Home Blog Page 623

देण्याची वृत्ती समाजाला समृद्धी व संपन्नतेकडे नेते- मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर-जोशी

 कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : केवळ धार्मिक कार्यापुरते मंदिर मर्यादित न ठेवता, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य संस्थांद्वारे केले जात आहे. आपण सामाजिक दायित्वाच्या मार्गावर चाललो, तर खूप काही करु शकतो. देण्याची वृत्ती ही समाजाला समृद्धी व संपनतेकडे घेऊन जाते. समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रत्येकाने पूर्ण केली तर माणूस म्हणून जगताना आनंद मिळू शकतो. असेच कार्य कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट सारख्या संस्था करीत आहेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर-जोशी यांनी व्यक्त केले. 
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्षी देण्यात येणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ.माधवी वैद्य, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे उपस्थित होते. 
प. पू. श्री कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन संस्था, पत्रकार अर्चना मोरे पाटील व खेळाडू रेश्मा पुणेकर यांना प्रदान करण्यात आला. दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. परमार्थ निकेतन चा पुरस्कार संस्थेतर्फे प्रमुख विश्वस्त चैतन्यदादा मल्लापूरकर यांनी स्विकारला. 
परमार्थ निकेतन व अर्चना मोरे यांनी मिळालेली पुरस्काराची रक्कम पुन्हा ट्रस्टच्या सामाजिक कार्याकरिता दिली. पुरस्कारार्थींनी त्यांच्या खडतर वाटचालीत खंबीर पाठबळ देणारे रेश्माचे वडील शिवाजी पुणेकर व मार्गदर्शक संतोष तांबे तसेच अर्चनाच्या आई व लता मोरे यांचाही सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला.

डॉ.माधवी वैद्य म्हणाल्या, स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. स्त्रिया आपल्या बौद्धिक सक्षमतेप्रमाणे सर्व क्षेत्रात लखलखत आहेत. आपले जीवन सफल करायचे असेल, तर आहार, विहार आणि विश्रांती ही तीन सूत्रे महत्वाची आहेत. आहारामध्ये शारिरीकतेसोबतच मानसिक आहार देखील गरजेचा आहे. आता स्त्रियांनी स्वत:ला अबला नाही, तर सबला समजायला हवे. 
पुरस्काराला उत्तर देताना चैतन्य दादा मल्लापूरकर म्हणाले, प.पू.कलावती आईंनी सन १९४२ साली हरिमंदिर येथून उपासनेला प्रारंभ केला. आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे १२०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत. आईंनी सर्वांना उपासनेचा मार्ग घालून दिला. त्यानुसार सर्वच जण सेवारुपाने येथे कार्य करतात, असे सांगत प.पू.कलावती आई आणि परामार्थ निकेतनचे कार्य सांगण्यात आले. 
रेश्मा पुणेकर म्हणाल्या, प्रत्येकाची परिस्थिती सामान्यच असते. मात्र, आई, वडिल, प्रशिक्षक आणि सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो. मी देखील या सर्वांच्या पाठिंब्यामुळे क्रीडा क्षेत्रात यश मिळवू शकले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सातत्य टिकविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्चना मोरे म्हणाल्या, गुन्हे क्षेत्रात पत्रकारिता करताना अनेक प्रकारे दबाव येत असतो. पण आपण सत्य घटेनेचे वार्तांकन केले व सचोटीने काम केले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करायला मदत होईल. आपण केलेले काम हीच कालंतराने आयुष्यभराची ओळख होऊन जाते.
राजेंद्र बलकवडे यांनी स्वागत केले. डॉ.पराग काळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

एआय तंत्रज्ञानाची तुलना अणुउर्जेशी केली जात आहे -निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस

– स्नेह-सेवा व मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे ‘सैनिक-स्नेह’ या प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ
पुणे : आज लढाईचे तंत्र बदलत आहेत. आजचे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा योग्य वापर देखील युध्दात होत आहे. आजच्या तंत्रज्ञानाचा विचार केला असता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जो प्रभुत्व मिळवू शकेल तो जगावर प्रभुत्व मिळवू शकेल असे मानले जाते. एआय तंत्रज्ञानाची तुलना ही अणु उर्जेशी केली जाते. आज एआय तंत्रज्ञानाचा वापर चीन मध्ये सर्वाधीक केला जात आहे, तंत्रज्ञानाच्या बाबातीत भारताने देखील खूप प्रगती केली असून आणिखी प्रगती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) यांनी केले.

स्नेह-सेवा व मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे ‘सैनिक-स्नेह’ या प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त देशाच्या सीमावर्ती भागातील जवानांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला. नवी पेठेतील निवारा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चितळे बंधू मिठाईवाले उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, सचिव नीला सरपोतदार सैनिक स्नेह प्रकल्प प्रमुख डॉ.दिनेश पांडे, सुधीर पळसुले, अविनाश जोशी, सुनिता वाघ आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी चितळे बंधू उद्योग समूहाचे प्रमुख श्रीकृष्ण चितळे आणि देणगीदार यांनी सहकार्य केले .यावेळी सुदर्शन हसबनीस यांनी आधुनिक युद्धतंत्र आणि भारत या विषयावर मार्गदर्शन केले. 

सुदर्शन हसबनीस म्हणाले, आज युध्दभूमीवर ड्रोनचा वापर वाढताना दिसत आहे. संरक्षणाच्या सर्व कवचाला भेदून ड्रोन आणि मिसाईल्स हल्ला करू शकतात. जिथे पोहचणे अशक्य होते त्या ठिकाणी जावून ड्रोन हवी असणारी माहिती मिळवू शकतो आणि युध्दासाठी आवश्यक असणाऱ्या इतर अनेक गोष्टी साध्य करीत आहे. भारत देशावर कोणी हल्ला केला तर त्याला प्रतिउत्तर देण्याइतकी साधने भारताकडे आहेत. त्याचबरोबर शत्रूला हरवण्याइतकी ताकद देखील भारताकडे आहे. परंतु ती ताकद आणखी वाढवून तंत्रज्ञानात प्रगती करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपक्रमाचे यंदाचे २९ वे वर्ष होते. संस्थेच्यावतीने तब्बल ६ हजार दिवाळी फराळ बॉक्स जम्मू आणि काश्मीर, तवांग आणि दिब्रुगड या सीमेवरील जवानांसाठी पाठविला आहे. त्याचबरोबर भेटकार्ड देखील आहेत. कार्यक्रमात विविध बटालियनच्या जवानांना पाहुण्यांच्या हस्ते मिठाई व संस्थेतील मुलांनी बनविलेले भेटकार्ड देण्यात आले, अशी माहिती डाॅ. राधा संगमनेरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्याम भुर्के यांनी केले. प्रास्ताविक डॉ.राधा संगमनेरकर.. यांनी केले. आभार नीला सरपोतदार यांनी मानले.

रानटी चित्रपटाचा दमदार टिझर आला !

THE MOST POWERFUL MARATHI FILM OF THE DECADE…. अशी टॅगलाईन दिमाखाने मिरवणाऱ्या पुनीत बालन स्टुडिओज निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य अॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त गुंफण पहायला मिळते आहे. अभिनेता शरद केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त ‘रानटी’ अंदाज यात दिसतोय. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. आपल्या खलनायकी अवताराने सर्वांचा थरकाप उडवणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा ‘रानटी च्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.

‘अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट’ अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा असं एक ‘सुपर पॅकेज’ असलेला पॉवरफुल अॅक्शनपट ‘रानटी’ येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर दिग्दर्शक समित कक्कड यांचे सर्व चित्रपट लक्षवेधी राहिले आहेत. ‘रानटी’ च्या निमित्ताने मराठीत भव्य अॅक्शनपट घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून त्यातील वेगळेपणा आणि भव्यता दिसून अली आहे. ‘रानटी’चा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशःकाटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे.

पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

भाजपच्या 40 स्टार प्रचाकांची यादी जाहीर:मोदी, शहा, योगी यांच्यासह चंद्रकांतदादा पाटील,मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाचा समावेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच नवनीत राणा यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये दोन महिलांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यात नवनीत राणा यांच्याबरोबरच स्मृती इराणी आणि पंकजा मुंडे यांना देखील स्थान देण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्टार प्रकारांच्या यादीमध्ये पक्षाचे प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासोबतच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, नारायण राणे, पियुष गोयल, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रविद्र चव्हाण यांचा देखील समावेश केला आहे. याचबरोबर नव्याने केंद्रात मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ यांना देखील या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी देखी पहा….

नरेंद्र मोदी
जगत प्रकाश नड्डा
राजनाथ सिंह
अमित शहा
नितीन गडकरी
योगी आदित्यनाथ
डॉ. प्रमोद सावंत
भूपेंद्रभाई पटेल
विष्णू देव साई
डॉ. मोहन यादव
भजनलाल शर्मा
नायब सिंह सैनी
हिमंता बिस्वा सरमा
शिवराज सिंह चौहान
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
शिवप्रकाश
भूपेंद्र यादव
अश्विनी वैष्णव
नारायण राणे
पीयूष गोयल
ज्योतिरादित्य एम. सिंधिया
रावसाहेब दानवे पाटील
अशोक चव्हाण
उदयनराजे भोंसले
विनोद तावडे
ॲड. आशिष शेलार
पंकजा मुंडे
चंद्रकांत (दादा) पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
स्मृती इराणी
प्रवीण दरेकर
अमर साबळे
मुरलीधर मोहोळ
अशोक नेते
डॉ. संजय कुटे
नवनीत राणा

कॉंग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पुणे- कॉंग्रेसची महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. जी यादी काल रात्री जाहीर होणार होती ती आज सकाकी सव्वा अकरा नंतर जाहीर झाली .

खाली वाचा यादी जशास तशी

डॉ. राजेश तुकाराम मानवतकर – भुसावळ (राखीव)
डॉ. स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोद)
महेश गांगणे – अकोट
शेखर प्रमोदबाबू शेंडे – वर्धा
अनुजा सुनील केदार – सावनेर
गिरीश कृष्णराव पांडव – नागपूर दक्षिण
सुरेश यादवराव भोयर – कामठी
पूजा गणेश थावकर – भंडारा (राखीव)
दलीप वामन बनसोड – अर्जुनी – मोरगाव (राखीव)
राजकुमार लोटुजी पुरम – आमगाव (राखीव)
प्रो. वसंत चिंडूजी पुरके – राळेगाव
अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर – यवतमाळ
जितेंद्र शिवाजीराव मोघे – आर्णी (राखीव)
साहेबराव दत्तराव कांबळे – उमरखेड (राखीव)
कैलास किसनराव गोरंट्याल – जालना
मधुकर कृष्णराव देशमुख – औरंगाबाद पूर्व
विजय गोविंद पाटील – वसई
काळू बधेलिया – कांदीवली पूर्व
यशवंत जयप्रकाश सिंह – चारकोप
गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा
हेमंग ओगळे – श्रीरामपूर (राखीव)
अभयकुमार सतीशराव साळुंखे – निलंगा
गणपतराव आप्पासाहेब पाटील – शिरोळ

आमदार धंगेकर यांच्यासाठी चक्रव्यूह तयार पण भाजपचा उमेदवार ठरेना

पुणे- कसबा विधानसभा मतदार संघ गिरीश बापट कमजोर झाल्यावर कॉंग्रेसने लीलया मिळविला आणि तो ज्या रवींद्र धंगेकर यांनी मिळवून दिला त्या विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची आता या विधानसभा निवडणुकीत कोंडी करण्याचे प्रयत्नही सफल होताना दिसत आहेत . कॉंग्रेसमधील गटबाजीने अगोदर धंगेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली गेली त्यानंतर माजीं महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरीची तलवार उपसली आणि आता मनसेची उमेदवारी गणेश भोकरे यांना देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपा ला सरळ सरळ कॉंग्रेस शी लढत देण्याची आव्श्यक्यात उरली आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत असला तरीही भाजपकडे तगडा उमेदवार नाही काय ? असाही सवाल केला जातो आहे. धीरज घाटे आणि हेमंत रासने या दोहोंनी कसबा मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे .कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांनाच रिंगणात उतरविले आहे . पण गेल्यावेलेची निवडणूक आणि आताची निवडणूक यात बरेच अंतर पडल्याचे जाणवते आहे. या सर्व पातळीवर भाजपा आणि धंगेकर अशी लढत असली तरी धंगेकर यांना घायाळ करणारी आयुधे अगोदरच तैनात करून नंतर सेनापती रिंगणात उतरविण्याची भाजपची रणनीती दिसते आहे. या सर्व रणनीतीला धंगेकर पुरून उरणार कि … कसे ? हे आता काही दिवसानंतरच समजणार आहे.

निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त तंत्रज्ञान तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी, सहाय्यक सेक्टर अधिकारी व इतर अधिकारी असे एकूण ९६ निवडणूक केंद्रावरील अधिकाऱ्यांना ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित प्रशिक्षणाच्यावेळी कसबा पेठ पुणे विधानसभेचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत येवले, तहसीलदार सुषमा पैकिकरी, प्रवीणा बोर्डे, शामल चिनके, नितीन गायकवाड, गजानन जाधव आदी उपस्थित होते.

या प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कसबा पेठ व शिवाजीनगर मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांना २६ व २७ ऑक्टोबर २०२४ ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर असणाऱ्या एकूण २ हजार अधिकाऱ्यांना समावेश आहे.

श्री. येवले म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याकरीता कसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसाठी ईव्हीएम हाताळणीबाबतचे एकूण तीन टप्प्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून आपल्या जबाबदाऱ्या राष्ट्रीय भावनेने व्यवस्थित पार पाडाव्यात व निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर, दिरंगाई व निष्काळजीपणा करू नये, असे श्री. येवले म्हणाले.
0000

बाणेर टेकडीवर जाणारे नागरिक यांचे करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक आणि पोलीस मदत केंद्र

पुणे -बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकाच्या बैठका घेऊन टेकडीवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला . नागरिकांच्या अडचणी, शंका समस्या जाणून घेऊन पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना नाग्रीकांन्पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्नकेला.
शहरातील सर्व टेकड्या या CCTV निगराणीखाली करण्यात येत असून बाणेर टेकडी सुरक्षेबाबत मीटिंग घेताना पुणे शहर पोलीस बाणेर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हे च्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे , पोलिसांची भूमिका व कर्तव्ये , बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी दि 26.10.24 रोजी सकाळी 06.30 ते 08.00 दरम्यान समक्ष भेट देऊन पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या

  1. तात्काळ मदतीकरिता 24*7 कार्यरत असणारे helpline क्र 112 नंबर 100 नंबर
  2. ⁠पुणे शहर पोलीस व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
  3. ⁠जेष्ठ नागरिक यांच्याकरिता बाणेर पो ठाणे क्रमांक व त्यांच्याकरिता राबविण्यात येत असलेली उपाययोजना
  4. ⁠एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती संकलन व मदत करणे
  5. ⁠सायबर गुन्हे फसवणूक बाबत माहिती
  6. ⁠बाणेर पोलीस ठाणेचा क्रमांक लोकेशन
  7. ⁠ बाणेर टेकडीवर जाणारे नागरिक यांचे करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक त्याचेवर अत्यावश्यक सेवा,बाणेर पोलीस ठाणे,पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांचे क्रमांक व व्हाट्सअप ग्रुप क्रमांक
  8. ⁠बाणेर परिसरामध्ये चालू करण्यात येणारे पोलीस मदत केंद्र
  9. पोलीस आयुक्तयांनी पुणे शहरातील सर्व टेकड्या या CCTV निगराणीखाली करण्याबाबत लावण्यात येणारे कॅमेरे बाबत माहिती
  10. ⁠टेकड्यांवर लावण्यात येणारे PA सिस्टीम
  11. ⁠AKSA LIGHTS
  12. ⁠पोलीस गस्त , पोलीस SCANNER

याबाबत माहिती देण्यात आलेली आहे नमूद कार्यक्रमास एकूण 200 ते 300 नागरिक उपस्थित होते नमूद मीटिंग शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व नागरिकांनी सकारात्मक रित्या प्रतिसाद देऊन सायंकाळी 06.00 ते पहाटे 05.00 पर्यंत बाणेर टेकडीवर कोणीही जाऊ नये याबाबत सर्व नागरिकांमध्ये संदेश देऊन नागरिकांना स्वतःहून सूचना देणार असलेबाबत माहिती दिलेली आहे . तसेच PEOPLE AWARNESS बाबतचा पोलिसांचा जनतेशी संवादपर असलेला हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेण्यात यावा याबाबत सूचना केलेली आहे.

7 देशांतील 21 फीचर फिल्म्स, 8 वेब सिरीज; विविध जागतिक कथानकांच्या पर्वणीसाठी फिल्म बाजार मध्ये सह-निर्मिती बाजार

एनएफडीसी फिल्म बाजारची एशिया टीव्ही फोरम आणि मार्केट (एटीएफ) सोबत भागीदारी

18 व्या एनएफडीसी फिल्म बाजार ने सह-निर्मिती बाजारसाठी सात देशांतील 21 फीचर फिल्म्स आणि 8 वेब सीरिजची अधिकृत निवड जाहीर केली आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत (इफ्फी) दरवर्षी फिल्म बाजार आयोजित केला जातो. या वर्षी, फिल्म बाजार चे आयोजन 20 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान गोव्यातील मॅरियट रिसॉर्टमध्ये करण्यात आले आहे.

या वर्षीच्या अधिकृत निवडीमध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, तमिळ, मारवाडी, बंगाली, मल्याळम, पंजाबी, नेपाळी, मराठी, पहाडी आणि कँटोनीजसह भाषांचा समृद्ध पट उलगडला आहे. फिल्म बाजार मध्ये, भारत, बांगलादेश, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन , जर्मनी आणि हाँगकाँगमधील चित्रपट निर्माते, वितरक, फेस्टिव्हल प्रोग्रामर, फायनान्सर आणि सेल्स एजंट्ससह अनेक उद्योग व्यावसायिकांना त्यांचे प्रकल्प सादर करतील.

ओपन पिच सत्र हे चित्रपट निर्मात्यांसाठी संभाव्य सहयोग शोधण्याची एक विलक्षण संधी असल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षी सह-निर्मिती बाजारात आलेल्या चित्रपट आणि वेब सिरीजची यादी येथे आहे:

अनुक्रमांक चित्रपट/ वेब सिरीज देश/राज्य भाषा 
1अ नाईट व्हिस्पर्स अँड द विन्ड्स  भारत आसामी 
2आदू कि कसम (डेस्टिनीज डान्स)भारत इंग्रजी/हिंदी 
3अनैकट्टी ब्लूज भारत तामिळ 
4ऍबसेन्ट भारत हिंदी/इंग्रजी 
5ऑल टेन हेड्स ऑफ रावणा भारत हिंदी 
6चेतक भारत हिंदी/मारवाडी 
7डिव्हाईन कॉर्ड्स बांगलादेश, भारत बंगाली 
8फेरल भारत इंग्रजी 
9गुलिस्तान (इयर ऑफ द विड्स)भारत हिंदी 
10गुप्तम (द लास्ट ऑफ देम प्लेग्ज) भारत मल्याळम 
11हरबीर भारत पंजाबी, हिंदी, इंग्रजी 
12होम बिफोर नाईट ऑस्ट्रेलिया, नेपाळ इंग्रजी, नेपाळी 
13कबूतर भारत मराठी 
14कोथियन- फिशर्स ऑफ मेन भारत मल्याळम 
15कुरिंजी (द डिसॅपरिंग फ्लॉवर)भारत, जर्मनी मल्याळम 
16बागी बेचारे (रिलक्टंट रिबेल्स)भारत हिंदी 
17रॉइड बांगलादेश बंगाली 
18सोमाहेलांग (द सॉंग ऑफ फ्लॉवर्स) भारत, ब्रिटन पहाडी, हिंदी 
19द एम्प्लॉयर भारत हिंदी 
20वॅक्स डॅडी भारत इंग्रजी, हिंदी 
21द व्याम्पायर ऑफ शेउंग शुई हॉंगकॉंग इंग्रजी, कॅण्टोनीज, हिंदी 
22एज ऑफ डेक्कन- द लिजेंड ऑफ मलिक अंबर भारत हिंदी, इंग्रजी 
23चौहान्स बीएनबी बेड अँड बसेरा भारत हिंदी 
24चेकवर भारत तामिळ, मल्याळम 
25इंडिपेन्डन्ट भारत, ब्रिटन इंग्रजी, तामिळ 
26जस्ट लाईक हर मदर  भारत हिंदी, इंग्रजी 
27मॉडर्न टाइम्स भारत, ब्रिटन इंग्रजी, तामिळ 
28पॉंडि चेरी भारत हिंदी, इंग्रजी 
29रिसेट भारत तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम 
   

परस्पर आदानप्रदान उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आशिया टीव्ही फोरम अँड मार्केट (एटीएफ) बरोबरची उत्साहवर्धक भागीदारी देखील या वर्षी आहे.वेब सिरीजची वाढती  लोकप्रियता लक्षात घेत एनएफडीसी ने नाट्य, प्रेमकथा, ऐतिहासिक नाट्य, विनोद, ॲक्शन, कमिंग-ऑफ-एज, साहसकथा आणि रहस्यकथा अशा विविध शैलींमधील आठ आकर्षक प्रकल्प समाविष्ट केले आहेत.

“सह-निर्मिती बाजार हा फिल्म बाजारचा एक महत्त्वाचा भाग बनला असून यातून निवडक प्रकल्पांना मोलाचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, अशी माहिती एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार यांनी दिली.या वर्षी, 23 देशांमधून 30 भाषांमध्ये प्रभावी 180 चित्रकृतींचे वैशिष्ट्यपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. वेब सिरीज उद्घाटन आवृत्तीसाठी, आमच्याकडे 8 देशांमधून 14 भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 38 कलाकृती दाखल झाल्या आहेत. निवड झालेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलाकृतीसाठी  परिपूर्ण सह-निर्मिती भागीदार शोधण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो!”,असेही ते म्हणाले.

फिल्म बाजार बद्दल अधिक माहिती:

2007 मध्ये आपल्या स्थापना झाल्यापासून, फिल्म बाजार दक्षिण आशियाई चित्रपट तसेच चित्रपट निर्मिती, निर्मिती आणि वितरणातील प्रतिभा शोधण्यासाठी तसेच समर्थन देण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे.फिल्म बझार दक्षिण आशियाई प्रदेशात जागतिक सिनेमांच्या विक्रीची सुविधा देखील प्रदान करतो तसेच दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते, विक्री एजंट आणि सर्जनशील व्यक्ती आणि आर्थिक सहयोग शोधणारे महोत्सव आयोजक यांना एकत्र आणणारे स्थान  म्हणून देखील काम करतो. फिल्म मार्केट या पाच दिवसांमध्ये, दक्षिण आशियाई आशय आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.सह – निर्मिती बाजाराचे उद्दिष्ट विविध जागतिक कथांवर प्रकाश टाकणे हे आहे.

इफ्फी बद्दल अधिक माहिती:

1952 मध्ये स्थापन झालेला, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. स्थापनेपासूनच इफ्फीचे उद्दिष्ट, चित्रपट, त्यांच्या मनमोहक कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्तींच्या कलागुणांचा गौरव करणे हे आहे. हा महोत्सव चित्रपटांबद्दलचे गाढ प्रेम आणि प्रशंसा वाढवण्याचा आणि चित्रपटांविषयी गोडी वाढवण्याचा , लोकांमध्ये समंजसपणाचे आणि सौहार्दाचे पूल बांधण्याचा तसेच प्रेक्षकांना वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेच्या नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो.

पुण्यातील मटका किंग नंदू नाईक च्या अड्ड्यावर छापा -६० जणांना घेतले ताब्यात

पुणे– पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने शुक्रवार पेठेतील खडक पोलिस पोलिस स्टेशनच्या हद्दीत जनसेवा भोजनालय येथील दुसऱ्या मजल्यावर छापेमारी करून नंदू नाईक यांच्यासह ६० जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ४७ मोबाईल आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली आहे. छापा टाकलेल्या दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शुक्रवार पेठेत खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नंदू नाईक मटका जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने सदरच्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार. सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा. अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे. पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे. सहा. पोलिस आयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे. सहा. पोलिस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक. यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथक १ व २ खंडणी विरोधी पथक १ तसेच दरोडा व वाहन चोरी पथक १ युनिट १ व ५ यांनी सदरची कारवाई केली आहे.

मी पीएमओ सचिव,उमेदवारी हवी असेल तर 50 लाख रुपये द्या: पुण्यासह राज्यातील सहा इच्छुकांना फोनद्वारे खंडणीची मागणी-दिल्लीचे 2 महाठग अटकेत

नाशिक-पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) मुख्य सचिव असल्याचे भासवत नाशिक मध्यच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदेंसह तिघा इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दिल्लीतील दोन तोतये सर्वेश मिश्रा ऊर्फ शिवा ऊर्फ दिनू सुरेंद्र मिश्रा (रा. गाझियाबाद) व गौरव बहादूर सिंग नाथ (रा. दिल्ली) यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही उच्चशिक्षित असून मिश्रा बीएस्सी आहे, तर नाथ बीएच्या दुसऱ्या वर्षाला दिल्लीमधील मयूर विहार येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो.संशयित दोघांनी जिल्ह्यातील व शहरात एका मतदार संघातील आमदाराचे पती आणि एक विद्यामान आमदार, देवळा मतदार संघातील इच्छुकासह अहिल्या नगर, डोंबिवली, कल्याण, पुणे, येथील एका इच्छुकांनाही अशाच प्रकारे दूरध्वनी करून खंडणीची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.​​​​​​​

आमदार देवयानी फरांदे यांना ६ ऑक्टाेबर रोजी फोन आला. समोरील व्यक्तीने प्रमोद मिश्रा असे नाव सांगत नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचे सांगितले. विधानसभेच्या तिकीट वाटपात तुमचे नाव नाही. तुम्हाला तिकीट पाहिजे असल्यास पार्टी फंड म्हणून ५० लाखरुपये द्यावे लागतील. यासाठी पुरावा म्हणून फाेनवरच पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे नावाचे पत्र वाचून दाखवत नाशिकसह राज्यातील इतर मतदार संघातील इच्छुकांचे तिकिट रद्द केल्याचे सांगितले. तुमची उमेदवारी कायम ठेवायची असल्यास तातडीने ५० लाख फंड द्यावाच लागेल असे सांगत हा निधी दिला नाही तर राज्यात बदनामी करण्याची धमकी देखील दिली.

दरम्यान,आमदार फरांदे यांनी हा प्रकार आयुक्तांकडे कथन केला. त्यानुसार तत्काळ तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. दिल्ली स्पेशल सेलच्या पथकाने गौरव नाथ यास पूर्वीच पकडले होते. पथकाने या दोघांचा ताबा घेत त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. दाेघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवस म्हणजे दि. २८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

कंपनी मॅनेजरची तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी:नकार दिल्यास कंपनीतून काढण्याची दिली धमकी

पुणे -येरवडा परिसरातील एका खासगी कंपनीतील मॅनेजरने कंपनीत काम करत असताना सदर कंपनीतील २७ वर्षीय तरुणीला अश्लील शब्द वापरुन ती वॉशरुमला जाताना तिचा वारंवार पाठलाग केला. तिला उघड उघड शारिरिक संबंधाची मागणी करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न करुन, शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास कंपनीतून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपी विरोधात येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुणी काम करत असलेल्या कंपनीतील मॅनेजरने तिचा वारंवार वॉशरुमला जाताना पाठला गेला. तुला वॉशरुमला एवढा वेळ का लागतो, अशी विचारणा त्याने करुन उघड उघड शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिल्यावर कामाच्या ठिकाणी सतत तिला मानसिक त्रास दिला गेला. त्यानंतर तरुणीने याबाबत पोश कमिटीकडे तक्रार केली असता, कमिटीने सदरचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार घडला. आरोपीने त्यानंतर पुन्हा उघड उघड शारीरिक संबंधाची मागणी केल्याने तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तिला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास कंपनीतून काढून टाकण्याची धमकी देखील आरोपीने दिली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका देवकर पाटील करत आहे.

‌‘तज रे अभिमान, जान गुणीयन सों, गुन की सेवा ना मानो अब मान‌’

पंडित सी. आर. व्यास जन्मशताब्दीनिमित्त विशेष संगीत सभा

पुणे : गुरुकृपेने पावन झालेला शिष्य, त्याच्या भावपूर्ण शब्दांतून प्रकट झालेल्या बंदिशी, त्यांचे अर्थपूर्ण गायन याचा आकृतीबंध दर्शविणाऱ्या विशेष संगीत सभेतून पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने अर्पण केलेली आदरांजली ठरली. निमित्त होते आकाशवाणी, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित गायन मैफलीचे.
मैफलीची सुरुवात पंडित शौनक अभिषेकी यांनी नटभैरव रागातील विलंबितमध्ये ‌‘गूँज रही कीरत तुम्हरी, चहूँ ओर संगीत जगत मे‌’ आणि मध्य लय एकतालातील ‌‘सूरज चंदा जबतक फिरे‌’ या बंदिशी सादर करून पंडित सी. आर. व्यास यांची गुरुप्रती असलेली निष्ठा, समर्पणभाव, अद्वैत, तादाम्यता दर्शविली. त्यानंतर देसी रागातील ‌‘आई रे आई तोहे मिलनको‌’, ‌‘शबरी भई थी राम औतार‌’ आणि ‌‘सुनरी एरी आज… शुभ दिन शुभ सगुन‌’ या पूरिया रागातील बंदिशी तसेच बागेश्री रागात बांधलेल्या ‌‘ना डारो रंग मोपे, तंग बसन अंग अंग प्रगट होत‌’ आणि ‌‘कैसी नाही तोहे लाज आवे‌’ या बंदिशीतून पंडित सी. आर. व्यास यांच्या शब्दसामर्थ्याचे दर्शन घडविले.
पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेली ‌‘तोहे रे गाऊँ मै आज, गुनिदास बलम मोरे‌’ आणि ‌‘चतराई कीन्हीं मोंसे, सपना मोहे दरस देके‌’ या स्वानंदी रागातील बंदिशीतून गुरुभक्तीचे उत्कट दर्शन घडविले. गुरुभेटीच्या आतुरतेतून निर्माण झालेली कैशिकरंजनी रागातील ‌‘ए मितवा कित जाय रहे भीरीमें हाथनमें लेत फूलनके हरवा‌’, ‌‘दिन मंगल आज आये गुन सागर घर आये‌’ या बंदिशी पंडित अभिषेकी यांनी अतिशय भावपूर्णतेने सादर केली.
उत्तरार्धात पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले. त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या बंदिश रचनेमागील भावपूर्ण आठवणी सांगितल्या. पंडित सी. आर. व्यास आणि पंडित जिंतेंद्र अभिषेकी यांच्यातील भावाबंधही उलगडले. सादरीकरणाची सुरुवात धनकोनी कल्याण रागातील ‌‘सरस सूर गाऊँ मन रिझाऊँ‌’, ‌‘बीते जीवन कछु काम ना आवे‌’ ही बंदिशी विलंबित लयीत तर दृतमध्ये ‌‘देख चंदा नभ निकस आयों‌’ने केली. शिव अभोगीमधील ‌‘सौ सौ बार गाऊँ तोहे‌’, ‌‘नित रहे मगन तोमें, मन चाहत गुन गाऊँ‌’, ‌‘तूही ग्यान तूही ध्यान चरआचरमें तूही‌’ या बंदिशी सादर केल्या.
‌‘बलम जा जा जारे काहे मनावन आया‌’, ‌‘जबहि घर आवे बतिया बनावे‌’ ही एका विरहिणीची लाडीक तक्रार सुधरंजनी रागात रचलेल्या बंदिशीच्या सादरीकरणातून दर्शविली. त्यानंतर ललत रागात ‌‘सुरनमें रस तुम हो, तालनमें लय गुनिदास‌’ ही भावपूर्ण बंदिश सादर केली. आत्मोपदेश स्वरूपात रचलेली गुजरीतोडी रागातील ‌‘बीत गयो सब जीवन तेरो, करत बखान अपनो ही अपनी‌’, ‌‘जानगुनी समझ न तोहे, भरम जाल कर दूर‌’ या बंदिशीनंतर दुगम हिंडोल रागातील ‌‘कैसे रिझाऊँ मन उन्हींके जब पिया मोरी बात न माने‌’, ‌‘मीठी बतियाँ करत नित मोंसे‌’ ही लाडीक तक्रार करणाऱ्या प्रियेची भावावस्था दर्शविणारी बंदिश सादर केली.
जीवनाचे मर्म सांगणारी राग बिलासखानी तोडीमधील अतिशय सुमधुर बंदिश ‌‘तज रे अभिमान, जान गुणीयन सों, गुन की सेवा ना मानो अब मान‌’ आणि ‌‘कौन जाने, कब मिटे जाय साँस तन की..‌’ ही बंदिश रसिकांना विशेष भावली.
कलाकारांना सुभाष कामत (तबला), प्रमोद मराठे (संवादिनी), अभेद अभिषेकी, राज शहा, केदार केळकर, निरज गोडसे (तानपुरा) यांनी साथ केली.
बंदिश ही चिरकाल टिकणारी गोष्ट असून युवा पिढीतील कलाकारांनी बंदिश गाताना त्यातील मर्म, गुढार्थ समजून-उमजून सादर करावी. बंदिशीच्या शब्दांमागील विचार, ती रचताना सर्व बाजूंनी केलेला अभ्यास त्यासाठी आवश्यक अशी आध्यात्मिक बैठक आणि गुरुकृपा यातूनच हृदयाला भिडणारी कलाकृती निर्माण होते, असे पंडित सुहास व्यास यांनी आवर्जून सांगितले.
आपले वडील पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर. व्यास यांचे नाते शब्दांपलिकडचे होते असे सांगून पंडित शौनक अभिषेकी यांनी या दोन महान कलाकरांच्या भावनिक नात्याची वीण उलगडून दाखविली. युवा पिढीने अभ्यासपूर्ण नजरेने या बंदिशींकडे पाहावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे समर्पक, अभ्यासपूर्ण निवेदन मंगेश वाघमारे यांनी केले. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी इंद्रजित बादल उपस्थित होते.

पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; एकूण 1337 सदनिकांची लॉटरी

पुणे / पिंपरी (दि.25) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील आणि पेठ क्र. ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यास प्रत‍िसाद म‍िळत आहे. यात २४ ऑक्टोबरपर्यंत जवळपास दोन हजार नागर‍िकांनी प्राथम‍िक नोंदणीची प्रक्रिया संबंध‍ित संकेतस्थळावर केली आहे.

पीएमआरडीएअतंर्गत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२ BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील EWS (१ RK) प्रवर्गात ३४७ सदनिका तसेच LIG (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरी काढण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागव‍िण्यात येत आहे. यात १२ ते २५ ऑक्टोबर २०२४ दुपारी चारपर्यंत एक हजार ९३२ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यात २९९ नागर‍िकांनी पर‍िपुर्ण अर्ज भरले असून २१८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून त्यांचे परिपूर्ण अर्ज पीएमआरडीएला प्राप्त झाले आहे. उर्वर‍ित अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी अर्जदारांकडून पुर्णपणे भरलेले नाही. परंतु, त्यांची प्राथम‍िक नोंदणीची झाली आहे.

कागदपत्रांची पडताळणी
पीएमआरडीएअतंर्गत काढण्यात आलेल्या सदन‍िकेच्या लॉटरीसाठी नागर‍िकांचा प्रत‍िसाद म‍िळत आहे. यात गत १३ द‍िवसात (२४ ऑक्टोबरपर्यंत) एक हजार ९३२ नागर‍िकांनी प्राथम‍िक नोंदणी केली आहे. यात आधार, पॅन, डोमेसाईल, उत्पन व जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी लॉनलाईन पद्धतीनेच करण्यात येत आहे. यासह शासनाच्या नियमानुसार 2018 नंतरचे डोमेसाईल तसेच जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या सदन‍िकांसाठी नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

१२ नोव्हेबरपर्यंत मुदत
इच्छुकांना पीएमआरडीएअंतर्गत असलेल्या सदनिकांसाठी १२ नोव्हेबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१BHK) प्रवर्गातील २९.५५ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत १५,७४,४२४/- इतकी असून LIG (२ BHK) प्रवर्गातील ५९.२७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत ३५,५७,२००/ आहे. तर पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (१ RK) प्रवर्गातील २५.५२ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २०,९०,७७१/ असून LIG (१ BHK) प्रवर्गातील ३४.५७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २८,३२,२०८ आहे. या गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांसाठी ५००० अनामत रक्कम असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी १०,००० अनामत रक्कम आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म फी ७०८ रुपये लागणार आहे.

जपानी संस्कृती, औद्योगिक विकास अभ्यासासाठी उन्हाळी शिबिरे उपयुक्त – रेन्या किकुची

पीसीईटी आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पिंपरी, पुणे (दि. २५ ऑक्टोबर २०२४) जपान ने तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांना जपान मधील आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक विकास तसेच संस्कृती अभ्यासण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत उन्हाळी शिबिरे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी ही उन्हाळी शिबिरे उपयुक्त आहेत असे प्रतिपादन जपानच्या एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) आणि जपान वाणिज्य दूतावासाच्या वतीने ‘जपान मधील संधी’ यावर दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे हे तिसरे वर्ष होते. यावेळी मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासातील संस्कृती आणि माहिती विभागाचे अधिकारी हमुरो मेगुमी, फिडेल सॉफ्टटेकचे अध्यक्ष आणि विशेष संचालक सुनील कुलकर्णी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, जलतापचे सदस्य हरी दामले, पीसीसीओई आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत तसेच औद्योगिक क्षेत्रातील वीस कंपन्यांचे प्रतिनिधी, पुणे, पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रातील पंढरपूर, अहिल्यानगर येथील सुमारे एक हजार सातशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
पहिल्या दिवशी हमुरो मेगुमी, सुनील कुलकर्णी यांनी जपानमधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, जपान मधील आयटी उद्योगातील करिअर संधी विषयी माहिती दिली.
इंडो – जॅपनीज असोसिएशनच्या वर्षा जोशी यांनी जपानी भाषेत सादरीकरण केले. स्वाती धर्माधिकारी यांनी ओरिगामी कला सादर केली. बोन्साय ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. सुजाता भट यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषेत उत्कृष्ठ सादरीकरण केले.
दुसऱ्या दिवशी डॉ. हरी दामले, प्रोसिड टेक्नॉलॉजीचे समीर लघाटे, फुजेत्सुचे सेवा वितरण संचालक सचिन कळसे, सुरेश पाटील, थिंक स्मार्ट सिस्टीमचे संचालक सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिमिटीस्यु फॅक्टरी ऑटोमेशन ग्रुप व्यवस्थापकीय संचालक हैदर आलम, डॉ. विनायक शिंदे यांनी इंटर्नशिप, प्लेसमेंट संधी याविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन डॉ. संदीप पाटील तर गीतांजली झांबरे यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.