Home Blog Page 600

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !

“आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो” – अक्षय मुडावदकर

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करत, त्यांना उपदेश करत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले… कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पा महाराज, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि ते कसे कृतार्थ झाले, त्यांचे कसे नाते होते आणि या भक्तिमार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या कृपाछायेखाली आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये आजवर बघायला मिळाले. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना रोजच्या रोज अनुभवता येत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने यशाचा एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. मालिकेने १३०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील दिव्य कथा, त्यांच्या अलौकिक चमत्कारिक कार्यांचा प्रवास आणि त्यांच्या उपदेशांनी भरलेले अनेक प्रसंग यामुळे ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली आहे.

याक्षणी बोलताना जय जय स्वामी समर्थ मालिकेतील स्वामी अर्थात अक्षय मुडावदकर म्हणाले,” आज जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे १३०० भाग पूर्ण होत आहेत. सर्व प्रथम या मालिकेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो कारण ४ वर्षांचा १३०० भागांचा यशस्वी प्रवास पुर्ण झाला आहे. एक टीम म्हणून प्रत्येकाचा यामध्ये मोलाचा वाटा आहे कारण हे कोणा एकट्यामुळे शक्य नाही. हे यश संपूर्ण टीमचे आहे. टीम सोबत मी रसिक प्रेक्षकवर्गाचे आभार मानतो कारण त्यांनी मालिकेच्या पहिल्या भागापासून मालिकेवर, कलाकारांवर आणि कलर्स मराठीवर भरपूर प्रेम केले. मला खूप छान वाटत आहे की, मी अशा एका प्रोजेक्टचा भाग आहे ज्याने एवढा मोठा टप्पा पार केला आहे. ही गोष्ट प्रत्येकाच्या नशिबात येईलच असे नाही. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आज जे ब्रह्मांडनायक आहेत त्यांना साकारण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या मालिकेद्वारे मी आज घराघरात पोहोचलो लोकांनी मला भरभरुन प्रेम दिले. आम्ही आता १३०० भागांपर्यंत आलो आहोत स्वामींचा अलौकिक जीवनपट पाहता अजून खूप प्रवास बाकी आहे. स्वामींच्या अनेक अलौकिक लीला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रसिकांना हीच विनंती की, असेच आमच्यावर प्रेम करत राहा.स्वामींच्या अलौकिक लीलांचे साक्षीदार व्हा,जगणे समृद्ध करा”

या यशाच्या निमित्ताने मालिकेतील कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. तसेच, प्रेक्षकांचे आभार मानले, ज्यांच्या प्रेमामुळे ही मालिका सतत नवीन शिखरे गाठत आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या यशस्वी प्रवासाच्या या टप्प्याबद्दल बोलताना संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “स्वामी समर्थांच्या भक्तीतून प्रेरणा घेऊन आम्ही ही मालिका सुरू केली आणि प्रेक्षकांच्या अपार प्रेमाने हा प्रवास यशस्वी झाला आहे. हा टप्पा म्हणजे आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे,” स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने ही मालिका आणखी दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील, असा विश्वास आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्ष सज्ज

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि पारदर्शकतेसह पार पाडण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, किरण सुरवसे, आणि सचिन आखाडे यांच्या नेतृत्वाखाली मतदान प्रक्रियेची तयारी सुरू आहे. मतदारसंघात शांततामय व निर्भय वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
या कक्षाचे नोडल अधिकारी प्रा. मनिष खोडस्कर आणि रवी फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य कर्मचारी मतदान केंद्रांवरील कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. कक्षाच्या व्यवस्थापनात निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे मतदारांना योग्य सुविधा, शिस्तबद्ध व्यवस्था, आणि तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 505 मतदान केंद्र असून, त्यापैकी दोन विस्तारित केंद्रे देखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. मतदारांच्या व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या सोयीसाठी या केंद्रांची व्यवस्था आखली गेली आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसोबतच मायक्रोऑब्झर्व्हर्सना नियुक्त करण्यात आले आहे, जे मतदारांना मार्गदर्शन करून त्यांचे अनुभव सुगम करण्यासाठी तत्पर आहेत.
मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने विविध सुरक्षा यंत्रणा तैनात केल्या आहेत. मतदान केंद्रांवर पोलीस, सुरक्षा कर्मचारी, आणि आवश्यकतेनुसार मेडिकल किटची सोय करण्यात आली आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या मतदानाच्या हक्काचा उपयोग निर्भयतेने करता यावा, यासाठी ही सर्व यंत्रणा सज्ज आहे.
या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समन्वय कक्षाद्वारे, मतदारांना पारदर्शक आणि व्यवस्थित निवडणूक प्रक्रिया अनुभवता यावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही:छगन भुजबळ यांनी दावा फेटाळला; म्हणाले – पुस्तक वाचून कारवाईचा विचार करणार

निवडणुकीच्या काळातच पुस्तक का आले?आपण अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही .

नाशिक-ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वत: वाचणार आहे. माझ्या वकीलांनादेखील देणार असून निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे, असा इशाराही भुजबळांनी दिला.मी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नाही. महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली, तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

सरदेसाई यांच्या पुस्तकांमधील दाव्याबद्दल भुजबळांकडून खरे खोटे करण्यात आले असून आपण अशी कोणतीही मुलाखत दिलेली नसून या प्रकरणी निवडणुकीनंतर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विकासासाठी सरकारसोबत गेलो आहे. मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. आक्षेपार्ह दाव्यावर कारवाई केली जाईल. निवडणुकीच्या काळातच पुस्तक का आले? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा एकच अर्थ म्हणजे ईडीपासून सुटका, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर ईडीची कारवाई झाली, असे अनेक प्रकारचे खुलासे भुजबळ यांनी केले आहेत असे वृत्त आहे. सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात केला आहे.

सुप्रिया सुळेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान:छगन भुजबळांनी जे लिहले ते खोटे असेल तर फडणवीसांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे

पुणे-छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलली आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले की यंत्रणेचा गैरवापर करत पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी अदृक्ष शक्ती हे संपूर्ण देशात सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या दाव्याबद्दल बोलताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, माध्यमांनुसार 95 टक्के ईडी, आयकर आणि केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर विरोधकांवर सुरू आहे, असे मी अनेकदा सांगितले आहे, त्याचा उल्लेख राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका लोकशाहीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्या मविआच्या आणि मित्रपक्षाचा आम्ही एकत्र प्रचार करत आहोत.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे.

भुजबळ साहेब तुम्ही खरे बोललात ह्या बद्दल आभार, बीजेपी जातीवादी आहे हे बोलण्याची हिम्मत तुम्हीच दाखवू शकता, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.


पुस्तकामध्ये म्हटलंय की, भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते, आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात या गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य सांगितल्याचे पुस्तकात दिसून येते.

भुजबळांनी वृत्त फेटाळले

छगन भुजबळ यांंनी आज तातडीने पत्रकार परिषद घेत असे दावे केल्याचे वृत्त फेटाळले. विशेष म्हणजे मी अशी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नाही तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. मी हे पुस्तक स्वत: वाचणार असून माझ्या वकीलांनादेखील देणार आहेय निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे.

कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील

कोथरूड मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन

बाईक रॅली आणि पदयात्रेद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी

रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचाही सहभाग

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे, भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार; असल्याची भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढते जनसमर्थन मिळत आहे.

भाजपा कोथरूड दक्षिण मंडळाच्या वतीने आज प्रभाग क्रमांक १० मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील सहभागी झाले होते.

कोथरूड मधील किनारा हॉटेल चौक येथून रॉलीचा शुभारंभ झाला. परमहंसनगर, टेकडी पायथा, कस्तुरी हॉटेल चौक, पौड रोड, कोथरूड पोलीस स्टेशन, श्रीराम कॉलनी, आशिष गार्डन, कुमार परिसर, सागर कॉलनी, कैलास वसाहत, साईनाथ वसाहत, पीएमसी कॉलनी, अरमान सोसायटी, भिमाले टॉवर्स, सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे रॉलीचा समारोप झाला.

रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून लोक हात उंचावून पाठिंबा दर्शवीत होते. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी यांसह अनेक ठिकाणी महिला औक्षण करण्यासाठी पुढं येत होत्या. विशेष म्हणजे तरुणांचा जल्लोष आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष शिंदे, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी,  नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, बाळासाहेब टेमकर, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे, कैलास मोहोळ, बाळासाहेब खंकाळ, राजेश गायकवाड, सिताराम खाडे यांच्या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मीनाताई ठाकरे वसाहतीतील रहिवाशांना मिळणार एसआरए अंतर्गत पक्की घरे: आमदार माधुरी मिसाळ

पुणे: गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहत इंदिरानगरमधील महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीचे एसआरए अंतर्गत त्याच जागेवर पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप महायुतीच्या उमेदवारआमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मीनाताई ठाकरे वसाहत, मुकुंदनगर, महर्षीनगर, प्रेमनगर परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिसाळ बोलत होत्या. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, प्रविण चोरबेले, राजश्री शिळीमकर, निखिल शिळीमकर, गणेश शेरला, रेणुका पाठक, श्रीकांत पुजारी, राहुल गुंड, श्वेता होनराव, बाळासाहेब शेलार यांचा प्रमुख सहभाग होता.
मिसाळ म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाची नियमावली निर्मिती प्रक्रिया खंडित झाली होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा करून एसआरएची नियमावली मंजूर करून घेतली. महापालिकेच्या ज्या जागांवर झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन महापालिकेने करावे ही आग्रही मागणी मान्य झाली. त्यानुसार एसआरएचा प्रायोगिक तत्त्वावरील पहिला प्रकल्प गुलटेकडी येथे सुरू होत आहे.
मिसाळ म्हणाल्या, गुलटेकडीतील नेहरू रस्ता आणि महर्षीनगरमध्ये तब्बल 12 एकर जागेवर मीनाताई ठाकरे इंदिरानगर ही मोठी वसाहत आहे. जागेची मोजणी, डिमार्केशन आदी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये दोन हजार 554 झोपड्या आढळून आल्या असून, त्यांचे पुनर्वसन होणार आहे.
मिसाळ पुढे म्हणाल्या, पुणे शहरात 486 झोपडपट्ट्या आहेत. 70 ऐवजी 50 टक्केच झोपडीधारकांची मान्यता, पाच किलोमीटरच्या परिसरातील दोन झोपडपट्ट्यांचे एकत्रित पुनर्वसन करण्याची मुभा यांसह सुधारित नियमावलीतील सुधारित तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती मिळाली आहे. सुधारित नियमावली लागू झाल्याने मोठ्या संख्येने पुनर्वसनाचे प्रकल्प दाखल होत आहेत. त्यामुळे पुनर्वसन गतिमान होईल असा विश्वास वाटतो.

पुणे शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

पुणे: शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा उद्या शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता स्थळ शहीद तुकाराम ओंबाळे मैदान, गोखले नगर येथे आयोजित केली आहे.

त्याआधी मुख्यमंत्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या डेक्कन येथील पुतळ्याला हार अर्पण करतील. त्यानंतर फर्ग्युसन रोडवर रोड शो करणार आहेत.

या रोड शो व सभेसाठी महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या रोडशो आणि सभेद्वारे महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शंखनात घुमणार असून महायुतीचे सर्व उमेदवार निर्विवाद यश संपादन करतील असा विश्वास शिवसेना नेते किरण साळी यांनी व्यक्त केला आहे.

कसब्यातील बहिणी रासने यांच्या पाठीशी स्वरदा बापट यांचा विश्वास

पुणे–महिलांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या आरोग्याची सदैव काळजी घेणाऱ्या हेमंत रासने यांच्या पाठीशी कसबा मतदारसंघातील लाडक्या बहिणी भक्कमपणे उभ्या असल्याचा विश्वास भाजपच्या शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी व्यक्त केला.

स्वरदा बापट, मृणालिनी रासने, ज्योत्स्ना सरदेशपांडे, ॲड. गायत्री खडके, योगिता गोगावले, रीना सपकाळ, माधुरी पंडित, रुपाली कदम, धनश्री कदम, श्रेया रासने, सोनाली सिद्ध आणि माधुरी मोधर या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रासने यांच्या प्रचारार्थ घरोघर संपर्क साधून प्रचार करीत आहेत.

बापट म्हणाल्या, हेमंत रासने यांच्या पुढाकारातून कसबा मतदारसंघातील बारा हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अहे. त्यांच्या खात्यात प्रत्येकी महिन्याला प्रत्येकी पंधराशे रुपये जमा होत आहेत. राज्यात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी महायुती सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. त्या योजनेतून त्या मुलीला अठरा वर्षांची झाल्यानंतर एक लाख रुपये मिळतील. या योजनेला ही मोठा प्रतिसाद मिळत आहे. एसटी बस प्रवासासाठी 50 टक्के सवलतीचा महिलांना फायदा होत आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. या योजनांची मतदारसंघात जनजागृती करून अधिकाधिक लाभ मिळवून देण्यात हेमंतभाऊ आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांचे मोठ्या संख्येने मतदान महायुतीला होईल याचा विश्वास वाटतो.

बापट पुढे म्हणाल्या, स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यांचे कार्य हेमंत रासने पुढे नेत आहेत. विविध क्षेत्रांत रणरागिणींना स्त्री शक्ती सन्मानाने गौरविण्यात येते. दरवर्षी वीस हजार महिलांचे हळदीकुंकू, रक्षाबंधन, कन्यापूजन, महाभोफ्लडला आदी उपक्रमांद्वारे संस्कृतीचे जतन केले जाते. आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे आणि औषधांचे मोफत वाटप, लहान मुलांच्या ह्दय शस्त्रक्रिया, कॅन्सर रुग्णांना पेट स्कॅन व केमोथेरपी, श्रवण यंत्रांचे वाटप, रक्त तपासण्या आदी आरोग्य सुविधांचा तेरा हजारहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे.

भररस्त्यात अडवून :कारची काच फोडून दहशत माजविण्याचा ट्रिपल सीट टोळक्यांचा प्रयत्न

पुणे-व्यावसायीकाला रस्त्यात गाठून अडवण्याचा प्रयत्न करून कारला दुचाकी आडवी लावून पैशाची मागणी करून नंतर गाडीवर दगड फेकून मारत लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अर्ज पर्वती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत फर्निचर व्यावसायीक संतोष पुनमाराम सुथार (रा.वारजे माळवाडी) यांनी दुचाकीवर आलेल्या आठ जणांविरोधात तक्रार दिली आहे.

तक्रार अर्जानुसार नेहमी प्रमाणे तक्रारदार हे दुकान बंद करून त्यांच्या कारमध्ये रात्री आठ वाजता त्यांची गाडी पानमळा परिसरात आली. तीन दुचाकीवर असलेल्या आठ जणांनी त्यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी हॉर्न वाजवल्यानंतर टोळक्याने त्यांच्या गाड्या कारसमोर आडव्या घातल्या. त्यांच्या गाडी जवळ येऊन हुज्जत घालत असतानाच त्यांनी पैशाची मागणी केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. यावेळी काही तर वेगळे घडत आहे अशी जाणीव होताच तक्रारदाराने तात्काळ गाडीच्या सर्व काचा लावून गाडी लॉक करून घेतली. त्यातील एकाने गाडीवर दगड फेकून मारला तर दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले धारदार हत्यार दाखवले. त्याचवेळी तक्रारदार फोन काढून व्हिडीओ बनत असताना आरोपींनी समोरील काचेवर दगड भिरकावला.

हा सर्व प्रकार घडताना व कारवर दगड फेकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत हॉर्न वाजविण्याच्या कारणातून झालेला हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र आरोपी निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

भाजपचा विरोध डावलून अजित पवार नवाब मलिकांसाठी उतरले मैदानात

मुंबई-अजित पवार यांनी भाजपच्या दबावाला न जुमानता नवाब मलिक यांनी उमेदवारी दिली होती. त्यानंतर अजित पवार नवाब मलिक यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, अजित पवार आज शिवाजीनगर माणखुर्द येथे नवाब मलिकांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. ते नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत.

अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आणि नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी रोड शो चे आयोजन करण्यात आले. या रोड शो मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सहभागी झाले होते. यावेळी अजित पवार हे नवाब मलिक यांच्या शेजारी उभे राहून लोकांना अभिवादन करत होते.

अजित पवार म्हणाले, मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. भाजप नवाब मलिकांचा प्रचार करत नसले तरी आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत. अबू आझमी जरी इथले आमदार असले, तरी त्याबाबत मतदार निर्णय घेतील. मागील तीन टर्म आमदार असताना अबू आझमी यांनी विकास केला नाही. शिवाजीनगर माणखुर्द येथे कचरा, लोकांचे आरोग्य यांसह अनेक अडचणी आहेत. नवाब मलिक यांनी प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर आम्ही येथील सर्व अडचणी दूर करू, असे अजित पवार म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले, अजित पवार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी मला उमेदवारी दिली. आता ते माझ्या प्रचारासाठी आले आहे. अजित पवारांनी मला ज्या हिमतीने मला उमेदवारी देण्यात आली, त्या हिमतीला दाद देण्यासाठी लोक अजित पवारांच्या स्वागतासाठी येथे आले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आले, तेव्हापासून महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपचा त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या म्हणाले की, पक्ष नवाब मलिक यांच्या बाजूने प्रचार करणार नाही, त्यांना पराभूत करण्यासाठी लढेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील उमेदवार देण्यात आला आहे.

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करा, एफआयआर दाखल करा: पवन खेरा

काँग्रेस शिष्टमंडळाची भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार.

मुंबई, दि. ७ नोव्हेंबर २०२४
काँग्रेस पक्षाने कर्नाटक, तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या आहेत. वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यांच्यावर एफआयआरही दाखल करावा, अशी मागणी केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी सांगितले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-याची भेट घेऊन भाजपा विरोधात लेखी तक्रार केली. यावेळी पवन खेरा यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्राचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, सचिन सावंत, चरणजित सप्रा, विधी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड रवी जाधव आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर भाजपाने काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. काँग्रेस पक्षाने गॅरंटी लागू केल्या नाहीत असा अपप्रचार करण्यात आला आहे. निवडणूक आयोग काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेऊन भाजपावर तात्काळ कारवाई करेल अशी अपेक्षा आहे असे पवन खेरा म्हणाले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत १३३ कट्टरपंथीय संघटना होत्या या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणुकीत पराभव होत असल्याचे दिसू लागतात असे अहवाल बाहेर काढले जातात. दलित, आदिवासी, गरिब, महिला, शेतकरी व युवकांचे प्रश्न उपस्थित होताच अशा प्रकारे सणसणाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधानांना मारण्याची धमकी आल्याचे सांगितले होते पण तो मेल हॅक करून पाठवण्यात आल्याचे नंतर उघड झाले. भाजपाला पराभव दिसू लागला आहे, देवेंद्र फडणवीससुद्धा निवडणूक हरत आहेत, त्यामुळे मानसिक संतुलन बिघडले असावे. काल राहुल गांधींबद्दल शहर नक्षलवाद्यांचे विधान केल्यानंतर हा अहवाल पुढे केला जात आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

सबरीमाला दर्शनासाठी मुंबईहून विशेष ट्रेन सोडावी ..

सबरीमाला अयप्पा सेवा समाजाची रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

मुंबई दिनांक ७ नोव्हेंबर २०२४

अय्यपन भक्तांसाठी मुंबई ते चेंगन्नूर (केरळ) या मार्गावर सबरीमालाला दर्शनासाठी जाण्याकरिता थेट विशेष ट्रेन सुरू करावी अशी मागणी सबरीमाला अयप्पा सेवा समाजाच्या प्रतिनिधींनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र लिहून केली. भाविकांची मागणी लक्षात घेता १६ नोव्हेंबर ते २० जानेवारी या काळात मुंबई ते चेंगन्नूर पर्यंत दर आठवड्याला एक विशेष ट्रेन सोडली जाईल अशी हमी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुंबई ते चेंगन्नूर (केरळ) या विशेष ट्रेनमुळे सुमारे एक लाख भाविकांना फायदा होणार आहे. यावेळी श्री. मणि बालन (सचिव, मुंबई भाजपा), श्री. मुथ्थू कृष्णन (दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष), माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री. व्ही. मुरलीधरन यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

भारती विद्यापीठात बॉम्ब असल्याच्या ईमेलने खळबळ

पुणे-कात्रज परिसरात असलेल्या भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ईमेल कॉलेज प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिल्यावर पोलिस बीडीडीएस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन महाविद्यालय, हॉस्टेल खाली करुन सखोल तपासणी करण्यात आली. परंतु त्यानंतर सदर बाब अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, याप्रकरणी संबंधित अनोळखी ईमेल धारका विराधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कॉलेजच्यावतीने डॉ.मंदार दत्तात्र्य करमरकर (वय-५५, रा.पर्वती दर्शन, पुणे) यांनी पोलिसांकडे अज्ञात ईमेल धारका विराधात तक्रार दाखल केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांना एका अलोळखी व्यक्तीने संबंधीत इर्मल पाठवला होता. त्यामध्ये तमिळनाडूमधील एका घटनेचा उल्लेख करुन भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची चेतावणी देण्यात आली. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.

बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सर्व ठिकाणी तपासणी करत वस्तीगृहाची देखील झाडाझडती घेतली. याप्रकारामुळे महाविद्यालयात खळबळ उडून धावपळ झाली. पोलिसांनी ईमेलची तपासणी केली असता तो विदेशातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ईमेल मध्ये कोणती स्पष्ट धमकी नव्हती किंवा ईमेल करणाऱ्याचा उद्देश स्पष्ट कण्यात आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.

अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त अन्न पदार्थांचा २४ लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे, दि. ७ : दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे विभागात व जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती आदी अन्न पदार्थांचा एकूण २४ लाख ७ हजार ९१८ रूपयांचा साठा जप्त केला आहे.

दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ४८ तर अन्न आस्थापनेतून अन्न पदार्थांचे एकूण ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तसेच गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा, वनस्पती व भगर आदी अन्न पदार्थाचा एकूण १४ लाख ८८ हजार ३९८ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

पुणे विभागात ८३ अन्न आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या तर अन्न पदार्थाचे एकुण १०२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भेसळीच्या संशयावरुन विविध अन्न आस्थापनांवर छापे टाकून जप्ती करण्यात आली. या मोहिमेत भेसळयुक्त अन्न पदार्थाचा ९ लाख १९ हजार ५२० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. दोन्हीही ठिकाणचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याप्रमाणे पुढील कारवाई घेण्यात येईल.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे पुण्यातील सर्व सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पार पाडली. सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थामध्ये भेसळ संदर्भात काही संशय असल्यास जागरुक नागरीकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

पुणे, दि. 7 : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु”, अशी शपथ पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी घेतली.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी याठिकाणी मतदान जनजागृती पथकाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भिमाले गार्डन सॅलेसबरी पार्क, ह्युममॅकनरी शाळेजवळ तसेच मार्केट यार्ड भाजी मंडई, गगनविहार हौसिंग सोसायटी संदेशनगर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. तर सुवर्ण मंदिर शेजारी तळजाई समाज मंदिर या ठिकाणी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.

येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार सहायता ॲप तसेच सिव्हिजील ॲपबद्दल माहितीही देण्यात आली. आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करुन मतदानाचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी १०० टक्के मतदान करणार असल्याचा संकल्प केला.

यावेळी स्वीप पथकाचे नोडल अधिकारी संपदा काळे, अमोल लावंड, गिरीश दारवटकर, लोकेश सुर्वे, पर्यवेक्षक सौरभ जाधव, रविंद्र पाटील, दत्तात्रय हरपळे यांच्यासह बीएलओ उपस्थित होते.