बराटे, कोथरूड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर, कसबा युवक अध्यक्ष गजानन लोंढे, शिवानी पोतदार, सागर चंदनशिवे, अर्चना वाघमारे,ओंकार निम्हण, शैलेश मानकर, अलीम शेख, सचिन जाधव,अरुण गवळे, नवनाथ खिलारे, प्राजक्ता देसले,सुरेखा पाटील,राणी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘अर्थ’नेपुण्यामध्ये तिसरे ‘यलोडोअर’ सुरु करून पश्चिम भारतात आपले स्थानअधिक मजबूतकेले

पुणे२५ फेब्रुवारी २०२५:  टायटनचा प्रीमियम हॅन्डबॅग ब्रँडअर्थ’ने आपले तिसरे एक्सक्लुसिव “यलो डोअर” पुण्यामध्ये सुरु करून पश्चिम भारतात आपल्या रिटेल विस्ताराची घोडदौड कायम ठेवली आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेल्या पहिल्या एक्सक्लुसिव्ह स्टोरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता पुण्यामध्ये विमान नगरमधील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये सुरु करण्यात आलेले जवळपास ५५० चौरस फुटांचे नवीन स्टोर म्हणजे अर्थ’च्या धोरणात्मक विस्तारातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुण्यातील ग्राहकांची उत्तम क्रयशक्तीजोमात असलेले आयटी क्षेत्र आणि युवा नोकरदारव्यावसायिकांची वाढती लोकसंख्या यामुळे या शहरातील रिटेल बाजारपेठेची छान भरभराट होत आहेया उत्साहजनक रिटेल बाजारपेठेचा लाभ घेण्याच्या धोरणात्मक उद्देशाने ब्रँडने आपले एक्सक्लुसिव स्टोर याठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतलामहाराष्ट्राचे दुसरे सर्वात मोठे शहरी केंद्र आणि खूप महत्त्वाचे तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यामध्ये नोकरदारव्यावसायिक महिलांचे आणि फॅशनच्या बाबतीत चोखंदळ ग्राहकांचे प्रमाण जास्त आहेअर्थ’ च्या प्रीमियम हॅन्डबॅन्ग उत्पादनांसाठी हे वातावरण अतिशय अनुकूल आहे.

अतिशय सुबकआकर्षक आणि आनंददायी वातावरण असलेलेअर्थ’ स्टोर भारतीय महिलांसाठी आपल्या स्वतःच्या ब्रँडच्या उत्पादनांची विशाल श्रेणी प्रस्तुत करते. “पॉकेट्स ऑफ जॉय” या मूलभूत संकल्पनेवर आधारित असलेले हे स्टोर आपल्याला एका वेगळ्या जगाची सफर घडवतेनवीन उत्पादनेभेट देण्यासाठी उपयुक्त आणि प्रत्येक बॅगमधून मिळणारा छोटाछोटा आनंदप्रत्येक दिवस आनंदानेसहजपणे जगता यावा यासाठी डिझाईन करण्यात आलेली उत्पादने या सर्व गोष्टी ठळकपणे स्टोरमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

मिनिमल आणि नीटनेटकी सुंदर रचनास्पर्शाची वेगळी अनुभूती देणारे टेक्श्चर्स आणि मजेशीर घटक यांचा आकर्षक मिलाप असलेले अर्थ’ स्टोर अगदी सहजसोप्या खरेदीला अजून जास्त आनंददायी बनवतेयाठिकाणचा प्रत्येक तपशील एक सुखद आश्चर्य आहेआमच्या बॅग्सचे सौंदर्य आणि उपयुक्तता त्यामधून प्रदर्शित होते, “पॉकेट्स ऑफ जॉय” प्रत्यक्षात साकार करणारा खरेदीचा अनुभव याठिकाणी मिळतो.

टायटन कंपनी लिमिटेडच्या फ्रॅग्रन्स अँड ऍक्सेसरीज डिव्हिजनचे सीईओ श्री मनीष गुप्ता यांनी सांगितले, “पहिल्या टप्प्यामध्ये यावर्षी १० आउटलेट्स सुरु करून आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत जवळपास १०० स्टोर्स सुरु करण्याची व्यापक योजना आहेसुरुवातीला आम्ही पुणेदिल्लीकोलकाताचेन्नई आणि मुंबई या शहरांवर लक्ष केंद्रित करणार आहोतआमची अपेक्षा आहे कीमार्च २०२५ पर्यंत अर्थ’ च्या एकंदरीत विक्रीमध्ये एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे योगदान जवळपास १५ ते २०असेलब्रँड स्टोर्स सुरु करणे हा आमच्या रिटेल धोरणातील महत्त्वाचा भाग आहेरिटेल विस्तार करत असताना एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सची संख्या वाढवण्याची आमची योजना आहेसुरुवातीच्या स्टोर्सना मिळत असलेले यश आमच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेयेत्या आर्थिक वर्षांमध्ये पुढील टप्प्यातील स्टोर्ससाठी टायटन फ्रॅन्चायजी मॉडेलचा वापर करेल अशी अपेक्षा आहेआमच्या वृद्धी योजनेच्या पुढील टप्प्यामध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी बाजारपेठांचा समावेश केला जाईल.”

हे नवीन स्टोर अर्थ’ ब्रँडचे महाराष्ट्रातील स्थान अधिक मजबूत करेलपुण्यामध्ये हे त्यांचे पहिले स्टोर आहेआर्थिक वर्ष २०२७ पर्यंत भारतभर १०० स्टोर्स सुरु करण्याच्या या ब्रँडच्या उद्दिष्टाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक पाऊल आहेप्रीमियम फॅशन ऍक्सेसरीजची आणि विचारपूर्वक घडवण्यात आलेल्या उत्पादनांची प्रचंड आवड असलेल्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण अर्थ’ पुढे देखील सुरु ठेवेल.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने ८२ दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी दिली.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसात म्हणजे दि. १६ मार्च २०२५ पर्यंत विविध विभागांसाठी उद्दीष्टे निश्चित करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणाऱ्या घरांची एकूण संख्या दि. ६ डिसेंबर रोजी ७१,४३७ होती व त्यांची एकूण क्षमता २८३ मेगावॅट होती. शंभर दिवसांच्या मोहिमेत एकूण घरांची संख्या १.२५ लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. राज्यात दि. २६ फेब्रुवारी रोजी योजनेच्या लाभार्थी घरांची संख्या १,२८,४७० व एकूण क्षमता ५०० मेगावॅट झाली होती. या योजनेचे शंभर दिवसांचे उद्दीष्ट ८२ दिवसात पूर्ण झाले. या आधी महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दीष्ट साठ दिवसात पूर्ण केले आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. योजना सुरू झाल्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत राज्यात ७१४३७ हजार घरांना लाभ झाला होता तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसात ५७,०३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले. योजनेत आतापर्यंत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना एकूण ८०० कोटी रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट देण्यात आले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या २१,०२७ झाली आहे. नागपूरनंतर पुणे (९८७५ घरे), जळगाव (९४८९ घरे), छत्रपती संभाजीनगर (८८१४ घरे), नाशिक (८५५८ घरे), अमरावती (७११९ घरे), कोल्हापूर (६२९१ घरे), धुळे (४१८७ घरे) आणि सोलापूर (४००७ घरे) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला ३० हजार रुपये, दोन किलोवॅटला ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. जास्तीत जास्त अनुदान ७८ हजार रुपये आहे. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मिटर मोफत दिला जातो. छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

थकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

एक मार्चपासून ठेकेदारांचा काम बंद आंदोलनाचा सरकारला इशारा

महिनाअखेर ७० टक्के बिले देण्याची मागणी

पुणे, प्रतिनिधी – शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर  राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय ठेकेदारांच्या संघटनांनी दिला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा धडाका सरकारने लावला होता. त्याचे कार्यारंभ आदेशही ठेकेदारांना देण्यात आले. काही कामे पूर्ण झाली, तर काही प्रगतिपथावर आहेत. मात्र, या कामांची बिले अजूनही ठेकेदारांना मिळालेली नाहीत. विविध विभागांची मिळून जवळपास ४६ हजार कोटींची बिले राज्यातील ठेकेदारांची अडकली आहेत. शासनाने सहा महिन्यांपासून बिले काढली नसल्यामुळे राज्यातील ठेकेदार

आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथील मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात चक्क डंपर आणून व पोतराजा पुढे साकड घालत हे त्यांनी अभिनव आंदोलन केले. पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशन, महाराष्ट्र हॉटमिक्स असोसिएशन, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी न दिल्यास सर्व कामे बंद ठेवण्याची घोषणा यावेळी कंत्राटदार संघटनेने केली.

यावेळी पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, महाराष्ट्र हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष बाबा गुंजाटे, अनिल जगताप, संजीव व्होरा, एम एस पंजाबी,भालचंद्र हुलसुरे, बिपिन दंताळ, सागर ठाकर ,शैलेश खैरे, विश्वास थेऊरकर , उदय साळवे, तुषार पुस्तके, अशोक ढमढेरे, राजेंद्र कांचन, कैलास इंगळे, दिग्विजय निंबाळकर व सुमारे २०० कंत्राटदार उपस्थित होते.

रवींद्र भोसले म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी विशेष भरीव तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार करतील अशी अपेक्षा यावेळी भोसले यांनी व्यक्त केली.

लेखनाच्या माध्यमातून महिलांचे अव्यक्त जग उलगडले

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त  महिला साहित्यिकांचा सन्मान

पुणे : महिला लेखकांनी केवळ महिला किंवा त्यांच्या समस्येविषयी लिहायला पाहिजे असे नाही. महिलांचे जग वेगळे आहे. महिलांनी निम्मे अवकाश व्यापले आहे परंतु या अवकाशाची कल्पना कोणालाही नाही. महिला लिहितात त्याला खूप आयाम असतात. महिलांना गृहीत धरले जात होते परंतु लेखनाच्या माध्यमातून त्यांचे अव्यक्त जग उलगडत आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल महिला साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, विनायक कदम महिला विश्वस्त अभिनेत्री वाळके उपस्थित होत्या.

स्नेहा अवसरीकर, वसुंधरा काशीकर, विनया खडपेकर, चित्रलेखा पुरंदरे, डॉ.स्मिता डोळे, ऋता पंडित या महिला साहित्यिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मुलांना कोणत्याही भाषेच्या शाळेत टाका, परंतु घरी मराठीतच बोला. आपल्या भाषेवर आपण प्रेम करायला पाहिजे त्या सोबतच इतर भाषांमधील साहित्य देखील वाचायला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उमा कुलकर्णी म्हणाल्या, ललित साहित्य हे खूप प्रभावी असून त्याची ताकद वेगळी आहे. कथा, कादंबऱ्या समाजावर मोठा प्रभाव टाकू शकतात. साहित्य टिकून ठेवायचे असेल तर वाचकांच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. आजच्या काळातील लेखकांनी आपले सामर्थ्य वाढवायला पाहिजे कारण आत्ताची पिढी ही आधीच्या पिढी इतकी भाबडी नाही. त्यामुळे लेखकांच्या साहित्यात दम असला पाहिजे. वाचन संस्कृती वाढवण्याची जबाबदारी केवळ वाचकांची नाही तर ती लेखकांची देखील आहे.

त्या पुढे म्हणाल्या, भाषा हे जिवंत माध्यम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून केवळ आनंद नको, तर भाषा बोलायला हवी. भाषा बोलली नाही तर ती मरून जाते. सध्या काही भाषांवरती ही वेळ आली आहे तसे मराठीचे होऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. 

शनिपार चौकात ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रम 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, (कसबा विभाग) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे आयोजन
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कसबा विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३००० हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वाक्षरी करून उपक्रमात सहभाग नोंदवला.

उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते योगेश खैरे, संघटक प्रल्हाद गवळी, मनविसेचे प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अभिषेक थिटे, धनंजय दळवी यांनी भेट दिली.

मनसे शहर सचिव वसंत खुटवड, मनविसे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी उपक्रमाचे आयोजन केले. तर, रुपेश चांदेकर, ऋषिकेश करंदीकर, करण मेहता, चंद्रकांत राजगुरु, प्रमोद उमरदंड, राहूल मुंगले यांनी उपक्रमाला सहकार्य केले.

मराठीत स्वाक्षरी करणाऱ्याला यावेळी पेढा देखील देण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष होते. यावेळी कॅलिग्राफी करणारे कलाकार देखील सहभागी झाले होते. मराठी भाषेचे महत्व आणि महती या उपक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली.

महावितरणच्या पिंपरी विभागामध्ये नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती

0

सोबतच ४ नवीन शाखा कार्यालयांना मान्यता

पुणे, दि२७ फेब्रुवारी २०२५: दर्जेदार वीजसेवा व ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणच्या पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाचे विभाजन करून नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी या चार शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. नव्याने तयार झालेल्या हिंजवडी उपविभागाचे कार्यालय आणि नवीन चार शाखा कार्यालयांमध्ये एकूण ८८ तांत्रिक व अतांत्रिक नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी विभागाच्या सांगवी उपविभागात यापूर्वी सांगवी, ताथवडे व हिंजवडी असे तीन शाखा कार्यालय होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कंपन्यांचे आयटी हब तसेच विजेसह नवीन वीजजोडण्यांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगवी उपविभागाच्या विभाजनाचा आणि नवीन हिंजवडी उपविभाग व चार नवीन शाखा कार्यालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठवला होता. त्यास मंजूरी देत महावितरणने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.  

सांगवी उपविभागाच्या पुनर्रचनेत सांगवी उपविभागात आता सांगवी, पिंपळे गुरव (नवीन), पिंपळे निलख (नवीन) व वाकड (नवीन) असे चार शाखा कार्यालय राहतील तर नवीन हिंजवडी उपविभागात ताथवडे, हिंजवडी आणि हिंजवडी एमआयडीसी (नवीन) असे तीन शाखा कार्यालय राहतील. पूर्वीच्या सांगवी उपविभागात एकूण २ लाख ५६ हजार ग्राहक होते. पुनर्रचनेनंतर सांगवी उपविभागात १ लाख ४० हजार आणि नवीन हिंजवडी उपविभागात १ लाख १६ हजार वीजग्राहक असतील.

नवीन हिंजवडी उपविभाग कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नवनिर्मित पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत हिंजवडी, चाकण एमआयडीसी व भोसरी-२ या तीन उपविभागांची तसेच ११ शाखा कार्यालयांची तसेच नवीन ८८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीसाठी नवीन उपविभाग व शाखा कार्यालयाबाबत वीजग्राहक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे वीज व ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होईल. 

अभिवाचनातून उलगडली स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘माझी जन्मठेप’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मरणासन्न यातना सोसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याच धारदार शब्दात तरुण कलाकारांनी आपल्या अमोघ वाणीने, आणि तितक्याच जिवंत अभिनयाने बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर अभिवाचनाच्या माध्यमातून सादर केले. या अभिवाचनाच्या द्वारे एका प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलिदान आणि त्यांचा जीवनपट ‘माझी जन्मठेप’ मधून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राहक पेठेतर्फे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहयोगाने ‘माझी जन्मठेप’ अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्य अविष्काराचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, विद्याधर नारगोळकर, संदीप खर्डेकर, श्रीकांत जोशी आदी यावेळी उपस्थित होते. या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सामाजिक समरसतेचा संदेश पुढे नेत, कार्यक्रमात हिंदू खाटीक समाजाचे नेते नरेंद्र सदाशिव घोणे यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या अभिवाचन नाट्यविष्काराची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची होती. तरी दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, संकलन अलका गोडबोले, नेपथ्य संदेश बेंद्रे, शब्दाचार मार्गदर्शन सुभाष सावरकर, संगीत मयुरेश माडगावकर यांनी केले. जान्हवी दरेकर, मुग्धा गाडगीळ बोपर्डीकर, गौरव निमकर, समर्थ कुलकर्णी, शंतनू अंबाडेकर, नवसाजी कुडव हे कथन कलाकार होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान मधील काळ्यापाण्याच्या शिक्षेच्या काळामध्ये कशा प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक यातना भोगल्या याचे जिवंत चित्रच जणू या अभिवाचनाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडले. ज्याप्रमाणे घाण्याला जुंपलेल्या बैलाकडून तेल काढणीचे काम करून घेतले जात, तसेच कैदयांकडून करून घेतले जाई. त्यावेळी त्यांना होणारा शारीरिक त्रास असो वा अंदमानच्या कोठडीमध्ये झालेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानसिक अवस्था अभिवाचनातून कलाकारांनी पुन्हा एकदा रसिकांसमोर मांडली.

सूर्यकांत पाठक म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन जितका हवा तितका लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सामाजिक दृष्टीकोन समाजाच्या तळापर्यंत पोहोचावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर पोहोचतील याची आम्हाला निश्चितच खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्राहक पेठ, भगिनी निवेदिता सहकारी बँक आणि पु.ना.गाडगीळ अँड सन्स यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.