पुणे, दि. १३ : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम महत्वपूर्ण आणि तितकेच संवेदनशील असते. त्यामुळे आपसात समन्वय ठेवून सोपविलेली जबाबदारी त्यांनी यथोचितपणे पार पाडावी, असे निर्देश आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ८५९ मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण अवसरी येथील शांताबाई शेळके सभागृहात पार पडले . त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, प्रमिला वाळुंज, डॉ. सचिन वाघ आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, येणारी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाची भूमीका महत्वपूर्ण आणि जबाबदारीची असते. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत असते. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडणे हे अत्यंत महत्वाचे काम असते. त्यामुळे या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोपविलेल्या जबाबदारीचे व्यवस्थीतपणे आकलन करून घेवून समन्वयाने कामकाज पार पाडावे.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३४६ मतदान केंद्र असून त्यातील पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घडामोडीवर निवडणूक प्रशासनाचे लक्ष असणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात येईल, मिळालेले साहित्य सूचीनुसार बरोबर असल्याची खातरजमा करावी. मतदान केंद्रावर साहित्यासह सुखरूप पोहोचल्याचा अहवाल त्याच दिवशी क्षेत्रीय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अभिरूप मतदानाची सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार पार पाडावी. मतदान केंद्रासाठी असलेल्या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र आणि व्हिव्हिपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी, तलाठी व मास्टर ट्रेनर यांनी याबाबतचे प्रशिक्षण दिले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे यांनी मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र कमिशनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. कमिशनिंग प्रक्रियेवेळी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.