Home Blog Page 609

नागपूरच्या दंगेखोराच्या घरावर बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार?

मुंबई, दि. २४ मार्च २५
हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? असा प्रश्न संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल कामरा प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध केला व पुढे म्हणाले की, कुणाल कामरांचा कार्यक्रम ज्या स्टुडिओत झाला तो त्यांचा नाही, या ठिकाणी विविध सांस्कृतीक कार्यक्रम होत असतात, सर्व प्रकारच्या विचारांचे लोक येथे कार्यक्रम करतात. भाजपा नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या सत्काराचा कार्यक्रमही येथेच झाला. हा स्टुडिओ एका स्वातंत्र्य सैनिकाचा आहे, देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्न केले नाही, स्वातंत्र्यानंतर त्यांनी लग्न केले. हा स्टुडिओ नफेखोरी न करता उपलब्ध करुन दिला जातो. अनेक कलाकारांनी या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे, त्या सांस्कृतीक केंद्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला तसेच एका स्वातंत्र्य सैनिकाच्या संपत्तीवरचा हा हल्ला आहे. हा प्रश्न केवळ अभिव्यक्तीचा नाही तर लोकांनी कसे जगावे याचाही आहे. या तोडफोडीत स्टुडिओचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे ते सरकारने भरून द्यावे. हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली हे अतिशय गंभीर आहे.

नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तशीच वसुली एकानाथ शिंदे व त्यांच्या दंगेखोरांकडून सरकार वसूल करणार का, याचे उत्तर द्यावे. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला उरले आता ७ दिवस;अभय योजनेतून १० हजारांवर ग्राहक थकबाकीमुक्त

पुणे, दि. २४ मार्च २०२५: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजनेला आता केवळ सात दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला या योजनेची मुदत संपत आहे. पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या १० हजार ३०६ ग्राहकांनी २७ कोटी ६४ लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळवली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह नवीन वीजजोडणीची गरज असो किंवा नसो, जागेवरील वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या दि. ३१ मार्चपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.

       पुणे परिमंडलामध्ये अभय योजनेसाठी ११ हजार ९९७ वीजग्राहकांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातील ९ हजार ४६४ ग्राहकांनी २३ कोटी ३८ लाखांचा एकरकमी भरणा केला आहे तर ८४१ ग्राहकांनी हप्त्यांमधील ४ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यातील ४ हजार २२७ ग्राहकांकडे वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून २ हजार ५१३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे तर ५ हजार २५७ ग्राहकांनी विजेची गरज नसतानाही या योजनेतून थकबाकीमुक्तीला प्राधान्य दिले आहे. 

या योजनेत दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सहभागी होता येईल व योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होत असून ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीचा भरणा करावा लागत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे परिमंडलामध्ये २५ हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित

पुणे, दि. २४ मार्च २०२५: वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलामध्ये गेल्या २४ दिवसांत २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. स्वतः मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी अधीक्षक अभियंते युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले (प्र.) यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत.

पुणे शहरात एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे ४० कोटी ९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये १० हजार १७७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर पिंपरी चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १८ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ७९६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे २९ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील ७ हजार ४६१ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला.

वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in  वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पुण्यात बुधवारी होणार विश्वविक्रम 

अभिनेत्री, गायिका पुष्पा चौधरी करणार विश्वविक्रम : सलग चार तासाहून अधिक वेळ सादर करणार लावणी गीते ; स्वामिनी म्युझिक डान्स अँड अ‍ॅक्टींग अकॅडमी यांच्यातर्फे आयोजन

पुणे : लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अभिनेत्री गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा प्रदीप चौधरी अनोखा विश्वविक्रम करणार आहेत. सलग ५१ लावणी गीतांचे सादरीकरण करून ‘वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया’ आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ मध्ये विक्रम नोंदविण्यासाठी त्या सज्ज आहेत. विश्वविक्रमाचा हा सोहळा बुधवार, दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती पुष्पा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला रत्ना दहीवेलकर, अनिरुद्ध हळंदे उपस्थित होते. स्वामिनी म्युझिक, डान्स अँड अ‍ॅक्टींग अकॅडमी वारजे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मराठी लावणी ला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पुष्पा चौधरी यांनी या विश्वविक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ कलाकार लीला गांधी, सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर, श्वेता शिंदे, माधुरी पवार, प्राजक्ता गायकवाड, प्रतीक्षा जाधव, आरती शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप कोथमीरे तसेच कला व सामाजिक क्षेत्रातील मंडळी याशिवाय वॅलेंटिना ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे विश्वस्त देखील उपस्थित राहणार आहेत.  

पुष्पा चौधरी म्हणाल्या, मराठी लावणी कला व संगीत जगभर पोहोचावे यासाठी मी माझ्या आवाजाच्या माध्यमातून विविध ५१ लावण्यांचे बोल व गाणी न थांबता सलग सादर करणार आहे. जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्यासाठी मराठी लावण्या गाण्याचा मानस आहे. यासाठी आवश्यक वेळ चार तासांपेक्षा जास्त असणार आहे. तरी पुणेकरांनी या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यास उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जया बच्चन म्हणाल्या, माध्यमांपासून कलाकारांपर्यंत सर्वांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथे धोक्यात

म्हणाल्या, एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान नाही काय ?

मुंबई- स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या बद्दल आता प्रख्यात अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही या विषयावर उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यांनी कुणालला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही त्यांचे मत व्यक्त केले आहे.
कुणाल कामराने त्यांच्या एका शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही वेगळ्या ढंगात कविता सादर केली होती,
त्यानंतर हॅबिटॅट कॉमेडी क्लबवर त्यांच्या लाईव्ह शो दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला केला. आणि तोडफोड करण्यात आली. आता या प्रकरणात केलेल्या कारवाईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जया बच्चन यांनी या मुद्द्यावर संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘जर बोलण्यावर बंदी असेल तर तुमचे काय होईल?’ तुमची तशीही परिस्थिती वाईट आहे. तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त काही विशिष्ट विषयांवर बोलण्यास सांगितले जाईल आणि काही प्रश्न विचारू नयेत असे सांगितले जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे आहे?जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘ कारवाईची स्वतंत्रता केवळ तेव्हाच असते जेव्हा मोठा गोंधळ निर्माण होतो. – विरोधकांना मारहाण करणे, महिलांविरुद्ध गुन्हे करणे, लोकांना मारणे – अशाच कृती करण्याचे जणू इथे स्वातंत्र्य असते.’ एकनाथ शिंदेंचा अवमान केला म्हणून कमरा वर कारवाई झाली असे विचारता त्या म्हणाल्या , एकनाथ शिंदेंनी फक्त सत्तेसाठी शिवसेना फोडली, चोरली हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?

प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणात पकडला

मुंबई- मोतेवारची गाडी घेऊन फिरणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या, तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रशांत कोरटकर हा दुबईत पळून गेल्याची चर्चा होती. पण पोलिसांनी तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळल्याची मोठी बातमी सूत्रांनी दिली आहे. प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो फरार होता. त्याने इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉल रेकॉर्डिंगमधील आवाज आपल्या नसल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे तो माध्यमांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचं सांगत होता. यानंतर त्याने कोर्टातही धाव घेतली होती.

प्रशांत कोरटकरला सुरुवातीला कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्याला दोनवेळा अटकेपासून संरक्षण मिळालं. कोल्हापूर पोलिसांनी कोर्टात सातत्याने कोरटकरच्या अटकेची मागणी केली होती. कोरटकरने आपला मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केला होता. पण मोबाईलमध्ये संपूर्ण डेटा डिलीट करुन त्याने पोलिसांकडे मोबाईल सुपूर्द केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता. पण तोपर्यंत उशिर झाला होता. प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता. कोल्हापूर पोलिसांकडून त्याचा युद्ध पातळीवर शोध सुरु होता. पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

इंद्रजित सावंत यांची कोर्टात बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशांत कोरटकरला खूप आधीच अटक होण्याची आवश्यकता होती. त्याला अटक न केल्यामुळे सरकारबद्दल आणि पोलिसांबद्दल व्यापक गैरसमज पसरला होता. सरकार त्याला लपवून ठेवत आहे का? अशी शंका उपस्थित केली जात होती. त्याच्या जामीन अर्जाला सातत्याने विरोध केल्यानंतर आज त्याला अटक झाली आहे. आनंदाची गोष्ट आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली.”प्रशांत कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असेल तर त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. कोल्हापूर पोलीस त्याला न्यायालयात हजर करतील. त्यानंतर कोल्हापूरच्या न्यायालयात सर्व कार्यवाही होईल. प्रशांत कोरटकरला जामीनासाठी फ्रेश अर्ज करावा लागेल. त्याचा परत जामीन अर्ज रिजेक्ट झाला तर त्याचा मुक्काम काही दिवस कारागृहात राहील”, अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली.

चोरी करणारे गद्दारच असतात:स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सत्यच बोलला, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

राज्य गद्दारांच्या आदर्शावर चाललंय का? तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करा
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची जोरदार पाठराखण करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली. कुणाल कामरा हा सत्यच बोलला. त्याने जनभावना मांडली. जे चोरी करतात ते गद्दारच असतात, असे ते म्हणालेत.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रकरणी कुणाल कामराच्या मुंबईतील खार येथील एका हॉटेलातील स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्याची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी स्पष्ट करू इच्छितो की, काल कॉमेडी शोच्या सेटची जी तोडफोड करण्यात आली, ती शिवसैनिकांकडून करण्यात आली नाही. त्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. ती तोडफोड गद्दारांनी (शिंदे गट) केली आहे. आपले राज्य सध्या शिवरायांच्या आदर्शावर चाललंय की, गद्दारांच्या आदर्शावर चालले आहे?

जे भेकड लोक आहेत, ते त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला म्हणून तोडफोड करत आहेत. पण या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला तेव्हाही या लोकांनी त्याचा निषेध केला नाही.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक टीकेनंतर ज्या लोकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटचे नुकसान केले, त्या लोकांकडून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की, न्याय हा सर्वांना सारखाच असला पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. तशीच नुकसान भरपाई काल कॉमेडी शोच्या सेटच्या तोडफोड प्रकरणात मि्ळाली पाहिजे.

ज्या गद्दार भेकड लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान चालतो, पण आपल्या गद्दार नेत्याचा अपमान चालत नाही, अशा तोडफोड करणाऱ्या लोकांकडून दामदुपटीने नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही चालत नाही हे दाखवण्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्याकडून हा सर्व प्रकार केला जात आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

दुसरीकडे, ठाकरे गटाच्या सोशल मीडिया पेजवरूनही या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंवर टीका केली म्हणून स्टुडिओ फोडणारे कावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह बोलले गेले, तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का? यांचे हिंदुत्व केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्यांपुरते मर्यादित आहे का?” असा सवाल ठाकरे गटाने यासंबंधी उपस्थित केला आहे.

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या जानेवारी २०२५ बॅचसाठी प्रवेश लवकरच बंद होत आहेत… त्वरा करा !!!

पुणे, २४ मार्च २०२५ – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एस सी डी एल), जानेवारी २०२५ बॅचसाठी प्रवेश जवळपास बंद होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२५ आहे. २५ वर्षांहून अधिक काळ, एस सी डी एल हे व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि लवचिक शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी राहिले आहे. ४०+ उद्योग-समर्पित अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी असलेली ही संस्था, विविध क्षेत्रांतील करिअरच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. भारताच्या प्रमुख डिस्टन्स लर्निंग संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस सी डी एल चे ८००,००० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आहेत तसेच व्यावसायिकांचे प्रबळ नेटवर्क आहे. एस सी डी एल येथील शिक्षण उदयॊग मानकांशी सुसंगत राहण्यासाठी बनवले गेले आहे, त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये या शिक्षणासाठी विस्तृत मान्यता आहे.

व्यवसायाभिमुख शिक्षण, तुमच्या व्यावसायिक जीवनात यश प्राप्त करण्यासाठी –

एस सी डी एल उद्योगाच्या मागण्या लक्षात ठेवून विस्तृत श्रेणी सह ४०+ व्यापक शिक्षण प्रदान करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक कौशल्य मिळते.

काही प्रमुख कार्यक्रम :

पी जी डिप्लोमा
बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एक्सिक्युटिव्ह पीजीडीएम स्पेशलायझेशन्स)
ह्युमन रिसोअर्स मॅनेजमेंट
डेटा सायन्स आणि ऑनालिटिक्स
बँकिंग आणि फायनन्स
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट

पी जी सर्टिफिकेट (विशेष कौशल्यासाठी शॉर्ट-टर्म कोर्सेस)

  • डिजिटल मार्केटिंग
  • प्रोजेक्ट मॅनेजमेंट

•बिझनेस ऑनालिटिक्स

कॉर्पोरेट आणि उद्योग-आधारित शिक्षण –

  • एस सी डी एल हे आयबीएम, विप्रो, आणि इन्फोसिस सारख्या प्रमुख संस्थांसोबत सहकार्य करते आणि व्यावसायिकांसाठी अनुकूलित शिक्षण विकसित करते. हे कार्यक्रम आयटी, बँकिंग, हेल्थकेअर, आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून ते झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणात स्पर्धात्मक राहू शकतात.

कधीही, कुठेही शिका – अत्याधुनिक डिजिटल शिक्षण

  • एस सी डी एल विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण प्रदान करते, जे मोबाइल-अनुकूल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
  • विद्यार्थ्यांना संवादात्मक कोर्स सामग्री, सुसज्ज लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) द्वारे प्रवेश मिळवता येतो
  • लाइव्ह आणि रेकॉर्ड केलेले लेक्चर्स मोबाइलवर
  • AI-आधारित प्रॉक्टर्ड परीक्षा आणि व्हर्च्युअल क्लासरूम्स
  • फॅकल्टी, सहली व उद्योग तज्ञांशी नेटवर्किंग

एस सी डी एल का निवडावे ?

  • आउटलुक – प्रथम क्रमांक असणारी डिस्टन्स लर्निंग संस्था
  • 800,000+ जागतिक विद्यार्थ्यांचे नेटवर्क
  • परवडणाऱ्या फीमध्ये विस्तृत तज्ञ कोर्सेस
  • पदवीधारक किंवा कामकाजी व्यावसायिकांसाठी 25% सरासरी पगार वाढ
  • एस सी डी एलला चा सर्व उद्योगांमध्ये उच्च मान्यता

•शिक्षणा करीत भारतासह यूएई, संयुक्त राष्ट्र, केनिया इत्यादी विविध देशांतील विद्यार्थी

सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, २४ मार्च २५ – सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे (SSPU) ने ॲलेन युनिव्हर्सिटी, जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शना करीता चर्चा सत्राचे आयोजन केले होते. आज ॲलेन युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली.

ॲलेन युनिव्हर्सिटीतील, मिरियम कोल्मर-ट्रायनी (एमए), आंतरराष्ट्रीय संबंध आणि संशोधन विपणन तज्ञ, आणि प्रा. डॉ. अंजा डायकमन यांनी शिष्यवृत्तींबद्दल मौल्यवान माहिती दिली. या वेळी मेजर सोनाली कदम (निवृत्त) आणि राघवन संथानम, संचालक – स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे देखील उपस्थित होते.

या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ॲलेन युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगामुळे जागतिक संधी आणि शैक्षणिक प्राविण्य मिळवण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.

चंद्रकंस, कौशिकरंजनी, रागेश्री कंस, पुराना चंद्रकंस, मधुकंस आणि मधुरकंस रागांचे मनोहारी सादरीकरण

स्वरावर्तन आयोजित ‌‘कंस‌’ प्रकार मैफलीत आरती ठाकूर-कुंडलकर यांचे सुश्राव्य गायन

पुणे : भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत अनेकविध रागरागिण्यांनी समृद्ध आहे. यातील ‌‘कंस‌’ या प्रकारातील विविध रागांचे मनोहारी दर्शन आज रसिकांना घडले. किराणा घराण्यातील ज्येष्ठ गुरू लीलाताई घारपुरे आणि जगविख्यात शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांनी गुरूंच्या सान्निध्यात ग्रहण केलेल्या सांगीतिक वारश्यातील ज्ञान पुढील पिढीपर्यंत प्रवाहित रहावे या हेतूने या मैफलीची मांडणी केली होती.

आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या शिष्य परिवाराच्या पुढाकारातून स्वरावर्तन फाऊंडेशनतर्फे या राग संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफल न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात आयोजित करण्यात आली होती. डॉ. दिलीप देवधर यांची विशेष उपस्थिती होती.

कुंडलकर यांनी मैफलीची सुरुवात चंद्रकंस रागातील ‌‘अब कल नाही मनवा‌’ या विलंबित एकतालातील बंदिशीने केली. या नंतर तीन तालातील ‌‘मूरत मन भाए मोहन की‌’ ही बंदिश सादर करून त्याला जोडून कौशिकरंजनीतील आडा चौतालातील सुयोग कुंडलकर रचित ‌‘मोरी आली मोहे अब नाही चैन‌’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. रागेश्री कंस सादर करताना रूपक तालातील ‌‘नाद भेद अपार कोहून‌’ आणि ‌‘ए सूर साधे षड्ज गंधार‌’ ही बाळासाहेब पुंछवाले यांची बंदिश सादर करून आरती ठाकूर-कुंडलकर यांनी रसिकांना मोहित केले.

ओडव बागेश्री म्हणजेच राग पुराना चंद्रकंस मांडताना त्यांनी ‌‘लगन तोसे लागी बनवारी‌’ ही अध्धा तीन तालातील बंदिश तयारीने सादर केली. डॉ. प्रभा अत्रे यांची राग मधुकंसमधील ‌‘माने ना माने ना कान्हा मोरी बतिया‌’ या बंदिशीची रसिकांना झलक ऐकविली. मैफलीची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक अभ्यासातून निर्माण झालेल्या मधुरकंस रागाने केली. या रागातील ‌‘पार करो मोरी नैय्या‌’ ही गुरूंनी रचलेली बंदिश ऐकविताना आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनातून गुरुस्वरांची अनुभूती आली.

गुरूंकडून प्राप्त झालेले शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ज्ञान आरती ठाकूर-कुंडलकर यांनी संगीत अभ्यासक, विद्यार्थी, रसिक यांच्यासमोर सादर करताना त्यांची गुरूंप्रति असलेली श्रद्धा, प्रेमभाव, तल्लीनता, एकरूपता आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या ओढीतून बहरत गेलेले गायन रसिकांच्या मनात अवितरपणे गुंजत राहिले. आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर यांच्या शिष्यांनी आयोजित केलेल्या या मैफलीत गुरू आणि शिष्यांमधील भावनिक अनुबंधाचे अनोखे दर्शन रसिकांना घडले. आरती ठाकूर-कुंडलकर यांना संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), मीनलता जोशी-देशपांडे, कस्तुरी कुलकर्णी (तानपुरा) यांनी सुरेल-समर्पक साथ केली.

डॉ. दिलीप देवधर, आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर यांच्या हस्ते सुरुवातीस दीप प्रज्वलन झाले. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी दहा वर्षांपासून स्वरावर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर सजगपणे कार्यरत आहेत. फाऊंडेशनच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या माहितीपटाचे अनावरण या प्रसंगी डॉ. दिलीप देवधर यांच्या हस्ते झाले. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसह अनेक मान्यवर मैफलीस आवर्जून उपस्थित होते.

मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच राहील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनालगतची सुमारे अडीच एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच राहील. यासंदर्भात लवकरच निर्णय करून ही जागा स्मारक उभे करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस काल पुणे दौऱ्यावर आले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या शिष्टमंडळाचे त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी स्मारक उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली असून, स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाल्याची भावना शिष्टमंडळातील सर्वच प्रतिनिधींनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल डंबाळे,ॲड. अविनाश साळवे, परशुराम वाडेकर, ॲड. जयदेव गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, रोहिदास गायकवाड, ॲड. अरविंद तायडे, युवराज बनसोडे, शैलेंद्र मोरे व अतुल साळवे यांचा समावेश होता.

मंगळवार पेठेतील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा खाजगी विकसकाला देण्याचा घाट घातला आहे. मात्र, या जागेवर शासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना व कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे.

मुरलीधर मोहोळ यांनीही बाबासाहेबांचे चांगले स्मारक उभारण्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांचे स्मारक व्हावे, ही भावना पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेची आहे. यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी सांगितले.

सुषमा अंधारेंनी गायले..ठाणे कि रिक्षा…:म्हणाल्या – आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे तोडफोड कधी?

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चिमटा काढत त्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आपटे, सोलापूरकर व कोरटकर यांच्याकडे केव्हा तोडफोड करायची असा सवाल केला आहे.

सुषमा अंधारे कुणाल कामराचे विडंबनात्मक गाणे गात म्हणाल्या,


ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा हाय ! एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी , आंखों ओआ चश्मा हाय। मंत्री नही है वो दल बदलू हैं और कहा क्या जाए, जिस थाली में खाये उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए। तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा हाय !

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, चिडचिड होत आहे? बापरे… प्रचंड चिडचिड होत आहे, तोडफोड होत आहे. पण साधा प्रश्न आहे माझा… जेव्हा भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती? आपटेंमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही? राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगण्यास सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा ते ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होते ते तुम्ही का फोडायला गेला नाही.प्रशांत कोरटकरने चक्क शिवाजी महाराजांच्या जैविक वडिलांपर्यंत पोहोचण्याची भाषा केली. त्यावेळी प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत? एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहन केल्या. आता एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल, तर तुम्हाला एवढ्या मिर्च्या का लागल्या? येस वुई सपोर्ट कुणाल कामरा, असे सुषमा अंधारे सत्ताधारी शिवसेनेवर टीका करताना म्हणाल्या.

विरोधी बाकांकडे कटाक्ष टाकत,CM म्हणाले, कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय ? असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो

छात्या बडवू नका -धडा शिकविणारच ; कॉमेडियन कामरा वरून सभा तहकूब अन CM आक्रमक

मुंबई- देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा सांगतो, आम्हाला स्टँडअप कॉमेडी आवडते. आम्ही ती पाहतो. त्याला दाद देणारे लोकं आहोत. पण त्याच्या नावाखाली मध्यंतरीच्या कालावधीत रणवीर अलाहाबादियाने ज्या प्रकारचे स्टेंटमेंट दिले, त्या असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. हे लोक आई-वडिलांसंदर्भात घाणेरडे स्टेटमेंट देतील आणि कुठल्यातरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तसल्या गोष्टी चालवतील हे चालणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण शांत बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही. म्हणून यासंदर्भात जी काही कडक कारवाई करता येईल, ती केली जाईल. त्यात कुठल्याही परिस्थिती कुणीही कितीही दबाव आणला तरी संबंधितांना सोडले जाणार नाही.

आता जे काही लेफ्ट लिबरल विचार तयार झालेत. याला अर्बन नक्षलवादीही म्हणता येईल. त्यांचा उद्देश एकच आहे. समाजातील मानकांना अपमानित करणे, देशातील संस्थांना अपमानित करणे, देशांच्या संस्थात्मक संरचनेवरून लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशी विधाने करणे अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही. त्यामुळे यासंदर्भात कठोरातील कठोर कारवाई केली जाईल अशी मी ग्वाही सभागृहाला देतो, असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे कुणाल कामरा यांनी हे अपमानास्पद शब्द वापरले ते सहन केले जाणार नाहीत. त्यांनी माझ्यावर शिंदेंवर सर्वांवर टीका करावी. व्यंग करावे. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपाऱ्या घेऊन कुणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचे काहीही कारण नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, अभिव्यक्तीवर घाला घालण्यात येत असल्याच्या छात्या बडवू नका. या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. काहीही झाले तरी अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. ही मंडळी महाराष्ट्राचे मानसिक आरोग्य खराब करण्याचे काम ही मंडळी करत आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचे माझे राजकीय मतभेद असू शकतात, पण राज्यातील एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदरभाव आहे, त्या नेत्याविषयी कुणीतरी इतक्या खालच्या दर्जाचे काहीतरी बोलतो व आमच्या समोरील बाकावरील काही जण हे तत्काळ त्याचे समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचे ट्विट येते, दुसऱ्याची क्लिप येते, तिसऱ्याची क्लिप येते. त्यामुळे हे कामराशी ठरवून चालले आहे की? कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येथे आली आहे.

राहुल गांधी लाल रंगाचे एक छोटेसे संविधान घेऊन फिरतात. ते संविधान हातात घेऊन कामराने एक फोटो ट्विट केला आहे. त्यांनी ते संविधान वाचले असते तर त्यांनी असा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, अमर्यादित आहे. तथापि, त्याची मर्यादा काय आहे? तुम्ही ज्याक्षणी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता, त्या क्षणी तुमचे स्वातंत्र्य मर्यादित होते. ही मर्यादा ठरलेली आहे. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कुणाल कामरावर झालेल्या वादावर निवेदन केले. ते म्हणाले, सभागृहात उपस्थित झालेला विषय अतिशय गंभीर आहे. आपण कुणीही अशा प्रकारच्या विचाराचे नाही की कुणी आपले मत अभिव्यक्त करू नये. किंबहुना हास्य असेल किंवा व्यंग असेल, त्याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. एखादे राजकीय व्यंग झाले तरी, त्या व्यंगातून आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे लोक आपण आहोत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही. खरे म्हणजे, हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्याचा इतिहास पाहिला तर देशातल्या उच्चपदस्थ लोकांसंदर्भात मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो अथवा न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचे बोलणे, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा पद्धतीने बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे.

मुळात या व्यक्तीला एकप्रकारे वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की, 2024 च्या निवडणुकीने जनतेनेच ठरवून दिले की, कोण खुद्दार व कोण गद्दार आहे. हा कामरा महाराष्ट्रातील जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने हिंदूहृदयसम्राट यांच्या विचारांचा वारसा कुणाकडे आहे हे दाखवून दिले आहे. तो वारसा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दिला. त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन कुणी काम करत असेल तर सहन केले जाणार नाही.

चुकीच्या मोजणीने २ सोसायट्या संकटात:खासगी मिळकतदारासाठी कारस्थान केल्याचा आरोप 

इमारती पाडल्या जाण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा बंद होण्याचा धोका

पुणे :भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या मोजणीने सोसायटीची ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्याने  बालेवाडीतील २ सोसायट्या संकटात सापडल्या आहेत.भविष्यात या इमारती पाडल्या जाण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा बंद होण्याचा धोका निर्माण झाला असून या संशयास्पद कृतीविरुद्ध संबंधित भू-कर मापक कर्मचाऱ्यावर कारवाई करावी,अशी लेखी तक्रार आणि  मागणी  सोसायटी पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे. बालेवाडी येथील  अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी ही तक्रार नोंदवली आहे.खासगी मिळकतदारासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २४  मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत दोन्ही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.अमित इम्राल्ड पार्क चे अध्यक्ष डॉ. विजय भिलवाडे,सेलिब्रेशन सोसायटीचे सचिव  संतोष छाजेड, राजाराम ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी,फ्लॅट धारक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

बालेवाडी येथे स. नं ३१/१ मध्ये अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटी आहे. इमारती चे नकाशे २००७ आणि २०१० ला महापालिकेकडून मान्य झाले व त्यानंतर बांधकाम होऊन लोकांनी ह्या इमारती मधे सरकारी स्टैम्प ड्यूटी भरून फ्लॅट विकत घेतले व त्याला महापालिकेने भोगवटा पत्र सुद्धा दिले आहे.  त्यासाठी आवश्यक त्या सरकारी मोजण्या २००५ आणि २०१० झालेल्या आहेत ,पुणे महापालिकेच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहेत आणि ह्या सर्व इमारती अधिकृत आणि कायदेशीर आहेत. अमित एमराल्ड पार्क चा रस्ता महापालिकेने एफ एस आय स्वरूपात मोबदला देऊन ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ह्या दोन्ही सोसायटी ने हायकोर्टात महापालिकेच्या विरोधात रस्ता दुरुस्त करून द्यावा असा दावा सुद्धा दाखल केलेला आहे आणि आज भूमीअभिलेख ने रस्ता गायब करून दुसऱ्यालाच देऊन टाकला आहे.

दिनांक ०३-०२-२०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाचे  हद्दीच्या खुणा दाखविणा बद्दल पत्र सेलिब्रेशन  आणि अमित इमराल्ड सोसायटीला मिळाले व भूमी अभिलेख चे भूकरमापक व्ही व्ही कोकरे यांनी दोन्ही सोसायटी च्या लोकांना विश्वासात न घेता जागेवर येऊन परस्पर हद्दी दाखवल्या व हा रस्ता दुसऱ्याच्या मिळकती मधे दाखवला व सोसायटीच्या हरकती न नोंदवता व्ही व्ही कोकरे निघून गेले. त्यानंतरसोसायटीनी  त्वरित ४ तारखेला हरकत दाखल केल्या. हद्द दाखविण्यासाठी आलेले भुकरमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी हद्दींची नोंद चुकीच्या पद्धतीने केली आणि सोसायटी चा रस्ता म्हणजे स. नं ३१/१ मधील भाग शेजारच्या खासगी  मिळकतीत म्हणजे स. न. २९ मधे दाखविला गेला .त्यामुळे तेवढी जागा आणि रस्ता कागदोपत्री महापालिकेचा भाग राहिलेला नाही व ती मिळकत खासगी झाली आहे. भविष्यात संबंधित मिळकतीचे मालक ती जागा ताब्यात घेऊन अमित एमराल्ड सोसायटीच्या इमारती पाडण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा असलेला रस्ता बंद करू शकतात. त्यामुळे दोन्ही सोसायटयांनी सावध होऊन या मोजणीला आणि चुकीच्या हद्दीला हरकत घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.चुकीची नोंद दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

भू -करमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी दाखविलेल्या हद्दी चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीने केल्या असल्यामुळे सदर चुकीचे नकाशा ची प्रत कोणालाही देऊ नये, वरिष्ठांनी  स्वतः खातरजमा केल्या शिवाय मोजणी प्रक्रिया निकाली काढू नये,सदर नकाशे  संपूर्ण रेकोर्ड सहित म्हणजेच गुगल नकाशे, जुन्या मोजणी, टिपण, फाळणी वर्गरे पुन्हा तपासून त्याची वरिष्ठांनी  स्वतः खातरजमा करून जागेवर पुन्हा हद्दी दाखविण्यात याव्यात,अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.भुकरमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी सदर प्रकरणात भ्रष्टाचार करून हद्दी दाखविल्या असल्यामुळे भु-करमापक व्ही. व्ही. कोकरे यांची चौकशी करावी आणि सदर प्रकरण त्यांच्याकडून काढून इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या नावे वर्ग करणेत यावे  व नव्याने त्याच्या हद्दी दाखवाव्यात असेही या तक्रारीत म्हटले आहे.
जमाबंदी आयुक्तांनी ह्या गैरप्रकारात स्वतः लक्ष घालावे आणि त्याच बरोबर हा रस्ता महापालिकेने २००८ सालीच ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जागेवर येऊन पाहणी करून ह्या बाबतीत निर्णय घ्यावा आणि हा रस्ता दुसऱ्यांच्या घशात घालू नये अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत  केली आहे..

तर माझ्यावर,आमदारांवर,आणि शिंदेंवर देखील दररोजच गुन्हे दाखल होतील- संजय राऊत


मुंबई-मी तर रोजच टीकात्मक लिहित असतो. ते माझे काम आहे. त्यामुळे माझ्यावर तर दररोजच गुन्हे दाखल होतील. विधानसभेतील सदस्यांचे कामकाज पाहिले तर त्यांच्यावर देखील रोज गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण वाचले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. कमजोर लोकांवर का गुन्हे दाखल करता? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदे हे या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचे देखील ते म्हणाले.

कुणाल कामरा वादावर संजय राऊत म्हणाले की, मी कुणाल कामराला खूप दिवसांपासून ओळखतो… तो आमच्यावर अशाच प्रकारे टिप्पणी करायचा. माझा असा विश्वास आहे की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर वैयक्तिक टिप्पणी नसेल तर ती स्वीकारली पाहिजे. जर टिप्पणी कोणत्याही राजकीय विचारसरणीवर असेल तर ती स्वीकारली पाहिजे. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. कुणाल कामरा यांचे कार्यालय, स्टुडिओची तोडफोड करण्यात आली… ही गुंडगिरी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 353(1)(b) (सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधाने) आणि 356(2) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती. रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी रात्री उशिरा, मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टिनेंटल कार्यालयात पोहोचले. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ येथे शूट करण्यात आला आहे. शिवसेना समर्थकांनी स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तो तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. कुणाल कामराला तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. यावरुन देखील संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आता सभागृह हे खोक्यांनी भरलेले आहे. विधिमंडळात खोकेबाजांनी भरलेले असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांचे हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे, त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवले असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. ते सर्वच खोके बाज असल्याने सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, भूमिका नाही, नैतिकता देखील नाही. ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहमंत्रालय चालवणे झेपत नाही, हे आता स्पष्ट दिसत आहे. कालच्या घटने बद्दल मुंबई पोलिस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. हा संपूर्ण कट दीड ते दोन तास आधी शिजला. मग त्यावेळी मुंबई पोलिस काय करत होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्याची नाचक्की होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया वरून कुणाल कामरा यांना धमक्या दिल्या जात आहेत. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. मात्र, या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.