पुणे, दि. 7 : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु”, अशी शपथ पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी घेतली.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी याठिकाणी मतदान जनजागृती पथकाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भिमाले गार्डन सॅलेसबरी पार्क, ह्युममॅकनरी शाळेजवळ तसेच मार्केट यार्ड भाजी मंडई, गगनविहार हौसिंग सोसायटी संदेशनगर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. तर सुवर्ण मंदिर शेजारी तळजाई समाज मंदिर या ठिकाणी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार सहायता ॲप तसेच सिव्हिजील ॲपबद्दल माहितीही देण्यात आली. आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करुन मतदानाचे महत्व यावेळी पटवून देण्यात आले. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनी १०० टक्के मतदान करणार असल्याचा संकल्प केला.
यावेळी स्वीप पथकाचे नोडल अधिकारी संपदा काळे, अमोल लावंड, गिरीश दारवटकर, लोकेश सुर्वे, पर्यवेक्षक सौरभ जाधव, रविंद्र पाटील, दत्तात्रय हरपळे यांच्यासह बीएलओ उपस्थित होते.