पुणे – पुण्याला पाण्याचे ऐतिहासिक सौख्य लाभलेले असताना , पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणात मुबलक पाणी असताना पुण्यातील बहुसंख्य भागात आज दुसर्या दिवशी पाण्यावाचून नागरिक सैरावैरा करत असल्याचे दिसले , पाणी विकतही मिळेना अशी स्थिती प्रथमच पुणेकरांनी अनुभवली . गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण शुक्रवारी हा पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत न संपल्याने पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.आज सकाळी पाणी येईल या भरवशावर बसलेल्या नागरिकांना दिवसभर पाणी मिळाले नाही. अनेकांच्या घरात तर सकाळचे विधी उरकण्यासाठी देखील पाणी नव्हते. पिण्यासाठी जार विकत घेण्याची नामुष्की पुणेकरांवर ओढावली.पण हे जार हि संपले . आणि बाजारात अवघ्या १० / १० रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या तेवढ्या उपलब्ध दिसू लागल्या. या ‘पाणी’बाणी चे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पडसाद उमटले.अतिरिक्त आयुक्तांनी सभेत सांगितले दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल तर पानिपुअर्वथ प्रमुखांनी सांगितले दुपारी ३ वाजेपर्यंत सुरळीत होईल पण संध्याकाळी ७ वाजता पाणीपुरवठा सुरळीत होऊ लागला ९ वाजेपर्यंत तो सर्वत्र सुरळीत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
महापालिकेकडून देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. २३) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (ता. २४) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी येईल, असे स्पष्ट केले होते. आज ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा दोन ते तीन तास उलटून गेले तरीही पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांना, अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा सुरू केली. अनेकांनी सकाळीच टॅंकर मागविण्याचा प्रयत्न केला; पण अचानक वाढलेल्या मागणीमुळे टॅंकरही उशिरा मिळाले. घरात पाणी नसल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच गैरसोय झाली.
उन्हाळ्यामुळे शहरात आधीच कमी व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची तारेवरची कसरत सुरू आहे. गुरुवारी पाणी नसणार हे माहिती असल्याने नागरिकांनी घरात एका दिवसासाठी पाण्याची साठवण केली. सोसायट्यांनी टँकर मागवून टाक्या भरून घेतल्या होत्या. शुक्रवारी पाणीपुरवठा नियोजित वेळेपेक्षा खूप उशिराने किंवा सायंकाळी होईल, अशी पूर्वकल्पना पाणीपुरवठा विभागाने दिलेली नव्हती. त्यामुळे नागरिक पाणीपुरवठा विभागावर विश्वास ठेवून आज पाण्याची वाट बघत बसले. पण पाणी आले तर नाहीच, ते कधी येणार याचेही उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले. याचा सर्व राग नगरसेवक, अन्य राजकीय पुढारी यांच्यावर काढण्यात आला.वेळापत्रक बिघडले
सकाळी वेळेवर पाणी न आल्याने घरात स्वयंपाक करण्यासाठी देखील पाणी नव्हते. तसेच अंघोळ व अन्य कारणांसाठी पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांचे वेळापत्रक कोलमडून गेले. अनेकांना कार्यालयात जाण्यासाठी उशीर झाला, तर काहींनी आंघोळ न करता कार्यालय गाठले. सोसायट्यांनी टँकर मागवून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण टँकरची प्रचंड मागणी वाढल्याने टँकरसाठी बराच वेळ वाट पाहावी लागत होती. काहींनी ज्यांच्याकडे बोअरवेल आले अशांकडून तात्पुरते पाणी घेऊन कामे उरकली. महिलांसह नोकरदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

