मुंबई-माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहीममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांतकडे देखील आम्हाला लक्ष द्यावे लागेल. कार्यकर्त्यांचे मनोबल खचून जाता कामा नये, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरेंना मदत करणार नाही असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार आम्ही एकत्र आहोत. आम्ही महायुतीकडून निवडणुक लढवणार आहोत. रामदास आठवलेंचा पक्ष आणि जन सुराज्य पक्षदेखील आमच्यासोबत आहे. बहुमत आम्हाला मिळेल असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीतील सगळे समान आहेत, कोणीही पहिला किंवा दुसरा येत नाही. सध्या महायुतीला विजय मिळवून देण्याचेच उद्दिष्ट आहे. सध्या मी या टीमचा लीडर आहे आणि आमची टीम काम करत आहे. मविआकडे बघा, आज मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यातच एकमत नाहीये. मग असे लोक जनतेला तरी कसे आवडतील ? महायुतीमध्ये कोणतीही स्पर्धा नाहीये. राज्यात महायुतीचे सरकार आणणे आणि राज्याचा विकास करणे, सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवणं हेच आमचं ध्येय आहे,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात तयार झालेले मविआचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात होते. आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजवण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मोहामुळे काँग्रेससोबत सरकार बनवलं असे शिंदे यांनी सांगितले.