Home Blog Page 602

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण:पुण्यातून आणखी एकास अटक

पुणे-माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यात कर्वेनगर भागातून अटक केली. सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार शुभम लोणकर अद्याप फरार आहे.गौरव विलास अपुणे (वय 23, रा. कर्वेनगर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अपुणे याला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे. अपुणेच्या काही साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

या हत्या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली. वारजे भागातील शुभम लोणकर हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येचा कट पुण्यात रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शुभमचा भाऊ प्रवीण याला अटक करण्यात आली आहे.शुभम हा लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल यांच्या संपर्कामध्ये होता. त्याला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अकोला पोलिसांनी जानेवारी महिन्यात अटक केली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर आल्यावर तो पुन्हा बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. त्या वेळी अनमोल बिष्णोई याने त्याला सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली. काही रक्कम त्याला आगाऊ देण्यात आली होती, तसेच त्याला आणखी पैसे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार शुभम याने अन्य तिघा आरोपींशी संगनमत करून सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला. जुलै महिन्यापासून ते सिद्दिकी यांची हत्या करण्याच्या तयारीत होते. 12 ऑक्टोबर रोजी आरोपींनी वांद्रे भागात सिद्दिकी यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली.

खडकवासल्यात यंदा भाजपला लढत अधिक सोपी -मोहोळ

पुणे- अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत घेऊन आपण खडकवासल्यात यंदा लढत आहोत , येथील लढत आपले भाजपा उमेदवार भीमराव तापकीर यांच्यासाठी अधिक सोपी असेल असे येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. मोहोळ म्हणाले , भारतीय जनता पार्टी-महायुतीचे खडकवासला विधानसभेचे अधिकृत उमेदवार भिमरावअण्णा तापकीर यांच्या प्रचार नियोजनासंदर्भात बैठक घेत विविध विषयांवर चर्चा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा महायुतीला कौल मिळाला असून यंदाही खडकवासल्यात कमळ फुलणार आहे. बैठकीला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

दरम्यान या मतदार संघात मनसेचे मयूरेश वांजळे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दाेडके हेही रिंगणात आहेत .मात्र या दोघांची आपसात लढत होईल आणि भाजपच्या उमेदवाराला लढत सोपी होईल असा दावा भाजपकडून केला जातो आहे.

कोथरूड मधून विक्रमी मतांनी चंद्रकांतदादा विजयी होतील – केंद्रीय मंत्री मोहोळ

पुणे- पुण्यातील ८ पैकी कोथरूड या मतदार संघातील भाजप उमेदवार चंद्रकांतदादा पाटील हे विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. कोथरुड हा भारतीय जनता पार्टी-महायुतीचा बालेकिल्ला असून या विधानसभा निवडणुकीतही मोठा विजय मतदारांच्या आशीर्वादाने होणार आहे. प्रचाराचे नियोजन, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.बैठकीस उमेदवार श्री. चंद्रकांतदादा पाटील, भाजपा शहराध्यक्ष धिरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री. दीपकभाऊ मानकर, आरपीआयचे शहराध्यक्ष श्री. संजय सोनावणे, शिवसेनेचे श्री. किरण साळी यांच्यासह कोथरुड विधानसभेतील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्यासाठी २०१९च्या विधानसभेला भाजपच्या स्टँडिंग आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती . त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली तर याच मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ केंद्रात राज्यमंत्री झाले.सुरुवातीला बंडाचा झेंडा हाती घेतलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकरही आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत कलहाचा मुद्दा मागे पडला असून आता शिवसेनेचे मोकाटे आणि मनसेचे शिंदे पाटील यांच्या विरोधात लढत देत आहेत चंद्रकांत मोकाटे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा मैदानात उतरवले असून किशोर शिंदे २०१९ ला पराभूत झाले होते .तेव्हा दुरंगी झालेली लढत यंदा तिरंगी होणार असून या लढतीमुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार आहे. या विभाजनाचा फटका महाआघाडीला बसणार आहे. एकेकाळी कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आता तो भाजपचा बालेकिल्ला बनला असून भाजपचे दोन खासदार या मतदारसंघात आहेत.


देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते

पवार साहेब या देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह

मुंबई : शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणला, पण एवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. अरे कसला चेहरा, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या टीकेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या जोरदार पलटवार केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लबोल संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊत म्हणाले की, या माणसाने स्वतःचा चेहरा पाहावा. शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहे. नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन शहरात पवार हे आपले कसे राजकीय गुरू आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेत आहे? हे वारंवार सांगितला आहे. पवार साहेबांचं बोट पकडून आम्ही कसं राजकारण केलं हे सुद्धा मोदी यांनी सांगितलं आहे. भाजप सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे. पवार साहेबांनी काहीच केलं नाही असे हे म्हणत आहेत. त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहावा आणि आपण नक्की या राज्यासाठी काय योगदान दिलं, याचं देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने आत्मचिंतन करावं, असा हल्लबोल त्यांनी केला.

पवार साहेब या देशाच्या राजकारणातील भीष्मपितामह आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही पवार साहेबांच्या आजारपणावर असं व्यक्त करून महाराष्ट्राचे मान शर्मेने खाली घातली आहे. या लायकीची माणसं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात उभी केली आहे. महाराष्ट्राला महान राजकारणाची परंपरा आहे. तुळशीच्या वृंदावनात भांगीची रोपटी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहेत. महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

सदाभाऊ खोत यांचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? टीका करायला लोकशाहीत काही हरकत नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच करतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे राज्य सुसंस्कृत, संयमी आहे. हे संतांचे राज्य आहे. हे चांगल्या राजकारण्यांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य संपवले आहे. म्हणून आम्हाला या राज्यातील सत्ता बदलायची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. पण ते फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते, तुम्ही कधीतरी या राज्याचे मुख्यमंत्री होता आणि आमच्या पाठिंबावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लबोल संजय राऊत यांनी केलाय.

शरद पवारांवर टीका होताच, अजित पवारांचा थेट सदाभाऊंना फोन, म्हणाले ‘हे सगळं बंद करा

मुंबई : आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्या चेहऱ्यावर भाष्य करत टीका केली. त्यांच्या या अभद्र विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अनेक नेत्यांनी खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. दरम्यान, खोत यांनी त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या याच विधानावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी खोत यांना थेट फोन कॉल करून आपली नाराजी कळवली आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकाण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणे कसं बोलायचं असतं, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, यांच उदाहरण घालून दिलेलं. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धत असते. तेच आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. तीच पद्धत पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी पुढे तीच पद्धत चालू ठेवली. पण सदाभाऊ खोत यांनी काल जे काही वक्तव्य केलं, ते निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दांत मी कालच निषेध केला आहे. मी फक्त एवढ्यावरच थांबलेलो नाही. मी खोत यांना फोनही केला होता. तुमचं हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा, असं मी त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणं, हे चुकीचं आहे.

वडगावशेरीचे बापू पठारे तब्बल ३०७ कोटींचे मालक; सुनील टिंगरे ५३ कोटींचे धनी

पुणे : वडगावशेरी मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या कुटुंबाची एकत्रित मालमत्ता ३०७ कोटी ९५ लाख ९५ हजार ९०५ रुपये आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला त्यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रात हा तपशील देण्यात आलेला आहे. तर सुनील टिंगरे ५३ कोटी ८१ लाख ४२ हजार ९७३ रुपयांचे धनी आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापू पठारे

जंगम मालमत्ता विवरण

१) बापूसाहेब तुकाराम पठारे – २,२९,२०,३६७/-
२)⁠ संजिला बापूसाहेब पठारे (पत्नी) – १,१६,८८,६२१/-

३) ⁠हिंदू अविभक्त कुटुंब – ११२,७२,२९,७६६/-
४) ⁠सुरेंद्र बापूसाहेब पठारे (मुलगा) – २५,२२,५९,२०६/-

  • एकूण मूल्य – १४१,४०,९७,९६०/-
    स्थावर मालमत्ता
    १) बापूसाहेब तुकाराम पठारे – २८,४४,७९,२७८/-

२) संजिला बापूसाहेब पठारे (पत्नी) – ११,७४,७६,५२१/-
३) हिंदू अविभक्त कुटुंब – १४,३८,६७,०१८/-

४) सुरेंद्र बापूसाहेब पठारे (मुलगा) – १११,९६,७५,१२८/-
एकूण मूल्य – १६६,५४,९७,९४५/

स्थावर व जंगम मालमत्तेची एकूण रक्कम – ३०७,९५,९५,९०५/-
बँक कर्ज – बापूसाहेब पठारे यांच्या नावे ९५,२६,८३९ रुपये, संजिला पठारे यांच्या नावे ९,४३,२०८ रुपये; तर सुरेंद्र पठारे यांच्या नावे ४१,३७,६५,०२९ इतकी देणी आहे. कर्जस्वरूपात एकूण ४२,४२,३५,०७६ आहे.
गुन्हे –
१) महागाई विरोधी जनआंदोलन केल्याने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम १८८ नुसार खटला नोंद.

२) पाणीप्रश्नासाठी जनआंदोलन केल्याने येरवडा पोलिस स्टेशन येथे भादंवि १४७, १४८, १४९, ३५३, ३२३, ३३६, ३३७, ४२७, ५०४ नुसार खटला नोंद.
३) किरकोळ वादामुळे येरवडा पोलिस स्टेशन येथे भादंवि १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४१, ३२५, ५०६ (२), ५०४ नुसार खटला दाखल. या तीनही प्रकरणी कोणतेही दोषारोप ठेवण्यात आलेले नाही किंवा कोणताही खटला प्रलंबित नाही. तसेच मुलगा सुरेंद्र पठारे यांच्याबाबत कुठलाही गुन्हा नोंद नाही.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील टिंगरे

एकूण मालमत्ता – ५३ कोटी ८१ लाख ४२ हजार ९७३ रुपये. (जंगम – स्वत:च्या नावे ५,४५,४४,३५९, तर पत्नी मनीषा टिंगरे यांच्या नावे १,६२,७९,२५३ रुपये. स्थावर – स्वत:च्या नावे २७,२७,५९,३५४ रुपये, तर पत्नीच्या नावे १९,२७,५९,७५४ रुपये.)

गुन्हे – बीआरटी विरोधात आंदोलन केल्याने विमानतळ पोलिस स्टेशन येथे भादंवि १४३, मपोका कलम ३७ (१), ३ (२५), १३५ नुसार गुन्ह्याची नाेंद, मनपा मुख्य इमारतीतील भाजप, शिवसेना कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून सामानाचे नुकसान केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे भादंवि १४३, १४६, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६, ४२७ गुन्हे दाखल.

एफ.सी कॉलेजच्या कॅम्पसमधील बॅट-या चोर १२ तासाचे आत जेरबंद

पुणे-पोलिसात तक्रार दाखल होताच एफ.सी कॉलेजच्या कॅम्पसमधील बॅट-या चोर १२ तासाचे आत जेरबंद करण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.२६/१०/२०२४ रोजी ते दि.०४/११/२०२४ रोजी दरम्यान डेक्कन एज्युकेशन सोसा. आयएमडीआर कॉलेज, आगरकर रोड, पुणे चे युपीएस रुममधील जिन्याखाली असलेल्या रॅकमधुन ४३ युपीएस बॅट ऱ्य कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरुन नेले म्हणुन तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १८२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला होता. या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, अजय भोसले यांनी तपास पथकातील स्टाफच्या मदतीने तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातुन १२तासाच्या आत दोन आरोपीं सचिन शहाजी डोकडे, वय २१ वर्षे, रा. बजिरंग बली मित्र मंडळ जवळ, आकाश गंगा सोसायटी समोर, वडारवाडी पुणे, राहुल यंकाप्पा पाथरुट, वय २० वर्षे, रा. जयमित्र मंडळ जवळ, जुनी वडारवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे केलेल्या तपासात सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन गुन्हयाच्या तपासात चोरीस गेलेला मुद्येमाल बॅट-या हा आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला . पुढील तपास सहा. पोलीस उप निरीक्षक डी.जी. शिंदे करीत आहेत. सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या गार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्ताञय सावंत, सहा. पो. फौजदार शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस अंमलदार नरेंद्र पवार, सागर घाडगे, वसिम सिध्दीकी, धनाजी माळी, रोहित पाथरुट यांचे पथकाने केलेली आहे

पिंपरी दिवाणी न्यायालयात वकील व कर्मचा-यांना मतदानाचे आवाहन

पुणे: दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व वकील तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचा-यांनी २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम.जी.मोरे यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयामार्फत मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी दिवाणी व फौजदारी न्यायालयात मतदान जनजागृती करण्यात आली. त्यावेळी सह दिवाणी न्यायाधीश श्री. मोरे बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, महादेव डोंगरे तसेच न्यायालयातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. मोरे यांनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली.

पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या निवडणूकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय या कार्यक्षेत्रातील सोसायट्या, समाज मंदिरे, प्रवासी वाहतूकीची ठिकाणे यांसह दाट वस्तीच्या व गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या निवडणूकीत सोसायटयांमध्ये ६ नवीन मतदान केद्रांचा समावेश झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी व्यक्त केला.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता पालनासाठी निर्णायक उपाययोजना – डॉ. माने यांच्या स्पष्ट सूचना

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 शांततेत व पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी पुणे विभागीय परिवहन कार्यालयाला व पोलिसांना आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी खास सूचना दिल्या आहेत.

  1. वाहन तपासणीवर कडक नियंत्रण: उमेदवारांच्या वाहनांमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिवहन विभागाला त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या वाहनांवर कडक निरीक्षण ठेवून आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाईल.
  2. संवेदनशील भागात पेट्रोलिंग वाढवणे: मतदारसंघातील झोपडपट्टी व गर्दीच्या भागांत पोलिसांनी नियमित पेट्रोलिंग वाढवून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी घेतली आहे, ज्यामुळे संभाव्य तणाव टाळता येईल.
  3. एक खिडकी कक्ष विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन: एक खिडकी कक्षाद्वारे दिलेल्या परवानग्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी फ्लायिंग स्क्वाड टीम आणि स्टॅटिक सर्विलन्स टीमला निरीक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
    यावेळी तहसीलदार किरण सुरवसे आणि नायब तहसीलदार सचिन आखाडे उपस्थित होते.

निघोजे,नानेकरवाडी, म्हाळुंगे परिसरात ५ तास वीज खंडित-महापारेषणच्या चाकण उपकेंद्रात बिघाड 

पुणे, दि. ०६ नोव्हेंबर २०२४: महापारेषणच्या चाकण येथील ४००/२२ केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रात बुधवारी (दि. ६) दुपारी ४.४५ च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण परिसरातील कुरुळी, नानेकरवाडी, म्हाळुंगे, निघोजे, आळंदी फाटा परिसरातील १८०० उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ११ हजार ८०० घरगुती, व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. ६) पाच तास खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण येथील ४००/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात दुपारी ४.४५ च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. परिणामी ५० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे महावितरणच्या २२ केव्हीच्या सहा एक्सप्रेस वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर लगेचच ५ वाजता या सहा एक्सप्रेस वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. मात्र पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे ३५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली व भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नानेकरवाडी, आळंदी फाटा, एमआयडीसी सर्कल व सारा सिटी या चार २२ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे आळंदी फाटा, कुरुळी, नानेकरवाडी, निघोजे व म्हाळुंगे परिसरातील ३०० उच्चदाब व १५०० लघुदाब औद्योगिक ग्राहकांचा आणि १० हजार घरगुती व व्यावसायिक अशा सुमारे ११ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. महापारेषणकडून करंट ट्रान्सफॉर्मर बदलल्यानंतर रात्री ९.४५ वाजता या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

‘सदा खोतांची विकृत टवाळी’ हेच् भाजपच्या महायुतीचे संस्कार ..! काँग्रेसने केला तीव्र निषेध

राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्याचा’ अवमान सहन करण्याची कोणती मजबूरी अजीत पवारांच्या ठायी..? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल..
पुणे – निवडणुक प्रचार सभेत, राजकीय द्वेषापोटी पातळी सोडुन आरोप करतांना, शिव छ्त्रपतींच्या महाराष्ट्राची सभ्यता, जीजाऊंचे व संतांचे संस्कार व शिकवणूकीस तिलांजली देण्याचे कार्य “महायुतीच्या नेत्यांकडून” एका पाठोपठ केले जात असुन देवेंद्र फडणवीसांच्या ऊपस्थितीत गोपिचंद पडळकरांच्या सभेत सदा खोत या कथित शेतकरी नेत्याने, इंडीया आघाडीचे जेष्ठ नेते शरदराव पवार यांचे चेहऱ्यावरील शस्त्रक्रीयेचा ऊल्लेख करून व्यंगात्मक उदगार काढून टवाळी केली व विकृती पाजळवली त्याचा ‘तीव्र धिक्कार व निषेध’ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केला.
ते पुढे म्हणाले की, फुटीर राष्ट्रवादी पक्षाची सत्तेची अशी कोणती मजबुरी व लालसा आहे की ‘पित्यासमान असलेले जेष्ठनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अघ्यक्ष आदरणीय शरदराव पवार’ यांचे प्रती टिंगल टवाळीचे विकृती दर्शवणारे उदगार काढल्या नंतर ही.. अजीत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शांत का ?
सदा खोतांच्या भाजप प्रणीत विकृत टवाळी विषयी जनाची नाही तर मनाची थोडी जरी लाज वाटत असेल तर केवळ निषेध न करता ‘भाजप-महायूतीती’स लाथ मारुन राष्ट्रवादीने बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या मातीच्या संस्काराशी ईमान राखावे असे आवाहन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
सदा खोतांनी फडणवीसांना शेतकरी कर्ज माफी’चे खोटे श्रेय देण्याच्या नादात.. ‘काँग्रेस प्रणीत युपीए सरकारने’ २००९ साली डॅा मनमोहनसिंग पंतप्रधान व शरदराव पवार कृषी मंत्री असतांना शेतकऱ्यांना दिलेली ७१,००० कोटींची कर्ज माफी जाणीव पुर्वक विसरले या विषयी देखील तत्कालीन राष्ट्रवादीत मोठे झालेले नेते अजीत पवार व त्यांचे सहकारी सहन करतात ? ही सत्तेच्या लाचारीची पातळी कीव आणणारी व भाजपच्या अधीन गेल्याची पावती असल्याची संतप्त टिका देखील अजीत पवारांच्या राष्ठ्रवादीवर काँग्रेस ने केली.

सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले,…शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे…मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी…असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

मिसाळ पंधरा वर्षे आमदार तरीही एकही ठोस प्रकल्प नाही : अश्विनी कदम यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

पर्वतीत अश्विनी कदम यांचे काम बोलतंय..

पुणे: महानगरपालिकेच्या माध्यमातून कै. शिवशंकर पोटे दवाखान्याचे नूतनीकरण आणि संयुक्त प्रकल्प डॉ.कदम डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी अश्विनी नितीन कदम यांनी केली. गोर-गरीब नागरिकांसह पुणेकरां ना अत्यंत महागड्या एमआरआय, सिटीस्कॅन, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, कलर डॉफलर, टू डिको, डायगोनॉटिक सुविधा मापक व अल्प दरात मिळत असल्याने अश्विनी नितीन कदम आरोग्यदूत आहेत. पर्वती मध्ये अश्विनी कदम यांचं काम बोलतय. विद्यमान आमदारांना पंधरा वर्षे संधी देऊनही त्यांच्या निष्क्रियतेमुळे एकही ठोस प्रकल्प दहा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही पर्वतीत उभा राहिला नाही.असा सूर आज अश्विनी कदम यांच्या प्रचार फेरीतून मांडला गेला . पर्वती विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मतदारसंघातील नागरिकांशी पहाटेचा थेट संवाद साधत दिवसभर पदयात्रेच्या माध्यमातून त्यांचा प्रचार दौरा झाला. यावेळी नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. परिसरातील महिला, युवती, तरुण, ज्येष्ठ सर्वानी त्यांची भेट घेत औक्षण करून, त्यांना शुभेच्छा दिल्या.

” नागरिकांची लोकप्रतिनिधी म्हणून माझा प्रभाग पुण्यात आदर्श होईल असा घडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. पर्वती मतदारसंघातील जनतेसाठी मी कायमस्वरूपी उपलब्ध आहे. निवडणुकीच्या काळातच पर्वतीतील लोकांच्या दारात जाणारी आणि पुन्हा पाच वर्षांनीच येणारी नसून जन्माने आणि कर्माने पर्वतीची कन्या आहे. माझ्या पर्वती मतदारसंघाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने निवडणुकीला सामोरे जात आहे. पर्वती मतदारसंघाला गतिमान विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही माझी माणसं त्यांच्या कन्येच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील यात शंका नाही अशी भावना अश्विनी नितीन कदम यांनी व्यक्त केली.”

यावेळी 132 गदादे पाटील यांचे पुलाखालचे ऑफिस येथून – दांडेकर पूल – पानमळा वसाहत पूर्ण ईशान हॉटेल – सुधीर दळवी गल्ली क्र. 1 ते 4 महिला मिलन पूर्ण – शिवतेज प्रतिष्ठान फाळके गोठा – लायन्स क्लब – सुदर्शन मित्र मंडळ नवजवान मंडळ – स्वामी विवेकानंद साईबाबा मंदिर पोलीस चौकी – म्हसोबा चौक बदाम गल्ली – राणा प्रताप मंडळ – मोरेश्वर रक्षलेखा वडाचा गणपती – गणेश मळा आदी भागातून पदयात्रा संपन्न झाली.

या पदयात्रेला महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह पदयात्रा मार्गातील नागरिक, महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी होता.

अवयवदानासाठी वारंवार जागृती होणे आवश्यक : डॉ. अविनाश भोंडवे

आडकर फौंडेशनतर्फे आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार प्रदान

पुणे : सुशिक्षित व्यक्तींमध्ये अजूनही आरोग्य साक्षरता नाही तसेच दुसरीकडे अवयव दानाविषयी पुरेशी जागृतीही नाही. अवयव दानाचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी असल्याने योग्य वेळी अवयवदान न झाल्याने रुग्णांचे मृत्यू ओढवतात. अवयव दानासंदर्भातील नागरिकांच्या मनातील भीती, शंका दूर करण्याचे वारंवार प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे काम करणाऱ्या आरती देवगावकर यांचा आडकर फौंडेशनतर्फे बुधवारी (दि. 6) डॉ.भोंडवे यांच्या हस्ते कोमल पवार स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे स्तुत्य काम आडकर फौंडेशनतर्फे केले जात आहे, असे नमूद करून डॉ. भोंडवे यांनी अवयवदान कोण करू शकतो याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. आरोग्य शास्त्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृत्रिम रक्तपेशी तयार करण्याविषयी संशोधन सुरू आहे. यात जर यश आले तर भविष्यात रक्तदानाची गरज कमी होऊ शकते असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना आरती देवगावकर म्हणाल्या, आयुष्यातील छोट्या-छोट्या समस्यांचा आपण बाऊ करतो. पण समाजात गेल्यानंतर आरोग्यविषयक समस्या काय आहेत हे समजे आणि आपले दु:ख त्यांच्या दु:खापेक्षा किती छोटे आहे याची जाणिव होते. अवयवदानाविषयी जागृती करतानाच अवयवदानाचे प्रमाण कसे वाढेल याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मानपत्र वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‌‘पुनर्जन्म‌’ या विषयावर आयोजित कविसंमेलनात जयंत भिडे, मीरा शिंदे, विजय सातपुते, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, साधना शेळके, विद्या सराफ, कांचन पडळकर, ऋचा कर्वे, प्रतिभा पवार, मिनाक्षी नवले, स्वाती सामक, प्रभा सोनवणे यांनी आपल्या रचना सादर केल्या.

मध्य पुण्यातील आरोग्य सुविधा बळकट केल्या- हेमंत रासने

पुणे-महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय, कमला नेहरु रुग्णालय व राज्य शासनाचे ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यावरील ताण कमी करण्याच्या हेतूने शहराच्या मध्य पुण्यातील महापालिकेच्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला.

रासने यांच्या प्रचारार्थ आज दत्तवाडी परिसरात मांगीरबाबा मंदिर, म्हसोबा चौक, शामसुंदर सोसायटी, राजेंद्र नगर, पीएमसी कॉलनी, गांजवे चौक या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, धनंजय जाधव, किरण साळी, बाळासाहेब किरवे, गौरव साईनकर, रमेश काळे, स्वाती मोरे, अनिता बोडके, तानाजी ताकपेरे, विजय गायकवाड यांचा प्रमुख सहभाग होता.

रासने म्हणाले, महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पहिले वैद्यकीय महाविद्यालय, कमला नेहरू रुग्णालयात महापालिकेची पहिली रक्तपेढी, पहिला अतिदक्षता विभाग, नवजात अर्भक व 12 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी ह्दयरोग तपासणी केंद्र, चंदुमामा सोनावणे रुग्णालयात नवजात बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक प्रसूतिगृह, डायलेसिस केंद्र या आरोग्य सुविधा सुरू केल्या.

रासने पुढे म्हणाले, कोरोनामुळे अत्याधुनिक आणि बळकट आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. विस्तारणाऱ्या शहरात आपल्यानजीक उत्तम आरोग्य सुविधा देणारी केंद्रे विकसित करणे, हा आमच्या आरोग्यविषयक धोरणाचा भाग आहे. त्यानुसार मध्य वस्तीमध्ये असलेली रुग्णालये विकसित करणे आणि आरोग्य सुविधांच्या क्षमतावर्धनावर भर देत आहोत.

लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाही – देवेंद्र फडणवीस

पुणे –
लाडकी बहिण योजना अमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र ,अडीच कोटी महिलांच्या खात्यात आम्ही आतापर्यंत पैसे भरले आहेत. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले. परंतु आम्ही ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील योजना बंद करणार नाही. सरकार जनतेचे असून हक्काच्या आमदार माधुरी मिसाळ पुन्हा विधानसभेत पाहिजे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण शाळेसमाेरील रस्त्यावर आयाेजन बुधवारी करण्यात आले हाेते त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे,शहराध्यक्ष धीरज घाटे,आमदार माधुरी मिसाळ,माजी मंत्री विजय शिवतारे,अमित गोरखे, दीपक मानकर, नाना भानगिरे, संजय सोनवणे, जगदीश मुळीक, विष्णू कसबे, सरस्वती शेंडगे ,संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे,प्रवीण चोरबोले , आबा शिळीमकर, संतोष नागरे , हर्षदा फरांदे, सुनील कुरूमकर, श्रीकांत पुजारी, महेश वाबळे, बाबा मिसाळ ,डॉ. सुनिता मोरे ,प्रशांत दिवेकर ,अनिरुद्ध भोसले उपस्थित हाेते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्य अहवाल प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, पुण्यात प्रचाराची सुरवात करावी असा प्रस्ताव माझ्या समोर आला त्यावेळी पर्वती मतदारसंघात प्रचार नारळ फोडण्याचे ठरवले. माधुरी मिसाळ यांचा चौथा विजय रेकॉर्ड ब्रेक असेल. एसआरए बाबत जी नियमावली तयार झाली त्याचे श्रेय मिसाळ यांना आहे. एफएसआय वाढवून देण्यासाठी त्यांनी काम केले. त्यातून २० हजार घराची निर्मिती याभागात होत असून गरिबांना ३५० स्क्वेअर फूट ऐवजी ४७० स्क्वेअर फूट मोठे घर उपलब्ध होत आहे. मिसाळ यांना विविध गोष्टीची जाण असून दूरदृष्टी आहे. पुणे बदलत असून मेट्रो आधीच सुरू झाली पाहिजे होती. आघाडी सरकार हे केवळ घोषणा सरकार होते पण आमचे सरकार गतिमान आहे. देशात सर्वात वेगाने तयार झालेली पुणे मेट्रो आहे. स्वारगेट येथे मल्टी मॉडेल हब तयार करण्याची कल्पना देखील त्यांची आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोडणारा देशातील सर्वाधिक अत्याधुनिक हब हा असणार आहे. स्वारगेट ते कात्रज आणि खडकवासला ते खराडी मेट्रो प्रकल्पास तातडीने मंजुरी देण्यात आली. पुण्यातील सांडपाणीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प राबवण्याचे ठरवले त्यातून नदी प्रदूषण रोखले जाणार आहे. मुळा मुठा नदीचे जुने स्वरूप पुन्हा लोकांना पाहवयास मिळेल. पुण्यात सर्वाधिक समस्या वाहतूक कोंडी आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड तयार करण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते पण येथील वाहतूक कोंडी पाहून त्या घाबरतात. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री यांचे पुढाकारातून ५४ हजार कोटींचे रस्ते निर्माण केले जाणार आहे. बदलत्या पुण्यात पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी वेगवेगळी विकासकामे केली आहे. त्यामुळे एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून समजते. महिलांना समाजात केंद्र स्थानी आणले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले. त्यासाठी सक्षमता करण्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मोठ्या संख्येने लोक सभेला आले असून हा प्रतिसाद पाहून ज्याच्या सभेला तुम्ही आले आहे त्यांना निवडून देण्याची जनतेची इच्छा दिसून येत आहे. ही प्रचार सभा नसून विजयी सभा आहे. सन २००९ मध्ये माधुरी मिसाळ यांचे तिकीट जाहीर होईपर्यंत स्व.गोपीनाथ मुंडे आनंदी झाले नव्हते कारण सतीश मिसाळ हे त्यांचे देखील कुटुंब होते. मतदारसंघातील सरकारच्या योजना मी सांगणार नाही पण मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी माधुरी मिसाळ यांनी प्रयत्न केले आहे. त्यांचे कोणते काम कधीच अडवले जात नाही. केवळ आमदार होऊन विकास होऊ शकत नाही त्यासाठी राज्यात सत्ता येणे आवश्यक असते. २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप निवडून आला पण थोडक्यात सत्ता गेली आहे.

मोहोळ म्हणाले, पुन्हा एकदा पार्वती करानी ठरवले हट्रिक झाली असुन आता चौकार मारण्याची वेळ आली आहे. शहरात अनेक विकास कामे आलेली आहे. देशात प्रगतीच्या दृष्टीने महाराष्ट्र वेगाने विकसित होत आहे. विकास कामे होताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांची कामे राज्य सरकारकडून होत आहे. पर्वती मतदारसंघात विकासाचे प्रचंड काम माधुरी मिसाळ यांनी केले आहे .त्यांना मागील वेळी ३० हजारांचे मताधिक्य होते, आता एक लाख मताधिक्याने मिसाळ यांना निवडून आणण्याचा संकल्प करा. पुण्यातील सर्व जागा महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, आज आपल्या पुणे शहरात पहिली सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. १५ वर्षं पक्षाने मला संधी दिली असून पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली. पक्षाचा विश्वास मी सार्थ ठरवला आणि राज्यात पुन्हा युती सरकार येण्यासाठी पर्वती मधील मतदारसंघ एक असेल याची ग्वाही देते. लोकांच्या दैंनदिन गरजा समस्या सोडवण्यासोबत सत्ता नसतानाही दुप्पट कामे केली. मतदारसंघ संमिश्र असून वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात त्यांच्यासाठी ४०० प्रकारची कामे सध्या सुरू आहे.राज्यात प्रथमच मल्टी मॉडेल हब स्वारगेट येथे उभारण्यासाठी कल्पना मांडली आणि त्याला निधी कोणती कमतरता सरकारने पडू दिली नाही. कला संस्कृती जपण्यासाठी कलाग्राम प्रथम मला सुरू करता आले. एसआरएचा पहिला ४७० स्क्वेअर फूट घरांचा प्रकल्प मला मतदारसंघात सुरू करता आला आहे. मतदार यांना माझ्या कामाची कल्पना असून ते पुन्हा एकदा गतिमान, कार्यक्षम महायुतीला साथ देतील.सर्वांना सांभाळून घेणारे नेते कसे असावे हे भाजप मध्ये पाहवयास मिळते. लाडकी बहिण योजना बद्दल अभिमानाने महिला माझ्याशी बोलत आहे.