Home Blog Page 611

श्रीनाथ भिमालेंना दिले कोणत्या पदाचे आश्वासन ?

पुणे- आज भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पुणे दौऱ्यात नाराज आणि बंड करू पाहणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांची स्थानिक नेत्यांची पदाधिकारी यांची भेट घेण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे . पर्वती मतदार संघातून मी लढणार आणि मी जिंकणार असा नारा देत असंख्य खर्चिक कार्यक्रम राबविलेल्या आणि प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची समजूत तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढली होतीच त्यानुसार पर्वती मतदार संघातून भिमाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता . आज प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस भिमाले यांच्या घरी आले . तेव्हा त्यांचे भाऊ , आणि कुटुंबीयांनी फडणवीस यांचे स्वागत केले . पर्वती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आता पर्वती मधून माधुरी मिसाळ यांचे काम सुरु करा असे फडणवीस यांनी सांगितले आणि महापालिकेत सत्ता आणायची आहे . यावेळी आता अडीच वर्षे महापौर पद तुम्हालाच देऊ असे आश्वासन भिमाले यांना देण्यात आल्याचे काही सूत्रांनी म्हटले आहे तर विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन त्यांना मिळाले असावे असाही दावा काहींनी केला आहे.

चित्रपट व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष देत कोट्यावधींची फसवणूक

पुणे-व्यावसायिक आेळख झालेल्या एका सहकाऱ्याने भागीदारीत गुरुकृपा स्पेशालिस्ट फिल्मस हा व्यवसाय सुरू करण्याचे सांगत एकास २ कोटी ३१ लाख रुपयांना गंडा घातला. व्यवसाय ताेट्यात जाऊन कंपनीसाठी खरेदी केलेली चार ते साडेचार काेटीची साधने भागीदाराने स्वत:कडे घेत त्याची परस्पर विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.चार काेटी ८३ लाख २३ हजार रुपयांची तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक केल्याचा अर्ज पोलिसांकडे आला. याबाबत गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने प्राथमिक चाैकशी केली असता, तक्रारदार यांचे दाेन काेटी ३१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

हा प्रकार सन २०१९ ते ३१ /१०/२०२४ यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चारुदत्त श्रीनिवास मुदगल (५८,रा.डेक्कन जिमखाना,पुणे) यांनी आराेपी नीलेश सुरेश ठाेले व रिना निलेश ठाेले यांच्याविराेधात फिर्याद दाखल केली आहे. आराेपी व तक्रारदार यांची व्यवसायातून आेळख झाली. तक्रारदर हे आराेपीस मागील १५ वर्षापासून मटेरियल सप्लाय करत असून आराेपींनी भागीदारीत गुरुकृपा स्पेशालिटी फिल्मस हा व्यवसाय सुरू केला. तक्रारदाराने माहिती घेतली असता आराेपीने स्वत:च्या संबंधित खात्यात ही रक्कम वळवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास सुरू केला आहे. तसेच यात कोण कोण गुंतले आहेत हे देखील तपासण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकल्याचेही अनेकांनी तक्रारीत म्हटले आहे.

जनतेचे दिवाळे काढून भाजपची दिवाळी!: रमेश चेन्नीथला

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त

६ नोव्हेंबरला काँग्रेस पक्ष गॅरंटी जाहीर करणार

माजी मंत्री अनिस अहमद यांचा वंचितमधून काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई दि. २ नोव्हेंबर २०२४
भाजप शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत घरवापसी केली. तसेच अंधेरी मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेले काँग्रेस नेते मोहसीन हैदर यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला यांना भेटून आपण अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू असे सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि व्यापारी धार्जिण्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. देशात सर्वात जास्त कापूस महाराष्ट्रात पिकतो पण सरकार ब्राझील आणि आफ्रिकेतून कापसाच्या गाठी आयात करते. त्यामुळे राज्यात कापसाचे भाव पडले आहेत आणि शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे सीसीआय मार्फत सरकारने हमीभावाने कापूस खरेदी केली पाहिजे.
सोयाबीनची तिच अवस्था आहे. सोयाबीन तयार झाले आहे, पण त्याला भाव नाही. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पाम तेल आयात करत आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव पडले आहेत. पण दुसरीकडे सोयाबीनच्या तेलाचे भाव मात्र प्रचंड वाढले आहेत. आठवड्यापूर्वी १ हजार ६०० रुपयांना मिळणारा तेलाचा डबा आज २ हजार १५० रुपयांना झाला आहे. पण सोयाबीनला हमीभावही मिळत नाही. सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे शेतक-यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
कांदा पिकाच्या बाबतीत ही सरकारचे धोरण शेतक-यांसाठी मारकच आहे. महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी लावून गुजरात आणि कर्नाटकचा कांदा निर्यात केला जातो. निर्यात बंदी उठवली की निर्यात शुल्क वाढवून निर्यात बंद केली जाते. परदेशातून कांदा आयात करून देशात कांद्याचे भाव पाडले जातात. गुजरातचा २ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला. पण महाराष्ट्रातील कांद्याला निर्यातबंदी केली. कर्नाटकच्या कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटवले आणि महाराष्ट्राच्या कांद्यावर लावले त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा निर्यात ही केला जाऊ शकत नाही आणि त्याला भावही मिळत नाही. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण हे महाराष्ट्र आणि राज्यातील शेतक-यांच्या विरोधात आहे. राज्यातला शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध करायचा असेल तर राज्यातील महायुतीने भ्रष्ट सरकार घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागेल असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
यावेळी चेन्नीथला यांच्या हस्ते काँग्रेसच्या नव्या व्हिडीओ जाहिरातीचे अनावरण करण्यात आले. या जाहिरातीत केंद्र आणि राज्यातल्या शेतकरीविरोधी धोरणांना लक्ष्य केले आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळाली नाही आणि हमीभावाच्या वचनांचा फोलपणा सिद्ध झाला, या मुद्द्यांवर जाहिरातीत भर दिला आहे.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, सचिव श्रीकृष्ण सांगळे, श्रीरंग बर्गे आदि उपस्थित होते.

पुणे कॅन्टोन्मेंट मधील बंड करायला थंड …देवेंद्र फडणवीस हे भरत वैरागेंच्या घरी..

शिवाजी नगर मधील सनी निम्हण यांच्या घरी दिली भेट .. आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन

पुणे- पुण्यातील भाजपा मधील तसेच महायुतीतील बंडखोरी थंड करण्यासाठी पुण्यात भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले असून ते पुणे कॅन्टोन्मेंट विधान सभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. भरत वैरागे यांच्या घरी निघाले असल्याचे वृत्त आहे .गेल्या विधानसभेला वैरागे यांना फडणवीस यांनी माघार घ्यायला लावली होती त्यावेळी दिलेले आश्वासन फडणवीस यांनी पाळले नसल्याची टीका वैरागे यांनी केली होती .आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून का अन्याय ? असाही सवाल वैरागे यांनी उपस्थित केला होता आणि कितीवेळा त्याच त्याच उमेदवारांना संधी देणार असेही विचारले होते . केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची शिष्टाई जिथे जिथे कामास आली नाही तिथे तिथे फडणवीस आज जाणार आहेत आणि नाराज लोकांची समजूत काढणार आहेत . वडगाव शेरीतील माजी आमदार मुळीक यांनी तर उमेदवारी मागे घेण्यासाठी फडणवीस यांनी फोनवरून दिलेले विधान परिषदे बाबतचे आश्वासन रेकॉर्ड करून व्हायरल केले आणि नंतर माघार घेतली आहे.

दरम्यान पुण्याचे माजी आमदार स्व. विनायक (आबा) निम्हण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिनी आज पाषाण येथील ‘झुंज’ निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून फडणवीस यांनी विनम्र आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे , केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. सनी निम्हण यांनी शिवाजीनगर मतदार संघातून कॉंग्रेसच्या वतीने उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना उमेदवारीच काय पण कॉंग्रेस माद्फ्ह्ये प्रवेश देखील दिला गेला नव्हता .

आज पुण्यात आल्यावर विमानतळावर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला यावेळी ते पहा काय म्हणाले ..

कसब्यात आज फडणविसांनी गाठले धीरज घाटे यांचे घर

दरम्यान फडणवीस यांनी आज शिवाजी नगर नंतर कसब्यात अधिकृत उमेदवाराच्या घरी जाण्यापूर्वी किंवा घरी न जाता अगोदर भाजप शहर अध्यक्ष माजी नगरसेवक आणि कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले धीरज घाटे यांचे घर गाठले . कसब्यात पुन्हा हेमंत रासने या गेल्या निवडणुकीला पराभूत उमेदवारालाच पुन्हा उमेदवारी दिल्याने कसब्यात नाराजी होती आणि खुद्द शहर अध्यक्ष असलेले घाटे यांनी … यांना हिंदुत्ववादी सरकर हवे आहे आणि हिंदुत्व वादासाठी ४०/४० वर्षे घातलेले कार्यकर्ते नको आहेत ‘ अशा स्वरूपाचे जाहीर वक्तव्य सोशल माध्यमातून करत नाराजी व्यक्त केली होती मात्र नंतर ते रासने यांच्या समवेत प्रचाराला दिसत होते तरीही त्यांची भेट घेऊन फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री मोहोळ , खडकवासल्यातून उभे असलेले आमदार भीमराव तापकीर यावेळी त्यांच्या समवेत होते,

कास्ब्याचे उमेदवार हेमंत रासने देखील त्यांच्या समवेत होते.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम. गौतमी यांची नियुक्ती

पुणे, दि. २ : भारत निवडणूक आयोगाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून एम. गौतमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती इंदापूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली आहे.

श्रीमती एम. गौतमी यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-204 असा आहे. त्यांना दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत नागरिकांना भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ९०२१५०८३१७ असा असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३३६६ असा आहे. तर ई-मेल पत्ता genobs.daund.indapur@gmail.com असा आहे. संपर्क अधिकारी श्री. नागनाथ कंजेरी हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९५९५९९४४५५ असा आहे.

दरम्यान, श्रीमती एम. गौतमी यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. श्री. पांढरे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षांची माहिती दिली. तसेच मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची देखील माहिती दिली. यावेळी विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालय, तीसरा मजला, येरवडा, पूणे येथील निवडणूक खर्च नियंत्रण कक्षात ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 7 नोव्हेंबर रोजी तर दुसरी 13 नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय सचिन बारवकर यांनी दिली आहे.

PM मोदी उडवणार प्रचाराचा धुरळा:महाराष्ट्रात 8 नोव्हेंबरपासून 10 सभा

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा सभा होणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात दोन अशा एकूण दहा प्रचारसभा पंतप्रधान मोदी घेणार आहेत. एकावेळी किमान १५ ते २० उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ८ नोव्हेंबर रोजी धुळे व नंदुरबार, ९ नोव्हेंबर : अकोला व नांदेड येथे सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर : चंद्रपूर व चिमूर, सोलापूर आणि पुणे, १४ नोव्हेंबर : संभाजी नगर व मुंंबई अशा सभा आहे.

पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट या अन्य दोन घटक पक्षांनीही केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा १४ नोव्हेंबरनंतर परदेश दौरा असल्याने त्यापूर्वी त्यांच्या प्रचारसभा राज्यात करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रत्येकी १५-२० सभा होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५० हून अधिक प्रचारसभा राज्यात घेणार आहे.

२०१९ मध्ये ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात केवळ ९ प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना महाराष्ट्रात तब्बल १९ सभा घ्याव्या लागल्या. कारण २०२४ मध्ये भाजपासाठी महाराष्ट्रात मोठे आव्हान होते. त्यामुळे स्वत: पंतप्रधान मोदींनी तब्बल १९ सभा आणि एक रोड शो महाराष्ट्रात केला होता. पण मोदींनी एवढ्या सभा घेऊन देखील महाराष्ट्रात त्यांना केवळ ९ जागांवरच विजय मिळवता आला तर एनडीएला फक्त १७ जागाच मिळाल्या. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी वर्धा, गोंदिया, नांदेड, लातूर, अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, नंदूरबार व मुंबई अशा सभा घेतल्या होत्या.

लक्ष्मीपुजनाच्या रात्री शहरात 12 तासात 35 ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही,

पुणे लक्ष्मीपुजनानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. या आतिष बाजीमुळे शहरात गेल्या १२ तासात तब्बल ३५ ठिकाणी छोट्या मोठ्या आगीच्या घटना घडल्या. त्यात शिवणे येथील दांगट नगरमधील कपड्याचे गोडावून आणि सासवड रोडवरील सोनाई गार्डनजवळील पाईप गोडावूनला आग लागण्याच्या घटना मोठ्या होत्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही.

फटाक्यामुळे प्रामुख्याने कचरा पेटणे, झाडावर बाण पडल्याने झाड पेटणे अशा घटना अधिक होत्या. शुक्रवारी सायंकाळी ७.३५ मिनिटांनी कळस येथील रस्त्यावर कचरा पेटल्याची पहिली वर्दी अग्निशमन दलाकडे आली. त्यानंतर आगीच्या घटना एकापाठोपाठ येत होत्या. त्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता वाघोली येथील नगर रोडवरील क्रोमा शोरुममागील फ्लॅटमध्ये आग लागल्याची ही ३५ वी घटना होती.१) राञी ७.३५ – कळस येथे रस्यावर कचरा पेटला
२) रात्री ७.३६ – मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग
३) ८.०५ – बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली
४) ८.०६ – कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग
५) ८.१२- मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचºयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग
६) ८.१९ – सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग
७) ८.२२ – मंगलदास रस्ता येथे झाडाला आग
८) ८.२४ – गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग
९) ८.३० – काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग
१०) ८.३४ – रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग
११) ८.३८ – बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग
१२) ८.४० – लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ घरामध्ये आग
१३) ८.४५ – कळस स्मशानभूमी जवळ एका शेतामध्ये आग
१४) ८.५४ – टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग
१५) ९.०१ – सिहंगड रोड, नवश्या मारुती जवळ घरामध्ये आग
१६) ९.०३ – औंध, बीआरटीएस रस्ता येथे घरामध्ये आग
१७) ९.११ – गणेश पेठ, डुल्या मारुती मंदिराजवळ छोट्या गोडाउनमध्ये आगीची घटना
१८) ९.२३ – वडगाव बुद्रुक, गोसावी वस्ती येथे घरामध्ये आग
१९) ९.२५ – कल्याणीनगर, गोल जिम चौक येथे मोकळ्या मैदानात आग
२०) ९.२९ – गणेश पेठ, बुरुड आळी येथे पुन्हा ताडपञीला आग
२१) ९.३५ – चंदननगर, खराडी बायपास येथे कचरा पेटला
२२) ९.४० – शिवणे, दांगट पाटील नगर येथे कपड्याच्या गोडाऊनमध्ये आग
२३) ९.४२ – पदमावती, पंचवटी मिञ मंडळ येथे गॅलरीमधे आग
२४) ९.५५ – सासवड रोड, सोनाई गार्डन जवळ पीव्हीसी पाईप गोडाऊनला आग
२५) १०.९१ – गंज पेठ, महात्मा फुले वाड्यानजीक कचरा पेटला
२६) १०.०२ – हडपसर, डिपी रस्ता कचरा पेटला
२७) १०.२७ – बिबवेवाडी, अप्पर डेपो येथे मोकळ्या मैदानात कचरा पेटला
२८) १०.३४ – रास्ता पेठ, आयप्पा मंदिरा जवळ इमारतीत गॅलरीत आग
२९) १९.५१ – खराडी, थिटे वस्ती येथे घरामध्ये आग
३०) ११.०७ – कोथरुड, हॅप्पी कॉलनी येथे टपरीला आग
३१) ११.४५ – गंगाधाम, आई माता मंदिराजवळ कचरा पेटला
३२) पहाटे २.५० – हडपसर, रामटेकडी, आंबेडकर नगर लाकडांना आग
३३) ३.०१ – कॅम्प, पुलगेट बसस्टॉप, सोलापुर बाजार कचरयाला आग
३४) ५.०० – कोंढवा खुर्द,नवाजी चौक, मक्का मश्जिद जवळ बंद घराला आग
३५) ६.३० – वाघोली, नगररोड, क्रोमा शोरूम मागे फ्लॅटमध्ये आग

राज ठाकरेंनी परस्परच अमीत ठाकरेंना उमेदवारी दिली :आता माहीममधून माघार नाही, निवडणूक लढणारच- एकनाथ शिंदे

मुंबई-माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहीममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांतकडे देखील आम्हाला लक्ष द्यावे लागेल. कार्यकर्त्यांचे मनोबल खचून जाता कामा नये, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरेंना मदत करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार आम्ही एकत्र आहोत. आम्ही महायुतीकडून निवडणुक लढवणार आहोत. रामदास आठवलेंचा पक्ष आणि जन सुराज्य पक्षदेखील आमच्यासोबत आहे. बहुमत आम्हाला मिळेल असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीतील सगळे समान आहेत, कोणीही पहिला किंवा दुसरा येत नाही. सध्या महायुतीला विजय मिळवून देण्याचेच उद्दिष्ट आहे. सध्या मी या टीमचा लीडर आहे आणि आमची टीम काम करत आहे. मविआकडे बघा, आज मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यातच एकमत नाहीये. मग असे लोक जनतेला तरी कसे आवडतील ? महायुतीमध्ये कोणतीही स्पर्धा नाहीये. राज्यात महायुतीचे सरकार आणणे आणि राज्याचा विकास करणे, सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणं हेच आमचं ध्येय आहे,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात तयार झालेले मविआचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात होते. आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजवण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मोहामुळे काँग्रेससोबत सरकार बनवलं असे शिंदे यांनी सांगितले.

दुचाकीवरून जाताना नकली बंदुकीच्या शायनिंगने पोहोचविले लॉकअपमध्ये …

पुणे : बंदुक घेऊन रोडवरुन दुचाकीवरुन जाणार्‍या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यात ‘तो’ काही वाहनचालकांवर ती बंदुक रोखत असल्याचे दिसत होते…. सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली अन ती दिवाळीतील फटाके उडविण्याची बंदुक असल्याचे समजले . हि बंदूक खरी असल्याचे भासवून लोकांमध्ये भ्रम निर्माण करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी या शायनर्स बहाद्दरांवर गुन्हा दाखल केला आहे.अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. शिवणे), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. वारजे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पेंटर असून पेंटिंगची कामे करतात.कात्रज – देहुरोड बायपास रोडवरील ) वडगाव पूल ते वारजे पूल दरम्यान दुचाकीवरुन दोघे जण जात होते. त्यातील मागे बसलेल्याने हातात बंदुक घेतली होती. ती तो सर्वांना दाखवत होता. एका कारला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना त्यांच्यावर ती रोखलेली दिसत होती. त्यांच्या मागे असलेल्या कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. तो खूप व्हायरल झाला. दिवाळीसारख्या सणामध्ये भर दिवसा गुंड हातात बंदुक घेऊन रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे या व्हिडिओमुळे प्रतीत होत गेले .

याबाबत सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी सांगितले की, या व्हायरल व्हिडिओवरुन आम्ही दुचाकीस्वारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. दिवाळीतील फटाके वाजविणारी बंदुक त्यांच्याकडे होती. त्यांच्या या कृत्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आणि दहशतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने त्यांना अटक केली आहे.

पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार, येरवड्यातील घटनेत एकजण गंभीर जखमी

पुणे : जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन शेजारी राहणार्‍या तरुणाला जखमी केले. येरवडा पोलिसांनी या लष्करी जवानाला अटक केली आहे.श्रीकांत शामराव पाटील (वय ४५, रा. श्रीराम मित्र मंडळ, अशोकनगर, येरवडा) असे या लष्करी जवानाचे नाव आहे.

याबाबत दिलशाद शहानवाज मुलानी (वय ३३, रा. श्रीराम मित्र मंडळ, अशोकनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता श्रीराम मित्र मंडळ येथे घडली. या घटनेत शहानवाज मुलानी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानवाज मुलानी आणि श्रीकांत पाटील हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगवरुन वाद होत असे. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. तेव्हा श्रीकांत पाटील घरातून १२ बोअरची बंदुक घेऊन आला. त्याने बंदुकीतून शहानवाज मुलानी यांच्यावर डोक्यावर गोळी मारुन गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर मुलानी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी श्रीकांत पाटील याला अटक केली आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कच्छ येथे भारताच्या सशस्त्र दलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी

नवी दिल्‍ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील कच्छच्या खाडी क्षेत्रातल्या लक्की नाला इथे सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शूर जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. अत्यंत दुर्गम ठिकाणी धैर्याने तैनात राहून आपले रक्षण करणाऱ्या आपल्या सुरक्षा जवानांचा अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कच्छमधील खाडी क्षेत्रातले तापमान अत्यंत तीव्र असते, त्यामुळेच हा भाग आव्हानात्मक आणि दुर्गमही आहे. अशातच इथे पर्यावरण विषयक इतरही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खाडी क्षेत्रातील एका तरंगत्या सीमा चौकीलाही (Floating Border Outposts – BOPs) प्रत्यक्ष भेट दिली आणि तिथल्या शूर सुरक्षा जवानांना मिठाईचे वाटप केले.

याबाबतच्या आपल्या अनुभवाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेले संदेश :

गुजरातमधील कच्छमध्ये आपल्या शूर जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहे.

आपले सुरक्षा जवान अत्यंत दुर्गम ठिकाणी धैर्याने तैनात राहून आपले रक्षण करतात, आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान वाटतो.

कच्छच्या खाडी क्षेत्रातल्या लक्की नाला इथे आपल्या सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शूर जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करताना खूपच आनंद झाला. हा भाग अत्यंत आव्हानात्मक आणि दुर्गमही आहे. इथे दिवस कडक उष्णतेचा असतो आणि प्रचंड

गारठाही असतो. या खाडीच्या प्रदेशात  पर्यावरण विषयक इतरही आव्हानांचा सामना करावा लागतो.

या खाडी क्षेत्रातील एका तरंगत्या सीमा चौकीलाही प्रत्यक्ष भेट दिली आणि तिथल्या शूर सुरक्षा जवानांना मिठाईचे वाटप केले.

कष्टकरी वर्गासोबत राहुल गांधींची दिवाळी

नवी दिल्ली : देशभरामध्ये दीपावली सणाचा उत्साह आहे. सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशात आणि झगमगटामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.मात्र अशीही काही घरं आहेत ज्यांच्या घरी हा प्रकाश हा आनंद दिसत नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आहे. कष्टकरी लोकांचे काम आणि आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्यासोबत मातीच्या पणत्या देखील तयार केल्या आहेत.

राहुल गांधी यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केली आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनोख्या प्रकारची दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना नेत्यांचा हा अंदाज आवडला असून तुफान कमेंट्स केल्या जात आहेत. राहुल गांधी आणि त्यांचा भाचा रेहान वढेरा दिसून येत आहे. दोघांनी कष्टकरी माणसांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये राहुल गांधी हे अगदी भिंत खरवडत आहेत. तसेच कामगारांच्या सोबक रंग मारण्याचे काम देखील करत आहेत. भिंत खरवडताना किंवा भेगांमध्ये लांबी भरताना काय समस्या येतात, याबद्दल कामगारांशी गप्पा मारल्या. तसेच राहुल गांधींच्या डोळ्यामध्ये धुळ गेल्याचे देखील दिसत आहे. राहुल गांधींनी कामगारांना तुम्हाला या सगळ्या कामाचा काय त्रास होतो, असे विचारत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर राहुल गांधी यांनी दिल्लीतील उत्तम नगरमध्ये मातीच्या पणत्या आणि नक्षीकाम केलेली भांडी तयार करणाऱ्या एका कारखान्याला भेट दिली. या ठिकाणीही राहुल गांधी यांनी स्वतः मातीच्या पणत्या बनवल्या. पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी आणि पणत्या तयार कशा केल्या जातात, याची माहिती राहुल गांधींनी घेतली. सध्या राहुल गांधी हे अनेकदा कष्टकरी वर्गाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना दिसतात. आता पुन्हा एकदा प्रत्यक्षामध्ये कामगारांपर्यंत जात त्यांची दिवाळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आबा बागुलांवर अन्याय हि वास्तवता कोण नाकारतोय ?

पर्वती मतदारसंघात जनतेचा सांगली पॅटर्न राबविण्याचा निर्धार

पुणे : शरद पवार , अजित पवार एवढेच नव्हे तर अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात , विश्वजित कदम यांच्यासह स्वर्गीय पतंगराव कदम , गिरीश बापट ,आणि शिवसेनेचे मनोहर जोशी सुद्धा आबा बागुलांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कामाने प्रभावित होते त्यांनी,’आबा बागुलांना आता कुठवर नगरसेवक ठेवता त्यांना आमदार करून आणखी मोठे काम करण्याची संधी द्यायला हवी ‘ असे मत वेळोवेळी व्यक्त केले होते .सर्वपक्षीय नेत्यांचेच नव्हे तर हेच मत स्थानिक कार्यकर्त्याचे नागरिकांचे होते पण पक्ष नेतृत्व देईल त्याची धुरा कार्यकर्त्यांना वाहावी लागली . मतदार कायमच या विषयी संभ्रमात राहिला आणि येथून भाजपच्या उमेदवाराचा विजय कायम होत गेला. आता या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांना उमेदवारी न दिल्याने, पर्वती मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह, नागरिकांनीही पर्वती मतदारसंघात सांगली पॅटर्न राबविण्याचा निर्धार केला आहे. अशा आशयाचे बॅनर सुद्धा पर्वती मतदारसंघात सर्वत्र लावण्यात आले आहेत.


आबा बागुल यांच्या सारखा कर्तबगार व विकास करण्याची धमक असलेला उमेदवार असूनही, महाविकास आघाडीत काँग्रेसला हा मतदार संघ घेचून आणण्यात अपयश आले. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही हा मतदार संघ कॉग्रेसकडे मिळू शकला नाही.
पुणे शहरातील काय पण पंचकृषीतील हजारो वृद्ध माता पित्यांना काशी यात्रा घडविणारा श्रावणबाळ, राजीव गांधी ई लर्निंग ही गोरगरिबांची शाळा चालविणारा व या द्वारे शेकडो मुलांना मोठ मोठ्या हुद्यावर पोहचविणाऱ्या आबा बागुल यांच्यावर वारंवार अन्याय झाला आहे. अशा भावना पर्वती मतदारसंघातील च नव्हे तर पुण्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. गेली कित्येक वर्षे समाजकारण व राजकारणात आपल्या कर्तबगारीने मनाचे स्थान मिळविणाऱ्या आबा बागुल याना वारंवार डावलले जात आहे. त्यामुळे चागला कार्यकर्ता व पर्वती चा विकास याकरिता आबा बागुल यांना निवडून देणे हे पर्वती च्या नागरिकांच्याच हिताचे आहे हे लक्षात घेऊन, पर्वती तील कॉग्रेस कार्यकर्त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात सांगली पॅटर्न राबविण्याचा निर्धार केला आहे. व त्याबाबतचे पर्वती मध्ये बॅनर ही झळकत आहेत.

पर्वती विधानसभा मतदार संघातील न झालेल्या विकास कामाबद्दल खंत व्यक्त केली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार चुकला असून, अजूनही वेळ गेलेली नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने पडून आपली क्षमता दाखवून देणार आहे. त्यापेक्षा महाविकास आघाडीने आबा बागुल यांना पाठींबा द्यावा असेही मत व्यक्त होते आहे .

सुवर्णवस्त्रांनी सजले सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे रुप

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे ; लक्ष्मीपूजनाला देवीला १६ किलो सोन्याची साडी
पुणे :  लक्ष्मीपूजनानिमित्त सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला शुद्ध सोन्यात बनविलेली सुमारे १६ किलो वजनाची साडी मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने लक्ष्मीपूजनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात केले जाते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल,  विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, नारायण काबरा, निलेश लद्दड आदी यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मीपूजनाला देवीला नेसविण्यात आलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई व आरास करण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले.