Home Blog Page 626

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर)इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (आयआयआरएफ) महाराष्ट्रात १२ वे, तर पश्चिम विभागात १८ वे स्थान

पुणे: इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने (आयआयआरएफ) नुकत्याच प्रकाशित केलेल्या क्रमवारीत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चला (एससीपीएचआर) महाराष्ट्रात १२ वे, तर पश्चिम विभागात १८ वे स्थान प्राप्त झाले आहे. देशातील फार्मसी महाविद्यालयांच्या यादीत ‘सूर्यदत्त’ने चमकदार कामगिरी करत या क्रमवारीत देशात ७२ वे स्थान मिळवले आहे.

उद्योग जगतातील तज्ज्ञांकडून या क्रमवारीचे सूक्ष्मपणे मूल्यांकन करण्यात येते. २०२४ या वर्षाची क्रमवारी एज्युकेशन पोस्ट मासिकात नुकतीच जाहीर झाली. अध्यापन-अध्ययन व स्रोत, संशोधन, भविष्यवेधी मार्गदर्शन, रिटर्न व इन्व्हेस्टमेंट आणि बाह्यधारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या पाच मुद्यांवर सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार केली जाते.

या क्रमवारीने सूर्यदत्तच्या समर्पित भावनेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव झाला आहे. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेच्या मान्यतेने बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या मान्यतेने डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्म) हे दोन अभ्यासक्रम चालवले जातात. उत्साही विद्यार्थ्यांची या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण व्हावीत आणि त्यांना एक चांगले करिअर घडविता यावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सूर्यदत्तसाठी ही मान्यता प्रोत्साहन आहे. सद्यस्थितीत आरोग्य क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन इथे प्रात्यक्षिक व पाठ्यपुस्तकातील ज्ञान दिले जाते.

सूर्यदत्त कॉलेज फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (एससीपीएचआर) औषधनिर्माणशास्त्राच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यास वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा उद्योगातील विविध भूमिकांसाठी तयार करण्याचे ध्येय संस्थेचे आहे. महाविद्यालयाने औषधनिर्माण पद्धतींना सुधारण्यास आणि रुग्णांच्या देखभालीत सुधारणा करण्यासाठी अभिनव संशोधनाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आधुनिक सुविधा आणि चांगल्या प्रकारे सुसज्ज प्रयोगशाळांसह, ‘एससीपीएचआर’ विद्यार्थ्यांना सिद्धांतात्मक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करते. कॅम्पसमध्ये आधुनिक वर्गखोल्या आणि प्रगत सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना सतत विकसित होणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्रातील करिअरसाठी मदत होते.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नामांकित क्रमवारीतील स्थानाबद्दल फार्मसी महाविद्यालयाच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले. अतिशय महत्वाच्या अशा या क्रमवारीत ‘एससीपीएचआर’ला स्थान मिळाल्याचा आनंद आहे. यातून महाविद्यालयाची उत्कृष्टतेबाबत असलेली समर्पित भावना आणि उच्च प्रतीचे फार्मसी प्रोफेशनल घडविण्याचे ध्येय अधोरेखित होते. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा आलेख असाच उंचवत राहावा. तुम्हाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,कसबा धंगेकर च लढविणार

मुंबई :महाविकास आघाडी पक्षातील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (23 ऑक्टोबर 2024) जाहीर केली. त्यानंतर आज (24 ऑक्टोबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या 45 तर काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार

अक्कलकुवा (एसटी) – अॅड. के. सी. पाडवी
शहादा (एसटी) – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
नंदूरबार (एसटी) – किरण दामोदर तडवी
नवापूर (एसटी) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
साकरी (एसटी) – प्रवीण बापू चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
रावेर – अॅड. धनंजय शिरिष चौधरी
मलकापूर – राजेश पंडितराव एकडे
चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
रिसोड – अमित सुभाषराव झनक
धामणगाव रेल्वे – प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
अमरावती – डॉ. सुनिल देशमुख
तिवसा – अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
देवळी – रणजीत प्रताप कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
नागपूर उत्तर (एससी) – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
चिमुर – सतीश मनोहरराव वारजूकर
हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
नायगाव – मिनल निरंजन पाटील (खतगावकर)
पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
फुलंब्री – विलास केशवराव औताडे
मीरा भायंदर – सय्यद मुझफ्फर हुसैन
मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
चांदीवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी (एससी) – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबादेवी – अमिन अमिराली पटेल
पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
भोर – संग्राम अनंतराव थोपटे
कसबा पेठ – रविंद्र हेमराज धंगेकर
संगमनेर – विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज संजय पाटील
करवीर – राहुल पांडुरंग पाटील
हातकणंगले (एससी) – राजू जयंतराव आवळे
पलूस काडेगाव – डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

दुर्गम भागातील कातकरी पाड्यांवर  दिवाळी सरंजाम वाटप

जेधे फाऊन्डेशनच्या उपक्रमाने  उजळली वंचितांची मने !

पुणे :

जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि  श्री शिव छत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट(पुणे) या संस्थेच्या वतीने.मुळशी तालुक्यातील भोडे गावालगत असणाऱ्या दुर्गम अशा ४ कातकरी पाड्यांवर  दिवाळी सरंजाम   वाटप करण्यात आले. दिवाळी सण साजरा करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूचा समावेश त्यात होता. एकूण ४५ कुटुंबांना सरंजाम वाटप करण्यात आले.दि. २३ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम अध्यक्ष  कान्होजी दयानंद जेधे  यांच्या पुढाकाराने  झाला. यावेळी नंदकुमार जाधव, रवींद्र पठारे,जयराज वाडेकर,अभिषेक गोळे,राजवीर जेधे,उमेश सपकाळ हे उपस्थित होते.या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते
‘अन्न,वस्त्र,पाणी,निवारा नसताना प्रतिकूल निसर्ग,दैनंदिन अडचणीना तोंड देत हलाखीची परिस्थिती जगणाऱ्या वंचितांची दिवाळी करण्यासाठी आम्ही  सर्व जण पायवाटा तुडवत दुर्गम भागात पोचलो.अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा सण साजरा करण्यासाठी  आणि माणुसकीचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला’,असे कान्होजी दयानंद जेधे यांनी सांगितले.जेधे मॅन्शन,गुरुवार पेठ, पंचमुखी मारुती मंदिराजवळ(पुणे ) येथे असणाऱ्या या मंडळाला समाजभूषण आप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव जेधे यांचा वारसा आहे.अनेक पुरस्कार या मंडळाला मिळाले आहेत. विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात.
*माणुसकीचा धागा जोडणारा दिवाळी सरंजाम* 
जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि  श्री शिव छत्रपती मित्र मंडळ ट्रस्ट या संस्थेच्या वतीने.देण्यात आलेल्या दिवाळी सरंजाममध्ये २ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो बेसन,डालडा ,तेल,मैदा,भाजके पोहे,फुटाण्याची डाळ,चकली भाजणी,खोबरे गोटा,मीठ,पिठी साखर,चिवडा मसाला,मोती साबण,उटणे,सुगंधी तेल,४ पणत्या,आकाश कंदील,फटाके,लाईट माळ ,रांगोळीचे रंग,रांगोळी स्टिकर,लक्ष्मी पावले,अत्तर,देवतांच्या तसबिरी,फुलांचे तोरण यांचा समावेश होता. 

आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन

शनिवारपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार; दूध उत्पादक शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांना प्रगतीची संधी

पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. बेनिसन मीडियाच्या पुढाकारातून ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी पुणे येथे होत असलेले हे प्रदर्शन येत्या शनिवारपर्यंत (दि. २६) सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात जवळपास १०० दूध व दुग्धजन्य उत्पादने आणि यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद मेश्राम, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ दूध) चेअरमन अरुण डोंगळे, जाफा कॉम्फीडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद वाघ, द वर्ल्ड व्हेटर्नरी पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. जितेंद्र वर्मा, पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे वसंतकुमार शेट्टी, कंपाउंड लिव्हस्टॉक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे चेअरमन दिव्याकुमार गुलाटी, यांच्यासह संयोजक प्राची अरोरा व आनंद गोरड आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी डेअरी व पशुखाद्य निर्मिती व्यावसायिक, शेतकरी युवक, युवतींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली.

डॉ. मिलिंद मेश्राम म्हणाले, “महाराष्ट्रात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दुधाचे उत्पादन व त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी दुभत्या जनावरांचे आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे असते. जनावरांना चांगला चारा, पौष्टिक पशुखाद्य देण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित लसीकरण, गरजेनुसार उपचार व्हायला हवेत.”

अरुण डोंगळे म्हणाले, “डेअरी आणि पशुखाद्याची सुरक्षा घेऊन होत असलेले हे प्रदर्शन शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, डेअरी व्यवसायाला पूरक आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण केला पाहिजे. गोकुळने दर्जा जपत संकलन वाढवले आहे. लाखो लिटर दुधाचे संकलन आणि हजारो शेतकरी बांधव गोकुळचे सभासद आहेत.”

प्रकाश कुतवळ म्हणाले, “व्यवसायात नावीन्य असणे प्रगतीचे लक्षण आहे. डेअरीत चांगल्या दर्जाचे दूध मिळत नाही. दुधाच्या भेसळीवर चर्चा करण्यापेक्षा त्यावर काम करणे अधिक महत्वाचे आहे. सहकार आणि खासगी अशा दोन शाखा या क्षेत्रात काम करतात. एखादी डेअरी किती दूध संकलित करते, यापेक्षाही त्याचा दर्जा काय, हे जास्त महत्वाचे आहे.”

प्राची अरोरा म्हणाल्या, “प्रदर्शनाचे आठवे वर्ष असून, यंदाची संकल्पना ‘मिल्क अँड फीड सेफ्टी’ अशी आहे. जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, डेअरी प्लांट मशीनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आईस्क्रीम व मिठाई उत्पादन, निर्यातीमधील संधी, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केट यावर तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा झाली.”

गेल्या सातही प्रदर्शनांमध्ये अत्याधुनिक मशिनरींची प्रात्यक्षिके पाहून व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अनेक शेतकऱ्यांनी व ग्रामीण युवक युवतींनी स्वतःचा लघु व मध्यम स्वरूपाचा दुग्धजन्य पदार्थ किंवा पशुखाद्य निर्मिती प्रकल्प उभारून स्वतःच्या ब्रँडनेमने विक्री यंत्रणा सुरु केली आहे, असे आनंद गोरड यांनी नमूद केले.

प्रसाद वाघ यांनी दुधाच्या दर्जेदार उत्पादनात पशुखाद्य कसे महत्वाचे आहे, याविषयी माहिती दिली. वसंतकुमार शेट्टी यांनी पोल्ट्री उद्योगाविषयी आपले विचार मांडले. जयाविजया राव यांनी सूत्रसंचालन केले. अश्वनीकुमार यांनी आभार मानले.

पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल 

पुणे -पर्वती विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष  आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता येथील लढत आता रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पर्वती  मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा यासाठी आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अन्य नेत्यांना वारंवार भेटून साकडे घातले होते.त्यांना पक्षश्रेष्ठींनी अनुकूलता दर्शवली आहे. सध्या   महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने,आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष , महाविकास आघाडी आणि अपक्ष म्हणून गुरुवारी (दि. २४ ) उमेदवारी अर्ज दाखल केला.  जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे,असा ठाम विश्वास व्यक्त करताना यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच आणि पर्वती मतदारसंघात परिवर्तन करणारच असा निर्धारही आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे. परिणामी यंदा या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार असून परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत.  

राजेश पांडे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती

पुणे – महाराष्ट्र भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची संघटनात्मक नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सातत्य आणि चौफेर संघटनशैलीने महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पांडे यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेत पक्षाने पांडे याना ही नवी जबाबदारी दिली आहे. याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समाजमाध्यमावर (एक्सवर) पोस्ट करून माहिती दिली आहे.

मितभाषी असलेले पांडे हे गेल्या 40 वर्षापासून संघ परिवारात सक्रिय आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे अकरावीमध्ये शिक्षणासाठी पुण्यात आले. तेव्हापासूनच ते पुण्यात आले. करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. दहा वर्ष पूर्ण वेळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले. परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे. शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपने 1993 मध्ये मुंबईत सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढला होता. त्याचे नेतृत्व आणि नियोजन पांडे यांनी केलेले. तेव्हापासूनच त्यांच्या संघटन कौशल्याची चुकून दिसून आली.

अलीकडच्या काळात भाजप उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले. मेरी माती मेरा देश, हर घर तिरंगा असे अभियान त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहचवत गिनीज रेकॉर्ड पूर्ण केले. याशिवाय जी२० परिषद, अयोध्या दर्शन अभियान असे अनेक संघटन उपक्रम त्यांनी पूर्ण ताकदीने यशस्वीपणे राज्यभर अमलात आणले. पुणे पुस्तक महोत्सवाचे ते आयोजक आणि संयोजक असून आतापर्यंत ७ गिनीज रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.

शिक्षण, सहकार, साहित्य, कौशल्य विकास आणि रोजगार, आरोग्य, क्रीडा, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रात पांडे यांनी युवा सक्षमीकरणावर काम केले आहे. लोकसहभाग हा त्यांच्या कामाचा गाभा राहीला आहे. संघटन कौशल्य आणि सर्वपक्षीय जनसंपर्क हि त्यांच्या राजकीय कामाची ओळख सांगितली जाते.


नवीन जबाबदारी स्वीकारताना मी देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आभार मानतो. विधानसभा निवडणुका सुरु झालेल्या आहेत. पक्षाच्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे संघटनेचे संपूर्ण लक्ष्य भाजप आणि महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येण्यासाठीच्या नियोजनावर आहे. निवडणुकीसाठी बूथ रचना, सरकारच्या लोककल्याणकरी योजना लोकांपर्यंत पोहचवणे यावर सध्या काम सुरु आहे. – -राजेश पांडे, महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश, भाजपा

हडपसर मधून प्रशांत जगताप तर वडगाव शेरीतून बाप्पू पठारेंना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर ..

आज ४५ जागा जाहीर – खडकवासला ,पर्वती उद्या जाहीर करणार

पुणे-महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात इस्लामपूर येथून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काटोल येथून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, घनसांगवी येथून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंब्रा- कळवा येथून पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड व इंदापूर येथून हर्षवर्धन पाटील,हडपसर मधून प्रशांत जगताप तर वडगाव शेरीतून बाप्पू पठारेंना, बारामतीतून युगेन्द्र पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद पवार गटाच्या यादीनुसार स्वतः जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणुकीसारखीच हायव्होल्टेज लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा सामना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार
जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

नाव – प्रशांत सुदामराव जगताप
वय – ४६ महाविद्यालयीन शिक्षण नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ठाम व आक्रमक भूमिका घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांसोबत राहण्याचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौराचे नाव वगळणे हा पुणे शहराचा अपमान होता. महापौरपदाचा सन्मान राखण्यासाठी थेट संघर्ष

पुण्याच्या पाणीप्रश्नावरून तत्कालीन पालकमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. गिरीषभाऊ बापट यांच्याशी संघर्ष
महापौरपदाच्या कार्यकाळात ‘पीएमपीएमएल’चे सक्षमीकरण
पुण्यात २४ x ७ पाणीपुरवठा योजनेची सुरुवात
डिसेंबर २०१६ मध्ये महापौरपदाच्या कार्यकाळात पुणे मेट्रोचा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका. गेल्या चार वर्षांत सर्वाधिक आंदोलने

१९९७ – सामाजिक कार्यास सुरुवात
१९९९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य. पक्षात आतापर्यंत सरचिटणीस ते शहराध्यक्ष अशी २५ वर्षांची संघटनात्मक कारकीर्द
२००० – चिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००२ – सरचिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००३ – सदस्य, पुणे महानगरपालिका परिवहन समिती (पीएमटी)
२००६ – पुनश्च सरचिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००७ – आई रत्नप्रभाताई सुदाम जगताप नगरसेविका म्हणून विजयी
२०१२ – वानवडी – कोंढवा प्रभागातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून विजयी
२०१२ – पीएमपीएमएल संचालकपदी निवड
२०१६ – २०१७ – पुण्यनगरीच्या महापौरपदी निवड
२०१७ – नगरसेवक म्हणून विजयी
२०१९ – (विधानसभा निवडणूक) प्रभारी अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
७ मे २०२१ पासून – अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
माजी संचालक – एसआरए
माजी संचालक – पीएमआरडीए
माजी संचालक – पुणे स्मार्ट सिटी

भोसरीत पाण्याची टाकी कोसळून भीषण अपघात :

पुणे-भोसरीच्या सदगुरू नगर येथील लेबर कॅम्पमधील पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये पाच ते सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. अद्याप मृतांची नावे समोर आलेली नाहीत. तर पाण्याची टाकी कोसळली त्याठिकाणी आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन व पोलीस प्रशासन उपस्थित मदत काय॔ सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना घडली. यात पाच ते सात जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी उभारण्यात आलेली ही पाण्याची टाकी आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी ही पाण्याची टाकी महापालिकेची नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पाण्याची टाकी कोसळल्याची घटना जिथं घडली तो लेबर कॅम्प एन एन सी एल या कंपनीचा आहे. या लेबर कॅम्प मध्ये राहणारे सर्व बांधकाम मजूर आहेत. या मजुरांना आंघोळ करण्यासाठी ठेकेदाराने जवळपास 12 फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारली होती. सकाळी काही मजूर टाकी खाली आंघोळ करत होते. टाकीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याच्या टाकीचा संपूर्ण ढाचा कामगारांवर कोसळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

जिथे हा लेबर कॅम्प उभारण्यात आला होता ती जागा रेड झोनची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान संबंधित टाकी महापालिकेनं उभारलेली नव्हती मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी दिली आहे. तर घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.

प्रवाशांची लूट होऊ नये!पुणे अर्बन सेलची मागणी

पुणे-दीपावली काळात शासकीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात एसटी आणि रेल्वे यांचे बुकिंग फुल असल्याने अनेक खासगी बसचालक याचा गैरफायदा घेताना दिसून येतात. परिवहन विभागाच्या नियमानुसार ५०% वाढीव दर घेण्याची मुभा खासगी वाहन चालकांना दिली असूनही या दर तीन पट वाढत असल्याने नागरिकांची प्रचंड प्रमाणात लूट दिसून येते.विमान तिकीट दरात खासगी बसने करावी लागणारी ही वाहतूक म्हणजे प्रवाशांची राजरोस लूट असून याबद्दल आज वडगाव शेरी विधानसभा अर्बन सेलच्या अध्यक्षा नीता गलांडे यांनी परिवहन विभागात उपनिरीक्षक स्वप्नील भोसले यांना निवेदन देत आवाज उठवला. यावेळी खाजगी वातानुकुलीत बसचे दरपत्रक ठरवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून यावर अधिकारी वर्गाने सकारात्मक कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे.

एसटी महामंडळामध्ये सहाय्यक वाहतूक अधिक्षक यांच्याकडे निवेदन देताना दीपावली काळात एसटी बसेसची संख्या वाढवण्यात यावी आणि दर्जा सुधारण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

साईनाथ नगर ते वडगाव शेरी गावठाण या ठिकाणी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या मार्गावरील खासगी वाहनांकडून जाताना ६० रुपये आणि येताना ६० रुपये असा १२० रुपये दर शालेय विद्यार्थ्यांकडून आकारला जातो. हा दर मासिक ३६०० रुपये असून साईनाथ नगरपासून बॉलिवूडमार्गे पुणे स्टेशनला जाणारी बस शालेय वेळेत साईनाथ नगर – वडगाव शेरी – पुणे स्टेशन या मार्गाने जावी, अशी वाहतूक नियोजन व संचालन अधिकारी श्री. नारायण करडे साहेब यांच्याकडे मागणी केली. अधिकारी वर्गाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे.

याप्रसंगी वडगाव शेरी विधानसभा अर्बन सेलच्या अध्यक्षा नीता गलांडे, कोथरूड विधानसभा अर्बन सेलच्या अध्यक्ष मीनल धनवटे तसेच अर्बन सेलचे सदस्य अब्दुल भाई तांबोळी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटलांनी अर्ज भरला; पण अपक्ष उमेदवाराने इंदापुरात वाढवले आजी-माजी आमदारांचे टेन्शन!

इंदापूर-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्याही परिस्थितीत इंदापूरमध्ये तुतारीचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या मतदारसंघात प्रवीण माने यांनी बंडखोरी करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा इंदापुरात तिरंगी सामना होणार आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्त्वाचे म्हणजे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे मात्र आता तिरंगी लढत होणार असल्याने आजी-माजी आमदारांची धाकधूक वाढली आहे. इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतल्याने अस्तित्वात आलेल्या तिसऱ्या आघाडीतून प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे हे उमेदवार असणार, असे निश्चित नव्हते. मात्र, बुधवारी सकाळी ‘माझे ग्रामदैवत बाबीरबुवाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील गुलाल पुडीत बांधून सभेला आलो आहे. त्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, काहीही केले तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही. हाताला फक्त कपाळाला गुलाल लावतो. तो उधळण्यावर फक्त तुमचा अधिकार आहे,’ अशा शब्दात आपला इरादा स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रवीण माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर शहरातून मोठी दुचाकी रॅली काढली. सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. दुसरीकडे माने यांची रॅली भरत शहा यांच्या दुकानासमोर आली. श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे मुकुंद शहा, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मुकुंद शहा यांचे वडील गोकुळदास शहा यांच्या प्रतिमेला माने यांनी अभिवादन केले. त्यावेळी शहा कुटुंबियांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च गर्दीत सभाही केली. यावेळी मात्र आप्पासाहेब जगदाळे अनुपस्थित होते.

आप्पासाहेब जगदाळेंची भूमिका निर्णायक
१९९५ मध्ये इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानंतर तत्कालीन अपक्ष उमेदवार निवडून आला होता. तिरंगी लढत झाली तर अपक्ष उमेदवार निवडून येतो हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीतील महत्त्वाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जगदाळे यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी विशेष स्नेह आहे. हर्षवर्धन पाटील हे जरी मामा असले तरी त्यांच्याशी सख्ख नाही. काही दिवसांपासून प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे हे दोघेही तिघांच्या समन्वयातून उमदेवार निश्चित करण्यात येईल, असे सांगत होते. मात्र, प्रवीण माने यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्याने जगदाळे नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“नवदुर्गांनी आता चंडिका बनायला हवे” – डॉ.राजेंद्र भवाळकर.

पुणे-माणुसकी फौंडेशन, जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन, जनहित बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान अशा १४ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. उद्यान मंगल कार्यालय सदाशिवपेठ येथे नुकतेच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ.राजेंद्र भवाळकर ,डॉ.अनिल माळी, डॉ.सुवर्णा माळी, अॅड.प्रार्थना सदावर्ते, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.राजेंद्र भवाळकर यांनी नवदुर्गांनी आता चंडिका बनायला हवे, सध्या महिला असुरक्षित झाल्या आहेत, प्रथितयश महिलांनी याबाबत जनजागृती केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

TATA AIG तर्फे महिला, मानसिक आरोग्य आणि कर्करोग विषयक उपचारसेवा यावर भर देणाऱ्या राइडर्सचे सादरीकरण

·         60 पेक्षा जास्त फायदे देणारे पाच नवीन राइडर्स सादर

·         मेंटल वेलबीइंग, एम्पॉवरहर, ओपीडी केअर, कॅनकेअर आणि फ्लेक्सी शिल्ड हे नवीन राइडर्स महत्त्वाच्या आरोग्य गरजांच्या पूर्ततेसाठी तयार करण्यात आले आहेत. 

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२४: भारतातील आघाडीची जनरल विमा पुरवठादार कंपनी TATA AIG जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज 60 पेक्षा जास्त फायदे देणारे पाच नवीन राइडर्स सादर करण्याची घोषणा केली. त्यायोगे त्यांच्या रिटेल आरोग्य विमा उत्पादनांची लवचिकता आणि व्यापकता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय खर्च सतत वाढत असल्याने आणि आरोग्यसेवेच्या गरजा बदलत असल्याने वाढत्या आरोग्य समस्या आणि जीवनशैली बदलांचा विचार करून हे राइडर्स वैयक्तिकृत संरक्षण देण्यासाठी तयार केले गेले आहेत. या सादरीकरणातून ग्राहकांना आरोग्य विमा क्षेत्रात विकास साधणाऱ्या संबंधित आणि अभिनव उपायसुविधा देण्याची  TATA AIG ची बांधिलकी प्रतिबिंबीत होते.

मेंटल वेलबीइंग, एम्पॉवरहर, ओपीडी केअर, कॅनकेअर आणि फ्लेक्सी शिल्ड हे नवीन राइडर्स मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि कर्करोग संरक्षण या सारख्या महत्त्वाच्या आरोग्य गरजांच्या पूर्ततेसाठी तयार करण्यात आले आहेत. एम्पॉवरहर राइडर महिलांच्या समग्र आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करते. जसे की वंध्यत्व, PCOS आणि इतर स्त्रीरोग संबंधित समस्या.  मेंटल वेलबीइंग राइडर या उद्योगक्षेत्रात प्रथमच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रतिबंधात्मक तपासण्या आणि पुनर्वसन संरक्षण सादर करते. कॅनकेअर कर्करोगासाठी वाढीव संरक्षण देते, ओपीडी केअर आणि फ्लेक्सी शिल्ड ग्राहकांना वाढत्या वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन आरोग्य खर्चांपासून सुरक्षित करतात.

क्लेम प्रक्रिया सुधारणा:

TATA AIG ने त्यांच्या क्लेम सेटलमेंट प्रक्रियेमध्ये देखील महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.  ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. कंपनीचे कॅशलेस क्लेम्सचे उपयोग आर्थिक वर्ष 2022-23 मधील 67.7% वरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 76.95% वर गेले आहेत. त्यामध्ये 96% कॅशलेस क्लेम्सवर चार तासांच्या आत प्रक्रिया केली जाते आणि 85% रिइम्बर्समेंट क्लेम्स पाच दिवसांच्या आत सेटल केले जातात.

कंपनी येत्या वर्षांत 100% कॅशलेस क्लेम्सच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करत आहे. या सुधारणांमुळे उद्योगक्षेत्रात कार्यक्षमतेसाठी आणि ग्राहक समाधानासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करत TATA AIG च्या जलद, सहज सेवेच्या बांधिलकीचे दर्शन होते.

नेटवर्क विस्तार

TATA AIG ने देशभरात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी आपले नेटवर्क आक्रमकपणे विस्तारित केले आहे. भारतातील 11,700 हून अधिक नेटवर्क हॉस्पिटल्ससह गेल्या 18 महिन्यांत 64% वाढ दर्शवत, TATA AIG चे प्रमुख लक्ष विशेषकरून वंचित क्षेत्रांमध्ये त्यांचे स्थान  विस्तारण्यावर आहे. OPD नेटवर्कमध्ये 5,000 हून अधिक सूचीबद्ध डॉक्टर आणि 3,000 हून अधिक निदान पुरवठादार आहेत. ते व्यापक आरोग्य सेवा संरक्षण सुनिश्चित करतात. याशिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी आणखी सुधारणा करत 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये समर्थित मजबूत टेलीकन्सल्टेशन सेवा आहे.

TATA AIG जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि एजन्सी प्रमुख  प्रतीक गुप्ता यांनी नाविन्यपूर्णता आणि विकास यावर असलेल्या कंपनीच्या बांधिलकीवर जोर दिला: “या नवीन राइडर्सचे सादरीकरण हा आरोग्य विमा क्षेत्रातील वाढीस गती देण्याच्या आमच्या धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. जेथे आरोग्यसेवा सुविधा उपलब्धता आणि जागरूकता वेगाने वाढत आहे अशा भारतातील विशेषतः टियर 2 आणि 3 शहरांमधील विस्तारावर आमचे लक्ष केंद्रित आहे. शाखा, एजंट्स आणि हॉस्पिटल पार्टनर्सचे नेटवर्क वाढवून, आम्ही लाखो लोकांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक प्रवेशयोग्य बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे आरोग्य विमा क्षेत्रातील वाढ साधली जाईल.”

प्रमुख राइडर वैशिष्ट्ये:

1.  एम्पॉवरहर: PCOS, वंध्यत्व, स्त्रीरोग संबंधित समस्या, महिलांमध्ये विशेष करून आढळणारे कर्करोग आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या महिलांच्या संपूर्ण आरोग्य समस्यांसाठी विमा संरक्षण देणारे समर्पित राइडर. यात गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाय संरक्षणाचा देखील समावेश आहे.

2.  मेंटल वेलबीइंग: मानसिक आरोग्य विषयक समस्यांसाठी या उद्योगक्षेत्रात प्रथमच विमा संरक्षण. लवकर आणि वेळेवर निदान आणि उपचार यावर भर देत यामध्ये मानसिक आरोग्य तपासण्या, मानसोपचार, पुनर्वसन सेवा यांचा समावेश 

3.  कॅनकेअर: विशिष्ट तीव्रतेच्या कॅन्सरचे निदान झाल्यास निश्चित विमा रकमेचे एकरकमी पेमेंट देणारे विस्तारित कॅन्सर कव्हर.

4.  ओपीडी केअर: दैनंदिन आरोग्य गरजा पूर्ण करण्याचे सुनिश्चित करत डॉक्टरांशी सल्लामसलत, निदान, औषध खरेदी, आणि व्हिजन कव्हर यांसारख्या बाह्यरुग्ण खर्चासाठी संरक्षण 

5.  फ्लेक्सी शिल्ड: वैद्यकीय महागाईपासून पॉलिसीधारकांना संरक्षित करण्यासाठी तयार केलेले रिस्टोअर इन्फिनिटी+ सह विमा रकमेचे अमर्याद रिस्टोरेशन आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या संरक्षणासाठी इन्फ्लेशन शिल्ड, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसरे वैद्यकीय मत, आधीपासून असलेल्या आजारासाठी/ आजारांसाठी 31 दिवसांचे विमा संरक्षण, जगभरात रुग्णालय कॅश आणि इतर प्रीमियम फायदे देते.

220 पेक्षा जास्त ठिकाणी उपस्थिती आणि 11,700 हून अधिक हॉस्पिटल्सच्या नेटवर्कसह, TATA AIG आरोग्य विमा क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा विस्तारण्यासाठी सज्ज आहे.

कोपा मॉलच्या पोएट्री पार्टीमध्ये गोष्टी आणि कवितांचा आनंद

पुणे, २३ ऑक्टोबर २०२४ – कोपा मॉल हे पुण्यातील लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन ऑक्टोबरमध्ये आणखी एक आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. मॉलमध्ये टेप अ टेलतर्फे पोएट्री पार्टी आयोजित केली जाणार असून त्यात कथाकथन, कविता आणि कल्पक अभिव्यक्तीला वाव दिला जाणार आहे. २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी टेरेसवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नव्या युगातील काही प्रमुख स्टोरीटेलर्स आणि कवींचा समावेश असेल.

पोएट्री पार्टीचे स्टार्स रंगमंचावर काव्य आणि कथांचा अनोखा मिलाफ सादर करणार आहेत. प्रेक्षकांना अमनदीप सिंग यांच्या प्रेम व विरहाच्या कथा ऐकायला मिळतील, तर वानिका सांगतानी त्यांच्या काव्यात्म नजरेतून भावनिक प्रवासाचा आढावा घेतील. दिव्या प्रकाश दुबे पहिल्या दिवशी आपल्याशा वाटणाऱ्या, भावस्पर्शी कथा सादर करतील. दुसऱ्या संध्याकाळी याहया बुटावाला रोमँटिक कथा सादर करतील, निधी नारवाल यांच्या कथांतून स्वतःला आणि नात्यांना शोधतानाचा प्रवास उलगडेल आणि रूचिका लोहिया आयुष्याबद्दलचे विचारपूर्वक प्रतिबिंब मांडतील.

कलात्मक पद्धतीने सजवण्यात आलेल्या टेरेसवर होणार असलेली ही पोएट्री पार्टी उपस्थितांना प्रेम, आयुष्य आणि प्रेरणेद्वारे भावनिक उंचीवर घेऊन जाईल. तुम्ही कवितांचे दर्दी असाल, किंवा कथांचे, हे सादरीकरण मनोरंजन आणि स्वशोधाचा उत्तम मेळ घालणारे असेल. प्रत्येक संध्याकाळी ६ ते ९ चालणार असलेल्या या टेप अ टेलमध्ये सर्जनशील आणि कथाप्रेमींच्या सहवासात एकमेकांशी कनेक्ट होण्याची अनोखी संधी मिळेल.

ठिकाण : टेरेस, कोपा मॉल

तारीख: २६ ऑक्टोबर (शनीवार) आणि २७ (रविवार)

वेळ : संध्याकाळी ६ ते रात्री ९

महाराष्ट्राला यशोमती ठाकूर सारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची गरज- आ. विनेश फोगाट

नामांकन रॅली व सभेला नागरिकांची अफाट गर्दी

महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर चा नामांकन अर्ज दाखल

तिवसा येथे लोकनेत्या यशोमती ठाकूर यांचे शक्तिप्रदर्शन

अमरावती-महिलाच नव्हे तर युवकांवर देखील अन्याय करणाऱ्या भाजप प्रणित सरकारला पराभूत करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणा. यशोमती ठाकूर सारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची समाजाला व पर्यायाने महाराष्ट्राला गरज असून या आपल्या बहिणीला हरविण्यासाठी विरोधक षडयंत्र रचतील परंतु आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पोहचवा असे आवाहन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आ. विनेश फोगाट यांनी केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार लोकनेत्या यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत आ. विनेश फोगाट बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव,मध्यप्रदेशचे माजी मंत्री सुखदेव पांसे,खा. बळवंत वानखडे,वर्धा येथील खा. अमर काळे, यवतमाळ येथील खा.संजय देशमुख,माजी मंत्री अनिलबाबू देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,आ. धीरज लिंगाडे,बबलू देशमुख, वीरेंद्र जगताप दिलीप एडतकर, सुनील देशमुख, विलास इंगोले, बबलू शेखावत,शाम देशमुख, यांची उपस्थिती होती.महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्ते व जनताजनार्दन यांच्यां उपस्थितीत यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा विधानसभा मतदार संघासाठी नामांकन दाखल केले. आ. यशोमती ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटकपक्षाचे हजारो कार्यकर्ते तिवसा येथील समर्थ आडकूजी महाराज नगर सातरगाव रोड येथील मैदानावर जमले होते.
प्रारंभी नामांकन रॅली काढून यशोमती ठाकूर यांनी अफाट सभा घेतली.मोठ्या शक्तीप्रदर्शनात त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी पुढे बोलतांना विनेश फोगाट म्हणाल्या की,यशोमती ठाकूर या बहादूर बेटी व बहीण आहे. यशोमतींचा आवाज म्हणजे तुमचा आवाज.यशोमती ठाकूर सारख्या महिला निर्माण झाल्यास महिलांवर अत्याचार होणार नाहीत असा विश्वास आ.फोगाट यांनी व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारचा समाचार घेत यशोमती ठाकूर सारख्या जनतेच्या पाठीराख्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी माजी मंत्री सुखदेव पांसे यांनी यशोमती सारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आज गरज असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी खा.अमर काळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.भाजपा व महायुतीच्या उमेदवारांची लोकसभेत कशी दयनीय अवस्था झाली याची सर्वांनाच कल्पना आहे त्याची धास्ती घेऊन विद्यमान सरकारने अनेक योजनांचे प्रलोभन जनतेला दाखविले. अश्या फोकनाड सरकारला खाली खेचण्याची वेळ आली असून आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असा आशावाद महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची साथ, तुमचा आशीर्वाद हाच माझा विश्वास-यशोमती ठाकूर

तुमचे प्रेम,आशीर्वाद,विश्वास माझी ताकद आहे.कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तुमची साथ पुरेशी आहे. ही लढाई नुसती निवडणूकी पुरती नसून संविधान वाचविण्यासाठी आहे. विद्यमान सरकारने तुमचा विश्वासाघात केला.शेतीमालाला आजही पंधरा वर्षांपूर्वीचेच भाव आहे. फसव्या योजना काढून भाजप प्रणित सरकारने मतदारांना आमिष दाखविले आहे. आपल्याला कोणत्याही प्रलोभनांना बळी पडायचे नाही.पक्ष व घर फोडण्याचे काम करणाऱ्या लोकांना संविधानाची ताकदच येणाऱ्या काळात दाखवावी लागेल यासाठी सजग राहून महाविकास आघाडीला भक्कम साथ द्या. विकास करणाऱ्यांच्या पाठीशी राहा.संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आवाहन तिवसा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केले.

यशोमती ताईंनी नेतृत्व सिद्ध केलं-खा. वानखडे

याप्रसंगी बोलतांना खा. बळवंत वानखडे यांनी म्हटले की, यशोमती ठाकूर यांनी तिवसा विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा आणली.त्यांनी विविध विकासकामे करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हे नेतृत्व आपण जपलं पाहिजे असं नेतृत्व लाभण आपल्या जिल्ह्याचे भाग्य आहे आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन यावेळी खा.बळवंत वानखडे यांनी केले.

आदर्श आचारसंहितेमुळे ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद

पुणे, दि. २४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांकडून स्वीकारण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याबाबत मुदतवाढ लागू राहणार नाही, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.