Home Blog Page 608

श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्य

कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व

पुणे – गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त, पहाटे ४ ते सकाळी ६ दरम्यान गायिका रसिक कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम झाला त्यांना तबला साथ अक्षय भडंगे यांनी तर ऑक्टपॅड वादन साथ यश जवळकर यांनी केली आणि सकाळी ८ वाजता गणेश याग देखील पार पडला.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनिलभाऊ रासने म्हणाले, देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविण्यात आले. त्यांना श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात भगवान श्री गणेशांचे नाव आहे उमांगमलज.

ते पुढे म्हणाले, उमा म्हणजे देवी पार्वती. तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला. असा याचा शब्दशः अर्थ. हा जशाला तसा लागू पडतच नाही. देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा म्हणण्याइतका मळ असेल तरी कसा? तर लक्षात घ्यायला हवे की या सर्व कथा अध्यात्माचे निरूपण करण्यासाठीच असतात.

आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणतात.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वाहनाचे टायर जाळण्याच्या प्रयत्नामागे निवडणुकीचे कारण नाही- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ४: चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खासगी वाहनाचे टायर जाळण्याचा केलेला प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिगत ताण तणावामुळे घडल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. या घटनेमागचे कारण विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

पोलीसांच्या प्राथमिक चौकशीनुसार विनायक सोपान ओव्हाळ (वय ४५ वर्षे) या दिव्यांग व्यक्तीने आज दुपारी ४.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या ब्रेझा वाहनाचे टायर जाळण्याचा प्रयत्न केल्याची नोंद झाली आहे. या घटनेमागचे कारण विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही. आरोपीने रमाई आवास घरकुल योजना आणि रसवंती दुकानासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडे अनेकदा अर्ज केले होते. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने आजचे हे कृत्य केले असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.

यापूर्वी याच व्यक्तीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी ध्वजारोहण समारंभाप्रसंगी महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. विनायक ओव्हाळ या व्यक्तीने विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्जही सादर केला आहे. पोलीस या व्यक्तीविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करत आहेत.
0000

पुण्यातील 21 लढती…

पर्वती
आबा बागुल, अपक्ष
आमदार माधुरी मिसाळ,भाजप
अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
पुणे कॅन्टोन्मेंट
रमेश बागवे,काँग्रेस
आमदार सुनील कांबळे,भाजप

कसबा
आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस
हेमंत रासने,भाजप
गणेश भोकरे,मनसे
कमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर,स्वराज्य पक्षातून निवडणूक लढवणार
छत्रपती शिवाजीनगर
आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजप
दत्ता बहिरट, काँग्रेस
काँग्रेस बंडखोर मनीष आनंद अपक्ष

कोथरूड
आमदार चंद्रकांतदादा पाटील,भाजप
चंद्रकांत मोकाटे,उबाठा शिवसेना
किशोर शिंदे,मनसे
खडकवासला
आमदार भीमराव तापकीर, भाजप
सचिन दोडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
मयुरेश वांजळे,मनसे
हडपसर
आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
साईनाथ बाबर, मनसे

जिल्ह्यातील लढती

बारामती

1. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. युगेंद्र पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. अभिजीत बिचुकले, अपक्ष

इंदापूर

1. हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
2. दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. प्रवीण माने, अपक्ष (बंडखोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

भोर वेल्हा मुळशी

1. संग्राम थोपटे, काँग्रेस
2. शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. किरण दगडे पाटील, अपक्ष (बंडखोर भाजप)
4. कुलदीप कोंडे, अपक्ष (शिवसेना बंडखोर)

पुरंदर

1. संजय जगताप, काँग्रेस
2. विजय शिवतारे, शिवसेना
3. संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मैत्रीपूर्ण लढत)

मावळ

1. सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बापूसाहेब भेगडे, अपक्ष (बंडखोर भाजप)

जुन्नर

1. अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. आशा बुचके, अपक्ष (बंडखोर भाजप)
4. शरद सोनवणे, अपक्ष (शिवसेना)

शिरूर हवेली

1. अशोक पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
2. माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

खेड आळंदी

1. दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बाबाजी काळे, शिवसेना उबाठा

आंबेगाव

1. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. देवदत्त निकम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

दौंड

1. राहुल कुल, भाजप
2. रमेशआप्पा थोरात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

पिंपरी

1. अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. सुलक्षणा शीलवंत,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

चिंचवड

1. शंकर जगताप, भाजप
2. राहुल कलाटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

भोसरी

1. महेश लांडगे, भाजप
2. अजित गव्हाणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

नियोजनबद्ध विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवू :आ. माधुरी मिसाळ

पुणे : मेट्रो, स्वारगेट मल्टिमोडल हब, बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेत 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, कोरोना काळात केलेले मदतकार्य, समान पाणीपुरवठा योजना, पु. ल. देशपांडे उद्यानात दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम, आनंददायी शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, पर्वती टेकडीचे सुशोभिकरण, तळजाई वन आराखडा, पूरग्रस्त भागातील सिमाभिंतींचे बांधकाम, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना आणि प्राधान्यक्रमाने 176 कोटी रुपयांच्या आमदार आणि विशेष निधीचा विनियोग या विकासकामांच्या जोरावर मोठा विजय मिळवू असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (ए) आणि महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी गाव, पापळ वस्ती, महेश सोसायटी, लोअर अप्पर इंदिरानगर परिसरात आज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दीपक मिसाळ, करण मिसाळ, मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण, श्रीकांत पुजारी, संतोष नांगरे, अविनाश गायकवाड, सुभाष जगताप, शिवाजी गदादे-पाटील, बाबुराव घाटगे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रशांत दिवेकर, रघुनाथ गौडा, विशाल पवार, प्रीतम नागपुरे, नवनाथ वांजळे, अजय भोकरे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, राजेंद्र बिबवे, नितीन बेलदरे, अरुण वीर, प्रभावती जागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे आमदार म्हणून गतीमान आणि शाश्वत विकास केला. त्यामुळे मतदारांचे प्रेम व विश्वास संपादन केले. म्हणूनच महायुतीने सलग चौथ्यांदा मला उमेदवारी दिली. या मतदारसंघात महायुतीचे संघटन भक्कम असून आम्ही एकसंघ आहोत. या उलट महाआघाडीत बिघाडी झाली असून, त्यांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वेळी विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास वाटतो.

सनी निम्हण यांच्या नेतृत्वास याेग्यप्रकारे वाव मिळवून देण्यासाठी खंबीरपणे मी त्यांच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे -माजी आमदार विनायक ऊर्फ आबा निम्हण यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र सनी निम्हण यांचे सामाजिक कृर्तत्व आहे. सनी निम्हण यांनी देखील विविध उपक्रमातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पुणे शहरात निर्माण केले असून ते प्रगतीच्या दिशेने पुढे अशीच वाटचाल करतील. मी देखील ठरवले आहे की, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे नेतृत्वास याेग्यप्रकारे वाव मिळाला पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
स्व.आबा निम्हण यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प.संजय महाराज पाचपाेर यांचा हरिकीर्तनचा साेहळा संपन्न झाला त्याप्रगंसी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिध्दार्थ शिराेळे उपस्थित हाेते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकांचे याराे के यार असे म्हटले जाणारे आबा निम्हण आपल्यातून गेल्यानंतर ज्याप्रकारे सनी निम्हण यांनी त्यांचे कार्य सांभाळले व ते सर्वांचे मदतीने पुढे नेले ही बाब अतिशयं वाखणण्याजाेगी संताेषजनक बाब आहे. वेगवेगळे आराेग्य शिबीर घेऊन सरकारी मदत देखील लाेकांपर्यंत त्यांनी पाेहचवली. पुणे जिल्हयातील सर्वात माेठे आराेग्य शिबीर कॅम्प त्यांनी नुकताच भरवला. गरीबातील गरीबास आराेग्य तपासणी लाभ मिळावा आणि महागडे ऑपरेशन देखील माेफत करण्याचा प्रयत्न सनी निम्हण यांनी केला. आगामी काळात आपण सर्वजण मिळून आबा निम्हण यांचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करु.
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मी स्वत: देखील ठरवले आहे की सनीच्या पाठीशी उभे राहून त्याच्या नेतृत्वाला याेग्य अश्याप्रकारचा वार मिळाला पाहिजे आणि त्याचे नेतृत्व बहरलं पाहिजे हे देवेंद्रजींचे शब्द माेठा आधार देणारे हाेते.
याप्रसंगी शिवाजीनगर व परिसरातील विविध पक्षातील अनेक मान्यवर, पै-पाहुणे, आप्तेष्ट उपस्थित हाेते. दत्ता बहिरट, मनीष आनंद, किशाेर शिंदे, पृथ्वीराज सुतार, दुर्याेधन भापकर, कमलेश सासकर, अभय सावंत,मुकारी अण्णा अलगुडे, विनाेद ओरसे यांच्यासह अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच आबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, विविध कला, क्रीडा, आराेग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. सर्वांनी आबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

स्वीप :मतदान जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार


सिस्टिमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम, ज्याला स्वीप म्हणून ओळखले जाते, हा भारतातील मतदार शिक्षण, मतदार जागरूकता आणि मतदार साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचा प्रमुख कार्यक्रम आहे. 2009 पासून निवडणूक आयोग भारतातील मतदारांना तयार करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मूलभूत ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी काम करत आहोत.
स्वीपचे प्राथमिक उद्दिष्ट सर्व पात्र नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करून आणि निवडणुकीदरम्यान माहितीपूर्ण निर्णय घेऊन भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण करणे आहे. या कार्यक्रमात राज्याच्या सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि लोकसंख्येच्या प्रोफाइलचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच मागील टप्प्यातील निवडणुकांमधील निवडणूक सहभागाचा इतिहास आणि त्यातून धडा घेण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक सामान्य आणि लक्ष्यित हस्तक्षेपांचा समावेश आहे.मतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टिसिपेशन’ (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे.
स्वीप’च्या माध्यमातून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जनजागृतीसाठी मदत होणार आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा ‘स्वीप’चा मूळ उद्देश आहे. समाजमाध्यमांद्वारे देखील मतदार जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न या माध्यमातून केला जातो.
कसे असते ‘स्वीपचे कार्य

  • मतदान जनजागृतीसाठी पोवाडा सादर करणे , या पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून निवडणुकीत मतदानाचे असलेले महत्त्व अधोरेखित करणे .
  • विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती करणे तसेच पथनाट्य स्पर्धांसह प्रभातफेरी आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे याचा सहभाग असतो
    -स्वीप’च्या कामाचा आवाका पाहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे हा उद्देश आहे . सर्व कार्यालयांनी विशेषतः शाळा, महाविद्यालयांनी यांचा सहभाग करून घेण्यासाठी पुढाकार घेणे आहे. मतदानावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
  • मतदान जनजागृतीसाठी घोषणा तयार करणे , माहितीपर व्हिडीओ तयार करणे
    दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार
    मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छिणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी , भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अँपवर नोंदविणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होनार आहे.
    दिव्यांग नागरिकांसाठी सुविधा
    मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.
    -मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अँपवर आपले नाव कसे नोंदवावे लागणार आहे.
    — नवी मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
    — ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून द्यावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

लेखक : प्रा योगेश अशोक हांडगेपाटील
(लेखक पुणे येथे कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

मधुकर मुसळेंच्या माघारीने शिरोळेंचा मार्ग सुकर

भाजपा नेतृत्वाशी चर्चेनंतर उमेदवारी मागे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर
पुणे, ता. ४ ः शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे मधुकर मुसळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे मुसळे यांनी सोमवारी (ता. ४) उमेदवारी मागे घेतली. मुसळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, असा विश्वास या वेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

मधुकर मुसळे हे भाजपाचे समर्पित कार्यकर्ते असून, त्यांनी स्मार्ट औंध साकारण्यासाठी अथकपणे काम केले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अनेक वर्षे भाजपाच्या मुशीत वाढलेल्या मुसळे यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी नगरसेवकपदापर्यंत मजल मारली होती. तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यात ते नेहमी पुढे असतात. तसेच औंध परिसर स्मार्ट बनविण्यासाठी अनेक कल्पक योजना कागदावरून प्रत्यक्षातआणण्यासाठी त्यांनी हिरिरीने प्रयत्न केले. त्यांच्या उमेदवारीमुळे या परिसरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सोमवारी मुसळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे वातावरण निवळले असून, आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार करणार असल्याचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी स्पष्ट केले.


मधुकर मुसळे हे पक्षाचे जुने-जाणते कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष व शेवटी मी, ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे, त्या संस्कारांचे परिपूर्ण पालन करीत मुसळे यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यासोबतच राज्यात महायुतीची सत्ता यावी, यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद!

  • सिद्धार्थ शिरोळे, भाजपा उमेदवार, शिवाजीनगर मतदारसंघ

शिरोळे यांना विक्रमी मताधिक्यासाठी सर्वसमावेशक रणनीती प्रचारप्रमुख दत्ता खाडे

विकासकामांची माहिती घराघरांत पोहोचविणार
पुणे ः सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा विश्वास संपादन केला असून, यंदाही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. शिरोळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रचाराची सर्वसमावेशक रणनीती आखण्या आली असून, पुढचे पंधरा दिवस मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे भाजपाचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख दत्ता खाडे यांनी सांगितले.
शिरोळे घराण्याचा लोकसेवेचा वारसा, सामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि तरुण, आश्वासक चेहरा ही वैशिष्ट्ये असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षांत परिसरातील नागरिकांशी नाळ जोडली आहे. शिवाजीनगर मतदारसंघात मेट्रोपासून झोपडपट्टी भागातील पायाभूत सुविधांपर्यंत, तसेच मतदारसंघाला डिजिटल बनविण्यापासून केंद्राच्या शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत अनेक प्रकारच्या विकासकामांना गती दिली आहे. त्याद्वारे त्यांनी कार्यक्षम आमदार ही प्रतिमा जनमानसांत ठसविली आहे. त्यामुळे आजघडीला मतदार त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याच्या मानसिकतेत आहेत, असे चित्र निवडणूकपूर्व आढाव्यातून स्पष्ट झाल्याचेही खाडे यांनी सांगितले.
गोखलेनगर हा गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय वस्तीचा भाग, सेनापती बापट रोडवरील उच्चभ्रू लोकवस्ती, शिवाजीनगर गावठाण व परिसरातील पारंपरिक कुटुंब या सगळ्यांच्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांनी या सगळ्या लोकांशी दांडगा संपर्क राखून, लोकसहभागाला प्राधान्य देत त्यांच्या गरजा पूर्ण केल्या आणि समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यातून आश्वासक आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. केवळ भाजपच नव्हे, तर सर्व पक्षांचे नेते-कार्यकर्ते आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्धार्थ यांच्याकडे बघतात, हे त्यांच्या कार्यशैलीचे यश आहे, असेही खाडे म्हणाले.

मतदारसंघात सर्व स्तरांतील मतदारांशी भाजपा आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा उत्तम संपर्क आहे. तो वृद्धिंगत व्हावा आणि शिरोळे यांना विक्रमी मताधिक्य मिळावे, यासाठी सर्वसमावेशक रणनीती आखली आहे. पक्षाच्या अभियानातून विकासकामांची माहिती घराघरांत पोहोचविणार आहोत. त्याचे प्रतिबिंब विक्रमी मताधिक्यात दिसून येईल, याची खात्री आहे.

– दत्ता खाडे, प्रचारप्रमुख – शिवाजीनगर मतदारसंघ, भाजपा

दृष्टिहीन उमेदवाराने पेटविली निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी … का ते घ्या जाणून ..

पुणे-. दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांनी शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. काळेवाडी पोलिसांनी विनायक ओव्हाळ यांना ताब्यात घेतले असून त्यांनी हे कृत्य का केले याचा तपास सुरू आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळ नुकसान झाले आहे. तसेच सध्या विनायक ओव्हाळ यांनी थेट गाडी पेटवण्याचा प्रयत्न का केला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उमेदवारी अर्जावरून दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. पोलिस देखील याबाबत चौकशी करत आहेत.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळाले नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळे संतापलेल्या ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओव्हाळ यांची नाराजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टलाही ओव्हाळ यांनी आयुक्तांची गाडी ही फोडली होती.

यापूर्वी पिंपरी महापालिका आयुक्तांची फोडली होती गाडी
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2024 रोजी देखील विनायक ओव्हाळ यांनी महापालिकेचे ध्वजारोहण सुरू असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. तसेच त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी देखील मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अनेक महिन्यांपासून महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागत होतो, मात्र आयुक्त भेटायला तयार नव्हते. याचाच राग मनात धरून विनायक ओव्हाळ यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली असल्याचे त्यांनी कबूल केले होते.

वडगाव शेरी मतदारसंघातून १६ उमेदवार रिंगणात

पुणे- आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता रिंगणात १६ उमेदवार उरले आहेत .

निवडणूक रिंगणातील उमेदवार असे,
१)हुलगेश मर्याप्पा चलवादी (बसपा)
२)बापूसाहेब तुकाराम पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
३) सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी काँगेस AP)
४)चंद्रकांत परमेश्वर सावंत
५)विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पार्टी)
६)विवेक कृष्णा लोंढे (वंचित)
७)शेषनारायण भानुदास खेडकर
८)सचिन दुर्वा कदम
९)सतीश इंद्रजीत पांडे
१०)संजय लक्ष्मण पडवळ
११)अनिल विठ्ठल धुमाळ
१२) अभिमन्यू शिवाजी गवळी
१३)बापू बबन पठारे
१४)मधुकर मारुती गायकवाड
१५)राजेश मुकेश इंद्रेकर
१६) शशिकांत धोंडीबा राऊत

विवेक फणसाळकर यांच्याकडे DGP पदाचा अतिरिक्त पदभार

मुंबई-निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ते पुढील आदेश येईपर्यंत या पदाचा कारभार पाहतील.

निवडणूक आयोगाने सोमवारी सकाळी काँग्रेस व इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांचा पदभार तत्काळ सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, रश्मी शुक्ला यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती करण्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार 3 अधिकाऱ्यांची नावे मागितली आहेत. ही नावे मुख्य सचिवांना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत द्यावयाची आहेत. सरकार मुख्य सचिव यासंबंधी कोणत्या अधिकाऱ्यांची शिफारस करणार? हे कळले नाही. पण पोलिस महासंचालक पदाच्या शर्यतीत संजय वर्मा (डीजी कायदा व तंत्रज्ञान), रितेश कुमार (डीजी होमगार्ड) व संजीवकुमार सिंघल (डीजी एसीबी) हे 3 अधिकारी असल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही.

विवेक फणसाळकर हे भारतीय पोलिस सेवेच्या 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. फणसाळकर हे पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. ते मुंबई पोलिस दलातील सुमारे 50 हजार पोलिसांचे नेतृ्त्व करतात. त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. तत्पूर्वी, ते ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. त्यांनी जवळपास पावणेदोन वर्षे ठाणे शहर आयुक्तपदाचा कारभार सांभाळला होता. कोरोना महामारीच्या काळात आपले प्राण संकटात टाकून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

विवेक फणसाळकर यांनीही याशिवायही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे. मुंबई पोलिस सहआयुक्त (प्रशासन) या पदाचेही त्यांनी नेतृत्व केले. अकोल्याचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी वर्धा व परभणीचे पोलिस अधीक्षक म्हणूनही काम केले. नाशिकचे उपायुक्त ही त्यांची आयुक्तालयातील पहिली नियुक्ती होती. त्यानंतर त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं ‘राजं संभाजी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला…

संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत व उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित कुलकर्णी यांचे संगीत आहे व गाण्याचे गीतकार हृषिकेश झांबरे आहेत.

हे गाणं आपल्या राष्ट्रवीर आणि हिंदवी स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव साजरा करतो. या गाण्यात उत्तम कलाकारांची तगडी फौज आहे ज्यामध्ये ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील हे महत्वाच्या भूमिकेत आहेत.

चित्रपटाबद्दल निर्माते संदीप रघुनाथ मोहिते-पाटील म्हणतात, “ “छत्रपती संभाजी महाराज हे केवळ इतिहासातील नायक नसून ते आजही प्रेरणादायी आहेत. ‘राजं संभाजी’ हे गाणं त्यांचं धैर्य, त्याग आणि आदर्श जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत महाराजांच्या शौर्यगाथेचा संदेश पोहोचेल.”

चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार शेलार म्हणतात, “‘राजं संभाजी’ हे गाणं चित्रपटाच्या हृदयाशी जोडलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या धैर्यशील व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाला संगीताच्या रूपात साजरं करणं हे आमच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. या गाण्यातून त्यांची वीरता, निष्ठा आणि संघर्ष रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मला खात्री आहे राज संभाजी गाणं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल.”

धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याची गाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘राजा संभाजी’ हे गाणं महानायकाच्या शौर्यला सन्मान देणारे ठरेल.

संदीप रघुनाथ मोहिते पाटील प्रस्तुत व उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर संभाजी महाराज’ चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे. येत्या २२ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिलांचे मोठे योगदान: अभिनेते राहुल सोलापूरकर

विधायक पुणे आणि सैनिक मित्र परिवारतर्फे बेपत्ता व शहीद सैनिकांच्या २५ वीरपत्नींची भाऊबीज
पुणे : शत्रूशी दोन हात करीत देशासाठी प्राणांची आहुती देणा-या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या घटना आपल्या प्रत्येकाला माहित आहेत, असे नाही. भारतीय स्त्रीयांच्या शौर्याबाबत अनेक ब्रिटीश अधिका-यांनी देखील लिहून ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून,देश कार्यात, महिलांचे मोठे योगदान असून आज भारतीय सैनीकांच्या वीरपत्नी घर सांभाळण्याची दुसरी मोठी लढाई करीत आहेत, असे मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.

विधायक पुणे, सैनिक मित्र परिवार, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन, विश्वलीला फाऊंडेशन, सेवा मित्र मंडळ, स्नेहमंच , राष्ट्रीय कला अकादमी, तर्फे देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या आणि सीमेवरुन बेपत्ता झालेल्या २५ सैनिकांच्या वीरपत्नींची भाऊबीज सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती मंदिराजवळ असलेल्या नारद मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, विष्णू ठाकूर, अभिजीत म्हसकर, संजय बालगुडे, उमेश देशमुख, शेखर कोरडे,आनंद सराफ, रेखा देशपांडे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा २५ वे वर्ष होते. वयोवृद्ध व आजारी भगिनींना घरपोच भाऊबीज देण्यात आली.

वीरपत्नी दिपाली मोरे म्हणाल्या, देशासाठी प्रत्येक सैनिक लढत असतो. आपल्या कुटुंबाला सोडून सीमेवर अहोरात्र पहारा देत असतो. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवाळीमध्ये आपण एक पणती लावावी. सैनिक मित्र परिवार सारख्या संस्था आम्हाला दिवाळीसारख्या सणात सहभागी करुन घेतात, याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ॠणी आहोत.

आनंद सराफ म्हणाले, वानवडी येथे वीरस्मृती नावाची इमारत आहे. सन १९६२ साली चीन युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांसाठी ही इमारत उभारण्यात आली. तेथील वीरपत्नी तसेच इतरही युद्ध व चकमकींमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींसोबत आम्ही दरवर्षी भाऊबीज साजरी करतो. वेगवेगळे सणवार त्यांच्यासोबत साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.

….श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे वंशज पुष्कर सिंह पेशवा यांच्या उपस्थितीत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधी ठिकाणी यंदाचा दीपोत्सव

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या
समाधीचे जीर्णोद्धार कार्य प्रगतीपथावर

पुणे-पाञ्चजन्य फाउंडेशन ही संस्था गेल्या काही वर्षांपासून इतर सामाजिक उपक्रमांसोबत पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रातील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधीच्या जीर्णोद्धाराचे कार्य करीत आहे.या समाधी जीर्णोद्धार कार्या विषयी पुणेकरांमध्ये जागृकता निर्माण व्हावी व सर्वांचे सहकार्याने हे कार्य पुढे यशस्वी व्हावे यासाठी फाउंडेशनतर्फे दिवाळीत समाधी परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीचा दीपोत्सव पेशव्यांचे विद्यमान वंशज पुष्करसिंह पेशवा यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.पुष्कर सिंह पेशवा म्हणाले जितक्या लवकर या समाधीचा जीर्णोद्धार होईल तितके चांगले.समीर कुलकर्णी म्हणाले त्यांचे फाऊंडेशन,मनपा मधील अधिकारी,नदी काठ सुधार प्रकल्पातील अधिकारी,खासदार मेधा कुलकर्णी आणि रचनाकार ह्यांची एकत्रित बैठक होईल व कृती आराखडा तयार केला जाईल.यावेtळी पाञ्चजन्य फाउंडेशनचे विश्वस्त सिद्धार्थ राजे,समीर कुलकर्णी, राजस जोशी,चंद्रभूषण जोशी व रश्मिन कुलकर्णी यांनी उपस्थित असणाऱ्या पुणेकरांना समाधीच्या जीर्णोद्धार कार्यात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याकडून चंद्रकांतदादा पाटील यांचे कौतुक

चंद्रकांतदादांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!

पुणे-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाचे भरभरुन करत, कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला असल्याचे गौरवोग्दार काढले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी चंद्रकांतदादांनी आपल्या गत पाच वर्षाच्या कार्याचा कार्य अहवाल डॉ. माशेलकर यांच्याकडे सादर केला, तो त्यांनी सविस्तर पाहिला. पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी आणि उपक्रम पाहून डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांत दादांचे मनापासून कौतुक केले. यावेळी चंद्रकांतदादांच्या कोथरुड मधील आरोग्य विषयक योजनांची डॉक्टरांनी आवर्जून माहिती घेतली.

कोथरुड ही राज्याची संस्कृतिक राजधानी आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची एक वेगळीच ओळख आहे. खरंतर एखादा व्यक्ती विशेष करुन राजकीय व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्याच्या स्वभावातही फरक पडतो. विनयशिलता, नम्रपणा कमी होतो. पण चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्यालातील विनयशीलता, नम्रपणा आणि समाजाप्रती समर्पित होऊन काम करण्याचा गुण सोडलेला नाही. गेल्या पाच वर्षात चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून कोथरुडकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या रुपाने कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या गुरु पौर्णिमेनिमित्तच्या गुरुपूजन उपक्रमाचेही भरभरुन कौतुक केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित होते.