Home Blog Page 609

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!

पुणे-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे भरभरुन करत, कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला असल्याचे गौरवोग्दार काढले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी चंद्रकांतदादांनी आपल्या गत पाच वर्षाच्या कार्याचा कार्य अहवाल डॉ. माशेलकर यांच्याकडे सादर केला, तो त्यांनी सविस्तर पाहिला. पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी आणि उपक्रम पाहून डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांत दादांचे मनापासून कौतुक केले. यावेळी चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील आरोग्य विषयक योजनांची डॉक्टरांनी आवर्जून माहिती घेतली.

कोथरुड ही राज्याची संस्कृतिक राजधानी आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची एक वेगळीच ओळख आहे. खरंतर एखादा व्यक्ती विशेष करुन राजकीय व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्याच्या स्वभावातही फरक पडतो. विनयशिलता, नम्रपणा कमी होतो. पण चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्यालातील विनयशीलता, नम्रपणा आणि समाजाप्रती समर्पित होऊन काम करण्याचा गुण सोडलेला नाही. गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून कोथरुडकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या रुपाने कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या गुरु पौर्णिमेनिमित्तच्या गुरुपूजन उपक्रमाचेही भरभरुन कौतुक केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित होते.

पुण्यातल्या आठच्या आठ जागा जिंकू – पंकजा मुंडे

पुणे-जिल्ह्यातल्या २१ च्या २१ आणि पुण्यातल्या आठच्या आठ जागा महायुती जिंकेल असे मत भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कवीटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर , नामदेव माळवदे उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या,’ आम्ही कार्यकर्ते एक विचारधारा आधारे निवडणूक लढत आहे. आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आले आणि जनतेकरीता त्यांनी काही केले नाही. लोकसभा निवडणुकीत मराठवाडामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली नाही. पण जनता आता सुज्ञ आहे. कोणत्याही फेक नरेटिव्हला ते बळी पडणार नाही. विकासाचे बाजूने जनता मते देईल. कोण कोणाला पाडा असे आता म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती पुन्हा राज्यात येणार नाही. ‘बटेंगे तो कटेंगे ‘हा मुद्दा मला पटत नाही, सोशल मीडियावर जे येते त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मनोज जरांगे यांच्या निर्णयाबद्दल मी काही बोलणार नाही, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा किंवा न लढविण्याचा अधिकार आहे. त्यांच्या फायदा आणि नुकसानवर आधारित आम्ही निवडणूक लढत नाही, लोकशाहीत विरोधक त्यांची भूमिका मांडतात आम्ही आमचे पक्ष काम करत आहे, असे मुंडे म्हणाल्या .

पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवाळी पार पडली असून भाऊबीज आता झाल्याने सर्वजण निवडणूक तयारीस लागले आहे. पुणे जिल्ह्यात 21 जागा असून 18 आमच्या महायुतीकडे आहे. आता आम्ही सर्व 21 जागा जिंकवणे प्रयत्न करत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना घेऊन आम्ही मतदार यांच्यापर्यंत पोहचत आहे. सरकारचे उत्कृष्ट निर्णय सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत आहे. पण लोकसभा निवडणुकीत आम्हाला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आले त्यावर आता जनतेचे डोळे खाडकन उघडले आहे. हरियाणामध्ये भाजपला जनतेने साथ दिली असून तेच चित्र राज्यात दिसेल. सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून आम्ही मागील निवडणुकीत विजय मिळवला पण अनपेक्षित आघाडी राज्यात झाल्याने आम्ही काही काळ सत्तेबाहेर राहिलो. मात्र, आता आम्ही पूर्ण तयारीने निवडणुकीत तयारी करत आहे. भाजप मध्ये पक्षाचा आदेश अंतिम असतो, कार्यकर्ते एखादा निर्णय होईपर्यंत वाट पाहतात, मागणी करतात पण त्यानंतर ते पक्ष आदेश पाळतात. जातीचे किंवा धर्माचे ध्रुवीकरण करून मते मिळवणे सवय नव्या पिढीला लागू नये. सरकारने मागील अडीच वर्षात मोठे काम केले आहे त्यामुळे त्यापूर्वी आघाडी सरकारने जे काम राज्यात केले त्यामुळे ते पुन्हा सत्तेत नको असे मतदारांना वाटत आहे. भाजपचे सर्व नेते निवडणूक तयारीस लागलेले आहे. आता निवडणुकीत वेगळे चित्र सर्वांना पाहवयास मिळेल.

पर्वतीत आबा बागुलांशीच लढाई, मिसाळ आणि कदमांची ..तावरे रिंगणात पण पाठींबा कदमांना

पुणे- मी आबांची लेक आहे असे विधान करत गेल्या विधानसभा निवडणुकीत आबा बागुलांना माघार घ्यायला लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम आणि भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या दोन्ही मातब्बरांना आता यावेळी पित्यासमान वयाच्या आबा बागुल यांच्याशीच लढत द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सचिन तावरे हे देखील रिंगणात आहेत मात्र त्यांनी आयत्यावेळी अर्ज माघारी घेण्यास उशीर झाल्याने आपण रिंगणात असलो तरी अश्विनी कदम यांना पाठींबा दिला आहे.त्यामुळे त्यांची उमेदवारी हि गौण मानली जाणार आहे.

राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे कि,’ पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री सचिन तावरे यांनी सौ. सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला,परंतु वेळेमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.३ मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांचा अर्ज माघार होऊ शकला नाही, पण श्री सचिन तावरे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अश्विनी कदम यांना आहे.

दरम्यान भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी आजपर्यंत प्रचाराला प्रारंभ केला नव्हता तो आज दुपारी ४ वाजता त्या प्रचाराचा प्रारंभ करत आहेत.

आपल्या प्रभागात केलेली लौकिकप्राप्त विकास कामे ३५ वर्षे नगरसेवक पदावरून केलेला कारभार आणि जनतेशी साधलेली जवळीक यामुळे आबा बागुलांचा या मतदार संघावर प्रभाव निश्चित असणार आहे. त्यांच्यावर वारंवार विधानसभेची उमेदवारी देण्याबत पक्षाने आणि विविध नेत्यांनी केलेले डावलण्याचे राजकारण यामुळे आबांच्या बाबत सहानुभूती आहे आता आपल्या राजकीय कारकिर्दीला पणाला लाऊन आबा बागुल पर्वती मतदार संघाच्या रिंगणात उतरले आहेत.

सदा सरवणकर निवडणूक लढणार:राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानंतर भूमिका स्पष्ट,अमित ठाकरे यांच्यासाठी विधानसभेचा मार्ग कठीण

मुंबई-

सदा सरवणकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानुसार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर आणि सहकारी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सदा सरवणकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे, माझा मुलगा आणि सहकारी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी भेटायला गेले होते. पण राज ठाकरे यांनी आमची भेट नाकारली. सरवणकरांना भेटायचे नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, असे राज ठाकरे म्हणाले असल्याचे सदा सरवणकरांनी सांगितले. त्यामुळे आता हा विषय संपला असून मी निवडणूक लढवणार आहे.

मी राज ठाकरेंसमोर एक नाही तर दोन्ही पुढे केले होते. पण, राज ठाकरे मला भेटत नसल्याने माझ्यासमोर दुसरा मार्ग नाही. मी महायुतीचा उमेदवार असून इतर पक्षांकडूनही महायुतीचे धर्माचे पालन केले जाईल, असा विश्वास सदा सरवणकरांनी व्यक्त केला.माहिम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटाचे उमेदवार त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीतील नेते प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. मात्र, मनसेने महायुती विरोधात दिलेले इतर उमेदवारांना मागे घ्यावे, तर मी देखील माघार घेण्यास तयार असल्याची भूमिका सरवणकर यांनी घेतली होती. जर मनसेचे इतर महायुतीविरोधातील उमेदवार माघार घेण्यास तयार असतील. तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि पक्षाच्या हितासाठी मी माघार घेण्यास तयार असल्याचे सरवणकर यांनी सकाळी सांगितले होते.

दरम्यान, सदा सरवणकर यांनी उमेदवादी अर्ज माघारी न घेतल्यामुळे ते निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून महेश सावंत आणि मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. आता अमित ठाकरे यांच्यासाठी विधानसभेचा मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे.

श्री महालक्ष्मी देवीला पाडव्याच्या निमित्ताने ५६ प्रकारचे भोग

 श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे ; दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य अन्नकोट
पुणे :  विविध प्रकारची मिठाई, फरसाण, चिवडा, फळे यांसह ५६ प्रकारच्या मिष्टांन्नांचा भोग श्री महालक्ष्मी देवीसमोर लावण्यात आला. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त श्री गोवर्धन पूजा करून भव्य अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात केले जाते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल,  विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, नारायण काबरा, निलेश लद््दड आदी यावेळी उपस्थित होते. 

लक्ष्मीपूजनानिमित्त श्री महालक्ष्मी देवीला शुद्ध सोन्यात बनविलेली सुमारे १६ किलो वजनाची साडी मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. त्याचे दर्शन घेण्याकरिता देखील देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. तर, पाडव्याला अन्नकोट आयोजित केला जातो.

अन्नकोट मध्ये ठेवण्यात आलेले सर्व पदार्थ मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आले. महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

जाधवर इन्स्टिट्यूटच्या २ हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधान आणि सैनिकांना पत्र

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे दिवाळीनिमित्त पंतप्रधान आणि सैनिकांप्रती कृतज्ञता

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील २ हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांना पत्र लिहिली. दिवाळीनिमित्त ही पत्रे नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मिर येथे तैनात बीएसएफ जवानांना पाठवण्यात आली. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी पत्रातून जवानांना अभिवादन केले आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी याकरिता विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील सैनिकांबद्दल आदर या उपक्रमाद्वारे दिसून आला. भारतीय सेनेबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. भारतीय सैन्याविषयी आणि सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती यावेळी देण्यात आली.

तुम्ही सीमेवर आहात, म्हणून आम्ही देशात सुरक्षित आहोत. तुम्ही आमची ताकद आहात. आम्हाला ही मोठे झाल्यावर तुमच्यासारखे सैनिक व्हायचे असे लिहीत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त केला.

पंतप्रधानांनी पुढाकाराने आधुनिक आणि विकसित भारताच्या गरजा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक लागू करण्यात आले आहे. ज्ञानाच्या बाबतीत भारताला एक मजबूत देश बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मुलांनी पत्राद्वारे दिली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकास आणि नोकरी धिष्ठित शिक्षण असावे, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

खडकवासला मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात पहा आहेत कोणकोणते 14 उमेदवार उमेदवार

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघार प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस संपन्न झाला. यामध्ये 10 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात 14 उमेदवारांचे अस्तित्व कायम राहिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे यांच्या उपस्थितीत अर्ज माघार प्रक्रिया पार पडली.
अभिषेक धुमाळ,चंद्रशेखर मते, सागर तडके, वैभव मोटे आणि रविकांत बडेकर यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, या महत्त्वपूर्ण निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीमुळे आता लढतीचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले आहे. खडकवासला मतदारसंघात होणाऱ्या या निवडणुकीसाठी वातावरण तापले असून, आता हे 14 उमेदवार मतदारांच्या विश्वासासाठी सामोरी जातील.

उमेदवाराचे नाव

1भिमराव धोंडिबा तापकीर
भाजपा

2 मयुरेश रमेश वांजळे
मनसे

3.दोडके सचिन शिवाजी
राका शप

4 अविनाश लोकेश पुजारी
सनय छत्रपती शासन

5 बालाजी अशोक पवार
राष्ट्रीय समाज पक्ष

6 ऋषिकेश अभिमान सावंत
राष्टीय स्वराज्य सेना

7 संजय जयराम दिवार
वंचित बहुजन आघाडी
खालील सर्व अपक्ष
8 अरुण नानाभाऊ गायकवाड

9 दत्तात्रय रामभाऊ चांदारे

10 रविंद्र गणपत जगताप
11 राहूल मुरलीधर मते

12 व्यंकट संतराम वांगवाड

13 सचिन बाळकृष्ण जाधव

14 डॉ. सोमनाथ अर्जुन पोळ

‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ कार्यक्रमातून भावसमाधीची अनुभूती

मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती
‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ कार्यक्रमातून उलगडला संत मुक्ताबाईंचा अलौकिक जीवनप्रवास

पुणे : भक्तांप्रती असलेला मातृत्वभाव, भक्तीयोगात प्राप्त केलेले उच्च स्थान, सामान्य जीवांना परब्रह्माचे दर्शन घडविण्याची आध्यात्मिक तयारी असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाईंचा अलौकिक जीवनप्रवास ‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ या कार्यक्रमातून उलगडला.
महाराष्ट्राला अनमोल आणि अमोघ अशी संत परंपरा लाभली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच संस्कारमूल्य जपणारी एक तरी पणती आपणही लावावी या उद्देशाने पंडित हेमंत पेंडसे यांनी संत मुक्ताबाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‌‘ब्रह्मचित्कला मुक्ताई‌’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कीर्तनाच्या धाटणीतून आणि अभंगांची जोड देत संत मुक्ताबाई यांचा जीवनपट भावपूर्णतेने पुणेकरांसमोर मांडण्यात आला. पंडित हेमंत पेंडसे, प्रख्यात कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांच्यासह राधिका ताम्हनकर, मेहेर परळीकर यांचा सहभाग होता. अमित वेणू (बासरी), कौस्तुभ परांजपे (ऑर्गन), अजित किंबहुने (तबला), उद्धव गोळे (पखावज), स्वप्नील कुंभार (टाळ) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेमध्ये भक्तीचा मळा फुलविणाऱ्या संत मुक्ताबाई यांचे बहुमूल्य योगदान आहे. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताबाई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्रामुख्याने घेतले जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताबाई. ही चारही भावंडे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत दीव्य स्वरूप होत. बोलण्यात स्पष्टता आणि कठोरता असणाऱ्या मुक्ताईने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचे आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली.
संत मुक्ताईची जीवनकथा आपल्या अमोघ वाणीतून रोहिणी माने-परांजपे एकिकडे उलगडत असताना नमो ज्ञानेश्वरा, मुंगी उडाली आकाशी, व्यथा सांगण्यास ज्ञाना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, धन्य धन्य मुक्ताबाई, निर्गुणाचे डहाळी, पाळणा लाविला, गुरू हा संतकुळीचा राजा, टाळ दिंडीचा गजर, बोलतो मृदुंग बोले एकतारी, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, आली गेली कैसी कळले नाही कोठे मुक्ताई या भक्तीरचना भावपूर्णतेने सादर करण्यात आल्या.
संत निळोबाराय, संत मुक्ताई, संत नामदेव, संत सोयराबाई, संत एकनाथ यांच्य रचनांसह डॉ. राहुल देशपांडे यांची भक्तिगीते पंडित हेमंत पेंडसे, राधिका ताम्हनकर, मेहेर परळीकर यांनी सादर केली.
भक्तीमार्गात परकाया प्रवेशसिद्धी मिळविलेल्या, स्त्री-पुरुष भेदापलिकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईंचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवनप्रवास ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या: डॉ. सय्यद नासिर हुसेन

भाजपा युती सरकारच्या काळात घोटाळ्यांचे विक्रम, ४० टक्के कमिशनवाले सरकार.

महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपाला धडा शिकवून जनता काँग्रेस मविआचे सरकार आणेल.

महाराष्ट्राला देशात पुन्हा नंबर एकचे राज्य करण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प.

मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०२४
महाभ्रष्ट महायुती भाजपा सरकारच्या काळात गुजरातच्या ठेकेदारांना मोठी कामे दिली तर टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन हिरे उद्योग, बल्क ड्रग्ज पार्क सारखे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पाठवून येथील रोजगारही पळवले. महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार गुजरातला दिले आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुणपिढी बरबाद करण्याचे पाप भाजपा युती सरकारने केले आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार महाराष्ट्रासाठी नाही तर गुजरातसाठी काम करत आहे. महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ निरीक्षक खा. सय्यद नासीर हुसेन यांनी केले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. नासिर हुसेन म्हणाले की, भाजपा युती सरकार हे भ्रष्ट व घोटाळेबाज सरकार आहे. ४० टक्के कमिशनवाल्या या सरकारने घोटाळ्यांचे अनेक विक्रम केले आहेत. १० हजार कोटींचा जलयुक्त शिवार घोटाळा, ८ हजार कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा, ६ हजार कोटींचा मुंबईतील रस्ते घोटाळा असे अनेक घोटाळे या सरकारने केले आहेत. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला ज्या कंपन्यांनी मोठ्या देणग्या दिल्या त्या कंपन्यांना महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांचे काम दिले आहे. भाजपा ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करून गप्प बसते, अजित पवार, रविंद्र वायकर, अशोक चव्हाण यांच्यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी घोटाळ्याचे आरोप केले व त्यांना भाजपात घेतल्यावर आता मात्र ते यावर काहीच बोलत नाहीत, यावर भाजपाने उत्तर दिले पाहिजे.

भारतीय जनता पक्षाने सीबीआय, ईडीचा धाक दाखवून आमदार फोडून विरोधी पक्षांची सरकारे पाडली. कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची सरकारे भाजपाने पाडली ते जनतेला आवडले नाही. कर्नाटकात जनतेने भाजपाला धडा शिकवत काँग्रेसचे बहुमताचे सरकार जनतेने आणले तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपालाही जनता धडा शिकवून काँग्रेस मविआचे सरकार आणेल असा विश्वास डॉ. नासिर हुसेन यांनी व्यक्त केला आहे.

भाजपा सरकारच्या काळात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर अत्याचार वाढले आहेत, महिला अत्याचार वाढले आहेत. शेतकरी आत्महत्याही वाढल्या असून देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली नाही तसेच पीक विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. शेतीमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे महागाई प्रचंड वाढली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८०० रुपये असताना प्रत्यक्षात फक्त ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. पण दुसरीकडे गोडतेलाच्या १५ किलोंच्या डब्याचे किंमत १६०० रुपये होती ती वाढून १० दिवसांत २१५० रुपये झाली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठिण झाले आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न असताना पेपरफुटी नित्याचीच झाली आहे. तलाठी परीक्षा, पोलीस भरती प्रत्येक परिक्षेचे पेपर फुटत आहेत. भाजपा सरकारच्या काळात सर्वत्र अनागोंदी कारभार असून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले त्यांच्या महाराष्ट्रात द्वेष पसरविण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे. हे चित्र बदलून महाराष्ट्राला देशात पुन्हा एकदा नंबर एकचे प्रगत राज्य बनवण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प आहे, त्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असेही डॉ. नासिर हुसेन म्हणाले.

शिवरायांच्या अश्वारुढ स्मारकाला ८००० पणत्यांची मानवंदना


पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर…  आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी… जय शिवाजी.. हर हर महादेवचा… मर्दानी जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात… तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्ट सहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी शिवजयंती महोत्सव समिती तर्फे सलग १३ व्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा  साजरा झाला. यावेळी ८००० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. 

श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन समितीच्या महिला सदस्या रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, विजया सागर पवार, दिपा किरण कंक, हेमलता राजाभाऊ बलकवडे, शोभा भोई, प्रतिक्षा विवेक तुपे, कामिनी प्रवीण गायकवाड, दिपाली विशाल गव्हाणे, जोत्स्ना निलेश जगताप यांसह उपस्थित महिलांच्या हस्ते तसेच समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, समीर जाधवराव, ईशान अमित गायकवाड आणि शिवकालीन स्वराज्यघराण्यांच्या वंशजांच्या व व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

समितीच्या सदस्यांच्या हस्ते शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल श्रीमंत देवरावराजे हांडे, श्रीमंत भोईटे सरकार, श्रीमंत सरदार बाप्पुजी मांढरे  ह्या स्वराज्यघराण्यांचा अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच राजे साळुंखे चालुक्य राजवंव, स्वराज्यनिष्ठ बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

अमित गायकवाड म्हणाले, दीपोत्सवाच्या पहिल्या तपपूर्तीच्या यशस्वी सांगता करुन नव तपपूर्तीचा पहिला दीपोत्सव साजरा करताना लक्ष लक्ष हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.          
समितीचे सचिव सचिन पायगुडे यांनी समितीच्या स्वराज्यकार्याचा गेल्या १२ वर्षाचा इतिहास तंतोतंत मांडून शिवशंभू भक्तां समोर जिवंत केला.दीपोत्सवाचे आयोजन दीपोत्सवाचे संकल्पक व समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, गोपी पवार, मोहन पासलकर, किरण शितोळे, निलेश जगताप, विशाल गव्हाणे,  महेंद्र भोईटे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

रश्मी शुक्ला भाजपसाठीच काम करत होत्या:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप; निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे केले स्वागत..

मुंबई-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीउचलबांगडी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाचा रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण झारखंड व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच तेथील पोलिस महासंचालकांची बदली झाली होती. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात एवढा विलंब का लागला? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे, असे ते म्हणाले.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप होते. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची पोलिस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सोमवारी निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले.

नाना पटोले म्हणाले, मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. झारखंड व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच लगेचच तेथील पोलिस महासंचालकांची बदली करण्यात आली होती. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी एवढा विलंब का लागला? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यापुढे निवडणुकीच्या कोणत्याही कामात त्यांचा हस्तक्षेप राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी.

रश्मी शुक्ला या स्पष्टपणे भाजपसाठीच काम करत होत्या. त्या विरोधकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. राज्य सरकारने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना या पदावर बसवले होते. आम्ही निवडणूक आयोगाने यासंबंधी एकदा नव्हे तर तिनदा तक्रार केली होती. त्यानंतरही सरकारने त्यांना दोन वर्षांची अवैध मुदतवाढ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचा दबाव असल्यामुळेच असे करण्यात आले.

नाना पटोले पुढे म्हणाले, पोलिस महासंचालक पदावर निष्पक्ष व्यक्ती बसला पाहिजे. कारण, हे पद राज्याच्या पोलिस विभागाचे महत्त्वाचे व प्रमुख पद आहे. रश्मी शुक्ला यांची या पदावर नियुक्ती झाली तेव्हापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली होती. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी. त्यांनी राज्यातील गुन्हेगारी संपवावी अशी आमची मागणी आहे.

फोन टॅपिंगचे आरोप असलेल्या DGP रश्मी शुक्ला यांची अखेर उचलबांगडी…

मुंबई-राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप होते. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची पोलिस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सोमवारी निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केलेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने काँग्रेस व इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्याचे आदेश दिलेत. आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांचा पदभार तत्काळ सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिलेत. एवढेच नाही तर पोलिस महासंचालकपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत 3 आयपीएस अधिकाऱ्यांचे एक पॅनेल पाठवण्याची सूचनाही मुख्य सचिवांना करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वीच आपल्या आढावा बैठका व राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवेळी अधिकाऱ्यांना निवडणूक केवळ निष्पक्ष व तटस्थपणेच नव्हे तर आपल्या कर्तव्याचे पालन करतानाही योग्य व्यवहार करण्याचा इशारा दिला होता, असे वृत्तसंस्थेने सूत्रांचा दाखला देत म्हटले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीने विशेषतः काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती.

रश्मी शुक्ला 2014 व 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत यांच्यासह काही विरोधकांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात सरकारने पुणे व मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.

आघाडी सरकारच्या काळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच्या पुष्टर्थ तत्कालीन पोलिस महासंचालकांना बदल्यांमधील भ्रष्टाचारप्रकरणी आलेले पत्र फडणवीसांनी दिले होते. हे पत्र कथितरीत्या रश्मी शुक्ला यांनी लिहिल्याचे बोलले जात होते. फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते.

1988 बॅचच्या आयपीएस केडरच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी पुणे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूर पोलिस अधीक्षक आणि सोलापूरच्या पोलिस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्य गुप्तचर विभागाचे (एसआयडी) आयुक्तपदही त्यांनी भूषवले. सशस्र सीमा दलाच्या पोलिस महासंचालकपदही त्यांनी भूषवले आहे.

कलाकारांनी आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य दृष्ट्या सक्षम व्हावे-मेघराज राजेभोसले

पुणे : कलाकारांनीच कलाकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी स्थापन केलेला कलाकारांचा परिवार म्हणजे बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच वर्ष भर कलाकारांच्या हिताचे अनेक कार्यक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि एम आर बी फाऊंडेशन पुणे, समुत्कर्ष एंडेव्हर्स प्रा.लिमिटेड पुणे.दिवा फाऊंडेशन पुणे.बढेकर डेव्हलपर्स पुणे यांच्या सहयोगाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील तब्बल १५०० शे (दीड हजार) कलाकार, तंत्रज्ञ, पडद्यामागिल कलाकारांना दिवाळी अन्नधान्य किट व फराळाचे वाटप करण्यात आले.तसेच कलाकारांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य व पुणे महानगर पालिका सामाजिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कलाक्षेत्रात पहिल्यांदाच कलाकारांच्या तब्बल ३० बालगंधर्व परिवार महिला बचत गट व बालगंधर्व परिवार पूरूष बचत गटांची स्थापना व उदघाटन करण्यात आले.कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आल्याचे बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांनी सांगितले.या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .

सध्या महाराष्ट्रात आणि देशात लोकप्रिय असलेला मराठी बिग बॉस ५ चा विजेता,सुरज चव्हाण यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या गुलीगत पॅटर्न ने हजारो कलाकारांची मने जिंकली व कलाकारांच्या पाठीशी मेघराज राजे भोसले भैय्यासाहेब कायम उभे असतात व मलाही अनेक वेळा ते मदत करतात असे आवर्जून सांगितले,कलाकारांनी आपल्या कले बरोबर च आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असेही सुरज चव्हाण म्हणाले.बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे, नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य, पिंपरी चिंचवड कलाकार संघ,कला परिवार हडपसर,अशा विविध कलासंस्थांच्या तब्बल १५०० शे दीड हजार कलाकारांनी दिवाळी अन्नधान्य किट व फराळाचा लाभ घेतला.सायंकाळी ७ वाजता शेकडो कलाकारांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच बालगंधर्व रंगमंदिरात भव्यदिव्य असा दिपोत्सव साजरा करून दिवंगत कलाकारांना अभिवादन करण्यात आले.

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या व्यक्तीला कारने उडवले:जागेवरच मृत्यू; कारचालक फरार

पुणे- पिंपरी चिंचवड परिसरातून एका भरधाव कारने फटाके फोडणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्यात एक व्यक्ती रस्त्यावर फटाके फोडताना दिसत आहे. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्या व्यक्तीला धडक दिली. सोहम पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून चालकाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेलिसिटी सोसायटीसमोर हा अपघात झाला. अपघातापूर्वी सोहम त्याच्या मित्रांसोबत रस्त्याच्या मधोमध फटाके फोडत होता. या वेळी रस्त्यावरून जाणारी वाहनेही इकडून तिकडे जात होती. दरम्यान, एक भरधाव कार आली आणि सोहमच्या अंगावर गेली. कारच्या धडकेत सोहम गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.ही संपूर्ण घटना सोसायटीबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये सोहम पटेल आणि इतर काही लोक रस्त्यावर फटाके फोडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, सोहमसोबतचे लोक रस्त्याच्या कडेला उभे आहेत, तर सोहम रस्त्याच्या मधोमध फटाके फोडत आहे. दरम्यान, एका बाजूने एक वेगवान कार आली आणि तिने सोहमला उडवले. घटनेनंतर कारचालक कारसह फरार झाला. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून कार आणि चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या एकखिडकी कक्षाचे अहोरात्र कार्य: दिवाळीच्या सुट्ट्यांनाही न थांबता निवडणुकीच्या तयारीत व्यस्त

पुणे: येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू असून एकखिडकी कक्षाच्या माध्यमातून उमेदवारांना प्रचार परवान्यांचे काम सुलभ करण्यात आले आहे. या कक्षाचे काम दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अहोरात्र सुरू आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील विविध परवान्यांचे काम वेळेत पूर्ण होऊ शकत आहे.
कक्षाचे काम निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे, आणि सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, नोडल अधिकारी स्वाती नरोटे तसेच सहाय्यक अधिकारी ज्ञानेश्वर मानकर, अक्षय लडकत, शैलेंद्र सोनवणे, दीपक टिकेकर, आणि प्रदीप शिंदे हे सर्व अधिकारी या महत्त्वपूर्ण कामात कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्यातून मतदारसंघातील विविध निवडणूक प्रक्रियांचे व्यवस्थापन प्रभावीपणे पार पडत आहे.
एकखिडकी कक्षाचे कार्य आणि महत्व
एकखिडकी कक्षाचा मुख्य उद्देश म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी लागणारे विविध प्रकारचे परवाने त्वरित उपलब्ध करून देणे हा आहे. निवडणुकीच्या काळात वाहन परवाने, सभा परवाने, रॅली व पदयात्रा परवाने, तसेच लाऊडस्पीकर परवाने या सर्वांची मोठी मागणी असते. हे परवाने प्राप्त करण्याची प्रक्रिया किचकट असते; मात्र एकखिडकी प्रणालीमुळे हे कार्य सोपं होत आहे.
सुट्ट्यांमध्येही न थांबता कार्यरत
एकखिडकी कक्षाचे कामकाज दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही सुरू आहे. या काळात देखील अधिकारी अहोरात्र कार्यरत राहून परवाने देण्याचे काम करत आहेत. एकखिडकी प्रणालीच्या अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांनी न थांबता सेवा देऊन मतदारसंघातील उमेदवारांना सहजगत्या परवाने मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रचारासाठी विविध परवाने घेण्याची प्रक्रिया सोपी झाली असून, उमेदवारांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या परवान्यांचे वितरण नियमित सुरू आहे.
निवडणूक प्रक्रियेतील सोयी आणि सुविधा
या कक्षाच्या अंतर्गत उमेदवारांना दिले जाणारे वाहन परवाने, सभा आयोजन परवाने, प्रचार रॅली व पदयात्रा परवाने आणि लाऊडस्पीकर परवाने हे सर्व कडक नियमानुसार दिले जातात. अधिकारी प्रत्येक परवान्याची प्रक्रिया नियमबद्धपणे पार पाडत आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे व मतदारसंघातील प्रचाराचे व्यवस्थापन सुगम बनले आहे.
एकखिडकी कक्षाच्या त्वरित आणि वेळेवर कामामुळे निवडणूक प्रक्रियेत गती आली असून, अधिकारी आणि कर्मचारी सतत कार्यरत राहून सेवा देत असल्याने निवडणुकीतील वेळेचे व्यवस्थापन सक्षमपणे केले जात आहे.