पुणे, दि. १३ नोव्हेंबर, २०२४ : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, हेच ध्येय बाळगून गेल्या पाच वर्षांत मनापासून काम केले. औंध, मॉडेल कॉलनी, बोपोडी अशा विविध भागांतील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दिशेने भरीव प्रयत्न केले आणि विकासकामांना गती दिली. अशी भावना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.
औंध भागात स्मशानभूमीचे सुशोभीकरण, कुटीर रुग्णालयात सोयीसुविधा, जगदीशनगर सोसायटी, इंदिरा वसाहत, कस्तुरबा वसाहत येथे हायमास्ट दिवे, बॉडी गेट पोलिस लाईन, इंदिरा वसाहत येथे विद्युत तारा भूमिगत करणे, औंध गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशोभीकरण, सुलभ शौचालयाच्या दुरुस्तीची कामे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळे मतदार संघात सर्वत्र मतदारांच्या भेटी घेत असून नुकतीच त्यांनी औंध येथील प्रिसम सोसायटी, वेस्टर्न रिव्हर व्ह्यू सोसायटी, सेल्वेन हाईटस सोसायटी, निर्मिती होरिझोन सोसायटी यासोबतच दीप बंगला चौक, मित्र नगर कॉलनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक स्मारक, मॉडेल कॉलनी येथील बर्ड वॉचिंग सेंटरची दुरुस्ती, भोसलेनगर येथे महावितरणचे रिंग मेन युनिट बसविणे, नॉव्हेल्टी हेरिटेज को-ऑप. हौसिंग सोसायटी येथे भूमिगत केबल टाकणे, ही कामेही मार्गी मागील पाच वर्षांत मार्गी लागले आहेत. तसेच गणेश सोसायटी, खाऊ गल्ली लेन, हर्डीकर हॉस्पिटल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आनंद यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी येथील लकाकी तळे रोड व अन्य भागात ड्रेनेज लाईन टाकल्या असून या भागातील नागरिकांचे जीवन आणखी सुखकर करण्यासाठी आणखी खूप काही करायचे असल्याचेही शिरोळे म्हणाले.
या परिसरासाठी येत्या काळात शासकीय संस्थांची मैदाने नागरिकांसाठी खुली करणे व इतर मैदाने सुसज्ज करणे, मेट्रो स्थानकांपर्यंत येण्या-जाण्यासाठी फीडर बस आणि रिक्षासेवेची उपलब्धता, मॉडेल कॉलनी, औंध येथील ‘पीएमपीएल’च्या बसथांब्यांचे नूतनीकरण, औंध आयटीआयचे अद्ययावतीकरण, युपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे, ओपन जिम, जलतरण तलाव, तसेच मॉडेल कॉलनीमध्ये ‘एमएनजीएल’चे नेटवर्क पूर्ण करणे, ही कामे प्रस्तावित असून लवकरात लवकर ती पूर्ण होतील असे आश्वासन शिरोळे यांनी दिले.
तंत्रज्ञानाच्या मदतीने ५७ वर्षीय महिलेच्या मेंदूतील दुर्मिळ मेनिन्जिओमा गाठीवर उपचार
पुणे,१३ नोव्हेंबर २०२४ – तीव्र डोकेदुखीमुळे आणि चालण्यामुळे देखील असह्य वेदनेने त्रस्त असलेल्या ५७ वर्षीय महिलेवर पुण्यातील हडपसर येथील सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन तिला जीवनदान दिले. या महिलेला अतिशय दुर्मिळ मेनिन्जिओमा ही मेंदूच्या गाठीचा आजार झाला होता. सततच्या जीवघेण्या वेदनेने ही महिला पुरती कंटाळली होती. तिने अनेक रुग्णालयात उपचार घेतले होते परंतु महिलेच्या वेदना कमी झाल्या नव्हत्या. मेंदूच्या मागील भागांत आणि पाठीच्या कण्यात दोनपेक्षा अधिक गाठ निर्माण झाल्याने ही महिला असह्य यातना भोगत होती. अशी केस मेंदूची गाठ असलेल्या केवळ १ ते १० टक्के रुग्णांमध्ये आढळते.
हडपसर येथील सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. सिराज बसाडे यांनी शस्त्रक्रियेच्या मदतीने या महिलेच्या मेंदूतील दुर्मिळ मेनिन्जिओमा गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी डॉक्टरांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली.
शारिरीक वेदना असह्य झाल्याने या महिला रुग्णाला तिच्या कुटुंबीयांनी सह्याद्रि सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तीव्र डोकेदुखी तसेच अशक्तपणा आणि पायांमध्ये कडकपणा आल्याने ही महिला त्रासलेली होती. रुग्णाची शारिरीक अवस्था पाहून डॉक्टरांनी तातडीने तिची वैद्यकीय तपासणी केली. एमआरआय अहवालात असे आढळून आले की गाठीमुळे रुग्णाला, मेंदूच्या मागच्या बाजूला, लहान मेंदू आणि मज्जारज्जू यावर खूप दाब निर्माण झाला होता तसेच त्या गाठीमुळे मेंदूतील प्रवाह सुरळीत होत नव्हता. परिणामी तिला असह्य डोकेदुखी जाणवत होती.
डॉक्टरांनी तातडीने रुग्णावर वॅन्ट्रीकुलोपॅरिटोनिअल प्रक्रिया सुरु केली. या उपचारांत महिलेच्या मेंदूतील अतिरिक्त स्त्राव काढला केला. त्यानंतर रुग्णाची डोकेदुखी नियंत्रणात आली. काही दिवसांनी महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांनी मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेंदूची कवटी मागच्या बाजूने उघडून गाठ काढण्याचे ठरले. या शस्त्रक्रियेला पॉस्टेरिअर फॉस्सा क्रॅनिओटोमी असे संबोधले जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय जटील आणि गुंतागुंतीची असते. शस्त्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी मॉनिटरींग मशीनची मदत घेतली. अखेरिस मेंदूतील गाठ यशस्वीरित्या काढण्यात वैद्यकीय पथकास यश आले.
याबद्दल अधिक माहिती देताना ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ सिराज बसाडे यांनी सांगितले की, “ही केस दुर्मिळ होती कारण या महिलेच्या मेंदूतील ज्या भागात गाठ होती तशी गाठ मेंदूत गाठ निर्माण झालेल्या एक लाख रुग्णांपैकी एकामध्ये आढळून येते. त्यामुळे आम्हांला या गुंतागुंतीच्या शास्त्रक्रियेदरम्यान येणाऱ्या संभाव्य धोकयांची कल्पना होती. म्हणूनच आम्ही शस्त्रक्रिया अचूक होण्यासाठी इंट्रा-ऑपरेटीव्ह मॉनिटरींग मशीन आणि अल्ट्रासाऊण्डची मदत घेतली गेली.आणि या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही मेंदूतील गाठ कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरित्या बाहेर काढू शकलो.”
शस्त्रक्रिया सुखरुप पार पाडल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा दिसून आल्या. फिजिओथेअरपीच्या मदतीने तिच्या स्नायूंना बळकटीकरण मिळाले आणि काही दिवसातच ही महिला सामान्य माणसांप्रमाणे चालू लागली.
रुग्ण आणि तिच्या कुटुंबियांनी सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाचे त्यांना मिळालेल्या उत्कृष्ट उपचाराबद्दल आभार व्यक्त केले. “आम्ही पुण्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये भेट दिली होती, परंतु सह्याद्रिहॉस्पिटलमध्ये मिळत असलेल्या उपचारांमुळे आम्हाला आशा वाटली. आमच्या आप्ताचे आयुष्य परत मिळवून दिल्याबद्दल डॉ. बसाडे आणि सह्याद्रिचे आम्ही कायमचे आभारी असू,” असे रुग्णाच्या कुटुंबाने म्हटले.
रुग्णांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो हे या केसमध्ये अधोरेखित होते. सह्याद्रि हॉस्पिटल्सची रुग्णसेवेप्रति असलेली तत्परता आणि अचूक शस्त्रक्रियेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या केसमधून दिसून येतो.
पुणे, दि. १३: सिंपल स्टेप्स फिटनेस या संस्थेतर्फे सिंहगड किल्ला येथे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी रन इव्हेंट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या दोन दिवशी सिंहगडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केली आहे.
रन इवेंट मॅरेथॉन स्पर्धेमध्ये साधारणपणे ४०० धावपटूंसह मार्गदर्शक, स्वयंसेवक व प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कळविले आहे. त्यामुळे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी सिंहगड घाट रस्ता मार्गात वर्दळ व गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पर्यायी मार्ग: या दोन दिवशी वाहतुकीला पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. हवेली पोलीस ठाणे हद्दीतून गोळेवाडी मार्ग घाटरस्ता मार्गे खेड-शिवापुर येथे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ती डोणजे-खडकवासला-वडगाव धायरी मार्गे नवीन कात्रज बोगदा येथून खेड शिवापूर येथे पर्यायी मार्गाने जाईल. राजगड पोलीस ठाणे हद्दीतून कोंढणपूर येथून घाटरस्ता मार्गे सिंहगड किल्ला- गोळेवाडी येथे येणारा रस्ता पूर्णपणे बंद राहणार असून वाहने डोणजे गावाकडे जाण्याकरीता खेड शिवापूर-शिंदेवाडी-नवीन कात्रज बोगदा या पर्यायी मार्गे वडगाव धायरी येथून खडकवासला डोणजे मार्गे गोळेवाडीकडे जातील.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या आदेशात नमूद केले आहे.
पुणे, दि. १३ : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम महत्वपूर्ण आणि तितकेच संवेदनशील असते. त्यामुळे आपसात समन्वय ठेवून सोपविलेली जबाबदारी त्यांनी यथोचितपणे पार पाडावी, असे निर्देश आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ८५९ मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण अवसरी येथील शांताबाई शेळके सभागृहात पार पडले . त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, प्रमिला वाळुंज, डॉ. सचिन वाघ आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, येणारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाची भूमीका महत्वपूर्ण आणि जबाबदारीची असते. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत असते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडणे हे अत्यंत महत्वाचे काम असते. त्यामुळे या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदारीचे व्यवस्थीतपणे आकलन करून घेवून समन्वयाने कामकाज पार पाडावे.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३४६ मतदान केंद्र असून त्यातील पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घडामोडीवर निवडणूक प्रशासनाचे लक्ष असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात येईल, मिळालेले साहित्य सूचीनुसार बरोबर असल्याची खातरजमा करावी. मतदान केंद्रावर साहित्यासह सुखरूप पोहोचल्याचा अहवाल त्याच दिवशी क्षेत्रीय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अभिरूप मतदानाची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार पार पाडावी. मतदान केंद्रासाठी असलेल्या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र आणि व्हिव्हिपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी, तलाठी व मास्टर ट्रेनर यांनी याबाबतचे प्रशिक्षण दिले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे यांनी मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र कमिशनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. कमिशनिंग प्रक्रियेवेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
पुणे, दि. 13 : पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
पुणे महानगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण सत्रामध्ये मतदान यंत्र आणि व्हिव्हिपॅट बद्दल माहिती देण्यात आली. मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, पारदर्शकता, मतदारांची ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया, मतपेटी हाताळणी आणि ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची कार्यप्रणालीची माहिती श्री. खैरनार यांनी दिली. कर्मचाऱ्यांना मशीनच्या सुसज्जतेबाबत दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मतदान केंद्रांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तंत्रांचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले.
मतदानासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींचे सविस्तर माहिती तसेच मतदान यंत्राच्या हाताळणीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश श्री. खैरनार यांनी यावेळी दिले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून; ‘दादा तुमचा विजय नक्कीच आहे. आम्ही देखील जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत आहोत,’ अशा भावना व्यक्त होत आहेत.
विधानसभा निवडणुकीला आता एक आठवडा बाकी आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी कोथरुड मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे. बुधवारी प्रभाग क्रमांक ३१ मधील प्रथितयश व्यक्तींच्या घरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. या भेटींमुळे नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक भेटीत चंद्रकांतदादा पाटील यांचे अतिशय उत्साहाने स्वागत होत आहे.
कोथरूड मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने समर्पित लोकसेवा, आणि विविध विकासकामांमुळे नागरिकही समाधानी असून; मतदारसंघात व्यापक जनसमर्थन मिळत आहे. त्यामुळेच, “दादा तुमचा विजय पक्का आहे! आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेतच. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून, आम्ही सर्वजण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरुन काम करत आहोत, अशी भावना कर्वेनगर मधील लोटस सोसायटीतील रहिवास्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना नेते किरण साळी, माजी नगरसेवक आणि कोथरुड मतदारसंघाचे महायुतीचे समन्वयक सुशील मेंगडे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेविका वृषाली चौधरी, भाजपा नेते विठ्ठल आण्णा बराटे, विशाल रामदासी, महेश पवळे, दत्ताभाऊ चौधरी, युवा मार्चाचे आदित्य बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकशेठ दुधाने, संतोष बराटे, प्रतिक नलावडे आदींसह महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिरूर : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माईनगरी (बो-हाडे मळा) शिरूर येथे शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ गुरूवारी (ता.१४) रोजी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे , पोपटराव पवार(आदर्श सरपंच- हिवरे बाजार),श्री नानजी भाई ठक्कर (ठाणावाला ) व इतर मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार असल्याची माहिती विनय सिंधुताई सपकाळ यांनी दिली.
समाजातील दानशूर व माई परिवारा वर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी सहकार्य केल्याने, आदरणीय माईं चे हे महान कार्य पुढे सुरू असून त्याचा शेकडो अनाथ लेकरांना फायदा होत आहे. नागरिकांच्या प्रेमाच्या जोरावर शिरूर येथील अनाथ लेकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘माईनगरी’ शिरूर येथील शारदार्जुन व्हटकर बाल भवन ‘माईनगरी’ आश्रमाचे पायाभरणी समारंभ बालदिन आणि आपल्या लाडक्या माईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरूवारी (ता.१४) रोजी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याची व रक्तदान शिबीरात सहभाग घेण्याची विनंती ” माईनगरी ” चे संचालक विनय सिंधुताई सपकाळ यांनी केले आहे.
पुणे: वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी प्रचारादरम्यान खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करून पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे.
खराडी भागात झालेल्या प्रचार फेरीमध्ये त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन हे आश्वासन दिले. यावेळी प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. यशवंत नगर, बोराटे नगर, राघवेंद्र नगर, तुकाराम नगर, शेजवळ पार्क, सोनाई पार्क, विडी कामगार वसाहत परिसरात पठारे यांनी झंझावती प्रचार केला. प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.
बापूसाहेब पठारे म्हणाले, “खराडी-शिवणे रस्ता झाल्यास नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. एक चांगला पर्यायी मार्ग म्हणून संपूर्ण मतदारसंघासोबतच पुणेकरांना मोठा फायदा होईल. मागील १० वर्षात या रस्त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आले. हा रस्ता कुणी रखडवला? वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू शकणारा हा रस्ता अर्धवट का सोडला? असे अनेक प्रश्न आहेत. खराडी-वडगावशेरी-कल्याणीनर-वारजे-शिवणे नदीकाठच्या रस्त्याचे काम तातडीने पुर्ण व्हावे, यासाठी मी वारंवार तत्कालीन शासनकर्ते, पालकमंत्री, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. परंतु, हे काम पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असेही पठारे यांनी सांगितले.
या पदयात्रेच्या प्रसंगी माजी राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण सहभागी होत्या. या पदयात्रेत सहभागी होत त्यांनी बापूसाहेब पठारे नक्की निवडून येतील यात काही शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला. “आमदारकीच्या काळात पठारे यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली असून, त्याचा फायदा मतदानात त्यांना होणार आहे. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून ते या मतदारसंघाला न्याय देतील”, असेही त्या म्हणाल्या.
सोयाबीन, कापसाच्या कमी भावामुळे शेतकरी संकटात, सोयाबीनला ६ हजारांचा भाव देण्याच्या फडणविसांच्या आश्वासनाचे काय झाले?
मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या लातूर व अक्कलकोटमध्ये जाहीर सभा.
लातूर/मुंबई, दि. १३ नोव्हेंबर २०२४ देश एक आणि अखंड आहे तरीही भाजपाचे नेते बटेंगे कटेंगेचा नारा देऊन दिशाभूल करत आहेत. भाजपा आरएसएसमधील कोणीही देशासाठी बलिदान दिलेले नाही परंतु देशाच्या एकता व अखंडतेसाठी काँग्रेस पक्षाच्या तीन नेत्यांनी बलिदान दिले आहे. भाजपा व आरएसएस संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान मनुस्मृतीच्या तत्वावर आधारीत नाही म्हणून भाजपा आरएसएसने रामलिला मैदानात संविधान जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लातूर व अक्कलकोट येथे मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. लातूरच्या सभेला तेलंगणाचे वरिष्ठ मंत्री उत्तमकुमार रेड्डी, माजी मंत्री दिलीप देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूसाला योग्य भाव मिळत नाही. नरेंद्र मोदी कृषी मालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहेत पण सोयाबीन कापसाच्या एमएसपी मध्ये वाढ करत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला 6000 रुपये प्रतिक्विंटल एमएसपी देऊ, असे सांगितले होते मात्र ते दिले नाही. भाजप सरकार दिलेली आश्वासने कधीच पाळत नाही. भाजपा युतीच्या खोटारड्या व फसव्या सरकारला सत्तेवरून उखडून टाका आणि महाविकास आघाडीचे, लोकांच्या हिताचे सरकार स्थापन करा असेही खर्गे म्हणाले.
माजी मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीने पंचसुत्री कार्यक्रम दिला असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. महिलांना ३ हजार रुपये तसेच २५ लाखांचे विमा कवच दिले जाणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत सहभाही होऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान पुर्नस्थापित करण्यासाठी ही लढाई असून २३ तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतवर येईल आणि २०२९ साली इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी कामाला लागा असेही अमित देशमुख म्हणाले.
काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर मित्रपक्षाने अगदीच चुकीचे उमेदवार दिले. त्यांनी आपल्या जागांचा एकूण आकडा वाढवण्यासाठी असे केले. पण त्यांनी दिलेल्या उमेदवारांची निवडून येण्याची कोणतीही शक्यता नाही. हे उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत हे मी सांगणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचेही उमेदवार बंडखोर झालेत. दोन-तीन उदाहरणे माझ्या डोळ्यांपुढे आहेत. हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. पण पुढे नेमके काय होईल? हे मला माहिती नाही.
मुंबई-. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मविआच्या जागावाटपातील चुकांवर बोट ठेवले. आमच्या मित्रपक्षांनी आपल्या जागांचा आकडा वाढवण्यासाठी दिलेले काही उमेदवार निवडून येण्याची अजिबात शक्यता नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
पृथ्वीराज चव्हाण एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की,काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर मित्रपक्षाने अगदीच चुकीचे उमेदवार दिले. त्यांनी आपल्या जागांचा एकूण आकडा वाढवण्यासाठी असे केले. पण त्यांनी दिलेल्या उमेदवारांची निवडून येण्याची कोणतीही शक्यता नाही. हे उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत हे मी सांगणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचेही उमेदवार बंडखोर झालेत. दोन-तीन उदाहरणे माझ्या डोळ्यांपुढे आहेत. हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. पण पुढे नेमके काय होईल? हे मला माहिती नाही.,
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत काही चुका झाल्या. या चुका प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये झाल्या. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी पाठवले. ते स्वतः प्रचारासाठी मोकळे राहिले. याऊलट आमच्या बाजूने सर्वच नेते स्वतः वाटाघाटीसाठी गेले. यामुळे रस्त्यावर कुणीच उरले नाही. काँग्रेस पक्षाने अंतर्गत बैठक घेऊन, या मुद्यावर गांभीर्याने चर्चा करून जागावाटपावरील आपली भूमिका ठरवण्याची गरज होती.
जागावाटपात सुरुवातीला अवास्तव भूमिका मांडण्या आली. म्हणजे हे ही चांगले आणि ते ही चांगले. पण प्रत्यक्ष चर्चेला गेल्यानंतर त्यातील काहीची झाले नाही. वाटाघाटीत काँग्रेस कमी पडली हे आम्ही मान्य करोत. पण या प्रकरणी फार चुका झाल्या असे काहीही नाही. पहिली यादी फार चांगली होती. दुसऱ्या यादीत तडजोडी कमी झाल्या. पण काँग्रेसला जागावाटपात फार जास्त जागा मिळणे व्यवहार्य नव्हते हे तेवढेच खरे होते, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सचिन आखाडे, सहाय्यक अधिकारी नारायण पवार, गजानन किरवले, लक्ष्मीकांत गव्हाणे, विवेक गावंडे,महादेव दुधाळ,वंदना छाडीकर, मीना शिंदे,शेखर मते, रवी बडेकर आणि गजेंद्र खैरमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जात आहे. या प्रक्रियेत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडणी करण्यात येते, तसेच उमेदवारांचे चिन्ह (सिम्बॉल) यंत्रांमध्ये अपलोड केले जाते. प्रत्येक यंत्राची कार्यक्षमता तपासण्यासाठी mock poll (प्रात्यक्षिक मतदान) घेतले जाते, ज्याद्वारे यंत्रांमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याची खात्री केली जाते. या तपासणी आणि प्रात्यक्षिक प्रक्रियेनंतर यंत्रे शीलबंद करून प्रत्यक्ष मतदानासाठी तयार करण्यात येतात. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही सहभागी आहेत, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रत्येक यंत्राची तपासणी अत्यंत काटेकोरपणे केली जाते. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये आणि मतदारांचा विश्वास दृढ राहावा, यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांना सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदानाचा अनुभव मिळेल, असे निवडणूक अधिकारी डॉ. माने यांनी सांगितले.
पुणे -मराठी भाषेला अभिजात भाषास अभिजात दर्जा देण्याची अनेक वर्ष मागणी झाली पण काँग्रेसने कधी त्याची पूर्तता केली नाही. आम्ही हे काम करून आमची जबाबदारी निभावली आहे. विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. वीर सावरकर यांना सतत ते शिव्या देतात. आघाडीला मी आव्हान देतो की, राहुल गांधी यांच्या तोंडून त्यांनी वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी. काँग्रेस ला केवळ सत्ता हवी त्याकरीता त्यांनी तुष्टीकरण खेळ खेळला आणि तेच काँग्रेस दलीत, आदिवासी, मागासवर्गीय यांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करेल. त्यामुळे जनतेने सावध राहावे आणि हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे. ही निवडणूक देशाला विकासाच्या वाटेवर नेणारी आहे. देश विरोधी ताकद यांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे
असे मत पंतप्रधान नरेंद्र यांनी मंगळवारी पुण्यातील स.प.महाविद्यालय येथे आयोजित प्रचार सभेत व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील दहा अशा एकूण ३१ विधानसभा मतदासंघातील महायुती उमेदवार प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे , खासदार श्रीरंग बारणे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर,शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे , आरपीआय शहराध्यक्ष संजय सोनवणे , यांच्यासह ३१ मतदारसंघातील उमेदवार उपस्थित होते. याप्रसंगी केशव शंखनाद ग्रुप यांनी शंखनाद करत उपस्थितांची मने जिंकली.
पुण्यातील लाडक्या बहिण आणि भाऊ यांना माझा प्रणाम असे मराठी मध्ये भाषणाला सुरवात करत मोदी म्हणाले, मी महाराष्ट्र मध्ये विविध भागात फिरलो असून जनतेचे अभूतपूर्व समर्थन मला मिळत आहे. विमानतळ ते सभा स्थळ अनेक लोक गर्दी करून अभिवादन करत होते. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत येईल. पुणे आणि भाजप यांचा संबंध विचार, संस्कार, आस्था असा आहे. महायुती सरकार आगामी काळात वेगाने विकास करेल. पुण्यात पुढील पाच वर्ष विकासाची नवीन उड्डाण करण्याची असतील. परकीय गुंतवणूक मध्ये रेकॉर्ड ब्रेक देशात गुंतवणूक झाली असून गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात या भागात नवी गुंतवणूक होत असून स्टार्टअप द्वारे तरुणांना लाभ मिळाला आणि रोजगार निर्मिती झाली. पुण्याचा ऑटोमोबाईल क्षेत्र वेगळी ओळख आहे. नागरिकांची स्वप्ने आणि आवश्यकता या माझ्या ऊर्जा आणि योजना कामाचा आधार आहे. पुण्यात मेट्रो जाळे विस्तारीकरण होत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. रिंगरोड , मीसिंग लिंक प्रकल्प यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पालखी मार्ग देखील वेगाने निर्माण होत असून ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही समर्पित सेवा आहे. महायुती पूर्वी जे सरकार राज्यात चालवत होते त्या आघाडीला सांगण्यासारखे काही विकास प्रकल्प नव्हते. विकासासाठी एकच विकल्प आहे महायुती आहे तरच राज्याची गती आणि प्रगती आहे. काँग्रेसच्या कट करस्थनाचा भाग कर्नाटक मध्ये दिसून येत आहे. तिथे सरकार बनले पण काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्तता केली नाही. केवळ घोटाळे समोर येत आहे. या लुटीचा पैसा महाराष्ट्र मध्ये पाठवून निवडणूक लढवली जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. काँग्रेसने जम्मू काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महाराष्ट्र मध्ये कोरे संविधान पुस्तके ते वाटप करतात. सात दशक संविधान देशात लागू का नव्हते याबाबत त्यांनी भूमिका मांडावी. जम्मू काश्मीर मध्ये संविधान प्रथमच लागू झाले आहे कारण जनतेने मोदीला सेवा संधी दिली. आम्ही कलम ३७० जमिनीत गाडले आहे. या कलमाने जम्मू आणि काश्मीर देशापासून वेगळे ठेवले, आतंकवादला प्रोत्साहन दिले. आज काश्मिरच्या लाल चौकात तिरंगा डौलाने फडकत असून दिवाळी देखील तिथे साजरी झाली. सात दशक जी भाषा पाकिस्तान बोलत होती ती भाषा आज काँग्रेस बोलत आहे. जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याची भाषा काँग्रेस बोलत असून ते देश किंवा महाराष्ट्र सहन करणार नाही.
अजित पवार म्हणाले, नेहमी पुणेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. देशात मोदी सरकार दूरदृष्टी मधून गतीने विकास करत आहे. महाराष्ट्राचा विकासाचा वेग गतीने वाढवला जाईल. निवडणुकीत अनेक नेते येतात आणि आरोप व प्रत्यारोप होत असतात. देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचा मान मोदी यांना मिळाला आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात वाढवणं या जागतिक बंदर निर्मितीसाठी निधी मंजूर केला. राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या सरकारला मिळणाऱ्या निधीपैकी निम्मा निधी शासकीय पगारावर जातो आणि बाकी निधी विकास कामास वापरला जातो. पण आघाडी सरकारने ज्या घोषणा केल्या त्यासाठी तीन लाख कोटी रुपये लागत असून ते विकास कसा साधणार याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी . केंद्र आणि राज्य मध्ये एक विचारांचे सरकार आले तर विकास गतीने होतो त्यानुसार जनतेने आम्हाला ताकद द्यावी.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशातील सर्वाधिक भेटी पुण्याला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. कोविड काळात देशाने जगातील १०० देशांना लस पुरवली, जी -२० परिषद आयोजन केले. देशातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचा विचार करून योजना राबवल्या गेल्या आहे. काँग्रेसने देशात गरीबी हटवली नाही पण मोदी सरकारने दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्य रेषेवर आणले. विमानतळ संख्या १५७ पर्यंत वाढवले. नवे १६ एम्स सुरू करण्यात आले. दिवसाला २८ किमी नवे रस्ते तयार होत आहे. अयोध्या राम मंदिर तयार झाले, जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० हटवले गेले. दहा वर्षात महाराष्ट्रसाठी दहा लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून दिले गेले आहे. साडेसात हजार कोटी रुपये राज्यातील साखर कारखान्यांना मदत दिली गेली आहे.
रामदास आठवले म्हणाले, ‘ज्या जिल्ह्यांनी अनेकांची जुळवली मने, त्या जिल्ह्याचे नाव आहे पुणे ‘, ‘ आज देशात इतिहास घडत आहे नवा, कारण आजही देशात आहे मोदी यांचा करिश्मा ‘ , ‘जगभर होत आहे नरेंद्र मोदींची स्तुती ,म्हणूनच घडत आहे जगात भारताची स्तुती ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य सभा होत आहे. माझ्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी असून ज्यांना न्याय हवा त्यांनी माझ्याकडे या, ज्यांना नको त्यांनी कुठेही जावा. आघाडी ही झोपेत असून त्यांना माहिती नाही आम्ही काय तयार केली आहे. युतीला लोकसभेत कमी मते मिळाली नाही पण त्यांनी खोटा प्रचार केला संविधान बदलणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बापाचे बाप आले तरी संविधान बदलणार नाही. मोदी यांना हरवण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहे. शरद पवार यांना मी सांगितले होते की, तुम्ही नरेंद्र मोदी यांचे सोबत या कारण विकासाला गती दिली पाहिजे. मला जागा मिळाल्या नाही तरी मी युती सोबत असून आघाडीच्या उमेदवारांचा काटा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू. चुकीच्या पद्धतीने आघाडी नेत्यांनी मुद्दे मांडून समाजाची दिशाभुल करू नका. आम्ही कोणत्या काँग्रेस नेत्याला कारागृहात टाकले नाही, ज्यांना जेल मध्ये जायचे ते जातात आणि येतात. १७० ते १८० उमेदवार आमचे निवडणुकीत निवडून येतील. सरकार आपले येणार आहे ‘मी काढतो आहे त्यांचा काटा,माझ्या पक्षाला मिळावा सत्तेत वाटा..’
चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगात एका क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण साहित्य आपण सुरवातीला आयात करत होतो पण आता एक लाख कोटींचे संरक्षण साहित्य निर्यात केले आहे. पुण्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्हा महायुती सरकार येण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पुण्याची भूमी ही संत आणि समाज सुधारक यांची भूमी आहे. पुण्यात पुन्हा एकदा महाविजय संकल्प झाला पाहिजे. महायुती काळात विकास कामांना निधी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून मिळाली आहे. विकास गंगा पुढे सुरू ठेवण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी.
डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुणे ते मुंबई दरम्यान अटल सेतू माध्यमातून सुखकर प्रवास झाला आहे. रोजगार निर्मिती , कल्याणकारी योजना अंमलबजावणी महायुतीने राबवली आहे. लाडकी बहिण योजना बाबत कोणता निधी कमी पडणार नाही पण त्याबाबत अपप्रचार केला जात आहे. महिला सुरक्षा बाबत सरकार गंभीर असून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.
पुणे:पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता प्रचारात रंगत आली असून अपक्ष उमेदवार आबा बागुल हे आजारी असल्याचे त्यांच्यासाठी आता मतदारच सरसावले आहेत. परिणामी या मतदारसंघात आता जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे घराघरात ‘ हिरा’ चाच गजर होत असल्याने आबा बागुल यांचा प्रचार विरोधकांना धडकी भरवणारा ठरला आहे.
आबा बागुल यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघ बागुल कुटुंबीय व मित्र परिवार पिंजून काढत आहेत. थेट -भेट, पदयात्रा, कोपरा सभा याद्वारे मतदारांशी संवाद साधत आहेत . त्याला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आबा बागुल आजारी असल्याने त्यांच्या पत्नी जयश्री बागुल यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. प्रचार प्रमुख हेमंत बागुल, अमित बागुल, कपिल बागुल, अभिषेक बागुल, सागर बागुल यांनी प्रचाराचे अचूक नियोजन केले आहे.पदयात्रांची आखणी, कोपरा सभांचे वेळापत्रकानुसार प्रचारावर भर दिल्याने संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त आणि आश्वासक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे समस्त बागुल कुटुंबियांचे मनोधैर्य उंचावले आहे.विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कोपरा सभांमध्ये जयकुमार ठोंबरे, नीता नेटके, बेबी राऊत, सुनीता नेमुर, राजिया बिलारी, इंगवले ताई यांच्यासह महाराणा प्रताप मंडळ, अखिल अप्पर मित्र मंडळ, दुर्गा माता नवरात्री उत्सव, पंचशील मित्र मंडळ, निळं वादळ ग्रुपच्या शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात प्रचारात आबा बागुल यांचीच सरशी असल्याचे चित्र आहे.
पुणे : जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित जीएसटीच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी पाठपुरावा करू. व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी दिले. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांना पुण्याच्या मध्यवस्तीतील तुळशीबाग मंडई लक्ष्मी रस्ता भोवरी आळी रविवार पेठ टिंबर मार्केट या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आज मेळावा घेऊन पाठिंबा दिला. यावेळी ते बोलत होते. राजेंद्र काकडे नितीन पंडित उमेश शहा किशोर लोढा दिनेश अमर शहा संजय मनोज पंकज साखरी या मनीष परदेशी संजीव फडतरे नयन ठाकूर वैभव लोढा हरीश शेट्टी गणपत जय हिंद सुनील इनामदार मनीष जाधव संजीव मंचे नितिन चिल्का अमित मनोज भारत लढे विनायक कदम किरण चौहान यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
रासने म्हणाले की, पुणे ही राज्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून कसबा मतदारसंघात सर्वाधिक बाजारपेठा आहेत. या परिसरातील व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत.तसेच, जीएसटी संदर्भातील मागण्या केंद्रशासनाकडे प्रलंबित आहेत. केंद्रात आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे राज्यशासनाचा प्रतिनिधी म्हणून व्यापाऱ्यांचे प्रश्न केंद्रशासनाकडे तातडीनं सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यावर आपला भर असणार आहे. उद्योगधंदे शहरात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर त्यांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केलाया भागातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी या भागातील व्यापाऱ्यांची नेहमीच सहकार्य मिळत असल्याने रासने यांनी व्यापाऱ्यांचे आभारही मानले.
पार्किंगचा प्रश्न निकाली काढणार
व्यापारी पेठांमध्ये वर्षभर ग्राहकांची गर्दी असते त्यामुळे, या भागात मोठया प्रमाणात पार्किंगची समस्या असून त्याने कोंडी होते. त्याचा परिणाम व्यावसायावरही होतो. ही बाब लक्षात घेऊन या भागासाठी उपलब्ध जागांवर विस्तारित पार्किंग उभारण्यास प्राधान्य देणार आहे. बाजारपेठ परिसरात सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा ची व्याप्ती वाढविणार आहोत. खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना संरक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देणार असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले.
पुणे, दि.१२: मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवडणूक निरीक्षक मानवेश सिंह सिद्धू, ललीत कुमार, भीम सिंह, पीगे लिगू, संजीव कुमार, के हिमावती, अरुंधती सरकार, गार्गी जैन, एम गौतमी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्षाच्या समन्वयक ज्योती कदम, जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे प्रत्यक्ष उपस्थित होते.
श्री. मिश्रा म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने कारवाई करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी. मतदान केंद्रांमधील नियोजन, पोलीस प्रशासनाची तयारी, वाहतूक नियोजन, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन आदी बाबींचा आढावा घेतला. पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करतानाच निवडणुकीची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विभागातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला आहे. सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यात येते. निवडणुकीत पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), आदर्श आचारसंहिता कक्ष (एमसीसी) पथकांद्वारे चांगले काम करण्यात येत आहे.
श्री. फुलारी म्हणाले, आंतरराज्य सीमेवर असणारे कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. यामध्ये पैसा, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींच्या अनुषंगाने तपासणी केली जात आहे, यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहील, असेही श्री. फुलारी म्हणाले.
डॉ. दिवसे म्हणाले, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांनी मतदारांना कोणताही त्रास न होता मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.
बैठकीनंतर श्री. मिश्रा यांनी माध्यम कक्षाला भेट देऊन विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक योगेश बोराटे यांनी कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. 0000