राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा निशाणा-
मुंबई-अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. हे दोन पानांचे रिपोर्ट कार्ड असून या माध्यमातून केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सादर करत असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.
एक व्यक्ती परदेशामध्ये जाऊन देशाची बदनामी करतच आहे. मात्र राज्यातील विरोधी देखील राज्याची बदनामी करत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. विरोध करावा, आरोप करावेत, मात्र जे काम चांगले आहे. त्याला चांगले म्हटले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला आहे. आमच्या सरकारच्या 60 ते 70 कॅबिनेट बैठका झाल्या आहेत. यामध्ये 900 निर्णय घेण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आधी वर्षावर कोण जात होते? किती जणांना त्याची परवानगी होती? हे सर्वांना माहिती आहे. असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आम्ही लोकांसाठी लगेच सही करतो. मात्र पहिले मुख्यमंत्री पेन देखील ठेवत नव्हते, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. बालहट्टासाठी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली होती. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
विरोधक गडबडलेले – अजित पवार
विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. आरोप करताना विरोधकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे. आमच्या योजनांना अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातील जनतेचा मिळाला आहे. त्यामुळे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत. काही जण घाबरलेले असल्याचा आरोप देखील करत आहेत. मात्र, मी गडबडले असल्याचे म्हणेल, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी होणारच नसल्याचा आरोप विरोधक करत होते. मात्र आता अडीच कोटी महिलांच्या खात्यात महिलांचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे विरोधकांना बहिणीच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल पचणी पडत नसल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ते निवडणुकीपुरतेच पैसे मिळणार असल्याचे म्हणत आहे. मात्र, या योजनेसाठी तरतूद करण्यात आली असूनही पैसे महिलांना मिळत राहणार असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.