Home Blog Page 620

महायुतीने रिपाइंला दाखवला ठेंगा


मुंबई-विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र मित्र पक्षांना एकही जागा सोडलेली नाही. महायुतीनेही रामदास आठवलेंच्या रिपाइंला ठेंगा दाखवला आहे.महायुतीकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपाइंने बंडाचा पवित्रा घेतला आहे. महायुतीसोबतचा आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष तिसऱ्या आघाडीत सामील झाला आहे. त्यांचा प्रश्न येत नाही. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खाेत यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आधीच महायुतीतून बाहेर पडला आहे.

महाविकास आघाडीत उद्धवसेना, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट हे तीन प्रमुख पक्ष असून, शेकाप, समाजवादी पार्टी, माकप, भाकप हे घटक पक्ष आहेत. समाजवादीने मविआकडे धुळे शहर, मालेगाव मध्य, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम या पाच जागांची मागणी केली होती. मात्र पाचपैकी तीन जागांवर उद्धवसेना आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धवसेनेने धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे, काँग्रेसने मालेगावमधून एजाज बेग तर भिवंडी पश्चिमेतून दयानंद चोरघे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सपाचे आमदार अबू आझमी यांनी २५ जागावर लढण्याचा इशारा दिला आहे.

२०१९ मध्ये समाजवादी पार्टीने चार जागा लढवल्या होत्या. त्यापैकी दोन जागा निवडून आल्या. अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगरमधून तीन वेळा आमदार आहेत, तर सपाच्या रईस शेख यांनी २०१९ मध्ये भिवंडी पूर्वमधून १,३१४ मतांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मुस्लिमबहुल मालेगाव मध्य आणि धुळे शहर मतदारसंघही हवे आहेत. त्या ठिकाणी एमआयएमचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे समाजवादी पार्टीने या ठिकाणी दावा केला आहे. तसेच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. परिणामी अबू आझमी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा वरदहस्त असलेल्या शेकापचा एक आमदार आहे. तरीही त्यांना पाच मतदारसंघात मविआने एबी फाॅर्म दिले आहेत. त्यामुळे शेकापने अलिबाग, पनवेल, उरण, पेण, लोहा कंधार या पाच ठिकाणांहून उमेदवारी जाहीर केली.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. २७: खडकवासला विधानसभा मतदारसंघात व‍िधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त १ हजार ७३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुणे येथील आंबेगाव बुद्रुक मधील सिंहगड टेक्निकल कॉलेजमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणात खडकवासला मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, किरण सुरवसे, कार्यालयातील विविध कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामाचे संपूर्ण स्वरूप जाणून घ्यावे आणि आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशी सूचना श्री. माने यांनी केली. निवडणूक कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांकडून तयार करण्यात येणारे नोंदवही, मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गरजेची सुव्यवस्था व सुविधा या सर्व बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी आणि मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने पार पाडावे, असे निर्देशही श्री. माने यांनी या प्रसंगी केले.

प्रशिक्षणादरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सुरवसे यांनी मतदान प्रक्रियेविषयी सखोल माहिती दिली. मतदान केंद्राध्यक्षांनी मतदानाच्या दिवशी करावयाचे मॉक पोल, प्रत्यक्ष कामकाज करताना येणारी आव्हाने आणि घ्यावयाची काळजी, निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या वेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजना, अशा सर्व बाबतीत त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. या प्रशिक्षणा दरम्यान मतदान केंद्रावरील पथकांना व्हीव्हीपॅट व ईव्हीएमबाबत संपूर्ण माहिती देऊन हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण कक्ष समन्वयक तुषार राणे व माधुरी माने तसेच प्रशिक्षक पल्लवी जोशी आणि काही विशेष मंडळ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पहिले. या प्रशिक्षणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी व कर्मचारी आदींना प्रशिक्षण देण्यात आले.

कसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. २७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्याअनुषंगाने कसबा पेठ व शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूकीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी यांच्याकरिता निवडणूक प्रक्रिया व ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण गणेश कला क्रीडा रंगमंच आणि अप्पासाहेब जेधे विद्यालय येथे संपन्न झाले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत येवले, तहसीलदार सुषमा पैकिकरी, प्रवीणा बोर्डे, शामल चिनके, रवींद्र मेढे, नितीन गायकवाड, सतीश वगे, गजानन जाधव आदी उपस्थित होते.

श्रीमती किसवे-देवकाते यांनी मतदान केंद्रांवरील मतदान अधिकारी यांना निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या आदीबाबत मार्गदर्शन दिले.

यावेळी पोस्टल मतदान प्रक्रियेसाठीची नोंदणी प्रक्रिया नायब तहसीलदार शीतल देसाई आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र हाताळणीबाबत, संपूर्ण मतदान प्रक्रिया तसेच मतदानाच्या अनुषंगाने करावयाच्या सर्व आवश्यक कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त तंत्रज्ञान तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी, सहाय्यक सेक्टर अधिकारी व इतर अधिकारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान अधिकारी व इतर असे एकूण १ हजार ८०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे, दि. २७: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात व‍िधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त १ हजार २४० अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुणे जिल्हयातील अवसरी येथील शांता शेळके सभागृहात प्रशिक्षण संपन्न झाले.

या प्रशिक्षणात आंबेगाव मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक व प्रमिला वाळुंज यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ सचिन वाघ तसेच निवडणूक कक्षाचे विविध समन्वयक उपस्थित होते.

या प्रशिक्षणात श्री. नागटिळक यांनी मॉक पोल, मतदान केंद्रावरील नियमावली, निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदी, महत्वाचे अधिनियम, विधानसभा निवडणूक २०२४ मधील महत्वाचे बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मतदानादरम्यान विविध नमूने कसे भरावयाचे याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती वाळुंज यांनी देखील विविध बाबींची माहिती दिली.
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. क्षेत्रिय अधिकारी, तलाठी आणि मास्टर ट्रेनर यांनी हे प्रशिक्षण दिले.

निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त दोन हजार अधिकाऱ्यांना हडपसर येथे प्रशिक्षण

पुणे, दि. २७: हडपसर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त २ हजार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले.

यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील, अमोल पवार, महेश सुधळकर, प्रशिक्षण समन्वय अधिकारी रवी आयवळे, सहायक समन्वय अधिकारी नितीन सहारे, नायब तहसीलदार जाई कोंडे आदी उपस्थित होते.

दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुधळकर यांनी मतदान यंत्राबाबत अत्यंत सोप्या भाषेत माहिती देऊन हाताळणीबाबत प्रात्यक्षिक दाखवले. या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रत्येक मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळली व त्या संबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिकांच्या आधारे करुन घेतली. प्रशिक्षणाला सर्व अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच हाताळणीसंदर्भात शंकाचे निरसन करून घेतले.

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर:कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट

आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा
वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी विधानसभेतून निवडून आले. आता त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या मिलिंद देवरा यांच्याविरोधात सामना करावा लागणार आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. परंतु, आदित्य ठाकरेंविरोधात तगडा उमेदवार देण्याकरता त्यांना पुन्हा विधानसभेतून निवडणूक लढवण्यास सज्ज करण्यात करण्यात आले आहे.

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट देण्यात आले असून भावना गवळी यांना रिसोड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

शिंदे गटाच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे:

1.अक्कलकुवा – आमश्या पाडवी 2.बाळापूर- बळीराम शिरसकर 3.रिसोड – भावना गवळी 4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर 5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर) 6. परभणी – आनंद शेशराव भरोसे 7. पालघर – राजेंद्र घेड्या गावित 8. बोईसर (अज) – विलास सुकुर तरे 9.भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे 10. भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी 11.कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर 12.अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर 13. विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे 14. दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम 15. अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल 16. चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते 17. वरळी – मिलींद मुरली देवरा 18. पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे 19. कुडाळ – निलेश नारायण राणे 20. कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर

बाळासाहेब ओव्हाळ तिसऱ्या आघाडी कडून सोमवारी अर्ज भरणार

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार

पिंपरी, पुणे (दि. २७ ऑक्टोबर २०२४) पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ सोमवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत तिसऱ्या आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती ओव्हाळ यांनी रविवारी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली.
बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब ओव्हाळ, गौतम गायकवाड, शिवराज ओव्हाळ, विनोद कांबळे व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय झरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय जाधव व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर संभाजी राजे छत्रपती यांनी बाळासाहेब ओव्हाळ यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. सोमवारी (दि.२८) संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ओव्हाळ तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करणार आहेत.
बाळासाहेब नामदेव ओव्हाळ हे किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक १६ येथून २०१७ मध्ये आरपीआयच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते.
सकाळी दहा वाजता, आकुर्डी खंडोबा माळ येथून हेडगेवार भवन येथे रॅलीने अर्ज भरण्यासाठी ओव्हाळ जाणार आहेत. तत्पूर्वी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले स्मारक, छत्रपती शाहू महाराज आणि एच. ए. कंपनी समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ओव्हाळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.

डावपेचांना ठोसे…रमेश बागवे आणि दत्ता बहिरट कॉंग्रेसकडूनच कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगरच्या रिंगणात

पुणे-पक्षांतर्गत डावपेचांना ठोसे लगावत त्यांना गारद करून दिल्लीपर्यंत मजल मारत गेलेले माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि दत्ता बहिरट यांनाच पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने या दोन्ही ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यास सर्वाधिक विलंब झाला.पण या राजकारणावर मात करण्यात हे दोघे बाजीगर ठरले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात पूर्वी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागेवर लहू शेवाळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील सचिन सावंत यांनी तिकीट नाकारल्यावर अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे.महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कॉंग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवारांची नावे:

1. अमळनेर – अनिल शिंदे 2. उमरेड – संजय मेशराम 3. अरमोरी – रामदास मासराम 4. चंद्रपूर – प्रवीण पडवेकर 5. वरोरा – प्रवीण काकडे 6. नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर 7. औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे 8. नालासोपारा – संदीप पांडे 9. अंधेरी पश्चिम – अशोक जाधव 10. शिवाजीनगर – दत्तात्रेय बहिरट 11. पुणे छावणी – रमेश बागवे 12. सोलापूर दक्षिण – दिलीप माने 13. पंढरपूर – भागीरथ भालके 14. बल्लारपूर – संतोषसिंह रावत

पुणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी देण्यात आलेले रमेश बागवे हे पुण्यातील ज्येष्ठ आणि शक्तिशाली नेत्यांमधील १ वरच्या फळीतील नेते मानले जातात.दलित बहुजन वर्गाचे नेते मानले जातात.नगरसेवक पद पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेले बागवे सर्व धर्म समभाव या एकाच मुद्द्यावर ४० वर्षे कॉंग्रेस मध्ये कार्यरत आहेत स्थायी समिती अध्यक्ष,सभागृहनेते अशी महापालिकेतील पदे त्यांनी भूषविली,राज्यात आतंकवादी कसाबला येरवड्यात फाशी देण्यात आली तेव्हा ते गृहराज्यमंत्री होते. दलित मागास समाजाला पुढे आणण्यासाठी अविरत कार्यरत राहिलेले डॅशिंग नेते अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. सुरेश कलमाडी यांच्या कडे नेतृत्व शहराचे असताना बागवे,दीपक मानकर हे त्यांचे दोन हाथ होते. मनुवादी साम्राज्य शाहीचे ते प्रमुख विरोधक शहरात मानले जातात. २०१४ ला भाजपची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे शहर कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले या काळात त्यांच्या एवढी जनतेशी संबधित प्रश्नांवर आंदोलने अन्य कोणीच केली नाहीत अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने कलाकारांना दिवाळी सरंजाम वाटप 

पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त नाट्य, सिनेमा क्षेत्रातील कलाकारांना दिवाळी सरंजाम वाटप करयात आले. या उपक्रमाला पुणे शहरातील विविध स्तरातील कलाकारांचा उदंड प्रतिसाद लाभला. सृष्टी गार्डन येथे पार पडालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री जायमाल इनामदार, अभिनेत्री भारती गोसावी, रजनी भट, सुबोध चांदवडकर, अंजली आठवले, आशा तारे यांच्यासह अनेक सिनेमा, नाट्य, संगीत क्षेत्रातील कलावंत उपस्थित होते. समुत्कर्ष यांच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी सांगितले. अतिशय उच्च दर्जाचे वाटप, सुरेख नियोजन असल्याचा आनंद कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसला. भविष्यातही अशाच चांगल्या उपक्रमांद्वारे संस्थेची पुढील वाटचाल असेल अशी भावना सुपेकर यांनी व्यक्त केली. संस्थेचे संचालक मनोज माझीरे, बबलू खेडकर, गणेश गायकवाड, सोमनाथ फाटके, रशीद शेख , अश्विनी कुरपे, गणेश मोरे गणेश गायकवाड अमीर शेख आसावरी तारे उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गायकवाड यांनी केले तर मोनिका जोशी यांनी आभार मानले.

भाऊसाहेब भोईर यांचा लढण्याचा निर्धार, आज अर्ज दाखल करणार

पिंपरी – ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून उद्या सोमवार ( दि. 28 ) रोजी रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाऊसाहेब भोईर यांनी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी निर्धार मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात त्यांनी शहराच्या दुरावस्थेस सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत आपले विचार मांडले होते. आपल्यावरील अन्यायाचा पाढाही वाचला होता काही झाले तरी लढणारच असे त्यांनी त्याच वेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर लगोलग प्रचारास लागून त्यांनी प्रचारात आघाडीही घेतली आहे. दरम्यान लढण्याचा निर्धार कायम ठेवत उद्या सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज ग क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल करणार आहेत. भोईर नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून रॅली काढण्यात येणार आहे कै.सोपानराव भोईर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल. पुढे चिंचवड गावात क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर श्री मंगलमूर्ती वाडा, धनेश्वर मंदिर मार्गाने ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या आधी सकाळी नऊ ते दहा या वेळात ते सकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रॅलीने जाऊन दुपारी बाराच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीत कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत मात्र चिंचवड मतदार संघातील नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावेत असे आवाहन ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे

पर्यावरणपूरक दिवाळीसाठी सायकल रॅली

पुणे-

दीपावली हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण असून हा सण जीवन प्रकाशमय करताना आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचू नये, याची काळजी घेणे, आपले कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव करून देताना जागरूकता निर्माण करण्यासाठी आज पुणे अर्बन सेलच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील मध्यवर्ती भागात असणारे बालगंधर्व नाट्यगृह मंदिर ते सेनादत्त पोलीस चौकी अर्थात दत्तवाडी येथील इंद्रधनुष्य एनवायरमेंटल हॉल अशी ३ किलोमीटर अंतर असणारी ही सायकल रॅली संपन्न झाली. शहरातील पर्यावरणावर आणि शहरावर निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत ही रॅली संपन्न झाली. यावेळी रॅली संपतेवेळी महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा वंदनाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या भुमातेचे अर्थात पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ घेण्यात आली. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या निसर्गाचा आनंद घेता यावा आणि त्यांचे जन्मसिद्ध हक्क त्यांना मिळावे, यासाठी शपथ घेण्यात आली असे अर्बन सेल चे शहर अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले

याप्रसंगी अर्बन सेलमध्ये अनेक नवोदितांना संधी प्राप्त करून देत शहरातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघाच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यामध्ये कोथरूडच्या अध्यक्षपदी सचिन यादव, खडकवासलाच्या अध्यक्षपदी मीनल धनवटे, कसबाच्या अध्यक्ष पदी आप्पासाहेब जाधव, वडगाव शेरीच्या अध्यक्ष पदी नीताताई गलांडे, पर्वतीच्या अध्यक्ष पदी अमोल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. याचसह पुणे शहरातील महत्वपूर्ण विभागात नियुक्ती करताना प्रामुख्याने क्रीडा विभागात शहर समन्वयक म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक मदन वाणी सर यांची नियुक्ती करण्यात आल्या.

यावेळी अर्बन सेल अध्यक्ष दुधाने म्हणाले,’ प्रदूषणविरहित सण साजरे करताना आपल्या निसर्ग आणि अन्य नागरिकांना कोणताही नाहक त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या सायकल रॅलीचे यश आपल्या कृतीवर अवलंबून असून ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे जनजागृती करावी, अशी विनंती केली. यावेळी आदरणीय वंदनाताई यांनी बोलताना जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये ४० शहरे आपल्या देशातील असून ही परिस्थिती बदलणे आपल्याच हातात असल्याचे नमूद केले. आपली समृद्ध संस्कृती आणि इतिहास जपताना, त्याची वृद्धी करताना आपले सामाजिक भान जपावे,

हडपसरच्या उमेदवारीला ही आघाडीतूनच आव्हान

पुणे- पर्वती विधानसभे प्रमाणे हडपसर विधानसभे च्या शरद पवार गटाच्या उमेदवारीला देखील महाविकास आघाडीतुनच आव्हान देण्यात येऊ लागले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने एकीकडे शरद पवार गटाने शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिल्यावर त्यांनी आपला प्रचार देखील सुरु केला असताना माजी नगरसेवक योगेश ससाणे,माजी आमदार महादेव बाबर आणि अन्य कार्यकर्त्यांनी विरोध करत उमेदवार बदल अन्यथा हडपसर विकास आघाडी स्थापन करून आपला वेगळा उमेदवार देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत योगेश ससाणे यांनी सांगितले कि,’ हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये हडपसर विकास आघाडी या नावाने महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब शिवसेना माजी आमदार महादेव बाबर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसेच या सर्वांच्या वतीने आज डॉ.अमोल कोल्हे यांना मुंबई मध्ये जाऊन सुमारे 14 पेक्षा जास्त नगरसेवकांनी भेट घेतली या भेटीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार बदलण्याबाबतची विनंती केली गेली की जे आम्ही यापूर्वीही महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना ज्या त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ज्यांनी त्यांनी कळवलेली होती परंतु तरीसुद्धा मतदारसंघाच्या बाहेर उमेदवार लागल्याची भूमिका सर्वांच्या असल्यामुळे आज डॉ.अमोल कोल्हे यांना सामूहिक रित्या भेटून यामध्ये योग्य तो निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली यामध्ये बाळासाहेब शिवरकर,दिलीप तुपे,शिवसेनेचे महादेव बाबर तसेच माजी नगरसेवक विजय देशमुख,तानाजी लोणकर राजाभाऊ बाबर भरत चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक योगेश ससाणे माजी उपमहापौर निलेश मगर माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड , प्रवीण तुपे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा या पक्षाचे नगरसेवक आनंद आळकुंटे,प्रशांत मस्के, शिवसेनेचे नगरसेविका प्राची आल्हाट,संगीता ठोसर अशा सर्वांच्या वतीने आज मुंबईमध्ये जाऊन भेट घेऊन उमेदवारीबाबत फेरविचार करण्याची विनंती केली आहे समीर तुपे हे यावेळी उपस्थित होते मागणी मान्य न झाल्यास 2002 साली हडपसर विकास आघाडीचा प्रयोग केला गेला होता त्याची पुनरावृत्ती हडपसर विधानसभा मतदारसंघात होईल याची नोंद पक्ष नेतृत्वाने घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

माणसातील चांगुलपणा लोकाभिमुख अधिकारी घडवतो-विजय कुवळेकर

पुणे, ता. २७: “चांगला माणूसच एक चांगला अधिकारी बनू शकतो. माणुसकीचा ओलावा, परिस्थितीची जाणीव, सामान्यांची कणव आणि त्याच्यातील चांगुलपणा लोकाभिमुख अधिकारी घडवतो. कृतज्ञतेच्या वृत्तीने समाजासाठी झटणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमुळेच राज्य चालतेय,” असे प्रतिपादन राज्याचे माजी माहिती आयुक्त व ज्येष्ठ साहित्यिक-संपादक विजय कुवळेकर यांनी केले.

माजी सनदी अधिकारी (आयएएस) अविनाश सुभेदार लिखित मनोविकास प्रकाशन प्रकाशित ‘सुभेदारी’ या आत्मकथन प्रकाशन सोहळ्यात विजय कुवळेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक होते. कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे झालेल्या सोहळ्यात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, लेखक अविनाश सुभेदार, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, पुस्तकाचे शब्दांकन केलेले नितीश साळुंके आदी उपस्थित होते.

विजय कुवळेकर म्हणाले, “मातीतून येणारे शहाणपण माणसाला घडवते. गरिबीचे चटके सोसलेला माणूस सामन्यांच्या भावना अधिक तीव्रतेने समजून घेऊ शकतो. ग्रामीण भागात राहून मराठीतून शिक्षण घेऊनही उत्तम अधिकारी होता येते, याचे उदाहरण अविनाश सुभेदार आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ‘ॲक्टिंग’पेक्षा ‘ॲक्शन’वर भर दिल्यानेच त्यांच्या हातून चांगले काम होऊ शकले.”

डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, “कृषी महाविद्यालयाने ‘नेहमी खरे वागा’ ही शिकवण दिली. त्याला सुभेदार खरे उतरले आहेत. जनता ही मालक आहे. शासन व प्रशासन जनतेच्या सेवेचे काम करतात. शेती जगली, तरच आपण जगू शकतो. शेती नसेल, तर जगही नष्ट होईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नेहमी शेती, शेतकरी व सामान्य जनतेच्या कल्याणाचे काम करण्याला प्राधान्य द्यावे.”

चंद्रकांत दळवी यांनी हे पुस्तक नव्या पिढीतील अधिकाऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. अगदी सोप्या आणि सहज भाषेत कोणताही अभिनिवेश न बाळगता सुभेदारांनी आपला प्रवास उलगडला असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन दशकात सनदी अधिकाऱ्यांनी उत्तम साहित्य लिहिले आहे. सुभेदारांमधील अधिकाऱ्यापेक्षा संवेदनशील माणूस अधिक भावतो, असे शेखर गायकवाड यांनी नमूद केले.

अविनाश सुभेदार म्हणले, “जीवनात निष्ठेने व कर्तव्य भावनेने भूमिका बजावली. नेहमी सर्वोत्तम द्यायचे, याच ध्येयाने कार्यरत राहिलो. जांभूळपाड्याची दुर्घटना माझ्यातील माणूसपणाची कसोटी पाहणारी होती. मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांसोबतची चार वर्षे सर्वोत्तम राहिली. अनेकदा संघर्ष करावा लागला. मात्र प्रामाणिकपणा, चिकाटी न सोडता लोकांसाठी थोडेफार योगदान देऊ शकल्याचे समाधान आहे.”

प्रास्ताविकात अरविंद पाटकर म्हणाले, प्रशासकीय अधिकारी संवेदनशील, समाजाभिमुख कसे असावेत, याचे दर्शन सुभेदार यांच्या पुस्तकात दिसते. लोककल्याणासाठी काम करणार्‍या या अधिकार्‍याचे आत्मकथन प्रकाशित करताना समाधान वाटले.” डॉ. संजय उपाध्ये यांनीही सुभेदार यांच्या कार्याचे कौतुक केले. सुप्रिया गोडबोले-चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत गरगटे यांनी आभार मानले.

भावगंधर्वांच्या आठवणींतून श्रोत्यांनी अनुभवले ‘असे होते दिवस’

८८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकरांनी दिला आठवणींना उजाळा

मनीषा निश्चल्स महक कॉन्सर्टतर्फे आयोजन; लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या गाणी, भजनाचे सादरीकरण

पुणे: “लतादीदी मला बहीण म्हणून लाभल्या आणि माझे जीवन समृध्द झाले. त्यांच्या सहवासाने माझे जीवन घडत गेले. लतादीदी गेली तेव्हा, ‘अवचिता परीमळू झुळुकला अळूमाळू’ अशी माझी अवस्था झाली होती. परंतु लतादीदीचे अस्तित्व आजही आहे. तिने सांगितलेल्या मार्गाने माझी वाटचाल असल्याने ती कायम माझ्यासोबतच आहे, याची जाणीव मला होते. लतादीदींचा सहवास मला भारावून टाकणारा आहे,” अशी भावना ज्येष्ठ संगीतकार, भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त मनीषा निश्चल्स महक कॉन्सर्टतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘असे होते दिवस’ या संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. यावेळी भावगंधर्वांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना पुणेकरांसमवेत उजाळा दिला. त्याला अनुसरून गायकांनी लतादीदींच्या गाण्यांचे सादरीकरण केले.

गुणी बाळ असा, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, अजी रुठकर कहाँ जाईएगा, यारा सीलि सीलि, जरा सी आहट होती है, तो दिल ये सोचता है, कही ये वो तो नही, रात भी है कुछ भीगी भीगी, निज रे गोपाळा, आजा रे परदेसी, अशी लतादीदींची क्लासिक गाणी तसेच पपीहा रे पपीहा रे, माई माई, चलाँ वाहि देस अश्या मीराबाईंच्या भजनांच्या सुरावटींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गायिका मनीषा निश्चल, विभावरी आपटे-जोशी यांनी गायन केले. त्यांना वाद्यांवर राजेंद्र दूरकर व विशाल गंड्रतवार (तबला), विवेक परांजपे व दर्शना जोग (सिंथेसायझर), अभय इंगळे (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली.

पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “दीदीच्या दोन बाजू होत्या. एक तिचा साधेपणा आणि दुसरी तिला सर्वत्र मिळणारा सन्मान. लतादीदी एकमेव गायिका आहे, जिच्या निधनानंतर ३९ देशांनी आपले ध्वज उतरवले होते. ही आपल्या सर्वांसाठीच आभिमानाची गोष्ट आहे. लतादीदी भारताचाच नाही, तर संपूर्ण विश्वाचा सन्मान होता. दीदी खूप मोठ्या शिवभक्त होत्या. छत्रपतींच्या गाण्यावर ध्वनिमुद्रिका बनवण्याचा निर्णय घेतला. त्या अतिशय स्वाभिमानी आणि मनस्वी होत्या.”

महायुतीचे उमेदवार आमदार शिरोळे सोमवारी अर्ज दाखल करणार

पुणे : महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज उद्या (सोमवारी ) दाखल करणार आहेत.

या प्रसंगी महायुतीतील भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवाजीनगरचे ग्रामदैवत श्री रोकडोबाचे दर्शन घेऊन सकाळी ९ वाजता पदयात्रेला प्रारंभ केला जाईल.आमराले दवाखाना,शिरोळे गल्ली,गणपती चौक,मॉडर्न शाळा,श्री जंगली महाराज मंदिर,बालगंधर्व चौक मार्गाने जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन असा पदयात्रेचा मार्ग आहे.

आमदार शिरोळे यांना सदिच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे,असे आवाहन शिवाजीनगर भाजपचे निवडणूक प्रमुख दत्ता खाडे यांनी केले आहे.