पुणे-छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहले आहे, त्यांच्या पुस्तकामध्ये एक मोठा दावा करण्यात आला आहे. मी या विषयावर संसदेतही अनेकदा बोलली आहे. माझ्या अनेक भाषणात मी सांगितले की यंत्रणेचा गैरवापर करत पक्ष फोडणे, घर फोडणे हे पाप आणि असंविधानिक गोष्टी अदृक्ष शक्ती हे संपूर्ण देशात सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या दाव्याबद्दल बोलताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, माध्यमांनुसार 95 टक्के ईडी, आयकर आणि केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर विरोधकांवर सुरू आहे, असे मी अनेकदा सांगितले आहे, त्याचा उल्लेख राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका लोकशाहीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत पारदर्शक निवडणूक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो. आमच्या मविआच्या आणि मित्रपक्षाचा आम्ही एकत्र प्रचार करत आहोत.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहले यातले काहीही खोटे असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे.
भुजबळ साहेब तुम्ही खरे बोललात ह्या बद्दल आभार, बीजेपी जातीवादी आहे हे बोलण्याची हिम्मत तुम्हीच दाखवू शकता, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
पुस्तकामध्ये म्हटलंय की, भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते, आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात या गोष्टी नोंदवण्यात आल्या आहेत. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य सांगितल्याचे पुस्तकात दिसून येते.
भुजबळांनी वृत्त फेटाळले
छगन भुजबळ यांंनी आज तातडीने पत्रकार परिषद घेत असे दावे केल्याचे वृत्त फेटाळले. विशेष म्हणजे मी अशी कुठलीही मुलाखत लोकसत्ताला दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढे देखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नाही तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो. मी हे पुस्तक स्वत: वाचणार असून माझ्या वकीलांनादेखील देणार आहेय निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे.