पुणे-. दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांनी शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. काळेवाडी पोलिसांनी विनायक ओव्हाळ यांना ताब्यात घेतले असून त्यांनी हे कृत्य का केले याचा तपास सुरू आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळ नुकसान झाले आहे. तसेच सध्या विनायक ओव्हाळ यांनी थेट गाडी पेटवण्याचा प्रयत्न का केला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उमेदवारी अर्जावरून दोघांमध्ये काही वाद झाला होता का, याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. पोलिस देखील याबाबत चौकशी करत आहेत.
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळाले नाही, रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीनला लावण्याची परवानगी दिली नाही, यामुळे संतापलेल्या ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओव्हाळ यांची नाराजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टलाही ओव्हाळ यांनी आयुक्तांची गाडी ही फोडली होती.
यापूर्वी पिंपरी महापालिका आयुक्तांची फोडली होती गाडी
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2024 रोजी देखील विनायक ओव्हाळ यांनी महापालिकेचे ध्वजारोहण सुरू असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. तसेच त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी देखील मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अनेक महिन्यांपासून महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागत होतो, मात्र आयुक्त भेटायला तयार नव्हते. याचाच राग मनात धरून विनायक ओव्हाळ यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली असल्याचे त्यांनी कबूल केले होते.